महाविजेता निवडा...

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
23 Feb 2012 - 12:52 pm

प्रिय मित्र-मैत्रिणींनो, व्यास क्रिएशन आयोजित ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेत सर्वोत्तम अकरा निबंधामध्ये माझ्या निबंधाची निवड झाली असून त्याची लिंक पुढील प्रमाणे आहे. लिंक ओपन करून त्यावर “like” करावे तसेच फेसबुक वरील आपल्या इतर मित्रमंडळींसाठी “share” करावे.

http://www.facebook.com/photo.php?fbid=240088092745006&set=a.18315451177...

मनापासून धन्यवाद!
निबंध पुढे दिलेला आहे...

व्यवसायातील प्रगतीसाठी नाविन्य व सर्जकता यांची गरज...
जुने ते सोने असे जरी म्हटले जात असले तरी नवे ते प्रत्येकाला हवेच असते हे विसरून कसे चालेल? तद्वत एखादा व्यवसाय नव्या रुपात दिसू लागला की ग्राहक आकृष्ट होतातच. कारण नाविन्याची ओढ प्रत्येकालाच असते. प्रगती या शब्दातच गती असल्याने व्यवसायाला, व्यापार उदिमाला किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या धंद्याला ही गती नक्कीच प्रगती पथावर नेत असते. ही गती कोणती म्हणाल तर सर्जकतेची, नवनवीन कल्पना अमलांत आणण्याची, नव्या जमान्याची अपेक्षापूर्ती होऊ शकेल अशा नवीनतम गोष्टी अंगीकारून आपला व्यवसाय पेश करण्याची. व्यवसाय फलद्रूप तेव्हाच होईल जेव्हा तो गतिमान असेल, त्यात नविनतेची झाक असेल. थोडक्यात काय तर जुनी कात टाकून नवनवा सळाळता उत्साह अंगीकारला की व्यावसायिक प्रगती ही होणारच ठरली.
व्यवसाय कोणताही असो, त्यामध्ये कालानुरूप बदल करणे वा नाविन्याचा अंतर्भाव करणे हे क्रमप्राप्त असते. आजच्या सायबर युगात कोणतीही क्षणापूर्वीची कृती वा घटना नवी राहत नाही. क्षणात जुनी होते. काही सेकंदात अनेकांकडून पाहिली, अनुभवली जाते. त्यामुळे जो नवनवीन कल्पना लढवून आपला व्यवसाय जगापुढे घेऊन जाईल, नाविन्याच्या क्लृप्त्या योजून इतरांपुढे सादर करेल तोच स्पर्धेत टिकू शकतो हे त्रिवार सत्य आहे. काही उदाहरणावरून हे स्पष्ट करता येऊ शकेल-
साध्या किराणा दुकानाचं किंवा वाणसामानाच्या दुकानदारीचं उदाहरण सांगता येईल. पूर्वी कसं गावाच्या किंवा शहरातील ठराविक ठिकाणी उघडझाप करणाऱ्या उभ्या फळ्यांचं दार असलेलं हे वाण्याचं दुकान असे. तराजू काट्यात तोलून वाण सामान दिले जायचे. रद्दीच्या कागदात पुड्या बांधून माल विकला जाई. आज असं तेलकट मेणकट दुकान शहरात दिसत तर नाहीच, खेड्यातही नाही. या व्यवसायात कितीतरी नवनवे बदल होत जाऊन आजची मॉलसंस्कृती उभी राहिली आहे. तराजू जाऊन इलेक्ट्रिक वेट मशिन्स आल्या. त्यामुळे ग्राहकाला अचूक वजनाचा माल मिळू लागला. वर्तमानपत्राऐवजी कॅरीबॅग आल्या, पाऊच आले, पॅकिंगची नवी कला या व्यवसायाने आत्मसात केली. हे बदल वेळोवेळी अनुसरल्यामुळेच दुकानापासून मॉलपर्यंतची ही प्रगती शक्य झाली. ही सर्जकता वाखाणण्याजोगी आहे. स्वच्छता, टापटीप, सुटसुटीतपणा असणे हे मुलभूत नियम कुठल्याही व्यवसायाला लागू पडतातच. तरीही मॉलमध्ये असलेली भव्यदिव्यता अन् एकाच जागी सर्व किराणा माल, गृहोपयोगी वस्तू, विविध साधने, कपडेलत्ते उपलब्ध करून देण्याची नाविन्यता प्रशंसनीय आहे. आज जगणेही वेगवान झाले आहे. कुटुंबासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू दहा दुकाने फिरून खरेदी करत बसण्यात वेळ घालविण्यापेक्षा मॉलमधील ही ‘वनस्टॉप शॉपिंग’ अल्पावधीत लोकप्रिय झाल्याचे दिसून येते. आपला माल लक्ष वेधून घेईल असा प्रदर्शित करण्यासाठी योजिलेला चकचकीतपणा ग्राहकाला नक्कीच भावतो, भुरळ पाडतो. आत आलेल्या ग्राहकाची आपुलकीयुक्त चौकशी व मार्गदर्शन हे देखील हा मॉलचा व्यवसाय प्रगती पथावर नेण्याचा राजमार्ग ठरला आहे. आता जर पूर्वीसारखे जुनाट वाणसामानाचे दुकान कोणी उघण्याचे धाडस केले तर तिकडे कुत्रेही फिरकणार नाही अशी परिस्थिती आलीय!
ग्राहकांच्या आपल्या व्यवसायाकडून काय अपेक्षा आहेत, त्यांना कोणते बदल अपेक्षित आहेत याचा अभ्यास करून त्वरित त्याप्रमाणे नवीनता आपल्या व्यवसायात आणणे महत्वाचे ठरते. पूर्वी चौकात फटकूरं टाकून गिऱ्हाईकांची वाट पाहणारे नाभिक बंधू आपल्या परंपरागत व्यवसायात ग्राहकांना जे हवे आहेत ते बदल स्वीकारून त्यांनी आजमितीला दिसणारे मेन्स पार्लर, हेअर कटिंग सलून या प्रकारांत आपला व्यवसाय प्रगतीपथावर नेऊन ठेवला आहे. काही दशकांपूर्वीचा नाभिक व्यवसाय आता कितीतरी नाविन्य घेऊन समोर येत गेला आहे. त्यांनी योजिलेली सर्जकताच या कामी महत्वाची ठरली आहे.
