माझे आजोबा - एक आठवण

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
31 Jan 2013 - 2:08 am

१ जानेवारीला दुपारी मामांचा फोन आला. ते म्हणाले की आजोबा (आईचे वडील) तुझी आठवण काढत होते, भेटून जा ! आजोबा गेले काही महिने वृद्धापकाळानुसार तब्येतीच्या तक्रारीने सारखे, दवाखाना व घर अश्या स्वरूपात होते. पण मला आजोबांनी 'का आणि कशासाठी' बोलावले याची कल्पना नक्कीच होती.

आजोबांना भेटायला जायला ४ जानेवारीची तारीख निघाली. ६ तारखेला लहान बहिणीच्या लग्नाची गडबड असल्यामुळे उशीर झाला होता. आजोबांना भेटायला आयसीयूत गेलो तर काळजात धक्कं झालं. आजोबांची तब्येत बरीच खालावली होती. शरीर जास्तच सुरूकतलेलं दिसत होतं. प्रचंड थकवा आलेला होता. आजोबांचं वय होतं ८४ वर्षे आणि आता ते नक्कीच जाणवत होतं.

आजोबांजवळ बसलो, त्यांच्याशी बोललो... आई सोबत होती तिने आजोबांना जेवू घातलं. जेवणाच्या तयारीची आजोबांची लगबग वेगळीच होती. जेवायच्या आधी हात धुवायचे, जेवताना शितं सांडायला नको... आदी सर्वकाही मसल्समेमरी असल्यासारखं आजोबांचं चाललं होतं. मी लहानपणापासून आजोबांना असं नीट नेटकं राहताना बघत आलोय त्यामुळे ते नवीन नव्हतं, मात्र आयुष्याच्या या टप्प्यावर सुद्धा त्यांच्या वागण्यात बदल नव्हता हे विशेष. जेवण झाल्यावर बोलले की डॉक्टरांनी परवानगी दिली तर मी लग्नात येईल आणि नाही दिली तर नाही येणार... मी 'हो' म्हणून मान डोलवली.

थोड्यावेळाने परत 'तो' विषय काढला ज्यासाठी त्यांनी मला बोलावले होते. त्यांना देहदान करायचे होते. त्यासाठी सर्व औपचारिकता मी पूर्णं कराव्यात असे त्यांना वाटत होते. गेल्या जुलै महिन्यापासून त्यांचा हा आग्रह होता की त्यांना देहदान करायचे आहे. मी अनेकदा त्यांना म्हणालोसुद्धा की, "आम्ही करू की तुमचं सगळं, तुम्हाला विश्वास वाटत नाही का?" तर ते त्यावर कायम म्हणायचे की, "तुम्ही तरी राखच करणार ना? त्यापेक्षा चार पोरं शिकली तर काय वाईट?" मग हा विषय तिथेच थांबायचा. जेव्हा आजोबा आयसीयू मध्ये दाखल झाले तेव्हापासून त्यांचा हा आग्रह अधिकच वाढला. मग त्यांच्या इच्छेखातर सर्व औपचारिकता पूर्णं केल्या. त्या दिवशी ते समाधानी दिसले.

आजोबांचा जन्म एका खेड्यात झाला. शिक्षण बेताचेच, घरची परिस्थिती बर्‍यापैकी होती. मात्र संपूर्ण आयुष्य गेलं ते एका छोट्या खेड्यात शेती करण्यामध्ये... नातेवाइकांकडे कुठे गेलं तरच गाव सोडलं असेल. शेगावची वारी मात्र नित्यनेमाने केली. एकदा तर शेगाव ते पंढरपूर पायीवारी सुद्धा त्यांनी केल्याचं मला आठवतं. गजानन बाबांवर खूप श्रद्धा होती त्यांची. एकदा असंच दवाखान्यात झोपून खिशातील गजानन विजय या ग्रंथाची छोटी आवृत्ती वाचत होते, मी विचारलं की, "कशाला त्रास करून घेताय तुम्ही? आणि एवढं बारीक वाचता येतं का आता तुम्हाला?" तर त्यावर ते म्हणाले की, "मला आता वाचावं कुठे लागतं? हे (पुस्तक) तर सवयीनुसार हातात पकडलेलं आहे बाकी आता सर्व पाठ झालेलं आहे. वाचायची गरजच नाही."

