श्री. ना. आणि व्ही. एस.

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
17 Feb 2013 - 5:48 pm

"मी कोण" हा प्रश्न मानवाला अनादि कालापासून पडला आहे. प्रत्येक मानव जाणते-अजाणतेपणे या प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे. कधी आपल्या कक्षेत राहून, तर कधी कक्षा भेदून. वैयक्तिक आवडी निवडी, निवडलेले पर्याय, घेतलेले निर्णय हे प्रत्येकाच्या "मी" च्या शोधाचं दृश्य रूप. मानवसमूहात रहायचं तर प्रवाहाबरोबर पोहोणं आलंच. सर्वदा आपल्या मनाप्रमाणे घडेलच असं नाही. मानवसमूहाचा हा अदृश्य दबाव माणसाला वेगळं वागायला भाग पाडतो. कधीकधी काही पर्याय मनाविरुध्द निवडावे लागतात, काही निर्णय बळजबरीने घ्यावे लागतात. अशा वेळी तो "मी" चा शोध बंड करून उठतो. घुसमट होते.

एकत्र कुटुंब आणि त्यापायी कधीकधी होणारी वैतागवाडी या विषयावर मराठी साहित्यात बरंच लिहिलं गेलं आहे. (विशेषतः सानिया, आशा बगे, गौरी देशपांडे या "नातेसंबंधपटू" लेखिकांकडून.)  पण मला भावलेलं चित्रण श्री. ना. पेंडसे यांनी "तुंबाडचे खोत" आणि "रथचक्र" या कादंबऱ्यांत केलं आहे.

"तुंबाडचे खोत" मध्ये खोतांचा मोठा वाडा, गोतावळा. गावाची खोती म्हणजे मोठा मान आणि आर्थिक सुबत्ता. खोत म्हणजे गावाचे राजे. सत्ताकेंद्राबरोबर येणारा माजसुद्धा खोतांमध्ये ठेचून भरलेला. अशा वाड्यात एका गरीब कीर्तनकाराची मुलगी गोदा सून म्हणून येते. तिच्या नवखेपणापासून सुरुवात करून ती वाड्यात रुळेपर्यंतचा प्रवास पेंडश्यांनी मोठा झक्क रंगवला आहे. तिच्या तिजवर नवऱ्याबरोबरच्या पहिल्या शैय्यासोबतीचा प्रसंग, वयाने मोठ्या पण नात्याने धाकट्या असणाऱ्या जावांबरोबर वावरतानाच्या घटना फार खुलवल्या आहेत. पण पेंडसे हे सारखं जाणवून देतात, की गोदा खोतांच्या वाड्यात रुळली, पण रमली नाही. मनाने अजूनही ती त्या गरीब कीर्तनकाराची पोर आहे. खोतांच्या वाड्यात तिचा जीव कासावीस होतो आहे.

पुढे तिच्या नवऱ्याच्या अघोरी कृत्यांमुळे खोतांची श्रीमंती लयास जाते. गाडं उतरणीला लागलेलं पाहून गोतावळा नाहीसा होतो. एक दीर परागंदा होतो, तर दुसरा वेगळं बिऱ्हाड थाटतो. या आपत्कालीन परिस्थितीत खरी गोदा ताठ कण्याने उभी रहाते. वेड लागलेल्या नवऱ्याला सांभाळते. एकुलत्या एक मुलाला गावाने वाळीत टाकलेलं असलं तरी खंबीर रहायला शिकवते. मुलाचा नामांकित वैद्य गणेशशास्त्री होतो. आपल्या सेवाभावी वृत्तीने तो गेलेलं वैभव परत मिळवून देतो.

