अमृतानुभव

अन्या दातार's picture
अन्या दातार in जनातलं, मनातलं
1 Mar 2012 - 2:54 pm

(पूर्वप्रकाशित)

स्प्रिंग फेस्टचा पहिला दिवस. सकाळपासूनच विविध वर्कशॉप्सची रेलचेल होती. सकाळी काही कुठे गेलो नव्हतो; पण संध्याकाळी मात्र "अनुभव"(फ्युजन संगीत मैफल) ला जायचेच असे ठरवले होते. दुपारी कॅमेरा घेऊनच बाहेर पडलो होतो.

कॉन्सर्टला पंडित विश्वमोहन भट येणार असल्याने त्याला माझ्या लेखी विशेष महत्त्व होते. संध्याकाळी ५ वाजता असणारी कॉन्सर्ट ६ वाजता चालू झाली. प्रचंड मोठ्ठी रांग बघून मला आत जायला मिळेल की नाही याची चिंता लागली होती. रांगेतच एक मित्र गाठ पडल्याने रांगेत मध्येच घुसणे शक्य झाले. (देवा, अशी किती पापे घडवणार आहेस तू माझ्या हातून???) प्रचंड गोंधळ, धक्काबुक्की यातून तावून सुलाखून आत घुसलो एकदाचा!! एक पायरी तरी पार पडली होती.

पडदा उघडला, आणि कर्मा बँडचे आगमन झाले. मी फोटो काढायच्या गडबडीत असल्याने कलाकारांची नावे नाही कळली. सर्वच कलाकार अत्यंत सुरेख परफोर्मर्स होते. भारतीय वाद्यांमध्ये तबला, घटम ही वाद्ये होती. पाश्चिमात्य वाद्यांमध्ये ड्रम, बेस गिटार, इलेक्ट्रिक व्हायोलीन आणि की बोर्ड ही वाद्ये होती. आणि त्यांच्याबरोबर होते आपल्या मोहन वीणे सह पंडित विश्वमोहन भट

कार्यक्रमाची सुरुवात यमन रागाने झाली. अत्यंत सुरेख अश्या "एरी आरी पिया बिन" या पारंपारिक बंदिशीने झाली. काय तो वाद्यमेळ! केवळ अप्रतिम. संध्याकाळची वेळ, मस्त थंडी आणि जोडीला यमन! अमृतानुभवाची हीच नांदी होती.

त्यानंतर राग झिंझोटी रागातील तुकडा सादर करण्यात आला. झिंझोटी बद्दल जास्त माहिती नाही त्यामुळे लिहिता येत नाहीये. आता याबद्दल काहीतरी श्रवण करावे लागेल.
या सगळ्यात वेळ कसा गेला ते कळतच नव्हते. यानंतर एक वेगळाच प्रयोग करण्यात आला. सहसा भैरवी राग शेवटी सादर केला जातो. यांनी भैरवीला मध्येच स्थान दिले. भैरवीतील "बाबुल मोरा नैहर छुटो जाये" हे बंदिशवजा गाणे सादर करण्यात आले. हे गाणे मी कुंदनलाल सैगलच्या स्ट्रीट सिंगर या चित्रपटात बघितले होते, ऐकले होते. अनेकदा ७२ आर पी एम च्या तबकडीवर सुद्धा ऐकले होते. त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. सैगलच्या आवाजातील गाणे आपल्याला http://www.youtube.com/watch?v=w_BmHDD8rSM इथे बघायला मिळेल.

इथे मात्र माझी थोडी निराशा झाली. सैगल, भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ही बंदिश ऐकून सवय असल्याने असेल कदाचित! शेवटी गांधीजींनी आफ्रिकेत आणि बिग ब्रदरच्या पंचतारांकित घरात शिल्पा शेट्टीने अनुभवलेला वर्णभेद एकच, पण मन हेलावते ते गांधीजींच्या अनुभवानेच. तसेच काहीसे मला वाटले. सैगल पेटी घेऊन रस्त्यावरून फिरताना त्याची जी अगतिकता जाणवते ती मात्र इथे जाणवली नाही.

यानंतर वेळ होती अजून एका देखण्या अशा हंसध्वनी रागाची.

काहीही माहित नसूनही का कुणास ठावूक, हंसध्वनी राग मला फार आवडतो. पहिला सूर लावल्या लावल्याच लक्षात आले, की माझी आवडती "जा तोसे नाही बोलू कन्हैय्या" ही बंदिश सुरु होणार. देवाने द्यायला सुरुवात केली की झोळी फाटेस्तोवर देतो असं म्हणतात ते काही खोटे नाही. संपूर्ण दीड तास प्रचंड चांगले काहीतरी ऐकायला मिळावे हा सुद्धा त्यातलाच एक भाग.

मैफल संपली ती रघुपती राघव राजा राम या भजनाने. खरंच अप्रतिम भजन.ÿ
प्रसन्न मुद्रेतले पंडित विश्वमोहन भट स्वाक्षऱ्या देताना:

असा अमृतानुभव मिळायला खरंच भाग्य लागते का? हा प्रश्न मात्र माझ्याकरता अनुत्तरीतच आहे बर मित्रांनो. जर तुमच्यापैकी कुणाला गवसले असेल तर खरंच सांगाल ना मला.......

संगीतमौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

वपाडाव's picture

1 Mar 2012 - 3:45 pm | वपाडाव

असलं अमृत पिण्याचं पुण्य आम्ही कधी करणार कुणास ठाउक ??

मन१'s picture

1 Mar 2012 - 10:31 pm | मन१

+१

वा छान ! वर्णन आणखी थोडे लांब असते तर जास्ती छान वाटले असते. मला शास्त्रीय संगीतातले फारसे काही कळत नाही. पण ऐकायला आवडते. येत रहा...

जयवी's picture

1 Mar 2012 - 5:19 pm | जयवी

क्या बात है........ !!
खरंच अमृतानुभव..... !! हे फक्त अनुभवायचं असतं ना.... शब्दांमधे ते ऐश्वर्य कसं व्यक्त करणार ...... !!

आम्हाला असा अमृतानुभव कधीच मिळालेला नाही, मिळण्याची शक्यताही नाही. गाणी ऐकण्याच्या बाबतीत आम्ही करंटेच. आम्हाला कसली ती आवडच नाही.

पण तू छान लिहिलंस. असाच अमृतानुभव घेत रहा, यापुढेही मिळवत रहा.

मी-सौरभ's picture

1 Mar 2012 - 11:45 pm | मी-सौरभ

आम्हाला शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नाही. साध्या गाण्याच्या स्पर्धेत जे गाणं मला आवडतं त्याला परीक्षक 'म' देतात. :(
तेव्हा असले कार्यक्रम आपल्यासाठी नाहीत हे मी पक्कं लक्षात ठेवलं आहे.

रेवती's picture

1 Mar 2012 - 8:49 pm | रेवती

ग्रेट अनुभव.
लेखन आवडले.
पहिल्या छायाचित्राने वातावरण निर्मिती केली.

पैसा's picture

1 Mar 2012 - 9:43 pm | पैसा

तू असं लिखाण पण छान करतोस. फोटोंनी मूड मस्त पकडला आहे. तू खराच नशीबवान की तुला असला अनुभव मिळाला!

प्रचेतस's picture

1 Mar 2012 - 11:49 pm | प्रचेतस

+१
नशिबवानच आहे तो. अमृताचाच अनुभव मिळालाय ना त्याला.

सुहास..'s picture

2 Mar 2012 - 12:32 am | सुहास..

अन्या, यु लकी ...... ;)

बाबूल मोरा चा फॅन !!