फिल्टर कॉफी

ऑफिस म्हणजे काम. काम म्हणजे कंटाळा. कंटाळा म्हणजे विरंगुळ्याचा शोध. सर्वात सोपा विरंगुळा म्हणजे चहा/कॉफी. सर्वसाधारणपणे प्रत्येक ऑफिसमध्ये चहा कॉफीची सोय असते. आमच्याही आहे. साधं मशीन होतं आधी; आता आमचे लाड म्हणून ‘सीसीडी’ चं बसवलंय. त्याचं स्वागतही झालं बसवल्यावर. आहे; छान आहे.
पण सध्या एक नवीन डिस्कव्हरी झालीय मला. एक चहा कॉफी वाला आहे आमच्या ऑफिसखाली. तसा शक्यतो मी चहा कॉफी च्या वाट्याला जात नाही. ‘कधीच’ हा शब्द मी वापरत नाही, कारण अनेक कारणांमुळे अधे मधे माझं कॉफी/चहा पान होतं आजकाल. हां, तर तो चहा कॉफीवाला. त्याची थोडक्यात स्टोरी अशी आहे की तो एम८० ने आमच्या बिल्डिंग खाली येतो. एम८० बेसमेंट मधे पार्क करतो. तिथून घोडा सायकल घेउन बाहेर येतो. ही घोडा सायकल म्हणजे त्याचं दुकान. कॅरियर ला कॉफी चा ड्रम लावलेला, एका बाजूला एक पिशवी, त्यात डिस्पोजेबल ग्लास. हॅंडल ला एक पिशवी त्यात १ थर्मास, ज्यात चहा असतो. आणि रिझर्व ग्लास चा स्टॉक. इतकंच नव्हे, डोसा, उत्तप्पा, इडली, अशा साउथ इंडियन पदार्थांची मेजवानीही हॅंडल ला लटकवलेल्या पिशवीत असते.

पहिल्यांदा त्याच्याकडे गेलो तेंव्हाच लई खूश झालो. ५ रुपये द्यावेत, एक कॉफी असं सांगावं. एका झटक्यात बरोब्बर एक डिस्पोजेबल ग्लास तो काढतो, लयबद्ध असा ३ वेळा कॅरियर वर आपटतो. आपटता आपटता विचारणार, "सादा, कडक?". तुम्ही सांगावं, "कडक", की तो त्या ग्लासात एक छोटा चमचा अस्सल फिल्टर कॉफी घालणार, आणि ड्रम मधून ग्लासभर फिल्टर कॉफीचा ‘जाम’ भरणार. या सगळ्याच्या जोडीला मोबाईल वर लावलेली साउथ इंडियन गाणी जो रंग आणतात ना, तो और आहे. त्याचा चहासुधा जबरदस्त असतो बरं का, आलं आणि वेलची वाला. पण लिमिटेड एडिशन. एक थर्मास भर; बस.

FC

तो मला खरोखर भावला त्या दिवशी मी खाली उतरलो आणि पाऊस आला. कडेकडेने मी त्याच्याइथवर गेलो. त्याने खुणेने मला समोरच्या दुकानाच्या शेडखालीच थांबायला सांगितलं. मी थांबलो. तो तिथवर त्याची छत्री घेऊन आला. मी आणि बाजूची २ माणसं, आमच्या ऑर्डर घेतल्या. मला विचारताना स्वत:च म्हणाला, "कडक ना?" मी होय म्हटलं. ५ रुपये देऊ केले, तर म्हणाला बादमें देना. गेला; कॉफ्या घेऊन आला. आम्हाला कॉफ्या दिल्या. आम्ही त्याचा आस्वाद घेतला. नंतर मी ग्लास त्याच्या इथल्या कचरापेटीत टाकायला जाऊ लागलो तर पुन्हा खुणेने मला थांबवलंन. माझ्याइथे आला, म्हणाला, "आप मत भीगो सर". माझ्याकडून ग्लास आणि १० ची नोट घेऊन गेला, ५ परत आणून दिले. इतकी सर्व्हिस ! कौतुक वाटलं मला ! धंदा म्हणून असेल तरीही इतकी सर्व्हिस कुणी देत असेल तर केवढं बरं वाटतं ! आणि तो मनापासून देतो ही सर्व्हिस.