तीच गोष्ट पूर्वापार चालत आलेल्या इतर बारा बलुतेदारांच्या व्यवसायाचीसुद्धा आहेच. लोहार, चांभार, सुतार यांचे पारंपारिक व्यवसाय अडगळीत जाऊन त्यांनी नवखे रूप धारण केलेले दिसते. बदलत्या काळानुसार हे व्यवसाय देखील किती बदलत गेले ते लक्षात घेण्याजोगे आहे. लोहारकाम आता फॅब्रिकेशन वर्क्स म्हणून गणले जाते. त्यात अंतर्भूत झालेल्या अनेक नवनव्या मशीन्समुळे खूपच सफाईदारपणा, अचूकपणा आलेला आढळून येतो. चर्मकारांचा व्यवसाय देखील आता नवे रूप घेऊन आलेला आहे. पूर्वी पायाचे माप देऊन जोडा शिवायला टाकावा लागे. आज हव्या त्या रंगाचे, हव्या त्या मापाचे जोडे घालून पाहता येतात, लगेच खरेदीदेखील करता येतात. पूर्वी फक्त चामड्याच्या असणाऱ्या वहाणा आज वेगवेगळ्या मटेरियल्स पासून बनविलेल्या आढळतात. ग्राहकाला सुखदायी होईल, आरामदायी वाटेल अशा चपलांची-बुटांची निर्मिती करून हा व्यवसाय वाढत गेला. सुतारकामाचे सुद्धा असेच आधुनिकीकरण झाल्याने तो व्यवसायसुद्धा नव्या रुपात प्रगती करीत आहे. पॅटर्नमेकिंग, इंटेरिअर डेकोरेटर, फर्निचर वर्क्स अशा नावांनी तो ओळखला जातो. फर्निचर बनविण्यासाठी नवनव्या मशिन्स व आधुनिक हत्यारांचा वापर सुरु झाल्याने कामामध्ये अचूक रेखीवता आणि वेगाने काम पूर्ण करून मिळण्याची हमी यांमुळे पारंपारिक सुतारकाम जवळजवळ कमीच झाले आहे.
वैद्यकीय व्यवसायाची भरभराट देखील त्यातील नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारल्यानेच होत आलीय. त्यामुळेच आपला भारतीय वैद्यकीय व्यवसाय ‘मेडिकल टुरिझम’साठी जगभरात वाखाणला जातो. परदेशी नागरिकांना माफक दरात उत्तम सेवा पुरविली गेल्यामुळे या व्यवसायाची जागतिक स्तरावर प्रशंसा केली जात आहे. देशाबाहेरून आलेल्या पेशंट्स लोकांना आपले भारतीय आदरातिथ्य भावते. योग्य ट्रीटमेंट, यथायोग्य दरात चांगल्या उपचारांची खात्री यांमुळेच ही प्रगती झालीय. परंपरागत चालत आलेल्या वैद्यकीय व्यवसायात कितीतरी छोटे मोठे बदल होऊन आजचा प्रगत तंत्रज्ञानाने व्याप्त व्यवसाय समोर आलेला आहे. बिनटाक्याच्या कित्येक शस्त्रक्रिया आज केल्या जातात. मोठमोठी ऑपरेशन्स आता कमी वेळेत अन् कमी त्रासाची होतात. नवनवीन शस्त्रक्रियांच्या पद्धतीचा वापर अंगीकारला जातो. नवीन उपचार पद्धती शोधून त्यानुरूप चिकित्सा-उपचार केले जातात. नवसंजीवनी प्राप्त व्हावी तसे स्वीकारार्ह बदल अनुसरून आजची प्रगती झाली आहे. म्हणजेच वैद्यकीय व्यवसायात सर्जकता व नाविन्य यांचा संगम झाल्यामुळेच ही प्रशंसनीय प्रगती झालेली आहे.
प्रकाशन व्यवसाय देखील आता जुनी वल्कले टाकून नाविण्याने बहरलेला दिसतो. सुबक व देखणी प्रिंटींग करता येऊ लागली आहे. नवनवे बदल स्वीकारून ई-पुस्तके, ई-प्रकाशन असे नाविन्य जपत हा व्यवसाय जागतिक स्वरुपात प्रकट झाला आहे. ई-बुक्स देखील आता खिशात मावू शकतील इतकी लहान आकारात उपलब्ध केली जातात. स्क्रीनवर स्क्रोल करून पाने उलटणे, हव्या त्या पानावर क्षणात जाता येणे, फोन्ट साईज वाचण्योग्य अशी कमीजास्त करता येणे इ.इ. कितीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग आज प्रकाशन व्यवसायाच्या प्रगतीच्या पथ्यावर पडले आहेत. आजच्या तरुणाईची नेमकी नाडी पकडून अनेक प्रकाशक आता ऑनलाईन पुस्तके प्रकाशित करण्याची सर्जकता दाखवितात. त्यामुळे वाचक वर्ग नक्कीच वाढला आहे. प्रकाशन व्यवसायाला पूर्वापार चालत आलेली छापील साहित्य संकल्पना बदलून दृश्य पुस्तकरचना करण्याची गरज अंगीकारणे अधिक फायद्याचे ठरणार आहे.
कुठल्याही व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोचविणे आजकाल खूपच महत्वाचे आहे. त्याचसाठी जाहिरातबाजी हा नवा व्यवसाय उदयास आला. अशी एकही गोष्ट वा वस्तू नाही जिची जाहिरात होत नाही. आपल्या व्यवसायाला पूरक ठरेल म्हणून आपल्या व्यवसायातील नाविन्याची जाहिरात वारंवार केली जाते. जाहिरातबाजीचा व्यवसायसुद्धा असाच फोफावला आहे, प्रगती साधून वाढला आहे. काही दशकांपूर्वी भिंती रंगवून जाहिरात केली जायची. त्यात अमुलाग्र बदल होत गेले. नवनवीन शोधांचा यशस्वी वापर करून वेगवेगळी प्रसारमाध्यमे, फ्लेक्स, होर्डिंग्ज, साईनबोर्ड, पाल्मप्लेट्स, मोबाईलवर एसएम्एस देऊन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जाहिरातबाजी केली जाते. दररोज त्यात नाविन्याची भरच पडते आहे. इंटरनेटच्या मार्गाने कशाचीही जाहिरात एका सेकंदात जगाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यात पोहचू शकते. या व्यवसायातील नवीनता टिकून आहे म्हणूनच ही प्रगती साधली जात आहे.
म्हणूनच प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायात नवनवे बदल घडवून त्याचा यशस्वी अन् प्रभावी वापर केला तर व्यावसायिक प्रगती निश्चितच होईल यात दुमत असण्याचे कारण नाही.

