दु:खाचा महाकवी हरपला

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जनातलं, मनातलं
26 Mar 2012 - 12:08 pm

अत्यंत दुर्बोध कविता अशी टीका पचवून पुढे दु:खाचा महाकवी या रसिकांनी दिलेल्या बिरूदाला शेवटपर्यंत जागलेले श्री माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस हे आपल्यात राहीले नाहीत या बातमीवर विश्वास बसत नाही. मर्ढेकरांनतरच्या पिढीतले ते एक महत्वाचे आणि प्रमुख कवी होत.

१० मे १९३७ रोजी ग्रेसजींचा जन्म नागपुरात झाला. त्यांचं बालपण विलक्षण गेलं. त्याबद्दल त्यांनी मौन पाळणं पसंत केलं. पण मनात खदखदणारं दु:खं प्रतिमांची सोबत घेऊन आलं. एखाद्या पदार्थाची चव जशी मोजता येत नाही तशीच भावनेची तीव्रताही. ती तीव्रता वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिमांचा वापर केवळ ग्रेसजींसारखे कवीच करू शकतात. या कविता वाचताना जाणवतं कि काहीच कळलं नाही तरी काहीतरी अभिजात असं आपण वाचतो आहोत. दृश्यरूप प्रतिमांमधून पहिल्याच वाचनात एखाद्याला अनुभूति येते आणि मग तो या कोलाज कवितांचा वेडा व्हायचा. हे वेड हळूहळू पसरत गेलं आणि या अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कवीला अनेक प्रतिभावंत शरण गेलं.

त्यांच्या रचनांप्रमाणेच त्याचं व्यक्तिमत्वही गूढ राहीलं. कदाचित या गूढ वागण्यामुळेच काव्यही गुढ झालं असावं. व्यक्त होण्याची प्रत्येकाची आपली एक पद्धत असते. ग्रेसजींची पद्धत ही सर्वस्वी निराळी होती. त्यांच्यावर उर्दू रचनांचा आणि रोमांचवादी इंग्रजी साहीत्याचा प्रभाव होता.

साहीत्य अकादमीचा त्यांना मिळालेला पुरस्कार ही त्यांच्या साहीत्यसेवेला मिळालेली पावती होय. १९६७ ला प्रकाशित झालेल्या संध्याकाळच्या कविता या काव्यसंग्रहाने ग्रेस जगाला माहीत झाले. त्यांची कविता संध्याकाळच्या धूसर प्रकाशात खुलते. आरती प्रभूंप्रमाणेच कातरवेळेचं आकर्षण ग्रेसजींना दिसून येतं. पं हृदयनाथ मंगेशकर ग्रेसजींच्या प्रेमात असे पडले कि शेवटपर्यंत ही मैत्री टिकून राहीली. ग्रेसजी कॅन्सरशी झुंज देत असताना पंडितजींनी त्यांचा उपचार दीनानाथ मंगेशकर मधे केला. या कॅन्सरवरही त्यांनी मार्मिक लेख लिहीला. पद्य लेखन जितकं सुंदर तितकंच गद्य लेखनही शब्दसौंदर्य उधळण करणारं ठरलं.

लताबाईंच्या वाढदिवसाला सकाळमधे आलेला ग्रेसजींचा लेख हा जपून ठेवावा या सदरातला आहे. चर्चबेल हा ललितसंग्रह वाचनीय आहे. चंद्रमाधवीचे प्रदेश, सांजभयाच्या साजणी आणि सांध्यपर्वातील वैष्णवी हे कवितासंग्रह विशेष गाजले.

सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचले ते भय इथले संपत नाही या गीतातून. ती गेली तेव्हां रिमझिम आणि घर थकलेले संन्यासी या गीतांनी लोकांना वेड लावलं. पंडितजींना घर थकलेले संन्यासी साठी सर्वोकृष्ट संगीतकार म्हणून राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.

आज हा महाकवी आपल्यात नाही हे वास्तव पचवणं कठीण जातंय. लक्षात राहतात ती त्यांची स्वतःच्या कवितेबद्दलची वाक्यं..
" माझे शब्द तुम्हाला कुठल्याही शब्दकोशात सापडणार नाही " किंवा " मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही. मी तिचे समर्थन का करू ?"

आणि मग या ओळी आठवतात..