या माणसाची वेळही ‘स्विस टाईम’ इतकी काटेकोर आहे. पहिल्याच दिवशी मी विचारलं तेंव्हा मला म्हणाला, "सुबह ८ से ११:२० और दोपहर ३ से ६ रहता हूं" एक दिवस ११:२१ झाले होते उतरायला तर मी या माणसाला पाठमोरं बघितलं. इतकं काटेकोर. एकंदरीत खूप वेगळा ‘अण्णा’ आहे तो. लई भारी.

प्रतिक्रिया

च्यायला
त्या अण्णापेक्षा तुमचा रतीबातला प्रॉम्प्ट पणा जास्त काटेकोर आहे.
आता पुनर्प्रत्ययाचा आनंद घेणारे पण छान छान येतील.
आमचे पण चान चान.

>>> च्यायला, त्या अण्णापेक्षा तुमचा रतीबातला प्रॉम्प्ट पणा जास्त काटेकोर आहे.
वात आणलाय राव...

-दिलीप बिरुटे

वात आणलाय राव...

फिल्टर कॉफी नको. नुसता फिल्टर पायजे.

>>>फिल्टर कॉफी नको. नुसता फिल्टर पायजे.
फिल्टर कॉफी नाही आणि नुसती फिल्टरही नाही.
मी अशा 'धाग्यातील अनुभवांनी' वात येतो म्हणतो.

अण्णा लोकांचा इडलीवडातला काटेकोरपणा येईल, कोणाचा दुधावाल्याचा काटेकोरपणा येईल, कोणाचा बांगड्या वाला 'ये बंगडीवाले' चा काटेकोरपणा येईल. कोणाचं काय तर कोणाचं काय ? सालं कुछ हटके पाहिजे. काटेकोरपणा संपला की कोणाचा युपी वाले असेच, तसेच येईल. मग आमचा महाराष्ट्र अभिमान येईल, मग स्त्री-पुरुष आणि लिंगभेदापलिकडचा विचार येईल. मग, देश-परदेशातला अभिमान आणि त्याचा काटेकोरपणा येईल...

-दिलीप बिरुटे

त्यासाठीच वेळीच फिल्टर लावा प्राडॉ. साहेब
बस्सबस्स केलय राव. प्रतिज्ञा काय, आरक्षण काय.
पार डस्ट्बीन केलय इथे. :(

वात आणलाय राव...
त्यांच्या नावातला वेल्ला पंजाबी असेल. ;)

कॉफी खास आवडीची नाही माझ्या... मात्र अण्णा लोकांच्या मेहनतीचे अन सचोटीचे मलाही खरेच कौतुक वाटते.. पाणीपुरीवाले भैय्या आणि हे चायकॉफी इडलीसांबार वाले अण्णा, दोघांमध्ये जमीन अस्मानाचा फरक..

दिलीप, अभ्या:

छान स्वागत झालं हो.
आणि हो; डसबिन कुठलं, आणि त्यात चांगल्या गोष्टी टाकायच्या नाहीत, (त्यांचा कचरा होतो), हे समजावल्याबद्दल खूप खूप आभार.

थंड घ्या, भटांनो! आणि मनावर तर अजिबात घेऊ नका.

मालक रागावू नका. आपला 'अधीर उपाशी' [सप्टेंबर २०१२] लेख अनेकांना आवडला म्हणून आपल्या ब्लॉगवरील लेख टाकून वाचकांची परिक्षा घेणार काय ? फिल्टर कॉपी [ऑगष्ट २०१२], आरक्षण [सप्टेंबर २०१२] प्रतिज्ञा [फेसबूक], आणि आपल्या ब्लॉगवरील लेखांचं किती रतीब घालणार ? आपल्या प्रतिसादात आपल्या प्रोफाईलवर ब्लॉगची लिंक द्या, वाचक सवडीने वाचतीलच.

