कधी सांज ढळत असताना...

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
12 Aug 2011 - 2:31 am

सेकंड एमबीबीएसचा क्लास सुटला. उदयाचे डॉक्टर भराभरा वर्गातून बाहेर पडू लागले. तसे थेअरीच्या क्लासेसना मुलं अ‍ॅप्रॉन घालत नाहीत. परंतू क्वचित एखादया मुलाच्या अंगावर पांढराशुभ्र अ‍ॅप्रॉनही दिसत होता. अविनाश सुद्धा या
घोळक्यात बाहेर पडत होता. एकटाच, कुठेतरी हरवलेला. नुकतंच झालेलं डॉ. नंदनवारांचं अ‍ॅनाटॉमीचं लेक्चर अजूनही त्याच्या डोक्यात घुमत होतं. किती सुरेख समजावतात सर अ‍ॅनाटॉमी. डॉ. हेन्री ग्रेचं अ‍ॅनाटॉमी हे पुस्तक सर संदर्भग्रंथ म्हणून वापरतात. हेन्री ग्रे एकोणविसाव्या शतकात होऊन गेलेला अ‍ॅनाटॉमीमधला बाप माणूस. आणि नंदनवार सरांची हेन्री ग्रेवर देवापेक्षाही जास्त श्रद्धा. त्यामूळे डॉ. नंदनवारांकडून अ‍ॅनाटॉमी शिकणे हे अविनाश भाग्याचं मानत होता.

अविनाश घोळक्यातून बाहेर पडला. भरभर पावलं उचलंत लायब्ररीच्या दिशेने चालू लागला. त्याला कारणही तसंच होतं. अविनाशकडे स्वतःची अशी हेन्री ग्रेच्या टेक्स्टबुकची कॉपी नव्हती. आणि आज नंदनवार सरांनी हेन्री ग्रेचं पुस्तक
तुम्ही वापराच असं सांगितलं होतं. या पुस्तकाच्या लायब्ररीतल्या मोजक्या कॉप्यांपैकी एक कॉपी त्याला काहीही करुन मिळवायची होती. त्यामुळे इतर मुले जाण्याच्या आधी त्याल लायब्ररीत पोहचायचं होतं.

तो फिजिऑलॉजीच्या लॅबजवळ आला. तिथून कॉर्नरलाच असलेल्या जिन्यावरुन पहिल्या फ्लोअरवर जायचं. पुढे दोन क्लासरूम ओलांडले की लायब्ररी. अविनाशच्या पाठोपाठ टकटक असा सँडल्सचा आवाज येत होता. असेल कुणी
एफवायची नविन मुलगी असे म्हणून अविनाशने त्याकडे दुर्लक्ष केलं. तो जिन्याच्या मध्यावर आला नाही तोच पाठीमागून हळूच हाक कानी आली, "ए स्कॉली". आवाज ओळखीचा वाटत होता त्याच्या. तो क्षणभर थबकला. मागे वळून पाहिलं. ती त्याच्याच क्लासमधील राखी कुलकर्णी होती.

"राखी, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मला स्कॉली म्हणत जाऊ नको म्हणून?"
"अरे त्यात काय झालं? तू आहेस स्कॉली म्हणून. मला सांग आपल्या क्लासमधले कितीजण एफवायला ऑल क्लियर आहेत?"
"सहाजण."
"या सहाजणांमध्ये तू ही आहेस."
"हो."
"मग मला सांग, जर एकशेवीसच्या क्लासमधले फक्त सहाजण ऑल क्लियर आहेत म्हणजे ते स्कॉलर आहेत असंच नाही का? आणि तू ही त्यातलाच एक आहेस म्हणून मी तुला स्कॉली म्हनते. दॅट्स ईट."

अविनाशने एकटक तिच्या नजरेला नजर भिडवली. आणि त्या नजरेतच पाहत राहीला. शांत, खोल, तळाचा ठाव न लागणार्‍या समुद्रासारखी भासली त्याला ती.

"ए हेलो... हेलो हेलो... समथिंग समथिंग?"

