इर्फान-ए-गम

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
17 Apr 2013 - 2:46 pm

अगदी लहानपणी महिन्यातून एकदा कटींग करायला न्हाव्याच्या दुकानात जायला लागायचेच. अर्थात हे वेळ सकाळची असायची. तेथे रेडिओ सिलोनवर जुन्या गीतांचा कार्यक्रम हमखास लागलेला असायचा व त्यात शेवटी स्व. सैगल साहेबांचे गाणे लागायचे. आता त्या कार्यक्रमाचे नाव आठवत नाही........त्यात पहिल्यांदी ही गज़ल स्व. सैगल यांच्या आवाजात ऐकलेली आठवते आहे आणि काहीतरी वेगळे ऐकल्याची भावना जी मनात आली ती आजही मनातून जात नाही. माझे आजोबा पखवाज उत्तम वाजवायचे व त्यांना संगिताची उत्तम जाण होती. मला वाटते त्यांना थोडेफार फारसीही यायचे. घरी आल्यावर मी त्यांना पहिल्या दोन ओळींचा अर्थ विचारल्यावर त्यांनी मोठ्या गंभीरपणे मला सांगितले, ‘तुला तो आत्ता कळायचा नाही...आणि जरा अभ्यासात लक्ष द्या’ आजोबांनी अहोजाहो केल्यावर गप्प बसायचे असते एवढे कळण्याइतके मला वाटते माझे वय असावे. असो....कॉलेजमधे गेल्यावर मात्र एखादी हवी असलेली वस्तू समोर आल्यावर काय त्रास होतो ते कळायला लागले नंतर पहिल्या दोन ओळींचा अर्थही चांगलाच कळला व काहीच वर्षांनी सगळ्या ओळींचा...

स्व. कुंदनलाल सैगल यांच्या आवाजात काय जादू आहे ते कळत नाही. जख्म-ए-दिल चिरके सिने से फेंक दे ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. ही गज़ल लिहिणारे थोर आणि म्हणणारेही थोर. काय म्हणतोय सिमाब............

अब क्या बताऊ मै तेरे मिलनेसे क्या मिला
इर्फान-ए-गम हुवा मुझे दिल का पता मिला.
तु मला भेटल्यावर माझा काय फायदा झाला ते कसे सांगू ? माझ्यात आता प्रचंड बदल झालेला दिसतोय तो तुझ्यामुळेच....
"वेदनांचा" माझा अभ्यास झाला आहे आणि त्या जेथे होतात ती जागाही मला माहीत झाली आहे - माझे ह्रदय !

जब दूर तक ना कोई फकीर आशना मिला
तेरा नियाझ मंद तेरे दरसे जा मिला.
या माझ्या आयुष्यात मला माझ्या ओळखीचा, आवडीचा, मला समजाऊन घेणारे कोणी भेटलेच नाही.
त्यामुळे एखाद्या आज्ञाधारक भक्ताप्रमाणे मी तुला तुझ्या दरवाजावर गाठले.

मंझ़िल मिली मुराद मिली मुद्दआ मिला
सब कुछ मुझे मिला जो तेरा नक़्श-ए-पा मिला
तु भेटल्यावर माझी इच्छापूर्ती झाली मला स्वर्ग ठेंगणा वाटू लागला.
तुझी सुंदर पावले माझ्या आयुष्यात पडली आणि मला जे पाहिजे होते ते सगळे मिळाले असे वाटू लागले.

या जख्म-ए-दिल को चिरके सिने से फेंक दे
या एतराफ कर की निशान-ए-वफा मिला
पण हाय ! तुला त्याचे काय ? माझे ह्रदय घायाळ करुन तू आता माझ्याकडी बघतही नाहीस. एक तर मला मारुन तरी टाक किंवा माझे प्रेम कुबुल कर !

सिमाब को शगुफ्ता ना देखा तमाम उम्र
कंबख्त जब मिला हमें कम आशना मिला...
आयुष्यात आम्हाला सुख असे लाभलेच नाही.......आम्ही कधी बहरलोच नाही..
हाय रे दैवा आत्ता कुठे वाटले होते की ह बहर वाट्याला येईल पण तेही फार अल्प काळच टिकणार असे दिसते आहे.......