मिपा एकदा उत्तम चाळून घ्या. जमलं तर वाचा. आणि मग आपलं नवनवीन लेखन टाकावं असं एक मिपाकर वाचक म्हणून आपल्याला म्हणेन. अर्थात मर्जी आपली. आपला ब्लॉग चाळला, ब्लॉग छान आहे.

नवनवीन आणि उत्तम लिहित राहा. आपणास 'दिलीप आणि अभ्याच्या' मनःपूर्वक शुभेच्छा.

-दिलीप
(आपलाच स्पष्ट )

कुठल्या आक्षेपाकडे लक्ष द्यायचे आणि कुठल्याकडे नाही हे सरावाने कळेल हो भाऊ.
तूर्तास या आक्षेपाकडे संपूर्ण दुर्लक्ष करा, असा अनाहूत सल्ला देतो.

काय राव लगेच चिडता तुम्ही पण.

अभ्याचं आणि सरांच(आणि माझं सुध्दा) हेच म्हणणं आहे की आपल्या ब्लाॅगवरनं लेखन इथे आणून टाकताना तारतम्य बाळगा जरा. तुमचा पहिला लेख छान होता यात वादच नाही, इथल्या वाचकांनाही तो खुप आवडला पण याचा अर्थ असा नाही की लगेच त्या वाचकांना तुम्ही गृहीत धरून तुमच्या ब्लाॅगवरच्या लेखांचा रतिब इथे घालायचा. एखाद्या लेखकाचं लेखन वाचकांना कितीही आवडलं तरी रोज मग त्याच प्रकारच्या येणार्या लेखांना लोकं कंटाळतात. शेवटी काय आहे की, उस गोड लागला म्हणून कोणी मुळासकट खात नाही.

आम्ही फक्त तुम्हाला जागं करण्याचा प्रयत्न करतोय, डोळे उघडायचे की नाही हे तुमच्यावर आहे.

@ किसनजी शिंदे की जे संपादकसो आहेत, ते जागं करायला एक प्रतिसाद दोन दोन वेळा का लिहिताय ?

त्याचं काय आहे की आमचं आयडियाचं कनेक्शन आहे ना म्हणून. ;)

व्हॉट अ‍ॅन आयडीया सरजी

छान लेखन.

काही 'सल्ले' वाचले. पण हे सल्ले ह्याच लेखनावरती का आले ते उमगले नाही. गेल्या काही दिवसात स्वतःच्या ब्लॉगवरील जुनाट वैरणीचा रतीब इथे बरेच लोक घालत आहेत. त्यातून नेमकी 'झाडाझडती' साठी सदर लेखाकाचीच निवड करण्यासाठी काय निश्कर्ष लावण्यात आले ? का इतर रतीब घालणार माननीय हे काही अधिकारी व्यक्तींच्या जवळच्या असल्याने त्यांना पंखाखाली घेण्यात आले आहे ?

+१
वरिजिनल पराशी सहमत

कोण कोणाशी संबंधित आहे सांगून टाका. जरा आमचे पण जनरल नॉलेज वाढू द्या.

उगाच कोळसा उगाळायचा ?

वरच्या आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की आमचे थोबाड बंद !

पण हे सल्ले ह्याच लेखनावरती का आले ते उमगले नाही.

राज्कुमार सरांना १००% अनुमोदन.

बरेच असेही लोक आहेत जे एक किंवा दोन लेख टाकून, वाचकांचे प्रतिसाद पदरात पाडून, त्यात स्वतःच्या प्रतिसादांची भरपूर भर टाकून, पुन्हा इथे फिरकलेलेही दिसत नाही. ना दुसरे लेख वाचून त्यावर कधी प्रतिसाद देण्याची तसदी घेताना दिसत नाहित.

फोटो सुंदर आहे. तुम्ही काढलेला असेल तर त्याचा एक्झिफ तपशील द्याल का? (विण्डोजमधे फोटोच्या प्रॉपर्टीजमधून हे दिसेल.) तुमच्या कॉफीवाल्या अण्णाचाही 'इन अ‍ॅक्शन' फोटो काढता आला तर बघा.

फिल्टर कॉफीची गोष्टच निराळी. चिअर्स.