अविनाश दचकून भानावर आला. थोडासा गडबडला. राखीच्या नजरेतील धीरगंभीरता जाऊन तिच्यात मिश्किल भाव दिसत होते.

"नाही नाही. राखी तसं काही नाही. मी तर तुला बहिणीप्रमाणे मानतो."
"अरे मी मस्करी केली तुझी. एव्हढं घाबरायला काय झालं?"

राखी असं म्हणाली खरं पण तिच्या नजरेतील मिश्किल भाव गायब झालं होतं. काहीतरी गडबड झाली होती खरी. पण काय हे मात्र त्याला समजत नव्हतं.

सारं कसं छान चालू होतं. थेअरी क्लासेस, प्रॅक्टीकल्स आणि मित्रांसोबत होणार्‍या चर्चा यामध्ये दिवस अगदी छान चालले होते. अविनाशची राखीसोबत असलेली मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती. दोघेही एकमेकांना बहीण भाऊ
मानतात हे आता एव्हाना क्लासमधल्या सार्‍यांना माहिती झालं होतं. कुणीतरी आडून आडून एखादी कमेंटही पास करायचा. परंतू ते दोघेही त्याकडे दुर्लक्ष करत असत.

"एमबीबीएस संपल्यानंतर तू काय करणार आहेस? लगेच दवाखाना तर नक्कीच टाकणार नाहीस."
"तो हातातला चहा थंड होतोय. आधी तो संपव."
"ए असं काय रे. सांग ना."
"इंटर्नशिप करणार आहे."
"व्हेरी फनी"
"व्हेरी फनी काय त्यात. एमबीबीएस झालेल्या प्रत्येकाला इंटर्नशीप कंपल्सरी आहे"
"ते मलाही माहिती आहे गाढवा. मी ही एमबीबीएसलाच आहे. उगाच पिजे मारु नकोस. सिरियसली विचारतेय."
"एमडी ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी."
"ओहो... एमडी गायनॅकॉलॉजी... मग काय बायकाच बायका... मज्जाच मज्जा..."
"ए चूप..."
"ए चूप काय? हे असं होणार नाही का?"
"नाही. मी हे ठरवण्यामागे काही कारण आहे."
"काय कारण आहे ते मला कळू शकेल का डॉक्टरसाहेब?"
"मी अकरावीला होतो तेव्हा. माझ्या एका दुरच्या बहिणीचं सिझरीन करावं लागलं होतं. बाळ सुखरुप बाहेर काढण्यात आलं. पण माझी ती बहीण मात्र वाचली नाही. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला नसता तर ती वाचली असती असं माझ्या
कानावर येऊ लागलं. तेव्हाच ठरवलं की आपण गायनॅकॉलॉजिस्ट व्हायचं. एक निष्णात स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ व्हायचं.

राखीच्या मनातील अविनाशबद्दलचा आदर दुणावला होता. ती त्याच्या अधिकाधिक जवळ जाऊ लागली होती. एक जीवाभावाची मैत्रिण म्हणून.

...पॅथॉलॉजीचं प्रॅक्टीकल सुरु झालं. क्लासमधले रोल नंबर एकापाठोपाठ एक असल्यामुळे अविनाश आणि राखीची प्रॅक्टीकलची बॅच एकच होती. आणि दोघंही एकमेकांच्या क्लोज असल्यामुळे प्रॅक्टीकलचा ग्रुपही. अविनाश ज्या ब्लड टेस्टचं प्रॅक्टीकल करायचं होतं त्याच्या सुचना प्रॅक्टीकल हँडबुकमध्ये एकाग्रतेने वाचत होता. राखी मात्र उगाचच मायक्रोस्कोपशी खेळत होती. अचानक ती चारोळी पुटपुटू लागली. अविनाश दचकला. ही त्यानेच लिहिलेली चारोळी होती. अशीच कधीतरी पॅथॉलॉजीच्या प्रॅक्टीकल हँडबुकच्या मागच्या पानावर लिहिलेली. पण त्याने आपल्याला काहीच माहिती नाही असं भासवायचं ठरवलं.

