अ‍ॅन्ड्रोईड: संस्थापक आणि स्थापना

लंबूटांग's picture
लंबूटांग in जनातलं, मनातलं
3 Apr 2013 - 4:00 am

टीपः माझा विडंबनाशिवाय काहीही लिहीण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सुधारणा अवश्य सुचवा.

२००३ च्या शेवटी शेवटी असाच एक दिवस. स्टीव्ह पर्लमन -एक हुशार, यशस्वी अभियंता आणि भांडवल पुरवठा/ गुंतवणूकदार - याचा दूरध्वनी खणखणला, पलीकडे होता जुना मित्र आणि सहकारी अ‍ॅन्डी रुबीन जो तिथून जवळच्याच एका भाड्याच्या जागेत आपली कंपनी चालवत होता.

अ‍ॅन्डी: मी कफल्लक झालोय, पैशाची गरज आहे.
स्टीव्ह: कधी पाहिजेत?
अ‍ॅन्डी: आत्ताच्या आत्ता!

स्टीव्हने जवळच्याच बँकेत जाऊन १०० डॉलरच्या १०० नोटा काढल्या. ते १०,००० डॉलर एका साध्या पाकिटात घालून तो अ‍ॅन्डीच्या ऑफिसात गेला आणि त्याच्या टेबलावर ते पाकीट ठेवले. ही तर फक्त सुरुवात होती. पुढील काही दिवसात स्टीव्हने अ‍ॅन्डीला उधार दिलेल्या रकमेची बेरीज झाली होती ह्याच्या दसपट, तब्बल एक लाख डॉलर. (ज्याची परतफेड नंतर अ‍ॅन्डीने १८ महिने स्टीव्हच्या ऑफिसचे भाडे भरून केली). हे एक लाख डॉलर अमूल्य होते कारण हे पैसे वापरूनच अ‍ॅन्डीला त्याच्या नवीन कंपनीच्या धंद्याची रूपरेषा बनवणे शक्य झाले. जिच्याशिवाय कोणताही उद्योजक अ‍ॅन्ड्रोईड कडे ढूंकुनही बघायला तयार नव्हता.

अ‍ॅन्डी रुबीन हा काही महिन्यांपूर्वीपर्यंत Danger Inc. चा सीईओ म्हणून काम करत होता. ह्या कंपनीने २००२ मध्ये SideKick हा बहुधा पहिला इंटरनेट फोन बनवला होता. ह्याच फोनने पहिल्यांदा app store ही संकल्पना मांडली. ह्या फोनने तरुणाई आणि सेलेब्रिटीजचे लक्ष वेधून घेतले. पण काही महिन्यांतच कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेला अ‍ॅन्डी बोर्डाबरोबर झालेल्या चर्चेनंतर ह्या पदावरून पायउतार झाला. त्याने खुल्या दिलाने कंपनीला नवीन सीईओ शोधण्यास मदतही केली.पण नवीन सीईओ सापडताच त्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि Cayman Islands ह्या त्याच्या आवडत्या सुट्टी घालवायच्या ठिकाणी निघून गेला.

जात्याच अतिशय हुशार आणि सतत नवीन काहीतरी करण्याचा ध्यास असलेल्या अ‍ॅन्डीच्या डोक्यात एक स्मार्ट कॅमेरा बनवायची कल्पना आली. त्याचे सॉफ्टवेअर लिहिण्यास त्याने सुरुवातही केली. पण एक तर ह्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यास त्याला कोणतीही कंपनी मदत करायला तयार नव्हती आणि लवकरच त्याच्या लक्षात आले की तसेही वर्षाला उणेपुरे ३ कोटी कॅमेरा विकले जातात. त्याला करायचे होते काहीतरी भव्य. त्याच्या लक्षात आले की आपण आधी बनवलेल्या फोनप्रमाणेच, सेलफोन्ससाठी open source प्रणाली बनवली तर तिची मागणी कैकपटीने अधिक असेल.