आजोबांशी असा अनेकदा संवाद साधत असताना मला अनेक प्रश्न पडायचे, काहींचा उलगडा झाला काहींचा नाही झाला. गेल्या एक-दीड वर्षांपासून आजोबांनी सर्व विषयांतून स्वतः:ला बाजूला केले. तसे सर्व व्यवहार मामांच्या हाती देऊन, दहापेक्षा जास्त वर्षे झाली होती, मात्र गेलं दीड वर्ष तर आजोबांनी अक्षरशः सर्वच गोष्टींतून मन बाजूला केले होते. हे असं म्हणायला फार सोपं असतं, मात्र आपलं मन असं असतं की जे हातातून निसटतंय त्याचाच जास्त हट्ट आपलं मन करत असतं. अश्या वेळी आजोबा मात्र अगदी वेळापत्रकानुसार ठरवल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने बाजूला होत गेले. शेवटी 'गजानन बाबा आणि ते' एवढाच व्याप उरला होता.

दिनांक २० जानेवारी २०१३ ला संध्याकाळी मामांचा परत फोन आला - आजोबा गेले !

आजोबा गेले याचं खूप दु:ख होतंच पण खरं सांगायचं तर आजोबांनी हेवा वाटावा अशी सांगता केली होती. शेतकरी कुटुंबात जन्मलेले आजोबा, त्यांनी आयुष्यभर शेती केली, स्वतः:चं शिक्षण बेताचेच होते मात्र दोन मुले व चार मुलींना शिकतील तेवढं शिक्षण दिलं. आयुष्यभर जयपूर नावाच्या एका खेड्यात राहिले जेथे दिवसातून केवळ एक बस जाते व तेवढीच परत येते. अश्या वातावरणात जगताना आजोबांनी एवढं छान जीवन कसं काय ठरवलं असेल? त्यांच्या शेवटच्या काही वर्षांत मला त्यांचा सहवास जास्त लाभला. त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या, आयुष्य, नाते-संबंध, अध्यात्म, गजाननबाबा, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज हे आमचे चर्चेचे विषय असायचे. यातून अनेकदा जाणवायचं की आजोबांचे विचार बर्‍यापैकी पुरोगामी होते.

अध्यात्माच्या मार्गावर असताना आजोबांनी अचानक विज्ञानवाद्यांप्रमाणे देहदानाचा आग्रह धरावा आणि हा संकल्प पूर्णं व्हावा अशी तजवीज करून घ्यावी हे नवल होते.

मध्येच अचानक माहिती पडलं की आजोबा जेव्हा पर्यंत सक्रिय शेती करीत होते तो पर्यंत त्यांचा व देवा-धर्माच्या आचरणाचा काही संबंध नव्हता. नियमाने शनिवारी पारावरच्या मारोतीला पाणी वाहायचा नेम त्यांनी केला. यथावकाश मुले कर्ती सवरती झाल्यावर, ते बाजूला झाले आणि मग त्यांची देवांशी, विशेषतः: गजानन बाबाशी फार चांगली गट्टी जमली. शेगाव वारी करायचा छंद जमला आणि अश्यांतच पंढरपुराची वारी सुद्धा झाली. तिथे तुळशीची म्हणून घेतलेली माळ जेव्हा तुळशीची नाही हे लक्षात आलं तेव्हापासून त्यांनी हाताने बनवलेल्या तुळशीच्याच माळा केवळ धारण केल्या आणि नंतर अश्या माळी अनेकांना तयार करून दिल्या.

अश्या भक्ती मार्गावर असताना त्यांना माझा काही रूढींना विरोध पटत होता. सत्यनारायणाचा भाकडपणा मान्य होता. आणि आपल्या धार्मिक आचरणात बदल व्हायला हवा असेही वाटत होते. मला कौतुक वाटतंय ते त्यांच्या अश्या कप्पेखानी जगण्याचं. आपण कायम सगळी सरमिसळ करत जगत असतो असं मला वाटतं. यामुळे त्यांनी केलेली ही विभागणी उत्तम वाटते.