नाकारलं असलं जरी तू मला,
पण मी धीर सोडलेला नाही
तुटलं जरी प्रेमाचं धनुष्य तरी
आशेचा बाण मोडलेला नाही

"छान आहे ना ही चारोळी. प्रेमाचं धनुष्य, आशेचा बाण. काय सुंदर उपमा वापरल्या आहेत ना? जणू काही हा प्रेमवीर प्रेमाच्या लढाईलाच निघाला आहे." राखी नजरेच्या कोपर्‍यातून हसत म्हणाली.

अविनाश गप्पच होता. काय बोल्णार होता तो तसाही.

"अरे तू का गप्प? बोल ना काहीतरी"
"राखी ते हे... आपलं ते..."
"बास झालं ततपप. कोण आहे ही जिने तुमचे धनुष्य वगैरे मोडले?"
"राखी जाऊ दे ना यार. आपण प्रॅक्टीकलला सुरुवात करुयात?"
"प्रॅक्टीकल तर करायचंच आहे. पण तुला मला सांगावं लागेल सारं"
"हो माझे आई. पण आता या ब्लड टेस्ट करुयात का आपण?"
"जरुर"

अविनाशने जे काही सांगितलं ते ऐकून राखीला तसं काही विशेष वाटलं नाही. अकरावी बारावीला असताना मुले मुलींकडे आकर्षित होतात. त्यालाच ते प्रेम म्हणतात. पुढे इंजिनीयरींग, मेडीकलला गेल्यानंतरही पहिली एक दोन वर्षे हे प्रेम मनात कुठेतरी घर करुन राहतं. अविनाशचं ही तेच झालं होतं. अविनाश आता जरी स्मार्ट वाटत असला तरी ज्युनियर कॉलेजला असताना अगदीच चम्या होता. म्हणजे हुषार होता नाही असं नाही. पण तरीही ईतर कुठल्याही पुस्तकी किडयापेक्षा फार वेगळा नव्हता. त्यामूळे साहजिकच त्या मुलीने साहेबांना नकार दिला होता. पुढे साहेब मेडीकलला आले. त्या मुलीने बीएस्सी जॉइन केलं. पण अविनाशच्या मनातून ती जाईना. मग ते प्रेम असंच कधी वह्यांच्या मागच्या पानांवर लिहिलेल्या चारोळ्यांमधून व्यक्त व्हायचं.

"पुढे काय?"
"कसलं पुढे काय?"
"तुमच्या लढाईबद्दल म्हनतेय मी. तुमचे धनुष्य तर तुटलेले आहे. मग आशेच्या बाणांचा काय फायदा?" राखीने आपलं हसू आवरत अविनाशला विचारलं.
"तू माझी खेचते आहेस ना?"
"खेचत वगैरे काही नाही. पण तुमची ती चारोळी ईतकी अप्रतिम होती की मला हसू आवरत नाहीये अजूनही. लेट ईट बी. व्हाट नेक्स्ट?"
"काही नाही."
"काही नाही? असं कसं काही नाही? काय करते ती हल्ली? कुठे असते."
"आमच्याच शहरात आहे. बीएस्सी सेकंड ईयरला आहे आता."
"एव्हढी सारी माहिती आहे तिच्याबद्दल. आणि म्हणे काही नाही. अगदी खरं खरं सांग. ती अजूनही तुला आवडते ना?"
"हो. पण नुसती आवडून काय फायदा?"
"फायदा आहे. जर तू तिला पुन्हा विचारलंस तर. तू म्हनतोस की तिने जेव्हा तुला नकार दिला तेव्हा तू बारावीला होतास आणि अगदीच चम्या होतास. आता परिस्थिती बदलली आहे. आता तू मेडीकलला आहेस. स्मार्ट झाला आहेस.
उद्या एखाद्या मोठया हॉस्पिटलमध्ये जॉबला वगैरे लागशील किंवा मग स्वतःची मजबूत प्रॅक्टीस तरी करशील. या सार्‍या गोष्टींचा विचार करुन कदाचित ती तुला आता होकार देऊ शकेल. निदान तू तिला विचारायला काय हरकत आहे?"
"असं होऊ शकेल का?"
"का नाही होणार?"

