७) एका खेळियाने - "युनायटेड" वुई स्टॅन्ड

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
27 Sep 2011 - 8:56 pm

परवाच आमच्या पराचं "भन्नाट" वाचत होतो... सु.शि. म्हणजे आधीच आपला वीक पॉईंट. त्यात पराच्या कन्सेप्टनीच डोक्याला शॉट दिला. दारा, मंदार, फिरोज आणि अमर विश्वास एकत्र?? एकेकाच्या "परा"क्रमाच्या कथा वाचताना सुद्धा भान हरपायला होतं. आणि हिथंतर पराभाऊ काय सांगून राहिले? दाराची अमानवी ताकद, अमरचं अफाट डोकं, मंदारचा स्मार्टनेस आणि फिरोजचं बैदुल एकत्र?? "अब्ब आयेगा मजा"। हे म्हणजे एका बाजूनी मॅक्ग्रा, दुसर्‍या बाजूनी वॉर्न, मागे गिलख्रिस्ट आणि स्लिप्समध्ये पाँटिंग झालं की राव ! च्यायला.... म्हणजे गुन्हेगार जर बोलिंग करत असेल....ग्रीनिज वा हेन्सला आउट घ्यावं तर समोर साक्षात रिचर्ड्स दत्त म्हणून हजर! कर्मधर्मसंयोगानी तो गेलाच तर कालिचरण.... चुकून त्याला घेतलाच तर लॉईड येणार... लॉईड गेला तर कॉलिस किंग !! गोलंदाजांनी श्वास तरी कसा घ्यायचा??? हे म्हणजे तुम्हाला २८ मीटर्सवर प्रतिस्पर्ध्याची बास्केट दिसतीये... फकस्त येकच अडचन हाये ! तुमच्या मध्ये मॅजिक जॉन्सन नामक ६ फूट ९ इंची दैत्य पॉईंट गार्ड म्हणून उभा आहे, त्याच्या शेजारी शूटिंग गार्ड म्हणून मायकेल जॉर्डन नावाचं रसायन आहे, स्मॉल फॉरवर्ड म्हणून दस्तुरखुद्द लॅरी बर्ड उभा आहे, पॉवर फॉरवर्ड चार्लस बार्कले आणि ह्यांच्या पुढे ६ फूट ११ इंच उंचीचा क्रिस्तियन लेट्टनर !! विश्वास ठेवा.. अश्या टीमविरुद्ध खेळण्यापेक्षा एखादा बास्केटबॉलपटू आत्महत्येचा अधिक सोपा मार्ग शोधेल !!

"सिंघम" चित्रपटात एक संवाद होता.... "कुत्तोंका झूंड कितनाभी बडा हो... उनके लिये एक शेरही काफी होता है।" - अहा रे मर्दा... काय पन ड्वायलाग हानलाय ! पण गड्याहो... जर १ - २ नाही... आक्षी ११ शेर एकत्र मैदानावर उतरले तर????

हाय का आव्वाज????

न्यूझीलंडची "ऑल ब्लॅक्स" रग्बी टीम, १९९६ - २००८ पर्यंतचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ, ८० च्या दशकातला विंडीजचा संघ, अमेरिकेची बार्सिलोना ऑलिम्पिक्सची बास्केटबॉलची "ड्रीम टीम", ५० च्या दशकातली रेयाल माद्रिद, ७० च्या दशकातली ब्राझीलची फुटबॉल टीम, टेनिसमधल्या ब्रायन बंधू, नवरातिलोवा - श्रायव्हर जोड्या, यँकीज, लेकर्स, बुल्सचे संघ.... अगणित असे संघ आहेत ज्यांनी त्या त्या खेळाला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. एका खेळियानेच्या निमित्तानी आपण महान, दिग्गज खेळाडूंची ओळख करून घेत आहोत. पण खेळ हा संगीतासारखाच कोण्या एका माणसाच्या करिश्म्यावर थोडेच चालतो? गीतरामायणात फक्त बाबूजी किंवा फक्त गदिमा असते तर? बासू चक्रवर्ती, मारुती कीर, मनोहारी सिंग, लूई बँक्स, केर्सी लॉर्ड ह्यांच्याशिवाय आर.डी. बर्मनच्या संगीताची कल्पना केलीये कधी? पॉल मॅकार्टनी, जॉर्ज हॅरिसन, जॉन लेनन किंवा रिंगो स्टार ह्यांच्यापैकी एकालाही बाजूला ठेऊन "बीटल्स" डोळ्यासमोर येऊ शकतील?