ग्रामीण पार्श्वभूमी , भक्ती किंवा आध्यात्मिक ओढ आदी असून सुद्धा आजोबांना देहदानाचे महत्त्व पटले होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. एखादा निर्णय घेणे आणि तो पूर्णत्वास नेणे हा सुद्धा आजोबांचा स्वभावगुण. एखादी गोष्ट मनापासून पटल्यास ती अन्य लोकास मान्य नाही म्हणून आपण ते करू नये असे त्यांना वाटत नव्हते. ते जगले ते आयुष्य फार उत्तम होते. त्यांनी शेवटी हे बोलून दाखवले होते की देवाने सर्व काही भरभरून दिले. आता त्याने घेऊन जावे एवढंच मागणं आहे.

आजोबांनी शेवटी शेवटी सर्वच विषयांतून आपले मन काढले होते. त्यांना ज्या टप्प्यावर जे करायला हवे होते ते त्यांनी केल्याचं आता जाणवतं. कप्पेखानी व टप्पेसुद जीवन जगले...
आज आता पहाटेचे दीड वाजत आहेत. आज आजोबांची तेरवी आहे. आजोबांच्या मागे उरलेला भलामोठा गोतावळा जमलेला आहे. मामांनी कालच आजोबांचा छान हसरा फोटो फ्रेमकरून आणला आहे. तो समोरच्या भिंतीवर आहे. आजोबांना हव्या त्यापध्दतीने देहदान झाले मात्र उरलेल्यांच्या इच्छेनुसार बाकी संस्कार होत आहेत.

आज असं नक्की वाटतं की देवाने असं भरभरून आयुष्य द्यावे. मात्र शेवटाला सर्व व्यापातून बाजूला होता येईल एवढा विवेकसुद्धा द्यावा. आजोबांना शेवटाला असं जगतांना बघून त्यांच्या बद्दल हेवा वाटत होता. एका ८४ वर्षाच्या माणसाचे आयुष्य एवढे सुंदर असावे की ३० वर्षाच्या नातवाला त्याचा हेवा वाटावा? काय म्हणावं याला?

आजोबा तुम्ही छान जगलात, मला सुद्धा आयुष्यभर पुरेल इतकी शिदोरी देऊन गेलात.

- नीलकांत

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

विकास's picture

31 Jan 2013 - 2:18 am | विकास

इतक्या साध्या-सोप्या शब्दात लिहीलेले वाचून त्यावर काय लिहायचे हेच कळत नाही. इतकी सुंदर ओळख करून देणारा नातू मिळाला... तुझे आजोबा नक्कीच नशीबवान आहेत.

त्यांना श्रद्धांजली आणि तुला-तुझ्या कुटूंबियांना त्यांच्या आठवणी मनात ठेवून परत सुरळीत आयुष्य चालू करण्यासाठी शुभेच्छा!

आजानुकर्ण's picture

31 Jan 2013 - 2:19 am | आजानुकर्ण

इतक्या साध्या-सोप्या शब्दात लिहीलेले वाचून त्यावर काय लिहायचे हेच कळत नाही. इतकी सुंदर ओळख करून देणारा नातू मिळाला... तुझे आजोबा नक्कीच नशीबवान आहेत.

सहमत

चित्रा's picture

31 Jan 2013 - 3:08 am | चित्रा

> ते जगले ते आयुष्य फार उत्तम होते.

खरंच.
आजोबांना श्रद्धांजली.

मूकवाचक's picture

31 Jan 2013 - 9:34 am | मूकवाचक

+१

मन१'s picture

31 Jan 2013 - 11:01 am | मन१

+१

सुधीर's picture

1 Feb 2013 - 12:17 pm | सुधीर

+१

श्रीरंग_जोशी's picture

31 Jan 2013 - 2:34 am | श्रीरंग_जोशी

आयुष्यातले पाश स्वतःच्या हाताने तोडून आपले आजोबा समाधानी मनाने अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
देहदानासारखे अत्यंत आदर्श दान त्यांनी केले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीला दंडवत.

