अवलिया विचारवंत - नरहर कुरुंदकर.

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
10 Feb 2012 - 8:35 pm

तीस वर्षापूर्वी एक प्रभावी वक्ता स्टेजवरच मरण पावला. तो मॅट्रीक पास झाला तेंव्हा त्याची पुस्तके बीए च्या अभ्यासक्रमासाठी लावली होती आणि बीए 'ना'पास झाला तेंव्हा एम ए चे विद्यार्थी त्याची पुस्तके अभ्यासत होते. त्यांची भाषणं जेव्हढी लोकांना चक्रावून टाकणारी असत तेव्हढाच त्यांचा म्रुत्यू ही होता. औरंगाबादेत भाषणाची सुरवात करताच रणांगणावरील योध्याप्रमाणे १० फेब्रूवारी १९८२ ला कुरुंदकर गुरुजी व्यासपिठावरच कोसळले. त्यावेळी त्यांच वय होतं पन्नास वर्ष. या उण्यापुर्या पन्नास वर्षात त्यांनी मानसशास्त्रापासून इतिहासापर्यंत विषयांचा अभ्यास केला, कलामिमांसेपासून राजकारणापर्यंत लेख लिहिले, आणी मनुस्म्रुतीपासून कुराणापर्यंत विषयांवर व्याख्याने दिली.

आपल्याकडची विचारवंत मंडळी सहसा अमुक जातीची, तमुक राजकीय विचारसरणीची किंवा एखाद्या नेत्याचे अनुयायी म्हणून ओळखली जातात. राजकीय विचारसरणीच्या बेड्या पायात ठोकूनच वैचारिक झेपा घेतल्या जातात. महाराष्ट्राच्या या वैचारिक काळोखात कुरुंदकर झगमगुन उठतात.

मनुस्म्रुतीवरच्या पुस्तकात ते लिहितात, मध्ययुगीन जगात सर्वच देशात विषमता होती. अमेरिका, युरोप ते अरबस्तानापर्यंतचा इतिहास गुलामिच्या आणी स्त्री छळाच्या काळ्या शाइने लिहिला आहे. पण ह्या गुलामिचे आपल्या धर्माने ज्या प्रमाणात समर्थन केलेले आहे, तेव्हढे जगाच्या पाठीवर कोठेही आढळणार नाही. कर्म करत रहा, फळ अत्ता मागू नकोस, पुढल्या जन्मी तुला ते मिळेलच. त्यानुसार तुझी जात ठरेल अन त्यावरून लायकी; ही धार्मीक शिकवण हिंदूना घातक ठरली. देशाला दुर्बल करणार्या . ह्या धार्मीक व्यव्स्थेचे समर्थक आजाही अस्तित्वात आहेत. ही कुरुंदकरांची खरी खंत होती. मनुस्म्रुतीत शुद्राला कर नाही असे मनुसमर्थक म्हणतात. पण त्याचवेळी शुद्राला धनसंचयाचा अधिकारच मनू देत नाही. तर तो कर भरणार कोठून ? अशा बाबी डोळ्याआड करतात. केवळ ग्रंथप्रामाण्यातून हे घडत नाही पण जातीचा दंभ मनूच्या उच्चवर्णीय समर्थकाना बौद्धीक गुलामगिरीत ढकलतो हे कुरुंदकर दाखवून देतात. परंपरेची बौद्धीक गुलामी अमान्य करणार्या उच्चवर्णीयांनाही मनू शूद्राचीच वागणूक देतो असे प्रतिपादून मनूच्या उच्चवर्णीय समर्थकानाही ते चक्रावून टाकतात.