... दिवाळीची सुट्टी संपली. कॉलेजची मुलं परतली. अविनाशही काहिशा मलुल चेहर्‍याने परतला.

"काय रे काय झालं? असा का आपल्या वॉर्डमधला पेशंट गेल्यासारखा चेहरा केला आहेस? घरी सारं ठीक आहे ना?"
"हो. घरी सारं व्यवस्थित आहे."
"मग?"
"तिचा बॉयफ्रेंड आहे."

राखी स्तब्ध झाली. आता यावर काय बोलावे हे तिला सुचेना. उगाच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली, "जाऊदे रे. त्यात काय एव्हढं. तुला दुसरी कूणीतरी छान मुलगी मिळेल. मी शोधेन तुझ्यासाठी."
त्यानंतर कुणीच बोललं नाही.

दिवसांमागून दिवस जात होते. पण अविनाश काही आपल्या देवदास अवस्थेतून बाहेर यायला तयार नव्हता. हळूहळू हा प्रकार अविनाशच्या वर्गामधील इतर मुलांच्याही लक्षात यायला लागला. बातमी हॉस्टेलमध्ये त्यांच्या विंगमध्येही
पसरली. मुलं आपापल्या परीने अविनाशची समजूत घालू लागली.

"यार अव्या तू पण ना. साला कुठल्यातरी पोरीला अकरावी बारावीला प्रपोज करतोस, ती नाही म्हणते, आणि आता तिचा बॉयफ्रेंड आहे म्हटल्यावर तू हा असा उदास होतोस. यार काही अर्थ नाही याला."
"अरे छोड ना यार. तू नही तो और सही. और वैसेभी तेरी वोह राखी हैं ना यार"
"अबे चूप... काहीही बडबडू नको. मी तिला बहिण मानतो" पोरं अकलेचे तारे तोडायला लागल्यामुळे अविनाश न राहवून म्हणाला.
"यार अव्या बहिण माननं आणि बहिण असणं यात खुप फरक आहे."
"अबे आता गप्प बसायला काय घेशील. सांगितलं ना एकदा की मी तिला बहीण मानतो म्हणून." आता मात्र अविनाश रुममेटसवर तडकला.
"ए... एव्हढं ओरडायला काय झालं? हल्ली असे मानलेले बहीण भाऊ खुप दिसतात. जरा आजूबाजूला पाहा. असे कितीतरी मानलेले भाऊ दादा-भाई नवरोजी होतात. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ही अशी मानलेली नाती काही वेळा दिनमें
भैया, रातमें सैया अशा प्रकारचीही असतात."
"प्लिज प्लिज, तूम्ही आता माझं फार डोकं खाऊ नका यार. हे अती होतंय."

झाल्या प्रकाराने अविनाशचे डोके भंजाळून गेले. बरं ही मुलं आता एव्हढयावर थांबणार नव्हती. हे जे काही बोलणं झालं ते आता कॉलेजमध्येही पसरणार होतं. आपण समजा दुर्लक्ष करु हे सगळं पण राखीच्या कानावर जर अशा कॉमेंटस गेल्या तर तिला हे सारं सहन होईल का या विचाराने अविनाश बेचैन झाला. विचार करुन करुन डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली, परंतू यावर काही उपाय अविनाशला सुचेना. शेवटी एक विचार अविनाशच्या मनात चमकून गेला. आपण राखीशी जेव्हढयास तेव्हढं बोलणं ठेवलं तर? न रहेगा बास न बजेगी बासुरी. आपण तिच्याशी फक्त क्लासमेटसारखं वागल्यावर कुणाला काही बोलायची संधीच मिळणार नाही. या विचारांनी अविनाशला हायसं वाटलं. आता राखीशी एका क्लासमेटसारखंच वागायचं.. जेव्हढयास तेव्हढं शक्य झालं तर इग्नोअरही करायचं. तिला बिचारीला त्रास होईल या सगळ्याचा. पण त्याला ईलाज नाही.

