कसला नवरा पाहिजे तुला

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
31 Jul 2011 - 9:36 pm

अनिवासी भारतीय मुलगा जावई म्हणून मिळतोय म्हटल्यावर मागचा पुढचा काहीच विचार न करता लोक कसे आपल्या मुलीचे कसे झटपट लग्न त्या एनाराय मुलाबरोबर लावून देतात आणि त्यानंतर कशा समस्या निर्माण होऊ शकतात यावर छान भाष्य करणारा लेख वाचून मला दोन वर्षांपूर्वीचा माझा अनुभव आठवला.

अमेरिकेला मला डेप्युटेशनवर जाऊन पुर्ण वर्ष झालं होतं. कंपनीच्या नियमानूसार अकरा महिन्यांनंतर एक महिना सुट्टी मिळते. भारतात येण्याजाण्याचा खर्च कंपनीचा. मीही आत खुप झालं म्हणून वर्ष पुर्ण होताच एक महिन्याची सुट्टी घेतली आणि भारतात आलो. मी चारेक दिवसात घरी स्थिरावल्यावर बाबांनी आधीच सांगितल्याप्रमाणे माझ्यासाठी मुलींचा अंदाज घेणं सुरु झालं. मुली पाहणं नाही. त्यामुळे दुरुन दुरुनच कानावर यायचं, इकडे एक मुलगी आहे, तिकडे एक मुलगी आहे, एव्हढी शिकली आहे, तेव्हढं कमावतं वगैरे वगैरे. मीसुदधा ती माहिती वरवर ऐकायचो आणि सोडून दयायचो.

पण त्या दिवशी मात्र जरा वेगळंच झालं. मी घरातल्या दोन बाय दोनच्या बाथरुममध्ये मोबाईलवर प्रल्हाद शिंदेचं "गातो आवडीने" ऐकत मस्त या खांदयावरून, त्या खांदयावरून पाणी ओतत आंघोळ करत होतो. दोन बाय दोनचं असलं तरी काय झालं, ते "माझ्या" घरातलं बाथरुम होतं. अमेरिकेतल्या शॉवर, बाथटब असलेलं, बाजुलाच कमोड असलेलं आणि बेक्कार म्हणजे गुदमरलेली हवा असलेल्या बाथरुमसारखं नव्हतं ते. त्यामुळे मी अगदी मनसोक्त न्हात होतो. बाबा देव्हा-यासमोर धीरगंभीर आवाजात "शांताकारं भुजंगशयनम" म्हणत होते. इतक्यात बाहेरच्या ओटीवर कुणीतरी हाक मारली. आवाज माझ्याही ओळखीचा होता. आण्णा होते ते. गावातलं एक सुजाण, सुशिक्षित बुजुर्ग. बाबांनी त्यांना बसायला सांगितलं. एव्हाना माझी आंघोळ झाली होती. मी बाहेर आलो.

"काय म्हणते अमेरिका?"
"काही नाही. आहे मजेत", मी हसत हसत उत्तर दिलं.

एव्हाना आईने चहा आणला. चहा पित पित आण्णांनी बोलायला सुरुवात केली. त्यांच्या मेव्हणीची मुलगी पुण्याला बी एच एम एस करत होती. तिच्याबददल सांगायला आले होते.

"नाही म्हणजे आता ती फायनल ईयरला आहे. आमचा विचार आहे ती तुमच्या घरात यावी. म्हणून बोलायला आलो."
असं कुणीतरी इतक्या स्पष्टपणे बोलण्याची ही पहिली वेळ होती. आणि तेही आई बाबांच्या पुढयात. थोडा वेळ काय बोलावं हेच सुचेना. बाबांनी तूच बोल असं नजरेनं सुचवलं. त्यामुळे बोलणं भाग होतं.

"आण्णा, तशी काही हरकत नाही. पण असं बघा, आपल्या गावाकडे एक पदधत आहे. मुलगा रितसर मुलगी पाहायला जातो. मुलगी कांदेपोहे घेऊन येते. चार चौघांदेखत दोघेही एकमेकांना काय करतेस, किती शिकलेस सारखे फालतू प्रश्न विचारतात आणि लगेच किंवा दोन चार दिवसांनी मुलाला होकार किंवा नकार विचारला जातो. मुलीचा तर कुणी विचारच करत नाही. मला असलं काही नकोय. मी तिला चार पाच वेळा भेटेन. तिच्याशी बोलेन. आणि त्यानंतर दोघांनाही मंजुर असेल तर पुढच्या गोष्टी बोलू आपण."
"अरे अर्थातच ना. तू अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनीयर. तिही जवळ जवळ डॉक्टर झाल्यातच जमा आहे. मग तुमचं लग्न ठरवायचं असेल, आपण जरी गावातले असलो तरी गावंढळपणा नक्कीच करणार नाही."
"मग हरकत नाही".