सिमाब अकबराबादी यांचे खरे नाव आशिक हुसेन सिद्दिकी. यांचे घराणे तीनशे वर्षापासून आग्रा येथे स्थायिक आहे.
इस्लामच्या पहिल्या खलिफाचे हे वंशज. त्यांचे घर अजुनही आग्रा येथे काकू गल्ली येथे आहे. सिमाबचे वडीलही एक चांगले उर्दू कवी होते व त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली होती. ते टाईम्स ऑफ इंडियाच्या जयपूर कार्यालयात कामाला होते. हे घराणे जहांगिरच्या काळात बुखाराहून आग्रा येथे स्थायिक झाले होते असे म्हणतात. सिमाबला उर्दू, हिंदी, फार्सी व अरेबीक भाषा चांगल्या येत असत. त्यांनी तर्कशास्त्राचेही शिक्षण घेतले होते. १८९७ साली सिमाबला घर चालवण्यासाठी रेल्वेत नोकरी पत्करायला लागली. १९२२ साली या लोखंडाच्या जगात त्यांचा जीव रमेना व ते आग्र्याला परतले. १८९२ साली त्यांनी गज़ल लिहण्यास सुरवात केली. आर्थिक कटकटींमुळे व विवंचनेमुळे त्यांची पुस्तके व कविता घेऊन ते कराचीला कोणी प्रकाशक मिळतो का हे बघायला गेले व तेथेच ३१ जानेवारी १९५१ रोजी आजारात मृत्यु पावले. त्यांनी केलेले कुराणाचे भाषांतर नंतर तीस वर्षाने प्रकाशीत झाले.

ते गेले पण ‘इर्फान-ए-गम हुवा मुझे दिल का पता मिला.’ या ओळी या दुनीयेत सोडून गेले.....

पूर्ण गज़ल
अब क्या बताऊ मै तेरे मिलनेसे क्या मिला
इर्फान-ए-गम हुवा मुझे दिल का पता मिला.
जब दूर तक ना कोई फकीर आशना मिला
तेरा नियाझ मंद तेरे दरसे जा मिला.
मंझ़िल मिली मुराद मिली मुद्दआ मिला
सब कुछ मुझे मिला जो तेरा नक़्श-ए-पा मिला
या जख्म-ए-दिल को चिरके सिने से फेंक दे
या ऐतराफ कर की निशान-ए-वफा मिला
सिमाब को शगुफ्ता ना देखा तमाम उम्र
कंबख्त जब मिला हमें कम आशना मिला
-सिमाब अकबराबादी..
इर्फान: ज्ञान आशना:, ओळखीचा नियाजमंद: आज्ञाधारक, दर: दरवाजा, एतराफ: स्वीकार, शगुफा: बहर

सैगल यांच्या आवाजात........

स्मजले तसे............

गझलआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

सुधीर's picture

17 Apr 2013 - 3:36 pm | सुधीर

गझल सुंदर आहे. भावानुवाद दिल्यामुळे समजली. धन्यवाद. अन्यथा उर्दू समजत नसल्यामुळे, अन अशा उत्तम गाण्यांची तोंडओळख करून देणारे कमी असल्यामुळे, अशी गाणी फार कमीवेळा कानावर पडतात.

तर्री's picture

17 Apr 2013 - 4:05 pm | तर्री

जयंतराव - मस्त लिहिले आहे.

ही गझल ऐकताना गंधर्व गायकीची आठवण झाली. मुळचे उत्तम काव्य , आर्जवी सच्चा सूर आणि त्या काळचे भिकार रेकॉर्डिंग अगदी सारखेच !

वसईचे किल्लेदार's picture

17 Apr 2013 - 4:16 pm | वसईचे किल्लेदार

अत्यंत श्रवणीय गझल भावार्थासह दिल्याबद्दल धन्यवाद.

