तुका जातो वैकुंठाला

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
25 Jun 2011 - 12:40 pm

न कळत्या वयात प्रभातचा संत तुकाराम पाहिला होता - खूप रडलोही होतो. अगदी काल-पर्वा युट्य़ूबवर संत तुकाराम चित्रपटातील दोन क्लिप्स पुन्हा एकदा पाहाण्यात आल्या. त्या उतरवूनदेखील घेतल्या. या चित्रपटातील तुकोबाची भूमिका विष्णुपंत पागनिसांची (पु.लं. च्या हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका मधली पेस्तनकांकाची "अरे साला काय ऎक्टिंग, तुला सांगतो साला ओरिजिनल तुकारामबी असा नसेल, ते विस्नुपंत आता वैकुंटमदी असेल, सिटिंग नेक्स्ट टू दी गॉड..." ही दाद आठवते का?). विष्णुपंत पागनीसांनी केलेल्या तुकारामाच्या या भूमिकेने त्या काळात अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. विष्णुपंत पागनिस असे मराठीत लिहुन गुगलवर सर्च मारला तर पागनिसांच्या मुलीने लोकसत्तामध्ये लिहिलेला लेख वाचायला मिळाला. त्या लिहितात की ही भूमिका करण्यापूर्वी विष्णुपंत पागनीस देहूला गेले. तिथे तुकोबांच्या मंदिरात त्यांनी तुकोबाला "तुकोबा, तुम्हीच आता माझ्याकडून ही भूमिका करून घ्या" असे साकडे घातले. या भूमिकेनंतर पागनिस यांच्यामध्येही अमूलाग्र बदल झाल्याचे त्यांनी लिहीले आहे.
जुन्या जमान्यातील अभिनयाबद्दल आणि एकुणच चित्रपटनिर्मितीबद्दल काय लिहावे? मी मागे एकदा माझ्या मित्रांसोबत "रामजोशी" पाहीला होता तेव्हा एका चांगला नामांकित असलेल्या वकिल मित्राने विचारले होते, "त्या काळात जाऊन शूटिंग कशी काय केली असेल बुवा, तेव्हा कुठे होता कॅमेरा..?" मी कपाळावर हात मारून घेतला होता. त्याकाळची चित्रपटनिर्मिती, अभिनय यांना मिळालेली ही अस्सल दाद होती. असो.