त्यानंतर आठवडाभर काहीच झालं नाही. मी तर झाला प्रकार विसरुनच गेलो होतो. पण दुस-या आठवडयातच काकूंचा म्हणजेच आण्णांच्या मिसेसचा फोन आला. त्यांना म्हणे मला मुलीचे फोटो दाखवायचे होते. म्हणजे खास दाखवण्यासाठी असे फोटो काढले नव्हते. नुकतंच मुलीच्या मामाचं लग्न झालं होतं. त्या लग्नाच्या अल्बममधलेच फोटो ते मला दाखवणार होते. मी सुटकेचा निश्वास सोडला. लग्नाचा अल्बम असल्यामुळे मुलीचे नटलेले, सजलेले फोटो असले तरी थोडेफार नॅचरल फोटोही पाहायला मिळणार होते. जेव्हा "दाखवण्यासाठी" फोटो काढले जातात तेव्हा फोटोशॉप नावाचं सॉफटवेअर त्या फोटोंचं कसं जादुई परिवर्तन करु शकतं हे मी स्वत: प्रोफेशनल वेब डेवलपर असल्यामुळे माहिती होतं. आणि हे असलं आता काही होणार नव्हतं. काही फोटो सोलो, मामाबरोबर, काकाबरोबर असे खास पोझ मधले असतीलही पण काही घाईगडबडीतले नक्कीच असतील. त्यामुळे तिचे साधे फोटो पाहायला मिळतील म्हणून मी खुष होतो.

झालं. गेलो एकदाचा आण्णांच्या घरी. चहा वगैरे घेत असताना काकूंचं भाचीपुराण चालू झालं. भाचीचा सांस्कृतिक कार्यक्रमांमधला सहभाग, तिची बक्षिसं, तिचा एम डी करायचा फ्युचर प्लान वगैरे. मी स्मित चेह-यानं मान हलवत होतो. कारण त्यात गैर काहीच नव्हतं. माझेही आई बाबा कुणी घरी आलं की हे करतात की. मी कसा मेहनत घेत आणि परिस्थितीला तोंड देत इंजिनीयरींग केलं, जॉबमध्ये सेटल होण्यासाठी कसा स्ट्रगल केला, अमेरिकेला जायची संधी कशी मिळाली वगैरे. नाही म्हणायला ती नाचते वगैरे हे ऐकून मीही थोडासा इंप्रेस झालो होतो. असो. नंतर आण्णांच्या मुलाने कॉम्प्युटर चालू केला. कारण अल्बम अजून प्रिंट नव्हता केला. सगळे फोटो मशिनवर होते. जसे जसे अल्बममधले पुढचे फोटो येऊ लागले तसतसं मी न्युट्रल व्हायला लागलो. मुलगी दिसायला तितकी खास नव्हती. म्हणजे मला अगदी अप्सरा हवी होती असं काही नाही. पण तीचे फोटो मनाला क्लिक होत नव्हते. मी उगाचच बाबांच्या चेह-याकडे पाहिलं. आणि मी लगेच समजून गेलो. मुलगी मलाच क्लिक होत नव्हती तर ती बाबांनाही आवडली नव्हती. सारे फोटो पाहून होताच काकूंनी पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली.

"तिचं आता फायनल ईयर चालू आहे. त्यामुळे आम्ही तिला आताच काही सांगणार नाही. तिची परिक्षा वगैरे झाली की सांगू. म्हटलं तू आता महिन्याभराने अमेरिकेला परत जाशिल तर एकदा तिचे फोटो तुला दाखवावेत म्हणून हे सगळं केलं."

आम्ही फोटो पाहण्याचा कार्यक्रम संपवून घरच्या वाटेला लागलो.
"बाबा कशी वाटली मुलगी?"
"नाक बसकं आहे तिचं. मला मुळीच आवडली नाही."
"बाबा मला एक कळत नाही, जर यांची मुलगी अजून तयार नाही तर हे लोक घाई कशाला करत आहेत? संपू दया की तिचं फायनल ईयर. तिला ठरवू दया की का तिला लग्न करायचं आहे की पुढे शिकायचं आहे ते."
"तुला नाही कळणार ते. अरे तू अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेस. जातीमधला आहेस. त्यामुळे त्यांनी तुझा विचार केला तर त्यात गैर काय आहे?"
"बरं. आपण फोटो पाहिले. आता पुढे काय? त्या काकू तर ठामपणे काहीच म्हणाल्या नाहीत."
"तुला तिच्याशी लग्न करायची घाई आहे का?" बाबा चेह-यावर मिश्किल हसू खेळवत म्हणाले.
"तसं नाही हो बाबा. जाऊदे. आता ते पुढे काही म्हणाले तरच आपण बोलू"
"आता कसं म्हणालास शहाण्यासारखं"
आणि तो विषय तिथेच संपला.

