शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे

'राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ म्हणजे मराठी माणसाची अस्मिता. राजा शिवछत्रपती न वाचलेले किमान आमच्या पिढीतले तरी कुणी शोधुन सापडणार नाही. लहानपणी म्हणजे प्राथमिक शाळेत असताना मला बाबासाहेबांची राजा शिवछत्रपती ही व्याख्यानमाला ऐकायची संची मिळाली. पहिल्या पुष्पातच सर्व श्रोते अगदी भारावुन गेले होते. त्यावेळी बाबासाहेबही पन्नाशीत होते. तेजस्वी चेहरा, लकाकणारे डोळे आणि आवेशपूर्ण आवाजाच्या या शिवशाहीराने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन ठेवले होते. सडेतोड स्वभावाच्या बाबासाहेबांनी आपल्या व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी सर्वांना आवाहन केले होते की कृपया लहान मुलांना बरोबर आणु नका आणि ज्यांना शेवटपर्यंत बसणे जमणार नसेल त्यांनी कृपया येउ नये. ते बरोबरच होते. एकदा का हा शाहीर शिवकालात गेला की अक्षरश: पाणी प्यायला देखिल न थांबता आपल्या लयीत इतिहास साकारत असे. आपल्या श्रोत्यांना साक्षात शिवकालात घेउन जाण्याचे महान सामर्थ्य बाबासाहेबांकडे होते. ते रंगात येउन कथन करीत असता जर मुलांनी दंगा सुरु केला, भोकाड पसरले वा कुणी मधेच उठुन चालु लागले का त्यांचा रसभंग आणि लयभंग होणे स्वाभाविकच होते.( सुदैवाने त्याकाळात भ्रमणध्वनी नव्हते.)

मराठी माणसाच्या घरात 'राजा शिवछत्रपती' असणे हे दारात वा खिडकीत तुळशीचे रोप असण्याइतके निश्चित होते. अनेक शाळांमधुन, वासंतिक व्याख्यानमालांमधुन वा अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतर्गत बाबासाहेबांची व्याख्यानमाला सातत्याने सुरू असायची. साधारण १९८०-८५ च्या सुमारास ठाण्यात त्यांची एक अभिनव व्याख्यानमाला झाली होती, विषय होता "राजा शिवाजी - एक प्रशासक व आदर्श राजा". तोप्रयंत मी त्याचे केवळ 'राजा शिवछत्रपती' च ऐकले होते. शिवराज्याभिषेकाच्या त्रिशतकी सोहळ्यानिमित्त म्हणजे १९७४ मध्ये दादरच्या शिवाजी मैदानात 'शिवसृष्टी' साकारण्यात आली होती. संध्याकाळी दर तासा-दोन तासांनी 'शिवराज्याभिषेकाचा' सोहळा खास उभारलेल्या प्रचंड मोठ्या रंगमंचावर साजरा होत असे. हा सोहळा खरोखरच प्रेक्षकांना शिवकालात घेऊन जात असे, आणि जेव्हा राजे सिंहासनस्थ होताना बाबासाहेबांच्या खणखणीत आवाजात जेव्हा 'गोब्राम्हण प्रतिपालक.....' अशी ललकारी यायची तेव्हा अंगावर रोमांच उभे राहत होते. या नंतर इतका भव्य कार्यक्रम झाला तो जाणता राजा.

