Skip to main content

उमजत नाही

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 16/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो हे मी इथे काथ्याकुट मध्ये का लिहितोय कोणं जाणे. नक्की काय वाटते हे शब्दात सांगणे अवघड आहे. कदाचित मिडलएज क्रायसीस की काय असू शकेल. साला माझ्या जनरेशनची ही जनरल गोची आहे. जे व्हायचे असते ते कधी होता आले नाही. जे झालो आहोत ते जस्टीफाय करत येत नाही. वयाच्या चाळीशी उलटली की हे हिशोब सुचायला लागतात. भाषेचा अभ्यास करायचा होता पण आइवडीलांनी जबरदस्तीने इंजीनिअरिंग करायला लावले. माझ्या फुटकळ विरोधाला दाद वगैरे काही द्यायची त्याना जाणीवच नसावी. आर्ट्स करून काय करणार आहेस बेकार पडलेल्या वकीलांच्या फौजेत आणखी एक भर.( जागेच्या केस मध्ये असलेल्या वकीलांचे मात्र कसा हुशार आहे म्हणून कौतूक ) नाहीतर उगाच कुठल्यातरी ढेकण्या कॉलेजमध्ये क्लॉक अवर वर मास्तरकी करत बसशील. भाषा वगैरे काय नंतर शिकता येईल. कर इंजीनिरिंग. ( स्वतः कधीकाळी आय आय टीत प्राध्यापक होते त्याचे जाम कौतूक) वगैरे वगैरे. नाटक करायला जम आवडायचे. बासरी /पेटी वाजवताना मजा यायची. नाटकात कम करायची झिंग यायची. स्पर्धेत बक्षीसे मिळाली की आपण भलते ग्रेट आहोत हे कळाल्यामुळे ती रात्र अजिब्बात झोप यायची नाही. एका वर्षी तर एकाच वेळेस दोन एकांकीका एक नाटक यात काम करत होतो. अधूनमधून आपण लिहीलेल्या एकंकीका कविता लोकाना भरपूर आवडतात हा सूखद धक्का बसायचा. ते काही असो नाटक हा शब्द उच्चारला तरी घरी शिव्या या शिवाय काहीच ऐकायला मिळले नाही. नाटकाबद्दल बोलणे हा गुन्हाच मानला होतां नाटक वगैरे काय आयुष्याला पुरणार आहे का. त्यापेक्षा चांगले शिकलास तर नोकरी मिळेल. तुझ्यासाठी कुठे शब्द टाकणार नाही. रडतखडत धक्के खात इंजीनिरिंग पूर्ण केले. वडीलांच्या पुढे हा अभ्यासक्रम नको वगैरे बोलायची टाप नव्हती. आपण नक्की काय करायचे आहे तेच विसरून गेलो. चार चौघांसारखी नोकरी पकडून पाहिली . प्रॉडक्षन शॉप वर मन रमायचे नाही. लग्न झाले . पहिली काही वर्षे फुलपाखरी गेली.यथावकाश मुलेबाळे झाली. कधी नाटकाला गेलो तर इतिहास आठवायचा. बरोबरची नाटकातली मित्र मंडळी त्यांच्या त्यांच्या व्यवसायात स्थिरावली. काहीजणा लेख दिग्दर्शक वगैरे झाले आहेत. दोघेजण नित्यनेमाने सिरीयल्स चा रतीब पाडतात. इंजीनिरींगची मित्र मंडळी त्यांच्या त्यांच्या नोकरीत रमली आहेत. बरेचजण परदेशी आहेत. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी कोणी कंपनी वगैरे सुरु करायचा संकल्प केलेला होता त्यांचे व्यवसाय आहेत. एखाद दुसरा अपवाद वगळता बहुतेक सगळेजण आर्थीक दृष्ट्या सद्धर आहेत. वयाची तिशी स्थिरस्थावर नामक भ्रामक स्टेशन गाठण्याच्या घाईत संपली. तिशी संपल्यावर कधितरी स्वतःला हा प्रश विचारला. मला जे हवे होते ते मिळाले का? पैसे..........? अजून म्हणावे तेवढे स्थिरसावर नाही घर.......... ? हप्ते चालू आहेत. मुले..........? याची कधी खूप आवश्यकता आहे असे वाटलेच नाही. ( रजनीशांचे वाक्य आठवते.यू आर अ बायप्रॉडक्ट ऑफ युवर पेरेंट्स लस्ट) सहचारीणी ........? पहीली काही वर्षे सहचारीणी होती... पण ती क्षणांची पत्नी आणि अनंतकाळची माता असते हे मुले झाल्या नंतर उमजते. तिच्यातली सहचारीणी आपण कुठे मारून टाकली हे कळालेच नाही. कामातला आनंद..........? पाट्या टाकतोय. निर्मितीचा आनंद कधी जाणवलाच नाही. हे सगळे हिशेब लावताना आयुश्याच्या या टप्प्यावर असताना एक वेगळाच एकाकीपणा जाणवतो. आपण फार कोणी नाही तर फक्त ओझ्याचे बैल आहोत याची पदोपदी जाणीव होते. हे ओझे अर्थातच आपणच निर्मिलेले. इतकी वर्षे जगून काय केले तर काहीनाही. पुलंच्या अपूर्वा मध्ये एक वाक्य आहे "गड्या तू वंशाचा दिवा नाहीस तर फक्त दुवा आहेस " अर्थात ते करून तरी काय केले. कोण्या आदीमानवाने सुरू केलेला वंश पुढे चालूठेवला. इतक्या वर्षात काहीही केले नाही. इतराना सोडा स्वतःला देखील कधी निर्मळ आनंद मिळेल असा प्रयत्न केला नाही. इतरांसाठी सोडाच स्वतःसाठी ही कधी जगलो नाही. या पुढे जगता येईल याची शाश्वती नाही. गाडील जुंपलेल्या बैलाला स्वतःची इच्छा असून काहीच उपयोग नसतो. पाठीवर फक्त फटकेच मिळतात. त्या फटक्याना भिऊन ओझे वहात चालत रहाणे हेच त्याच्या हातात असते. जगण्यासारखे काही राहिले नाही आणि काही राहण्यासारखे कधी जगलो नाही ही त्याची स्वतः करून घेतलेली शोकांतीका असते. आयुष्याचे हिशेब मांडायला आता भिती वाटते. नक्की कशासाठी जगतोय हेच उमजत नाही. ज्या दिवशी हे कळेल त्या दिवशी कशासाठी मेलो हे उमजेल.

