पर्यावरणपूरक गणेशोत्सव

Primary tabs

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
9 Sep 2011 - 11:20 pm

मध्यंतरी पुण्यातील शाश्वत फाउंडेशनच्या सौ. प्रज्ञा ठाकूर यांच्याशी संवाद झाला त्यातून त्यांच्या "पर्यावरणपूरक गणपती मुर्तीच्या" प्रकल्पाबाबत समजले. त्यांन या संदर्भात मिपाकरांसाठी माहिती देण्याची विनंती केली होती. ती खाली त्यांच्याच शब्दात देत आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव
गणाधीश जो ईश सर्व गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा

सकळ गुणांचा अधिपती असलेल्या गणेशाच्या पूजनाने सर्व कार्याचा शुभारंभ आपण करीत असतो. गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सातवाहन व चालुक्य च्या कालखंडा पासून सुरु असल्याचे दाखले आढळतात. ब्रिटीशांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या जनतेला एकत्र आणण्यासाठी १८९३ मध्ये लो. टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक केला. आता हा गणेशोत्सव फक्त धार्मिक न राहता सामाजिक व राजकीय चळवळ बनला आहे.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीची स्थापना करण्याची प्रथा आहे. नदीकाठच्या मातीपासून मूर्ती बनवून तिला हळद व पानाफुलांपासूनचे रंग वापरून रंगविली जात असे. तसेच त्यांचे विसर्जन देखील नदीत करत असत. गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धती काळानुसार बदलत गेल्या. गणेशच्या मूर्ती, सजावटीसाठी लागणारे साहित्य, गणेश विसर्जन मिरवणूक व विसर्जनाच्या पद्धती या सर्व गोष्टींवर आधुनिकतेचा प्रभाव दिसून येतो

घरोघरी बसविल्या जाणार्‍या मूर्तींमध्ये लक्षणीय वाढ होत असून हजारोच्या संख्येने सार्वजनिक गणेश मूर्ती व देखावे उभे राहत आहेत. उत्सवादरम्यान होणाऱ्या जल, ध्वनी, वायू प्रदूषण या बरोबरच विजेचा अतिरिक्त वापर यामुळे मुळ हेतू पासून गणेशोत्सव दुरावत चालला आहे.

गणेशमूर्ती मजबूत, जास्तीत जास्त उंच व वजनाला हलकी करण्यासाठी शाडू माती ऐवजी प्लास्टर ऑफ प्यारीस चा वापर होवू लागला. या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत तर नाहीतच पण त्यांचे विघटन देखील लवकर होत नाही यामुळे अशा मूर्तींचे खंडित भाग विसर्जनानंतर उघड्यावर येतात. हे प्लास्टर ऑफ प्यारीस पुनर्वापरास हि उपयोगी नसते. गणेशमूर्ती सजावटीसाठी जे मखर वापरले जाते त्यात प्लास्टिक व थर्माकोल चा वापर मोठ्या प्रमाणात आढळतो, हे घटक विघटनशील नसल्याने पर्यावरणास हानिकारक ठरतात, आणखी महत्वाचा मुद्दा येतो तो निर्माल्य विसर्जनाचा. प्लास्टिक च्या पिशव्यांमधून हे निर्माल्य नदी, तलावात विसर्जित केले जाते. अशा पद्धतीने नैसर्गिक जाल्स्त्रोतांना हानी पोहोचते व सृष्टीचे जीवनचक्र बिघडते.

वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे प्रदूषणाच्या समस्या भेडसावत आहेतच त्यात सण व उत्सव यांचे मागल्या व पावित्र्य राखावयाचे असेल तर पर्यायांचा विचार करण्याची वेळ आली आहे.

गेली काही वर्षे बर्‍याच संस्था याविषयी जनजागरण करीत आहेत, लोकांमध्ये याविषयी जागृतीही दिसून येते, त्याचेच प्रत्यंतर म्हणजे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती व सजावट साहित्य यांची वाढती मागणी. हि मागणी व उपलब्धता यांची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन शाश्वत इको सोल्युशन फौंडेशन, नवसंवेदनाई गणेश या संस्थांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सहाय्याने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती व सजावट याविषयी समाजातील विविध घटकांमध्ये यावर्षीपासून नवी मुंबई येथून प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले. या प्रशिक्षण वर्गातशाडू माती व कागदाचा लगदा तसेच कागद आणि कापड यापासून मखर व निर्माल्या टाकण्यासाठी कागदाची पिशवी बनविण्याचे संबंधी प्रशिक्षण दिले विकलांग विद्यार्थी, महिला बचत गटांतील सदस्य महिला, शाळांतील विद्यार्थी, जेल मधील कैदी अशा १०० जणांना प्रशिक्षण दिले.

