समाजसेवा म्हणजे काय?

गाभा: 

राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्यासाठी घटनेतील नियमात लिहीलेल्या Literature, science, art and social service या चार पैकी, सचिन नक्की कशात बसतो ह्या चर्चेत खालील वाक्य होते:

सचिनने भारतासाठी उत्कृष्ट खेळ करून त्याच्या मनाने भारतीय समाजाची सेवाच केली नाही का? का सेवा करायची म्हणजे राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रच असले पाहिजे?

या वाक्यावरून वेगळा चर्चा प्रस्ताव टाकायचा मोह झाला. चर्चा सचिनबद्दल नसून तसेच त्या वाक्यासंदर्भात व्यक्तीगतही नसून, केवळ "समाजसेवा" नक्की कशाला म्हणावे या संदर्भात आहे.

सचिन माझा देखील लाडकाच आहे, पण critical thinking करायचे झाल्यासः क्रिकेटमधे कोट्यावधी रुपये मिळवणार्‍या, ते कमी पडतात म्हणून का काय अंबानीकडे आयपीएल लिलावातून त्यांच्या मुंबई इंडीयन्स मधे (अजून पैशासाठी) काम करणार्‍या, ते ही कमी पडते म्हणून "ये दिल मांगे मोर" म्हणत पेप्सीची (पैशाच्या मोबदल्यात) जाहीरात करणार्‍या आणि पब्लिकला प्रॉडक्टीव्ह टाईममधे काम-धंदा सोडायला लावून, खिळवून ठेवणार्‍यास नक्की समाजसेवक कसे म्हणावे? का समाजसेवेची व्याख्या पण इतर अनेक मुल्यांप्रमाणेच पातळ (dilute) झाली आहे?

या विशिष्ठ उदाहरणात म्हणजे सचिनच्या संदर्भात तसेच इतर अशा कोणाच्याही संदर्भात, पैसे कमवणे याबद्दल मला आक्षेप नाही. रग्गड पैसा केल्यावर, समाजसेवा केली तर किती चांगले होईल असे नक्कीच वाटेल पण तशी एखाद्याची इच्छा नसेल तर त्याला देखील आक्षेप नाही. कारण अक्षरशः हे घाम गाळून कमावलेले पैसे आहेत. ते कसे वापरावेत हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. उगाच मोरॅलीटीचा दबाव आणणे मला योग्य वाटत नाही, कारण त्यातून पैसे कमावणे म्हणजे काहीतरी अपराध केला अशी भावना बळावू शकते, जी आपल्याकडे अनेक दशके/शतक+ वर्षांसाठी मारक ठरली आहे... असो.

पण मग समाजसेवा म्हणजे काय? गोदूताई परूळेकर, मेधा पाटकर, नानाजी देशमुख, अभय बंग, बाबा आमटे, प्रकाश आमटे आदी अनेकांनी अक्षरशः स्वतःला झोकून दिले आणि एकेका प्रश्नाच्या मागे, त्यांच्या तत्वनिष्ठांशी प्रामाणिक रहात कुठल्यातरी प्रश्नाला वाचा फोडली, रंजल्या-गांजल्याला आपले म्हणले, व्यवस्था तयार केली, उत्तरे शोधली. वगैरे वगैरे... पण ही झाली मोठी माणसे. आपण त्यांचेच एका अर्थाने देव करत आरत्या ओवाळू लागतो कारण ते सोपे असते.

असेच आत्ताच्या काळातले उदाहरण म्हणजे: डॉ. हरीश हांडे. ह्या माणसाने ९३-९४ साली अमेरीकेत अपारंपारीक उर्जा या त्यावेळच्या अपारंपारीक विषयात एम एस केले. नंतर त्याला सौर उर्जेने भारतीय उपखंडातील उर्जेचा प्रश्न सोडवायचा होता. आधी विषुववृत्ताच्या अगदी जवळ (अधिक सुर्यप्रकाश) म्हणून श्रीलंकेत गेला. नेमके त्याच सुमारास तेथे नागरी युद्ध अधिक जोरात चालू झाले आणि तो भारतात त्याच्या कर्नाटकातील गावामधे गेला. का तर तेथे नातेवाईकांच्या ओसरीवर झोपायला जागा मिळेल, तेव्हढेच पैसे वाचतील म्हणून आणि दुर्गम भागातील खेड्यांमधे त्याने उर्जा देण्याचे काम चालू केले. महत्वाचे म्हणजे फुकटात नाही पण केवळ पैसे करण्याच्या हेतूने देखील नाही. त्यातून त्याने एक व्यवस्था तयार केली आणि हजारो घरांमधे दिवेलागण करून दाखवली. गेल्या वर्षी त्याला मॅगॅसेसे पारीतोषिक मिळाले... कधी भेटता आले, ऐकता आले तर अवश्य अनुभव घ्या... ही काही त्याची जाहीरात नाही. त्याला गरजही नाही. पण एक समाजसेवेचे उदाहरण म्हणून सांगिताना जे वाटते ते लिहीले इतकेच.

अर्थात समाजसेवा ही केवळ रंजल्या-गांजल्यांसाठीच असते अशातला भाग नाही, पण तो एक मोठा भाग आहे. कुणाला पटोत अथवा न पटोत पण आत्ताच्या काळातल्या अण्णा हजारेंपासून ते आधीच्या काळातील अनेक समाजधुरीणांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने समाजसुधारणेच्या क्षेत्रात योगदान केले आहे. पण तुर्तास हा विषय येथे मर्यादीत ठेवूयात.

पण अशी समाजसेवा नोकरदार / प्रापंचिक माणसाला स्वतःचे आयुष्य नुसतेच जगताना नाही तर मनापासून उपभोगताना करता येऊ नये काय? मला तसे वाटत नाही. किंबहूना वर म्हणल्याप्रमाणे नैतिक दबाव (मॉरल प्रेशर) म्हणून नाही तर जबाबदारीच्या जाणिवेतून सर्वांनीच काहीतरी समाजसेवा करावी असे वाटते - जिथे आवडते तिथे, ज्या विषयात आवडते त्या विषयात आणि सुरवातीस अगदी जेव्हढा वेळ देता येईल तितकाच...

सध्याच्या काळात बिल गेट्स, वॉरन बफे आदींनी आधी संपत्ती केली आणि नंतर आता त्याचा समाजासाठी उपयोग करायला वापर करत आहेत. तेच क्लिंटन फाउंडेशन काढून तर त्याच्या बरेच आधी जिमि कार्टर ने हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी या ख्रिश्चन धर्मातील शिकवणीप्रमाणे संस्था काढून समाजसेवेचे काम केले अनेकांना प्रेरणा देखील दिली. चर्चमधे दर रविवारी प्रार्थना झाल्यावर पैसे गोळा करायची प्रथा आहे ज्यातून विशेष करून कॅथलिक पंथ जगभर नुसतेच धर्मांतर करत हिंडत नाही तर त्यांच्यातील स्वयंसेवकांच्या मार्फत सेवापण करत असतो.