वाचने 23995
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

अंतर्मुख करायला लावणारे मुक्तक. आवडले.

विजूभाऊ, हे वाचून परिक्रमेच्या यादीत तुमचंही नाव जोडावं वाटतंय. जोडू का? विलासराव, तुम्ही व मी.. इतर काही होता आलं नाही त्याबद्दल खंत बाळगतानाच काही काळासाठी खरे फकीर होऊन पाहू. कुणीतरी आहे पण कुणीही नाही यापेक्षा काही काळासाठी फकीर होऊ. मग जे खरोखर आहोत ते आणखी सुस्पष्‍ट होईल कदाचित..

In reply to by यकु

यशु या फकिरी 'कारव्यात' सामील व्हावसं वाटत पण संसार सोडवत नाही. संसार म्हणजे जबाबदार्‍या, ओझे, अपेक्षा, कर्तव्य आदी.

अशीच काहीशी अवस्था झालेय माझीही.... भावनांशी ,पक्षी गोंधळाशी सहमत....| | | | |

नाही म्हणजे हे अगदी जनातलं मनातलं, मधेही चपखल बसलं असतं. लिखाण तुमच्या दृष्टीने मोकळ होण्याचं एक साधन जरी वाटलं तरी आमच्या लेखी ते एक अंजन आहे. मी काही वयाने फार मोठा नाही, नुकतीच गद्धे-पंचविशी झाली. एक गोष्ट आज उमजते आहे, की कुठल्याही गोष्टी मध्ये मानसिक समाधान मिळवण्यासाठी, त्या गोष्टीचं वेड (passion) असणं खूप गरजेचे आहे.

ह्म्म्म्म. जेआयला विजुभौ काय बाय छंद लावुन घे ने. तेवराच टाइमपास व्हईल.

फार खरं आणि दुखरं लिहून गेलात.

खरय.... आणि अवघड आहे.. उगाच आठवण करुन दिली तुम्ही विजु भौ....चान्गल चल्लल होत मस्त.... आता आला का डोक्याला ताप... जाउद्या झाल गेल... ग्लास अजुनही अर्धा भरलेला आहे... पाय ताणुन जार रिलैक्स व्हा.....मस्त गझल-बिझल लावा.....आणि तब्येतीने प्या...

पुन्हा एकदा "मोकलाया दाहि दिशा" वाचा. जगातली सर्व दु:खे, एकाकीपणा एका फास्यफवार्‍यात विरून जातिल. बादवे, मी असे काही क्वचित बडाबडलो तर काही सल्लागार मला "दोन कॉट्टर पोटात ढकलायला शीक" असा सल्ला द्यायचे. सोमरस प्राशन अब्रम्हण्यम् नसणार्‍यांनाही टेन्शन येउ शकतं असं वाटतय. तुमच्यासारखाच व तुमच्या बर्‍याच आधी पिचलेला

विजुभाऊ, याला जीवन ऐसे नाव! आपण काय काय करायचे असे ठरवत असतानाच आपल्या आयुष्यात दुसरंच काहीतरे होत असतं/ होतं नी पूर्ण दिशाच बदलते. मग म्हणत बसतो 'हे केलं असतं तर, हे केलं नसतं तर, कुठून बुद्धी झाली आणि बरंच काही.'