घर थकलेले सन्यासी, हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळयामधले नक्षत्र मला आठवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी, आभाळ घसरले होते

पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळी मागे, असतेच झर्‍याचे पाणी

मी भीऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई

या आवडत्या कवीला श्रद्धांजली वाहण्याचा प्रसंग यावा हे रसिकांचं दु:ख शब्दातीत आहे. अशा वेळी ग्रेसजींच्याच शब्दांचा आधार घेऊन म्हणावं लागतं..

अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले,
स्मरणाचा उत्सव जागून जणू दु:ख घराला आले

दु:खाच्या या महाकवीला माझी विनयपूर्वक आदरांजली !

- संध्या

साहित्यिकसद्भावनालेखबातमी

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Mar 2012 - 12:09 pm | बिपिन कार्यकर्ते
मोदक's picture

26 Mar 2012 - 12:22 pm | मोदक

:-(

पिलीयन रायडर's picture

26 Mar 2012 - 12:44 pm | पिलीयन रायडर

लहानपणीच घरी "साजणवेळा" ऐकलं होतं.. काही कळायचं नाही पण कानाला छान वाटायचं...
अजुनही काही कळत नाही पण करोडो वेळा ऐकुनही आजही ऐकावस वाटतं....
त्यातली ३ गाणी इथे ऐकायला मिळतील...
http://www.esnips.com/thumbnails.php?album=3275912

पिलीयन रायडर's picture

26 Mar 2012 - 12:46 pm | पिलीयन रायडर

त्यांच्या ह्या ओळी मला फार आवडतात...
" मी महाकवी दु:खाचा.. प्राचीन नदी परि खोल...
दगडाचे माझ्या हाती..वेगाने होते फुल..."

पांथस्थ's picture

26 Mar 2012 - 2:52 pm | पांथस्थ

मला पण!

कवी ग्रेस ह्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

आत्मशून्य's picture

26 Mar 2012 - 1:04 pm | आत्मशून्य

या महाकवीला माझीही विनयपूर्वक आदरांजली.

ग्रेस जी गेले. आपल्या स्टाईलने ते जगले. त्यानी लिहिलेही त्याच मूडमधे. जो शैलीवाला कलावंत, साहित्यिक असतो. त्याच्या लोकप्रियतेला मर्यादा असतात कारण शैली मुळे त्याच विशिष्ट शैलीचे आस्वादक त्याचे चाहते असतात. पण शैलीचा लाभ असा की दीर्घ काळ शैलीदार च जास्त लक्षात रहातो.ग्रेस जी नी आपले वेगळेपंण मुद्दाम हून जपले का माहित नाही. पण त्या वेगळेपणामुळेच त्याना आरती प्रभू सारखे अढळपद मिळणार आहे. संध्याजीनी अभ्यासपूर्ण श्रद्धांजली वहाताना आचार्य अत्रे ( हे ही स्वत: कवि) यानी लिहिलेल्या काही लेखांची आठवण करून दिली.
माझी ग्रेस जी ना विनम्र श्रद्धांजली !

गणेशा's picture

26 Mar 2012 - 1:34 pm | गणेशा

बातमी वाचुन अतिशय वाईट वाटले..
माझा आवडता कवी आज या जगात नाहिये, हे ऐकुनच मन सुन्न झाले..

"वार्‍याने हलते रान.." ह्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी आमची भेट झाली होती.... ओझरती ..
एक वेडा वाचक आणि एक झपाटुन लिहिणारा लेखक ..
आता पर्यंत माझ्या कवितेंच्या डायरीवर पहिली सहि ( आणि शेवटची) करणारे ग्रेस होते..
आणि त्याचे कारण ही त्या कवितेंचा प्रेरणादायी स्त्रोत होते खुद्द कवी ग्रेस ...
"आई .." या त्यांच्याच लिहिलेल्या करुन कवितेंवरुन लिहायला घेतले आणि दिल्लीतील एकांतात काहुर बनलेले २३ दिवस कसे गेले कळलचे नाहि..

कवि ग्रेस यांना वयक्तीक एकटे भेटण्याची वेळ येणार होती असे वाटत असतानाच कवितेपासुन दुरावलो गेलो आणि माझ्या लाडक्या कविला नागपुरात जाऊन भेटणे जमले नाही..