दोन तीन दिवसांनी त्या काकूंचा बाबांना फोन आला. म्हणे तुम्ही काहीच म्हणाला नाहीत. बाबांनी त्यांना समजावलं की त्यांनी संदिग्धपणा ठेवल्यामुळे आम्ही काहीच न बोलता तुमच्या म्हणण्याची वाट पाहत होतो. मुलीच्या आई वडीलांनी विचारलं होतं की मला मुलगी आवडली की नाही. घ्या. हे अगदी चांगलं होतं. नुसते फोटो दाखवायचे त्रयस्थामार्फत आणि वरून विचारायचं की मुलगी आवडली की नाही. खरं सांगायचं तर मला त्या मुलीला सरळ सरळ नाही म्हणावसं वाटत होतं. बाबांनी तर तिचा विचार करणं सोडूनच दिलं होतं. पण माझंच मन मला टोचू लागलं. नुसतं फोटोत पाहिलेल्या बाहय रुपावर जाऊन त्या मुलीला नकार देणं कितपत योग्य आहे? काय हरकत आहे तिला एकदा प्रत्यक्ष पाहायला, बोलायला? बाबांना कन्विन्स केलं आणि माझा पहिला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला...

मुलीचं आजोळ माझ्या गावापासून तीन किलोमिटरवर होतं. तिच्या आजोबांच्या घरी ती लोकं आली होती. आमच्याकडून आम्ही तिघंच. मी, बाबा आणि माझा नुकताच कॉलेज पास आऊट झालेला छोटा डॉक्टर भाऊ. मुलीकडून खुप मोठा लवाजमा होता. कार्यक्रम मुलीच्या आजोबांच्या घरी असल्यामुळे तिचे आजी आजोबा, आण्णा आणि काकू म्हणजे तिची मावशी, तिची अजून एक गायनॅकॉलिजिस्ट मावशी, आणि त्या मावशीचा सॉफ्टवेअर इंजिनीयर नवरा. या सगळ्यांपैकी बाकी कुणालाही सॉफ्टवेअर इंजिनीरैंग कशाशी खातात हे माहिती नसल्यामुळे सुत्रे अर्थात गायनॅकॉलिजिस्ट मावशीच्या सॉफटवेअर इंजिनीयर नव-याच्या हाती गेली. आणि त्या भला गृहस्थाने मला असे काही प्रश्न विचारले की ज्याचे नाव ते. अगदी मी कुठल्या टेक्नॉलॉजीवर काम करतो, कुठल्या व्हिसावर अमेरिकेत गेलोय इथपासून ते अगदी पी एम पी सर्टीफिकेशन केलंय का इथपर्यंत सारं विचारलं. तो मला त्यांचा भावी जावई म्हणून हे सारं विचारत होता की त्याच्या कंपनीतल्या एखादया व्हॅकन्सीसाठी माझा इंटरव्ह्यू घेत होता हेच मला कळेना. मी डॉट नेटवर काम करतो की जावावर या गोष्टीने माझ्या संसारी आयुष्यात कसा फरक पडणार होता हेच मला कळेना.

आणि माझा इंटरव्ह्यू होत असताना मुलगी आतमध्ये होती. बहुतेक आतून ऐकत असावी सारं. थोडया वेळाने ती बाहेर आली. तिच्या गोतावळ्यासमोर तिला निरखून पाहणं थोडंसं अवघडच होतं म्हणा पण ईलाज नव्हता. तिला पाहताच मला आश्चर्याचा धक्क्काच बसला. फोटोत ती जशी दिसत होती, तितकी काही ती दिसायला साधारण नव्हती. कदाचित मेकअप केल्यामुळे असेल पण खरंच बरी दिसत होती ती फोटोतल्यापेक्षा. मी उगाचच तिला कॉलेज कुठे आहे, कुठल्या ईयरला आहे वगैरे विचारलं. अर्थात या प्रश्नांची उत्तरं मला आधीच माहिती होती. बास, काहितरी विचारायचं म्हणून मी तिला विचारलं. ती मुलगी मात्र स्वत:हून काही विचारेना. न राहवून मीच मग तिला म्हटलं की तुला मला काही विचारायचं असेल तर विचार. आणि मुलीने काही म्हणायच्या आधीच काकूंनी, तिच्या मोठया मावशीने उत्तर दिलं, "तिच्या काकांनी (गायनॅकॉलिजिस्ट मावशीच्या सॉफटवेअर इंजिनीयर नव-याने) सारं विचारलंय. त्यामुळे तिला काही विचारायचं गरज नाही." नाही म्हणायला एक गोष्ट तीने ठामपणाने सांगितली, तिला एम डी करायचं आहे.