ह्म्म्म..... नि:शब्द...... :| पण एक सल्ला : मेडिटेशन वगैरे मध्ये मन रमवा... उचित दिशा मिळेल.... तसेच आयुष्याविषयी पॉझीटीव अ‍ॅप्रोच बाळगा..... विपश्यनेविषयी आत्मीयता असेल, तर इगतपुरीला जाऊन आश्रमात एखादा १५ दिवसाचा कोर्स करा... सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. ___________________ किन्वा सिरियल'साठी लिखाणात वगैरे इन्टरेस्ट असेल तर एखाद्या डीरेक्टर किन्वा प्रोड्युसरला भेटा. (सन्दर्भ आणि पत्ते: चे.पु. वर मिळतील) त्यान्ना तुमची एखादी स्टोरी वगैरे दाखवा.. आणि सतत त्यान्च्या कॉन्टॅक्ट मध्ये रहा. तुमच्या "शहा" आडनावाचा शक्य तितका वापर करा. अ‍ॅम नॉट जोकिन्ग... बट .. एखाद्या मराठी सिरियलच्या हिन्दी प्रोड्युसरला भेटलात.. तर जास्त फायदा होईल. किन्वा अ‍ॅक्टीन्ग साठी "तारक मेहता का उल्टा चष्मा" सारख्या सिरियलसाठी ट्राय करा... मराठीपेक्षा हिन्दीत पैसे केव्हाही जास्त मिळतात. किन्वा "विपुल शहा" बरोबर ओळख वाढवा... न जाणो.. कदाचित रोहित शेट्टीच्या सिन्घम- पार्ट २ मध्ये तुम्हीही दिसाल आम्हाला!!!.... ;) ;) आणि तसेही तुम्ही सध्या मुम्बईतच्च आहात.. म्हटल्यावर या 'गाठेभेटी' करणे. खेटे घालणे तुम्हाला त्यातल्या त्यात सोपे जाईल!!!! बट प्लीज बी पॉझीटीव्ह!!! :) :)

विजुभाऊ. एकेका वाक्याला भडभडून आलं आहे आणि खूप खूप बोलावंसं वाटलेलं आहे. आता तुम्हाला भेटून गप्पा मारण्याचा प्लॅन अत्यंत तातडीने करायला हवा आहे.

विजुभौ, मुक्तक पोहचलं आणि आवडलंही. थोडेफार फरक सोडले तर सर्वत्र असेच असेल असे वाटते. पण सकारात्मक दृष्टी, जगण्यातला आनंद. सतत स्वतःला उत्साही आणि बीझी ठेवणं. वगैरे. इ.इ. '' आयुष्याचे हिशेब मांडायला आता भिती वाटते. नक्की कशासाठी जगतोय हेच उमजत नाही'' च्यायला लैच बेक्कार किडा टाकला राव तुम्ही. :( असो, यावरुन आठवण झाली. कोणीतरी एका माणसानं सुर्याला विचारलं, कसं काय चाल्लंय ? तेव्हा सूर्य म्हणाला, चाल्लंय आपलं एकेक दिवस ढकलतोय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या प्रतिसादावरुन पु.लं.च्या ह्या ओळी आठवल्या.. "संध्याकाळी गप्पा मारुन झाल्यावर मी सूर्याला बोललो, " अच्छा ! चल मग, आता उद्या भेटू.." सूर्य बोलला, "कशावरुन? मधल्या रात्रीचा तुला अजून भरवसा आहे?" सूर्य आता म्हातारा झालाय !" (शब्दांची फेरफार झाली असल्यास क्षमस्व..) बाकी विजूभौ, टेंशन घेऊ नका हो.. च्यायला, मला पण काय काय व्हायचं होतं. (लहानपणी "पान-टपरी उघडणे" ही महत्वाकांक्षा होती ;-)) आणि अजूनही काय बिघडलयं हो.. आताच "आपुलकी" वाचत होतो, त्यात पु.लंनी लिहील्यं की शरद तळवलकर, वसंतराव देशपांडे ह्यांची त्यांच्या पन्नाशीनंतरच कदर केल्या गेली.. खुद्द पुलंनी त्यांच्या पन्नाशीत बंगाली शिकायला सुरुवात केली होती, आणि गुरुदेव टागोरांनी चित्रकला ह्याच वयात शिकली.. आताच सांगायचं तर, बोमण इराणी त्याची छायाचित्रकारी सोडून आता अभिनयक्षेत्रात नाव कमावतोय.. मला मेघालयात एकजण भेटला होता. आता शाळा-कॉलेजात पोरं असलेला हा गृहस्थ बँकेतल्या आपल्या मोठ्या पदावरच्या नोकरीतून सुटी घेऊन बाईकवरुन अख्खा भारत हिंडतोय, बायको-पोरांची चिंता सोडून.. तोच बोलल्याप्रमाणे, "अपनी जिंदगी अपने लिए भी जी के देखते है, यार!" तेव्हा, भिडा त्येज्यायला.. काय करायचयं ते करायला सुरु करा.