याच्या उलटं टोक म्हणजे "रथचक्र" मधली "ती". मोठ्या वाड्यात, एकत्र कुटुंबात तीही घुसमटते आहे. वेडसर नवरा संन्यासी होण्यासाठी घर सोडून गेला आहे. पदरी दोन मुलं. तिला घराच्या उतरंडीत पायपुसण्याचं स्थान आहे. तिच्या दोन्ही मुलांना इतर कुटुंबीय नोकरासारखं वागवताहेत. अशा वेळी ती कक्षा भेदायचा प्रयत्न करते. आपल्या धाकट्या मुलाला शिकवायचं आणि या दलदलीतून बाहेर काढायचं या ध्येयाने ती प्रेरित आहे. पण ती गोदाइतकी खंबीर नाही. परिस्थितीखाली पिचून ती आक्रस्ताळेपणा करते, कधी पराकोटीचा स्वार्थीपणा दाखवते, हितशत्रूंचा पाणउतारा करायच्या नादात हितचिंतकांना डिवचते. रथचक्र जमिनीत रुतत जातं - तिने वर खेचायचा खूप खूप प्रयत्न करूनही. परिस्थिती बिघडत जाते. मोठा मुलगा वाड्याने फेकलेलं नोकराचं स्थान स्वीकारतो. धाकटा मुलगा शिकायला मुंबईला जातो खरा, पण आईचा धिक्कार करतो. सगळं करून-सावरून कोणाला त्याची किंमत नाही, या विचाराने ती कोलमडते. शेवटी विहिरीत जीव देते.

इंग्रजी साहित्यात ही घुसमट वाचायला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण व्ही. एस. नायपॉल यांनी लिहिलेलं "अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास" ही कादंबरी नुकतीच वाचली. नायपॉल भारतीय वंशाचे त्रिनिदादियन लेखक आहेत. १९७१ साली त्यांना बुकर पुरस्कार मिळाला आणि २००१ साली साहित्याचं नोबेल पारितोषिक. (नायपॉल काही वेगळ्या कारणांमुळे भारतात वादग्रस्त आहेत, पण ते इथे महत्त्वाचं नाही.)

मिस्टर बिस्वासची नाळ थेट गोदाशी आणि "ती"शी जुळते. बिस्वास एका दरिद्री कुटुंबातला. त्याचं लग्न गावातल्या मातब्बर तुलसी परिवारातल्या मुलीशी होतं. तुलसी परिवार त्याला घरजावई करून घेतो. तुलसी घरात अनेक विवाहित मुली त्यांच्या घरजावई पतींबरोबर रहात असतात. घराच्या आर्थिक चाव्या तुलसी पुरुषांकडे. घरजावयांना आश्रिताची वागणूक. सततचा पाणउतारा. बिस्वासचा कोंडमारा होतो. बिस्वास बंड करू पहातो, पण दोनतीनदा त्याला लज्जित अवस्थेत परत तुलसींच्या घरात परतावं लागतं. त्याच्या लक्षात येतं, की आपलं स्वतःचं घर असण्याला पर्याय नाही. त्याचं स्वतःचं घर हे त्याच्या स्वातंत्र्याचं आणि स्वत्वाचं प्रतीक ठरतं.

इथे नायपॉल पेंडश्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कथा पुढे नेतात. पेंडश्यांची गोदा जिंकते आणि "ती" हरते. नायपॉल मात्र वेगळाच शेवट दाखवतात. बिस्वास घर बांधतो खरा, पण ते ओबडधोबड, गचाळ आणि गलिच्छ असतं. बिस्वासला ते माहीत नसतं असं नाही, पण त्याला "आपलं घर आहे" हीच भावना महत्त्वाची वाटते. तो विजयी झाल्याचं दाखवतो, पण आतल्याआत त्याला त्या विजयाचा पोकळपणा खात रहातो.

कक्षा भेदली की नाही हे महत्त्वाचं नाही, स्वत्वाची जाणीव महत्त्वाची.

साहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

17 Feb 2013 - 9:18 pm | पैसा

तुंबाडचे खोत आणि रथचक्र वाचल्या आहेत. श्री. नां.च्या कादंबर्‍यांतून भोवताल, गाव हेही एक महत्त्वाचे पात्र असते. या दोन्हीही कादंबर्‍या आवडल्या होत्याच. त्यांना समांतर अशी पुरुष व्यक्तीरेखा व्ही एस नायपॉल यानी रंगवली आहे हे वाचून बरं वाटलं. आता तीही कादंबरी वाचणे भाग आहे.

खटासि खट's picture

17 Feb 2013 - 9:22 pm | खटासि खट

चांगला धागा आहे

मुक्त विहारि's picture

17 Feb 2013 - 9:46 pm | मुक्त विहारि

आणि मनाला भावले ते "कक्षा भेदली की नाही हे महत्त्वाचं नाही, स्वत्वाची जाणीव महत्त्वाची."

सॉलिड..

जेनी...'s picture

17 Feb 2013 - 9:50 pm | जेनी...

एकदम सहमत .
अजुन चांगले प्रतिसाद वाचण्याच्या प्रतिक्षेत ..
धागा उत्तम .

प्रचेतस's picture

17 Feb 2013 - 10:09 pm | प्रचेतस

लेख आवडला.
'तुंबाडचे खोत' चे खरे कथानक तसे गोदानंतरच सुरु होते. किंबहुना ही कथा एका व्यक्तीची नाहीच ती आहे एका घराण्याची, गोदा त्यातला एक छोटासा तुकडाच.

'रथचक्र' मधली 'ती' ची घुसमट मात्र खूप प्रभावीपणे व्यक्त झाली आहे.

ऐक शुन्य शुन्य's picture

18 Feb 2013 - 12:33 am | ऐक शुन्य शुन्य

'तुंबाडचे खोत' चे खरे कथानक तसे गोदानंतरच सुरु होते.

नरसु खोत, बज्या.. ते ओड्डल पर्यंत..प्रत्येकाचे व्यकती चित्रण तेही प्रत्येक व्यक्ती वेगळी अन हेवीदावी... सुरेख कांदबरी आहे...

सस्नेह's picture

17 Feb 2013 - 10:23 pm | सस्नेह

श्री ना अन व्ही एस यांच्या लेखनाच्या तुलनेची नस अचूक पकडली आहे.
पहिला पॅरा आवडला.
स्त्रीलेखिकांपेक्षा काही वेळा पुरुष लेखकच स्त्रियांच्या व्यथा भेदकपणे मांडण्यात यशस्वी झाले आहेत खरे...

चौकटराजा's picture

12 Aug 2014 - 9:29 am | चौकटराजा

स्त्रीलेखिकांपेक्षा काही वेळा पुरुष लेखकच स्त्रियांच्या व्यथा भेदकपणे मांडण्यात यशस्वी झाले आहेत खरे...
कारण पुरूष स्त्री चा शत्रू असलाच तर फक्त शारिरीक पातळीवर असतो. पण मानसिक पातळीवर स्त्रीनेच स्त्रीचे शोषण केल्याचे
दिसते. नणंदा भावजया, जावा जावा, सासू सून ही नाती काय सांगतात बर्‍याच वेळा ?

नणंदा भावजया, जावा जावा, सासू सून ही नाती काय सांगतात बर्‍याच वेळा ?

ये रीश्ते क्या केहलाते हैं. :)

मन१'s picture

17 Feb 2013 - 11:34 pm | मन१

समोर चित्र उभे राहिल असे जिवंत वर्णन करणार्‍या ह्या कादंबर्‍या असाव्यात असे वाटते.

मन१'s picture

17 Feb 2013 - 11:34 pm | मन१

समोर चित्र उभे राहिल असे जिवंत वर्णन करणार्‍या ह्या कादंबर्‍या असाव्यात असे वाटते.

संजय क्षीरसागर's picture

17 Feb 2013 - 11:42 pm | संजय क्षीरसागर

धन्यवाद!