ही दु:खद बातमी वाचुन डोळ्यात पाणी आले..

" मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फ़ूल"
------ ग्रेस

बाकी अजुन काय लिहु .. मिस यु माय डिअर ग्रेस.

यकु's picture

26 Mar 2012 - 1:41 pm | यकु

वाईट झाले.
:(

प्रशु's picture

26 Mar 2012 - 1:53 pm | प्रशु

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ग्रेसजी तुमच्या कवीता नेहमी मराठीजनांच्या मनात गुंजी घालत राहतील, तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली...

अरुण मनोहर's picture

26 Mar 2012 - 3:14 pm | अरुण मनोहर

ह्या महाकविला विनम्र श्रद्धांजली. लिहायला अधिक काही शब्दच सुचत नाहियेत.

देविदस्खोत's picture

26 Mar 2012 - 3:39 pm | देविदस्खोत

ही बातमी वाचून मन एकदम सुन्न सुन्न झाले. सर्वत्र निस्तःब्धता पसरली. या " महाकवी" ला माझी भावपूर्ण विनम्र श्रध्दांजली......................!!!!!!!!!!!!!!!!

सस्नेह's picture

26 Mar 2012 - 3:45 pm | सस्नेह

मराठी मायबोलीच्या सुवर्णकाळाचा आणखी एक भागीदार हरपला...
कवी ग्रेस याना ही शब्दांजलीची श्रद्धांजली...!

सांजसंध्याजी , लेख वाचुन डोळे पाणावले.
ग्रेस हे खरच फार मोठ कवितेच विद्यापीठ होते.

राजघराणं's picture

26 Mar 2012 - 6:47 pm | राजघराणं

त्यांच काव्य कळण्याएव्हढी बुद्धी मजपाशी नाही. प्ण श्रद्धांजली

चाणक्य's picture

27 Mar 2012 - 1:32 am | चाणक्य

+१
असेच म्हणतो

अर्धवटराव's picture

28 Mar 2012 - 2:14 am | अर्धवटराव

त्यांचे काव्य कळणारे मन माझ्यापाशी नाहि... मला महान वाटणार्‍या लोकांना ग्रेस महान वाटतात, तेंव्हा आंधळ्या श्रद्धेचा दोष पत्करुन ग्रेस नक्कीच महान असणार ही खात्री
|| श्रद्धांजली ||

अर्धवटराव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Mar 2012 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चटका लावणारं लेखन.

ग्रेस गेले असं वाटत नाही. एक गोष्ट खरी आहे की, ग्रेस नेहमीच साहित्याचे, साहित्यिकांचे आणि हौशी वाचकांच्याही नेहमी चर्चेतलेच म्हणावे लागतील. ’ ग्रेसची कविता काही कळत नाही’ ’ग्रेस यांचं बोलणंही तसंच’ कविता वाचायला लागल्यावर पहिल्या शब्दापासून शेवट झाला तरी कवितेत काही तरी असलेलं अनेकांना गवसत नाही. समजलं समजलं असं म्हणावं आणि ओंजळीतल्या सुटलेल्या पाण्याप्रमाणे अर्थही तसाच सुटून जावा. कविता वाचनानंतरची ही अवस्था. प्रचंड असं शब्दसामर्थ्य. कोणत्या तरी अज्ञात जगाचा अद्भूत माणसाने शब्द सामर्थ्याने चालवलेला शोध. आपण वाचकांना त्याचा काहीच थांगपत्ता नाही. कवी भावकवी आहे. त्याचं नेमकं स्वरुप कसं आहे, तेही सांगता येत नाही. पण, अनेक अभ्यासक, जाणकार म्हणतात तसं त्यांची कविता दु:खानुभव व्यक्त करते. अनिवार्य उदासीची ती कविता आहे. दु:ख आणि मरणाची ती एक मोठी गाथा आहे. असं काय नी किती. ग्रेस यांच्या लेखनातून आपणच शोधत राहावा एकटेपणा, ठसठसणा-या जागा. कवितेतील प्रतिमाही अशा की, एकावर बोट ठेवावं तर दुसरंच काही तरी हाताला लागतं. धुके, शिल्प, द‍र्‍या, पिंपळ पान, असं काय नी किती. जुन्या वृत्तांचा अतिशय सफाईनं वापर करणारा एक कुशल कारागीर. कुठलं सौंदर्य कुठे व्यक्त होतंय कसलाच थांगपत्ता नाही. आम्हा वाचकांना आपल्याला खरं समजून घेता आलं नाही.