मुलीला पाहून तर झालं. पण इथेही पुन्हा संदिग्धता. ते लोकं काहीच ठामपणे सांगेनात. पुन्हा कधीतरी बोलूयात असं सांगून उठलो. का कोण जाणे, पण मला काहितरी खटकत होतं. आणि नेमकं काय ते कळत नव्हतं. माझी एक महिन्याची सुटटी संपत आली होती. अमेरिकेत परत येण्याचे वेध लागले होते. आता कुठेतरी त्या विषयावर निदान आई बाबांशी तरी बोलणं गरजेचं होतं.
"बाबा काय करायचं? मुलगी ठीक वाटते मला. पण तिच्याशी पाच सहा वेळा बोलल्याशिवाय मी काहीच सांगू शकणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे ते लोक ठामपणे काहीच बोलत नाहीत. मला तर काहीच कळत नाहीये."
"तू अमेरिकेला परत जायच्या आधी आपण एकदा आण्णांच्या घरी जाऊ या"

झालं. मला अमेरिकेत परत यायला दोन दिवस असताना आम्ही आण्णांच्या घरी गेलो. काकूंनी बोलायला सुरुवात केली.
"तू आम्हा सर्वांना आवडला आहेस. आम्ही तिला विचारलं. तिने सारं आमच्यावर सोपवलं आहे. पण आता तिचं फायनल ईयर सुरू आहे. तिची तीन चार महिन्यांनी परीक्षा संपली की आम्ही तुला तिचा नंबर देऊ."

आम्ही घरी आलो. पण मला आता मात्र खरंच मला काहीतरी खटकत होतं.
"बाबा, का कोण जाणे पण मला नाही वाटत की हे सगळं पुढे जाणार आहे"
"असं का वाटतंय तुला?"
"ते लोक ठामपणे काहीच बोलत नाहीत. जाऊदया. त्या मुलीशी जेव्हा बोलणं होईल तेव्हा बघू."

मी अमेरिकेला आलो. कामामध्ये सारं विसरून गेलो. बघता बघता तीन महिने निघून गेले. आता मात्र घरी बाबांची चलबिचल सुरू झाली. बाबांचं म्हणणं होतं की त्या लोकांशी बोलून घ्यावं. खरं तर मला अंदाज आला होता. मी तसं बाबांना सांगितलं सुदधा.
"बाबा, मला अगदी ठाम वाटतंय की त लोक माझा ऑप्शन म्हणून विचार करत आहेत. त्या मुलीला खरं तर शिकायचं असावं पण तिच्या घरच्यांनी उगाच घाई केली आहे. बहुतेक मुलगी तयार नसावी."
"जे काही असेल ते. मी बोलतो त्यांच्याशी आणि काय ते क्लियर करून घेतो."
"चालेल."

आणि शेवटी तेच झालं होतं. माझा अंदाज खरा ठरला होतं. मुलीला एम डी करायचं असल्यामुळे मुलीने लग्नाला नाही म्हटलं होतं. पण त्यांनी ते आम्हाला सांगितलं नव्हतं. मला भारतात यायला अजून वेळ आहे आणि त्यामुळे आताच मला नाही
कशाला म्हणा या विचाराने त्यांनी बहुतेक आम्हाला काहीच सांगितलं नसावं. पण आता बाबांनी स्पष्टच विचारल्यामुळे त्यांना नाही म्हणावं लागलं होतं.

विचित्र होतं ते सगळं. मुलीच्या घरचे "मुलगा अमेरिकेला आहे" एव्हढाच विचार करत होते. त्यामुळे ते घाई करत होते. पण मुलीला पुढे शिकायचं असल्यामुळे मुलगी नाही म्हणत होती. मला एक प्रश्न मात्र राहून राहून पडत होता, जी मुलगी मला एम डी करायचं आहे म्हणत होती, ती घरच्यांना का ठामपणे सांगू शकत नव्हती की मला एव्हढयात लगन करायचं नाहीये म्हणून. जर डॉकटर मुलीची ही अवस्था तर बीए, बिकॉम झालेल्या मुलींचं काय होत असेल. या मुली एव्हढया शिकतात, सवरतात, पण जेव्हा लग्नासाठी जेव्हा कुणा मुलाला दाखवण्याची वेळ येते तेव्हा घरच्यांना सांभाळण्यासाठी मनाविरुदध हो म्हणतात. आणि मग पुढच्या सगळ्या समस्या निर्माण होतात. मला तर अशी उदाहरणे माहिती आहेत की मुली अगदी साखरपुडा होईपर्यंत तोंड उघडत नाहीत आणि साखरपुडा झाला की सगळ्यांना अंधारात ठेऊन प्रियकरासोबत पळून जातात. अर्थात सगळ्याच मुली अशा असतात, किंवा सर्रासपणे असं होतं असं नाही. पण काही मुली असं करतात एव्हढं मात्र नक्की...

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

31 Jul 2011 - 11:15 pm | मी-सौरभ

एम डी च शिक्षण पूर्ण झाळ असेल तर ऊडवणार का बार???

आत्मशून्य's picture

2 Aug 2011 - 12:07 am | आत्मशून्य

जर मूलगी पसंत असेल, तर आता बार उडवायला हरकत नाही... का तीला एम्डी करायच होतं हे कळलं म्हणून तूम्ही तीला ऑप्शनला ठेवलं ? कारण केवळ हेच कारण असेल तर एक चांगल स्थळ हातून जाणे योग्य न्हवे. आणी आता जर हे स्थळ जूळलं तर मूलीला तूमच्याबद्दल जो अभिमान विश्वास व आपूलकी वाटेल ते वेगळचं.