वास्तवीक (गेट्स-बफे सारखे) असे काम आपल्याकडे देखील पुर्वी चालायचे. त्यात आत्ता लगेच आठवते त्याप्रमाणे जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती असोत, अनेक पार्सी ट्रस्ट्सच्या शिष्यवृत्ती असोत का टाटा - बिर्ला सारखे उद्योगपती असोत... न बोलता पैशाने आणि पुस्तकाच्या रुपाने शेवटपर्यंत अखंड मदत केलेल्या पुल-सुनिताबाईंचे उदाहरण वास्तवीक पुलंच्या चाहत्यांनी कायम लक्षात ठेवण्यासारखे आणि आत्मसात करण्यासारखे आहे... पण नंतर "राजा कालस्य कारणम" झाले का "पैसा कालस्य कारणम" झाला माहीत नाही, स्वार्थ, अनास्था, व्यवस्थेवरील अविश्वास, तसा अविश्वास तयार होणारे अनुभव.. कारणे काही असोत पण असे वाटते की एक अब्जांच्या देशात तुलनेने तेव्हढी समाजसेवेची वृत्ती वाढली नाही.

तरी देखील जे काही तुलनेने कमी आहेत त्यात देखील प्रेरणा देणारे खूप काही आहे... मधे एकदा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ५२ भागात असेच जगावेगळे करणार्‍यांच्यावर तपस्या नावाची मालिका झाली होती. ती बघण्यासारखी आहे. त्याव्यतिरीक्त देखील अनेक उदाहरणे असतील...

तुमच्या पहाण्यात, अनुभवात तसे काही आले आहे का? समाजसेवेची गरज नक्की कशासाठी आहे असे वाटते?

प्रतिक्रिया

सोसल वर्क म्हणजे आपल्याला सोसल तेवढं दुसर्‍याना मदत करणे, परतफेडीच्यी अपेक्षा न ठेवता.

+१..
अगदि साधी अन छोटीशी व्याख्या आहे समाजसेवेची ! एकदा निरपेक्षपणे दुसर्‍याला मदत करतो म्हटल्यावर वैयक्तिक जीवनातही कुणी आदर्श असावे ही अपेक्षा का ? माणूस म्हटल्यावर + - स्वभावगुण आलेच. मदत करतो आहे हा मोठेपणा पहावा. वैयक्तिक आयुष्याचे मोजमाप काढण्याची काही गरज नसावी.

गोदूताई परूळेकर, मेधा पाटकर, नानाजी देशमुख, अभय बंग, बाबा आमटे, प्रकाश आमटे आदी अनेकांनी

ही समाज सेवाच.

डॉ. हरीश हांडे

ही पण

अण्णा हजारे

हो.. हो नक्कीच

बिल गेट्स, वॉरन बफे

१०० पर्सेंट !

जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती

ही सुद्धा समाज सेवाच.

अनेक पार्सी ट्रस्ट्सच्या शिष्यवृत्ती असोत

ही सुद्धा समाज सेवाच.

का टाटा - बिर्ला सारखे उद्योगपती असोत

नक्कीच, हे समाजसेवकसुद्धा आहेत.

तपस्या नावाची मालिका झाली होती

आता तुम्ही आग्रहानं शिफारस करताय म्हणजे ही पण समाज सेवाच असणार.

सचिन तेंडुलकर

इतना अच्छा आदमी है अपना सच्या अपने कु भौत पसंद हय, होन दो ना थोडी ढिलढाल एखांद बार कायदे में. और वो भी अच्छे मराठी माणूस की लायकी की वजे से हो रही ना? ऐसा कहेंगे की और एक अच्छे मराठी माणूसने समाजसेवा की व्याख्या बदल डाली ! :)

समाजसेवेचे अनेक मार्ग आहेत.
कोणत्या प्रकारे करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न.
मनुष्याला उपयोगी पडल्याशी कारण.
संसारी माणसालाही थोडा वेळ काढून सेवा करता येईल.
आता लोक उगीच शिळेपाके अन्न मोलकरणीला देऊन ती समाजसेवा आहे असं म्हणायला लागले तर अवघड आहे.
इथे पुन्हा वृत्ती कशी आहे त्यावर समाजसेवेची व्याख्या अवलंबून असेल असे वाटते.
एखादी गोष्ट आपल्याकडे पुरेशी आहे म्हणून आनंदाने दुसर्‍याला द्यावी असे वाटणे, त्यातून मिळणारा आनंद ही आपलीही गरजच आहे हे पक्के ओळखून असणे असं काहीसं......... जाऊ दे. आजकाल वैचारीक धाग्यांमुळे फार मतप्रदर्शन करता येत नाही हेच खरं.;)

भ्रष्टाचाराला खतपाणी मिळेल असे न वागणे, समाजाने नैतिकतेचे आणि राज्याने कायद्याचे घालून दिलेले बंधन मनापासून पाळणे, रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळणे, गरजवंतांना शक्य होईल तितकी मदत करणे, पुढच्या पिढीवर सुसंस्कार करणे इ.इ.इ. अनेक मार्गाने समाजसेवा घडू शकते असे माझे मत आहे.

"त्यांच्यातील स्वयंसेवकांच्या मार्फत सेवापण करत असतो."
आणि त्या सेवांच्या मोबदल्यात धर्मांतरे पण घडवून आणत असतो. :)

>

हल्लीच्या काळात खुप खाऊन, चरुन, माज आल्यानंतर, माजासहित केली जाणारी ती - 'स' माज सेवा. (हे सचिनला बहुधा लागू नसावे (अशी आशा आहे.))

हे सचिनला बहुधा लागू नसावे (अशी आशा आहे.))
नक्की लागू नसावे अशी खात्री आहे.

:) चांगला चर्चाप्रस्ताव. याचे उत्तर म्हणून काही प्रतिप्रश्न विचारतो, त्याच्या उत्तरांनंतर पुढील चर्चा करायला अधिक मजा येईलसे वाटते
१. एखाद्या सैनिकाने प्रचंड पराक्रम गाजवला. त्यामुळे त्याचे कौतूक झाले, त्याला बरेच पुरस्कार मिळाले, प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळाला. त्यापैशातून त्याने एक हॉटेल काढले, गाडी घेतली वगैरे वगैरे. मात्र मुळात भारतीय समाजासाठी अतुलनीय शौर्य गाजवणार्‍या सैनिकाला तुम्ही समाजसेवक म्हणणार का?
२. बहुतांश राजकीय पक्ष समाजसेवा करतात असा त्यांचा दावा असतो ते तुम्हाला पटते का? लालुप्रसाद यादव, अटलबिहारी वाजपेयी, ज्योती बसू, सोनिया गांधी आदी व्यक्ती खासदारकीच्या माध्यमातून समाजसेवा करतात हे तुम्हाला पटते का?
३. किरण बेदी व तत्त्सम व्यावसायिक एन्जीओंचे कर्तेधर्ते तुम्हाला समाजसेवक वाटतात का?
४. लता मंगेशकर यांनी आपल्या गाण्याने समाजाचे कान तृप्त केले तर त्यांनी आपल्या गायनातून समाजसेवाच केली आहे असे तुम्ही मानता का?
५. मी एका भारतीय कंपनीत नोकरी करतो. सरकारने नेमून दिलेला टॅक्स नियमीतपणे भरतो ज्यातून समाजासाठी विविध सेवा व सोयी मीच निवडून दिलेले सरकार करते. तेव्हा मी समाजसेवक आहे का?
६. एका लेखकाने समाजातील एखाद्या अनिष्ट प्रथेवर सडकून टिका केली, ज्यामुळे समाज ढवळून निघाला. या लेखकाचे नाव झाले. आदर सत्कार झाला. ती प्रथा बंद व्हावी म्हणून त्याने इतर कोणतीही आर्थिक मदत केली नाही. एका अर्थाने त्याचे योगदान केवळ साहित्यक्षेत्रापुरतेच मर्यादित होते. मिळालेल्या पैशातून त्याने एक घर बांधले, स्वतःचे प्रकाशनगृह काढले वगैरे. मात्र त्याच्या लेखनाची सेवा ही समाजसेवा गणणार का?