कारण मी आंतर्जालावर पाहिलेला आठवत होता, शोधलं तर बर्‍याच ठिकाणी तो सापडला, हे एक उदाहरण

माझ्या काही शंका आहेत. जमले तर संबंधितांनी उत्तरे द्यावीत.

आपला 'अधीर उपाशी' [सप्टेंबर २०१२] लेख अनेकांना आवडला म्हणून आपल्या ब्लॉगवरील लेख टाकून वाचकांची परिक्षा घेणार काय ?

वाचकांवर वाचायची कुणी सक्ती केली आहे काय? लिखाण चांगले आहे कि वाईट यापेक्षा ते ब्लॉगवरील आहे याला जास्त महत्त्व आहे काय? आणि वाचकांची परीक्षा ??? काय घरात घुसून वाचकांची मानगूट पकडून लेख वाचायला लावते काय कोण ?

आपल्या ब्लॉगवरील लेखांचं किती रतीब घालणार ? आपल्या प्रतिसादात आपल्या प्रोफाईलवर ब्लॉगची लिंक द्या, वाचक सवडीने वाचतीलच.

ब्लॉगवरील लेखांचा रतीब इथे घालण्यात काय चूक आहे? आक्षेप नेमका कशाला आहे? पूर्वप्रकाशित लेखन टाकण्याला, की दोन लेखात पुरेसे अंतर न ठेवण्याला की इतर कशाला?

मिपा एकदा उत्तम चाळून घ्या. जमलं तर वाचा. आणि मग आपलं नवनवीन लेखन टाकावं असं एक मिपाकर वाचक म्हणून आपल्याला म्हणेन. नवनवीन आणि उत्तम लिहित राहा.

मिपावर लिहिण्यापूर्वी मिपावरील लेखन वाचणे हि precondition आहे काय? माझे वैयक्तिक मत असे आहे की ज्याला लिहायचे आहे त्याने लिहावे, ज्याला वाचावेसे वाटेल त्याने वाचावे, ज्याला हवे त्याने दोन्ही करावे. इतके लोक वाचनमात्र असतात, काही जण लेखनमात्र असतील तर काय बिघडले? मी एक वाचक आहे, मला चांगले वाचायला मिळाल्याशी मतलब. लिहिणारा इतर काय वाचतो त्याच्या चौकशा करायची मला जरूर भासत नाही.

आपल्या ब्लाॅगवरनं लेखन इथे आणून टाकताना तारतम्य बाळगा जरा..... त्या वाचकांना तुम्ही गृहीत धरून तुमच्या ब्लाॅगवरच्या लेखांचा रतिब इथे घालायचा.

तारतम्य बाळगा म्हणजे नेमके काय देवा ?? आणि वाचकांना गृहीत धरणे म्हणजे तरी नेमके काय ??

एखाद्या लेखकाचं लेखन वाचकांना कितीही आवडलं तरी रोज मग त्याच प्रकारच्या येणार्या लेखांना लोकं कंटाळतात.

जे कंटाळतील ते त्या लेखकाचे लेख वाचणार नाहीत. शिम्पल. मला खरेच हा प्रश्न पडला आहे की लेकांनो तुम्हाला कोण जबरदस्ती करतो वाचायची?

पार डस्ट्बीन केलय इथे.

मोजून चार लेख टाकलेले दिसतात लेखकाने तर थेट डस्ट्बीन ???

मी कदाचीत चुकत असेन काही समजून घेण्यात. तसे असेल तर कुणी समजवावे. मी आनंदाने ऐकून घेईन.

उत्तरांच्या अपेक्षेत आहे.

पुर्ण सहमती.

(स्वतःच्या) ब्लॉग वरचे (पुर्वप्रकाशित) लेखन मिपा वर प्रकाशित करण्यास मला तरी काहि वावगे दिसत नाहि. जो तो ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मिपाचा आस्वाद घेत असतो. आणी वैयक्तिक रित्या मला इतर ब्लॉग्सवर जाण्यापेक्षा मिपावर वाचन करणे जास्त सोयीस्कर वाटते.

असो. वेल्लाभट तुम लिखते रहो!

