रवी चतुर्वेदी आता पद्मश्री !

चैतन्य गौरान्गप्रभु's picture
चैतन्य गौरान्गप्रभु in जनातलं, मनातलं
15 Feb 2012 - 11:37 pm

सकाळी चार वाजता उठून भारत आणि ऑस्ट्रेलीयाची कसोटी पाहणा-या क्रिकेट चाहत्यांचा या वेळी चांगलाच हेटा झाला. वाईटातल्या वाईट पद्धतीने कसं हरावं याचा नमुनाच भारताच्या संघाने यंदा सादर केला. मात्र ऑस्ट्रेलीयामधील पहाटे उठून पाहिलेले सामने असोत किंवा वेस्ट ईंडिजमधले रात्री जागुन पाहिलेले क्रिकेट असो, ती मजा, ते थ्रील काहीतरी वेगळंच असतं. पुर्वी भारताबाहेरील सामन्यांसाठी रेडिओवर अवलंबुन रहावं लागायचं. "धूप खिली हुई और दर्शकोंमें उत्साह" या वाक्यापाठोपाठ येणारा हजारो प्रेक्षकांचा आवाज असो, किंवा "... अगली गेंद...ऑफइस्टंप के काफी बाहर.. और बहोsssतही उम्मदा तरीकेसे ये खेल दिया है कव्हर्स क्षेत्रमेंसेचार्रर्रर्रर्रर्रन..." या वाक्याबरोबर चेह-यावर आपोआप येणारं स्मीत असो; रेडिओ कॉमेन्ट्रीच्या माध्यमातुन मैदानावरचा अवघा खेळ आपल्या डोळ्यांसमोर मांडण्याचं सामर्थ्य या समालोचकांकडे असायचं. हिंदीतील क्रिकेट समालोचनाचा श्रीगणेशा करणा-या रवी चतुर्वेदी यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार घोषित करून भारत सरकारने जनतेच्या क्रिकेटप्रेमाची पावतीच दिली आहे.
चाळीस वर्षांपुर्वीच्या अश्याच फ्रेब्रुवारी महिन्यातील थंडिमध्ये दिल्ली-मुंबई रणजी सामन्यात "नमश्कार - दिल्लीके फिरोजशाह कोटला मैदान से मैं रवि चतुर्वेदी .... " अशी सुरूवात करून क्रिकेटप्रेमींच्या हृदयाची धडकन वाढवणारे रवीजी आता ७४ वर्षांचे झाले आहेत. क्रिकेटवर २० पुस्तकं, त्यापैकी १५ ईंग्रजीमध्ये लिहून झालीत. सुनिल गावस्करपासुन ते सचिन तेंडूलकरपर्यंत सगळ्यांचे लाडके 'पंडितजी' म्हणजे 'अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हे उससे मिलाने की कोशिश में लग जाती है' या सुप्रसिद्ध वाक्याचं 'जीता जागता उदाहरण' आहेत.
लखनऊ शहराच्या गल्ली बोळांमध्ये खेळत-बागडत बालपण गेलं. क्रिकेटचा मागमुसही तेव्हा लागला नव्हता. मात्र पाच वर्षाचा असतांना वडिलांची बदली दिल्लीला झाली आणि मॉल रोड वरील नव्या घरात गृहप्रवेश केला. नवं शहर आणि नव्या घराबरोबरच लहानग्या रवीला क्रिकेट हा नवा खेळही माहिती झाला. क्रिकेटचं वेड मग ईतकं वाढलं की आयुष्यात क्रिकेटविरच व्हायचं हा निर्णय शाळेत जाताच बोलून दाखवला. शाळेच्या क्रिकेट टिममध्ये, त्यानंतर कॉलेज आणि मग दिल्ली विद्यापिठाच्या टिममध्ये देखील तो खेळला. रणजी खेळाडू व्हायचं त्याचं स्वप्न मात्र अपुरं राहिलं.