संगीतात जे स्थान "हार्मनीचं" तेच आमच्या खेळांत "टीमवर्कचं". वेगवेगळ्या सप्तकांमध्ये जेव्हा वेगवेगळ्या "टोन्स"चे सूर एकत्र येतात तेव्हा निर्माण होणारं नादब्रह्म आणि वेगवेगळी कौशल्यं घेऊन, वेगवेगळ्या "टेंपरामेंट"चे खेळाडू एकत्र येतात तेव्हा निर्माण होणारं सळसळतं चैतन्य ह्यात फरक तो काय? वादकानी समेवर येताना सारंगियाकडे "ये बात है।" म्हणत टाकलेली नजर आणि स्ट्रायकरनी बॉल नेटमध्ये ढकलता ढकलता मिडफील्डरच्या पासला दिलेली दाद हे सारखेच की ! डग्ग्याच्या नादावर गायकाच्या सुरांशी एकरूप होणारा कसलेला साथीदार तबलावादक आणि आपल्या आक्रमकांची ताकद ओळखून त्यांना "फीड्स" देणारा व्हॉलिबॉलचा "सेटर" ह्या दोघांची जातकुळी एकच !

"चला रे... मैदान मारूया" ह्याइतकं प्रेरणा देणारं वाक्य नसेल ! आपल्या नशिबानी अनेक वेळा असे "एकसे बढकर एक" खेळिये एकत्र आले आणि आपल्या सांघिक खेळानी त्यांनी जग जिंकलं. म्हणूनच आपला आजचा खेळिया कोणी एक व्यक्ती नाही तर एक संघ आहे.

ह्यांनी ५-१० नाही, तब्बल १३३ वर्षं जिवाचं रान करून आपला संघ जपला आहे. पोटच्या पोरासारखी त्याच्यावर माया केली आहे. डोळे दिपवणारं यश बघितलं आहे तसंच डोळ्यांसमोर अंधारी आणणारं अपयश देखील पचवलं आहे. फीनिक्स पक्ष्यासारखा हा संघ अक्षरशः राखेतून पुनःपुन्हा उभा राहिला. ह्यांचे पाठिराखे विजयाचा जल्लोष धिंगाणा घालून करतात पण पराभवानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्याला उभं राहून मानवंदना देण्यात कमीपणा मानत नाहीत. मॅचेस्टर मधल्या सर मॅट बस्बी वे शेजारच्या ओल्ड ट्रॅफर्डवर जेव्हा ७५,८९७ "रेड डेव्हिल्स"च्या मुखांतून जेव्हा "Glory glory glory Man United, And the reds go marching on, on, on. " चे सूर निघतात तेव्हा ती केवळ एका फुटबॉल क्लबची anthem नसते. माणसाच्या विजिगीषु वृत्तीचं, जिद्दीचं, लढाऊ वृत्तीचं, खिलाडूपणाचं, कष्टांच, व्यावसायिक दृष्टिकोनाचं आणि यशाची नवी शिखरं पादाक्रांत करण्याच्या निरंतर ओढीचं ते एक स्तोत्र असतं !

१८७८ साली, Lancashire & Yorkshire Railway Company च्या कोच फॅक्टरीच्या कामगारांनी Newton Heath LYR ची स्थापना केली. पहिली काही इतर रेल्वे कंपन्यांशी खेळल्यावर १९८५ साली प्रथम त्यांनी "मँचेस्टर कप" फुटबॉल स्पर्धेत भाग घेतला आणि सरळ अंतिम फेरीत धडक मारली. दुसर्‍याच वर्षी त्यांनी ती स्पर्धा जिंकली देखील. १८८९ साली शहरांच्या फुटबॉल सामन्यांची कल्पना रुजू लागली आणि १२ संघांच्या पहिल्या साखळीत Newton Heath LYR आठवे आले. २८ एप्रिल १९०२ रोजी Newton Heath चं नाव बदलण्यात आलं आणि Manchester United Football Club असं नवं नाव घेऊन क्लब पुन्हा उभा राहिला. क्लबसाठी पहिल्यांदाच J Ernest Mangnall ह्या व्यावसायिक व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली. १९०८ साली त्यांनी आपलं पहिलं लीग विजेतेपद मिळवलं. १९१० साली "ओल्ड ट्रॅफर्ड" ह्या नव्या घरच्या मैदानावर लिव्हरपूल कडून त्यांना ४-३ असा पराभव स्वीकारावा लागला आणि एका अभूतपूर्व "खुनशी"ला सुरुवात झाली. १९१४ ते १९१८ ही वर्षं पहिल्या महायुद्धात गेली. युद्धानंतरच्या कालखंडात देखील क्लबची कामगिरी यथातथाच होती. कधी उपविजेतेपद तर कधी रेलिगेशन अश्या कामगिरीच्या हिंदोळ्यावरच दुसर्‍या महायुद्धापर्यंतची वर्षं गेली. १९३२ साली जेम्स गिब्सन नावाच्या उद्योगपतीने वट्ट दोन हजार पाऊंड गुंतवून मॅन यू ला पुन्हा दिवाळखोरीपासून वाचवलं.