माझ्याकडुन जमेल तशी उत्तरे ...

१. एखाद्या सैनिकाने प्रचंड पराक्रम गाजवला. त्यामुळे त्याचे कौतूक झाले, त्याला बरेच पुरस्कार मिळाले, प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळाला. त्यापैशातून त्याने एक हॉटेल काढले, गाडी घेतली वगैरे वगैरे. मात्र मुळात भारतीय समाजासाठी अतुलनीय शौर्य गाजवणार्‍या सैनिकाला तुम्ही समाजसेवक म्हणणार का?

तो 'सैनिक' ह्या भुमिकेत कार्यरत असताना त्याने गाजवलेल्या शौर्यामुळे तो समाजसेवक होतो. अर्थात हे करत असताना सैन्याकडुन त्याला पगाररुपी जो मोबदला मिळत असतो त्याने त्याचे शौर्याचे अथवा समाजसेवकपणाचे महत्व कमी होते असे वाटत नाही.
'सैनिक' ही फेज संपल्यानंतर त्याने जमा झालेल्या पैशातुन जे काही केले त्याचा समाजसेवकपणाशी संबंध नाही, त्याने हॉटेल काढले अथवा गाडी घेतली म्हणुन त्याचे कर्तुत्व कमी होत नाही.
जोवर तो पुर्वपुण्याईचा वापर 'सैनिक' ही फेज संपल्यानंतर व्यवसायिक दृष्टीतुन अधिक पैसे मिळवण्यासाठी करत नाही तोवर त्याच्या समाजसेवक ह्या सन्मानास आक्षेप घेण्याचे कारण नाही.

२. बहुतांश राजकीय पक्ष समाजसेवा करतात असा त्यांचा दावा असतो ते तुम्हाला पटते का? लालुप्रसाद यादव, अटलबिहारी वाजपेयी, ज्योती बसू, सोनिया गांधी आदी व्यक्ती खासदारकीच्या माध्यमातून समाजसेवा करतात हे तुम्हाला पटते का?

हो, त्यांचा हा दावा बहुतांशी म्हणण्यापेक्षा जवळपास संपुर्णपणे पटतो.
'राजकिय पक्ष' हे मुलतः समाजसेवा ह्याच हेतुने कार्यरत असतात. त्या पक्षात काम करण्यार्‍या एखाद्या विविक्षित व्यक्तीचे उदाहरण घेऊन संपुर्ण पक्षाच्या समाजसेवकत्वाचा लेखाजोखा मांडता येणार नाही.

३. किरण बेदी व तत्त्सम व्यावसायिक एन्जीओंचे कर्तेधर्ते तुम्हाला समाजसेवक वाटतात का?

प्रश्न संपुर्ण क्लियर नाही, संदिग्धता भरपुर आहे.
तुम्हाला सगळे 'एन्जीओ' एकाच तागडीत तोलायचे आहेत का ? तसे असल्यास हा प्रयत्न आणि त्यातुन काढलेले अनुमान हा मिसलिडिंग विदा ठरेल असे वाटते.
असो, काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांशी 'एनजीओ' ह्या 'समाजसेवक' नसतात असे आमचे मत आहे.

४. लता मंगेशकर यांनी आपल्या गाण्याने समाजाचे कान तृप्त केले तर त्यांनी आपल्या गायनातून समाजसेवाच केली आहे असे तुम्ही मानता का?

हो, १००% असेच मानतो !
त्याबद्दल त्यांना मिळणारा मोबदला जर तुम्हाला गृहित धरायचा असेल तर तो समजाने त्यांच्या कर्तुत्वाची, कलेची, गुणांची पारख आणि कौतुक करुन एक सन्मान म्हणुन असे मानावे.
इनफॅक्ट तेवढेच पैसे घेऊन तसे कोणी गाऊ शकणार नाही व लता मंगेशकर तशा गातात व त्याने समाज तृप्त होतो की एका प्रकारची समाजसेवाच आहे.
केवळ मोबदला/पैसे घेतात/देतात म्हणुन त्याचे महत्व कमी होते असे वाटत नाही.

५. मी एका भारतीय कंपनीत नोकरी करतो. सरकारने नेमून दिलेला टॅक्स नियमीतपणे भरतो ज्यातून समाजासाठी विविध सेवा व सोयी मीच निवडून दिलेले सरकार करते. तेव्हा मी समाजसेवक आहे का?

नाही !
तुम्ही जो टॅक्स भरता ते तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही इथल्या ज्या काही असतील त्या सोईसुविधा उपभोगता त्याचा मोबदला व तुमचे भविष्यातले जीवन सुखकर करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना तुमच्याकडुन हातभार म्हणुन तुम्ही टॅक्स देता. हा सरळसरळ व्यवहार आहे, ह्याला समजासेवा कसे काय म्हणता येईल ?

६. एका लेखकाने समाजातील एखाद्या अनिष्ट प्रथेवर सडकून टिका केली, ज्यामुळे समाज ढवळून निघाला. या लेखकाचे नाव झाले. आदर सत्कार झाला. ती प्रथा बंद व्हावी म्हणून त्याने इतर कोणतीही आर्थिक मदत केली नाही. एका अर्थाने त्याचे योगदान केवळ साहित्यक्षेत्रापुरतेच मर्यादित होते. मिळालेल्या पैशातून त्याने एक घर बांधले, स्वतःचे प्रकाशनगृह काढले वगैरे. मात्र त्याच्या लेखनाची सेवा ही समाजसेवा गणणार का?