दै. सकाळमधील लेख खूप छान होता. आता जालावर सापडेना. पण शोधता-शोधता एक सुंदर मनोगत ’सूर्य बुडे ऊन ढळे’ सापडलं. आता अजून काहीच बोलवत नाही.

-दिलीप बिरुटे

लिंकबद्दल थँक्यू सर!

||| मी इथे, श्री. हृदयनाथ मंगेशकर यांच्या तीर्थरूपांच्या नावे उभारण्यात आलेल्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळात गेल्या अडीच महिन्यांपासून वास्तव्याला आहे. (For my second, divine promotion of cancer ! हे मुद्दाम अधोरेखित करून सांगण्याचे कारण असे की, मंगेशकर या शब्दोच्चाराचा लहरकंप समग्र भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनात कायमचा लहरत-बहरत असतो, आणि आपले वर्तमानपत्र हृदयनाथांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने त्यांच्यावर खास विभागाची एक पुरवणी काढत आहे, त्याचे आमंत्रण आपण दूरध्वनीवरून मला दिलेत, त्याबद्दल मी आपला खरोखरच आभारी आहे. ‘खरोखरच’ म्हणण्याचे कारण असे की, आपण बहुधा नेहमीच खोटय़ा भावना व्यक्त करीत नाही, पण बहुतेक वेळी आपले सगळे वागणे-बोलणे हे उच्चाराच्या गौरवाने सतत वाकलेले असते, किंवा भारावलेले तरी असते. उच्चारांच्या या भारावलेपणात, वाकलेपणात, एखाद्या नेकीच्या सृजनशील जिवाचा अनेकदा कोंडमारा होतो. म्हणून मी हेतुपुरस्सर खरोखरच आपले आभार मानतो आहे. स्वत:कडे वेगळी भूषणाची भूमिका घेऊन, इतरांना दूषण देण्याचा अजिबात हेतू नाही. |||

हे फार आवडलं..

योगप्रभू's picture

26 Mar 2012 - 6:58 pm | योगप्रभू

'चर्चबेल' चा नाद ऐकत 'मितवा' 'सांध्यपर्वातील वैष्णवी'चा हात धरुन 'चंद्रमाधवीच्या प्रदेशात' निघून गेला.
आता काय म्हणायचं?

वार्‍यानं हलतं रान, तुझे सुनसान, ह्रदय गहिवरले.

तिमा's picture

26 Mar 2012 - 7:38 pm | तिमा

त्यांच्या सर्वच कविता काही मला समजल्या नाहीत, पण ज्या काही ,माझ्या साहित्यिक मित्रांनी समजावून दिल्या, त्या अप्रतिम होत्या.
थोर कलावंतांचे महत्व जगाला त्यांच्या पश्चातच समजते.
श्रद्धांजली !

प्रभाकर पेठकर's picture

26 Mar 2012 - 8:19 pm | प्रभाकर पेठकर

गेली अनेक वर्षे परदेशात वास्तव्यास असल्या कारणाने मराठी साहित्याचा म्हणावातितका जवळून संबंध येत नाही.
कवी ग्रेस ह्यांची 'ती गेली तेंव्हा..' ही कविता आणि 'अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे' हे त्याच कवितेतील, मात्रूवियोगानंतरचे, वाक्य अक्षरशः अंगावर येते.

गेली ती प्रतिभा. अनंतात विलीन झाली. त्यांचे शेवटचे क्षण शांततेत गेले असतील अशी आशा करतो.

अलभ्य फुलला सखे घनवसंत हा मोगरा
विनम्र लपवू कुठे ह्र्दयस्पंदनाचा झरा

उन्हात मन शिंपिले पळसपेटला पारवा
कुडीत जळतो जसा मरणचंदणाचा दिवा

कुशीत जड अस्थिला नितळ पालवीची स्पृहा
भयाण मज वाटतो रुधिर अस्त गांधार हा

उदास भयस्वप्न की समिर येथला कोवळा
गळ्यात मग माझिया सहज घातला तू गळा

सुगंध दडवू कुठे गगन वैरिणीचे वरी
तुडुंब भरले तुवा कलश अमृताचे घरी

जळात जरी नागवी सलग इंद्रियांची दिठी
विभक्त जणु कुंतिला शरण कर्ण ये शेवटी
- ग्रेस

एका प्रतिभावंत महाकवीला विनम्र आदरांजली _

स्पंदना's picture

27 Mar 2012 - 4:45 am | स्पंदना

सांजसंध्या परिपुर्ण लेख अन प्रतिसाद सुद्धा ..