हो आणि आपली गणेशा, मनराव नंतर एक प्यार्टी फिक्स झालि,

अवांतर - डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीण म्हणतात मग एखाद्या डॉक्टर बाईच्या नव-याला डॉक्टराण म्हणावे का ?

वपाडाव's picture

12 Aug 2011 - 5:41 pm | वपाडाव

तिच्या मारी.....
ह्या गण्या अन मन्यानं प्यार्टी कधी दिली रे ???....

एकट्या एकट्यात जौन आला कारं तुमी....

प्रियाली's picture

31 Jul 2011 - 11:55 pm | प्रियाली

मला वाटतं त्यावेळी तुम्ही/तिने होकार दिला नाही ते बरेच झाले. एकंदरीत दोन दगडांवर पाय ठेवण्यासारखे प्रकरण दिसते आहे. एम.डी करायचं आहे म्हणून एम.डी. होता येत नाही. त्यासाठी खर्च, गुंतवणूक, अ‍ॅडमिशन वगैरेंची गणिते जुळवावी लागतात. तेव्हा, सहज गणिते जुळत असतील तर केलं एम.डी. नाहीतर मग मुलगा बघून टाकलेला बरा अशी बर्‍याच पालकांची (आणि बहुधा मुलींचीही) धारणा असते/ असू शकते.

मुलगी तोंड उघडून स्पष्ट बोलत नसावी कारण एम.डी. करणे म्हणजे स्वतः ठरवून मुंबई-पुणे ट्रिप उरकून येणे नाही. तिला पुढे शिकण्यासाठी पैसे पुरवणारे, सपोर्ट करणारे आई-वडिलच असतात. तिला पदोपदी त्यांची गरज आहे पण तेच ठाम नसतील तर मुलगी तरी कशी ठाम असेल? काही आईवडिलांना अद्यापही मुलींच्या उच्चशिक्षणासाठी खर्च करणे जिवावर येते कारण एवढा खर्च आता केला तर लग्नाचा खर्च कसा करायचा ही चिंता असते.

असो. त्यावेळी झाले ते बरे झाले कारण तुम्ही लग्न ठरवलं असतं आणि त्या काळात तिला अ‍ॅडमिशनही मिळाली असती तर नेमके काय झाले असते ते सांगता येत नाही पण आता बघा एम.डी झालं असेल, तुम्हाला आवडली असेल आणि तिला यापुढे शिकायचं नसेल तर पुन्हा विचार करता येईलच.

धन्या's picture

1 Aug 2011 - 8:15 am | धन्या

संपुर्ण लेखाचं सार मोजक्याच शब्दांत मांडणारा आपला संतुलित प्रतिसाद आवडला.

एम.डी करायचं आहे म्हणून एम.डी. होता येत नाही. त्यासाठी खर्च, गुंतवणूक, अ‍ॅडमिशन वगैरेंची गणिते जुळवावी लागतात. तेव्हा, सहज गणिते जुळत असतील तर केलं एम.डी. नाहीतर मग मुलगा बघून टाकलेला बरा अशी बर्‍याच पालकांची (आणि बहुधा मुलींचीही) धारणा असते/ असू शकते.

पण असं दोन दगडांवर पाय ठेवताना पालकांनी मुलीचं मतही विचारात घ्यायला हवं. तिची अशा दोन्ही अल्टरनेटिव्ह्जना हा असेल तर हरकत नाही. परंतू तिची पुढे शिकायचीच ईच्छा असताना घरच्यांनी उगाचच तिला केवळ "मुलगा अमेरिकेत आहे" म्हणून लग्नाच्या बोहल्यावर चढवणं योग्य नाही.

मुलगी तोंड उघडून स्पष्ट बोलत नसावी कारण एम.डी. करणे म्हणजे स्वतः ठरवून मुंबई-पुणे ट्रिप उरकून येणे नाही. तिला पुढे शिकण्यासाठी पैसे पुरवणारे, सपोर्ट करणारे आई-वडिलच असतात. तिला पदोपदी त्यांची गरज आहे पण तेच ठाम नसतील तर मुलगी तरी कशी ठाम असेल? काही आईवडिलांना अद्यापही मुलींच्या उच्चशिक्षणासाठी खर्च करणे जिवावर येते कारण एवढा खर्च आता केला तर लग्नाचा खर्च कसा करायचा ही चिंता असते.

खुप वाईट अवस्था होत असेल अशा वेळी मुलींची. ज्या आईवडीलांनी लहानाचं मोठं केलं, ज्यांनी खर्चिक उच्चशि़क्षण दिलं त्या आईवडीलांची ईच्छा एका बाजूला तर आपली स्वप्ने दुसर्‍या बाजूला अशा दुविधेत मुली पडतात. फ्रेंड सर्कलमधल्या खुप मुलींच्या बाबतीत असं झालेलं आहे.