गणेशोत्सवाचा आनंद निरामय व चांगल्या पद्धतीने चिरकाल घ्यावयाचा असेल तर गणेशोत्सवात होणारा अतिरिक्त वीज वापर, कचर्याची योग्य विल्हेवाट, सजावट साहित्य, ध्वनी प्रदूषणाचे निकष याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी गरज आहे ती मानसिकतेत बदल करण्याची. या गणेशोत्सवात याची मुहूर्तमेढ रोवली आहे. आपले लाडके बाप्पा देखील सुखावतील अशी खात्री आहे !

सौ प्रज्ञा ठाकूर
शाश्वत इको सोल्युशन फौंडेशन

प्रकटनसंदर्भमाहितीसंस्कृतीधर्मइतिहाससमाजजीवनमानतंत्र

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

9 Sep 2011 - 11:33 pm | मुक्तसुनीत

प्रस्तावातली कल्पना आणि एकंदरीत प्रकल्प आवडला. अनेक शुभेच्छा.

वसईचे किल्लेदार's picture

9 Sep 2011 - 11:38 pm | वसईचे किल्लेदार

गरज आहे ती मानसिकतेत बदल करण्याची
असेच म्हणतो ...

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2011 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा

चांगल आहे...असच चालू राहू द्या...या सत्कार्याला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा... :-)

पाषाणभेद's picture

10 Sep 2011 - 2:15 am | पाषाणभेद

छान प्रयत्न आहे

प्रदीप's picture

10 Sep 2011 - 10:35 am | प्रदीप

येथे उपक्रमाची माहिती आवर्जून दिल्याबद्दल विकास ह्यांना धन्यवाद.

कागदापासून बनविलेल्या मूर्ती सहजी विसर्जित होतात का?

धनंजय's picture

10 Sep 2011 - 9:16 pm | धनंजय

कागदाचा लगदा आणि माती यांच्या मिश्रणाने सहज विघटित होणार्‍या मूर्ती बनवण्याची युक्ती कल्पक आहे.

प्रदीप's picture

13 Sep 2011 - 7:54 am | प्रदीप

माझा कागदासंबंधीचा प्रश्न विस्तारून विचारतो: हा जो कागद मूर्तीसाठी वापरला जातो, तो पाण्यात सहज विरघळतो का? (भारतातील परिस्थिती माहिती नाही, पण इतरस्त्र, विकसित देशात, recyclable कागद असतो तो तरी पाण्यात विरघळतो का?)

जमायला पाहिजे, असे वाटते.

बाथरूममध्ये वपरायचा कागद विसविशीत असतो, आणि पाण्यात पडल्यावर सहज विघटित होतो. पाण्यात सहज विरघळणारा गोंदही शोधून सापडेल - तांदळाची उकड, कुठल्या झाडाचा चीक, वगैरे. त्यात मातीचे प्रमाण असे असावे, की मिश्रणाची घनता (विशिष्टगुरुत्व) पाण्यापेक्षा अधिक असायला पाहिजे : की मूर्ती तरंगू नये पण पाण्यात खाली जावी.

वरील बातमीमधील मूर्तीबद्दल मात्र विकास किंवा कोणी माहीतगार व्यक्ती सांगू शकतील.

विकास's picture

13 Sep 2011 - 8:58 am | विकास

मला देखील असेच वाटते आहे. मी त्यांच्याकडून उत्तर मिळवायचा प्रयत्न करणार आहे, म्हणून उत्तर दिलेले नव्हते.

इथे पेपरमेश (mache) हे आर्ट्स अँड क्राफ्ट्सच्या दुकानात मिळते. ती म्हणजे अक्षरशः कागदाची भुकटी असते. ती पाण्यात (कणके सारखी भिजवून) मुर्ती बनवता येऊ शकते आणि ती पाण्यात विरघळूही शकते. याची (प्रॉडक्टची) अधिक माहिती नंतर देण्याचा प्रयत्न करेन.

