विनोबा भावे-अती दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे हे ठेच लागण्याचे दोन उत्तम उपाय आहेत अध्यात्मातील वन लायनर्

कापूसकोन्ड्या's picture
कापूसकोन्ड्या in जनातलं, मनातलं
16 Jan 2012 - 11:44 pm

नमस्कार,
या आठवड्याच्या सुट्टीत इंटरेनेटवर लक्ष्मीबाई टिळक आणि प्रभाकर माचवे यांचे काही लिखाण शोधत असताना, अचानक हाती घबाड सापडले. ओस्मानिया विद्यापीठ च्या साईटवर बरीच मराठी पुस्तके डिजिटल स्वरूपात ठेवली आहेत. त्यात माझ्या आवडीच्या लेखकांपैकी विनोबा भावे यांचा १९४६ सालात प्रसिद्ध झालेला विचारपोथी नावाचा एक ग्रंथ सापडला. पुस्तक प्रथम अधाशासारखे उतरवून घेतले. स्कॅन करून पिडिएफ केलेले असल्यामुळे समोर ठेवून स्वत: टंकलेखन केलेले आहे. टायपिंग च्या मर्यादेमुळे मला आवडलेले काही निवडक उतारे येथे देत आहे.
शिर्षक : विचार पोथी
लेखक :विनोबा भावे.
दुसरी आवृत्ति १९४६ ( प्रथम कधी प्रसिद्ध झाले ते माहीत नाही.)
विषय अर्थातच अध्यात्म.
एकूण ७३६ वाक्ये किंवा वचने
प्रस्तावनेत बाबा लिहीतात.--हे विचार सुभाषिता सारखे नाहीत सुभाषिताला आकार लागतो हे जवळजवळ निराकार आहेत.
इंग्रजी मध्ये वन लायनर प्रसिध्द आहेत. खालचा प्रकार त्या वन लायनर सारखाच आहे.
1. सत्तेचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, बळाचा अभिमान, रूपाचा अभिमान, कुळाचा अभिमान, विद्वतेचा अभिमान, अनुभवाचा अभिमान, कर्तुत्वाचा अभिमान, चारित्र्याचा अभिमान,हे अभिमानाचे नउ प्रकार आहेत. पण मला अभिमान नाही असे भासणे ह्यासारखा भयानक अभिमान नाही.
2. आई तु मला जे दिलेस ते कोणीच दिले नाही, पण तु मेल्यावर जे देत आहेस, ते तू ही जिवंतपणी दिले नाहीस. आत्म्याच्या अमरत्वाचा एवढाच पुरावा मला बस आहे.
3. आमची आई म्हणे, "देशे काले च पात्रे च हे एक थोतांड आहे. दयेने वागावे म्हणजे झाले." मी म्हणे, "अपात्री दान करण्यात दान घेणाऱ्याचे ही अकल्याण आहे." ह्या वर तीचे उत्तर ठरलेले होते, "पात्र-अपात्र आपण कोण ठरवणार? जो गरज मागायला आला तो परमेश्वरच असतो,"
4. गीता अनासक्ति सांगते. पण ईश्वरात आसक्त हो म्हणतेच.
5. छातीवर पिस्तूल रोखून धान्य लुबाडणे आणि सोन्याची मोहोर देउन ते विकत घेणे ह्यांत पुष्कळवेळा मुळीच फरक नसतो.
6. स्वधर्म सहजप्राप्त असतो. मुलाला दूध पाजण्याचा धर्म आई मनुस्म्रृतीतून शिकत नाही.
7. मला बाहेरून किती मिळाले आणि माझे स्वत:चे आतले किती, हे मी पाहतो तेंव्हा माझे स्वत:चे असे काही उरत नाही. ‘इदं न मम’ ही भावना करण्याचे मला काहीच कारण नाही.
8. धुमसत असताना प्रगट होऊ नये. पेटल्यावर दिसेलच.
9. स्वप्न म्हणजे झोपेत जागणे, आणि अनवधान म्हणजे जागृतीत निजणे, पुष्कळवेळा ही एकमेकांची कार्यकारणे असतात.
10. हिमालय उत्तरेस का आहे? मी त्याला उत्तरेस राहू दिले म्हणून. मी उद्या त्याच्या उत्तरेस जाऊन बसलो म्हणजे तो दक्षिणेकडे फेकला गेलाच की.
