आजोबांच पेन

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
2 Dec 2011 - 6:40 pm

नमस्कार मंडळी,

कधी कधी उन्हाळ्यात एक थंड हवेची झुळुक येते, ऊर भरून आपण श्वास घेतो, थंडावा अंगभर पसरतो. श्वास न सोडावासा वाटतो. पण निसर्गाचा नियम.. श्वास सोडावाच लागतो.
असंच काहीसं सुख आणी दु:ख. ते यावं आणि जावं हेच कदाचित आयुष्य. :)

कॉलेज मधे होतो तेव्हा "मेस"वर जेवायचो. मेसवर एक आजोबा यायचे. खळखळून हसायचे. आम्हाला सामील व्हायचे. वय ८५ आहे असे ते म्हणायचे. दुपारी आणि रात्री भेटायचे. आम्हाला बघून खुप खुश व्हायचे. हसायचे, आमच्याबरोबर विनोद करायचे आणि स्वतःचे तरुणपण आठवून पुन्हा खुश व्हायचे.

आजोबा एकदा जेवणानंतर गप्पा मारताना म्हणाले की त्यांच्या वयाचे त्यांच्याबरोबर कुणीच नाही. आम्ही म्हणालो की म्हणजे? मग ते म्हणाले कि त्यांचे सर्व मित्र, नातेवाईक सर्व स्वर्गवासी झाले आहेत. आहेत ती दोन मुले ईतर देशात स्थाईक झाली आहेत. कधी कधी फोने येतो आणि मनीऑर्डरही.

आजोबांना पेंशन होती. एकटेच रहात. कपडे घालणं व्यवस्थित, डोक्याचा भांग पाडलेला. चेहरा कायम हसरा. मेसवर कितीही चेष्टामस्करी आणि पैसे वेळेवर न दिल्याने अपमान झाला तरीही. त्यांचा खिशाला नेहमी एक पेन असे. मला नेहमी प्रश्न पडायचा, की या वयात हा माणून पेनाचं काय करत असेल? मी एकदा विचारलं
मी: आजोबा हा पेन तुमच्या खिशाला नेहमी असतो? तुम्ही लिहिता की तुम्हाला सवय आहे म्हणून? (त्यावेळी मी कॉलेजकुमार असल्याने उत्सुकतेपोटी)
आजोबा: अरे हा पेन साधासुधा नव्हे. तुझ्या आज नसलेल्या आजीने १० वर्षापुर्वी भेट म्हणून दिला होता. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी. वेगळीच चमक आली होती त्यांच्या चेहर्‍यावर. त्यादिवशी मला प्रेम किती दृढ असू शकतं याची पुसटशी कल्पना आली होती. त्यानंतर आजोबा मला आज्जीचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस मुलांचे वाढदिवस हे सगळे किस्से रंगवून रंगवून सांगत, त्यांना जणू एक नवा मित्रच मिळाला होता. कितीतरी आठवणींचा खजिना त्यांनी माझ्यासमोर रिता केला. मी अडाणी त्यावेळी समजू शकलो नाही ते सगळं.

एकदा त्यांच्या घरी गेलो होतो. आजोबांचं घर म्हणजे एकदम स्वच्छ, एक श्रद्धास्थान, मोजंक सामान. महत्वाचं म्हणजे कॅलेंडर, ज्यावर सगळ्या तारखा खुणा केलेल्या. प्रत्येक गोष्टीत आजींची एक न विसरणारी आठवण. टेबलावर ठेवलेली एक एक आठवण, आणि ते पेन.

एक दिवस आजोबा मेसवर बर्‍याच दिवसांनी आले, तब्येत बरी नव्हती. मला पुण्याला निघायचं होतं रात्री. आजोबा आज मान खाली घालून जेवत होते.
मी: "आजोबा, तुमच्या खिशातलं पेन नाही आज?"
आजोबा खिशाला हात लावत अचानक थरथरले, अस्वस्थ झाले, "माझं पेन, माझं पेन" म्हणत न जेवताच परत गेले. मला वाटलं येतील परत.

पण परत आलो तेव्हा कळालं की आजोबांच पेन हरवलं आणि आयुष्य सुद्धा.

प्रेम म्हणजे काय असतं? काय असतं?

आपला
मराठमोळा

साहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 Dec 2011 - 11:34 pm | पैसा

काळजाला भिडणारी आठवण.

प्रेम म्हणजे काय असतं? कदाचित ते हरवल्यावर त्याचा अर्थ जास्त चांगला समजतो का? मुके प्राणी कुठच्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता प्रेम करतात, ते का? आणि आपल्यावर प्रेम करणार्‍यालाच आपण सर्वात जास्त दु:ख देतो असं का?

कुठचीही गोष्ट आपल्या जवळ असताना तिचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व समजत नाही. जर काही कारणाने ती आपल्यापासून दुरावली कीच ते कळतं असं का असावं?

स्मिता.'s picture

2 Dec 2011 - 11:46 pm | स्मिता.

आठवणीतला शेवट काळीज हेलावणारा होता. आयुष्याच्या संध्याकाळी प्रेमाची, आपुलकीची, किमान थरथरत्या आवाजात निघणारे चार शब्द ऐकून घेणारी कोणीच माणसं सोबत नसणं यासारखं भयानक काही नसावं असं वाटतं.

शिल्पा ब's picture

3 Dec 2011 - 8:40 am | शिल्पा ब

:(

दिपक's picture

3 Dec 2011 - 9:29 am | दिपक

ह्र्दयस्पर्शी लेखन!

सुहास..'s picture

3 Dec 2011 - 10:09 am | सुहास..

_/\_

यशोधरा's picture

3 Dec 2011 - 12:50 pm | यशोधरा

सुरेख लिहिले आहेस ममो!

sneharani's picture

3 Dec 2011 - 2:50 pm | sneharani

आठवण!!हेलावणारी आठवण छान शब्दबध्द केलीता!!