त्याला त्याच्या जुन्या नोकरीत त्याच्या रोबोट्सवरील प्रेमामुळे आणि Andy Rubin शी साधर्म्य असल्याने Android हे टोपणनाव मिळाले होते. ते नाव वापरून त्याने android.com हे संस्थळ आरक्षितही करून ठेवले होते. तेच संस्थळ आणि आपल्या काही जुन्या सहकाऱ्यांना गोळा करून त्याने ऑक्टोबर २००३ मधे android ही नवी कंपनी सुरू केली. ध्येय होते एक असा प्लॅटफोर्म जो कोणत्याही software इंजिनीअर ला मुक्तपणे त्याला हवा तसा वापरता येईल.

कंपनी सुरू तर केली पण अजूनही कोणती कंपनी/ गुंतवणूकदार नुसता open source प्लॅटफोर्म ह्या कल्पनेवर पैसे लावायला तयार नव्हता. स्वत:चे जमवलेले पैसे वापरून अ‍ॅन्डीने काही काळ तग धरली पण सरतेशेवटी ऑफिस ची जागा खाली करायची वेळ आल्यावर मात्र त्याने पर्लमन ला फोन केला.

वर लिहिल्याप्रमाणे एक लाख डॉलर संपेपर्यंत २००५ चा मध्य उलटून गेला होता पण android ची रूपरेषा बऱ्यापैकी तयार झाली होती आणि . ती बघितल्यानंतर मात्र गुंतवणूकदाराचे लक्ष वेधले गेले. ह्या पैकीच एक होता Craig McCaw जो आज Clearwire ह्या mobile operator कंपनीचा chairman आहे. त्याने ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली. त्याच्याशी बोलणी सुरू असतानाच अ‍ॅन्डीने google च्या २ संस्थापकांपैकी एक लॅरी पेज ह्याला ह्या वाटाघाटींबद्दल इ मेल पाठवली. लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन ह्या google च्या संस्थापकांना अ‍ॅन्डी आधी एकदा एका conference मध्ये भेटला होता. ते दोघे बराच काळ SideKick हा फोनही वापरत होते. काही आठवड्यातच १७ ऑगस्ट, २००५ रोजी एका गुप्त रकमेला google ने android विकत घेतली होती.

हा लेख संपवण्याआधी अ‍ॅन्डीच्या दूरदृष्टीची दाद द्यावी लागेल कारण गेल्या वर्षीच्या जून महिन्यात त्याने twitter वरून घोषित केले की एका दिवसात १.१७ दशलक्ष android उपकरणे activate केली गेली आणि त्या दिवसापर्यंत ४० कोटींहून अधिक android उपकरणे विकल्या गेली होती.

Android च्या ह्या थक्क करणाऱ्या प्रगतीबद्दल पुढील लेखात.

संदर्भः
http://en.wikipedia.org/wiki/Android_(operating_system)
http://en.wikipedia.org/wiki/Andy_Rubin
http://www.nytimes.com/2007/11/04/technology/04google.html?_r=3&hp=&page...
http://online.wsj.com/article/SB1000142405311190425320457651272021435109...
http://news.cnet.com/8301-1023_3-10245994-93.html?tag=mncol
http://www.bubblews.com/news/340798-know-quotandy-rubinquot-brain-of-the...
http://www.eetimes.com/electronics-news/4402119/Andy-Rubin--After-rough-...

वाङ्मयतंत्रविज्ञानलेखमाहिती

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

3 Apr 2013 - 4:08 am | श्रीरंग_जोशी

या विषयावर प्रथमच वाचण्यास मिळाले.

माहितीबरोबरच चित्रेही डकवल्यास लेखन अधिक परिपूर्ण वाटेल.

सर्व चित्रे आंतरजालावरून साभार

अ‍ॅन्डी रुबिन
Andy Rubin

स्टीव्ह पर्लमन
Steve Perlman

साईडकिक
SideKick

लॅरी पेज
Larry Page

सर्गे बिन
Sergey

श्रीरंग_जोशी's picture

3 Apr 2013 - 9:32 pm | श्रीरंग_जोशी

यात जरा भर घालतो.
अ‍ॅन्ड्रॉइडचे चिन्ह
Android
हे चित्र आंतरजालावरून साभार.