साहित्यिकशुभेच्छामदत

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

23 Feb 2012 - 1:00 pm | चिरोटा

अभिनंदन. आता पार्टी पाहिजे.

पप्पु अंकल's picture

23 Feb 2012 - 1:07 pm | पप्पु अंकल

अभिनंदन ..लिहते रहा.

रणजित चितळे's picture

23 Feb 2012 - 3:09 pm | रणजित चितळे

शुभेच्छा

यकु's picture

23 Feb 2012 - 3:11 pm | यकु

अभिनंदन..डॉकसायेब अभिनंदन..
या स्पर्धेत जालावरच्या बर्‍याच दिग्गजांनी भाग घेतलेला दिसतोय..

आत्मशून्य's picture

23 Feb 2012 - 3:13 pm | आत्मशून्य

.

पिंगू's picture

23 Feb 2012 - 3:25 pm | पिंगू

अभिनंदन डॉक्टर..

- पिंगू

स्वातीविशु's picture

23 Feb 2012 - 5:00 pm | स्वातीविशु

अभिनंदन.

वपाडाव's picture

23 Feb 2012 - 5:04 pm | वपाडाव

चान.. चान...

पैसा's picture

23 Feb 2012 - 5:27 pm | पैसा

निबंध खरोखरच आवडल्यामुळे "लाईक" करण्यात येईल.