सुभाषबाबूंचे आकलन करताना कुरुंदकर लिहितात - जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी . जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे. सुभाषबाबूंनी त्यांच्या आझाद हिंद रेडीओवरच्या भाषणातून गांधीचा उल्लेख राष्ट्रपिता असाच केला होता. बंगाल मधल्या दास पॅक्ट नुसार ५२ % मुसलमानाना ६०% जागा मिळणार होत्या आणी सुभाषबाबू ह्या करारात सामील होते हे पटवून देत कुरुंदकर सुभाषबाबूंचे मुस्लीम प्रेम दाखवून देतात. स्वतःला गांधीवादी म्हणवणारे कुरुंदकर महात्मा गांधीचे अमक्या विषयावरचे विचार साफ चूक आहेत असे म्हणायला कचरत नाहीत. फाळणीच्या वेळी गांधीजींनी मुस्लीमांचे लांगुलचालन केले होते असा आरोप हिंदुत्ववादी करतात. त्याला उत्तर देताना कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे हिंदुत्ववादी का विसरतात ?"
वाचकांच्या, श्रोत्यांच्या प्रस्थापित कल्पनांना तडाखे हाणत त्यांना संपूर्णतः नव्याने विचार करायला शिकवणे हे कुरुंदकरांचे वैशिष्ट्य होतेच. पण असे करताना कुरुंदकर अंगावर येत नाहीत. क्लिष्ट विषयांवर धक्कादायक भाष्ये करताना कुरुंदकरांची भाषा मार्मिक, प्रवाही तरी विचारप्रवर्तक अशी असते.

जमाते इस्लामी च्या संमेल्लनासमोर त्यांनी केलेले भाषण विशेष विचारप्रर्तक होते. जमलेल्या तमाम मौलवी, उलेमा आणी मुस्लीम श्रोतुसमुदायाला कुरुंदकर म्हणाले होते ''मी नास्तिक आहे. धार्मिक अर्थाने मी हिंदू नाही. पण मी मुसलमानही नाही. हे तुम्हाला मान्य आहे काय? एक मिनिट ... जगात चोर असतात हे वास्तव मान्य करण वेगळं आणी चोरांचा चोरी करण्याचा अधिकार मान्य करण वेगळं. मी मुसलमान नाही. पण माझा मुसलमान नसण्याचा हक्क तुम्हाला मान्य आहे काय ? अल्लाहने एकमेव सत्यधर्म सांगितला तो म्हणजे इस्लाम. अशी तुमची धारणा आहे. इतर सर्व घर्म अशुद्ध आहेत असे तुमचे म्हणणे आहे. त्या इतर धर्मीयांनी अल्लाचा धर्म स्वीकारलाच पाहिजे असा तुमचा आग्रह आहे मग माझ्यासारख्या नास्तिकाविषयी तर बोलायलाच नको !" मुस्लीम प्रश्न हा अल्पसंख्यांक प्रश्न नाही तर इतर धर्म खोटे आहेत या भुमिकेतुन तो जन्मला आहे असे कुरुंदकर म्हणतात. जमाते इस्लामी समोरचे भाषण मान्यतेच्या शांततेत पार पडते. पण कुरुंदकरांचे पुरोगामी मित्र चक्रावून जातात.

विनोबांना न पटणारा संत म्हणणारा हा गांधीवादी, इस्लाम धर्माची कठोर चिकीत्सा करणारा हिंदुत्ववाद्यांचा शत्रू आणि धर्मशास्त्रांचा नास्तिक प्रकांडपंडीत महाराष्ट्राला पुनःपुन्हा आठवावा लागणार आहे. त्यांनी ज्या प्रश्नांवर चिंतन केलं ते प्रश्न आजही ज्वलंत आहेत. यापुढेही रहाणार आहेत. बाबा आमटेंच्या कुरुंदकरांवरच्या ओळी आहेत :

वास्तवाच्या जाणीवांना वाचा यावी; तस बोलायचास
प्रज्ञेच्या दाहक हुंकारासारखा.

काळोख उजळत येणाऱ्या किरणांसारखा यायचा तुझा शब्द;
नीतीच्या वाटा प्रकाशत,आयुष्याचे अर्थ दाखवत.
त्यातून दिसायचे नवे प्रश्न नव्या दिशा;
कुणाला गवसायचा प्रकाश कुणाला संधी,

तर कुणाला सापडायचे ते स्वत:च.

