इंडोवेशन

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
5 Oct 2011 - 7:25 pm

गेले दोन दिवस इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि चेतन भगत यांचे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कंपन्यां कशा या मुलांना वापरतात यावरून वाद चालला होता. पण दोघांचाही आपल्याकडील सिस्टीम आणि त्या सिस्टीमचे प्रॉडक्ट असलेले व्यावसायीक अशा दोन्हीवर रास्त असला तरी काहीसा त्रागाच दिसत होता.

त्याच्याकडेच बघण्याचा दुसरा दृष्टीकोन कर्मधर्मसंयोगाने मला काल ऐकायला मिळाला. ठिकाण होते एम आय टी आणि वक्ते होते, डॉ. रघुनाथ माशेलकर. विषयाचा मथळा होता: Innovation's Holy Grail: Getting More from Less for Many. उपस्थित हे भारतीय तसेच अभारतीय होते - विद्यार्थी, प्राध्यापक/फॅकल्टी, उद्योजक आणि शास्त्रज्ञ. लवकर गेल्याने बसायला जागा मिळाली, अनेक जण शेवटपर्यंत उभे राहून बोलणे ऐकत होते.

विषयाच्या मथळ्याप्रमाणेच माशेलकरांच्या बोलण्याचा मतितार्थ होता की कल्पकतेने/इनोवेशनने आपण कमी रिसोअर्सेस मधे बरेच जास्त करू शकतो. अर्थात गरज असते ती कल्पकतेची. या संदर्भात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय वेगळ्या पद्धतीने विचार करत पुढे जात आहेत. ज्यासाठी त्यांनी इंडोवेशन असा शब्द वापरला. त्यांच्या भाषणाचा मुद्दा समजावून सांगण्यासाठी त्यांनी भारतात कसे आणि काय चालले आहे, काय यशस्वी झाले आहे याची आपल्याला माहीत असलेलीच पण त्यांच्या दृष्टीकोनातून उदाहरणे दाखवली. ती येथे परत थोडक्यात सांगतो:

सर्वप्रथम त्यांनी जयपूरच्या संस्थेकडून तयार केला गेलेला कृत्रिम पाय दाखवला. तशाच कृत्रिम पायाला अमेरीकेत $२००० पडतात. पण असा सामान्य भारतीयाला कसा परवडणार असा विचार करून त्यावर संशोधन करून भारतीय तंत्रज्ञांनी तयार केलेला पाय हा $५० च्या खाली मिळतो. त्याचा वापर दाखवण्यासाठी त्यांनी एक चित्रफीत दाखवली ज्यात गुढघ्यापासून खालचा पाय नसलेल्या एका माणसास त्यांनी तो पाय लावला होता. तो झाडावर चढला, तिथून उडी मारली, सायकल चालवली, चार मिनिटात एक किलोमिटर पळून दाखवले इत्यादी... ती बघत असताना सगळे अवाक झाले होते. त्यांच्या ते लक्षात आले का ते कळले नाही. पण शांतता पाहून ते मिष्कीलपणे म्हणाले, या दृश्यानंतर लोकं टाळ्या वाजवात! आणि मग सगळे एकदम जागे झाले आणि टाळ्या वाजवू लागले. :-) अर्थात त्यानंतर ते जे काही म्हणाले ते महत्वाचे होते. त्यांच्या दृष्टीने ह्या चित्रफितीतून एक संदेश जातो: जर संधी मिळाली तर सामान्य गरीब माणूस हा प्रस्थापितांच्या बरोबरीने अथवा त्याहूनही पुढे जाऊ शकतो. प्रश्न आहे तो तशी संधी उपलब्ध करून देण्याचा आणि त्यासाठी लागणार्‍या कल्पकतेचा.

त्या नंतर त्यांनी टाटा नॅनोचे उदाहरण सांगितले. नॅनो संदर्भात चाळीसएक आंतर्राष्ट्रीय पॅटंट्स आहेत. तंत्रज्ञांना रतन टाटांनी अक्षरशः अखुड शिंगी बहुदुधी गाय शोधायला सांगितले होते. किंमत काही झाले तरी $२००० अथवा कमीच असली पाहीजे. आज ते म्हणाले कंपन्यांमधे नॅनो हा शब्द स्वस्तातील इनोवेशनसाठी प्रचलीत झाला आहे. त्या संदर्भात त्यांनी "छोटू" फ्रिजचा एक फोटो दाखवला जो ग्रामिण भागात वापरात आहे.