याचं कारण म्हणजे पालकांची ईच्छा त्याने अभ्यासाकडे लक्ष द्यावं, अशी होती. आतासारखं ग्लॅमर आणि पैसा त्या काळी क्रिकेटमध्ये नव्हता. त्यामुळे क्रिकेटर हे करिअरही असु शकते, असा विचार कोणता मध्यमवर्गीय, नोकरीपेशा आणि रिटायर्डमेन्टला आलेला बाप करेल? घरच्या लोकांनी बजावून ठेवल्याप्रमाणे मग जीवशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. रवीने जीवशास्त्राच्या परिक्षेतही भरघोस यश मिळवलं. दिल्लीलाच डॉक्टर झाकिर हुसैन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणुन नोकरी मिळावी ईतकं भरघोस! मात्र कॉलेजमध्ये जीवशास्त्र शिकवणा-या या प्राध्यापकाचा जीव मात्र क्रिकेट्मध्येच अडकलेला.
तो जमाना रेडिओचा होता. ईंग्रजी समालोचन ऐकत क्रिकेटचा आनंद घेत असतांना सहज म्हणुन आपणही समालोचकच का होवू शकत नाही? असा विचार डॉ रवींच्या मनात आला. समालोचन शिकवणारी अशी काही विद्यापिठं तेव्हा नव्हती. आतासारखं कुठल्याही सामन्याचं समालोचन युट्युबवर क्षणार्धात मिळेल अशी सोयही नव्हती. मग ईंग्रजी वर्तमानपत्रांतील क्रिकेटविषयक लेख आणि बातम्यांचं वाचन सुरू झालं. त्या काळात क्रिकेटवर लिहणारे अनेक राजे लोक होते. टाईम्स ऑफ ईंडियाचे आर श्रीमन आणि ज्येष्ट्य क्रिडा समिक्षक के गोपालकृष्णन हे त्यांपैकीच. रवीजींनी त्यांच्याशी ओळख वाढवली. आजही या दोघांनाच ते आपला गुरू मानतात.
आताच्या काळातली निवृत्त खेळाडूंनी क्रिडा समिक्षण आणि समालोचन करण्याची पद्धत तेव्हा नवी होती. क्रिडा पत्रकार, समिक्षक, जाणकार यांच्या सान्नीध्यात राहून, पुस्तकं वाचून रवीजींनी आपला अभ्यास आपणच सुरू केला. दरम्यानच्या काळात दिल्ली दूरदर्शनवर ईंग्रजी समालोचकाची ऑडिशनही दिली. ऑडिशन छान झाली असली, तरीही नशिबाने त्यांच्यासाठी वेगळंच पॅकॅज तयार करून ठेवलं होतं.
१९६० मध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे हिंदीत समालोचन करण्याचे धोरण राबवले. नुकतेच ऑडिशन देऊन गेलेले रवी चतुर्वेदी यांचं हिंदीवरील प्रभुत्त्वही दूरदर्शनचे निर्माते मधू मालती आणि आकाशवाणीचे संचालक आर एन दास यांनी पाहिलं होतं. 'या क्षेत्रात नवीन काहीतरी करून अधीक काळपर्यंत ईनिंग खेळायची असेल, तर हिंदी समालोचनाची जबाबदारी स्विकारा. आम्ही हवी ती सगळी मद्त करतो,' असा सल्ला या दोघांकडून मिळाला आणि रवी चतुर्वेदिंनी हिंदी समालोचनाचा श्रीगणेशा केला.
क्रिकेट खेळलेले असल्यामुळे त्यातील लहानसहान गोष्टी, संज्ञा, नियमावली, आणि ब-याच खेळाडुंचे रेकॉर्डस त्यांना तोंडपाठ होते. आपल्या या ज्ञानाचा पुरेपुर लाभ उचलत त्यांनी हिंदी समालोचनाच्या क्षेत्रात वाटचाल सुरू केली. अनेक शब्दांना हिंदी प्रतिशब्द शोधले, नव्या संज्ञा. एक नवा अध्यायच सुरू झाला. 'दर्शकोमे काफी उत्साह', 'और ये लगा सिक्सर' ईत्यादींसारख्या त्यांच्या वाक्यांचे पुढे वाक्प्रचार झाले.
हिंदी साहित्य आणि कवीतांचा केलेला अभ्यास, वाचन आता त्यांना व्यक्त होण्यासाठी महत्त्वाचा ठरू लागला. सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे क्रिकेटचं वेड! त्यांच्या उत्साहातून अनेकदा हिंदी भाषेलाच नवे असे शब्द आणि उदगार मिळाले. सिद्धूनी सिक्सर मारल्यावर "... ये छे रन और दर्शक आंदोलित" असं पुर्णतः नवीन 'एक्स्प्रेशन' देणारे चतुर्वेदी पहिलेच आणि एकमेवच!