11. व्यासांनी विष्णु सहस्त्रनाम लिहीले त्यात आधी ॐकाराचा उच्चार केला आहे, ॐ हे विष्णु सहस्त्रनामाचे अतिसंक्षिप्त रूप आहे.
12. गायत्रीत व्यक्तीगत उपासनेचा मानेलेला आहे. पण ’धीमहि’ -आम्ही ध्यान करतो- हे बहुवचनी पद समुदायाचे सूचक आहे. ंहणजे गायत्री उपासना व्यक्तीने करावयाची आहे, पण ती आपल्या ठिकाणी सर्व समुदायाची-विश्वात्म्याची-कल्पना करून करायची आहे.
13. पाश्चात्य भाषेत ’संताचे अनुवर्तन’ असा प्रयोग आढळून येतो आपल्याकडे ’संताचे गुणगान’ म्हणतात. ’गुणगान’ म्हणण्यात नम्रता आहे पण त्यात ’अनुवर्तन’ गृहीत असेल तरच ती नम्रता शोभेल
14. कमीत कमी परिग्रहातून ज्यास्तीत ज्यास्त कस कसा काढावा हे अपरीग्रह शिकवतो.
15. वेदार्थ स्वच्छ समजत असेल, घटकाभर समाधी लागत असेल, नामस्मरणाने सात्विक भाव उमटत असतील म्हणून काय झाले? आचरणात उतरेल तेच खरे.
16. जीवनात भिती राखली म्हणजे मरण निर्भय होईल.
17. वेदात सहते या धातुचे दोन अर्थ आहेत; एक सहन करणे आणि दोन, जिंकणे. जो सहन करतो तोच जिंकतो.
18. नम्रता म्हनजे लवचिकपणा. लवचिकपणात तणावाची शक्ती आहे, जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकष्टा आहे.
19. अल्प श्रद्धेच्या माणसाला लोक परमार्थ पचनी पडू देत नाहीत, हा लोकांचा उपकार आहे.
20. निंदास्तुतींची वजाबाकी करणारा मनुष्य आपोआप मोकळा होतो.
21. दोन धर्माचा कधीही झगडा नसतो. सर्व धर्माचा अधर्माशी झगडा असतो.
22. अर्थ म्हणतो, ’हक्काचे रक्षण करणे हे कर्तव्य आहे’ धर्म म्हणतो, ’ कर्तव्य करीत राहणे हा हक्क आहे’.
23. पर म्हणजे दुसरा तसेच पर म्हणजे श्रेष्ठ. दुस~याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानून चालावे ही साधकाची मनोभूमिका.
24. संन्यास ही नोट आहे तर कर्मयोग हे नाणे आहे, किंमत एकच.
25. सर्वच प्रश्न सोडवून सुटणारे नसतात. काही प्रश्न सोडून दिले की सुटतात.
26. ’यथेच्छसि तथा कुरू’ असे सांगून पुनः ’मामेकं शरणं व्रज’ आहेच. स्वतंत्रतेने संयमाला वरावे ह्यात स्वारस्य आहे.
27. अंकुर केव्हा फुटावा हे पेरणा~याच्या हातापेक्षा गव्हाला अधिक समजते.
28. नेहमी अपयश येते ह्यात आश्र्चर्य नाही. यश म्हणजे समाप्ती. ती नेहमी कशी येईल? ती एकदाच यायची.
29. तू म्हणतोस-- प्रयोगावरून ठरले म्हणून पक्के. मी म्हणतो-- प्रयोगावरून ठरले म्हणूनच कच्चे.
30. “मला काय उपयोग? “असे न म्हणता "माझा काय उपयोग?" असे म्हणावे. म्हणजे उपयुक्ततावादाचे सार्थक होईल.
31. अती दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे हे ठेच लागण्याचे दोन उत्तम उपाय आहेत.
32. अभय दोन प्रकारचे असते. आपण कोणास न भिणे, आणि आपले कोणास भय न वाटणे. हे दुहेरी अभय आहे.
--
कापूसकोन्ड्या

संस्कृतीधर्मवाङ्मयसाहित्यिकमौजमजाप्रतिसादमाध्यमवेधमाहितीआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

17 Jan 2012 - 12:09 am | कवितानागेश

विनोबाजींची भगवद्गीतेवरील प्रवचने सुद्धा वाचनीय आहेत.
त्यात यातील बरेच विचार वाचले आहेत.