धिरूभाई अंबानी नव्वदच्या दशकात म्हणाले की पोस्टाच्या स्टँप इतका फोन कॉल स्वस्त झाला तर सगळे जण फोन घेतील. आपण तशी मोबाईल क्रांती झालेली पाहतोच... त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील एका खेड्याचे एक गंमतीशीर उदाहरण दिले - रात्री नवरा दारू पिऊन घरी येऊन जर भांडण-मारहाण करेल असे वाटले तर मोबाईलने जोडलेल्या स्त्रीया एकमेकींस टेक्स्ट करून बोलावतात आणि अशा नवरोबाला गप करतात. थोडक्यात मोबाईल बरोबर सोशल फायदे पण झाले. अर्थात याहून अधिक फायदे त्यांनी कोळी, भाजिविक्रेते वगैरेंच्या संदर्भात सांगितले. धिरूभाईंनी त्यावेळेस ती जबाबदारी मुकेश अंबानी आणि त्याच्या टीमवर टाकली. त्यांना फक्त रिफायनरीच्या कामाचा अनुभव होता. पण आऊट ऑफ बॉक्स विचार करत त्यांनी प्रस्थापित इन्फ्रास्ट्रक्चर कसे वापरले आणि पुढे गेले.

सरते शेवटी अरविंद आय इन्स्टीट्यूटचे उदाहरण. ज्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियांना कमीतकमी $३००० पडतात त्या त्यांनी $३० ते $३०० मधे आणल्या. अर्थात ऐपतीप्रमाणे $३० का $३०० हे ठरवले जाते आणि साधारण ४०% शस्त्रक्रीया गरीबांवर मोफत केल्या जातात. बरं गुणवत्तेवर शंका येणार म्हणून त्याचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी लंडनच्या एका रॉयल इस्पितळाशी केला होता. आणि लक्षात येते की सक्सेस रेट हा अरविंद आय केअरचा जास्त आहे. (या प्रकल्पावर अधिक लिहीता येईल पण नंतर कधीतरी).

हे सगळे सर्वसमावेशक (इन्क्लूजिव) इनोवेशन आहे. त्यांना नंतर एका बाईने प्रश्न विचारला की पण असे स्वस्त होत असेल तर ज्यांनी त्यात मिलीयन्स डॉलर्स गुंतवून पद्धती तयार केल्यात त्यांचे काय? अर्थात उत्तर साधे होते - असा ट्रेंड झाला तर त्यांना बदलावे लागेल अथवा बुडावे लागेल. (माझ्या लेखी चीनशी स्पर्धा करताना आता अमेरीकेस या वास्तवाचे वेगळ्या संदर्भात भान येऊ लागले आहे).

अर्थात हे सगळे असले तरी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे याचे त्यांना भान आहे. ही उदाहरणे देताना काही व्यक्तींची स्तुती चालली नव्हती, त्यांचे उदात्तीकरण चालले नव्हते. तर फक्त माणसे वेगळा विचार करत कमी रीसोअर्सेस मध्ये जास्त कल्पकता कशी दाखवता येते, समाजाला उपयुक्त कसे करता येते हे दाखवण्याचा उद्देश होता...

म्हणून त्यांच्या दृष्टीने इनोवेशन हे केवळ आय आय टी अथवा तत्सम इतर संस्थांपुरतेच मर्यादीत नाही तर ते अगदी व्यक्तीगत पातळीवर सेकंड नेचर होणे महत्वाचे आहे असे त्यांचे म्हणणे होते. पण त्या संदर्भात एकदा टाटा च्या ऑफिसात कुणाशीतरी बोलताना ते म्हणाले की इतरत्र धोका पत्करण्यास प्रोत्साहन दिले जाते, पण आपल्याकडे धोका पत्करल्यास फासावर लटकवतात (अर्थात हे वक्प्रचार म्हणून घ्यावे!). रतन टाटांना ते भावले आणि नंतर त्यांनी "Daring to Try" नवाचे पारीतोषिक चालू केले जे अशा नव्या रीस्कस घेऊन कल्पकता दाखवणार्‍यांना दिले जाते. असे अजूनही काही सांगितले.