लिहिलेलं आवडलं, माझ्याकडं एक उत्तर आहे या सगळ्यावरचं, जमल्यास ट्राय करुन बघा. * दररोज घरुन ऑफिसमध्ये यायची अन ऑफिसमधुन घरी जायची वेळ ठरलेली असते, तशी वेळ ठरवुन बघा या जगातुन निघायची, वर विचारलेल्या पैकी ब-याच प्रश्नांची उत्तरं मिळतील, किंवा बरेच प्रश्न नाहीतच तर ती उत्तरंच आहेत हे लक्षात येईल. तरीसुद्धा काही प्रश्न राहतील, ते राहुदेत तसेच, एकदा इथुन 'पास' झालात की मग कुणालाच ही उत्तरपत्रिका दाखवायची नाहि. *(संदर्भ - http://misalpav.com/node/17095)

लिखान आवडले .. परंतु , आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती , आधीच्या आयुष्याची जमाबाकी करायची.. आनि बाकी बद्दल निराश होउन पुढील आयुष्य उगच खंगत जगायचे(मिडलेज क्रायसीस या नावाने) मला आवडत नाही .. मला येथे व्यव्स्थीत सांगता येत नाहिये .,. आणि तितकासे वय ही नाही .. तुम्ही म्हणाला ते कळते आहे.. बरेचसे करावयाचे राहुनी गेले तरी बरेचसे करता ही येउ शकते हे कळणे महत्वाचे वाटते.. बघु सविस्तर लिहिता आले तर लिहितो .. कदाचीत त्याचा मलाही उपोयोग होयील कधीकाळी .. -

मुक्तक आवडलं. हे वरचे 'विचार' रूपी प्रकटन "विजूभाऊ" या व्यक्तिमत्वाचंच असेल तर: तुमच्या "इतकी वर्षे जगून काय केले?" या प्रश्नाचं उत्तर हे घ्या: १. "विल यू बी माय स्पेन्सर " २. एक धागा सुखाचा ....... असे खूपसे तुमचे लेख (आणि बर्‍याच लेख-चर्चांमधले विचारप्रवर्तक प्रतिसाद), त्यांनी आम्हा वाचकांना दिलेला आनंद, विचार करायला लावणं, ही सगळी तुमचीच कमाई. तेंव्हा ही जी काही अल्पकालीन melancholy अवस्था असेल, तिचा सन्मान ठेवाच, पण त्यानंतर मात्र पुढचा लेख 'स्पेन्सर'सारखा येऊ द्यात.

In reply to by बहुगुणी

>>>> हे वरचे 'विचार' रूपी प्रकटन "विजूभाऊ" या व्यक्तिमत्वाचंच असेल तर: वरच्या बहुगुणीच्या पोस्टशी सहमत. प्रत्येकाच्या आयुष्याचा वाटेवर एक वळण असे येतेच. लेख नायकाचा हा मेल मोनोपॉज मानावा काय?

विजुभाऊ, प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येतेच. आता आम्ही कितीही सल्ले दिले तरी या परिस्थितीतून तुम्हालाच बाहेर पडावं लागेल. तुम्हाला जरा थांबण्याची नितांत गरज आहे असं वाटतंय. प्लॅनिंग करून दोन एक वर्षांत रिटायरमेंट घ्यायचा विचार करा आणि मग तुम्हाला जे आवडेल ते करा. तुमच्या सहचारिणीशी संवाद साधून बघा, आपण मागे पडलोय याचाही तिला बिचारीला विचार करायला कदाचित वेळ मिळत नसेल. तिने घराची जबाबदारी घेतली म्हणून इतकी वर्षं तुम्ही निर्वेधपणे नोकरी करू शकलात. आजकाल मुलांसाठी पैसे मिळवत रहायची गरज नाही, शिक्षणाच्या अनेक प्रकारच्या संधी आणि शैक्षणिक कर्ज स्वस्तात उपलब्ध आहेत. अभ्यास कसा करायचा इतकं मुलाना शिकवलं तरे पुरे, बाकी पुढचा रस्ता ती आपला आपण शोधून काढतात. सध्या काही दिवस रजा घेऊन कुटुंबाबरोबर रहा, नोकरीचा विचारसुद्धा करू नका. स्वतःला आणि बायकोमुलांना वेळ द्या, आणि मग नोकरी कधी सोडायची आणि पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग करा. तुम्हाला मनापासून शुभेच्छा!

थोडेफार कळतंय... पण आयुष्याचा हिशेब कशासाठी मांडायचा हे मात्र अजून कळत नाहीये....... --जुगारी (?) माउ

तुमच्या मनातलं उतरलयं विजुभौ, मी यावरच एकदा इथे लिहिलं होतं.. काही प्रश्नांची उत्तरे न शोधावीत यातच आपला फायदा असतो.