११ मार्च १९४१ रोजी जर्मन बाँबहल्ल्यात "ओल्ड ट्रॅफर्ड" जमीनदोस्त झालं. युद्धानंतर सर्वार्थांनी पुनर्बांधणीला सुरुवात झाली. मॅट बस्बी नावाच्या एका किमयागाराने व्यवस्थापक म्हणून सूत्रं हातात घेतली. आणि मँचेस्टर युनायटेडनी रूप पालटायला सुरुवात केली. मॅटनी क्लबमध्ये आमूलाग्र बदल केले. नवीन ताज्या दमाच्या खेळाडूंना करारबद्ध करण्याबरोबरच त्यानी व्यवस्थापनाच्या तंत्रातही त्यानी अनेक प्रयोग केले. खेळाडूंबरोबर सरावासाठी उतरणारा बस्बी हा पहिला मॅनेजर होता. ४६-४७ च्या मोसमात लीग फुटबॉल पुन्हा चालू झालं. आणि ५२ च्या मोसमाच्या शेवटच्या दिवशी आर्सेनलचा ६ - १ असा धुव्वा उडवत मॅनचेस्टर युनायटेडनी फुटबॉल लीग जिंकली !! ५५ आणि ५६ चे मोसम जिंकणार्‍या, २२ वर्षांचं सरासरी वय असणार्‍या "कोवळ्या पोरांच्या" ह्या संघाला ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी नाव दिलं "द बस्बी बेब्ज"! १७ वर्षं ८ महिन्यांच्या वयात इंग्लंडचं प्रतिनिधित्व करणारा डंकन एडवर्ड्स लोकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. बस्बी बेब्ज इंग्लंडमध्येच नाही तर युरोपात लोकप्रिय होत होते. ५७ साली "युरोपियन कप" खेळणारा मॅन यू पहिला संघ ठरला. उपांत्य फेरीत रेयाल माद्रिदकडून हारण्याआधी त्यांनी बेल्जियन क्लब Anderlecht ला १०-० असा तुडवला होता. आणि खरोखरंच "मॅन यू" आत्ता कुठे वयात येत होता !

पण ६ फेब्रुवारी १९५८ रोजी दुपारी ठीक ३ वाजून ४ मिनिटांनी एक अशी घटना घडली की आख्खं फुटबॉल जगत हादरलं. युरोपियन कपच्या उपांत्यपूर्व फेरीत Red Star Belgrade ला त्यांच्या मैदानावर धूळ चारून परतत असताना म्यूनिच विमानतळावरून उड्डाण करताना मॅन यू च्या संघाला घेऊन जाणारं विमान धावपट्टीवरून घसरून अपघातग्रस्त झालं. डंकन एडवर्ड्स, मार्क जोन्स, जेफ बेन्ट, टॉमी टेलर, एडी कोलमनसारख्या आठ हरहुन्नरी - गुणी खेळाडूंचा नियतीनी घास घेतला. सचिव वॉल्टर क्रिकमार, व्यवस्थापक टॉम करी आणि बर्ट व्हेली, काही पत्रकार असे १३ इतर मारले गेले. डेनिस व्हायोलेट, बॉबी चार्लटन आणि खुद्द मॅट बस्बीसारखे अनेक जखमी झाले. जॉन बेरी आणि जॅकी ब्लांकफ्लॉवर सारखे खेळाडू पुन्हा कधी खेळू शकणार नव्हते.

">

मॅन यू नी आजवर काही कमी हाल सोसले नव्हते. पण हा धक्का पचवणं खरंच कठिण होतं. "शो मस्ट गो ऑन" म्हणत त्यांनी लीगच्या १४ मॅचेस खेळल्या, पण एकच जिंकू शकले. हा "दुबळा" संघसुद्धा FA Cup च्या फायनल्समध्ये धडक मारून आला. पण तरी त्या अपघाताच्या धक्क्यातून संघ सावरला नव्हता.

५९ साली एक दिवस ओल्ड ट्रॅफर्डच्या दारात एक कॅडिलॅक थांबली. दरवाजा उघडला गेला आणि खुद्द मृत्युशी दोन हात करणारा मॅट बस्बी दोन कुबड्यांच्या साहाय्यानी उभा राहिला आणि त्यानी मान वर करून एकदा त्या भकास स्टेडियमकडे पाहिलं. मॅट आपल्या ऑफिसमध्ये आला... काही क्षणांत डेनिस व्हायोलेट आला... बॉब चार्ल्टन आला....सहाय्यक व्यवस्थापक जिमी मर्फी आला. आणि पोरं पुन्हा कामाला लागली. फाटलेलं आभाळ पुन्हा शिवायला लागली. डेनिस लॉ, जॉर्ज बेस्टसारख्या अफाट टॅलेंटेड खेळाडूंना करारबद्ध करण्यात आलं. पुन्हा नव्या जोमानं प्रॅक्टिसला सुरुवात झाली. असं म्हणतात की संकटं माणसांना जवळ आणतात. त्या एका घटनेनं सगळ्या संघालाच नाही तर हजारो.. लाखो पाठिराख्यांना, चाहत्यांना जवळ आणलं होतं. "मँचेस्टर युनायटेड" हा आता केवळ एक फुटबॉल क्लब उरला नव्हता. "आपलं मॅन यू" आता जिद्दीनी लढणार्‍यांचं, शुन्यातून जग उभं करू पाहणार्‍यांचं, संकटांच्या छाताडावर पाय देऊन पराक्रमाचा झेंडा रोवणार्‍यांचं मंदिर झालं होतं !