दु:ख तर आहेच पण त्यांचा ठेवा आपल्यापाशी सदोदित राहिल. आज्च्या उद्याच्या पिढीला अंतर्मुख करित राहिल.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2012 - 7:16 am | अत्रुप्त आत्मा

ग्रेस माझ्या रक्तात भिनत गेले,ते शब्दवेध,पुणे या संस्थेनी (साधारण १० वर्षांपूर्वी) त्यांच्या साजणवेळा या कॅसेटच्या प्रकाशनाचा सोहळा आयोजित केला होता,त्या दिवसापासुन...त्या अधी मी सर्वसामान्यतः ग्रेसांची जी प्रसिद्ध झालेली गीतं होती,तेवढ्यावरच थांबलेलो होतो.त्या दिवशी आमचं सगळं ग्रेस प्रेमी मित्र मंडळ संध्याकाळी ६वाजल्यापासुन भरत नाट्यच्या बाहेर ठिय्या देऊन उभं होतं,कारण ग्रेस स्वतः भेटणार,दिसणार,ऐकायला मिळणार म्हणुन...! तेवढ्यात हवेत गारवा येऊन पावसाला सुरवात झाली...(आंम्ही लाइटाभावीभरत-ची-व्यवस्था माहित असल्यामुळे मनातुन खिन्न झालो होतो) पण आमच्या एका मित्रानी हि परिस्थिती म्हणजे,काहिही चिंतेचं कारण नसुन उलट पाऊस आहे म्हणजे आज ग्रेस आणखि खुलणार असं भाकित वर्तवलं..आणी पुढे घडलंही तसच...

ग्रेस आणी (बहुतेक आनंद मोडक) हे दोघेही त्या पावसात चक्क रिक्षानी भरतच्या दारात उतरलेले पाहुन आंम्हालाही थोडसं आश्चर्य वाटल...त्यावर आमचा एक नागपुर-ग्रेस-सहवासी मित्र त्यांच्या साधेपणा बद्दल बोलला,त्यानी आंम्ही अजुन भारावलो. ठरल्यावेळी ७वाजता कार्यक्रम सुरु झाला...चंद्रकांत काळे निवेदक,माधुरी पुरंदरे आणी मुकुंद फणसळकर हे दोघे गायक,आणी काहि वादक मंडळी असा मंचावर हिशोबी मामला होता.आणी त्यात आनंद म्हणजे, हार/तुरे/भाषण असल्या परंपरागत पद्धतींना पूर्ण फाटा देऊन सरळ विषयाला सुरवात झाली...(हीच प्रथा अश्या सगळ्या कार्यक्रमात पडायला हवी...) ग्रेस बोलायला उभे राहिले,त्यांच्या संथ भावपूर्ण लायीत पुढे आंम्ही ऐकु लागलो... पहिली काहि मिनिटं काव्य आणी रसिकांची बांधिलकी या वर अतिशय मौलिक विवेचन झालं आणी नंतर आमच्या मित्राची भविष्यवाणी खरी ठरली...पाऊस या एका विषयाला वाहुन घेतल्यासारखे त्या दिवशी ग्रेस जे काहि बोलले,जणु वीज त्यांच्या वाणीमधुन उतरावी असा भास होत होता. आंम्ही मंत्रमुग्ध..शांत...स्तब्ध अश्या सग़ळ्या अवस्थांमधुन जात होतो...

मग पुढे काळे,पुरंदरे,फणसळकर या त्रयीनी कार्यक्रमही असा काही रंगवला, की त्या दिवशी मध्यंतरही आंम्हाला अनावश्यक रुढीसारखं वाटलं...कार्यक्रम झाला आणी एका खर्‍या सत्संगाचा लाभ घडुन आंम्ही सर्व मित्रमंडळी पुन्हा आपापल्या मुक्कामी मार्गस्थ झालो...