कापूसकोन्ड्या's picture

17 Jan 2012 - 12:17 am | कापूसकोन्ड्या

गीताई माउली माझी
तीचा मी बा़ळ नेणता
पडता रडता घेई उचलून कडेवरी--

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2012 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा

कापुसकोंड्या आवडला रे लेख... वाचनखुण साठवली गेली आहे.. :-)

कापूसकोन्ड्या's picture

17 Jan 2012 - 12:24 am | कापूसकोन्ड्या

कापूसकोन्ड्या त्याची गोष्ट सांगत रहणार.
आत्मा ऐकत राहणार अत्रुप्तच तो|
झ्याक जोडी जमली रे|

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2012 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा

@कापूसकोन्ड्या त्याची गोष्ट सांगत रहणार.
आत्मा ऐकत राहणार अत्रुप्तच तो|
झ्याक जोडी जमली रे|>>> ह्हा ह्हा..! मजला आनंद जाहला... अत्रुप्त आत्मा त्रुप्त जाहला

खूप मोलाचे विचार आहेत. माहित असतातच तरीही असे कोणी सांगितले की छान वाटते.
धन्यवाद.

विकास's picture

17 Jan 2012 - 6:50 am | विकास

ओस्मानिया विद्यापीठ च्या साईटवर बरीच मराठी पुस्तके डिजिटल स्वरूपात ठेवली आहेत.

दुवा दिलात तर दुवा देईन! :-)

अंकुर केव्हा फुटावा हे पेरणा~याच्या हातापेक्षा गव्हाला अधिक समजते.

यावरून एक ऐकीव इंग्रजी वाक्य आठवले: माणूस सफरचंदात बीया किती आहेत हे सांगू शकतो, पण बी मधून किती सफरचंदे येतील हे सांगू शकत नाही...

कापूसकोन्ड्या's picture

17 Jan 2012 - 7:25 pm | कापूसकोन्ड्या

मस्त आहेत वचने, एक खजिना खुला करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

कापूसकोन्ड्या's picture

17 Jan 2012 - 7:29 pm | कापूसकोन्ड्या

याकडे एक शब्द समुह थोडया शब्दात मोठा अर्थ व्यक्त करण्याची ताकद. असे पहावे.
आपण थोडेच सर्व ऐकतो?

निनाद's picture

17 Jan 2012 - 7:19 am | निनाद

वर्धा जिल्ह्यात असलेल्या पवनार येथील परंधाम आश्रमात ही पुस्तके मिळतात.
प्रकाशक - परंधाम प्रकाशन, (चोळकर)
मूल्य अतिशय नाममात्र आहे. सर्व पुस्तके प्रिंट मध्ये आहेत.
नागपुरात नक्की मिळतील!

मला विनोबांचे गीता प्रवचने अतिशय आवडते.
इतक्या साध्या शब्दात, सामान्य माणसांसाठी असलेले गीतेचे विवेचन मला इतरत्र कुठेही आढळले नाही. या छोट्याशा पुस्तकात मी गेली २ वर्षे गुंतून पडलो आहे :)

त्यांचे इशावास्य उपनिषदावरचे पुस्तक वाचायचे आहे. पण ते अजून झालेच नाही.

कापूसकोन्ड्या's picture

17 Jan 2012 - 7:30 pm | कापूसकोन्ड्या

अष्टादशी वाचा

मन१'s picture

17 Jan 2012 - 10:50 am | मन१

पण विनोबाजींचे बहुतांश लिखाण हे उप्देशात्मक असते त्यामुळेच कधी कधी थोडेसे वाचून झाले की कंटाळवाणे वाटते. पारंपरिक भारतीय विचार वगैरे त्यातून डोकावत राहतात.
त्यांच्या टाइपच्या पुढील वाक्यांमुळे मला व्यावसायिक व व्यावहारिक जीवनात जबरदस्त आपटी खावी लागली.