अशा वेळी पालकांनीच समजून घेतलं पाहिजे. निदान ती दुविधेत पडणार नाही एव्हढं तरी पाहायला हवं.

खुप वाईट अवस्था होत असेल अशा वेळी मुलींची. ज्या आईवडीलांनी लहानाचं मोठं केलं, ज्यांनी खर्चिक उच्चशि़क्षण दिलं त्या आईवडीलांची ईच्छा एका बाजूला तर आपली स्वप्ने दुसर्‍या बाजूला अशा दुविधेत मुली पडतात. फ्रेंड सर्कलमधल्या खुप मुलींच्या बाबतीत असं झालेलं आहे.
अशा वेळी पालकांनीच समजून घेतलं पाहिजे. निदान ती दुविधेत पडणार नाही एव्हढं तरी पाहायला हवं.

पालकांनी समजुन घ्यायला हरकत नाहीच मुळी...
पण "समजुन घेणे" या क्रियेत पैसा उभा होत नाही ना....
सो, त्यांचे निर्णय मान्य करावेच लागतील...
अन्यथा, वराकडील मंडळीसोबत सल्ला-मसलत करुन पीजीचा खर्च मुलगी लग्नानंतर मायबापाला देइन
किंवा लग्नातला अर्धा-पाउण खर्च पेलेल ही अट तिने स्वतः घातली पाहिजे....
क्युकी पैसाईच बोलता है !!!! (पैसातै नव्हे)

>> मला भारतात यायला अजून वेळ आहे आणि त्यामुळे आताच मला नाही
कशाला म्हणा या विचाराने त्यांनी बहुतेक आम्हाला काहीच सांगितलं नसावं. >>

असच असावं. चांगलं स्थळ हातचं जाऊन देणं जीवावर आले असेल. यात मुलीचा दोष नाही. जिथे तोंड उघडायचे (पक्षी - आई-वडीलांकडे) तिथे तिने उघडलेले दिसते. आता आई-वडील तळ्यात का मळ्यात होते यात त्यांचाही दोष नाही - चांगलं स्थळ कोण जाऊ देईल?
त्यांची अशी अपेक्षा असावी की <वधूकडचा मोड सुरू>दोघांना एकमेक खूप पसंत पडून मग तुम्ही एंगेज व्हावं. नंतर तोपर्यंत तिने एम डी पूर्ण करावं. मग सुखेनैव नांदावं. नोकरी वगैरे सासरच्या मर्जीनुसार वर्क आऊट होईलच<वधूकडचा मोड संपला>.

लग्न ही नाजूक बाब असते. तिथे एक घाव दोन तुकडे चालत नाहीत. मुलीचे नशीब उजळणार असेल तर आई-वडील शक्यतो "नाही" असे किरकोळ कारणासाठी म्हणायला कचरतात. हो मुलीचे पदव्युत्तर शिक्षण हे कारण अजूनही किरकोळ धरतात.

आता आई-वडील तळ्यात का मळ्यात होते यात त्यांचाही दोष नाही - चांगलं स्थळ कोण जाऊ देईल?
त्यांची अशी अपेक्षा असावी की <वधूकडचा मोड सुरू>दोघांना एकमेक खूप पसंत पडून मग तुम्ही एंगेज व्हावं. नंतर तोपर्यंत तिने एम डी पूर्ण करावं. मग सुखेनैव नांदावं. नोकरी वगैरे सासरच्या मर्जीनुसार वर्क आऊट होईलच<वधूकडचा मोड संपला>.

मी जी परिस्थिती वर्णन केली आहे, त्या परिस्थितीच्या संदर्भात तरी मी तुमच्याशी सहमत नाही. आई वडील स्वतःच दुविधेत आहेत. लग्न ठरवावं की मुली कुठल्याही बंधनात न अडकवता पुढे शिकू द्यावं याचा ठाम निर्णय ते घेऊ शकत नाहीत.

तुम्ही <वधूकडचा मोड> मध्ये जे लिहिलं आहे त्याच्याशी १००% सहमत. मुलीचा होकार असेल तर हे पटण्यासारखं आहे.

मुलीच्या पदव्युत्तर शिक्षणाचा आधीच झाला असता तर तुम्ही लग्नाचा अर्धा खर्च उचलला असता काय?
किंवा रजिस्टर लग्न (कमीत कमी खर्चात) करण्याचा आग्रह धरला असता काय?
विचित्र अवस्था बरेचदा (दोन्ही पक्षाची) मुलीकडच्यांची होते.
चांगले स्थळ आल्यावर जाऊ देणे जिवावर येते.
मुलींच्या पुढच्या शिक्षणाला नाही म्हणवत नाही.
अमेरिका म्हणजे अजूनही भारतात 'ग्रेट' समजली जाते त्यामागे त्यांची अपुरी माहिती हे कारण असतेच पण एकंदरीतच मुलगी चांगल्या ठिकाणे पडावी (?) म्हणून जीव जाईपर्यंत आईवडील काळजी करत असतात.