अर्थात एका उदाहरणामुळे "आहे मनोहर तरी गमते उदास" असेच वाटले - त्यांनीच सांगितल्याप्रमाणे लंडनमधे एका ब्रिटीश व्यक्तीने टाटाचे युरोपातील एक मोठा एम्प्लॉयर म्हणून कौतूक केले. पण नंतर विचारले की, "काही भारतीयांमध्ये वैभव आहे पण भारत कधी वैभवशाली होणार?"

त्याचे उत्तर अर्थातच सोपे नाही... म्हणून शेवटी त्यांचा मंत्र (जो नंतर त्यांनी परत व्यक्तीगत बोलताना परत परत सांगितला) तो असाच होता: "Doing well by doing good" , "Do well by doing good".

समाजजीवनमानतंत्रशिक्षणअनुभव

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

5 Oct 2011 - 7:56 pm | चिरोटा

ईनोवेशन हे केवळ मोठ्या संस्थांपुरते मर्यादित नाही. किंबहुना भारतात झालेले ईनोवेशन हे मोठ्या संस्थांतून न होता लहान संस्था/कंपन्यांकडून झाले आहे. जगातला सर्वात स्वस्त टॅबलेट कॉम्प्युटर आज भारतातून रिलिज झाला.(http://www.thehindu.com/sci-tech/article2514268.ece )

असचं इतरही बाबतीत घडूदे... स्वताइ येइल व चिन्यांना ठेचताही येइल....

लेखन आवडले.
अगदी व्यक्तीगत पातळीवर सेकंड नेचर होणे महत्वाचे आहे असे त्यांचे म्हणणे होते
मस्त!
इनोव्हेशनला नेहमीच अजूबाजूच्या लोकांचा विरोध झालेला आपण पाहतो.
अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही कारण नसताना पारंपारीक मार्गाचा अवलंब करायचा आग्रह असतो आणि तिथेच माणसाची निम्मी शक्ती संपते. स्वत:च्या माणसांशी लढणे सोपे नाही (मानसिक स्तरावर). या बाबतीत सपोर्ट ग्रूप असावा की नाही माहीत नाही...........शक्यतो नसतो. लहान मुलांच्या कल्पनाश्क्तीला वाव देणारा सपोर्ट ग्रूप म्हणजे आईवडील! मोठ्यांचे काय? अगदी सेकंड नेचर असावे असे इन्होवेटीव लोक असतात. बरेचजणांना कल्पना मांडण्यापुरतेही वातावरण नसते.

क्लिंटन's picture

5 Oct 2011 - 10:49 pm | क्लिंटन

अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही कारण नसताना पारंपारीक मार्गाचा अवलंब करायचा आग्रह असतो आणि तिथेच माणसाची निम्मी शक्ती संपते. स्वत:च्या माणसांशी लढणे सोपे नाही (मानसिक स्तरावर).

बरेचजणांना कल्पना मांडण्यापुरतेही वातावरण नसते.

पूर्णपणे पटले. जोपर्यंत गप्प बसा संस्कृती आहे तोपर्यंत असेच चालू राहणार आणि इनोव्हेशनच्या मार्गात हा प्रकार अडसर म्हणून राहणार हे नक्की.

जोपर्यंत गप्प बसा संस्कृती आहे तोपर्यंत असेच चालू राहणार आणि इनोव्हेशनच्या मार्गात हा प्रकार अडसर म्हणून राहणार हे नक्की.

डॅनियल शेच्टमन (Shechtman) या इस्त्रायली शास्त्रज्ञाला आज त्याच्या ८० च्या दशकातील शोधाबद्दल (discovering a material in which atoms were packed together in a well-defined pattern that never repeats. दुवा ) रसायन शास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. मात्र हा शोध जेंव्हा त्याने प्रथम शास्त्रज्ञांच्या समुहात सांगितला, तेंव्हा त्याला वेडात काढले गेले, इतकेच नव्हे तर त्याच्या बॉसने त्याला रीसर्च ग्रूप सोडून जायला सांगितले...