सामान्य क्रिकेट रसिकांना समजेल आणि उमजेल अश्या भाषेमध्ये क्रिकेट येऊ लागल्यामुळे आता रेडिओच्या लोकप्रियतेतही कमालीची वाढ झाली. भारतातल्या सामन्यांचे प्रक्षेपण टिव्हीवरून होत असे, मात्र विदेशातील सामन्यांसाठी रेडिओ हे एकच माध्यम होते. एकंदर या क्षेत्रात एक नवं युग सुरू करण्याचं श्रेय चतुर्वेदिंना जातं. दरम्यानच्या काळात क्रिकेटला खुप जवळून पाहण्याची, अनेक खेळाडुंशी मैत्री करण्याची संधी त्यांना मिळाली. डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स, क्लाईव्ह लॉईड त्यांचे मित्र बनले. सुनिल गावस्कर त्यांना पंडितजी म्हणायचे, तर बिशनसिंग बेदींचे ते 'मान्यवर' होते.
आताच्या काळात सहज हाताशी उपलब्ध असलेल्या रेकॉर्डस, केवळ एका क्लीकवर प्राप्त होणारी खो-याने माहिती आणि ईतीहास या सगळ्यां सुवीधा तेव्हा नव्हत्या. अनेकदा समालोचकाला आपल्या उपजत क्षमता आणि अभ्यास यांच्या भरवश्यावर वेळ मारून न्यावी लागायची. रवीजींचं ईंग्रजीवरही तेवढंच प्रभुत्त्व असल्यामुळे त्यांनी अनेक ईंग्रजी समालोचकांशी संवाद साधून आपल्या समालोचनाला 'चार चांद' लावले. पुढे त्यांना डॉ. नरोत्तम पुरी, आकाश लाल ईत्यांदीसारखे सहकारी लाभले, आणि हिंदी समालोचनाने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
विदेशातील सामन्यांच्या निमित्ताने त्यांचं ईंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅरेबिअन बेटांसह अनेक देशविदेशांत फिरणं झालं. क्रिकेटची काशी असलेल्या लॉर्डसवर समालोचन करण्याची संधीही त्यांना लाभली. १९७६ च्या पोर्ट ऑफ स्पेन कसोटीमध्ये भारताने ४०० धावांचं अशक्य वाटणारं लक्ष्य पार करत विजय मिळवला, तेव्हाच्या सामन्यातील चतुर्वेदींच्या समालोचनाचं कौतुक पंतप्रधान ईंदिरा गांधींनी स्वतः केलं होतं. कॅरॅबिअनच्या वेगवेगळ्या बेटांना भेटी देत असतांना आलेल्या अनुभवांची प्रवासवर्णनं त्यांनी लिहली, आणि ती भारतापेक्षा वेस्ट ईंडिजमध्येच खुप लोकप्रिय झाली!
आपला काळ गाजवून झाल्यानंतर आता डॉ चतुर्वेदी क्रिकेट पाहण्यात, वाचण्यात आणि लिखाणात मग्न आहेत. समालोचकांच्या नव्या पिढीमध्ये क्रिकेटच्या ज्ञानाचा अभाव असल्याची खंत बाळगण्यापेक्षा मुळात भाषेचा आणि अभिव्यक्तीचा अभाव असल्याची खंत त्यांना अधिक जाणवते. टिव्हीमुळे मुळात समालोचनाचंच महत्त्व कमी झाल्याच्या या काळात आता हिंदी समालोचनाला तर उतरती कळाच लागली आहे. मात्र अश्यातही या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवणारे चतुर्वेदी अजुनही आशावादी आहेत. शेवटी राज्य असो किंवा नसो. राजा हा नेहमी राजाच असतो. नाही का?