मुलीच्या पदव्युत्तर शिक्षणाचा आधीच झाला असता तर तुम्ही लग्नाचा अर्धा खर्च उचलला असता काय?
किंवा रजिस्टर लग्न (कमीत कमी खर्चात) करण्याचा आग्रह धरला असता काय?

रेवतीताई, जे काही झालं ते मुलीकडच्यांचा चॉईस होता. मुलीचे पदव्युत्तर शिक्षण आधीच झाले असते तर काही शक्याशक्यता बदलल्या असत्या :)

अर्थात, तुमच्या प्रश्नाचं प्रांजळ उत्तर "होय" असं आहे, दोन्ही पर्यायांना :)

इंटरनेटस्नेही's picture

1 Aug 2011 - 4:03 am | इंटरनेटस्नेही

करिअर आणि अफेर्स/लग्न हा चॉईस करणे म्हणजे लै अवघड प्रकरण दिसते बुवा.. :O

धन्या's picture

1 Aug 2011 - 8:34 am | धन्या

खुपच गहन प्रश्न पडलेला दिसतोय तुम्हाला.
कुठल्या कॉलेजात आहात? :D

करिअर आणि अफेर्स/लग्न हा चॉईस करणे म्हणजे लै अवघड प्रकरण दिसते बुवा..

सध्या तरी अफेअर्सचा आनंद घ्या. करियर आणि लग्न या गोष्टी तशाही चुकणार्‍या नाहीत. :P

मी-सौरभ's picture

1 Aug 2011 - 11:20 am | मी-सौरभ

चि. इंट्या याचे लग्न या विषयावर एक कौल टंकावा असे वाटू लागले आहे.....

जिकडे वाचावे तिथे हाच मुद्दा चर्चेत आहे.... :)

आयला, म्हणजे इन्ट्याचे लग्न झालेले नाहीये अजून?

कौतुक आहे हो मग! अहो लग्नाशिवायच बराच 'अनुभव' आहे म्हणा की. त्यांच्या प्रतिक्रियांवरुन तरी लक्षात येतंय हो तसंच.

>>लग्नाशिवायच बराच 'अनुभव' आहे <<

@प्यारे:
मागे तो 'पुण्यात कोण्याएका विहिरिचं पाणी प्यायला आहे' असं काही तरी वाचल्याचे स्मरते........... म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढाच कि ते बेनं बारा हिरिचं पानी प्यायलेलं दिसतयं......

(हिरीबद्द्ल अधिक माहितीसाठी... कॉन्टॅक्ट इंटोबा.... ;) )

वाकडे म्हाराज.. छान लिहील आहे :)
अशीच परिस्थिती घरोघरी दिसते हल्ली

अन्या दातार's picture

1 Aug 2011 - 11:42 am | अन्या दातार

स्पा ने त्याच्या घरची परिस्थिती मस्त खुसखुशीत शब्दात मांडावी अशी विनंती करुन मी माझे २ शब्द संपवतो! :D

स्पा's picture

1 Aug 2011 - 11:51 am | स्पा

स्पा ने त्याच्या घरची परिस्थिती मस्त खुसखुशीत शब्दात मांडावी अशी विनंती करुन मी माझे २ शब्द संपवतो

अन्या मी "कोल्हापूरच्या" परिस्थिती बद्दल काही बोललो होतो का..

का तू भांडण उकरून काढतोस ;)

अन्या दातार's picture

1 Aug 2011 - 12:54 pm | अन्या दातार

स्पावड्या, तुच म्हणालास ना मगाशी अशीच परिस्थिती घरोघरी दिसते हल्ली म्हणून. मग त्यासाठी सँपल म्हणून तुझा उल्लेख केला रे!
आणि इथे विषय अ‍ॅरेंज मॅरेजचा चालला आहे, अफेअरचा नाही. ;)

चालायचंच राव. अरेंज मॅरेज इज लाईक अ डील, स्टील इट इफ यु लाईक इट. (पण त्यातलं आपल्याला काही कळत नाही ब्वॉ!) ;-)

मुलीला वर अगदीच आवडला असता, एम डी होण्यापेक्षा तर? (हलके घ्या.) ;-)

नायल्या,

ही अशी प्रेमासाठी शिक्षणाची बिक्षणाची कुर्बानी देणं प्रेमविवाहात होतं. ठरवून केलेल्या किंवा ठरवून होत असणार्‍या लग्नात बर्‍यापैकी गणिती आकडेमोड असते :)

भडकमकर मास्तर's picture

1 Aug 2011 - 2:24 pm | भडकमकर मास्तर

अगदी अगदी..
क्लेम ठेवणे.... मोघम मोघम बोलत टोलवाटोलवी.... असे दोन्ही पार्टींकडून चालते...

चालायचेच...

Nile's picture

1 Aug 2011 - 2:33 pm | Nile

मी गणितच म्हणतोय. कोणती ऑफर जास्त फायद्याची आहे, चांगलं पण सहजी मिळणार नाही असं स्थळ का एमडी? (अन एमडी होऊन पूढची गणितं..) असा फायद्याचा विचार करत नसतील का?