त्यांच्या मूल्यांचा वारसा आपण पुढे चालवालच असा विश्वास वाटतो...

अक्षया's picture

31 Jan 2013 - 9:29 am | अक्षया

+ १

मोदक's picture

31 Jan 2013 - 11:31 pm | मोदक

+११

प्रभाकर पेठकर's picture

31 Jan 2013 - 2:42 am | प्रभाकर पेठकर

आजोबा नातवाचे प्रेमबंध, आदर, आदर्श अगदी मनाला भिडणारे आहे. नीलकांत, तुझे कौतुक वाटतेच पण आजोबांची अजिबात ओळख नसतानाही ते गेल्याचे वाचून कंठ दाटून आला. कुणालाही हेवा वाटावा असे आदर्श आणि संपन्न आयुष्य ते जगले. 'मरावे परि किर्तीरुपी उरावे' ही ऐकिव उक्ती प्रत्यक्षात उतरविणार्‍या अमर आत्म्याची ओळख ह्या निमित्ताने झाली.

देहदानाची माझीही खुप इच्छा आहे. देहदानामुळे मौल्यवान अवयवांच्या (जसे, डोळे, किडणी, हृदय इ.इ.) उपयुक्ततेमुळे कमीत कमी ६ ते ७ जणांना नवआयुष्य मिळतं. मग असा मौल्यवान देह जाळून ह्या नैसर्गिक संपत्तीचा नाश करू नये असे वाटते. नाहीतर काय ' जन्माला आला होला आणि पाणी वाहून मेला' ह्या पलीकडे आपले कर्तृत्व काहीच नाही असे होईल.

नीलकांता, देहदानाची प्रक्रिया कशी असते ह्याची तपशिलवार माहिती दिल्यास इच्छुक मिपाकरांस फार फायद्याचे होईल.

लाल टोपी's picture

1 Feb 2013 - 7:00 pm | लाल टोपी

पेठ्कर काकांशी सहमत. नीलकांत, देहदानाच्या प्रक्रीयेची संपूर्ण माहिती मिपावर प्रसिध्द कराच, तुमच्या आजोबांना हीच चांगली श्रध्दांजली ठरेल

इतक्या साध्या-सोप्या शब्दात लिहीलेले वाचून त्यावर काय लिहायचे हेच कळत नाही. इतकी सुंदर ओळख करून देणारा नातू मिळाला... तुझे आजोबा नक्कीच नशीबवान आहेत.

त्यांना श्रद्धांजली आणि तुला-तुझ्या कुटूंबियांना त्यांच्या आठवणी मनात ठेवून परत सुरळीत आयुष्य चालू करण्यासाठी शुभेच्छा!

असेच म्हणतो. इतक्या सहजपणाने निर्मम होणे फार थोड्यांना जमत असावे.

स्वाती दिनेश's picture

3 Feb 2013 - 12:52 pm | स्वाती दिनेश

नंदन सारखेच म्हणावेसे वाटते,
नील, तुझ्या आजोबांच्या आत्म्याला नक्कीच शांती लाभली असणार..
स्वाती

चौकटराजा's picture

31 Jan 2013 - 4:14 am | चौकटराजा

मालकानू,. आजोबांच्या आठवणीची कहाणी ह्र्द्य आहे. आजोबांसारखेच मला करता येईल अशी शुभेव्छा तुम्ही मला द्यावी !

फार सुरेख लिहिले आहेस नीलकांत. आजोबांना श्रद्धांजली. ते खरोखर अद्ध्यात्म जगले.

अग्निकोल्हा's picture

31 Jan 2013 - 5:27 am | अग्निकोल्हा

आज असं नक्की वाटतं की देवाने असं भरभरून आयुष्य द्यावे. मात्र शेवटाला सर्व व्यापातून बाजूला होता येईल एवढा विवेकसुद्धा द्यावा. आजोबांना शेवटाला असं जगतांना बघून त्यांच्या बद्दल हेवा वाटत होता. एका ८४ वर्षाच्या माणसाचे आयुष्य एवढे सुंदर असावे की ३० वर्षाच्या नातवाला त्याचा हेवा वाटावा?