एक एक काडी गोळा करत पुन्हा उध्वस्त घरटं बांधायला सुरुवात झाली. चार्ल्टन, लॉ आणि बेस्टचं अफाट त्रिकूट जमून आलं. प्रतिस्पर्ध्याचा बचाव फासळ्यांसारखा कापत जाणारे रेड डेव्हिल्स पुन्हा इंग्लिश आणि युरोपियन फुटबॉल गाजवू लागले.

"बस्बी बेब्ज"नी ६३ चा FA Cup जिंकला, ६५ आणि ६७ साली लीग जिंकली आणि ६८ मध्ये Benfica ला हरवून युरोपियन कप जिंकणारा पहिला इंग्लिश संघ हा मानही मिळवला. ह्या अदभुत प्रवासाचा शिल्पकार मॅट बस्बी ६९ मध्ये संघव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाला आणि क्लबचा जनरल मॅनेजर झाला. आधी विल्फ मॅक्गिनेस आणि मग टॉम डॉकेर्थीच्या प्रशिक्षणाखाली मॅन यू पुन्हा चाचपडायला लागला. इतका की ७३-७४ च्या मोसमात १९३८ नंतर पहिल्यांदाच मॅन यू अव्वल साखळीतून बाहेर पडला.

इथेच मॅन यू चं आपल्या चाहत्यांच्या मनातलं स्थान काय आहे ते दिसून आलं. "सेकंड डिव्हिजन" च्या त्यांच्या सगळ्याच सामन्यांना प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली. आपल्या आवडत्या संघाला प्रोत्साहन दिलं. खेळाडूंनीही त्या जोरदार पाठिंब्याचं सोनं केलं. सेकंड डिव्हिजन जिंकून मॅन यू पुन्हा अव्वल साखळीत दाखल झाला. पण टीम फिजियोच्या बायकोशी "लफडं" केल्यामुळे डॉकेर्थीची उचलबांगडी झाली आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न म्हणायची वेळ आली. डेव्ह सेक्स्टन आणि मग रॉन अॅटकिन्सन विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. आणि ८६ - ८७ च्या मोसमाच्या ऐन मध्यात पुन्हा रेलेगेशनची शक्यता दिसत असतानाच अॅटकिन्सनच्या जागी अॅलेक्स फर्ग्युसन ह्या अॅबरडीनच्या व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली. अॅलेक्सनी त्या मोसमात मॅन यू ला १९ व्या स्थानावरून ११ व्या स्थानापर्यंत आणलं. क्लबवर त्याची मांड बसायला काही काळ गेला खरा. पण १९९३ चा मोसम जिंकल्यावर मॅन यू चा जो धडाका चालू आहे तो आजपर्यंत. त्याच काळात अ‍ॅलेक्स फर्ग्युसन... माफ करा - "सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन" च्या हातात गॅरी पॅलिस्टर, रायन गिग्ज, डेव्हिड बेकहम आणि पीटर श्मायकलसारखे हिरे गवसले जे पुढे बरीच वर्षं मॅन यू चे आधारस्तंभ ठरले. गिग्जतर १९९० पासून आजपर्यंत मॅन यू साठी तब्बल ८८२ सामने खेळला आहे. पण ह्या सर्वांत अग्रगण्य नाव कुठलं असेल तर ते एरिक "द किंग" कँतोना !!

कँतोना हा फुटबॉल टॅलेंटच्या बाबतीत परग्रहावरून आलेला होता. त्याची बॉलवरची हुकूमत लाजवाब होती. अफाट वेगाने चित्त्याच्या चपळाईने तो प्रतिस्पर्ध्याच्या गोलक्षेत्रात घुसला की प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायचे. कँतोनासारख्या प्रतिभावान आक्रमकाने मॅन यू मधल्या धडाकेबाज गोलस्कोररची उणीव भरून काढली आणि मॅन यू इंग्लंडमधीलच नाही तर युरोपमधला एक ताकदवान संघ म्हणून गणला जाऊ लागला. कँतोनाच्या परीसस्पर्शानी मॅन यू एका उत्तम संघावरून एक बलाढ्य संघ झाला. ९४ साली सर मॅट बस्बीच्या निधनानंतर मॅन यू नी प्रीमियर लीग आणि एफ ए कप ह्या दोन्ही स्पर्धा जिंकल्या.

१९९८ - ९९ चा मोसम मॅन यू साठी अफाट यशाचा ठरला. प्रीमियर लीग, एफ ए कप आणि युएफा चँपियन्स लीग अश्या तिन्ही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकणारा मॅन यू पहिला संघ ठरला. ह्या युएफा चँपियन्स लीगच्या अंतिम सामन्याचा किस्सा मोठा रोमांचक आहे.