असेच एक जुने ऐकीव उदाहरणः येल विद्यापिठात फ्रेड स्मिथ नामक एका विद्यार्थ्याने मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना जो स्वतंत्र विचारांचा उद्योग चालू करायचा प्रकल्प सुचवायचा असतो तसा सुचवला. प्राध्यपकाला या फ्रेडची कल्पना अव्यावहारीक वाटली म्हणून त्याने त्याच्या प्रकल्पप्रस्तावास "सी" ग्रेड दिली. पण फ्रेड स्मिथ ला तर ती कल्पना चुकीची वाटत नव्हती. म्हणून त्याने ती तशीच स्वतःच्या जीवावर पुढे रेटली आणि फेडरल एक्स्प्रेस ही जगभर पसरलेली कुरीअर कंपनी अस्तित्वात आली... :-)

तात्पर्य: कमी अधिक फरकाने हे सर्वत्र होते. इस्त्रायलमधे पण आणि अमेरीकेतही... पण तरी लोकं हट्टाने प्रयत्न करतच रहातात. म्हणून कुठेतरी असे वाटते की इनोवेशनच्या मार्गात इतर कुठला अडसर नसतो, तर आपलीच रीस्क न घेण्याची आणि सरशी तेथे देशी वृत्ती... त्याच्या बाहेर पडायचे शिक्षण आणि आपले आपण करायचे प्रयत्न हेच त्यावर उत्तर आहे. बाकी गोष्टी आपोआप मागे येतील.

क्लिंटन's picture

5 Oct 2011 - 11:23 pm | क्लिंटन

हो बरोबर मी आणखी काही अशी उदाहरणेही देऊ शकेन. पण ही उदाहरणे झाली वर्कप्लेसमधील. सर्वत्र घरोघरी पण अशीच 'गप्प बसा' संस्कृती असते का? माझा मुद्दा या घरोघरच्या "गप्प बसा" संस्कृतीविषयी आहे.

रेवती's picture

5 Oct 2011 - 11:27 pm | रेवती

अगदी! कितीतरी आया अगदी इन्होवेटीव असतात आणि मुलांसाठी जगावेगळे प्रयत्न करत असतात. तीच तर पहिली पायरी! तिथे गप्प बसा संस्कृती आली की मुलांना कोण शिकवणार?

विकास's picture

5 Oct 2011 - 11:36 pm | विकास

माझा मुद्दा या घरोघरच्या "गप्प बसा" संस्कृतीविषयी आहे.

अंशतः सहमत. ती आहे आणि जायला पाहीजे हे मान्यच. ते माशेलकर देखील म्हणाले...

पण त्याला नावे ठेवत आपण आज मोठे झालो तरी रीस्क टेकर का होत नाही? मुकाट्याने देवधर्माचे कर म्हणले तर काही वया पर्यंत ऐकणारे पोर नंतर पूर्ण विरुद्ध जाऊ शकते/जाते आणि ते योग्यच आहे. पण तेच इतरत्र करायला का शिकत नाही?

मला वाटते या संदर्भात आपण (म्हणजे भारतीयांनी) दोन गोष्टी करण्याची गरज आहे. सर्वप्रथम भले कितीही गप्प बसा संस्कृतीतून आपण तयार झालो असलो तरी त्यातून आपल्यापुरते शक्य तेव्हढे बाहेर पडायचा प्रयत्न सातत्याने करणे. आणि दुसरे म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांना किमान आपण तसे करणार नाही, त्याची रीअ‍ॅक्शन म्हणून मोकळे मार्गदर्शन करू आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्याच्या मधे येणार नाही याची सजग काळजी घेणे.

क्लिंटन's picture

6 Oct 2011 - 9:10 am | क्लिंटन

मला वाटते या संदर्भात आपण (म्हणजे भारतीयांनी) दोन गोष्टी करण्याची गरज आहे. सर्वप्रथम भले कितीही गप्प बसा संस्कृतीतून आपण तयार झालो असलो तरी त्यातून आपल्यापुरते शक्य तेव्हढे बाहेर पडायचा प्रयत्न सातत्याने करणे. आणि दुसरे म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांना किमान आपण तसे करणार नाही, त्याची रीअ‍ॅक्शन म्हणून मोकळे मार्गदर्शन करू आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्याच्या मधे येणार नाही याची सजग काळजी घेणे.