खरोखर हेवाच वाट्तोय! आजोबांना विनम्र श्रद्धांजली.

चित्रगुप्त's picture

31 Jan 2013 - 5:32 am | चित्रगुप्त

आजोबांच्या जीवनाचा, विचारांचा थोडक्यात घेतलेला आढावा र्‍हदयस्पर्शी आहे.

आजोबांशी असा अनेकदा संवाद साधत असताना मला अनेक प्रश्न पडायचे, काहींचा उलगडा झाला काहींचा नाही झाला.

याविषयी आणखी लिहाल का?

सुनील's picture

31 Jan 2013 - 5:52 am | सुनील

सुरेख लिहिले आहे.

तुमच्या आजोबांना आदरांजली.

सहज's picture

31 Jan 2013 - 7:26 am | सहज

फार छान लिहले आहेस.

मला कौतुक वाटतंय ते त्यांच्या अश्या कप्पेखानी जगण्याचं. आपण कायम सगळी सरमिसळ करत जगत असतो असं मला वाटतं. यामुळे त्यांनी केलेली ही विभागणी उत्तम वाटते.

हे जमण सोप नसाव अस वाटतय. नशिबवान आहात की वयाच्या तिशीपर्यंत तुम्हाला आजोबा लाभले. म्हणजे पुर्‍या मॅच्युरिटीने तुम्ही दोन पिढ्या मागच्या माणसांचा विचार करु शकलात.

देहदानाविषयी मात्र, खरोखर माणुस फार कणखर असला पाहिजे अस वाटत्य. कारण आपण या देहावर इतक प्रेम करतो, इतक जपतो, स्वच्छता, सजवणे, काळजी, अन तो देह असा; आता हल्ली पूरी कल्पना की नक्की काय केलं जात, असताना दान करण सोप्प नसाव.

आजोबा गेल्याचे ऐकून वाईट वाटले. त्यांना श्रद्धांजली.
तू आणि आजोबा, दोघेही नशिबवान आहात.

पैसा's picture

31 Jan 2013 - 8:21 am | पैसा

तुझ्या मनातला, अगदी खोल गाभ्यातला उमाळा वाचून डोळ्यात पाणी आल्यावाचून राहिलं नाही. तुझे आजोबा आणि तू दोघेही नशीबवान आहात. त्यांना श्रद्धांजली.

राही's picture

31 Jan 2013 - 8:39 am | राही

आजोबांना श्रद्धांजली. त्यांचं जगणं सुंदर होतं आणि मिटणं त्याहूनही अधिक सुंदर.

मनातील भावना खूप साध्यासोप्या सरळ शब्दांत मांडल्या आहेत.
आजोबांना आदरांजली.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Jan 2013 - 8:46 am | मिसळलेला काव्यप्रेमी

खुप साध्या सोप्या पद्धतीने प्रभावी ओळख करुन दिलीत मालक.
खरचं असं जमायला हवे, मला कधी कधी वाटते आपण आपल्या गरजा विनाकारण भारंभार वाढवून ठेवतो, आणि मग त्यातून आंग काढण अजूनच अवघड होऊन बसते. आपल्या आजोबांच्या एकूणच सर्व पिढीला हे छान जमले, कारण त्यांनी त्यांच्या गरजा फारच मर्यादित ठेवल्या होत्या, अतिशय संयमाने.
बाकी वर अपर्णातै म्हणतात त्याप्रमाणे, असे आजोबा वयाच्या तिशी पर्यंत लाभले ह्याचा हेवा कराव तेवढा थोडाच आहे.

इनिगोय's picture

31 Jan 2013 - 10:29 am | इनिगोय

शब्दाशब्दाशी सहमत.

खूपच साधा सरळ आणि प्रभावी लेख.