२५ मे १९९९ रोजी, सर मॅट बस्बीच्या ९० व्या जयंतीच्या दिवशी बार्सिलोनामध्ये मॅन यू आणि बायर्न म्यूनिकचे तुल्यबळ संघ चँपियन्स लीगच्या अंतिम सामन्यात झुंजत होते. लीग आणि एफ ए कप जिंकणारे मॅन यू अनोखं "ट्रेबल" साधून आपल्या सर्वांत लाडक्या मॅनेजरला श्रद्धांजली वाहायला उत्सुक होते. पण त्यांच्यासमोर ऑलिवर कानचा बलाढ्य बायर्न म्यूनिक होता. लोथार मथायस, कार्स्तन यँकर, जेन्स येरेमियेस, तोमास लिंका ह्या नावांचा फुटबॉल विश्वात मोठा दरारा होता.

पहिल्याच काही मिनिटातच एका "सेट पीस"नी मिळालेल्या फ्री किकवर मारियो बासलेरनी बायर्नला आघाडीवर नेऊन ठेवलं. प्रत्युत्तरादाखल बेकहम, ड्वाइट यॉर्क, अँडी कोल जिवाच्या करारानी आक्रमणं रचत होते. पण समोर मथायस, बाबेल, सॅम्युएल कुफॉरची फळी भेदणं सोपं नव्हतं. त्यातच अ‍ॅलेक झिकलरसारखा भन्नाट आक्रमक मॅन यू च्या गोलवर असा हल्ला चढवायचा की श्मायकल आणि नेव्हिल, स्टॅम वगैरे रक्षकांच्या पोटात गोळा यावा. मिनिटागणिक दर्शकांची उत्सुकता आणि मॅन यू च्या पाठिराख्यांच्या जिवाची घालमेल वाढत होती. दुसर्‍या हाफ मध्ये पण बायर्नने बचाव भक्कम ठेवला. अ‍ॅलेक्स फर्ग्युसननी टेडी शेरिंगहम आणि ओले गुनार सोल्शायर हे आपले दोन आक्रमक मैदानात आणले तरी गोल काही होईना. मॅट बस्बीच्या जयंतीच्या दिवशी ऐतिहासिक "ट्रेबल" जिंकण्याचं मॅन यू चं स्वप्न त्यांच्या डोळ्यांदेखत धुळीस मिळत होतं. बायर्नच्या पाठिराख्यांनी मशाली पेटवून विजयोत्सव साजरा करायला सुरुवात केली.

९० व्या मिनिटाला मॅन यू ला एक कॉर्नर मिळाला. चौथ्या पंचानी ३ मिनिटांचा "इंज्युरी" टाईम बाकी राहिल्याची खूण केली. मॅन यू साठी ही शेवटची संधी होती. "अभी नही तो कभी नहीं" म्हणत गोलकीपर पीटर श्मायकल आपली जागा सोडून कॉर्नरसाठी बायर्नच्या गोलक्षेत्रात आला. बेकहमची कॉर्नर किक श्मायकलच्या डोक्यावरून यॉर्ककडे गेली.. .त्याच्याकडून गिग्ज.. गिग्जनी तो चेंडू कसाबसा शेरिंगहमकडे ढकलला आणि शेरिंगहमनी थंड डोक्यानी तो जाळ्यात धाडला !! १ - १ !! घड्याळावर सामन्याची वेळ दिसत होती ९०:३६ !! मॅन यू निदान खेळ अतिरिक्त वेळेत घेऊन जाण्यात यशस्वी ठरले होते.

खेळ पुन्हा सुरु झाल्यावर जेमतेम ३० सेकंदांत मॅन यू नी पुन्हा एक कॉर्नर मिळवला. ह्या वेळी श्मायकेल आपल्या जागेवरच राहिला. बेकहमच्या कॉर्नर किकला ह्यावेळी शेरिंगहमचं डोकं सापडलं... तिथून चेंडू गेला तो सोल्शायरच्या दणदणीत राइट फूटरच्या मार्गे पुन्हा बायर्नच्या जाळ्यात !!! मॅन यू २ - बायर्न म्यूनिक १ !! अक्षरशः काही क्षणांत मॅन यू नी बायर्नच्या तोंडचा घास काढून घेतला होता. अ‍ॅलेक्स फर्ग्युसनच्या दोन बदली खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी दोन गोल करत बाजी उलटवली होती. एका मिनिटापूर्वी विजयोन्मादाने जल्लोष करणारे बायर्नचे पाठिराखे आता सुन्न झाले होते. विजय स्पष्ट दिसत असल्यामुळे ८० व्या मिनिटाला बदलला गेलेला कर्णधार लोथार मथायस हादरला होता. एक निव्वळ अशक्यप्राय विजय मिळवून मॅन यू नी सर मॅट बस्बीना आदरांजली वाहिली होती.