पांथस्त तुम्ही प्रामाणिकपणे लिहिलंय असं वाटलं म्हणून तुम्हाला सांगतो. ब्लॉगवरील लेखन टाकू नका असं मी तरी म्हणालेलो नाही, काय टाकायचं त्याचं भान असावं अस मला म्हणायचं आहे. काल दिवसभर मिपावर पडीक होतो तेव्हाचं एक निरिक्षण तुम्हाला सांगतो. वेल्लोभट यांनी एकाच दिवसात किमान सहा लेख टाकलेले दिसले किती लेख टाकायचे याची काही मर्यादा मिपावर नाही. आपल्या ब्लॉगवरील आरक्षण लेखन मिपावर टाकलं बघा बरं त्याची चर्चा आणि चर्चाप्रस्ताव. क्विक विडंबन: कळीदार कपूरी पानफिल्टर कॉपी आहेच. आणि एक प्रतिज्ञा नावाचं एक चित्र आणि दोन ओळी असा एक लेख तीनवेळा अप्रकाशित झाला. मिपाचं उर्ध्वश्रेणीकरणापूर्वी नवसदस्यांच्या वावराबद्दल एक सूचना होती ती आत्ता मला सापडत नाहीहे, मिपावर उत्तम लेखन यावं असं एक मिपाकर वाचक म्हणून तुम्हाला जसे वाटेल तसे मलाही वाटते. 'कैच्या कै रतिबापेक्षा' काही निवडक वाचकांना आवडेल. असं माझं एक मत आहे, आणि माझं मत सर्वांनाच पटले पाहिजे असं काही नाही. काय लिहायचं जसं स्वातंत्र्य आहे, तसं काय वाचायचं याचंही वाचकांना स्वातंत्र्य आहेच, यात काही वाद नाही.

वेल्लाभट तुम लिखते रहो याच्याशी सहमत पण 'नवनवीन, उत्तम आणि निवडक' येऊ द्या, असे म्हणण्याचे स्वातंत्र्य एक मिपाकर म्हणून मला आहेच.

-दिलीप बिरुटे

मला एकदाच, फक्त एकदाच प्रा.डॉं. चा स्वसंपादन न केलेला प्रतिसाद बघायचा आहे. त्या शिवाय आमच्या पिंडाला कावळा शिवणे नाही !

हाहाहा. खरंय. प्रयत्न करतो.

-दिलीप बिरुटे

परा, हा वरती बघ रे तो प्रतिसाद! ;)

(उगीचच केलेले किडे...)

हा घ्या प्राडाँचा स्वसंपादनपूर्व प्रतिसाद. :-D (जनहितार्थ जारी)

*************************************

पांथस्त तुम्ही प्रामाणिकपणे लिहिलंय असं वाटलं म्हणून तुम्हाला सांगतो. ब्लॉगवरील लेखन टाकू नका असं मी तरी म्हणालेलो नाही, काय टाकायचं त्याचं भान असावं अस मला म्हणायचं आहे. काल दिवसभर मिपावर पडीक होतो तेव्हाचं एक निरिक्षण तुम्हाला सांगतो. वेल्लोभट यांनी एकाच दिवसात किमान सहा लेख टाकलेले दिसले किती लेख टाकायचे याची काही मर्यादा मिपावर नाही. आपल्या ब्लॉगवरील आरक्षण लेखन मिपावर टाकलं बघा बरं त्याची चर्चा आणि चर्चाप्रस्ताव. क्विक विडंबन: कळीदार कपूरी पानफिल्टर कॉपी आहेच. आणि एक प्रतिज्ञा नावाचं एक चित्र आणि दोन ओळी असा एक लेख तीनवेळा अप्रकाशित झाला. मिपाचं उर्ध्वश्रेणीकरणापूर्वी नवसदस्यांच्या वावराबद्दल एक सूचना होती ती आत्ता मला सापडत नाहीहे, मिपावर उत्तम लेखन यावं असं एक मिपाकर वाचक म्हणून तुम्हाला जसे वाटेल तसे मलाही वाटते. 'कैच्या कै रतिबापेक्षा' काही निवडक वाचकांना आवडेल. असं माझं एक मत आहे, आणि माझं मत सर्वांनाच पटले पाहिजे असं काही नाही. काय लिहायचं जसं स्वातंत्र्य आहे, तसं काय वाचायचं याचंही वाचकांना स्वातंत्र्य आहेच, यात काही वाद नाही.