नानबा's picture

4 Apr 2013 - 1:39 pm | नानबा

यात अजून थोडी भर घालतो.
कपकेक पासून आईस्क्रीम सँडविच पर्यंत लोगोमध्ये झालेले बदल -
a

आणि हा सगळ्यात नव्या जेली बिनचा लोगो -
a
दोन्ही चित्र गुगलबाबांकडून साभार. :)

अ‍ॅन्ड्रॉईड्चा लोगो एकच आहे. जो वर श्रीरंग_जोशी यांनी दिला आहे. हे सगळे गूगलने त्यांच्या मौजमजेच्या वर्क कल्चरला साजेसे केलेले मार्केटिंग कँपेन्स साठीचे अ‍ॅन्ड्रोइडचे अवतार आहेत.

गूगल ने त्यांच्या कॅम्पसच्या लॉनवर या प्रत्येक व्हर्जनचे पुतळे ठेवले आहेत. ही त्यांची काही छायाचित्रे.

google lawn

droid

यशोधरा's picture

3 Apr 2013 - 7:42 am | यशोधरा

माहिती आवडली.

सोत्रि's picture

3 Apr 2013 - 8:04 am | सोत्रि

झक्कास सुरूवात.

-(अँड्राँइडप्रेमी) सोकाजी

प्रचेतस's picture

3 Apr 2013 - 8:34 am | प्रचेतस

छान सुरुवात पण लेख खूपच त्रोटक आहे. अ‍ॅन्ड्रॉइडच्या निर्मितीबद्दल अधिक माहिती हवी होती.

अँड्रॉईड वापरतो आणि त्यात भरपूर काड्या पण केल्यात. पण हा इतिहास प्रथमच कळला. थोडा विस्तृतपणे लिहीला असता तर अजून छान झाला असता.

तर्री's picture

3 Apr 2013 - 9:01 am | तर्री

पु.भा.प्र.

मूकवाचक's picture

5 Apr 2013 - 9:26 am | मूकवाचक

+१

कंजूस's picture

3 Apr 2013 - 9:09 am | कंजूस

झकास .माझ्या अगोदरच्या लिखाणाला तुमच्याकडून छानच उत्तर आले होते .पहाटे चारला लिहिल्यामुळे थोडेच लिहिलेत पणा सवडीने अजून भर घालणार याची खात्री आहे . गुगल जेव्हा दुसरी कंपनी विकत घेते तेव्हा त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देते .ढवळाढवळ करत नाही . हेही एक कारण आहे गुगलने घेतलेले प्रॉडक्ट गुगलचेच वाटण्याचे .उदा: ऑर्कुट पिकासा वगैरे .

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2013 - 9:13 am | प्रसाद गोडबोले

मस्त झालाय लेख !!

अ‍ॅन्ड्रॉईड प्रोग्रामिंग विषयी बेसीक वाचायला आवडेल

नानबा's picture

3 Apr 2013 - 9:17 am | नानबा

सहमत.

लंबूटांग's picture

3 Apr 2013 - 9:37 am | लंबूटांग

सध्या तरी ही लेखमाला अ‍ॅन्ड्रॉईडच्या उत्क्रांतीवर केंद्रीत ठेवण्याचा विचार आहे पण पुढे मागे वेळ मिळेल तसा त्यावरही थोडे लिहायचा प्रयत्न करेन. मला स्वतःला छोटी मोठी प्रोजेक्ट्स स्वतःलाच शिकण्यासाठी केली होती त्या व्यतिरिक्त फारसा अनुभव नाहीये पण स्वतःचे अनुभव लिहीण्याचा प्रयत्न करेन.

नुकतेच परत एकदा dev environment set up करताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे गूगल ने ही set up process आता खूपच सोपी केली आहे. पहिले तर सर्व पॅकेजेस download करून Hello World करेपर्यंतच माझा उत्साह मावळायचा.

दुसरी गोष्ट मला जाणवलेली म्हणजे आता गूगल ने user interface standardize करण्यावर बरेच लक्ष दिले आहे. बर्‍याचशा best practices वगैरे documentation बरोबरच दिलेल्या आहेत आणि इन जनरलच documentation प्रचंड improve केलेले आहे.