सध्या विजुभाऊंच्या या विचारांवर अनेक प्रेमाचे, मैत्रीचे प्रतिसाद आणि शब्द येतील. अनेक सल्ले आणि उपदेशही मिळतील. पण त्यांनी सांगितलेली स्थिती ही एक अत्यंत अस्वस्थ करणारी स्थिती आहे आणि शहाणपणाचे वाटणारे असंख्य उपाय कळत असूनही वळत नाही असं होतं अशी ही अवस्था आहे. मित्र जमवून त्यांच्यासोबत हे शेअर केल्याने खूप बरं वाटतं. हा लेख वाचताच विजुभाऊंनी आपल्याला दोस्तलोकांमधे मानलं आहे हे कळून आनंद झाला. अशावेळी पॉझिटिव्ह थिंकिंगवाल्या गोळ्यांचा जसा उपयोग होतो तसा किंवा त्याहूनही जास्त सहानुभव असलेल्या मैत्रीचा होतो. त्यातूनच मी एकटा नाही.. हा गरजेचा दिलासा मिळतो. विजुभाऊ नीड्स अ लिसनर फ्रेंड इन अस, नॉट अ डॉक्टर टू सब्स्क्राईब पिल्स.. मीही आहे हो तुमच्यासोबत विजुभाऊ.. मीही अशातून जात असतो वरचेवर.. रोजच.. :)

In reply to by गवि

पाणी पिताना ठसका लागल्यावर ती उबळ १०-१५ सेकंदात जाणार आहे हे माहिती असतं पण, आजुबाजुच्यांचं "हळू", "वरती बघ" वगैरे सूचनांनी वैतागायला होतं. :)

मलाच केंद्रस्थानी ठेवून वर्तुळं काढायचो तेव्हा मला असे काही वाटायचे. पण इतरांना केंद्रात ठेवून मी परीघावर गेलो तेव्हा जास्त सुखी झालो. बाकी इतर प्रापंचीक समस्यांच्या बाबतीत काय सांगावे ? आधी गुंतू नये नंतर कुंथू नये.

In reply to by रामदास

=०()8=

In reply to by रामदास

अगदी थोडक्यात आणि नेमके, चोख--- हिट द बूल्स आय!

In reply to by रामदास

थोडक्यात सर्व सांगीतलेत. खूप आवडले. धन्यवाद. राघव

मिड लाइफ क्रायसिस हा शब्द मी थोड्या वेगळ्या अर्थाने ऐकला होता. मध्यमवीय्न माणसाला तारुण्य निसटायची खंत वाटते आणि ते मुठित धरण्यासाठी तो आटोकाट प्रयत्न करतो, मेक-अप्,मेक ओव्हर चे प्रयत्न, व्यक्तिमत्व विकासाच्या एकाएकी आहारी जाणे, अजूनही आपण एखाद्या युवतीला आवडू शकतो हे स्वतःशीच सिद्ध करायचा प्रयत्न करणे ही सगळी त्याची लक्षणे. "सवत माझी लाडकी" मोहन जोशी-नीन कुलकरणी-वर्षा उसगावकर ह्यांचा हा मराठी चित्रपट बराचसा ह्या समस्येच्या मांडणीच्या अंगाने जातो म्हणे. लेखाकाने लिहिलय त्यातून पारंपारिक भाषेत सांगायचं तर वैराग्य डोकावतय किंवा कबीराच्या भाषेत साम्गायच तर "बीत गये दिन भजन बिना रे". मागे पं अजय पोहेकरांच्या आवाजात ही आर्त भैरवी ऐकायचो, तेव्हा अस्वस्थ झाल्यासारखे होइ. हा लेख वाचून तसेच काहिसे झाले. बीत गये दिन भजन बिना रे -कबीर बीत गये दिन भजन बिना रे । भजन बिना रे, भजन बिना रे ॥ बाल अवस्था खेल गवांयो । जब यौवन तब मान घना रे ॥ लाहे कारण मूल गवाँयो । अजहुं न गयी मन की तृष्णा रे ॥ कहत कबीर सुनो भई साधो । पार उतर गये संत जना रे ॥

एक रोटी भी न दें सका कोई उस भूखे को | तस्वीर उस भूखे की मगर लाखो कमा गयी !! . 1 मनोबा या ओळी वाचून ते सुदान मधल्या एका लहान मुलाचा फोटो आठवला हातापायाच्या काड्या झालेला लहान मूल त्याच्या मागे त्या मुलाच्या मरणाची वात पहात उभे असलेले भले मोठे गिधाड. फोटो पाहिला त्या नंतर आठवडाभर स्वतःच्या वांझोट्या जगण्याची चीड येत होती

In reply to by प्रदीप

एक किलोमीटरवर असलेल्या मदतकेंद्राकडे पोचण्यासाठी ते मूल खुरडत चाललं होतं. फोटो काढून होताक्षणीच तो फोटोग्राफर निघून गेला असं लिहिलं आहे. कॅमेर्‍याइतकंही वजन नसलेल्या त्या पोराला उचलून मदतकेंद्रावर नेऊन भरवलं असतंन तर पुलित्झरपेक्षा जास्त आनंद मिळाला असता त्याला. नंतर आत्महत्या केली तेही ठीकच मग.