अकरा वर्षांपूर्वी पुण्याच्या एका संस्थेने आयोजित केलेल्या 'पन्हाळा, पावनखिंड, विशाळा व प्रतापगड' या भ्रमंतीला जायचा योग आला होता, साक्षात बाबासाहेबांच्या बरोबर! बाबासाहेबांच्या सहवासातले ते दिवस अजुनही आठवतात. पन्हाळ्यावर प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या कडुन सिद्दी जौहर ऐकणे ही पर्वणी होती. तेव्हा बाबासाहेब ७९ वर्षांचे होते पण उत्साह तरुणांना लाजविणारा. एखाद्या लहान मुलाने पाहुण्यांना आपले घर दाखवावे तितक्या उत्साहाने बाबासाहेब आम्हाला घेऊन पन्हाळ्यावर फिरले होते. राजे वेढा फोडुन साधारण कुठल्या वाटेने गेले असावेत ती त्यांच्या अभ्यासानुसारची वाटही त्यांनी दाखविली. तिथुन पुढे अंबा घाटात. मुक्काम पावनखिंडी जवळ एका विश्रामगृहात होता. सकाळी नाश्ता झाल्यावर पावनखिंडीचा कार्यक्रम होता. आम्ही सगळे बसकडे जात असताना मागुन बाबासाहेबांची हाळी आली, 'अरे म्हातारे झालात काय रे या वयात? वर टपावर बसून सह्याद्रीचा वारा छातीवर घ्यायचा सोडुन आत कसले बसता? ताबडतोब सग़ळे मागे शिडीकडे वळले. पावनखिंडित फिरुन आल्यावर बाबासाहेबांनी तिथे उभारलेल्या तात्पुरत्या निवार्‍यात आम्हाला राजे पन्हाळा ते विशाळा कसे निसटले हे सांगायला लागले आणि सगळे जण आपण भर दुपारी रणरणत्या उन्हात आहोत हे विसरुन गेलो. त्या विश्रामगृहाच्या मालकांनी (श्रीयुत शिरगावकर) पावनखिंडीत एक छोटी प्रदर्शिका उभारली होती व तिचे उदघाटन बाबासाहेबांच्या हस्ते होते. तिथुन पुढे विशाळा व मग प्रतापगड. लहानपणापासुन प्रतापगड अनेकदा पाहिला होता, मात्र बाबासाहेबांसोबत पाहिलेला प्रतापगड काही निराळाच होता. प्रतापगडचे युद्ध हे दहा देशांच्या लष्करी अकादमींमध्ये एक संपूर्न पाठ म्हणुन शिकविले जाते - 'कमीत कमी वेळ, सामग्री व सेनेच्या सहाय्याने बलाढ्य व सुसज्ज शत्रुच्या प्रचंड सेनेचा सर्वनाश' याचे उदाह्रण म्हणुन. एकदा रात्री जेवणानंतर बाबासाहेब जरा निवांत मिळाले आणि मी संधी सोडली नाही. बाबासाहेब म्हणजे अत्यंत मऊ माणुस, कुणाला नाही म्हणणार नाहीत. मी बाबासाहेबांना विनंती केली की 'प्रतापराव गुजर' ऐकायचे आहे आणि आम्हा सर्वांना बाबासाहेबांनी प्रत्यक्ष तो इतिहास ऐकवला आणि आमचे कान तृप्त झाले.

आज बाबासाहेबांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना हा सचित्र मुजरा

Photobucket
Photobucket
Photobucket
Photobucket
Photobucket
Photobucket
Photobucket
Photobucket

लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

तळेगावी आप्पा दांडेकर यांचे घर व बाबासाहेब ( बमो) त्यांचे जिगरी दोस्त . त्यांमुळे तळेगावात त्यांचे
बर्‍याच वेळा येणे जाणे असे . आमच्या घरा शेजारीच असलेल्या एका प्राथमिक शाळेच्या प्रांगणात त्यांच्या शाहिरी वजा इतिहास कथनाचा सतत आठ दिवस न चुकता कार्यक्रम पहाण्याचे व ऐकण्याचे भाग्य लाभले. पाहण्यातला आनंद असा की एकदा बमो चारशे वर्षापूर्चीच्या कालखंडात घुसले की त्यांच्या देहबोलीत मावळा व शाहीर अशा दोन्ही अंगाने संचार होई. व अमोघ वाणीने दिवस तिथि प्रहर वेळेसह शिवचरित्र ओघवू लागे. शाळेत असताना शिवचरित्रातील पुस्तकात दीनानाथ दलाल यानी काढलेली रेखाचित्रे कॉपी करायची व शाळेच्या हस्तलिखीतात प्रसिद्ध करायची असा माझा उद्योग असे. मिस्किलपणा हा बाबासाहेबांचा मी दुरून अनुभवलेला एक मस्त गुण आहे. त्याना शिवप्रेमानेच व त्यांच्या आनंदी वृतीने आजवर " अखंड तारुण्य" बहाल केलेले आहे.
त्यांच्या व्याख्यानानी आमचे बालपण् समृद्ध केले या बद्दल अत्यंत कृतज्ञता व माझा मानाचा मुजरा !

------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !

"जाणता राजा" आम्हांस समजावणार्या शिवशाहीर बाबासाहेबांना अभिवादन.. त्यांना पु.लं.नी लिहीलेलं मानपत्र लोकसत्तामधून

चिगो..

|| कौन कहता है, के आसमां में सुराख नही होता?
इक पत्थर तो तबियत से उछालों , यारों ||

लिहिलेले प्रत्येक वाक्य जसे काही माझ्याच आठवणी आहेत असे वाटत होते मला. माझी खात्री आहे की माझ्या वयाच्या सगळ्या मराठी मुलांना smiley (वय साधारम ४५smiley हेच वाटते असणार. अगदी मनातले लिहिलेत सर्वसाक्षी साहेब.