ह्याचे उत्तर हो / नाही असे देता येणार नाही, त्याचे अजुन काही दुरगामी परिणाम लक्षात घेणे गरजेचे आहे.
लेखकाने लेख लिहले, टिका केली. त्याबद्दल त्याचे नाव झाले, समाज ढवळुन निघाला, आदरसत्कार झाले व त्यातुन त्याला पैसा मिळाला व त्याने तो स्वतःसाठी वापरला ह्या वर्णनात कुणेही समाजसेवा नाही.
मात्र त्याने जे मत मांडले व समाज जागृत झाला व त्यातुनच इतर काही व्यक्तींना प्रेरणा मिळाली व त्यांनी त्या अनिष्ट रुढी बदलण्यासाठी 'प्रत्यक्ष' हालचाल केली हे त्या लेखकाच्या प्रेरणेतुन घडले असे मानायला हरकत नाही, त्याचे श्रेय त्याला नको का ?
लेखकाने स्वतःच मदत द्यावी किंवा स्वतःचय त्या फ्रेंटवर जाऊन लढावे हा आग्रह अनाठायी आहे.
असे असतील तर सर्व वृत्तपत्र संपादकांना लेखण्या मोडुन हातात तलवारी/बंदुका घेण्यावाचुन पर्याय नाही. 'क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे' असे जरी म्हटले जाते तरीही ही वाचाळता बर्‍याचदा दुसर्‍यांना क्रिया करण्यास प्रोत्साहित करते असे वाटते व म्हणुन त्या वाचाळतेचे श्रेय लेखकाला दिले जावे व त्याला समाजसेवक म्हणुन सन्मान केला जावा असे वाटते.

बाकी तुमचे बहुतांशी प्रश्न 'कर्तुत्व' आणि 'मोबदला' ह्यावर रेंगाळले आहेत असे एक निरिक्षण नोंदवतो व त्या दोन्हीचा एकमेकांशी फारसा संबंध नाही असेही आग्रहाचे मत नोंदवतो. कर्तुत्व असेल तर मोबदला मिळतोच, मिळालाच पाहिजे, पण तो मिळाला म्हणुन त्या कर्तुत्वाची किंमत कमी नाही होत नाही, असो.

बाकी चर्चा वाचतो आहे, आवडते आहे. जमेल तशी भर घालत जाईन.

- छोटा डॉन

डॉनरावांशी सहमत आहे.

सहमत आहे

लता मंगेशकर यांनी आपल्या गाण्याने समाजाचे कान तृप्त केले तर त्यांनी आपल्या गायनातून समाजसेवाच केली आहे असे तुम्ही मानता का?

गाणे हा त्यांचा व्यवसाय आहे. गायन करणारे सर्वच समाजसेवक मानले पाहिजेत मग.सुनिधी चौहान्,उदित नारायण्,सोनु निगम....
शिवाय जे चाली(गाण्यांच्या) रचतात- ते सर्व अन्नू मलिक, नदिम श्रवण,विजु शहा,जतिन ललित हेही समाज सेवक मानायचे का? कारण त्यांची काही गाणी ऐकून (जी लता दिदींनीही गायली आहेत) माझेही कान तृप्त झाले आहेत.

तो 'सैनिक' ह्या भुमिकेत कार्यरत असताना त्याने गाजवलेल्या शौर्यामुळे तो समाजसेवक होतो. अर्थात हे करत असताना सैन्याकडुन त्याला पगाररुपी जो मोबदला मिळत असतो त्याने त्याचे शौर्याचे अथवा समाजसेवकपणाचे महत्व कमी होते असे वाटत नाही

हा मुद्दा काहीसा संभ्रमित करणारा आहे.
एखाद्या सैनिकाच्या कार्यकाळात युद्ध होतच नाही आणि शौर्य गाजवायची संधीच मिळत नाही. तोही समाजसेवक ठरतो का? मला वाटते 'होय. ठरतो' कारण तो सर्वसामान्यांच्या आयुष्याचे रक्षण करण्याच्या कार्यात सज्ज राहात असतो.
आता प्रश्न येतो, प्रवासी वाहतुक करणार्‍या विमानांच्या वैमानिकांचा. ते ही समाज सेवक आहेत का? त्यांनाही स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांची वाहतुक करावी लागते. त्यांनाही सैनिकांप्रमाणे वेतन मिळते. त्यांनाही, विमानात काही बिघाड निर्माण झाल्यास मोठ्या कौशल्याने विमान सुखरुप उतरवावे लागते आणि कधी कधी जीवाचे मोल द्यावे लागते.

बस चालक, एस्टी चालक, रेल्वे गाड्यांचे चालक असे अनेक जण ह्या कक्षेत येतील. पण 'सैनिकांची' ती समाजसेवा आणि ह्या इतरांची, जे सैनिकांप्रमाणेच किंवा कधी कधी रोजच्या जीवनात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांची ने-आण करतात त्यांची सेवा 'समाजसेवा' नाही का?

तुम्ही जो टॅक्स भरता ते तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही इथल्या ज्या काही असतील त्या सोईसुविधा उपभोगता त्याचा मोबदला व तुमचे भविष्यातले जीवन सुखकर करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना तुमच्याकडुन हातभार म्हणुन तुम्ही टॅक्स देता. हा सरळसरळ व्यवहार आहे, ह्याला समजासेवा कसे काय म्हणता येईल ?

भूदल, हवाईदल,नौदल ह्यांचा खर्च कुठल्या पैशातून होतो? आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी जी मदत दिली जाते, जी विजमाफी दिली जाते ती कुठल्या पैशातून दिली जाते? झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन, राखिव जाती/जमातींचे शिक्षण,
सरकारी मोफत इस्पितळे, महानगरपालिका शाळा इ.इ.इ. अनेक बाबतीत जो पैसा खर्च होतो तो सामान्याच्या करातूनच नं? 'सामान्य माणूस' करतो ते कर्तव्य आणि 'सैनिक' करतो ते समाजकार्य असा दूजाभाव का?

वेश्याव्यवसायाला सरकार संमती/परवाने का देते? ह्या प्रश्नाला असे उत्तर देण्यात येते, 'त्या आहेत म्हणून आपल्या आया-बहिणी सुरक्षित आहेत.' मान्य. म्हणजे, वेश्याही समाजातील स्त्रियांचे रक्षण करून एक प्रकारे समाजसेवा करणार्‍या 'समाजसेवक'च झाल्या नं? त्यांना 'समाजसेविका' असे सन्मानाने का संबोधिले जात नाही?

डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार इ.इ.इ. अनेक जणं ह्या नं त्या मार्गाने समाजसेवाच करीत आहेत असे मला वाटते.

१००% सहमत. पैसे घेवून गाण्या बजावण्यालाही समाजसेवेत टाकल्याने मी ही संभमीत झालो होतो. आपण मांडलेले मुद्दे बघता 'आम्ही सारे समाजसेवक' म्हणायला हरकत नाही!
विनामोबदला केलेले कुठेलेही कार्य म्हणजे समाजसेवा असे मला वाटते.

विनामोबदला केलेले कुठेलेही कार्य म्हणजे समाजसेवा असे मला वाटते.

म्हणजे आमचे नान्या, बिका जे पालथे धंदे करतात, उगा बोंबलत काड्या सारत हिंडतात ते सगळे समाजसेवेत मोडते ?