आमाला गरिबाला कळेल असं लिवा की राव. dev environment set, user interface standardize काय बी कळलं न्हाय बगा.

धन्या's picture

3 Apr 2013 - 8:18 pm | धन्या

dev environment set up : डेव्हलपमेंट एन्वायर्न्मेंट सेटप - आपण जे अँड्रॉईड अ‍ॅप्स वापरतो ते जावा या भाषेत लिहावे लागतात. जे लोक हे प्रोग्राम्स (अ‍ॅप्स) लिहितात त्यांना अँड्रॉईड डेव्हलपर म्हणतात. हे प्रोग्राम्स लिहिण्यासाठी, त्यांची चाचणी करण्यासाठी काही खास प्रोग्राम वापरावे लागतात. सध्या गुगल हे सारे प्रोग्राम्स एकाच प्रोग्राममध्ये बंडल बनवून देते ज्याला अँड्रॉईड डेव्हलपमेंट टुलकीट (एडीटी) म्हणतात. हे एडीटी आपल्या संगणकावर आपल्या वापरायोग्य बनवणे म्हणजेच dev environment set up.

user interface standardize: संगणकाचे प्रोग्राम्स ही संगणकाच्या किचकट भाषांमध्ये चालणारी प्रणाली असते. परंतू सामान्य वापरकर्त्याला मात्र संगणकाच्या खिडक्याच (विंडोज/स्क्रीन्स) दिसतात ज्यामध्ये तो माहीती देऊ शकतो. या स्क्रीन्सवर इनपुट बॉक्सेस, बटन्स, चेकबॉक्सेस अशा विविध गोष्टी वापरुन आपण त्या प्रोग्रामला माहिती देवून कार्यान्वित करु शकतो. या स्क्रीन्स म्हणजेच user interface. तर वेगवेगळ्या अँड्रॉईड फोन उत्पादकांच्या मोबाईल फोनांवर स्क्रीन्सवरील इनपुट बॉक्सेस, बटन्स, चेकबॉक्सेस यामध्ये सातत्य असणे म्हणजेच user interface standardization

लंबूटांग's picture

3 Apr 2013 - 9:28 am | लंबूटांग

पहाटे चारला लिहिल्यामुळे थोडेच लिहिलेत पणा सवडीने अजून भर घालणार याची खात्री आहे

:) संध्या़काळी ४ नंतर टंकले बरेचसे इथल्या. हापिसातून वेळ मिळाला तसे टंकल्याने थोडे त्रोटक झाले आहे. मला मराठी टंकनाचा कंटाळा आहे त्यामुळेही त्रोटक वाटले असेल.

गुगल जेव्हा दुसरी कंपनी विकत घेते तेव्हा त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देते .ढवळाढवळ करत नाही

गूगलचे संपूर्ण वर्क कल्चरच वेगळे आहे आणि प्रत्येकालाच आठवड्यातील १ दिवस पाहिजे त्या प्रोजेक्ट वर काम करण्याची मुभा आहे. ऑर्कुट हे अशाच २०% कामातून तयार झालेले आहे. Gmail, Google News, Google Talk, Google Sky ही आणखी काही उदाहरणे.

गूगलने अ‍ॅन्ड्रॉइड विकत घेतल्यानंतर अ‍ॅन्डी बरोबर अ‍ॅन्ड्रॉइडवर काम करणारे दोन मुख्य अभियंते हे कुठेही न जाता अ‍ॅन्ड्रोईड वर काम करत गूगल मधे राहिले.
.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Apr 2013 - 10:07 am | llपुण्याचे पेशवेll

छान लेख. पण फार त्रोटक. कृपया जरा मोठा लेख लिही. वाचल्यावर एकदम ज्ञानी झाल्यासारखे वाटले पाहीजे. :) आत्ता देखील वाटत आहे पण थोडं कमी. :)
पुढचे भाग लिही पटापट.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Apr 2013 - 4:43 am | निनाद मुक्काम प...

वाचल्यावर एकदम ज्ञानी झाल्यासारखे वाटले पाहीजे.
Smiley face laughing
एकदम
लखू रिसबूड सारखे

लंबूटांग
Giving Thumbs Up Winking
मस्त झोकात सुरुवात झाली आहे.