In reply to by गवि

आपण त्या मुलाला वेळीच उचलले नाही, त्यावेळी स्टोरी मिळवण्याच्या नादात आपण माणूसकी विसरलो, ह्याची त्याला बोच लागून राहिली व तिने त्याचा बळी घेतला. जाता जाता, थोडे शांतपणे पाहिले तर अशा वेळी एका बातमीदाराने नक्की काय केले पाहिजे ह्याचे सरळ साधे उत्तर नाही. उदा. युद्धप्रसंगांत, एखादा अपघात नुकताच झालेला असतां तेथे जाऊन कव्हरेज करतांना, अशा वेळांमध्ये ह्या व्यक्तिंनी नक्की कशाला प्राधान्य द्यावे-- आपल्या प्रोफेशनला (ज्यावर त्या व्यक्तिची किमान रोजीरोटी, व कमान सगळे करीयरच अवलंबून आहे) का माणूसकीच्या गहिवराला? ह्याहीपुढे जाऊन मला अनेकदा आपल्या -म्हणजे कुठल्याही माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या- नित्य जीवनातील असल्या द्वंदाचे प्रश्न भेडसावतात. अनेकानेक उदाहरणे देता येतील. पण त्याचा खरे तर वेगळा धागाच होईल. कधीतरी पुढेमागे वेळ असेल त्याप्रमाणे तसा टाकेन.

In reply to by प्रदीप

जाता जाता, थोडे शांतपणे पाहिले तर अशा वेळी एका बातमीदाराने नक्की काय केले पाहिजे ह्याचे सरळ साधे उत्तर नाही. उदा. युद्धप्रसंगांत, एखादा अपघात नुकताच झालेला असतां तेथे जाऊन कव्हरेज करतांना, अशा वेळांमध्ये ह्या व्यक्तिंनी नक्की कशाला प्राधान्य द्यावे-- आपल्या प्रोफेशनला (ज्यावर त्या व्यक्तिची किमान रोजीरोटी, व कमान सगळे करीयरच अवलंबून आहे) का माणूसकीच्या गहिवराला?
याविषयी सुस्पष्ट कन्सेप्ट असायला हरकत नाही.. फोटो काढण्याविषयी कोणतेच दुमत नाही. तुमचा पत्रकाराचा धर्म आधी निभवा.. पण एक फोटो काढून झाल्यावर दुसर्‍या फोटोमागे किंवा स्टोरीमागे लागताना सहज शक्य अशी कृती करणं ही निव्वळ मानवता आहे. तुम्ही दिलेल्या दोन्ही उदाहरणांत , विशेषतः नुकत्याच झालेल्या अपघातात कव्हरेज करतानाही खरं तर वर म्हटलेलं आचरणं चुकीचं नाही.. पण सध्या आपण असं मानू की अशा वेळी प्रोफेशनला (रिपोर्टिंगला) महत्व द्यावं.. अशावेळी नक्कीच म्हणता येईल की नुकताच झालेला अपघात आणि सुदानमधल्या या नीट माहीत असलेल्या दुष्काळी स्थितीत जाऊन रिपोर्टिंग करणं यात फरक आहे. दुसर्‍या केसमधे पत्रकाराला नक्कीच थोडा वेळ मदतीसाठी देता येईल. हा फोटो पोर योग्य ठिकाणी उचलून ठेवून आणि त्याच्या आई/बापांना विश्वासात घेऊन अरेंज केला होता की काय का अशी शंका यावी इतका थंडपणा तिथून निघून जाण्याच्या कृतीत दिसतो.

विजूभाऊ, प्रत्येक जण कधीना कधी जातो या फेज मधून! व्हॉट इफ मधे गुंतून न रहाता स्वान्त सुखाय सेकंड इनिंगच्या दृष्टीने छोटी छोटी पावले टाकायला सुरुवात करा.

जे आयला, विजुभौ एवढ्या लवकर?

विजुभौ का उगा सगळ्यांना विचार करायच्या कामाला लावताय ? साला आयुष्यात आपण जी काही ५-१० जॉली माणसे बघितली, त्यात विजुभौंचा नंबर बराच वरती लागतो. अर्थात हा धागा आम्ही 'विजुभौंची बदमाषी' ह्या सदरात घेतला आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद आवडेश.

In reply to by परिकथेतील राजकुमार

क्या मामु ...आय मीन.. विजुभाय...एकदम सेन्टी मार रेला हय ?? आपुन की तरफ से ये तेरे लिये ;)

कधी काळी तुम्ही कौन्सेलिंगही करायचा ना? उत्तर होकारार्थी असेल तर, आठवा थोडं. लेखन चांगलं. सोपी वाक्यं वगैरे हातोटी दिसतेच. :)

इतक्या वर्षात काहीही केले नाही. इतराना सोडा स्वतःला देखील कधी निर्मळ आनंद मिळेल असा प्रयत्न केला नाही. इतरांसाठी सोडाच स्वतःसाठी ही कधी जगलो नाही. या पुढे जगता येईल याची शाश्वती नाही. आयुष्याचे हिशेब मांडायला आता भिती वाटते. नक्की कशासाठी जगतोय हेच उमजत नाही. >>> हे कुठले विजुभौ ? निराशेच्या नकारात्मक भोवर्‍यात गटांगळ्या खाणारे हे विजुभौ आमचे विजुभौ नक्कीच नाहीत. लेखनातुन, प्रतिसादातुन, एकदोनदा दुरध्वनीवरुन झालेल्या संभाषणातुन मला जाणवलेले, कळलेले नेहमीचे जिंदादिल विजुभौ हे नाहितच. हॅलो, हॅलो विजुभौ, तुम्ही कुठे आहात ?.................