मस्त वाचून अगदी, डोंबिवलीतले ते नेहरु मैदानात बसलो आहोत व समोर बमो राजा शिवछत्रपती सांगत आहेत असे वाटायचे. ...................ह्या फेसबूकवाल्या पिढीची कीव कराविशी वाटते.

माझे ब्लॉग्स्
www.bolghevda.blogspot.com (मराठी)
www.rashtrarpan.blogspot.com
www.rashtravrat.blogspot.com

रणजित चितळे

गेल्या वर्षी शिवाई नगरला त्यांच शिवाजी महारांजावरचं एक छोटसं व्याख्यान त्याच बुलंद आवाजात ऐकलं होत ज्याचं वर्णन तुम्ही वर केलंय. smiley

~~~~~~~~~~~~~~~~~~oOoOoOoOoOoOo~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल..
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल..

- अशोक बागवे

ठाण्यातल्या शिवसमर्थ शाळेच्या पटांगणातली बाबासाहेबांची राज्याभिषेकापर्यंतची व्याख्यानमाला ,'शिवाजी,आदर्श प्रशासक राजा' ही व्याख्याने, जाणता राजाचे प्रयोग.. मनात सगळं अजून ताजं आहे ! मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी परत एकदा टवटवीत झाल्या!
आठवणी आवडल्या.
बाबासाहेबांना भरपूर आयुरारोग्य लाभो..
स्वाती

--^--^--^--

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

माझ्या आजच्या वयानुसार बाबासाहेबांना मी माझ्या शाळकरीवयात, म्हणजे त्यांच्या ऐन तारुण्यात, पाहिले आणि ऐकले आहे. शिवजयंती निमित्त अफजलखान वधाचे आख्यान होते. महाराजांनी, वाघनखांनी, अफजखानाचा कोथळा बाहेर काढला आणि प्राणांतिक वेदनांनी अफजलखान तडफडू लागला, ओरडू लागला. त्या घटनेशी एकरुप झालेल्या बाबासाहेबांनी जो आक्रोश मांडला तो अक्षरशः, त्या न समजत्या वयातही, अंगावर कांटा आणणारा होता. दुर्दैवाने, कोणा तरूणाने तो 'सीन' पाहून जोरात शिट्टी वाजवली............. बापरे!
आख्यान तिथेच थांबले. बाबासाहेब संतापाने लालेलाल झाले होते.
'कोणी वाजवली शिट्टी?' बाबासाहेब गरजले.
संपूर्ण श्रोतृवृंद 'आता काय होणार?' ह्या चिंतेने चिडीचुप झाले.
'कोणी वाजवली शिट्टी?' बाबासाहेब पुन्हा गरजले.
आयोजकांची धावपळ झाली. त्या तरूणाला शोधून काढलं.
'हाकलून द्या त्याला बाहेर. इथे काय तमाशा चाललाय काय?' बाबासाहेब पुन्हा कडाडले.
त्याला बाहेर नेण्यात आले. जवळ जवळ १५ मिनिटे कार्यक्रम थांबला होता. पुन्हा त्या वातावरणात प्रवेशण्यास बाबासाहेबांस अजून १०-१५ मिनिटे लागली. पण, बाबासाहेबांनी बाकी श्रोत्यांचा रसभंग होऊ दिला नाही.

त्यांचा 'जाणता राजा' हा कार्यक्रम मस्कत मध्ये आणण्याचा भव्य विचार मनांत घेऊन, पुण्यातील त्यांच्या एका कार्यक्रमांत त्यांची भेट घेतली होती. रंगमंचाच्या मागे, ३-४ मान्यवरांच्या घोळक्यात, बाबासाहेब बसले होते.
तेंव्हा कोणीतरी विचारले, ''जाणता राजा' हा कार्यक्रम महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक घटनेवरच का संपतो?'
त्यावर किंचित विचारमग्न होत बाबासाहेब म्हणाले,'महाराजांचा मृत्यू ही घटना मी स्विकारु शकत नाही.'
ह्या वाक्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील वेदना, आपल्या घरातील एखाद्या निकटच्या, प्रिय व्यक्तिच्या मृत्यूच्या कल्पनेने होते तशी होती.
माझ्याशी बाबासाहेब फार आपुलकीने बोलले. 'मस्कतला यायला मी तयार आहे' म्हणाले. दुर्दैवाने त्या कार्यक्रमाची व्यावहारीक गणिते माझ्या आणि महाराष्ट्र मंडळाच्या आवाक्या बाहेर होती. त्यामुळे तो कार्यक्रम मस्कत मध्ये होऊ शकला नाही.