आदूबाळ's picture

3 Apr 2013 - 11:10 am | आदूबाळ

छानच! पुभाप्र!

सुहास झेले's picture

3 Apr 2013 - 4:35 pm | सुहास झेले

मस्त... पुढे वाचण्यास उत्सुक :) :)

महेश हतोळकर's picture

3 Apr 2013 - 5:32 pm | महेश हतोळकर

मस्त सुरुवात.
पु.भा.प्र.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2013 - 5:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहाहा. शेठ, लेख माहितीपूर्ण झालाय. चांगली माहिती मिळत होती आणि मधेच लेख संपला. :(
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

4 Apr 2013 - 7:08 pm | प्यारे१

+१

परिकथेतील राजकुमार's picture

3 Apr 2013 - 6:04 pm | परिकथेतील राजकुमार

वाचतोय मालक...

राजेश घासकडवी's picture

3 Apr 2013 - 8:51 pm | राजेश घासकडवी

झक मारली आणि हा लेख वाचला असं झालंय... चक्क पराशी सहमत व्हायची वेळ आली!

प्रीत-मोहर's picture

3 Apr 2013 - 8:26 pm | प्रीत-मोहर

मस्त!!!!!

वाचनोत्सुक.
-प्रीमो

शिल्पा ब's picture

4 Apr 2013 - 1:49 am | शिल्पा ब

फारसं समजलं नाही तरी आवडलं. हे ओपन सोर्स काय भानगड असते? समजा एखाद्याने त्यात काही सुधारणा केली तर ते सगळ्यांनाच उपयोगी पडतं का आपलं आपलं वापरायचं असतं? अ‍ॅड्रॉईड हे फोनचं अ‍ॅप आहे ना?

लंबूटांग's picture

4 Apr 2013 - 2:45 am | लंबूटांग

ओपन सोर्स काय भानगड असते?

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर असे सॉफ्ट्वेअर ज्याचा सोर्स कोड कोणालाही उतरवून घेता येतो आणि हवा तसा बदलता येतो. बहुतांशी ही संज्ञा सॉफ्टवेअरच्या संदर्भात वापरली जात असली तरी ती कोणत्याही वस्तूबाबत वापरली जाऊ शकते. अगदी ओपन सोर्स कोला ही उपलब्ध आहेत. म्हणजेच त्यांची रेसिपी त्यांच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केलेली आहे. कोका कोला सारखी अतिगोपनीय नाही.

रोजच्या वापरातलेच उदाहरण घ्यायचे झाले तर फायरफॉक्स, क्रोम हे ब्राऊजर ओपन सोर्स आहेत पण इंटरनेट एक्स्प्लोरर नाही.
मिपा ज्या ड्रुपल वर चालते आहे ते ड्रुपलही ओपन सोर्स आहे.

समजा एखाद्याने त्यात काही सुधारणा केली तर ते सगळ्यांनाच उपयोगी पडतं का आपलं आपलं वापरायचं असतं?
सर्वसाधारणपणे प्रत्येक ओपन सोर्स प्रोजेक्ट चा एक चमू असतो ज्याला मुख्य कोड मधे बदल करायचे अधिकार असतात. बाकी जनतेला तो फक्त जालावरून उतरवून घेता येतो.

अर्थात तुम्ही ह्या ग्रूपला तुमचे बदल मेल करू शकता आणि ते त्यांना पटले तर ते मुख्य कोड मधे सामावूनही घेतले जाऊ शकतात.

तोपर्यंत तरी आपलं आपणंच वापरायचं.

अ‍ॅड्रॉईड हे फोनचं अ‍ॅप आहे ना?

अँड्रॉईड ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. जशी आपल्या संगणकावर विन्डोज असते तशी. विंडोज मात्र क्लोज्ड सोर्स/ प्रोप्रायटरी सॉफ्ट्वेअर ह्या प्रकारात मोडते. जिचा सोर्स कोड उपलब्ध नसतो आणि जिचे reverse engineeringकरून सोर्स कोड मिळवणे आणि त्यात कोणत्याही प्रकारे बदल करणे, अथवा ती वितरीत करणे कायद्याने गुन्हा समजला जातो.

iPhoneमधे iOS ही ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाते व ती सुद्धा क्लोज्ड सोर्स प्रकारात मोडते.