-दिलीप बिरुटे

आमच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून लोकांची काय धडपड. ;)

मोदकशेठ, अहो मला 'स्वसंपादनपूर्व प्रतिसाद' बघायचा नाहीये. प्रा. डाँ. चा असा कुठलाही एक प्रतिसाद बघायचा आहे, जो त्यांनी स्वसंपादित केलेला नसेल. ;)

श्या.. काय राव परा.

तुमच्या पिंडाला कावळा शिववायची गडबड असती तर तुमच्या प्रतिसादावर उपप्रतिसाद दिला असता...

हे किडे म्हणजे फक्त प्राडाँची खेचत होतो.

काय राव तुम्ही झंटलमन लोक...

त्यांची खेचू नका. त्यांच्या 'डब्बल बॅरल' विषयी तुम्हाला अजुन माहिती नाही.

आता पुढच्या गप्पा सवडीने खवत मारू.

अवांतर केले म्हणून मिपाकाळजीवाहक निषेधाची पत्रके वाटायला सुरू करतील..

(स्वतःच्या) ब्लॉग वरचे (पुर्वप्रकाशित) लेखन मिपा वर प्रकाशित करण्यास मला तरी काहि वावगे दिसत नाहि. जो तो ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मिपाचा आस्वाद घेत असतो. आणी वैयक्तिक रित्या मला इतर ब्लॉग्सवर जाण्यापेक्षा मिपावर वाचन करणे जास्त सोयीस्कर वाटते. >>>>

छान ! मग अस करू यात का ? सगळ्या ब्लॉगर्स ला त्यांचे सगळे पुर्वप्रकाशित लेखन ईकडे ( मिपावर) टाकायला सांगावे का ? एकुण फक्त १२००० हजार ब्लॉगर्स आहेत , आणि प्रत्येकी १० लेख एका दिवसात टाकायला सांगुयात म्हणजे एकुण १,२०,००० !! व्वा कित्ती छान होईल ना मग , मिपाचे ओरिगीनल लेखक ( जे फक्त मिपावर लिहीतात .) जे दिवसातुन साधारण २० एक लेख/कविता/काकु/भटकंती टाकत असतात. छ्या !! कुठे २० आणि कुठे एक लाख वीस हजार ..

एक प्रश्न परत विचारतो. आक्षेप नक्की कशाला आहे? पूर्वप्रकाशित लेखन टाकण्याला की दोन लेखातील कमी अंतराला? की पूर्वप्रकाशित लेखनात कमी अंतर ठेवण्याला ?? की अजून चौथेच काही आहे ??? प्रश्न एकदम नेमका आहे. नेमके उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे.

बिरुटे सरांनी इथेच वर दिले आहे. एकाच दिवसात ७ धागे. त्यात एक फेसबुकी फॉरवर्ड वाटणारा ४ वेळा अप्रकाशित केला. तो का अप्रकाशित केला जातो आहे याची चौकशी करण्याऐवजी परत परत तोच धागा टाकणे याला काय अर्थ आहे? लेखक महाशय संपादक मंडळाकडे चौकशी करून विचारू शकत होते. अन्यथा सांगू शकत होते की "ते ढकलपत्र नाहीये. मी स्वतः लिहिलं आहे." मामला खतम. पण इथे लिखाण टाकण्यापूर्वी इथले धोरण, इथे दाद कोणाकडे मागावी याबद्दल किती जण वाचतात?

नवीन मंडळींचे स्वागतच आहे. पण अति उत्साहाच्या भरात कोणी एका वेगळ्या प्रकारच्या संस्थळाला मराठी फेसबुक्/ऑर्कुट समजू नये ही किमान अपेक्षा आहे. असे एका लेखकाचे ५/६ धागे पहिल्या पानावर दिसले की तुमचेच काही सन्माननीय मित्र ओरडायला लागतात. 'मिपाच्या नव्या रूपाला साजेसे धागे' वगैरे प्रतिक्रिया तुम्हीही पाहिल्या असतीलच! संतुलन साधणे हे सर्वांकडूनच अपेक्षित नाही का? धन्यवाद!