">

ह्या ऐतिहासिक विजयानंतर मॅन यू ची लोकप्रियता गगनाला भिडली नसती तरच नवल. त्यानंतर प्रीमियर लीग, लीग कप, चँपियन्स लीग, कम्यूनिटी शील्ड, फिफाचा क्लब फुटबॉलचा विश्वचषक... मॅन यू नी फुटबॉलमधल्या प्रत्येक प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली. प्रीमियर लीगच्या १९ मोसमांमध्ये त्यांनी थोडीथोडकी नाही तर तब्बल १२ विजेतेपदं मिळवली आहेत. ह्या मोसमात सुद्धा कर्णधार नेमांजा विदिक, वेन रूनी, नानी, हाविएर हर्नांडेझसारख्या अफलातून खेळाडूंसह त्यांनी चेल्सी आणि आर्सेनलसारख्या अव्वल संघांना आतापर्यंत धूळ चारली आहे. त्यांचे पाठिराखे आपल्या लाल टीशर्ट्सवर गेल्या ४८ वर्षांपासून बाळगलेला "क्रेस्ट" छातीवर अभिमानाने मिरवत आहेत.

१३३ वर्षांचा इतिहास असलेला मॅन यू फोर्ब्सच्या सर्वांत लोकप्रिय क्रीडा ब्रॅन्डसच्या यादीत दुसर्‍या स्थानावर आहे. आज क्लबचं मूल्य जवळपास २ अब्ज डॉलर्स आहे. २४ देशांमध्ये त्यांच्या पाठिराख्यांचे २०० पेक्षा अधिक अधिकृत सपोर्ट क्लब्ज आहेत. काही कंपन्यांच्या अंदाजाप्रमाणे त्यांचे जगभरात ३० कोटींपेक्षा जास्त चाहते आहेत. आजही प्रीमियर लीगच्या त्यांच्या सामन्यांच्या प्रेक्षकांचे आकडे इतरांचे डोळे फिरवतात. नानी, रूनी, हर्नांडेझ मॅन यू च्या गळ्यातले ताईत आहेत. फेसबुकवर त्यांचे जवळपास दोन कोटी चाहते आहेत. एक व्यावसायिक फुटबॉल संघ म्हणून मॅन यू कडे जगातला प्रत्येक मान, सन्मान, मरातब आहे... प्रचंड पैसा आहे आणि पाठिंबाही !

आजकाल खेळांमध्ये.. त्यातही फुटबॉलमध्ये प्रचंड पैसा आहे. रेयाल माद्रिद, बार्सिलोना, साओ पावलो, ए सी मिलान ही प्रचंड लोकप्रिय नावं आहेत, चेल्सी, म्यूनिक, युवेंटसना आपलं वेगळं ग्लॅमर आहे, आर्सेनल, बोका ज्यूनियर्स, सेल्टिक, मोनॅको मध्ये अफाट खेळाडू आहेत आणि लिव्हरपूल, टीएसव्ही म्यूनिकसारख्या क्लब्जना मोठा इतिहास आहे ! आणि मॅन यू जवळ ह्यातली प्रत्येक गोष्ट आहे. परंपरा, अव्वल दर्जाचं फुटबॉल, लोकप्रियता, ग्लॅमर ह्या प्रत्येक निकषावर मॅन यू चं नाणं खणखणीत आहे. आणि म्हणूनच मॅंचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब आपलं वेगळं अस्तित्त्व, आपली वेगळी ओळख टिकवून आहे.

आपल्याकडे "वास्तुपुरुष" ही संकल्पना आहे. प्रत्येक वास्तुला आपलं असं एक व्यक्तिमत्व असतं म्हणतात. जुने वाडे पेशव्यांच्या पराक्रमाच्या कथा सांगतात तर नवी अपार्टमेंट्स त्यात राहणार्‍या कारकुनांच्या व्यथा ! संध्याकाळी कधी शनिवारवाड्यात गेलात तर तो नुकतीच पगडी काढून शेंडीची गाठ सोडलेला वयस्कर पण तेजःपुंज चेहरा तुम्हाला त्याचा इतिहास सांगतो. गारद्यांच्या गर्दीत सापडलेल्या नारायणरावांचा "काका मला वाचवा" असा आक्रोश कानांवर येतो. महादरवाज्यावर सोसाट्याच्या वार्‍यात छातीचा कोट करून, भक्कम पाय रोवून आपल्या आकडेबाज मिशांना पीळ देणारा रायगड बघितला आहात कधी? गड कोटांचं जाऊदे... पहाटे पावणेतीन वाजता सी एस टी वरच्या शांततेत कधी बग्गीच्या टापांचा आवाज ऐकू आलाय तुम्हाला?