सुमीत भातखंडे's picture

4 Apr 2013 - 11:36 am | सुमीत भातखंडे

माहिती...वाचतोय

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Apr 2013 - 11:59 am | घाशीराम कोतवाल १.२

हा अ‍ॅण्डी रुबीन पहिला स्टिव्ह जॉब्स बरोबर अ‍ॅपल मधे होता ना ?

लंबूटांग's picture

5 Apr 2013 - 9:18 am | लंबूटांग

१९८९ साली Switzerland ला एका रोबोटिक्सच्या प्रकल्पावर काम करत असताना सुट्टी घालवायला अ‍ॅन्डी Cayman Island ला गेला होता. तिथे पहाटे पहाटे समुद्रकिनारी फिरताना त्याला खुर्चीत कोणीतरी झोपलेले दिसले. तो होता अ‍ॅपलमधे काम करणारा अभियंता बिल कॅस्वेल. तो त्याच्या गर्ल फ्रेंड बरोबर तिथे सुट्टी घालवायला होता आणि तिने त्याला हाकलून दिले होते :). अ‍ॅन्डीने त्याला आपल्याबरोबर राहू दिले. हे उपकार लक्षात ठेवून बिलने त्याला अ‍ॅपलमधे काम करण्याची ऑफर दिली. तेव्हा अ‍ॅपलच्या Macintosh ने बाजारात धूम माजवली होती (windows अजून यायचे होते) आणि अ‍ॅपल यशाच्या शिखरावर होती. अतिशय हुषार अभियंते तेथे काम करत होते आणि नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यास झटत होते. तेच कंपनी चालवत होते म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

अ‍ॅन्डीने तेथे manufacturing engineer म्हणून कामाला सुरुवात केली पण नंतर त्यांच्या संशोधनात (research and development) उडी घेतली. अ‍ॅपलमधे एकदा त्याने कंपनीचे आंतरिक नेटवर्क मधे घुसखोरी करून सर्व फोन कॉल्स चीफ एक्झेक्युटिव्ह जॉन स्कली यांच्याकडून आलेले भासतील असे बदल केले आणि ते वापरून आपल्या सहकाऱ्यांना स्टॉक प्रदान केले आणि आय. टी. डिपार्टमेंट चा रोष ओढवून घेतला.

दोन वर्षांनंतर त्याने अ‍ॅपलनेच १९९० साली सुरू केलेल्या जनरल मॅजिक नावाच्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. ही कंपनी हातात धरण्याजोग्या संगणन आणि देवाणघेवाण उपकरणांना (hand-held computing and communications devices) ला वाहिलेली होती. तेथे तो आणि इतर काही अभियंते इतके कामाला वाहिलेले होते की त्यांनी त्यांच्या क्युबिकल्स वरच पलंग बांधून घेतले जेणेकरून त्यांना तेथेच राहता येईल आणि हवे तितका वेळ काम करता येईल. रात्रंदिवस काम करून त्यांनी या उपकरणांना लागणारी एक मॅजिक गॅप नावाची प्रणाली बनवली. जी अतिशय उत्कृष्ट असूनही फारशी चालली नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कंपन्यांनी त्यात रस दाखवला. याचे मुख्य कारण म्हणजे ती प्रणाली काळाच्या दशकभर पुढे होती. यानंतर हे सर्व अभियंते वेगवेगळ्या कंपन्यांत काम करण्यास एक एक करून निघून गेले.

स्टीव्ह पर्ल्मन ज्याचा उल्लेख या लेखाच्या पहिले आला आहे, त्याची आणि अ‍ॅन्डीची भेट अ‍ॅपलमधेच झाली.

श्रीरंग_जोशी's picture

5 Apr 2013 - 9:27 am | श्रीरंग_जोशी

हा योगायोग इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद!!