In reply to by इरसाल

विजुभौ मनातली घालमेल जाणवली, मला मुन्नाभाई मधला डॉक्टरचा पपा आठवला.
च्यायला ! =)) =)) माझ्या डोळ्यासमोर एकदम बासरी हातात घेउन 'ज्यूस पिवानू, बाँसूरी रमवानू, मज्जानी लाईफ' म्हणणरे विजुभौ आले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

विजुभौ मनातली घालमेल जाणवली, मला मुन्नाभाई मधला डॉक्टरचा पपा आठवला.
माझ्या डोळ्यासमोर एकदम बासरी हातात घेउन 'ज्यूस पिवानू, बाँसूरी रमवानू, मज्जानी लाईफ' म्हणणरे विजुभौ आले.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ए.. विज्जु भौ... तू रानी के पिच्छु क्यों पडा है रे...... ;) मग विजुभौन्ना....'रानी तो पप्पानी'...... च्याऐवजी फक्त 'रानी तो विजुभाऊनी'........ असं म्हणावं लागेल ;)

हे वरचे 'विचार' रूपी प्रकटन "विजूभाऊ" या व्यक्तिमत्वाचंच असेल तर: हा बहुगुणी यांचा मुद्दा गौण आहे. आयुष्यात आपण जी काही ५-१० जॉली माणसे बघितली, त्यात विजुभौंचा नंबर बराच वरती लागतो हा परिकथेतील राजकुमारांचा मुद्दा देखील गौण आहे. विजुभाऊ नीड्स अ लिसनर फ्रेंड इन अस Not necessarily गवि. Perhaps he needs a sounding board, to know that he is not alone in feeling / experiencing this . वरील प्रतिसादांमधून त्यांना जसे उपदेश मिळाले तशीच ही जाणीव सुद्धा झालीच असणार. मलाच केंद्रस्थानी ठेवून वर्तुळं काढायचो तेव्हा मला असे काही वाटायचे. पण इतरांना केंद्रात ठेवून मी परीघावर गेलो तेव्हा जास्त सुखी झालो रामदास यांच्या ह्या प्रतिसादाशी सहमत. विजूभाऊ, हे वाचून परिक्रमेच्या यादीत तुमचंही नाव जोडावं वाटतंय. जोडू का? विलासराव, तुम्ही व मी.. इतर काही होता आलं नाही त्याबद्दल खंत बाळगतानाच काही काळासाठी खरे फकीर होऊन पाहू. कुणीतरी आहे पण कुणीही नाही यापेक्षा काही काळासाठी फकीर होऊ. मग जे खरोखर आहोत ते आणखी सुस्पष्‍ट होईल कदाचित.. यकु, तुमच्या परिक्रमेच्या यादीत माझेही नाव जोडा ( स्त्रियांनी येण्याची हरकत नसल्यास)... नाहीतरी शेवटी प्रत्येकाने स्वत:चेच शोधायचे आहे जीवनाचे प्रयोजन...

>>यकु, >>तुमच्या परिक्रमेच्या यादीत माझेही नाव जोडा ( स्त्रियांनी येण्याची हरकत >>नसल्यास)... नाहीतरी शेवटी प्रत्येकाने स्वत:चेच शोधायचे आहे >>जीवनाचे प्रयोजन... चला.. लागा तयारीला बरेच मेंबर्स झाले.. विलासराव, इन्दुसुता, विजुभौ, मी

जीवन सुंदर आहे! त्याला आपण सारे मिळुन अजुन सुंदर बनवू या!!

नुकतीच तिशी पार केली.. धाग्यातला आर्त अस्वस्थपणा बरेचजण जाणवूनदेखील (बरेच जण न जाणवून कदाचित) उपदेश, सल्ले देत होते-देत आहेत, हे पाहून काय म्हणावे समजत नाही. याला निराशा म्हणता येईल की अस्वस्थता ? मग पुढे काय ? कुठे तरी असं वाटतंय की या प्रश्नांना मांडुच नये म्हणजे बर्‍याचशा पुस्तकी उपदेशांपासून तरी सुटका .. तरी पण प्रश्न छळत राहतात त्याला उत्तर नाहीच. असो, विजूभौना या भावना इथे मांडल्याबद्दल धन्यवाद .!!