खरे बोलावे. साधे रहावे. उगाच भपका कशाला? दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे.
उगाच कुणाला वाइट्-साइट बोलू नये.(म्हनजे थोडक्यात सगळी टिंगल टवाली गायब. गजाल्या गायब. कट्टे गायब्.दोसत कंपनी गाय्ब.) मेहनत करावी. मेहनत केली असेल तर त्याचे श्रेय मिळेलच. श्रेय मुद्दम घेण्याचा प्रयत्न करू नये.
आपली चूक कबूल करावी.दुसर्‍याच्या चुका उगाच प्रकाशझोतात आणू नये.

यकु's picture

17 Jan 2012 - 1:40 pm | यकु

सहमत

विनोबांना एकदा विचारण्‍यात आले, तुम्ही कोकणस्‍थ ब्राह्मण की देशस्थ?
'मी फक्त स्वस्थ ब्राह्मण आहे..' त्यांनी उत्तर दिले.

या उत्तरापेक्षाही आणखी सखोल दृष्‍टी असलेल्या विद्वानाने नंतर फक्त 'स्वस्थ ब्राह्मण' हेही उत्तर कसे चुकीचे आहे यावर तासभर व्याख्‍यान केले आहे.
त्यांचे म्हणणे असे की फक्त स्वस्‍थ असणे पुरेसे आहे.. स्वस्थ असल्यानंतर पुन्हा ब्राह्मण आहोत हे सांगण्‍याची काही गरज नाही.

त्यामुळे शब्द पांडित्य असू शकेल पण विनोबांचे उपदेश फार मौलिक वाटले नाहीत.

कापूसकोन्ड्या's picture

17 Jan 2012 - 7:55 pm | कापूसकोन्ड्या

प्रश्न विचारणारा पुण्याचा असावा. कारण आडनाव काय? या पहील्या प्रश्नाचे उत्तर जोशी किंवा वैद्य असे आले की, पुढचा प्रश्न ठरलेला- कोब्रा की देब्रा?
आणि उत्तर कसे चुकीचे आहे यावर तासभर व्याख्‍यान केले आहे.असेल तर तो तर खात्रीचाच पुणेकर.(आणखी सखोल दृष्‍टी असलेल्या विद्वानाने)
त्यामुळे शब्द पांडित्य असू शकेल पण विनोबांचे उपदेश फार मौलिक वाटले नाहीत. एकदम मान्य

निनाद's picture

17 Jan 2012 - 1:48 pm | निनाद

त्यांच्या टाइपच्या पुढील वाक्यांमुळे मला ही व्यावसायिक व व्यावहारिक जीवनात जबरदस्त आपटी खावी लागली होती. त्यानंतर गीता प्रवचने वाचले व विचार बदलले...

दादा कोंडके's picture

17 Jan 2012 - 2:27 pm | दादा कोंडके

हे असले विचार वाचनियच असतात तसं आचरण करणं प्रापंचिक माणसांसाठी हास्यास्पद आहे.
संग्रह इथं दिल्या बद्दल धन्यवाद कापूसकोंड्याजी!

अवांतरः हे वनलायनर वाचून खूप वर्षापुर्वीचे गो सी गोखल्यांचं ज्ञान सागरातील शिपले आठवलं. त्याचे ५-७ भागही होते. त्यातली काही वाक्य,
"जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर घटस्फोटाचं एकमेव कारण म्हणजे विवाह होय!"
"पाठीमागे वाघ लागला असता माणूस जेव्हडी धडपड करेल त्याच्यापेक्षा जास्त धडपड तो पुढे लागलेल्या पोटासाठी करतो" :)

चिरोटा's picture

17 Jan 2012 - 3:00 pm | चिरोटा

त्यांच्या टाइपच्या पुढील वाक्यांमुळे मला व्यावसायिक व व्यावहारिक जीवनात जबरदस्त आपटी खावी लागली

सॉफ्ट्वेयरचे hotfix वा नविन version येते तसेच विचारांचेही करायचे असते.
विचारांच्या मागे "शक्य असेल तेव्हा", " नुकसान होणार नसेल तर ","काहीच फायदा होणार नसेल तर" हे टाकून पहा.
शक्य असेल तेव्हा खरे बोलावे. साधे रहावे.
काहीच फायदा होणार नसेल तर उगाच भपका कशाला?
नुकसान होणार नसेल तर दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे.