ह्याच वास्तुपुरुषांसारखं जर मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचं काही व्यक्तिमत्त्व असेल तर ते अस्सल रांगड्या इंग्लिशमनचं आहे. ह्याचे हात कोणे काळी शेतात राबून राठ झालेले असले तरी त्याचे कपडे स्वच्छ आहेत. सूट खुंटीवर लटकवलेला आहे.. टायची गाठ सैल आहे... ताठ कणा, भरदार छाती, मजबूत खांद्यांचा हा उंचापुरा गडी आहे. हातांत त्याची आवडती बियर आहे. तोंडात पाईप आहे...खुरटी सोनेरी दाढी आहे.. चेहर्‍यावर बाssssरिक लाल - तांबूस ठिपके आहेत, निळे - विलक्षण बोलके डोळे आहेत. त्यांमध्ये अगदी लहान मुलाची निरागसता आहे.. ओठांवर स्मित आहे. फुटबॉलवर याचं निरतिशय प्रेम आहे. ज्यो स्पेन्स, बॉब चार्लटन, जॉर्ज बेस्ट ही त्याची दैवतं आहेत...आर्थर अ‍ॅलबिस्टन, ब्रायन रॉबसन, एरिक कँतोनाच्या कथा तो रंगवून रंगवून सांगतो...रॉय कीन, निकि बट, बेकहम, पॉल श्कोल्सचे दिवस आठवून तो "गेले ते दिन गेले" म्हणत उसासे टाकतो...नानी, रूनीसारख्या खेळाडूंचा उल्लेख "the new kids on the block" असा करताना त्याच्या डोळ्यांतून कौतुक ओसंडून वाहत असतं. प्रचंड पैसा आणि मानसन्मान असतानादेखील ह्याने आपली मूल्य, आपली "रूट्स" जपलेली आहेत. आणि म्हणूनच मॅन यू... द मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब आमच्यासाठी केवळ एक संघ नाही... आमचं आयुष्य अजून समृद्ध करणारा एक खेळिया आहे !

(सर्व छायाचित्रं आणि चित्रफिती जालावरून साभार)

क्रीडामौजमजाविचारमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

27 Sep 2011 - 9:15 pm | शुचि

>> संगीतात जे स्थान "हार्मनीचं" ............... दिलेली दाद हे सारखेच की ! >>
फूट्बॉल चा सामना कधी आवडीने पाहीला नाही परंतु आपले लेख तरीही खूप आवडतात. "एका खेळीयाने" ही संपूर्ण मालीकाच अतिशय सुरस, वाचनीय आहे. प्रत्येक वाक्यागणीक टीमचा/ खेळाडूचा चैतन्य, जोश, उत्साह, आत्मविश्वास, ताकद ओसंडून वहाते. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक लेखात "टीमवर्क" ला दिलेले महत्व. सुपर्ब!!

jaypal's picture

27 Sep 2011 - 9:39 pm | jaypal

बा.डी.स.
पु.ले.शु.
कीप इट अप :-)

ह्म्म्म....

जे पी ने कोण्या एका संघाची बाजू घ्यावी हे आवडलं नाही :) असो...पण रायन गिग्ग्स माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे.

अवांतर : तू मॅन यू च्याबाजूने आहेस म्हटल्यावर तुला लिव्हरपूल बद्दल लिही म्हणून सांगण्यात काही अर्थ नाही ;)

जे.पी.मॉर्गन's picture

27 Sep 2011 - 9:52 pm | जे.पी.मॉर्गन

मी मॅन यू वाला वगैरे नाही रे प्रभो :). अरे वेगवेगळ्या संघांचा विचार करत होतो...बरेच संघ हे कोण्या विशिष्ट काळात दादागिरी करून गेले. काहींचा इतिहास अगदीच अलिकडचा आहे. काहींना तितकं "ग्लोबल अपील" नाही. त्या निकषांवर मॅन यू परंपरा, प्रसिद्धी आणि यश ह्या तिनही निकषांवर पात्र ठरला म्हणून त्यांच्यावर लिहिलं इतकंच !

प्रभो's picture

27 Sep 2011 - 10:00 pm | प्रभो

ओक्के ...जे पी ने एखाद्या क्लबात गुंतुन स्वतःचा छोटा डॉण करू नये ;) म्हणून आपलं विचारलं रे... :)

जबरदस्त लेखन, एका खेळियाने - म्हणजे प्रत्येक वेळी एक व्यक्ति नसुन एक संघ हा पण एक खेळिया असतो ही कल्पना प्रत्यक्षात लिहिल्याबद्दल अतिशय धन्यवाद.

विवेक मोडक's picture

28 Sep 2011 - 8:24 am | विवेक मोडक

खरंच जबरदस्त.
मी आज मॅन यु चा परत एकदा फॅन झालो आहे

मी आज मॅन यु चा परत एकदा फॅन झालो आहे

.......................अगदी हेच म्हंतो....

ढब्बू पैसा's picture

28 Sep 2011 - 9:46 am | ढब्बू पैसा

खूप फुटबॉलप्रेमी नाही , नुसती तोंडाओळख आहे. मॅनयू या क्लबमागे इतका इतिहास आहे हे माहिती नव्हत़ं! लेख नेहमीप्रमाणे आवडेश :)

विकाल's picture

28 Sep 2011 - 9:55 am | विकाल

जबराट....!!!

दंडवत्स...!!!

मृत्युन्जय's picture

28 Sep 2011 - 10:06 am | मृत्युन्जय

उत्कृष्ट लेख. एकदम जे पी मॉर्गन इष्टाइल.

अवांतरः आमचे पंढरपुरचे छोटा हुसैन कुठे चेहरा लपवुन बसले आहेत?