मीही पुढल्या वर्षात ३० पुर्ण करेन ... बट माय ब्लड इस स्टिल वार्म ...रादर ... बॉयलिंग हॉट !! गणित , बुध्दीबळ , संगीत , काही इतर कला शिकायच्या सोडल्या तर वयाचा तसा काहीही फरक पडत नाही ... एज इज जस्ट अ नंबर ! शिवाय पुरुष तर कधीच म्हातारा होत नसतो ... फौजा सिंग विषयी ऐकले आहे का ? हे पहा http://en.wikipedia.org/wiki/Fauja_Singh! अवांतर :बाकी वरील चर्चेतुन विजुभाऊ तुम्ही बासरी वाजवाता असे कळाले , एकदा कधीतरी मैफील जमवा राव :)

In reply to by प्रसाद गोडबोले

इथे जगणे सोडून द्यायच्या किंवा ते रडत खडत जगण्याबद्दलचा मुद्दा नाहीये. बहुतेक जण आपापल्या आवडीच्या कला, छंद जोपासतातच. नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करतात, अगदी आजूबाजूच्या लोकांसाठी ते सदैव हसरे व्यक्तिमत्त्व असेल पण तरीदेखील 'ओझ्याचा बैल' असल्यासारखी जाणीव, निर्मितीच्या आनंदाच्या आधी अनुभवलेल्या जाणीवांची कमतरता अथवा दोन पिढ्यांच्यामधला/ली फक्त एक दुवा/साखळी अशी एक भावना (जी बहुतांश तात्कालिक असू शकते) त्याबद्दलची अस्वस्थता व्यक्त होत असेल ती नाकारता येत नाही.. बाकी इथे तसा रक्त थंड पडण्याचाही काही संबंध नाहीये राव. :)

'Geniuses are the luckiest species on the earth; for, what they like to do most often coincides with what they have to do' असं एक वाक्य अनेक वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं, ते अजूनही लक्षात राहण्याचं कारण एवढंच, की ते मनोमन पटलं होतं. अर्थातच, जिनिअस अल्पसंख्यच. बहुसंख्यांच्या वाट्याला तुमचंच भागधेय येणार. अनेक विषयात डोकावण्याची ज्यांची वृत्ती त्यांना तर अधिकच. एक ना धड भाराभर चिंध्या. तरी तुम्ही बरंच काही केलंय - आणि करताय. आम्ही काय म्हणायचं? पण, मला आता दुःख नाही वाटत. प्रत्येकजण कसा जिनिअस होईल, नाही का? आणि असंही आहे, एक भीमसेन असतील तर ऐकायलाही दहा हजार हवेत ना माझ्यासारखे? आणि हे नुसतं मनाचं खोटं समाधान करून घेतोय असं नव्हे. कारण you should not be happy or unhappy by comparison हेही नंतर केव्हातरी समजलं - आणि उमजलंही. मी इतक्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो हेही कमी नाही, ह्याची जाणीव झाली. कमी नव्हे, खूपच आहे खरं तर, हे लक्षात आलं. असो. भरकटत गेलो का?

आणि काय हो विजुभाऊ, तुम्ही म्हणता तुम्ही लेखक झाला असता. मग काय झालं असतं? चॅनेल मालकाच्या लहरीखातर आणि TRP साठी अत्यंत मूर्ख आणि मठ्ठ अशा मालिका लिहीत बसला असतात? पैसे मिळाले असतेही, पण आनंद वाटला असता? नट झाला असतात तर? काही अपवाद वगळता, तिथेही तीच बोम्ब. बघताय ना डॉ. गिरीश ओक काय करतायत टीव्हीवर? आत्ताच प्रतिमा कुलकर्णींना कुणातरी भंगड कलाकाराला बक्षीस - पुरस्कार - देताना पाहिलं. अतिशय प्रतिभाशाली दिग्दर्शिका, पण 'तुपारे'सारखी यशस्वी मालिका देऊ शकणार नसतील तर काय, पुरस्कारच वाटायचे, ही किंमत करतं जग तुमच्या प्रतिभेची. गायक नाहीतर वादक? आणि काय करणार होतात - रियालिटी शोवर जाऊन परीक्षक बनायचं, कशालाही जिनिअस, आउटस्टँडिंग, इ. इ. विशेषणं बहाल करायची, हे? ह्यापेक्षा वडापाव विकणारा मनुष्यसुद्धा अधिक प्रामाणिकपणे पैसे कमावतो. तात्पर्य; वडिलांचं ऐकून तुम्ही इंजिनिअर झालात, हेच योग्य झालं.

लेखक होऊन काय झाले असते हे सांगायचे तर स्वतःला ज्यात मनापासून आनंद वाटतो असे काही करता आले असते. अर्थात के सरा सरा सरा........ जे आवडते ते करता येणे हे किती महत्वाचे असते काय सांगू. गायक चित्रकार काहीवेळा हालाखीत असतात. मनाने खचतात पण त्यांना कलेची तंद्री लागली की त्या क्षणापुढे सगळे जग विसरतात. पुन्हा उभारी घेतात