उगाच किसून कीस काढणार्‍या आणि असंबद्ध शब्दच्छल करणार्‍या प्रतिसादाला डान्रावांनी समर्पक उत्तर दिले आहे.

मी वर विचारलेल्या प्रश्नावर डॉन्रावांनी मते दिली आहेत. त्यावर सहमतीसोबत अंशतः खंडनही आले आहे.
मुळात प्रश्नच संदिग्ध बनविले आहेत ज्याची उत्तरे देताना मुळ प्रश्नातील व्यक्तीसापेक्षता दिसून यावी. तरीही सर्वसहम्तीने व्याख्या बनते आहे का हे पहावे या भुमिकेतून हे प्रश्न विचारले आहेत.
@ डॉन, प्रश्नाचा एकच रोख या कारणासाठी आहे कारण मुळ धाग्यात सचिनला बरेच पैसे मिळतात, शिवाय तो आयपीएल खेळतो व जाहिराती करतो त्यामुळे(तरिही) त्याने समाजसेवा केली आहे का? यावर मत विचारले/दिले आहे

इतरही मतांसाठी थांबून माझेही मत/पुरवणी/प्रतिवाद सोमवारी करेन. पुढील दोन दिवस आंतरजालावर नसेन त्यामुळे प्रश्न टाकून मधेच पळाला असे वाटु नये म्हणून हा प्रतिसाद! :)

डॉनरावांनी दिलेल्या उत्तरांशी बहुतांशी सहमत आहे...

चर्चा विषय हा "समाजसेवा कशाला म्हणावी" हा आहे, समाजसेवक कोणाला म्हणावे हा नाही. तरी देखील, या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर देयचे झाले तर समाजसेवक म्हणून आजीवन म्हणण्यासाठी, तसे आजीवन काम करावे लागेल, नाहीतर तेव्हढ्यापुरते चांगले सामाजीक कार्य केले असेच म्हणावे लागेल - देवळात जाताना बाहेर बसलेल्या एखाद्या भिकार्‍याच्या पदरात एखादे नाणे टाकून पुण्यसंचय केल्यासारखे... अर्थात तुमच्या प्रश्नांच्या संदर्भात उत्तर इतके सरळ असू शकत नाही. म्हणून मला जे वाटते ते, :-)

एखाद्या सैनिकाने प्रचंड पराक्रम गाजवला...तुम्ही समाजसेवक म्हणणार का?

प्रस्तावात देखील म्हणल्याप्रमाणे, समाजसेवा करणे म्हणजे "साधी रहाणी उच्च विचारसरणी" वगैरे मला अपेक्षित नाही. पण एकतर स्वेच्छेने (voluntarily) एखाद्या स्वतःच्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षा-स्वार्थाच्या बाहेर बघून समाजातील कुठल्यातरी गोष्टींवर काम करणे. सैनिकाने तसे केले असते. ती समाजसेवेपेक्षाही मोठी अशी राष्ट्रसेवाच असते. त्याला त्याच्या नागरी जीवनात परत सुखाने नांदता येण्यासाठी मदत करणे (जेणे करून तो घोडा-गाडी देखील शकेल) हे देखील मी मान्य करतो. पण त्याला कायमस्वरूपी समाजसेवक म्हणणे मला पटणार नाही.

बहुतांश राजकीय पक्ष समाजसेवा करतात असा त्यांचा दावा असतो ते तुम्हाला पटते का? लालुप्रसाद यादव, अटलबिहारी वाजपेयी, ज्योती बसू, सोनिया गांधी आदी व्यक्ती खासदारकीच्या माध्यमातून समाजसेवा करतात हे तुम्हाला पटते का?

आत्ताच्या पिढीपेक्षा आधीच्या पिढीत राजकीय पक्ष आणि त्यांचे नेतृत्व हे अधिक सेवाभावी होते असे म्हणेन. गोरेगावची लाटणी मोर्चा काढणारी "पाणीवाली बाई" (मॄणाल गोरे), (काँग्रेसमन्सच्या आरोळ्यांमधे) "जी मधूला गंडवते ती प्रमिला दंडवते" ;) ह्या सारख्या स्त्रीयांनी झोकून देऊन काम केले. आणिबाणीच्या काळात समाजवादी, जनसंघ आणि कम्युनिस्ट नेत्यांनी जर आवाज उठवला नसता, दिडच वर्षे असेल पण हालापेष्टा खाल्या नसत्या तर भारताचे लोकशाही म्हणून भविष्य अंधारातच गेले होते... लालू देखील कधीकाळी समाजवादाच्या आदर्शाने काम करणारे व्यक्तीमत्व होते. तेंव्हा तेव्हढ्या पुरते ते नक्कीच समाजसेवक होते. सत्तेच्या राजकारणात येण्याआधी शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून अनेक समाजसेवी प्रकल्प राबवले गेले...

किरण बेदी व तत्त्सम व्यावसायिक एन्जीओंचे कर्तेधर्ते तुम्हाला समाजसेवक वाटतात का?

त्यांचे काम जर प्रत्यक्ष समाजसेवेचे असले त्यातून जर काही (चांगले अथवा किमान त्यांच्या प्रामाणिक नजरेतून चांगले) वळण लागत असले तर ते समाजसेवकच आहेत, फारतर त्यांना "व्यावसायीक समाजसेवक" म्हणता येईल. विशेष करून जर, त्यांना बाहेर त्याहूनही अधिक मोबदल्याचे काम मिळत असेल आणि तरी देखील ते इथे चिकटून असले तर...

लता मंगेशकर यांनी आपल्या गाण्याने समाजाचे कान तृप्त केले तर त्यांनी आपल्या गायनातून समाजसेवाच केली आहे असे तुम्ही मानता का?

आय विश... पण मग बप्पी लेहरी हा तर बिचारा जगभर वणवण हिंडला, सगळीकडचे संगीत त्याने आत्मसात करून त्याला भारतीय पठडीत बसवून, तुम्हाला हवे असोत अथवा नको, त्याने कान भरून टाकले. मग ते किती बर सामाजीक कार्य ठरेल? ;) एनीवे, गंमत बाजूस ठेवूया पण या संदर्भात सचीन आणि लता एकाच मापाने मोजत आहे. त्यांच्या खर्‍या अर्थाने अतुलनीय कार्यास मला समाजसेवा म्हणवता येणार नाही. अर्थात ते सामाजीक मदत (न बोलता) करत असतील या बाबतीत देखील मला तिळमात्र शंका नाही. पण ती समाजसेवा नाही...