शिल्पा ब's picture

6 Apr 2013 - 5:42 am | शिल्पा ब

जर मॅजिक गॅप त्यावेळी काळाच्या पुढे होती तर नंतर ती वापरली गेली का? असेल तर कशात? म्हणजे उदा. विचारतेय.

लंबूटांग's picture

6 Apr 2013 - 8:24 am | लंबूटांग

काळाच्या पुढे म्हणजे तिच्यात जे फीचर्स होते त्यांचा वापर करण्यासाठी ना वायरलेस इंटरनेट सगळीकडे पोहोचले होते ना तितके सेलफोन वापरकर्ते होते.

इतके वर्षांत hardware मधेही झपाट्याने बदल झाले आणि लोकांच्या आवडीनिवडीतही.

बॅटमॅन's picture

4 Apr 2013 - 12:01 pm | बॅटमॅन

मस्त माहिती..अजूनपर्यंत अँड्रॉईडच्या वाटेला कधी फारसा गेलो नाही पण माहिती मस्त आहे.

स्मिता.'s picture

4 Apr 2013 - 1:58 pm | स्मिता.

वाचतेय... पुढचे भाग जरा मोठे येवू द्या.

अँड्रॉईडचे लेटेस्ट व्हर्जन काय? फोनच्या किंमतीवरुन पण फरक पडेल का, कोणते व्हर्जन मिळेल ह्यावर?

घाशीराम कोतवाल १.२'s picture

5 Apr 2013 - 10:44 am | घाशीराम कोतवाल १.२

अँड्रॉईडचे लेटेस्ट व्हर्जन काय?
जेली बीन हे नविन व्हर्जन आहे

फोनच्या किंमतीवरुन पण फरक पडेल का, कोणते व्हर्जन मिळेल ह्यावर?
हो नक्कीच जर तुम्ही सॅमसंग ग्रॅन्ड घ्याल तर तो २३००० रुपयांत मिळेल ज्यात जेली बीन हे नविन व्हर्जन आहे
त्यात तुम्ही ड्युअल स्क्रीन वापरु शकता एकाच स्क्रीन वर दोन अ‍ॅपस वापरुन काम करु शकता

यशोधरा's picture

5 Apr 2013 - 12:37 pm | यशोधरा

धन्यवाद घा को १.२.

मदनबाण's picture

5 Apr 2013 - 1:13 pm | मदनबाण

छान माहिती. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Apr 2013 - 1:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

जगात क्रांतिकारी बदल घडवणार्‍या तंत्रज्ञानामागच्या मानवी कथा प्रचंड आवडतात... सुंदर सुरुवात... पुभाप्र.

चाणक्य's picture

6 Apr 2013 - 6:49 am | चाणक्य

वाचतोय

किसन शिंदे's picture

6 Apr 2013 - 8:57 am | किसन शिंदे

मस्त!!

लंबूटांग's picture

5 Nov 2014 - 2:35 am | लंबूटांग

खरं तर १३ मार्च २०१३ लाच बातमी आली होती की अँडी रुबिन ऐवजी सुंदर पिचई नावाचा भारतीय यापुढे अ‍ॅन्ड्रॉईडचाही मुख्य असेल. त्यावेळी अ‍ॅन्डी गूगलच्याच गूगल एक्स ह्या अतिशय सिक्रेट आणि कोणी विचारही करू शकणार नाही अश्या प्रोजेक्ट्सना वाहिलेल्या डिव्हिजनमधे जाणार असे ऐकले होते. त्यातच गूगलने गेल्या डिसेंबरमधे बॉस्टन डायनॅमिक्स ही प्रसिद्ध कंपनी विकत घेतल्यानंतर तो गूगलची रोबोटिक्स डिव्हिजन चालवत होता असेही वाचले होते. त्याचे रोबॉटिक्सवरील प्रेम पाहता तो अजून काहीतरी भव्यदिव्य लवकरच जगाला दाखवून देईल असे मला वाटत होते.

पण चार दिवसांपूर्वी आलेल्या बातमीप्रमाणे अँडी आता गूगलमधून बाहेर पडला आहे. हार्डवेअर बनवणार्‍या स्टार्टअप्ससाठी incubator असे काहीसे करण्यासाठी.

What's next?