नेमके उत्तर बिरुटे सरांनी इथेच वर दिले आहे.

त्यांचे उत्तर नेमके वाटले असते तर मी परत प्रश्न विचारलाच नसता. शिवाय त्यांचे उत्तर आणि तुमचे जुळत नाही ती वेगळी गोष्ट आहे. त्यांनी २-३ दा "नवनवीन लिहा" असा उल्लेख केला आहे. तुमचा मुख्य कन्सर्न क्वालिटी वाटतो आहे.

एकाच दिवसात ७ धागे. त्यात एक फेसबुकी फॉरवर्ड वाटणारा ४ वेळा अप्रकाशित केला. तो का अप्रकाशित केला जातो आहे याची चौकशी करण्याऐवजी परत परत तोच धागा टाकणे याला काय अर्थ आहे?

इथे एक प्रश्न विचारायचा आहे. धागा अप्रकाशित केला तेव्हा सदर सभासदास कळवले जाते काय? माझा धागा कधी अप्रकाशित न झाल्याने नक्की काय प्रोसेस पाळली जाते ते माहित नाही. मुळात काही पक्की defined प्रोसेस आहे का तेच मला माहित नाही. तसे नसेल तर आपला धागा मुद्दाम अप्रकाशित झाला आहे हेच न कळण्याची शक्यता आहे. मिपात काहीतरी घोळ झाला असेल असे गृहीत धरून तोच धागा परत परत टाकला असण्याची शक्यता आहे. तसेच झाले असेल असे नाही पण शक्यता आहे. आणि तसे नसेल तर संपादकांना काही काळापुरता एखाद्या सभासदाचा नवीन लेख टाकण्याचा हक्क काढून घेण्याचे स्वातंत्र्य असावे असे माझे मत आहे.

पण इथे लिखाण टाकण्यापूर्वी इथले धोरण, इथे दाद कोणाकडे मागावी याबद्दल किती जण वाचतात?

गोष्ट खरी आहे. पण स्वानुभवाने सांगतो, बरेचदा कुठे वाचावे हेच कळत नाही. हे टाळण्यासाठी स्वागताच्या इमेल मध्ये अशा धाग्यांची यादी जोडावी अशी सूचना करतो. अर्थात हे आत्ता होत असेल तर आनंदच आहे.

अति उत्साहाच्या भरात कोणी एका वेगळ्या प्रकारच्या संस्थळाला मराठी फेसबुक्/ऑर्कुट समजू नये ही किमान अपेक्षा आहे.

अपेक्षा रास्त आहे. पण टीका ही पण योग्य शब्दात करावी असे मत आहे. निदान नवीन सदस्यांशी बोलताना तरी. एकदा आयडी नाठाळ आहे हे सिद्ध झाले की वेसण घाला की.

असे एका लेखकाचे ५/६ धागे पहिल्या पानावर दिसले की तुमचेच काही सन्माननीय मित्र ओरडायला लागतात. 'मिपाच्या नव्या रूपाला साजेसे धागे' वगैरे प्रतिक्रिया तुम्हीही पाहिल्या असतीलच!

आमचे कोण मित्र ????? धन्यवाद !!! ;-)

संतुलन साधणे हे सर्वांकडूनच अपेक्षित नाही का?

मान्य.

पण ब्लॉग वरील लिखाण मिपा वर टाकण्यात नक्की गैर काय हे अजूनही कळले नाही. असो, माझी समज कमी पडत असेल. जाऊ देत.
असो, निदान तुम्हालातरी माझ्या प्रतिसादात प्रामाणिकपणाचा अंश दिसला हे बघून आनंद झाला.

समजा झाले तसे तर काय मज्जा होईल याचे एक गणित करू. एका मराठी ब्लॉगरचे सरासरी २०० लेख असतात असे गृहीत धरू. जितके म्हणून मराठी ब्लॉगर आहेत त्यांनी हे असे दिवसाला १० लेख टाकले तर २० दिवसात सगळा जुनापुराणा माल खलास होऊन जाईल.(सरासरी ५०० लेख धरले तर ते ५० दिवसात संपतील. स्टील नॉट अ बिग डील.)