तर तुकोबा आपल्या अंगणात चिपळ्य़ांच्या तालावर "पांडूरंग ध्यानी, पांडूरंग मनी" असे भजन करीत बसले आहेत, त्यांचा म्हाद्या पोटदुखीने बेजार होऊन "आईईईई, आईईईई" ओरडतोय. तुकोबाची बायको आवडी तिच्या म्हशीच्या वैरणकाडीची हलवा-हलव करतेय. म्हाद्याचे ओरडणे ऎकून आवडाबाई तुकोबावर उखडते आणि तुकोबाला अगदी फरफर ओढतच घरात घेऊन जाते -
"म्हयना झाला, पोर घरात माशावानी तडफडतंय, त्याचं काय हाय का तुमच्या जीवाला? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी....घ्या ह्या कार्ट्याला"
असे म्हणून ती आत्ताच ओढून आणून आत बसवलेल्या तुकोबाच्या मांडीवर पोराला आदळतेच! (तुकाराम उगाच नाही म्हणाले - तुका झाला सांडा, विटंबिती पोरे रांडा)
तुकोबा पुटपुटतात "अगं, अगं असं काय करतेस? तो आजारी आहे ना?"
तो आजारी आहे ना हे म्हाद्याच्या अंगावरून हात फिरवीत बोललेले तुकारामांचे शब्द अगदी लोण्याहूनही मऊ, दयाद्र !
या टोनींगसाठी मी पागनिसांना हजार ऒस्कर दिले तरी त्यांना खरी दाद दिल्याचे माझे समाधान होणार नाही.
आवडी मात्र तुकोबाच्या या ऒस्करविनर शब्दांना दाद इत्यादी द्यायची सोडून त्यांच्यावर भडकतेच -
"व्ह्यय, व्ह्यय, तेच मगापासून तुमच्याम्होरं वरडतोया, त्याला काय औशद-बिशद करायचं हायं का न्हाई?"
"अगं, पांडूरंगासारखा धन्वंतरी, आणि विठ्ठ्लनामासारखं औषध त्रिभुवनात तरी मिळेल काय? बाळ, तु पांडूरंगाचं नाव घे पाहू....पांडूरंग, पांडूरंग"
तुकोबा त्यांच्या मधाळ आवजात म्हाद्याला त्याच्या तापेवर विठ्ठ्लनामाचं औषध सुचवतात. म्हाद्याही गोड आवाजात "पांडुरंग, पांडूरंग" म्हणू लागतो.
इथे आवडीच्या रागाचा कडेलोट होतो -
"खबरदार म्हाद्या, जिभन-जिभ हासडून काढीन त्या पांड्याचं नाव घेतलंस तर, घरात एक येडा आहे, तेवडं पुरं झालं"
ती म्हाद्याला तुकोबाच्या मांडीवरून कच्चकन ओढुन घेऊन दणकन जमिनीवर आदळते -
"बगा, बगा जरा डोळं फाडुनशान, पोर म्हशीवानी वरडतयं"
तुकोबा पुन्हा त्याच मऊ आवाजात "ऒरडणार नाहीतर काय करील बिचारा? तु त्याला माझ्याजवळही बसू देत नाहीस, आणखी तुही त्याच्याकडं बघत नाहीस..दिवसभर त्या दूध न देणा-या म्हशीमागं असतेस"
"हां, माझ्या म्हशीचं नाव काडू नका हं..." आवडी
"का? माहेरची आहे म्हणुन?"
"व्ह्यय, व्ह्यय ती माझ्या माहेरचीय म्हणुन ती मला लईई आवडतीया, काय म्हणणंय तुमचं? म्हायेरच्या वरवट्य़ांन आमा बायकाचं डोस्कं जरी फुटलं, तरीबी रगत येत न्हाय त्यातनं कंदी...जवातवा-जवातवा माझ्या म्हायेरचं नाव काडतायसा, आज न्हाई, तर च्चार वर्सानं माजी म्हस दूद देईन...पण रातदिस तुमी त्या काळ्याचं नाव कुटतायसा, काय दिलं त्यानं? समद्या घराचं वाटोळं केलं...खायाला भाकरीचा तुकडाबी नाही ठेवला, पोरबाळं आजारी पाडली, त्या मेल्या काळतोंड्यांनं माज्या म्हशीचं दुद बी आटवलं..."
एवढं रामायण ऎकूनही तुकोबाचा मधाळ आवाजात हेका सुरूच -
"अगं, पण पांडूरंगाला का शिव्या देतेस?"
"शिव्या? आता नुसत्या शिव्यावर ठेवत नाही, ह्या म्हाद्याला नेऊन आपटते त्याच्याम्होरं, चांगली पाठ चेचुन ईचारते तुमच्या त्या धन्वंत-याला....."
असे कडाडुन ती पोटदुखीने आजारी असलेल्या म्हाद्याला एका हाताला धरून घरातून, एका हातात तुकोबाचंच पायतण घेऊन रस्त्यातून फ़रफटत पांडूरंगाच्या देवळाकडे ओढत नेऊ लागते.
तुकोबाही आपली वीणा सावरीत तिच्या मागे पळतात.
तिकडे मंदिरात सालोचे किर्तन रंगात आलेले असते. तो आपल्याच नादात तल्लीन होऊन
"आणि ते असं थरथर-थरथर कापलं" असं काहीतरी श्रोत्यांना सांगत दोन्ही हात वर करून मागे येत असतो.
म्हाद्याला विठोबाच्या पुढे नेऊन टाकण्यासाठी आलेली आवडी पाठमो-या अवस्थेत तिच्याकडे येणा-या सालोला हाताच्या एका फटक-यानं गर्दीत भिरकावून देते. सालो श्रोत्यांमध्ये जाऊन एका अंगावर पडतो.
पुढे सालो ने जाब विचारल्यावर त्याला आवडीने त्याच्याही टाळकुटेपणाचा उध्दार करून त्यालाही गप्प करणे. या घटनेमुळे सालोने तुकोबाला देवळात यायला बंदी घालणे, पुन्हा तुकोबाचा देवापुढे काकुळतीचा अभंग इ.इ. सीन्स होतात.
