टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
पोफळीत रंगलेल्या गप्पा
पोफळीत रंगलेल्या गप्पा
कोकणातल्या सफरीतील मला सदैव स्मरणात रहातील असे जे काहि लोकं भेटले त्या मधे नानू सुर्वे हा वल्ली. त्याची आणि माझी भेट अगदी आकस्मिक झाली.. मी पंताच्या ओसरीवरच्या झोपाळ्या वर आरामात बसलो होतो.. आणि ह्या इसमाच्या एका विशिष्ट बोलण्याच्या पध्दति मुळे माझं लक्ष ह्याच्या कडे गेलं..
मी पंताना विचारलं का हो पंत हा कोण इसम आहे इतक्या शिव्या देत बोलणारा ? अस्सल कोकणी शिवी देत पंत म्हणाले शिंचा एक नंबर चा डांबीस आहे.... आपल्या समोर हा गडी लोकांना शिव्या देइल आणि नंतर त्यांच्या कडुन फळं नीट उतरवली नाहित, आज पैसे नाहित नंतर बघु, असली कारणं देत त्यांना लुबाडेल.
आता पंतां सारख्या एक नंबरच्या डांबीस माणसाने ज्याला "डांबीस" म्हणले आहे.. म्हणजे ह्या माणसात नक्की काहि तरी असणार हे मी जाणलं आणि ठरवलं वेळ काढुन ह्याला गाठायचंच.
आता हे पंत आणि ह्यांचा इतिहास असा कि हा पंचक्रोशीत सर्वात लबाड आणि डांबिस माणुस म्हणुन प्रसिध्द. अगदि स्वतः च्या भावांना हि ह्याने प्रॉपर्टि च्या मोहा पाइ देशो धडि ला लावलं असा हा महाभाग. लखपति, हजार एक कलमं , नारळ पोफळी , जमीन वैगेरे सगळं मुबलक. ह्यांचे मुख्य काम म्हणजे दिवस भर आराम, लोकांना शिव्या देणे आणि लुबाडणे. ह्यांच्या आसपास च्या सर्व लोकांना ह्यानी एकदा तरी "इंगा" दाखवला आहे. पंत हे कोणाचे हि कौतुक करत नाहित.. स्वतः बद्दल ह्यांना एक वेगळाच अभिमान आहे. आता ह्या उतरत्या वयात जेव्हा लोकं देवा-धर्मा चे करतात, आपला गर्व बाजुला ठेवुन जुळवुन घेतात , तिथे पंत अजुन हि "मोडेन पण वाकणार नाहि" हा तोरा कायम ठेवुन आहेत. त्यामुळे ह्यांच मुलगा व बायको शी पटत नाहि हे दिसुन येते. मुलगा हि "रत्नाग्रीस" काहि नवा धंदा टाकुन वेगळे बिर्हाड करण्याच्या विचारात आहे. असो.
तर अशा ह्या पंतानी ज्याला डांबीस असे संबोधले अशा नानू ला गाठायचे असे ठरवुन मी पहाटे पोफळीतुन समुद्रा कडे गेलो. मला कल्पना होती कि नानू मला सकाळचा नक्की भेटेल.. खेकडे, मासे आणि कोळीणी असतील तीथे नानू भेटण्याची शक्यता मला जास्त वाटली. आणि तशी भेट झाली हि !
आता हा नानू म्हणजे काहि साधा प्राणि नाहि हे मला त्याच्या गॉगल वरुन समजलं.
काय कसं काय ? बरय वैगेरे औपचारीकता झाली आणि नानू नी मला सरळ प्रश्न केला.. काय मासे बीसे खाता कि नाहि ? अहो आमच्या समोर लाजु नका. आम्हाला त्या तिकडचे माहित आहे हो.. आम्हि हि इन्ग्रजी सिनेमे बघतो म्हणलं.. कसे ?