हो बरोबर. या दोन गोष्टी करायलाच हव्यात.

पैसा's picture

5 Oct 2011 - 8:05 pm | पैसा

डॉ. माशेलकरांचं व्याख्यान तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायला मिळालं, नशीबवान आहात! टाटांनी अशी अनेक स्वस्त तंत्रज्ञानं लोकांना उपलब्ध करून दिली आहेत. फक्त ५००/- रु मधे मिळणारा वॉटर प्युरिफायर, "टाटा स्वच्छ "आहे, त्याला वीज लागत नाही, आणि तो कुठल्याही महागड्या वॉटर प्युरिफायर इतकंच चांगलं काम करतो. यात "आउट ऑफ द बॉक्स" विचार करणं हे महत्त्वाचं.

भारतात अशा प्रकारचं संशोधन जास्त होतं याचं कारण अनेक सोयीसुविधांचा अभाव हे असावं. जे उपलब्ध असेल त्यातूनच लोक जास्तीत जास्त चांगली वस्तू तयार करायचा प्रयत्न करतात.

इथे उत्तर भारतात वापरण्यात येणारं 'जुगाड' आठवतं. मिळेल ते इंजिन आणि ४ चाकं आणि स्पेअर पार्ट्स वापरून चालणार्‍या गाड्या लोकल मेकॅनिक तयार करतात. 'कचर्‍यातून कला' ती हीच! शिवाय कुठचीही साधनसंपत्ती वाया जात नाही, पर्यावरणाचं आपोआपच संरक्षण होतं हेही महत्त्वाचं.

वा वा वा!!
मस्त वृत्तांत.
अशी व्यावहारिक व्याख्यानं मी फक्त हॉलीवूडपटात पाहिली आहेत.. आपल्याकडेही होतात म्हणायची.
मला वाटतं नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारं वातावरण आपल्याकडं फारसं आढळत नाही. त्यातून जे बाहेर तयार झालं असेल तेच उत्तमच असणार असा खुळचट समज.

विकास's picture

5 Oct 2011 - 9:10 pm | विकास

मला वाटतं नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारं वातावरण आपल्याकडं फारसं आढळत नाही. त्यातून जे बाहेर तयार झालं असेल तेच उत्तमच असणार असा खुळचट समज.

माशेलकरांनी पॅटंट मिळवण्यात बराच पुढाकार घेतला. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की १९८९ पर्यंत ते नवीन शोध/कल्पना ही भारतीय सरकार अथवा कंपन्यांना कमर्शिअलाईझ करण्यासाठी दाखवत, तेंव्हा हे इतरत्र कुठे केले आहे का असा प्रश्न विचारत. त्यावर, "नाही"हे उत्तर मिळाले की बासनात गुंडाळून ठेवले जायचे. मग त्यांनी आंतर्राष्ट्रीय पॅटंट फाईल करणे चालू केले, त्यामुळे एखाद्या संशोधनाचे महत्व आपल्याच लोकांना समजू लागले....

भारतीय उद्योगसंस्थांनी केलेल्या इनोवेशन्स साठी हे पुस्तक पण छान आहे - http://www.goodreads.com/book/show/6590721-making-breakthrough-innovatio...

एक माहित असलेले कमी खर्चिक इनोवेशन .
एका नावाजलेल्या साबण कंपनीत वेष्टनात जर अनवधानाने साबण भरायचा राहून गेला तर ....
१.धावपट्टा/सरकपट्ट्याला एक आधुनिक वजनकाटा जोडला जेणेकरून वजनावरून ओळखणे सोपे जाईल.
२.धावपट्टा/सरकपट्ट्याच्या शेवटी लहान यंत्रमानव लावला जो वेष्टन उचलून खात्री करेल.

अशीच अडचण साध्या साबण बनवणाऱ्या कंपनीत आली त्यांनी ....
१.धावपट्टा/सरकपट्ट्याला आडवा असा पंखा (fan ) लावला, हवेने रिकामे वेष्टन बेल्ट वरून खाली पडेल किंवा बाहेर उडेल.