दुस-या क्लिपमध्ये तुकोबा वैकुंठाला निघालेले आहेत. मंदिरासमोर अपार गर्दी जमली आहे. "पांडुरंगा, हिला सुखी ठेव" या वाक्यानंतर "पांडुरंग,पांडुरंग, पांडुरंग हरी" या भजनावर गर्दीने ताल धरला आहे. पगड्या, फेटे, कमरबंद बांधलेले वारकरी तुकोबाभोवती फेर धरून नाचत आहेत. मधोमध असलेले तुकोबा हळूहळू पुढे सरकत आहेत. भजनाचा पूर ओसरत असतानाच तुकोबा त्यांचं शेवटचं सांगणं, मधाळ, आर्जवी आवाजात सांगू लागतात-
"आता तुम्हाला माझं शेवटचं, एकचं सांगणं आहे, की सुखी संसारी असावे, चित्त परब्रम्ही ठेवावे. (हे सांगत असताना तुकोबांचे दोन्ही हात गर्दीच्या दिशेने पसरलेले, गर्दीतील प्रत्येकाला आपले म्हणणे पटावे म्हणून वाक्यातील प्रत्येक शब्दावर जोर, आर्जव...) अखंड नाम, हा माझ्या अनुभवाचा, परब्रम्ह गाठण्याचा, एकच, अगदी सोपा मार्ग आहे. त्यानं ईश्वरावरील श्रध्दा अचल होते, चित्त शुध्द होतं. स्वईर संचारी मनाला, ईश्वरी प्रेमाखेरीज आणखी कशानंही वेसण घालता येत नाही...मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकविधभाव म्हणतात. अखंड नामोच्चारानं हा एकविधभाव आपल्या मनात उत्पन्न करून परमेश्वर प्राप्ती करून घेता येते (आता तुकोबाची नजर वर जाते). आणि मग, मुखी नाम, हाती मोक्ष, ऎसी साक्ष बहुतांची...अवघे लाभ होती या चिंतने, नाम संकिर्तने गोविंदाच्या...."
तुकोबाच्या आकाशाकडे गेलेल्या नजरेला खाली येणारे पुष्पक विमान दिसते, दोन्ही पंखांनी हवा कापीत ते खाली उतरतेय. तुकोबा अभंग गाऊ लागतो -
पैल आले हरी शंख चक्र शोभे करी ।
गरुड येतो फडत्कारे ना भी ना भी म्हणे त्वरे ।।
मुगूट कुंडलांच्या दिप्ती तेजे लोपला गभस्ती ।
मेघ:श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी ।।
चतुर्भज वैजंयती गळा माळ हे रूळती ।
पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा ।।
तुका झालासे संतुष्ट घरा आले वैकुंठपीठ ।
आपण नुसता वाचुन काढला तर अभंगात तेवढी मजा येत नाही. त्यासाठीही तुकोबांचीच चाल घ्यावी लागते. म्हणजे अभंगाचे एक पद म्हणुण झाल्यावर लगेच पुढचे पद न घेता त्याच पदाचा अर्धा भाग घ्यायचा, हा अर्धा भाग खाली खाली, उतरत जाणा-या तालात:-
पैल आले हरी शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी ।
गरुड येतो फडत्कारे ना भी ना भी म्हणे त्वरे. ना भी ना भी म्हणे त्वरे, ना भी ना भी म्हणे त्वरे....
मुगूट कुंडलांच्या दिप्ती तेजे लोपला गभस्ती । तेजे लोपला गभस्ती, तेजे लोपला गभस्ती.....
मेघ:श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी ।। मूर्ती डोळस साजिरी, मूर्ती डोळस साजिरी....
चतुर्भज वैजंयती गळा माळ हे रूळती । गळा माळ हे रूळती, गळा माळ हे रूळती.....
पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा ।। उजळल्या दाही दिशा, उजळल्या दाही दिशा.....
तुका झालासे संतुष्ट घरा आले वैकुंठपीठ । घरा आले वैकुंठपीठ, घरा आले वैकुंठपीठ......
पांडूरंग हरी, जय जय पांडूरंग हरी, जय जय पांडूरंग हरी.
तुकोबा आता खाली उरतलेल्या पुष्पक विमानात बसले आहेत. दोन गंधर्वकन्या त्यांना पंख्याने वारा घालत आहेत. तुकोबा गर्दीवर नजर टाकीत, हात जोडून, मुखाने पांडुरंग, पांडूरंग म्हणताना असा भास होतो की ते पांडुरंगाच्या नावाचा प्रसादच प्रत्येकाच्या मुखात भरवीत आहेत. तुकोबा गाऊ लागतात -
आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा । आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा....
तुमची आमुची हेचि भेटी येथुनीया जन्म सुखी ।। येथुनीया जन्म सुखी, येथुनीया जन्म सुखी....
आता असो द्यावी दया तुमच्या लागतसे पाया । तुमच्या लागतसे पाया, तुमच्या लागतसे पाया....
येता निजधामी कोणी विठठ्ल-विठठ्ल बोला वाणी ।। विठठ्ल-विठठ्ल बोला वाणी....
रामक्रुष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला । तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला....