मन१'s picture

17 Jan 2012 - 3:05 pm | मन१

टाळ्या... लोळलो.... दंडवत.......
विशेषटः शेवटच्या दोन ओळींना.

मराठी_माणूस's picture

17 Jan 2012 - 3:19 pm | मराठी_माणूस

ह्याला म्हणतात theory आणि practical मधला फरक !!

कापूसकोन्ड्या's picture

17 Jan 2012 - 7:59 pm | कापूसकोन्ड्या

In theory, theory and practical should be the same, but in reality it is not.

किचेन's picture

22 Jan 2012 - 9:47 pm | किचेन

_/\_

कापूसकोन्ड्या's picture

17 Jan 2012 - 7:38 pm | कापूसकोन्ड्या

अहो काय मन१ साहेब?
एवढे सिरीयस होउ नका हो. ही एक गंमत विरंगुळा समजा. संत वचने अशीच असतात. एक तर ग्रंथ जुना आहे तो जाला वर मिळाला म्हणून कौतुक आणि शब्दाची ताकद पहा!
इथे कुठे आहे अध्यात्म?
धुमसत असताना प्रगट होऊ नये. पेटल्यावर दिसेलच.
तुमच्या विचाराशी सहमत आहे काही वेळाने कंटाळा येउ लागतो. पण तसा तो कोण्त्याही गोष्टींचा येतोच की!
असो.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

तिमा's picture

17 Jan 2012 - 7:52 pm | तिमा

भारत हा कधी कधी माझा देश आहे
आम्ही कधी कधी खरे बोलतो
बर्‍याचदा कोरड्याने उमाळे आणतो
हातचं राखून मदत करतो
'जे होते ते बर्‍यासाठीच' असे म्हणून स्वतःची समजूत घालतो
कोणी गेल्यावर 'काढत्या पायाने' भेटायला जातो
लोकांचे इगो मापतो
स्वतःला इगो नाहीच अशी समजूत करुन घेतो
स्वार्थालाच परमार्थाचे आवरण चढवतो

विनोबांचे विचार पटो न पटो, पण ते एक अधुनिक ऋषीवर्य होते यात वाद नाही.
फक्त अध्यात्मच नव्हे पण त्यानी बाकी बरीच कामे केली आहेत.प्रायोपवेषन करणारे भारतातले दोनच विनायक त्यातले हे एक.

राही's picture

31 Jan 2013 - 7:19 pm | राही

विनोबांचे साहित्य अजूनही कोणी वाचत असेल आणि ते त्याला आवडत असेल असे वाटले नव्हते. विनोबांना समजून घेण्यात महाराष्ट्राने मोठी चूक केली आहे असे सतत वाटत रहाते.गांधीजींना संत मानून त्यांच्यावर टीका झाली आणि विनोबाजींना राजकारणी ठरवून. खरे तर आपण विनोबांकडे संत म्हणून आणि गांधींकडे राजकारणी म्हणून पहायला हवे होते.

विकास's picture

31 Jan 2013 - 8:31 pm | विकास

गांधीजींना संत मानून त्यांच्यावर टीका झाली आणि विनोबाजींना राजकारणी ठरवून.

योग्य निरीक्षण आणि चपखल वाक्य.

विनोबांवर टिका दोनदा झाल्याचे माहीत आहे. एकदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीस त्यांनी केलेल्या विरोधाच्या वेळेसआणि दुसर्‍यांदा झाली ती त्यांनी आणिबाणीस जेंव्हा अनुशासनपर्व म्हणले आणि मौनव्रतात असताना प्रतिक्रीया म्हणून केवळ टाळी वाजवली तेंव्हा.