पंताच्या कडे येणारे तुमचे सगळे लोक माझ्या कडेच येतात हो जर "काहि" हवं असेल तर. आहो कसले जानवे आणि कसले काय.. हे कलियुग आहे महाराज. नानू नी त्याच्या मैत्री पुर्ण हास्या चा फायदा काहि "गिर्हाइक" सापडतय का हे चाचपण्यात केला !
मी उगाचच ओशाळल्या सारखा.. नाहि नाहि तसलं काहि मी खात नाहि हो नानूराव.. मी आपला सहज फिरतो आहे समुद्रा वर. मी काहि तसलं खात पीत नाहि !
बहुतेक नानू ला माझ्यातला प्रामाणिक पणा पटला असेल.
"अहो तसे नाहि.. तुम्हि बारा देश फिरलेली माणसं.. तुम्हाला काय हवं नको हे विचारायचे आमचे कर्तव्य नाहि का ? तसं मला वाटलं होतंच तुमच्या कडे बघुन कि तुम्हि काहि खात पीत नसणार म्हणुन." नानू नी सारवा सारव करुन टाकली.
"चहातरी पीता ना ? " हो तर
मग चला कि घोट भर घेवु आमच्या पोफळीत.. अहो आमची फोफळी म्हणजे अगदि "एअर कंडिशन" आहे.. खुर्ची टाकुन बसलात कि हि खाडि आणि समुद्र दर्शन तुम्हाला तुमच्या त्या " रेझॉर्ट " सरख वाटेल.. पण हो ते तसले काहि "बिच व्यु का बे वॉच का काय म्हणतात ते..." तसलं काहि नाहि हो आमच्या पोफळीत , एक डोळा मीचकावीत नानू म्हणाला !
नानू ची नारळ-पोफळी ची बाग अगदी समुद्रा ला खेटुन आहे. त्याचं ह्या पोफळीवर एक प्रकारचे प्रेम आहे हे त्याच्या वागण्या बोलण्या वरुन समजलं. माझ्या साठी एक आणि स्वतः ला एक अशी आराम खुर्ची घेवुन नानू आला आणि माझ्या साठी सुंठेचा चहा स्वयपाकघरात सांगितला गेला. खुर्ची वर बसुन मी ती समुद्राची शांत आणि गंभिर आभा अनुभवत होतो. पोफळीतील झाडांमधुन वहाणारा वारा एक मंद संगित- नाद करत होता.... खरच अशी पोफळी कोकणात कुठे नाहि .. मी नकळत म्हणुन गेलो...
नानू लहान मुला सारखा लाजला.. अगदी मनापासुन त्याला माझी दाद आवडली हे त्याच्या हालचालीं वरुन समजलं.
तुम्हि साखर घेता ना चहात ? मला जरा जास्त साखर लागते चहात. त्याचे काय आहे दिवसभर गडि माणसांना शिव्या देयच्या असतात.. म्हणुन सकाळी एकदा भरपुर साखरेचा चहा लागतो मला.. .. नानू मला काहि बोलु देत नव्हता हे मला लक्षात आलं .. बहुतेक त्याला काहितरी सांगायच होतं .. माझ्याशी खुप बोलायचं होतं हे मला जाणवलं. एका विषया वरुन दुसर्या विषया वर तो जात होता पण मला बोलु देत नव्हता.
मी हि ठरवलं.. आपण नुसतं ऐकत रहायचं .. मधे मधे नानूराव तुमचं बरोबर आहे.. आजकाल तुमच्या सारखी विचार करणारी लोकं नाहित हो .. वैगरे वैगरे चाव्या मारण्या पलीकडे नानू माझं काहि ऐकण्या साठी थांबत नव्हता !
खरं तर मला अशी लोकं आवडतात... त्यांना खुप काहि बोलायचं असतं .. प्रत्येक विषया वर त्यांचं काहि तरी मत असतं.. मी अशा लोकांना नेहमी "चावी मारतो". हि माझी सवय आहे. ह्यातुनच मला अनेक मित्र सापडले आहेत. भटकंती मधील खरी माणसं आणि आनंद मला अशा गप्पांमधेच जाणवला आहे !