मी-सौरभ's picture

31 Jan 2013 - 4:25 pm | मी-सौरभ

पूर्णतः सहमत

कवितानागेश's picture

31 Jan 2013 - 8:51 am | कवितानागेश

तुमच्या आजोबांना आदरांजली.
२-३ वेळा वाचलं, आणि काय लिहावं ते कळत नव्हतं. तुमची आजोबांशी असलेली attachment जाणवतेय.
मला पटकन माझ्या आजोबांची आठवण झाली. तशीही त्यांची आठवण सततच असते. पण 'ते आता नाहीत' अशी जाणीव पुन्हा एकदा झाली. नाहितर त्यांचा आमच्यावर प्रभाव इतका आहे, की कुठलीही अडचण आली की आमच्या प्रत्येकाचा मनात पटकन येते, 'आजोबा असते तर अत्ता काय म्हणाले असते?', आणि असा विचार आल्याक्षणी ट्युब पेटते, आणि समोरचा मार्ग मोकळा होतो. आमच्या सगळ्यांचा मनातून , विचारातून, त्यांचे अस्तित्व सतत आमच्या सोबत असतं.
तुमच्या आजोबांचा विवेक, कणखरपणा तुम्हालादेखिल कायम सोबत करेल, अशी खात्री आहे.

किसन शिंदे's picture

31 Jan 2013 - 8:58 am | किसन शिंदे

आजोबांना श्रध्दांजली!!

आजोबांसोबतच्या मनात दाटून राहिलेल्या ह्या सगळ्या आठवणी खुप सुंदरपणे शब्दात मांडल्या आहेत. आजोबा(वडीलांचे वडील) जाण्याचं दु:ख मी हि नुकतंच महिन्याभरापुर्वी अनुभवलंय त्यामुळे लिहलेलं हे सगळं खुप जवळचं वाटतंय.

नीलकांत, तुझ्या आजोबांना श्रद्धांजली.

जगण्याची उत्तम शिदोरी वारसाहक्काने मिळणे हे दुर्लभ असते आणि ते तुला प्राप्य झाले..

- पिंगू

नि३सोलपुरकर's picture

31 Jan 2013 - 11:09 am | नि३सोलपुरकर

तुमच्या आजोबांना आदरांजली.

क्रान्ति's picture

31 Jan 2013 - 11:22 am | क्रान्ति

नीलकांत, तुझ्या आजोबांना विनम्र श्रद्धांजली.
खूप आतून आलेला लेख. असा विवेकी, विचारी वारसा मिळणं हा दैवयोग आहे!

विसुनाना's picture

31 Jan 2013 - 11:22 am | विसुनाना

नीलकांत, तुमच्या आजोबांचे आयुष्य आदर्शवत गेले आणि मृत्यूनंतरही तो आदर्श त्यांनी कायम ठेवला.
मोठमोठ्या पंडितांनी केलेल्या पोचट पोपटपंचीपेक्षा अत्यंत साधेपणाने पण ठामपणे केलेल्या विधायक क्रिया जास्त महत्त्वाच्या.
आजोबांना आदरांजली.

बॅटमॅन's picture

31 Jan 2013 - 11:37 am | बॅटमॅन

तुमचे आजोबा लै भारी होते. आवडले आपल्याला!!! सादर प्रणाम. _/\_

श्रावण मोडक's picture

31 Jan 2013 - 11:47 am | श्रावण मोडक

'कप्पेखानी जगणं' यासारखा शब्द योजावासा वाटला असे लेखन हातून झाले आहे. बाकी सारेच माझ्या शब्दांच्याच मर्यादा असल्याने लिहित नाही.

मालोजीराव's picture

31 Jan 2013 - 11:51 am | मालोजीराव

मोठमोठ्या पंडितांनी केलेल्या पोचट पोपटपंचीपेक्षा अत्यंत साधेपणाने पण ठामपणे केलेल्या विधायक क्रिया जास्त महत्त्वाच्या.

+१

सुंदर लेख झालाय, तुमच्या आजोबांना विनम्र श्रद्धांजली !

तुझ्या आजोबांना श्रद्धांजली वाहतो!