छोटा डॉन's picture

28 Sep 2011 - 11:03 am | छोटा डॉन

लेख उत्तम आहे ह्यात वाद नाही.
जे.पी.च्या लेखणीला सलाम :)

मॅन्-यु कडे बरेच काही आहे जे इतरांकडे नाही, त्यांच्याकडे जे आहे ते इतरांना नेहमीच हवे असते पण ते काही केल्या मिळत नाही, त्यांच्याकडे असलेल्या ह्या खास गोष्टीमुळे त्यांचा प्रभाव प्रत्येक मॅचमध्ये दिसतोच, ते विजयाचे शिल्पकार असतात ... होम ग्राउंडवर असलेल्या मॅचचे रेफ्री !!! ;)

असो, लेख आवडला हे पुन्हा एकदा सांगतो.
बाकी तुर्तास आम्ही ठिक आहोत :)

- ( चेल्सीप्रेमी ) छोटा डॉन

जे.पी.मॉर्गन's picture

29 Sep 2011 - 12:00 pm | जे.पी.मॉर्गन

अगो बाबो... आग लागलेली दिसतीये ! आयला आपल्याला लई आश्चर्य वाटतं पब्लिकची इतकी अ‍ॅटॅचमेंट बघून. हायबरीला जाताना "निळ्या रंगाचा टीशर्ट घालून जाऊ नकोस" म्हणणारा इंग्रज येडा वाटला होता. पण तिथे गेल्यावर समजलं की त्याच्या बोलण्यात खरंच तथ्य होतं. वीगन कडून आर्सेनल हारल्यावर पब्लिक नी पब मध्ये जो दंगा घातला होता....इंग्लिश पब्लिक लई सेंटी असतं बाबा !

चेल्सीला शुभेच्छा ! :)

जे पी.

विसुनाना's picture

28 Sep 2011 - 11:22 am | विसुनाना

लेख बेहद्द आवडला.
सन ४६ ते ६० काळातल्या 'मॅन यु' कथेवर कोणी चित्रपट काढला नाहीय का अजून?

छोटा डॉन's picture

28 Sep 2011 - 11:38 am | छोटा डॉन

विसुनानांनी पिक्चरचा उल्लेख केला म्हणुन आठवले.

फुटबॉलवर असलेला 'दी गोल' नावाचा पिक्चर आवजुर्न पाहण्यासारखा आहे.
एका मेक्सिकन पोराची शुन्यापासुन सुरवात करुन पहिल्या भागात 'न्यु-कॅसल युनायटेड' पर्यंतचा प्रवास आणि नंतर दुसर्‍या भागात थेट युरोपियन जायंट 'रियाल माद्रिद'मधले करियर ते चॅम्पियन्स लीग जिंकण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे.
मस्त आहे सिनेमा.
ह्यात खरेखुरे फुटबॉल स्टार्स घेतल्यामुळे अजुन छान वाटते.

ह्या सिनेमातले २ मुख्य पात्र असलेले 'केव्हिन हॅरिस' आणि 'सॅण्टोयागो म्युनेझ' हे कुठल्याच अँगलने चित्रपट कलाकार वाटत नाही, ते जणु खरोखरच प्लेयर्स आहेत असेच वाटते. असो.

- छोटा डॉन

विसुनाना's picture

28 Sep 2011 - 11:57 am | विसुनाना

टीव्हीवर पाहिला आहे. आवडला होता.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2011 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार

जे. पी. शेठ तुम्ही उगाच आमच आवडते लेखक नाही आहात.

लेख वाचत नसून अक्षरशः एखादा चलचित्रपट किंवा मॅन्-यु वरची डॉक्युमेंटरी बघत आहोत असेच वाटत होते.

सरस लिखाण मालक. पु.भा.प्र.

अवांतर :- चेल्सी वैग्रे सारख्या फालतू टिम्सवर मात्र लिहून वेळ घालवू नये अशी विनंती.

टिनटिन's picture

28 Sep 2011 - 12:38 pm | टिनटिन

युरोपमध्ये प्रत्येक फुटबॉल टिमची एक फर्म असते. ग्रीन स्ट्रीट हूलीगन्स नावाचा एक चित्रपट आहे त्यावर. वेस्ट

टिपीकल जेपी स्टाईल लेख. :)
तस आमचं फुटबॉल प्रेम ४ वर्षातुन एकदाच उफाळुन येत म्हणा. पण लेख एकदम आवडल्या गेला आहे.

या माळेतील पुढिल पुष्प वाचण्यास उत्सुक. :)

मेघवेडा's picture

28 Sep 2011 - 5:36 pm | मेघवेडा

तंतोतंत.

नन्दादीप's picture

28 Sep 2011 - 4:50 pm | नन्दादीप

भारी लेख.

पुर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला.

मन१'s picture

28 Sep 2011 - 7:30 pm | मन१

Hats off!

अनिकेतपन्त's picture

29 Sep 2011 - 10:33 am | अनिकेतपन्त

जे.पी., आमच्या टीमवर लेख लिहलास, बर वाटल.
बाकी लोकांना 'जास्त चांगलं लिहा' म्हणुन सांगाव लागत, तुला फक्त 'जास्त लिहा' एवढंच सांगाव वाटतय.
धन्यवाद...