नानू माझ्याशी येवढ्या मोकळेपणाने का बोलतो आहे हे मला कळत नव्हते. तशी आमची ओळख काहि तासांची सुध्दा नव्हती. आमच्या गप्पा अनेक विषयांवर झाल्या.. जमीनीचे भाव, कोकणातील पिकं, रस्ते, जाती-जातियवाद, राजनीती, दाभोळ पॉवर प्लान्ट, स्मगलींग, स्मगलर्स, दाउद व त्याचे नातेवाइक, आजकालच्या बायका... बायका... नानू च ज्ञान आणि चातुर्य ह्या सर्व विषयांवरील त्याच्या स्वतंत्र मतांतुन जाणवलं.
त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा ओलावा आहे हे समजलं. कुठेतरी दु:ख लपलेलं आहे हे हि जाणवलं. म्हणुन मी सहज म्हणालो. .. नानूराव तुम्हि खुप छान बोलता .. अगदी ऐकत रहावसं वाटत... बोलता बोलता तास कधी गेला ते कळाले नाहि..
ह्यावर नानू एकदम म्हणाला.. तुम्हि ते नानूराव सोडा आणि नानू वर या.. आता आपण परके का आहोत ? आणि तुम्ही म्हणता मी छान बोलतो.. पण आमचं ऐकतो कोण इथे ? अहो ऐकायला माणसं आहेत कुठे इथे ?
तेव्हा, जर कोणी तुमच्या सारखा शहरातला आलाच इकडे तर त्याच्या कडे मन मोकळं करतो. कालच तुम्हाला बोलवणार होतो पण म्हणलं तुम्हि पंतां कडे आला आहात म्हणजे शिष्ट असणार.. उगाच कशाला कपभर चहा वाया घालवा? मिस्किल हास्य करत नानू म्हणाला.
नानू ला एक मुलगा आहे आणि तो शहरात रहातो हे बोलण्यातुन समजले. त्याने एका क्रिश्वन मुली बरोबर लग्न केले आहे हे सुध्दा नानू बोलुन गेला. दोघांना पुढे बाहेर देशात "कॉम्पुटर कंपनी" पाठवणार आहे ,ह्यात नानू ला आनंद असला तरी ... इतकी शेती, कलमं,नारळ, पोफळी पुढे बघायला कोणी हि नसल्याची खंत नानू च्या बोलण्यात जाणवली.
चला निघायला हवं.. नानू राव पुढच्या वेळेला आलो की वेळ काढुन येइन तुमच्या कडे.
नानू राव नाहि आधी नानू म्हणा.. आणि हो "आलो कि" नाहि नक्कि या नाहि तर तुम्हि भ*****, त्या राणिच्या देशात भो****... ###### आणि जाल ह्या नानू ला विसरुन . . जोरात हसत मिठिमारत नानू म्हणाला.
नानू नी दिलेल्या शिव्यां वरुन माझी खात्री पटली कि मी आता नानू च्या आतल्या गोटात सामील झालो आहे..
पंतांच्या गावाला आलेला मी.. नानू च्या गावाला निरोप देउन निघालो...
नानू सारखी माणसं काहि क्षणात मला आपलेसे करुन घेतात. बहुतेक अशा माणसांना शोधायला आणि भेटायलाच मी भटकंती करतो. काटेरी फणसाला चीर जावी आणि त्यातुन बाहेर पडणारा गोड रस आणि गर चाखायला मिळावा तसा अनुभव मला नानूच्या पोफळीत ल्या गप्पां मधे आला !
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती



छान..
लेख चांगला आहे. नानू ची चांगली ओळख करून दिली आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
हेच,
लेख चांगला आहे.
हेच म्हणतो...!
मस्तच..
मस्तच आहे...अजुनही वाचायला आवडेल..
मदनबाण.....