सस्नेह's picture

31 Jan 2013 - 12:20 pm | सस्नेह

सर्वसामान्य माणसांत खरोखरच आदर्श म्हणावे असे जीवन होते तुमच्या आजोबांचे. त्यांना मनापासून श्रद्धांजली.
माझे बालपण अन टीन एज लहान लहान गावांतून गेले. मी असे पाहिले आहे की खेडोपाडी राहणारे अशिक्षित किंवा अर्धशिक्षित लोक आपणा सुशिक्षितांसारखी देवधर्म, अध्यात्म इ. ची चिकित्सा करत नाहीत, वाद घालीत नाहीत. जीवनातली कर्तव्ये चोख पार पाडून , जो काही नेमधर्म असेल तो सहजपणे अन गाजावाजा न करता पाळतात. याशिवाय वारी, कीर्तन, जप-जाप इ. अध्यात्मही जीवनाचा एक भाग म्हणून करतात. त्यातून त्यांना घ्यायचा तो बोध घेतात, इतर कुणाला रस असेल तर बोध देतात. अनाठायी उपदेश , गवगवा यांचा लवलेश नसतो. अन पुन्हा हे सगळं अगदी, नदी जशी उतार मिळेल तशी वाहत जावी, तसं नैसर्गिक. त्यांच्या जीवनाकडून अपेक्षा फारशा नसतात. मिळेल त्यात समाधान असते.
हा सगळा सांस्कृतिक ठेवा आपण शहरी सुशिक्षित मात्र हरवून बसलो आहोत. आमच्या अपेक्षाना मर्यादा नसते, बुद्धी हेच आमचे विश्वासाचे एकमेव साधन असते. तिच्या मर्यादेपलीकडचे काही कुणी अनुभवी वडीलधारे सांगू लागले तर आम्ही मान्य करत नाही....
आजोबांसारखे एक साधे सरळ जीवन आम्ही खरच हरवून बसलो आहोत.

अभ्या..'s picture

31 Jan 2013 - 11:16 pm | अभ्या..

मालकांनी अगदी साध्यासोप्या शब्दात जागवल्यात ह्या आठवणी.

सुहास झेले's picture

31 Jan 2013 - 12:39 pm | सुहास झेले

नीलकांत, काय बोलावं सुचत नाही आहे. जगणे जे म्हणतात ते असेच काहीसे असावे. पेठकर काका म्हणतात तसे मलाही देहदानाच्या प्रक्रियेबद्दल विस्ताराने जाणून घ्यायला आवडेल.

काळजी घे...

योगप्रभू's picture

31 Jan 2013 - 12:50 pm | योगप्रभू

नीलकांत,
तुमच्या आजोबांसारखी माणसे म्हणजे बावनकशी सोने असतात.
त्यांच्या आठवणीत राहा आणि त्यांच्या जीवनमूल्यांचा गाभा जमेल तसा जपा..
आजोबांना आदरांजली.

सार्थक जीवनाचा सुरेख आढावा.

धमाल मुलगा's picture

31 Jan 2013 - 4:06 pm | धमाल मुलगा

_/\_

अधिराज's picture

31 Jan 2013 - 4:27 pm | अधिराज

सुरेख लिहिले आहे.
तुमच्या आजोबांना आमचा प्रणाम.

अत्यंत चांगल्या रितीने व्यक्तिचित्र रेखाटलं आहे. आम्हाला कधीही भेटले नसूनही आता ते गेले याची हुरहुर लागावी इतकं साधं सरळ आणि त्यामुळे सुंदर लिहीलं आहे.. हा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांना सद्गती लाभो ही इच्छा..

खुप छान लेख... लेख वाचुन मला माझ्या आजोबांची आठवण झाली... ते गेले तेव्हा १०२ वर्षाचे होते.. पण एकदम व्यवस्थित.. स्वतःची सगळी कामे स्वतः करायचे..
तुमच्या आजोबांना आदरांजली.

स्मिता.'s picture

31 Jan 2013 - 5:07 pm | स्मिता.

तुमच्या आजोबांना आदरांजली!