वरील संदर्भातच, थोडे अवांतर होईल पण: स्व. वसंत पोतदारांकडून एक किस्सा ऐकला होता. ६५च्या भारत-पाक युद्धाच्या सुमारास ते सी रामचंद्रांचे पी ए होते. युद्ध आपण जिंकलो होतो, वाटाघाटी उरल्या होत्या. "ऐ मेरे वतन के लोगोच्या" स्टाईलमधले, कोण्या एका मोठ्या कवीच्या (माझ्या लक्षात नाही पण, कवी प्रदीप वगैरे सारख्या) लेखणीतून नवीन गाणे तयार झाले होते. सी रामचंद्रांनी ते स्वरबद्ध केले होते. तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रींच्या उपस्थितीत आशाबाईंने ते गायले. आशाबाई या कार्यक्रमास सोन्याच्या दागिन्याने मढून आल्या होत्या. गाणे झाले. सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. आशाबाईंने सर्व दागिने काढले आणि सैनिक विधवा फंडास दान केले... सगळेच बघत राहीले. दुर्दैवाने दुसर्‍याच दिवशी शास्त्री ताश्कंदला गेले आणि त्यांच्याबरोबरच ते गाणे विरुन गेले. पोतदारांनी ते म्हणून दाखवले होते. ते भेटले तेंव्हा व्हिडीओ कॅमेरा पण नव्हता आणि पेन-पेन्सिलीने ते लिहून ठेवायचे सुचले नाही, याची खंत वाटते. असो.

मी एका भारतीय कंपनीत नोकरी करतो. सरकारने नेमून दिलेला टॅक्स नियमीतपणे भरतो ज्यातून समाजासाठी विविध सेवा व सोयी मीच निवडून दिलेले सरकार करते. तेव्हा मी समाजसेवक आहे का?

नाही... तुम्ही केवळ सामाजीक कार्यास मदत करता आहात जे समाजसेवक घडवत असतात.

एका लेखकाने समाजातील एखाद्या अनिष्ट प्रथेवर सडकून टिका केली,... मात्र त्याच्या लेखनाची सेवा ही समाजसेवा गणणार का?

लेखक हा ट्रिकी भाग आहे. कारण लेखणी ही तलवारीपेक्षा जास्त धारदार असू शकते. समाजाला वळण लावू शकते. तुम्ही म्हणालात त्या संदर्भात मला पुल आणि दुर्गाबाई आठवल्या... दोघांची जोडगोळी आणि वेगवेगळे देखील आणिबाणीच्या विरोधात मैदानात उतरले होते. मला वाटते शंकररावांनी तर पुलंची "विदुषक" म्हणून हेटाळणी देखील केली होती. पण तेव्हढेच करून ते थांबले नाहीत. दुर्गाबाईंचे रहाणे साधेच होते, त्यांनी कुठे आर्थिक मदत केली वगैरे माहित नाही. पण लेखणीतून ज्ञानदान नक्कीच केले. पुलंनी तर काय संस्था काढल्या, पुस्तके अनेक ग्रंथालयांना दिली, पुणे विद्यापिठात मायक्रोफिल्मचा सेक्शन चालू करण्यासाठी त्यावेळेस पाच लाखांचे अनुदान दिले. यात पैशाचा प्रश्न नाही पण त्यातून सामाजीक जाण दिसते.

तात्पर्यः माझ्या लेखी समाजसेवक म्हणजे अशी व्यक्ती जिने स्वतःचे आयुष्य हे एखाद्या कार्यासाठी झोकून दिले आहे. ते करत असताना इतरत्र जे काही मान-सन्मान मिळू शकतात त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ते केवळ बंग अथवा आमटेच नसतात तर इतर अनेक निनावी असू शकतात जे आपल्याला माहीत नसतात. असो.

यातल्या प्रत्येक मुद्यावर किंवा मी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात चुक/ बरोबर नाही हे तर स्वयंस्पष्ट आहे. डॉन्रावांची मतेही रोचक आहेत. अनेक ठिकाणी मी सहमतही आहे. मात्र तिथे अथवा वरील उत्तरांत जिथे सहमत नाही त्याचे खंडन करण्यात फारसे हशील नाही कारण त्यात फार योग्य-अयोग्य करण्यात मजा नाही. मात्र 'समाजसेवा' या क्षेत्राची व्याख्या किती संदिग्ध असु शकते ते दिसून येते. एखादी व्यक्ती देशाप्रती काहि योगदान देत असेल आणि स्वतःला मिळालेल्या पैशाचा स्वतःला हवा तसा उपयोग करत असेल तर माझ्यामते त्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, आनि एखादी व्यक्ती स्वतःवर पैसा खर्च करते, स्वः जाहिराती करून अधिकाधिक पैसा कमावते हे कारण त्यांच्या समाजसेवेकडे दुर्लक्ष करण्यासाठी किंवा त्या समाजसेवेला दुय्यम/अपुरे मानण्यासाठी मला पुरेसे वाटत नाही.

एखाद्याचे देशासाठी - समाजासाठी योगदान अमूक एक साच्यातलेच असले पाहिजे, त्याने समाजासाठी काहि करताना वैयक्तिक आयुष्यात खस्ता खाल्ल्या(च) पाहिजेत हा 'सूर' मला गैर आणि क्वचित प्रसंगी घातक वाटतो. एखाद्याने समाजासाठी स्वार्थ बाजूला ठेऊन काम केले तर ते अधिक मोलाचे आणि स्वतःसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडून मग समाजासाठी काही करू पहाणार्‍याची समाजसेवा दुय्यम असा जर सूर असेल तर मो मला दुर्दैवी वाटतो. किंबहूना, स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष -प्रसंगी हेळसांड- करून परमार्थ करणार्‍यांच्या कामाबद्दल अतीव आदर असला तरी त्यांच्या घरच्यांबद्दल कुठेतरी वाईट वाटते आणि काही व्यक्तींच्या बाबतीत तर त्याव्यक्तीपेक्षा घरच्यांचे कौतूक अधिक वाटते. अश्यावेळी त्या व्यक्तीला समाजसेवा करताना आडकाठी न करता केवळ घर सांभाळणार्‍या स्त्रिया/पुरूषदेखील समाजसेवाच करतात असे मी समजतो.

आता मुद्दा सचिन/लता वगैरेंचा: माझ्यामते त्यांनी राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय समाजाचे सक्षम प्रतिनिधित्त्व करून भारतीय समाजाची एकप्रकारे व त्यांच्या क्षेत्रात सेवाच केली आहे. त्यांना 'समाजसेवक' म्हणावे की नाही याबद्दल मी मत ठरवू शकलेलो नाहि मात्र त्यांना भारतरत्न किंवा खासदारकी त्यांच्या 'समाजासेवे' साठी दिली तर मला गैर वाटत नाही.