क्रीडासमीक्षा

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

16 Feb 2012 - 12:09 am | अन्या दातार

पडद्यामागच्या माणसाची चांगली ओळख करुन दिली आहे.

चिंतामणी's picture

16 Feb 2012 - 12:35 am | चिंतामणी

दर्शकोसें खचाखच भरा हूआ स्टेडीयम.

असो.

लहानपणापासून ज्यामाणसाच्या आवाजात समालोचन ऐकले त्याबद्दली विस्तृत माहिती दिल्याबद्दल आभार.

>>>आताच्या काळात सहज हाताशी उपलब्ध असलेल्या रेकॉर्डस, केवळ एका क्लीकवर प्राप्त होणारी खो-याने माहिती आणि ईतीहास या सगळ्यां सुवीधा तेव्हा नव्हत्या. अनेकदा समालोचकाला आपल्या उपजत क्षमता आणि अभ्यास यांच्या भरवश्यावर वेळ मारून न्यावी लागायची. रवीजींचं ईंग्रजीवरही तेवढंच प्रभुत्त्व असल्यामुळे त्यांनी अनेक ईंग्रजी समालोचकांशी संवाद साधून आपल्या समालोचनाला 'चार चांद' लावले.

हे वर्णन सर्वात महत्वाचे.

पडणारा बॉल, बॅटस्मनची फटका मारताना होणारी हालचाल इत्यादी गोष्टी शब्दातुन डोळ्यासमोर उभ्याकरणा-या या महान समालोचकाला सलाम.

बालपणीचे दिवस आठवले.
टिव्ही नुकता नुकताच आला होता. पण आकाशवाणीच्या समालोचनाची ईतकी सवय लागली होती की चक्क दुरवाणीसंचाला मुका करुन आकशवाणीला बोलायची संधी दिली जात असे.
पंडीतजींचा करुन दिलेला परिचय आवडला.

क्रिकेटचं वेड वाढवणार्‍या एका चांगल्या समालोचकाची चांगली पुनःओळख, धन्यवाद!

'हिंदू' दैनिकामधलं हे त्यांचं प्रकाशचित्र, गॅरी सोबर्स बरोबर कॉमेंटेटर्स बॉक्स मध्ये:

हेच म्हणतो...
बाकि म.रा.वि.म. च्या क्रुपेने आम्हाला टिव्हि येऊन पण आजहि रेडिओचा आनंद लाभतो....:)

५० फक्त's picture

16 Feb 2012 - 11:02 am | ५० फक्त

सुंदर माहिती, धन्यवाद.

चतुरंग's picture

16 Feb 2012 - 7:03 pm | चतुरंग

रवी चतुर्वेदींचे अभिनंदन!
रेडीओची कामेंट्री ऐकतच मोठे झालो. आमच्याकडे जुना वाल्व रेडिओ होता त्यावर आवाज फार छान ऐकू येई.
मॅचेसला पहाटे किंवा रात्री उठून रेडिओला कान लावून बसणे आणि आवाज हळू कर रे म्हणून वडिलांकडून बोलून घेणे हे नियमित असे! ;)
"खिली हुई धूप. पिचपर हल्कीसी नमीं. गावसकर गार्ड लेते हुए नजर आ रहे हैं . गेंद मार्शल की हाथ में पॅवेलिअन की ओर से, और ये खेल शुरु!"
दुसरे एक आठवतात ते म्हणजे सुशील दोशी. यांचेही हिंदीवरील प्रभुत्व उच्चकोटीचे होते. "गेंद तेजीसे अंदरकी तरफ कट करके आयी, बल्ला और पॅड के बीचोबीचसे निकल गयी और ये क्लीन बोल्द!! बहोत ही उम्दा इनकटर था अँडी रॉबर्ट्सका!! वेस्टिंडीज के खिलाडियो में जल्लोश. और एकदूसरे की हथेली पे तालियां देते हुए अपनी सुपरिचित शैली में सब दिखाई दे रहें हैं!"
हिंदीतले कितीतरी शब्द हे मला कॉमेंटरीमुळे माहीत झाले.

-रंगा

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

16 Feb 2012 - 8:41 pm | चैतन्य गौरान्गप्रभु

सर्वाना मनापासुन धन्यवाद
मी हे लेखन नागपूरच्या एका छोट्याश्या मराठी पेपरसाठी करतो. त्यावर ईतक्या प्रतिक्रीया कधिच येत नाहीत. मिपाचा पहिलाच अनुभव खुप झकास राहिला. माझ्याकडे अजुनही बरेच (जवळपास ४०) असे लेख आहेत. हळूहळू ते पण पोस्ट करीनच. धन्यवाद!!!!