राजेश घासकडवी's picture

5 Oct 2011 - 10:28 pm | राजेश घासकडवी

या लेखात दिलेली उदाहरणं खूपच छान आहेत. नवनिर्माणातून जनसामान्यांचा उत्कर्ष साधणं यासाठी इनोव्हेशनची गरज आहेच. शेवटी दिलेलं टाटांचं वाक्य समर्पकच.

मात्र मला ही उदाहरणं वाचताना राहून राहून वृक्षारोपणाची आठवण झाली. फळं मिळावीत, सावली मिळावी, हिरवाई वाढावी म्हणून झाडं लावणं योग्यच. आपापल्या बागांमध्ये झाडं लावणाऱ्या व्यक्तीही असतात. पण आज जी व्यापक गरज आहे, संपूर्ण देशाचं वनीकरण वाढवण्याची, ती अशा एकेकाच्या झाडांमुळे कशी पूर्ण होणार? त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनीकरणाची मोहीम हाती घेणारी सुसज्ज यंत्रणा लागते.

कल्पनावृक्षांची वाढ करण्यामागेही तेच आहे. रीसर्च आणि डेव्हलपमेंटवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झाला पाहिजे - सरकारकडून, कंपन्यांकडून, व युनिव्हर्सिट्यांकडून. त्यातून निघणारी संशोधनं विकसित करून बाजारात आणण्यासाठी सुलभ मार्ग हवे. ती विकसित झाल्यावर पेटंट घेण्याची व ते सुरक्षित ठेवण्याची सोय हवी. हे हळुहळू होतंय. पण जोपर्यंत ही पोषक इकोसिस्टिम नाही, तोपर्यंत मोजक्या बागा आणि मोजकी झाडं रहाणार.

विकास's picture

5 Oct 2011 - 10:36 pm | विकास

पण जोपर्यंत ही पोषक इकोसिस्टिम नाही...

सहमत.

अजून थोडेसे: त्यांनी (माशेलकरांनी) शिक्षणाबरोबर संध्या मिळतात ह्यावर भर दिला. त्या संदर्भात स्वतःचे उदाहरण दिले. एस एस सी ला बोर्डात अकरावे आले पण विधवा आईस पुढच्या शिक्षणाला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यांना दोराबजी टाटा ट्रस्ट कडून शिष्यवृत्ती मिळाली आणि शिक्षण झाले. असे अनेक हात पुढे येणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. (त्यांनी स्वतःच्या आईच्या नावाने इनोवेशन संदर्भात एक वार्षिक मदत-पारीतोषिक जाहीर केले आहे.)

५० फक्त's picture

5 Oct 2011 - 11:32 pm | ५० फक्त

कालपासुन संध्या हा शब्द वाचतोय, इनोव्हेशन असेल तर माहित नाहि पण संधी या शब्दांचं अनेकवचन हे संधी असंच आहे, संध्या असं नाही.

विकास's picture

5 Oct 2011 - 11:37 pm | विकास

पण संधी या शब्दांचं अनेकवचन हे संधी असंच आहे

सहमत!

चतुरंग's picture

5 Oct 2011 - 11:39 pm | चतुरंग

ते अनेकवचनात केलेलं इनोवेशन आहे, असं खोडून काढू नका राव! ;)

(संध्यासाधू) रंगा

अन्या दातार's picture

7 Oct 2011 - 1:15 pm | अन्या दातार

गप्प बसा हो! ;)

केशवराव's picture

5 Oct 2011 - 11:34 pm | केशवराव

मूळ लेख आणि त्यावरील सर्व प्रतिक्रिया छान .
असेच लेखन येऊदे.

चतुरंग's picture

5 Oct 2011 - 11:49 pm | चतुरंग

माशेलकरांचं व्याख्यान ऐकायला मिळालं ही चांगली संधी लाभली. त्यांचे विचार मननीय आहेत.

-रंगा

lakhu risbud's picture

6 Oct 2011 - 12:00 am | lakhu risbud

विकास साहेब माशेलकरांच्या या भाषणाचा दुवा मिळेल काय ?कोणीतरी रेकॉर्ड केले असल्यास हे भाषण ऐकायला आवडेल.
आणि आपल्या नॅनो संदर्भात चाळीसएक आंतर्राष्ट्रीय पॅटंट्स आहेत हे वाचून तर आश्चर्य वाटले,या बद्दलची पण अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक.
लोकसत्तेतील कुबेरांचा लेख आत्मचिंतन करण्यास लावणारा आहे.