तात्पर्यः माझ्यामते स्वःच्या पलिकडे विचार करून, समाजासाठी (खरंतर तो आपला - जन्म झालेला - समाज असला पाहिजे असेही नाही) काही करणे गरजेचे आहे याची जाणिव प्रत्यक्षात उतरण्यासाठी आपल्या परिने आपल्या क्षेत्रात शक्य तितके योगदान करणे म्हणजे समाजसेवा. प्रसंगी शक्यतेच्या, कुवतीच्या पलिकडचे योगदान करणे हे थोरपणाचे लक्षण निर्विवाद आहे मात्र समाजसेवा करण्यासाठी असे वागणे (स्वत्त्व विसरून - कुवतीपलिकडे झोकून देणे) अनिवार्य वाटत नाही

हे आपण मागे वाचलंय. नि विसरूनही गेलोय. आपले टोळभैरव तिथे खेळायला गेले नाहीत याचं कारण सरळ आहे. तिथे चालू खेळाइतके पैसे / सुखसोयी इ. फायदे मिळणार नव्हते. हे लोक देश म्हणून खेळत असते तर ही बाब अडचण ठरली नसती. माझ्या दृष्टीने हा म्याच फ़िक्शिंग इतकाच मोठा गुन्हा आहे. या चमूतल्या प्रत्येकाला या कृतीसाठी शिक्षा होणं गरजेचं आहे. त्यांच्यापैकी कुणालाही भारतरत्न वा सर्वोच्च लोकसदनाच्या सदस्यतेची खिरापत आदि कुठलीही राष्ट्रीय परिमाणे चिकटवायला नकोत. त्याची गरज नाही नि उपयोग तर त्याहून नाही. क्रिकेटपुरतं बोलायचं तर सचीन त्यातला बादशहा, देव, प्रेषित सगळं काही आहे. तिथेच तो खुष आहे. त्याला तिथेच राहू द्या.

आपल्या नोकरी/व्यवसायाव्यतिरीक्त चाकोरीबाहेर जाउन फायद्याची अपेक्षा न ठेवता इतरांसाठी नैतिकतेने केलेले कार्य ..

http://bolghevda.blogspot.in/2010/09/blog-post.html

- आपण एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत करू शकता.
- जवळच्या बिनसरकारी संघटनेत काम करू शकता.
- आपण जर वृद्ध असाल तर आजूबाजूचा लहान मुलामुलींना गोष्टी सांगून किंवा गोष्टी सांगायला लावून सभाधीट बनवू शकता. आपला पण वेळ चांगला जाईल व लहानांना पण जाता जाता वळण लागेल.
- आपण जर गृहिणी असाल तर फावल्या वेळेत आपल्याला येणारी कोठलीतरी कला लहानांना शिकवता येईल. कला, गोष्टी, संगीत व गप्पागोष्टींतून सुद्धा समाजोपयोगी चांगले गुण शिकले, शिकवले जाऊ शकतात.
- तुम्ही जर वैद्य किंवा डॉक्टर असाल तर जवळच्या गरजू लोकांना सामाजिक स्वास्थ्या बद्दल प्रबोधन करू शकाल व औषधेही देऊ शकाल.
- किती लिहू? तुम्ही आपण आपल्या कुवती प्रमाणे स्वतःच ठरवून रामाच्या खारुटली प्रमाणे आपला वाटा उचलू शकता. थोडक्यात, आयुष्यात एकातरी गरजू मुलासाठी देवमाणूस व्हायचा प्रयत्न करा व बघा किती आंतरिक समाधान प्राप्त होते ते.

ज्यांना एवढेही जमणार नसेल त्याने बाकीच्यांनी हाती घेतलेल्या कामात अडथळे न आणता त्यांना मनापासून निदान चांगले आशीर्वाद तरी द्यावेत. काही गोष्टी ज्या सहज आपल्या हातून होऊ शकतात त्या अशा.

- आपल्याला आवडले असेल किंवा नसेल पण आपले राष्ट्र वेगवेगळ्या भाषिक प्रांतात (राज्यात) विभागले गेले आहे. आपल्या राष्ट्राने ह्या गोष्टीचा स्वीकार केला आहे. आपले राष्ट्र आपल्या राज्यांपेक्षा श्रेष्ठ असल्या कारणाने आंतरराज्य सीमेवरून भांडणे उकरून काढता कामा नयेत व असलेल्या मतभेदांना प्रोत्साहन देता कामा नयेत. कोठच्याही अशा मोहिमेला बळी पडू नका ज्याने राज्या राज्यां मध्ये कलह निर्माण होईल. आपले बळ, आपली ऊर्मी, आपली ताकद, आपला उत्साह, आपली शक्ती, आपला जोर, आपला जोष व आपली बुद्धी नेहमी आपल्या राष्ट्राच्या सीमा सुरक्षित कशा राहतील ह्यात लागल्या पाहिजेत. आपल्या सीमेला धरून असणाऱ्या प्रश्नांशी आपण नेहमी जागरूक असले पाहिजे. कोणत्या सीमा अजून निश्चित नाहीत, कोणच्या सीमेबाबत कोणच्या राष्ट्रांबरोबर वाद आहेत, घुसखोर कोठून होत आहे, बांगलादेशी विस्थापितांचा लोंढा अजून का येत आहे व आपला देश तो थांबवण्यासाठी काय करत आहे इत्यादी बाबींवर आपले लक्ष वेधलेले असले पाहिजे.
- आपल्या राष्ट्राची संपत्ती व नैसर्गिक साठे ह्याच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपण नेहमी सतर्क असले पाहिजे. मुलांना व वाटचुकलेल्या तरुणांना राष्ट्रीय संपत्तीच्यानाषापासून नेहमी परावृत्त केले पाहिजे. राष्ट्रीय संपत्तीला हानी पोहचेल अशा कोठच्याही मोहिमेला आपला पाठिंबा असता कामा नये. विरोध दर्शवायच्या सुद्धा सुसंस्कृत पद्धती आहेत त्याचा वापर करावा. कोणत्याही कायद्या विरुद्ध किंवा सरकारी धोरणाचा विरोध करायचा असेल तर राष्ट्रीय संपत्तीला हानी न पोहचवता करा.
- मंदिर, मस्जिद इत्यादी धर्मस्थळे दळणवळण केंद्रांवर व रस्त्यांमध्ये बांधायचा कोणताही विचार असेल तर किंवा बांधली जात असली तर, अशा कोणत्याही मोहिमेला प्रोत्साहन वा पाठिंबा देऊ नये.
- लोकसंख्या वाढीमुळे उद्भवणारे प्रश्न अशिक्षित लोकांना समजावून सांगा. संख्ये पेक्षा कस का चांगला ह्याचे महत्त्व समजवावे.
- आपल्या राष्ट्राबद्दल चांगले विचार मनात नेहमी आणावे, तसेच आपल्या परिवाराबद्दल मनात चांगले विचार आणावे, आपल्या समाजाबद्दल मनात चांगले विचार आणावे. प्रार्थनेचा खूप फायदा होतो. त्याने मन निर्मळ, आनंदी राहते व आजूबाजूला चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होते हे सर्वश्रुतच आहे. देशासाठी चांगल्या मनाने केलेली प्रार्थना उपायकारक ठरते.
- मतदान हे आपले सगळ्यात मोठे कर्तव्य आहे व लोकशाही टिकवण्याचे मुख्य साधन आहे. ते प्रत्येकाने आपला धर्म आहे अस समजून पाळले पाहिजे.

सॉफ्टवेयरमधल्या एखाद्या Open Source प्रोजेक्टचा सदस्य बनून प्रोजेक्टला मदत करणे समाजसेवा होईल काय ?