सर्वसाक्षीजी, ज्या 'पावनखिंड' रिसॉर्टमध्ये तुम्ही उतरला होता ते श्री. प्रकाश शिरगावकर आणि त्यांची पत्नी सौ. माधुरी शिरगावकर माझे चांगले मित्र आहेत. ते स्वतः कॉम्प्यूटर प्रोग्रॅमर आहेत तर सौ. इंटेरिअर डेकोरेटर आहे. ते दोघेही अनेक वर्षे मस्कत मध्ये होते. बाबासाहेबांबरोबर त्यांनी २-४ कार्यक्रम केले पण दुर्दैवाने मी सहभाग घेऊ शकलो नाही.
आपल्याला ती संधी मिळाली, हेवा वाटतो आपला.

बाबासाहेब म्हणजे शिवप्रेमाने भारलेली व्यक्ती. त्यांचे ८ दिवसांचे शिवचरित्र आख्यान मी आमच्या शाळेत ऐकले आहे. बाबासाहेब वेळाचे पक्के. संध्याकाळी साडेपाचला आख्यान सुरु व्हायचे. पहिल्या दिवशी लोक वाटेल त्या वेळेला आले. त्या दिवशी व्याख्यान संपतांना बाबासाहेबांनी तंबी दिली की उद्यापासून साडेपाचला दरवाजे बंद करुन घेतले जातील आणि कोणालाही प्रवेश मिळणार नाही!! पुढचे सातही दिवस लोक सव्वापाचलाच जागा पकडून हजर होते. साडेपाचला दरवाजे बंद!!
काय ते आख्यान महाराजा, अरे इतिहास अंगात संचारलेला माणूस तो. प्रसंगाचे इसवीसन, तारीख, वार, वेळ, तिथी इतकंच नव्हे तर उर्दू महिनादेखील ते सांगायचे. अत्यंत ओघवती वाणी, प्रसंगानुरुप बदलणारा आवाजाचा पोत, विलक्षण बोलका चेहेरा, छाती फुटून जाईल असा शिवचरित्राचा अभिमान अशी सामग्री घेऊन ते मंचावर उभे राहिले की भान हरपून जात असे.

त्यांच्या व्याख्यानानंतरच्या सुट्टीत मी मावशीच्या घरी गेलो असताना शिवचरित्राचे दोन खंड अचानक हाती लागले. अक्षरशः तहानभूक विसरुन दोन-तीन दिवसात ते खाऊन टाकलेले आठवतात.
मिरजेला एकदा त्यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला होता. त्यावेळची एक आठवण. बोलण्याच्या ओघात इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण असा प्रश्न त्यांनी केला. सगळे सभागृह चिडीचूप. कोणालाच उत्तर माहीत नव्हते. बाबासाहेब कळवळले. एकालाही उत्तर माहीत नाही असे बघून त्यांना खेद झाला. अखेर एका मुलीने 'आरती साहा' असे उत्तर सांगताच त्यांना एवढा आनंद झाला की ते म्हणाले "शाबास्स्स!! मुली, आज तू मिरजेची लाज राखलीस. शाबास!!"

दुर्दैवाने 'जाणता राजा' हा कार्यक्रम बघण्याचा योग मात्र अजून आलेला नाही. त्याबद्दल ऐकून मात्र आहे.

अतिशय औचित्यपूर्ण सचित्र लेखाबद्दल तुमचे आभार सर्वसाक्षी.

बाबासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांना आयुरारोग्य लाभो ही शिवचरणी प्रार्थना!!

(शिवप्रेमी)रंगा

गोनीदांच्या कुठल्यातरी पुस्तकात त्यांनीच सांगितलेला किस्सा.
प्रतापगड दर्शन करून गोनीदा परतत असताना रडतोंडी का पसरणी घाटात थोडावेळ थांबले होते. तितक्यात समोरून सायकल हापसत हापसत घामाघूम झालेला एक स्वार त्यांच्या सामोरा आला. जवळ येताच दिसले ते बाबासाहेब. गोनीदांनी विचारले सायकलवरून इतक्या त्वरेने यायचे काय कारण (त्याकाळी आजच्याइतक्या सतत एसटी नव्हत्या) तर बाबासाहेब म्हणाले की प्रतापगडाच्या पायथ्याच्या कुठल्यातरी एका गावातील घरात महाराजांचे अस्सल पत्र असल्याचे एकाकडून समजले, लगेचच धावत निघालो.

एका झपाटलेल्या माणसाचे तितक्याच कलंदर माणसाशी असलेले मैत्र फारच विलक्षण.

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

दुर्गभ्रमणगाथा... हे ते पुस्तक...