विनोबांचे तत्वज्ञानावरील लेखन आणि भूदान सारखी चळवळ, जरी ती पूर्ण यशस्वी झाली नसली, तरी मला आवडते. त्यात त्या माणसाची खरी पॅशन कळते. त्यांनी राजकीय प्रतिक्रीया देयला नको होत्या. अशा वेळेस आठवते, "जेणो काम तेणो ठाय, बीजा करेसो, गोता खाय" .

राही's picture

1 Feb 2013 - 10:51 am | राही

संतांनी राजकीय सल्ले अथवा प्रतिक्रिया दिल्याचे पूर्व दाखले आहेत.बरीचशी प्रथितयश मंडळी-यात राजकारणीही आलेच-मनातल्या असुरक्षिततेने,आशीर्वादासाठी अथवा योग्य मार्गदर्शनासाठी अनेक खर्‍या वा तथाकथित साधुपुरुषांकडे जात असतात.आणीबाणीला विनोबांनी अनुशासनपर्व म्हटले ते योग्यच होते असे माझे मत आहे.आणीबाणीबाबत जरासा वेगळा दृष्टिकोन बनला आहे तो या धाग्यावर अप्रस्तुत होईल म्हणून मांडत नाही.'जेनुं काम तेनुं थाय' हे आम आदमीसाठी योग्य असले तरी खर्‍या संतांसाठी कोणतीही कामे,अगदी मैलासफाईचीही,वर्ज्य नसतात.

no.
not again.
मला एखाद्या लहान पोराचे आयुष्याचे वाटोळे करायचे असेल तर मी तसले काहीतरी त्याच्या हाती ठेवीन,चार चौघांसारखं जगण्याबद्दल लाज वाटून घ्यायला शिकवीन. चमत्कारिक आणि विचित्र "प्रयोग" कर म्हणेन. स्वतःचं मन मारत जग म्हणीन. पुन्हा "मन मारुन जगा" असं विनोबा कुठेच म्हटले नाहित असं कुणी म्हणेल. ते थेट म्हटलेच नाहित हो; पण त्यांच्या उपदेशानं तोच इफेक्ट येतोय ना! जगूच देत नाहित सुखासुखखायफर फार प्रयत्न करुन डिलिट करावं लागलेलं डोक्यातून.
ते भूदान वगैरे असेल ग्रेट. चळवळ नको पण तत्वज्ञान आवर. असच मी त्या थोर गृहस्थास म्हणेन.
.

राही's picture

1 Feb 2013 - 11:16 am | राही

वारकरी पंथ(भक्ती चळवळ)नको पण तुमचा अमृतानुभव आवरा असे ज्ञानेश्वरांस सांगणे योग्य ठरेल काय?(येथे विनोबा-ज्ञानेश्वर अशी तुलना मुळीच अभिप्रेत नाही.)खरे संत हे आम समाजापासून कधीही फटकून रहात नसतात.त्यांची नाळ दीन-दुबळ्यांशी घट्ट जुळलेली असते. ते जीवनाचे तत्त्वज्ञान अगदी साध्या सोप्या शब्दात सांगत असले तरी तो शॉर्ट कट नसतो.पलायनवाद तर मुळीच नसतो.उलट हे लोक जीवन भरभरून जगण्यास उद्युक्त करतात.
गीतारहस्य,गीताई,अमृतानुभव,शांकरभाष्य असे ग्रंथ हे लहान मुलाच्या हातात देण्याजोगे असतीलच असे नाही.

श्रीनिवास टिळक's picture

2 Feb 2013 - 8:11 am | श्रीनिवास टिळक

विनोबाजींच्या भूदानचळवळीचे यश व अपयश याची कारणमीमांसा मी माझ्या Myth of Sarvodaya: a study in Vinoba’s concept (New Delhi: Breakthrough Communications, 1984) या पुस्तकात केली आहे. मात्र येथे myth शब्दाचा अर्थ असत्य किवा खोटे असा केलेला नसून ज्याला आपण मराठीत कहाणी म्हणतो त्या अर्थाने आहे. १९८२ साली याच विषयावर माझा “कहाणी भूदान यज्ञाची” हा लेख माणूस या साप्ताहिकात प्रसिद्ध झाला होता.