साहित्यिकसमीक्षा

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

11 Feb 2012 - 12:06 am | अत्रुप्त आत्मा

व्वा व्वा...डॉक्टर धागा वाचण्या आधीच प्रतिक्रीया देतोय...एका खर्‍याखुर्‍या समाजवाद्याचे आणी चतुरस्र सयंत माणसाचे दर्शन म्हणजे नरहर कुरुंदकर... आपण तर कुरुंदकरांचा फ्यानच हाय बा... :-) धार्मिक/सामाजिक विषयातले खुप वाचन आजपर्यंत केले आहे..पण कुरुंदकरांची पुस्तकभेट जर मिळाली नसती,,,तर वाचलेले सर्व उपयोगात आणायची बुद्धी कुठुन मिळाली असती...? मला तर असं वाटतं की श्रावणात काहाण्या जश्या नेमानी वाचल्या जातात,,, व्रतं वैकल्य केली जातात तशी कुरुंदकरांची पुस्तकं लोकांनी धार्मिक ग्रंथासारखी वाचावी,वाटावी,ऐकवावी... इहलौकिक पुण्यसंचयाचा याच्या इतका दुसरा चांगला मार्ग नाही... आमच्यामते मेंदुला कुठल्याही परंपरावादाचा गंज चढू द्यायचा नसेल,तर कुरुंदकरांचे लेखन संग्रही असणे अनिवार्य आहे.... :-)

डॉक्टर,,,आता शिवरात्र आणी जागर यांचाही परिचय करवुन देणारे लेखन येऊ दे...

परिचय उत्तम पण अतिशय थोडक्यात वाटला.
कुरुंदकरांबद्दल अजूनही वाचायला नक्कीच आवडेल.

राजघराणं's picture

10 Feb 2012 - 9:03 pm | राजघराणं

लेख वर्तमानपत्रासाठी लिहिलाय. त्यामुळे शब्दमर्यादा पाळावी लागली. परत कधीतरी लिहीन सविस्तर.

सुनील's picture

10 Feb 2012 - 9:09 pm | सुनील

जरूर लिहा. लवकर लिहा.

शैलेन्द्र's picture

10 Feb 2012 - 8:58 pm | शैलेन्द्र

सुंदर... माझा अत्यंत आवडता विचारवंत...

शिवाजी ज्याल कळवुन घ्यायचाय, त्याने एकदा फक्त कुरुंद्करांचे शिवाजीवरचे लेख वाचावेत.. बाकी नाही वाचल तरी चालेल..

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2012 - 10:29 pm | अत्रुप्त आत्मा

+++++11111 टू शैलेंन्द्र

अतिशय सुरेख!
आणखीही येऊद्या कुरुंदकरांबद्दल.

दीपक साळुंके's picture

11 Feb 2012 - 1:47 am | दीपक साळुंके

कुरुंदकरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

तू कसलेली विचारांची शेतं, पहिली वहिली कणसं धरत होती.
अन् कणसाच्या कसदार दाण्यात, भरू लागलं होतं टचटचून दूध.
त्या दुधाच्या मुक्या हाळीनं, झेपावू लागले होते पाखरांचे थवे दाही दिशांनी... (पण)
विचारांच्या सुगीचे स्वप्न साकारत असतानाच कोसळलास.
- बाबा आमटे

काही अधिक माहितीपूर्ण दुवे -
१. नरहर कुरुंदकर डॉट कॉम
२. आचार्य नरहर कुरुंदकर
३. प्रा. सुरेश द्वादशीवारांचा कुरुंदकरांवरिल अप्रतिम लेख
४. कुरुंदकर नावाचे लोकविलक्षण रसायन
५. ‘आनंदाचे आवारु’ मांडणारे कुरुंदकर

मराठी_माणूस's picture

11 Feb 2012 - 10:51 am | मराठी_माणूस

प्रा. सुरेश द्वादशीवारांचा कुरुंदकरांवरिल अप्रतिम लेख

फारच छान व्यक्ती चित्रण . लिंक बद्दल धन्यवाद.

त्यातिल खालील वाक्य वाचुन खंत वाटली

एकदा यदुनाथ थत्ते म्हणाले, 'हा माणूस जपला पाहिजे.' यदुनाथ थत्त्यांना माणसे शोधण्याचा, जपण्याचा आणि प्रकाशात आणून फुलविण्याचा सोसच होता. एकदा ते म्हणाले, कुरुंदकरांसारखा माणूस परदेशात असता, तर लोकांनी त्याला विमान घेऊन दिले असते. आम्ही त्याला बसने, ट्रकने, मिळेल त्या वाहनाने व्याख्यानांना नेतो.