खाली नितीन यांनी म्हणलेला मुद्दा देखील महत्वाचा आहेच. पण नक्की काय वापरले आहे त्यावर होणारे पाण्याचे प्रदुषण गंभीर किती आहे ते ठरू शकते. पण पेंट आणि प्लॅस्टर ऑफ पॅरीस इतके प्रदुषण कागदामुळे होईल असे वाटत नाही. त्या अर्थाने "भाविकांनी" वास्तवीक कुठल्याही धातूंच्या नुर्तींचीच पुजा करणे योग्य आहे असे वाटते. पण तो वेगळा मुद्दा आहे.

विकास's picture

13 Sep 2011 - 4:30 pm | विकास

वरील लेखात्/छायाचित्रात केलेल्या मुर्ती या पूर्ण रिसायक्लेबल पेपर पल्प ६०% आणि शाडूची माती ४०% एकत्रीत करून केल्या आहेत. त्या पाण्यात लवकर विरघळतात असा अनुभव आला आहे.

जाई.'s picture

10 Sep 2011 - 10:16 pm | जाई.

स्तुत्य उपक्रम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2011 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपक्रम चांगलाच आहे. सार्वजनिक गणेत्सोवाच्या मंडळांबरोबर घरोघरी बसवल्या जाणा-या गणेशाच्या मूर्ती याबाबत प्रबोधन होणे गरजेचेच आहे. आमच्या औरंगाबादेत पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या बाबतीत जागृती करण्याचा प्रयत्न होतांना दिसला. म्हणजे यावेळेस अशा बातम्या अधून मधून वाचनात आल्या. परंतु त्याचे प्रमाण केवळ दैनिकात बातमी छापून येण्यापूर्तेच दिसले.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि त्यासोबत वापरले जाणारे कागदांचे मखर याबाबतीत नागरिकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग लाभला पाहिजे, यासाठी मूर्ती आणि सजावटीच्या वस्तू स्वस्त आणि अधिक आकर्षक करता आल्या पाह्जेत असे वाटते.

श्री विकास यांनी शाश्वत फाउंडेशनच्या प्रकल्पाची ओळख करुन दिली त्याबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

सहज's picture

11 Sep 2011 - 9:51 am | सहज

अजुन महाराष्ट्र सरकारनेच काही नियम, कायदे केले आहेत का?
निदान २०१२ पासुन संपूर्ण महाराष्ट्रभर फक्त पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच उपलब्ध होणे अशक्य आहे का?
असे काहीसे नियम आणल्यास आमच्या धर्मात ढवळाढवळ का करता ? असा पुरोगामी महाराष्ट्रातून विरोध होईल का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2011 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या धर्मात ढवळाढवळ का करता ? असा पुरोगामी महाराष्ट्रातून विरोध होईल का?

कालच कोणत्या तरी दैनिकात बातमी होती की, दीड दिवसांच्या की, पाच दिवसांच्या गणेशोत्सावातील मूर्त्या विसर्जनाच्या वेळी पाण्यात विरघळलेल्या नाहीत म्हणून काही सामाजिक उपक्रम राबविणा-या मंडळींनी काठावर पडलेल्या त्या मूर्त्या पुन्हा पाण्यात विसर्जीत केल्या. गणेशोत्सवातील मूर्त्या समूद्रात विसर्जीत केल्यानंतर समूद्राच्या काठावर भग्न झालेल्या मूर्त्यांचे फोटो आपल्याला मेल्स मधून येतात तसे ते फोटो सार्वजनिक रस्त्यावर गणेशोत्सवाच्या काळात लावले पाहिजेत. आपल्या देवबाप्पाची नंतरी अशी अवस्था पाहून धार्मिक मंडळी कदाचित पर्यावर्णपूरक गणेशाच्या मूर्त्या स्थापन करतील. काय म्हणता ?

-दिलीप बिरुटे

विकास's picture

12 Sep 2011 - 7:03 pm | विकास

गणेशोत्सवातील मूर्त्या समूद्रात विसर्जीत केल्यानंतर समूद्राच्या काठावर भग्न झालेल्या मूर्त्यांचे फोटो आपल्याला मेल्स मधून येतात तसे ते फोटो सार्वजनिक रस्त्यावर गणेशोत्सवाच्या काळात लावले पाहिजेत.