त्याचा आधीचा "तिचा" विषय डोक्यात काहूर माजवत असतानाच ही नविन समस्या समोर उभी राहीली होती. पण त्याला आता त्याचं उत्तरही मिळालं होतं.

... दुसरा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे कॉलेजला राखी हसत सामोरी आली. त्याने नाईलाजाने तिला हाय हेलो केलं आणि नंतर पुर्णपणे दुर्लक्ष करुन तिच्यापासून दुरच्या डेस्कवर बसला. राखीला कळेना हा असा का वागतोय म्हणून. ती त्याच्या डेस्कवर जाऊन बसली.

"अवी काय झालं? मला का टाळत आहेस?"
"काही नाही. आपण शांत बसूयात का? थोडया वेळाने थोडया वेळाने फिजिऑलॉजीचं लेक्चर सुरु होईल"
"ते होऊदे. पण मला कळायला हवं की काल रात्री असं काय झालंय ज्यामुळे तू मला टाळत आहेस? ते मला कळायला हवं."
"आता? लगेच?"
"हो. आता लगेच."

अविनाशने झाला प्रकार राखीला सांगितला.

"अरे एव्हढंच ना? त्यात काय एव्हढं मनावर घ्यायचं. मलाही मुली हॉस्टेलला तुझ्यावरुन चिडवतात. पण मी एका कानाने ऐकते आणि दुसर्‍या कानाने सोडून देते. आपल्याला माहिती आहे ना की आपलं काही नाही म्हणून. मग झालं
तर. आणि आता विषय निघालाच आहे तर सांगते. मलाही तू आधी आवडायचास. अगदी एफवाय पासून. म्हणून मी एसवायच्या सुरुवातीला तुझ्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत होते. पण तू मला म्हणालास की तू मला
बहिणीप्रमाणे मानतोस. त्यामुळे माझा नाईलाज झाला. अर्थात म्हणून काही मी तुझ्याशी असलेली मैत्री तोडली नाही."

अविनाश एकटक राखीकडे पाहत राहीला. सकाळच्या वेळी त्याच्या मनात कातरवेळेची व्याकुळता जमा झाली.

दूर कुठेतरी महालक्ष्मी अय्यरच्या आर्त व्याकुळ आवाजातील रेकॉर्ड वाजत होती,

कभी शाम ढले तो मेरे दिलमें आजा ना
कभी चांद खिले तो मेरे दिलमें आजा ना
मगर आना ईस तरह तुम, के यहांसे फीर ना जाना

कथा

प्रतिक्रिया

प्रेयसी आणि बहीण यांच्यामध्ये सुंदर नाते देखील आहेच की - मैत्रिणीचे.
अविनाश खरच चम्या होता.
_______

पण तुम्ही तिची भावना त्याच्या मनात जशीच्या तशी उमटल्यानंतर त्याला तिचे मन कळलेले दाखविले आहे ते आवडले. एक प्रकारचा "मिरर-इफेक्ट."
सहवेदना!

प्रेयसी आणि बहीण यांच्यामध्ये सुंदर नाते देखील आहेच की - मैत्रिणीचे.

येक नवंबर बोल्लात बघा.....

कधी सांज ढळत असताना हे वाचुन लगेच ते गाणे आठौले...
बाकी यशवंतनी जे म्हटले आहे ते खरे असे वाटते....

खिळून शेवटपर्यंत वाचत राहिलो.
हिंदी पिक्चरमधले दृश्यच हाती पडले, वेगळे काही नाही.
एकूण घाट पाहता आपल्याकडून आणखी कसदार लिखाणाची अपेक्षा होते. :)

धन्या's picture

12 Aug 2011 - 9:03 am | धन्या

खिळून शेवटपर्यंत वाचत राहिलो.

धन्यवाद.