लेख एवढा सुरेख आणि भावपूर्ण आहे की वाचूनच तुमच्या आणि त्यांच्या नात्याची जाणीव होतेय. आजोबा जरी हयात नसले तरी त्यांच्या देहदानाच्या रुपाने आणि तुम्हाला दिलेल्या मूल्यांच्या रूपाने ते आजही या जगातच आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2013 - 11:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजोबा आणि नातवाचे प्रेमसंबंध, आजोबांच्या आठवणी, आजोबांचे विचार, आजोबांनी सर्वच गोष्टीतून निवृत्त होणं, या सर्व गोष्टी मनमोकळेपणानं आणि सहज लिहिल्यामुळे लेख भावपूर्ण झाला आहे.

-दिलीप बिरुटे

आजोबा म्हणजे आयुष्यातील एक हळवा कोपरा.
खूपच सुरेख लिहिले आहे त्यांच्याबद्दल तुम्ही.
तुमच्या आजोबांना आदरांजली.

नीलकांतः
इतकं सरळ, समाधानी आयुष्य जगून, त्याची इतक्या सहजपणे सहस्त्रांना अनुकरणीय अशी सांगता करणं यातच तुमच्या आजोबांचं अलौकिकत्व दिसतं. तुम्ही आणि तुमच्या नातेवाईकांनीही त्यांच्या इच्छेला मान देऊन देहदानाचा निर्णय सुफळ केलात यासाठीही कौतुक केलंच पाहिजे. तुमचं साधं सरळ निवेदन आतपर्यंत पोहोचलं.

इन्दुसुता's picture

1 Feb 2013 - 9:29 am | इन्दुसुता

त्यांना श्रद्धांजली आणि तुला-तुझ्या कुटूंबियांना त्यांच्या आठवणी मनात ठेवून परत सुरळीत आयुष्य चालू करण्यासाठी शुभेच्छा!

असेच म्हणते.

नीलकांत's picture

1 Feb 2013 - 3:43 pm | नीलकांत

आपणा सर्वांच्या प्रतिक्रियेंबद्दल आभारी आहे.

वर विचारणा झाल्याप्रमाणे देहदान करण्यासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या शरिररचनाशास्त्र विभागात नोंद करावी लागते. त्यासाठीच्या अर्जावर देहदान करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी हवी असतेच मात्र त्यासोबतच त्यांच्या एका मुलाची व मुलीची संमतीदर्शक स्वाक्षरी आवश्यक असते. शरीराचे अवयव अन्य कुणाच्या कामी यावे असा विचार असल्यास विशेष काळजी घ्यावी लागते. त्याबाबत तेथील डॉक्टर सविस्तर सांगतात.

- नीलकांत

प्रभाकर पेठकर's picture

4 Feb 2013 - 8:16 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद नीलकांत. आता पुण्यात आलो की तातडीने ह्या दृष्टीने कार्यवाहीस सुरुवात करेन.

रणजित चितळे's picture

1 Feb 2013 - 7:13 pm | रणजित चितळे

सूंदर लेखन

आजोबांना श्रद्धांजली

धनंजय's picture

1 Feb 2013 - 11:21 pm | धनंजय

तुम्ही करून दिलेली ओळख भिडली. तुमच्या आजोबांना श्रद्धांजली.

इरसाल's picture

4 Feb 2013 - 10:58 am | इरसाल

तुमच्या आजोबांना श्रद्धांजली.
अतिशय योग्य निर्णय.

अत्यंत साध्या, अकृत्रिम शब्दात आलेलं तुझ्या आजोबांच्या आठवणींचं लेखन भिडलं. डोळ्यात आपसूक पाणी आलं.
'कप्पेखानी जगणं' या शब्दात सगळं सामावलं आहे! देहदानाचा धाडसी निर्णय घेणार्‍या तुझ्या आजोबांना मनःपूर्वक श्रद्धांजली. असे आजोबा लाभले, नशीबवान आहेस!

-रंगा

प्यारे१'s picture

4 Feb 2013 - 9:15 pm | प्यारे१

आदरांजली. (लेख आज वाचला)

वेताळ's picture

5 Feb 2013 - 1:31 pm | वेताळ

________/\__________

वेताळ's picture

5 Feb 2013 - 1:31 pm | वेताळ

________/\__________