धन्या's picture

1 Aug 2011 - 4:35 pm | धन्या

तरीही, ईतर फायद्यांपेक्षा मला शिकायचंच आहे अशा ध्येयाने मुलगी "झपाटलेली" असण्याची शक्यता नाकारता येत नाही ना :)

विजुभाऊ's picture

1 Aug 2011 - 3:46 pm | विजुभाऊ

एम डी होणे आणि लग्न करणे यांचा अर्थोअर्थी काय संबन्ध आहे?
( एम डी ची फी कोणी द्यायची य अर्थाने म्हणत नाही) लग्नानंतर सुद्धा एम डी करता येते की?
हल्ली पैसे मोजायची तयारी असल्यास एम डी करणे इतके अवघड जात नाही

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 Aug 2011 - 3:21 pm | विश्वनाथ मेहेंदळे

च्यामारी, हा धागा नजरेतून निसटून गेला होता. अनुभव मस्त लिहिला आहे.

>>जर डॉकटर मुलीची ही अवस्था तर बीए, बिकॉम झालेल्या मुलींचं काय होत असेल
वरील वाक्यावर तीव्र आक्षेप नोंदवू इच्छितो. मानसिक रित्या कणखर असणे, दबावाखाली न येता मते मांडणे आणि मुळात म्हणजे स्वतःला काही मते असणे याचा आणि शिक्षणाचा फारसा संबंध नाही.

विनायक प्रभू's picture

12 Aug 2011 - 3:30 pm | विनायक प्रभू

बच गया साला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Aug 2011 - 8:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियालीचा प्रतिसाद पटला आणि आवडला.

धनाजीराव, स्पष्ट बोलण्याचा आणि शिक्षणाचा फार काही संबंध असतो असं वाटत नाही. थोडाफार संबंध येतो तो कमाईमुळे. एकदा स्वतःचे पैसे मिळवायला लागलो कि निदान ठामपणे उभं रहाण्याचा आत्मविश्वास येऊ शकतो. दहावीची परीक्षा झाल्यानंतर "स्वयंपाकाला बाई लावता येईल, पण मला अभ्यास करायला मजा येते" असं लोकांना सांगणारी त्यानंतर १५ वर्षांनीही, स्वयंपाकाबरोबरच लौकीकार्थाने चिक्कार शिकली आणि तशीच वागताना दिसते; दुसर्‍या बाजूला आयटीसारख्या चिक्कार पैसा आणि प्रतिष्ठा देणार्‍या व्यवसायात असूनही मनातले विचार स्पष्ट बोलून दाखवू न शकणारीही दिसते.

मुलगी ही मोठी जबाबदारी आहे (ती स्वतःची जबाबदारी घेऊच शकत नाही), मुलांची (मुलगा-मुलगी दोन्ही) लग्न ही आपलीच गरज, जबाबदारी, सामाजिक कर्तव्य आणि हौसही आहे असं मानणारे पालक, या सगळ्यामुळे हा प्रकार तापदायक होतो असं मला माझ्या मित्रमंडळाकडे बघून वाटतं.

मर्द मराठा's picture

13 Aug 2011 - 8:21 am | मर्द मराठा

ह्या अनुभवातून पालकांची मानसिकता प्रकर्षाने जाणवते... काही करून लग्न म्हणजे मूलीच्या आयुष्याची परिणती .. मुलींच्या भाग्याचा उदय फक्त नवराच करू शकतो ही समाजभावना जाणार कधी?

काही कुटुंबामध्ये मुलीला वाढवलेच अशा पध्दतीने जाते की निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात कधी तयारच होत नाही.. आईवडीलांवर किंवा नवर्‍यावर पडणार नाही ह्या पध्दतीने स्वतःच्या शिक्षणाची/लग्नाची/पर्यायाने आयुष्याची आखणी करीन.. व ते स्वत:च्या आईवडीलांना ठामपणे सांगीन.. हे तर फार दूरच राहीले..
स्वत:चे शिक्षण स्वतःच्या खर्चाने पूर्ण करण्यात काय झिंग आहे हे कळत नाही ह्या पदधतीमुळे..
कधी कधी अमेरिकेतली १८ व्या वर्षी मूलांना घरातून हाकलण्याची पद्धत खरीच चांगली वाटते.

आणि दुसरा गोड गैरसमजाचा प्रकार म्हणजे अनिवासी भारतीय जावई मिळाला म्हणजे जग जिकंल्याची भावना...
अमेरीकेतले भारतीय संगणकीय तंत्रज्ञ आता पैशाला पासरी झाल्याने सध्या शहरांत हे प्रकार कमी झाले आहेत पण गावांत बरेच ऐकायला मिळते... ह्याचे उत्तम उदाहरण आहे हा अनुभव.

बर्‍यापैकी विस्ताराने लिहीला आहे अनुभव... काही अनावश्यक बाबींचा उल्लेख वगळता आवडला.