हिंदी पिक्चरमधले दृश्यच हाती पडले, वेगळे काही नाही.
एकूण घाट पाहता आपल्याकडून आणखी कसदार लिखाणाची अपेक्षा होते.

टंकून टंकून कंटाळा आला होता. त्यामुळे शेवट वाटावा असा प्रसंग येताच द येंड ची पाटी लावली. :)

प्रचेतस's picture

12 Aug 2011 - 8:56 am | प्रचेतस

सुंदर लिखाण धनाजीराव.

स्पा's picture

12 Aug 2011 - 9:15 am | स्पा

वा वा

मस्तच....

ती चारोळी जाम आवडली ब्वा आपल्याला...

छान..मस्त. हलकीफुलकी.. पण अजून पुढचा भाग असेल असं वाटलं होतं.. दादाभाई नवरोजी केसेस कॉलेजातल्या आठवल्या.. मज्जा.

मुलूखावेगळी's picture

12 Aug 2011 - 10:33 am | मुलूखावेगळी

कथा छान

आणि चारोळी आवडली

अर्थात म्हणून काही मी तुझ्याशी असलेली मैत्री तोडली नाही.

:)

जाई.'s picture

12 Aug 2011 - 10:38 am | जाई.

सुंदर लेखन. मला विशेषत राखीचे पात्र आवडले.

स्कॉली या शब्दाने कॉले़जच्या वर्षाची आठवण झाली.

नाकारलं असलं जरी तू मला,
पण मी धीर सोडलेला नाही
तुटलं जरी प्रेमाचं धनुष्य तरी
आशेचा बाण मोडलेला नाही.

या ओळी फारच छान.

इंटरनेटस्नेही's picture

16 Aug 2011 - 1:31 am | इंटरनेटस्नेही

कथा ठीक असली तरी अनेक डायलॉग्स आवडले नाहीत.. तद्द्न चीप वाटले.
-
इंट्या.

प्रांजळ मत दिल्याबद्दल आभार !!!
पुढच्या वेळी चांगले लिहिण्याचा प्रयत्न करेन :)

धन्या's picture

16 Aug 2011 - 10:04 am | धन्या

धन्यवाद !!!

अरे रे अरे रे, मनसे जारे
अरे रे अरे रे, वरसे मारे
ईदीवरकेपुडू लेदे...ईदी ना मनसे कादे...
एवरेमन्ना विनदे... तना दारिदो तनदे... :P

साती's picture

16 Aug 2011 - 6:08 pm | साती

मेडिकल बॅकग्राउंडची कथा म्हणून उत्साहाने वाचली ५०% आमच्या लवस्टोरीशी जुळतेय बघा.
शेवट गुंडाळलात पण.असो.

आमची पण प्रॅक्टिकलची बॅचपण एकच.
कारण आमचीही नावे क च्या बाराखडीत एकामागे एक. काळे-कमलशेट्टी. रोल नं ८२-८३.
आता आयुष्यभर साती काळे कमलशेट्टी झालेय. :)

बाकी एम बी बी एस ला अ‍ॅनॉटॉमी , फिजिऑलॉजी पहिल्या वर्शाला अस्तं हो,दुसर्‍या नव्हे. आणि एटीकेटी फक्त दुसर्‍या वर्षी असते पहिल्या नव्हे. सबब हिरो पहिल्या वर्षी ऑल क्लिअर होऊन दुसर्‍या वर्षी अ‍ॅनॉटॉमी शिकतो हे खरं नव्हे.

वपाडाव's picture

16 Aug 2011 - 6:42 pm | वपाडाव

तसे विशेष नाही पण कथा सांगोपांग व्हायला अजुनही स्कोप होता....
त्याचे गायनॅक करण्याचे कारण नाय पटले....
अकरावीला असताना निदान मला तरी मी डिग्री करेन की नाही हे माहिती नव्हते....
राखी सोडुन इतर नाव वापरलं असतं तर अजुन इफेक्ट पडला असता...
(खोल गळ्याचे, तोकडे कपडे घालुन मिरवणारी मुलगी)