शरद's picture

17 Apr 2013 - 5:13 pm | शरद

वा, जयंतराव, एका सुरेख गझलेची छान ओळख. सहगलच्या आवाजातील दर्द हा गुलाम अलि, जगजित वगैरेंपेक्षा निराळाच. ती जातकुळी बेगम अख्तर साहिबांसारखी. एकदम आवड निर्माण होणे जरा॒ अवघडच. आपण इतक्या वर्षांनंतर त्याची आठवण करून दीलित, धन्यवाद.
दुसर्‍या कडव्याबद्दल मला थोडे निराळे सांगावे वाटते. मंजिल.. उद्दिष्ट, जास्त चपखल म्हणजे अंतिम उद्दिष्ट, मुराद...कामना, मुद्आ.. अर्थ, दावा., नक्श-ए-पा ...पाउलांची चिन्हे, पाउलखुणा. काय आहे, वाळवंटात चहुकडे वाळूच वाळू पसरली असतांना आपल्याला गोंधळल्यासारखे होते. आपले अंतिम उद्दिष्ट काय, कोठे जावयाचे आहे, कसे जावयाचे आहे, काहीच कळेनासे होते. अशा संभ्रमावस्थेत जरा कोणाची पदचिन्हे दिसली तर एक मोठा दिलासा मिळतो. आज आपली अवस्था आहे तशी आणखी कोणाची तरी होती पण त्याने वाट शोधली, त्याच्या पाउलखुणा आपणालाही मार्गदर्शन करतील हा दिलासा फार उत्साहजनक असतो. आयुष्यातही असेच घडू शकते. पुढे काय करावयचे आहे, आपले ध्येय तरी काय, काही काही सुचत नाही. अशा सैरभैर अवस्थेत एकाही व्यक्ती अचानक भेटते व त्यामुले आयुष्याला वळण मिळते, दिशा मिळते. शायर आपली ही कृतज्ञता व्यक्त करत आहे.
प्रत्येक कविता ही रसिकाची, स्वत:ची असते. एकाला भावले ते दुसर्‍याला आवडलेच पाहिजे असे नाही. एकाचा अर्थ बरोबर दुसर्‍आचा चूक असे तर मुळीच नाही. वाचकांसमोर माझे एक गुंजन.
शरद

राही's picture

17 Apr 2013 - 8:12 pm | राही

नक्श्-ए-पा =पदचिह्ने, पाऊल खुणा. प्रत्यक्ष पावले आयुष्यात पडली असे नाही, तर त्यांचा आभास, त्यांची केवळ चिह्नेही तितकीच दिलासादायक होती. तसेही शेवटी शायराला त्याची प्रेयसी अथवा त्याचे प्रेयस मिळाले असे नाही, पण काही तरी खूण पटली आणि तो आभासही त्याला (आयुष्य जगण्याला) बळ देता झाला.
कवीने कोणत्याही दृष्टीने लिहिलेले असो, वाचकाला ते वेगवेगळे प्रतीत होते, आणि अर्थाच्या अनेक शक्यता धुंडाळताना त्या मागच्या धूसर संदिग्धतेमुळे कवितेची गोडी अधिकच वाढते.
गझल आवडली आणि रसग्रहणही.

लॉरी टांगटूंगकर's picture

17 Apr 2013 - 9:02 pm | लॉरी टांगटूंगकर

गझल आवडली आणि रसग्रहणही अशक्य आवडलं.

स्पंदना's picture

17 Apr 2013 - 5:36 pm | स्पंदना

मस्त गझल.
शरद सरांच रसग्रहणही खासच!
धन्यवाद जयंत काका.

पैसा's picture

17 Apr 2013 - 6:02 pm | पैसा

अप्रतिम गाण्याचं सुरेख रसग्रहण!

किती श्रीमंत, किती सच्च्या भावना. खूप सुरेख अनुवाद. धन्यवाद.

जयंत कुलकर्णी's picture

18 Apr 2013 - 11:23 am | जयंत कुलकर्णी

सगळ्यांना धन्यवाद !