तसेच अंतर्मुख करायला लावणारे आणि परखड सत्य मांडणारे खालील वाक्य

आम्हाला विद्वत्तेचा आदर असतो. फक्त ती विद्वत्ता आम्हाला हवी तशी बोलावी अशी आमची मागणी असते. जोवर ती तशी बोलते तोवर आम्ही तिची महत्ता सांगणार. जेव्हा तिचे निष्कर्ष आमच्या आवडीतून वेगळे येतील तेव्हा ती प्रथम दुर्लक्षिणार आणि सोयीची नसेल तर आम्ही ती तुडविणार

सुनील's picture

11 Feb 2012 - 9:08 pm | सुनील

चांगले दुवे इथे दिल्याबद्दल आभार.

कुरंदकरांच्या विचारांचे काही करावे ह्या विचारने सतत बेचैन होणारा मी म्हणतो अखिल मिपा कुरुंदकर विचार मंच स्थापुया का ?

अत्रुप्त आत्मा's picture

11 Feb 2012 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा

विचार मंच>>> हम हाजिर है|

नितिन थत्ते's picture

11 Feb 2012 - 12:51 pm | नितिन थत्ते

सुरेख लेख.

माझ्या विचारसरणीवर कुरुंदकरांचा मोठा प्रभाव आहे.

राजघराणं's picture

11 Feb 2012 - 1:05 pm | राजघराणं

मी पण .. मी पण .. मी पण

तर्री's picture

11 Feb 2012 - 1:20 pm | तर्री

नरहर कुरुंदकर विचार मंच :-
१. राजघराणे
२. अ.आत्मा
३. तर्री

नावे झटपट नोंदवा.

राजघराणं's picture

11 Feb 2012 - 1:43 pm | राजघराणं

हा विषय खरड्फळ्यावर न्या

रमताराम's picture

11 Feb 2012 - 2:33 pm | रमताराम

आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे सायबानूं. एवढे कुरुंदकरप्रेमी एकदम भेटावेत म्हणजे पंढरीतच आल्यासारखे वाटले. राजघराणं यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

दीपकराव दुव्यांबद्दल आभार.
मराठी_माणूसः आमच्या दृष्टीने दुसरे अधोरेखित अधिक दुर्दैवी आहे. :(

कुरूंदकर या माणसाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत असे मी मानतो. कुरूंदकर वाचण्यापूर्वी आणि त्यानंतर अशा दोन कालखंडातील रमताराम सर्वस्वी वेगळे व्यक्तिमत्त्व आहे असे मी. 'लाईफ वॉजन्ट द सेम अगेन' असेच म्हणतो.

ता.क.: सर्व कुरूंदरकरप्रेमींना प्रत्यक्ष भेटण्याची तीव्र इच्छा आहे. या निमित्ताने विचार करण्याचा आळस नसलेल्या चार डोक्यांनी एकत्र आल्यास अधिक चांगले काही निर्माण होऊ शकेल.

नितिन थत्ते's picture

11 Feb 2012 - 2:42 pm | नितिन थत्ते

माझा हात वर आहे.

सुनील's picture

11 Feb 2012 - 9:11 pm | सुनील

कुरूंदकर या माणसाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत असे मी मानतो. कुरूंदकर वाचण्यापूर्वी आणि त्यानंतर अशा दोन कालखंडातील रमताराम सर्वस्वी वेगळे व्यक्तिमत्त्व आहे असे मी. 'लाईफ वॉजन्ट द सेम अगेन' असेच म्हणतो.
माझ्याही बाबतीत जवळपास असेच म्हणतो!