पुर्वी असले प्रकार केले गेले आहेत. नक्की माहीत नाही, पण मला वाटते की माध्यमांनी स्वेच्छेने अथवा काही अंशी अप्रत्यक्ष बंदीमुळे असे फोटो छापणे बंद केले आहे.

खाली ऋषिकेशने म्हणल्याप्रमाणे कॅच देम यंग हे महत्वाचे आहे.

सहज's picture

13 Sep 2011 - 7:05 am | सहज

मनोभावे गणपती स्थापना, उत्सव साजरे करणार्‍यांनी, विसर्जन केल्यावर हे असे दृश्य दिसु शकते यावर काही विचार केला आहे?

पैसा's picture

11 Sep 2011 - 10:33 am | पैसा

या गणेशोत्सवात मी सावंतवाडी, पणजी अशा काही ठिकाणी मोठे "निर्माल्य कलश" विसर्जनाच्या जागी ठेवलेले पाहिले. लोक मूर्तींबरोबरचे निर्माल्य त्यात टाकतात.

इथे गोव्यातल्या आणखी एका प्रथेचा उल्लेख करते. पोर्तुगीज काळात मूर्तीपूजेवर बंदी आणल्यामुळे तेव्हापासून काही घरातून गणेशोत्सवात गणपतीच्या तसबिरीची पूजा केली जाते. तेव्हा विसर्जनाचा प्रश्नच येत नाही. तसंच कोकण-गोव्यात फुलाफळांची माटोळी तयार करण्याची पद्धत आहे. इथेही थर्माकोल वगैरे वापरलं जात नाही. काही घरातून लाकडाच्या जुन्या मखरांचा वापर केला जातो. ही मखरं गणेशोत्सव संपताच घडी घालून परत माळ्यावर जातात, त्यातून कचरा तयार व्हायचा प्रश्नच येत नाही.

माझ्या सासर्‍यांकडे विजेच्या दिव्याऐवजी समई पेटवून ठेवलेली असते. गणपतीची मूर्ती गावच्या कलाकाराकडची शाडू मातीची असते.तसंच गणपतीचं विसर्जन नदीत न करता घरच्या विहिरीजवळ पाण्याचा हौद भरून त्यात करतात. ते मातीमिश्रित पाणी नंतर झाडांना घालतात.

शक्य असेल त्यानी अशा टिकाऊ मखरांचा आणि नैसर्गिक वस्तूंचा उपयोग केला तर पर्यावरणविषयक बरेच प्रश्न तयार होणार नाहीत.

शाहरुख's picture

11 Sep 2011 - 11:06 am | शाहरुख

मी काय म्हणतो, सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरुप बघता, तिथे गणपतीच्या मुर्तीचीच आवश्यकता आहे काय ?

हे प्लास्टर ऑफ प्यारीस पुनर्वापरास हि उपयोगी नसते

निदान कोल्हापूरमधे, घरच्या गणपतीच्या विसर्जनावेळी, मुर्तीदान उपक्रम चालतो, ज्यात शाडू आणि बहुतेक पी.ओ.पी. च्याही मुर्ती (हौदात नावापुरते विसर्जन करुन) स्वीकारतात आणि नंतर त्या कुंभारांना पुढच्या वर्षासाठी देतात..त्यातल्या पी. ओ.पी. चा परत वापर होतो की नाही काय माहित !

या उपक्रमाला आमच्या काही नातेवाईकांसह अनेक कोल्हापूरकरांचा चांगला प्रतिसादही मिळतो :)

सर्व वाचक-प्रतिसादकांना धन्यवाद! नंतर सविस्तर उत्तर लिहीन, येथे फक्त या प्रकल्पाची मिळालेली छायाचित्रे देत आहे.

ऋषिकेश's picture

12 Sep 2011 - 9:18 am | ऋषिकेश

लेख, माहिती चांगली आहे.. त्यापेक्षाअ वरील चित्रे बघुन 'कॅच देम यंग' हे धोरण आहे की काय असे वाटले आणि बरे वाटले!