अभ्या..'s picture

17 Feb 2013 - 11:50 pm | अभ्या..

छानच लिहिले आहे. सवाईच्या वर्गीकरणानंतर तुमच्या लेखनाबद्दल अपेक्षा वाढल्याच होत्या. पूर्ती झाली आहे.
अशाच सुंदर लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.

बॅटमॅन's picture

18 Feb 2013 - 12:04 am | बॅटमॅन

लेखन मस्त आवडले. साहित्याच्या तौलनिक अभ्यासाबद्दल अजून डीटेलवारी लिहिले असते तर अजून मजा आली असती.

पैसातै, मुक्तविहारी, खटासि खट, पूजा पवार, वल्ली, ऐक शुन्य शुन्य, स्नेहांकिता, मन१, संक्षी, अभ्या आणि बॅटमॅन

या माझ्या (हाताच्या बोटांवर) मोजता येणार्या प्रतिसादकांचे आभार!

रेवती's picture

20 Feb 2013 - 3:14 am | रेवती

लेखन फारच आवडले.

लई भारी लिहिलंय, तुंबाडचे खोत ही आयुष्यात वाचलेली पहिली कादंबरी,ब-याच दिवसांनी त्याबद्दल वाचुन खुप बरं वाटलं.

नंदन's picture

20 Feb 2013 - 10:15 am | नंदन

लेख आणि त्यामागची कल्पना आवडली. मात्र याबद्दल अधिक विस्ताराने लिहिलेत तर वाचायला नक्कीच आवडेल.

कक्षा भेदली की नाही हे महत्त्वाचं नाही, स्वत्वाची जाणीव महत्त्वाची.

घर आणि स्वातंत्र्याचं प्रतीक यावरून 'अ रुम ऑफ वन्स ओन' हा प्रसिद्ध निबंध आठवला. (किंवा अमृता प्रीतम यांचा चौथा कमरा).

तुमचा अभिषेक's picture

20 Feb 2013 - 10:30 am | तुमचा अभिषेक

छानच परिचय दिलात, कधी योग आला तर या कादंबर्‍या यामुळेच वाचणे होईल.

प्रचेतस's picture

11 Aug 2014 - 6:36 pm | प्रचेतस

श्री.नां.ची ही महाकादंबरी पुन्हा वाचायला सुरुवात केलीय.
निर्विवादपणे मराठीतील सर्वश्रेष्ठ कादंबरी.

धन्या's picture

11 Aug 2014 - 6:42 pm | धन्या

आमचे एक मित्र गड, किल्ले, लेणी आणि पुरातन मंदीरे या व्यतिरिक्त इतर कुठलाही विषय असला की मुग गिळून गप्प बसतात.

मात्र "तुंबाडचे खोत" मधला "तुं" उच्चारायचा अवकाश, हे मित्रवर्य मुग थुंकून अखंड बोलू लागतात.

चला, वल्लीशेठनं सर्टिफाय केलं म्हणजे नक्कीच सर्वश्रेष्ठ असणार. चलो बाकी लोग हवा आने दो!

यशोधरा's picture

11 Aug 2014 - 7:09 pm | यशोधरा

छान लिहिले आहे. मिपा सुरु झाल्यावर लगेच प्रतिसाद दिला आहे! :)

सौंदाळा's picture

12 Aug 2014 - 10:04 am | सौंदाळा

हत्या पण मस्त आहे वाचायला.

प्रचेतस's picture

12 Aug 2014 - 10:11 am | प्रचेतस

हत्या छानच आहे. पण त्याचा पुढचा भाग 'कलंदर' वाचलास काय?

किती विभिन्न शैली.

सौंदाळा's picture

12 Aug 2014 - 10:18 am | सौंदाळा

'कलंदर' राहीलय अजुन वाचायचं.
घेतो वाचनालयातुन लवकरच

छान लिहलं आहे, रथचक्र वाचली नाही आता शोधते किंवा मागवुन घेते. अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास - जवळच्या लायब्रररीमध्येच आहे म्हणुन लगेच मागवली :)

वल्ली धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद, आधी वाचला नव्हता.