कुरूंदकर यांचे नाव फक्त ऐकले आहे, वाचले काहीच नाही. पण आता मिळवून वाचीन...
भेटणार असाल तर मी पण येतोय रे! ररा - तुझ्याकडून ह्यावर ऐकायला आवडेल! :-)

अप्पा जोगळेकर's picture

15 Feb 2012 - 8:05 pm | अप्पा जोगळेकर

सर्व कुरूंदरकरप्रेमींना प्रत्यक्ष भेटण्याची तीव्र इच्छा आहे.
यापेक्षा मी असं म्हणेन की सर्व कुरुंदकरप्रेमींनी त्यांनी वाचलेल्या कुरुंदकरांच्या लेखांचे विवेचन मिसळपाव वर पोस्ट करत जावे. संभाषणापेक्षा वाचन माणसाला अधिक अंतर्मुख करते असे वैयक्तिक मत आहे.

राजघराणं's picture

11 Feb 2012 - 2:59 pm | राजघराणं

उद्या चालेल ?

रमताराम's picture

11 Feb 2012 - 3:03 pm | रमताराम

फिरस्ता क्र. वगैरे तपशील व्य. नि. करतो आहे.

पैसा's picture

12 Feb 2012 - 11:45 am | पैसा

आणि उत्तम चर्चा वाचायला मिळते आहे. दीपक साळुंके यांना उत्तम दुव्यांबद्दल धन्यवाद!

प्रकाश घाटपांडे's picture

15 Feb 2012 - 1:05 pm | प्रकाश घाटपांडे

वर्तमानपत्रांची मर्यादा लक्षात घेता. त्यांना एडिटून छापणे भाग आहे. आजच वाचला व हेच लिहिणार होतो.

विकास's picture

15 Feb 2012 - 6:11 pm | विकास

लेख आवडला. येथे त्याचा विस्तार जरूर करावा.

कुरंदकरांच्या लेखनाचा मी पंखा आहे. खूप अभ्यासू आणि विचार करायला लावणारे लेखन इतकाच त्यांच्या लेखनाचा गाभा नसून त्यांना जे काही भावले ते परखडपणे मांडायचा प्रामाणिकपणा देखील त्यांनी दाखवला. जागर सारख्या पुस्तकातील त्यांचे विचार वाचताना ते अधिक जाणवते. स्वतः कम्युनिस्ट विचारसरणीचे असले तरी केवळ समोरचा कम्युनिस्ट म्हणून सरसकट मान्य आहे असे झालेले नाही. त्यांनी अगदी दामोदर कोसंबींवर लिहीलेल्या श्रद्धांजलीत्मक पण विशेष करून गीतेवरील विचारांच्या लेखात दिसून आले आहे.

कुरंदकरांचे अकाली निधन हेच केवळ नुक्सान झाले नाही, तर त्यांचे लेखन हे कधी नंतर जनमानसात हवे तसे पोचले नाही ही देखील खंत वाटते.

दीपक साळुंके's picture

15 Feb 2012 - 11:47 pm | दीपक साळुंके

स्वतः कम्युनिस्ट विचारसरणीचे असले तरी ...

कुरुंदकर हे कम्युनिस्ट विचारसरणीचे नव्हते. डाव्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता असे म्हणता येईल. इतिहासाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी मार्क्सवादी पद्धतीची होती. कुठल्याही एका विचारसरणीच्या चौकटीत बंदिस्त करता येईल असा हा माणूस नव्हता.

कुरंदकरांचे अकाली निधन हेच केवळ नुक्सान झाले नाही, तर त्यांचे लेखन हे कधी नंतर जनमानसात हवे तसे पोचले नाही ही देखील खंत वाटते.

पूर्णपणे सहमत !

मराठी_माणूस's picture

18 Feb 2012 - 11:36 am | मराठी_माणूस

कुरंदकरांचे अकाली निधन हेच केवळ नुक्सान झाले नाही, तर त्यांचे लेखन हे कधी नंतर जनमानसात हवे तसे पोचले नाही ही देखील खंत वाटते.

सहमत. ह्याचे कारण म्हणजे ते आंग्ल भाषेत नव्हते हे असेल का ?

अप्पा जोगळेकर's picture

15 Feb 2012 - 7:58 pm | अप्पा जोगळेकर

अतिशय उत्तम लिखाण. नरहर कुरुंदकरांबद्दल आणखीन वाचायला आवडेल.