मुळ युक्तीबाबतः एकुणात पर्यावरण संरक्षण वगैरेंचं माहित नाही मात्र सहज विघटन होणार्‍या घटकांमुळे स्थानिक पर्यावरण, स्वच्छता आणि सौंदर्य सारेच टिकेल. त्यामुळे हा प्रकल्प अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे

सौ. ठाकुर यांचे अभिनंदन, शुभेच्छा! विकास यांचे आभार

खूपच चांगली माहिती!
मुलांनी केलेली गणेशमूर्ती अगदी सोज्वळ वाटतिये.
कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मूर्ती पाण्यावर तरंगते की नीट विसर्जीत होते?
आम्ही ख्रिसमसचे सजावटीचे सामान गणपती सजावटीसाठी वापरले व डिसेंबरात पुन्हा वापरू.
बाकी प्रदुषणाबद्दल बोलायला उरले आहे काय?
आम्ही भारतात दहा बारा दिवसांपूर्वीच फोन करून घेतले.
गणपतीच्या दिवसांत माणूस बहिरे व्हायची वेळ येते इतके मोठ्याने स्पिकर्स लावतात. पहाटेपर्यंत ३ वा. पर्यंत यावर्षी दंगा घातला. माणसाचे बोलणे ऐकू येत नव्हते अशी परिस्थिती! माझ्या आईची मैत्रिण रात्री १ वा. आजारी पडली तर गर्दीतून वाट काढत कसेबसे हॉस्पिटलात दाखल केले. तान्ही बाळे, वृद्ध यांची दया येते.

नितिन थत्ते's picture

13 Sep 2011 - 8:22 am | नितिन थत्ते

पाण्यात विरघळणारी आणि विघटन होणारी मूर्ती जास्त प्रदूषक आहे असे मला वाटते.

कल्पना करा की एक कागदाची आणि एक पीओपी मूर्ती/वस्तू (सेम टु सेम आकाराची), नदीच्या पाण्यात टाकली आहे.

पीओपीची वस्तू काहीही न होता ५-१०-१५ वर्षे पडून राहील. केमिकली इनर्ट असल्याने तिचे विघटन होणार नाही.

उलट कागदी मूर्तीचे विघटन होऊ लागेल. कागद विघटित होताना निर्माण होणारे पदार्थ त्याच नदीच्या पाण्यात विरघळतील. हे तयार होणारे पदार्थ + ते विघटित करणारे जीवजंतू आरोग्याला हानिकारक असण्याची शक्यता अधिक आहे.

निर्माल्य + मूर्तीचे रंग हे अधिक प्रदूषणकारी आहे.

पीओपीच्या मूर्ती तशाच राहिल्याने नदीत मासेमारी वगैरे करणार्‍यांना अडचण करतील हे ठीक.

वेगळे उदाहरण द्यायचे तर एक भाजलेली वीट आणि न भाजलेली वीट पाण्यात टाकली. न भाजलेली वीट विरघळेल आणि पाणी गढूळ होईल. भाजलेल्या विटेने काहीच हानी होणार नाही.

नितिन थत्ते

हा विचार मुर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करतेवेळी आहे.
उपाय १. एखाद्या कृत्रिम हौदात/ जलाशयात विसर्जन करून पुढे ते पाणी जमिनीत ओतता येईल. कागद वगैरेचे खत/माती होईल.. पाणी जिरून जाईल
उपाय २: एक मोठा खड्डा करून त्यात पाणी भरणे, त्यात विसर्जन करणे आणि मग खड्डा बुजविणे
उपाय ३: मुर्ती जमिनीत पुरणे (धार्मिक धक्का किती आहे माहित नाही :) )

नितिन थत्ते's picture

13 Sep 2011 - 9:57 am | नितिन थत्ते

हौदात विसर्जन करण्याबाबत सहमत. परंतु बहुतांशी विसर्जन समुद्रात आणि नद्यांमध्ये होत असते म्हणून हा विचार.

आणखी धक्का: मूर्ती क्रश करून रस्त्यांखाली भर घालायला वापरता येतील.

वपाडाव's picture

13 Sep 2011 - 5:40 pm | वपाडाव

अजुन एक धक्का :: १. दहा मंडळांनी मिळुन एकाच गणेश मुर्तीची स्थापना केली तर किंवा केलीच नाही तर....
.........................२ .एकच मुर्ती वर्षानुवर्षे वापरली तर....

जाणकारांनी प्रकाश टाकण्यासाठी एक प्रश्न ::
एक गाव एक गणपती काय कागदावरच आहे काय?