रायगडखोर्‍यात इतिहासावर प्रकाश टाकू शकेल असा कागद मिळालाय अशी बातमी बाबासाहेबांना मिळाली होती.. त्याची खातरजमा करायला ते पुण्याहून महाबळेश्वरमार्गे रायगडी भर पावसात सायकलने गेल्याची या पुस्तकात गोनिदांनी नोंद केली आहे..

अवांतरः ह्याच पुस्तकाचा हात धरून माझी भटकंतीची सुरुवात झालीय...किती वेळा ह्या पुस्तकाची पारायणे झालीत.. माहीत नाही...

रियासतकारांनी शिवचरित्राकडे पहायची एक वेगळी दृष्टी दिली तर बाबासाहेबांनी शिवचरित्र घराघरात पोचवलं. त्यांची व्याख्याने ऐकली आहेत तसंच जाणता राजाचा प्रयोगही पाहिला आहे. अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटतं. बाबासाहेब ९० वर्षांचे झाले! खरंच वाटत नाही. त्यांना शतायुषी होण्यासाठी शुभेच्छा!

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥

जीवेत् शरद: शतम्

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

फार फार भाग्यवान आहात तुम्ही, या आठवणी इथं दिल्याबद्दल देखील धन्यवाद.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल तर वादच नाही. शिवचरित्र म्हणजे स्फूर्तीचा स्त्रोत आहे. सध्या काही हलकट बी ग्रेड संघटना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल अतिशय हीन पातळीवर जाऊन विषारी प्रचार करत आहेत त्याबद्दल खंत वाटते. वास्तविक ही कटू गोष्ट इथे लिहायला नको होती पण लिहावीशी वाटली. शिवशाहीर बाबासाहेब यांनी त्या वादांना आव्हान द्यावे असे वाटते, त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभे राहू.

|| जय भवानी जय शिवाजी ||

---------------------------------------------------------------------------------------
You only live once, but if you do it right, once is enough.

बासाहेबांचा परिचय झाला तो पुलंनी केलेल्या गणगोत मधून. पुढे त्यांची व्याख्याने, मुलाखती, भाषणे सारे काही ऐकले आणि आयुष्यातले काही क्षण सोनेरी करून घेतले

ऐतिहासिक कादंबरी जर कोणी लिहावी तर ती बाबासाहेबांनीच! इतर कादंबर्‍या म्हणजे कधी पोकळ कधी भरीव पण शेवटी शब्दांचीच लेणी वाटतात तर राजा शिवछत्रपतींमध्येमात्र शब्द जिवंत होत नाहीत तर पात्रेच उठून उभी राहतात.

इतिहास जगायला शिकवणार्‍या या शाहिरास मानाचा मुजरा

ऋषिकेश
------------------
माझे मिपावरील लेखन इथे वाचा

ऐतिहासिक कादंबरी जर कोणी लिहावी तर ती बाबासाहेबांनीच!

ह्या वाक्यावर बाकी दुमत आहे. बाबासाहेब विरश्रीयुक्त भाषणे करतात, वाचकाला खिळवून ठेवणारे इतिहास लेखन करतात. त्यांचे इतिहास संशोधन आणि अनुषंगाने येणारे तपशिल अफाट आहेत, ह्यात वाद नाही पण त्यांनी शिवाजी महाराजांना 'देवत्व' बहाल केले आहे त्यामुळे त्यांच्या लेखनात कधी कधी 'इतिहासा'च्या जागी 'आरती' दिसून येते.

त्या मानाने मला ना. सं. इनामदारांच्या ऐतिहासिक कादंबर्‍या जास्त आवडतात.

पेठकर काकांशी सहमत.

मी चुकत नसेन तर वल्लींनी वर सांगितलेला हा किस्सा गो. नि. दांनी दुर्गभ्रमणगाथे मध्ये सांगितलाय.

बाबासाहेब म्हणजे चालता बोलता इतिहास.. बाबासाहेबांबरोबर आठवी नववीत असताना रायगड चढून गेलो होतो ते सुद्धा आडवाटाअंनी. प्रत्येक दगड आणि दगड ठाऊक आहे त्यांना, अफाट अभ्यास आणि ओघवते वकतृत्व.
बाबासाहेबांना दीर्घ आयुरारोग्य लाभो !

लेख आवडला.

एका बळवंताने दुसर्‍या बळवंताचा पोवाडा गावा असा काव्यगत न्याय आज बघायला मिळाला.

बमोंच्या दिर्घायुष्याच्या शुभेच्छा.