त्यानंतर मिपाचे ओरिगीनल लेखक ( जे फक्त मिपावर लिहीतात .) त्यांना हव्या त्या फ्रिक्वेन्सी ने लेख टाकायला मोकळे. आणि मज्जा म्हणजे सगळे जुने लेख संपून गेल्याने हा प्रॉब्लेम बराच काळ परत येणार नाही. सांगा आहे की नाही मज्जा ??? फक्त त्या २० दिवसात मिपा वर फिरकू नका म्हणजे झाले.

अजून करा गणित !!! आमाला येत नाय काय ??? ;-)

गुड आयड्या!

आमचे आणि विमे ह्यांचे विचार आजकाल जुळायला लागलेले बघून अतिव दु:ख झाले आहे.

एक तर विमे ह्यांनी काही दिवस जालसंन्यास घ्याव अशी विनंती किंवा मग मी तरी घेतो.

पराने माझा प्रतिसाद चोरला ;)

आमचे आणि विमे ह्यांचे विचार आजकाल जुळायला लागलेले बघून अतिव दु:ख झाले आहे.

एक वेळ राज -उद्धव गळ्यात गळे घालतील असे वाटलेले होते पण परा - विमे ????????

फक्त त्या २० दिवसात मिपा वर फिरकू नका म्हणजे झाले. >>>

?????

नका ना फिरकु मग !

धंदा म्हणून असेल तरीही इतकी सर्व्हिस कुणी देत असेल तर केवढं बरं वाटतं ! आणि तो मनापासून देतो ही सर्व्हिस.

धंदा नाही हो पॅशन, लगाव/लगन. आवडला किस्सा.

फिल्टर कॉक्फी म्हणून आस्थेने धागा उघडला आणि भ्रमनिरास झाला. (अवांतर आणि अतिअवांतरामुळे नव्हे त्याने मनस्ताप झाला :)) )

तो त्या ग्लासात एक छोटा चमचा अस्सल फिल्टर कॉफी घालणार, आणि ड्रम मधून ग्लासभर फिल्टर कॉफीचा ‘जाम’ भरणार

काही म्हणजे काही कळले नाही.
१. "एक छोटा चमचा अस्सल फिल्टर कॉफी" - म्हणजे काय?
२. "ड्रम मधून ग्लासभर फिल्टर कॉफीचा ‘जाम’" - म्हणजे काय?

लेखातल्या फोटोचा आणि लेखातल्या घटनेशी काहीही संबंध नाही. लेखात डिस्पोजेबल ग्लासचा उल्लेख आहे.
पण लेखात फिल्टर कॉफी फोटो सोडून कुठे दिसलीच नाही.

- (मद्रासी अण्णा) सोकाजी

याच प्रतिसादाची अपेक्षा होती!
इतर वाद चालूदेत.. पण चमचा भर "अस्सल फिल्टर कॉफी" काय असते?
ड्रम मधून कसला जाम भरला जातो?

(फिल्टर कॉफी प्रेमी) मैत्र

मस्त लिहिलंय, आवडलं. फिल्टर कॉफीचा फोटो भारीये.

सॉरी ! तो मी 'काढलेला' नाही. 'शोधून काढलेला' आहे.

.

लेख आवडला. ड्रम मधून ग्लासभर फिल्टर कॉफीचा ‘जाम’" - म्हणजे उकळते पाणी का? हे मात्र लेखात स्पष्ट करायला पाहिजे होते.

मी कोणाचे ब्लॉग शोधून तिथे वाचायला जात नाही, शिवाय मिपाच्या ईंटरफेस ची चांगलीच सवय झाल्याने मला मिपावरच वाचायला मजा येते. त्यामुळे लेख इथे टाकल्याबद्दल धन्यवाद. (काही काही ब्लॉग्ज लेखन चांगले असले तरी विचित्र रंगसंगति , फॉन्ट वगैरे मुळे अक्षरशः वाचवत नाहीत)