मला वाटते होय. आपल्या सद्सद्विचार बुद्धीला पटून जी सेवा केली जाते ती समाज सेवाच.

वरच्या थोर विचारवंत मिपाकरांच्या* अनेक प्रतिक्रिया अभ्यासल्या असता, रा. रा. श्री. तात्या अभ्यंकर हे देखील मोठे समाजसेवक आहेत हे कोणाच्या ध्यानात कसे आले नाही ह्याचे आश्चर्य वाटले. त्यांनी मुंबई सारख्या शहरात बसून पार कवठे-बुद्रुक पासून अमेरिका आणि जर्मनी पर्यंतच्या मराठी लोकांसाठी एक किती छान व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे पहा बरे.

*द्विरुक्ती बद्दल क्षमस्व.

रा. रा. श्री. तात्या अभ्यंकर हे देखील मोठे समाजसेवक आहेत हे कोणाच्या ध्यानात कसे आले नाही ह्याचे आश्चर्य वाटले.

दोन-अडीच वर्षांपूर्वी मी पूर्ण सहमत असे म्हणू शकलो असतो. ;) पण तात्याने तसेच इतर अनेकांनी जालावर ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या ती समाजसेवाच आहे (अर्थात त्यामुळे त्यांना समाजसेवक म्हणणे जरा जास्त होईल...)

समाजसेवकाची व्याख्या ही कालसापेक्ष करायला हवी..!! केवळ उत्पन्नातला हिस्सा दिला आहे तोच स से असे कसे म्हणता येईल?
समाज हा अनेकविध घटकांनी बनलेला आहे.. विविध घटकांच्या गरजा वेगळ्या असतात. मध्यमवर्गाला चाकोरीच्या बाहेर पडणं शक्य आहे हे दाखवलं हे कसं नाकारता येणारं ?

समाजाचा प्रत्येक सद्स्य हा एक प्रकारे समाजाच्या वाढीसाठी प्रयत्न करत असतो.. कळत नकळत.. अधिक चांगल्या प्रकारे समाजाला विधायक वळणं देण्याचा प्रयत्न करणारा घट्क तो समाजसेवक!!

>>>समाजसेवा म्हणजे काय?

गहन प्रश्न आहे. माझ्या परीने (विजुभाऊंच्या परीचा काही संबंध नाही) उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

स हा प्रत्यय त्याच्या पुढील शब्दाने सुचित होणार्‍या वस्तुच्या/गोष्टीच्या सह, एकत्रित अशा अर्थाने वापरला जातो.

स च्यापुढे वर माज आहे आणि त्यानंतर सेवा हा शब्द आहे. याचाच अर्थ माजासह सेवा असा सरळ सरळ अर्थ होतो.

म्हणजेच समाजसेवा म्हणजे जी सेवा केल्यावर लोक माज करतात ती होय असा लाक्षणिक आणि ध्वनित अर्थ होतो.

बर्‍याच वेळेस हाच अर्थ अभिप्रेत असतो.

फार थोड्या वेळा अशी सेवा करणार्‍या व्यक्तिंचे आचरण आम्ही ज्या पद्धतीने सांगितले आहे तशा अर्थाप्रमाणे नसते. अशी माणसे फार थोडी.

थेट आणि फक्त स्वत:साठी नसलेलं काहीही करणं म्हणजे समाजसेवा.

त्यातून समाधान मिळणं हा एक लाभ आहेच.

निव्वळ शीर्षकाशी सुसंगत आहे. थोडं बाऊन्सर वाटेल पण सोपंय.

नित्शेनं म्हटलंय ` Not to use the other is the highest morality'.

मला वाटतं `दुसर्‍याला न वापरणं म्हणजे समाजसेवा'; कधी असं जगून पाहा, इतर कोणतीही समाजसेवा करायला लागणार नाही

पांढरी स्कॉर्पिओ , खादीचा शर्ट खादीची पँट.. गळ्यात ७-८ तोळेचे गोफ ..हातात अंगाठ्या..मनगटाला ब्रेसलेट...रेबॅनचा गॉगल..
अशा वेषात एखाद्या गणपती मंडळाला देणगी देउन ..निवडणुकीच्या वेळेस गरीबांना जेवण देउन ...
अधे मधे आंदोलन करून ( रस्ता बंद ) ..अधिकार्यांना झोडून .. लोक सेवा करणे ..
रस्ता बांधणी ..पाइप लाइन यांचे काँट्रक्ट घेणे ..गृहनिर्माण प्रकल्प सुरु करणे ..

असे जे करतो तो समाज सेवक म्हणून प्रसिद्ध होउन नंतर जनतेचा सेवक होउन सभागृहात जातो

सर्व प्रतिक्रिया वाचल्यावर डॉनरावांची प्रतिक्रिया ही सर्वात संयत व १०० टक्के सहमतीची वाटते.
गविंनीही एका ओळीत समाजसेवेचे सार छान लिहिले आहे.
असा , विचार करायला लावणारा धागा टाकल्याबद्दल विकासरावांचे आभार.

समाजसेवा म्हणजे ते काम जे तुम्ही नसतं केलं तर तुमचं काहीही बिघडलं नसतं.. पण तरी तुम्ही केलं म्हणून दुसर्‍या कुणाचं काही तरी भलं झालं... आणि त्यानी तिसर्‍याला त्याचा त्रास/ नुकसान झालं नाही...

समाजसेवा म्हणजे ते काम जे तुम्ही नसतं केलं तर तुमचं काहीही बिघडलं नसतं.. पण तरी तुम्ही केलं म्हणून दुसर्‍या कुणाचं काही तरी भलं झालं... आणि त्यानी तिसर्‍याला त्याचा त्रास/ नुकसान झालं नाही...

फारच आवडली ही व्याख्या!

समाजसेवा म्हणजे काय? समाजाची सेवा. सेवा या शब्दाच्या मूळ अर्थात निष्ठा, समर्पण, त्याग या गोष्टी अंतर्भूत आहेत. सेवा म्हणजे श्रद्धापूर्ण श्रम. जिथे स्वार्थ असेल तिथे सेवाभाव असू शकणार नाही. इथे भाव महत्त्वाचा.

सेवा शब्दाच्या या व्याख्येत समाजासाठी केलेलं जे कर्म बसेल ती समाजसेवा. "सर्व्हिस" हा इंग्लिश शब्द खर्‍या अर्थाने सेवा शब्दाच्या सर्व अर्थच्छटा व्यक्त करू शकत नाही. इंग्रजीत पगारासाठी केलेलं काम सुद्धा सर्व्हिसच असतं.

हे लक्षात घेता बहुसंख्य राजकारणी त्यांचा व्यवसाय "समाजसेवा" लिहितात हे पाहून मजा वाटते. कारण खर्‍या अर्थाने 'सेवा' हा व्यवसाय किंवा धंदा असू शकत नाही.

एका संपादकाकडून आलेला हा प्रतिसाद बघून गहिवरलो आहे.

संपादक हे समाजसेवक आहेत का असा एक काथ्याकूट मांडावा काय :p :p :p