विकास's picture

6 Oct 2011 - 12:39 am | विकास

त्यांचे भाषण टेप केलेले पाहीले. जर ते जालावर ठेवल्याचे कळले तर येथे दुवा देईन.

गिरीष कुबेरांच्या लेखाबद्दल धन्यवाद.

lakhu risbud's picture

6 Oct 2011 - 12:02 am | lakhu risbud

वरील प्रतिसादात दुवा आला नाही,हा दुवा,
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=184...

मस्त. वरील बहुतेकांशी सहमती. अगदी शाळेपासुनच तुम्हाला काय वाटते? काय आवडते? ही गोष्ट कशी असावी? वगैरे बद्द्ल मत विचारावं, त्यांना विचार करायला प्रवृत्त करावं. शाळेत आनंदच असला तरी पालक मिळुन शाळेत याविषयी काय करता येईल यांची यादी देउन शाळा प्रशासनाला तसे करण्यास भाग पाडु शकतात : हा एक माझा विचार. आपल्याकडे पायखेचु वृत्ती असल्याने कितपत प्रभावी ठरेल शंकाच आहे. असो.

छान माहीती मिळाली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2011 - 7:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धागा प्रतिसाद आवडले. सतत तक्रारीच वाचायला मिळत असताना अशा पॉझिटीव्ह पद्धतीने विचार व्यक्त करणारा धागा म्हणून विशेष कौतुक.

क्रेमर's picture

6 Oct 2011 - 9:11 pm | क्रेमर

माशेलकरांची इंडोवेशन ही संज्ञा वाचून मला इंडोटेशन (इंडिया+मेडिटेशन) ही एक धेडगुजरी कल्पना सूचली आहे. इंडोवेशनचे काय व्हायचे असेल ते होवे पण इंडोटेशनच्या क्षेत्रात भारताने क्रांती घडवून आणली आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Oct 2011 - 7:24 pm | निनाद मुक्काम प...

सुंदर लेख आहे .
माझ्या मते स्वातंत्र्यानंतर भारतात चलनाचे जेवढे अवमूल्यन झाले त्याहून कैक पटीने हुशार ह्या शब्दाचे झाले आहे .
''वर्षभर घोका नी, ३ तासाच्या परीक्षेत ओका'' .ह्या प्रकारामुळे अनेक सो कोल्ड हुशारांचे लोंढे देशात निर्माण झाले व त्यातून कोचींग क्लासेस चे जाळे.

सीवी रामन ह्यांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यानंतर हुशारांचा जो काही दुष्काळ आपल्या देशात पडला तो वाजपेयी ह्यांनी जय विज्ञान अशी घोषण देऊन एक दशक झाले तरी थांबला नाही .( भारतीयांनी परदेशात जाऊन नोबेल मिळवले .)

इयत्ता सहावीत डॉ होमी भाभा ह्यांच्या नावाने परीक्षा घेतली जाते . त्यात सुवर्ण पदक मिळवणाऱ्या आमच्या शाळेतील विद्यार्थी अपुर्या मार्गदर्शना अभावी पुढे चाकोरी बध्द अभासक्रम निवडतांना मी पहिले आहे .तेव्हा ह्या परीक्षेचा मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो .

आय आय टी साठी जीवाचे रान करणाऱ्या लोकांना इस्त्रो मध्ये जावेसे वाटत नाही .
आज इस्त्रो ने चांदयान मोहीम असो की लघु पल्ल्याचे उपग्रह असो , जगात स्वतःच्या गुणवत्तेचा स्वस्त नी मस्त असा लौकिक कायम करून नासाचे अनेक ग्राहक देश आपल्याकडे वळवले . जर्मनी मधील अनेक विद्यापीठ आपल्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी नासा पेक्षा इस्रो ला पसंती देतात .
कालच आपल्या आणी फ्रेंच विद्यापीठाचे उपग्रह आणी त्यांच्या आणी आपल्या देशाचा उपग्रह हवामानविषयक ( शेतकर्यासाठी ) यशस्वी प्रक्षेपित झाला .