तुका वैकुंठाला गेला. जाताना आम्हाला रडवुन गेला. घरा आले वैकुंठपीठ !!!!!
शेवटच्या अभंगात तुकोबा म्हणतात - तुमची आमुची हेची भेटी, येथुनिया जन्म सुखी....!!!!
वैकुंठाला जाणारे तुकोबा लोकांना आर्जव करतायत - आता असो द्यावी दया, तुमच्या लागतसे पाया...!!!!

तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का? त्यांना न्यायला खरंच विमान आले होते काय? तुकोबाच्या नादापायी त्यांच्या लेकरांचे आणि आवडीचे किती हाल झाले? त्याला जबाबदार कोण? असले निरर्थक प्रश्न विचारण्याने आपण दगडाचे दगडच राहातो - आपल्याला पाझर फुटला नाही हेच कळते. तुकोबा विमानातुन वैकुंठाला गेलेही नसतील पण "तुमची आमुची हेचि भेटी येथुनीया जन्म सुखी" असे मरतानाही म्हणायला माणूस अमरतेची चव चाखलेलाच असावा लागतो.

(पूर्वप्रकाशित)

कलासंगीतसंस्कृतीधर्मवाङ्मयसमाजजीवनमानमौजमजाचित्रपटप्रकटनअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

पप्पु अंकल's picture

25 Jun 2011 - 12:58 pm | पप्पु अंकल

अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. नितांत सुंदर चित्रपट. संत तुकाराम म्हणुन आज देखिल विष्णुपंत पागनिसांची छायाचित्रे वापरलि जातात.
खुप छान लिहिलय.

तुकाराम म्हटल्यावर त्यांची प्रतिमा डोळ्यापुढे विष्णुपंतांसारखीच येते. असा कलावंत पुन्हा होणे नाही.

तुम्ही केलेले वर्णनही छान!

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2011 - 1:01 pm | llपुण्याचे पेशवेll

वा वा वा .. येशा एक नंबर एक नंबर.

पण "तुमची आमुची हेचि भेटी येथुनीया जन्म सुखी" असे मरतानाही म्हणायला माणूस अमरतेची चव चाखलेलाच असावा लागतो.
एकदम पटले. 'तुका म्हणे तेथे पाहीजे जातीचे | येरागबाळ्याचे काम नोहे||'
प्राचार्य सोनोपंत दांडेकर म्हणत " आम्ही ज्ञानेश्वर माऊलीला देव मानतो ते त्यांनी भिंत चालवली म्हणून नव्हे. ती काय आज यंत्रयुगात कोणीही चालवेल. आम्ही त्यांना देव मानतो ते त्या ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवाच्या अमॄताचा लाभ आम्हाला करून दिला म्हणून. "

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2011 - 1:02 pm | बिपिन कार्यकर्ते

_/\_

सुंदर स्मरणयात्रेबद्दल धन्यवाद!

छोटा डॉन's picture

25 Jun 2011 - 2:24 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो रे ....
फारच सुरेख स्मरणयात्रा, फार आवडली.

- छोटा डॉन

प्रभो's picture

27 Jun 2011 - 7:42 pm | प्रभो

हेच म्हणतो रे यशवंता....

मूकवाचक's picture

5 Jul 2011 - 8:12 pm | मूकवाचक

_/\_

कवितानागेश's picture

25 Jun 2011 - 1:25 pm | कवितानागेश

:)

मृत्युन्जय's picture

25 Jun 2011 - 1:41 pm | मृत्युन्जय

मस्त लिहिले आहेस रे यशवंता. खुपच सुंदर. एकदम चित्र उभं केलेंस की रे डोळ्यासमोर.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jun 2011 - 2:16 pm | परिकथेतील राजकुमार

__/\__ अतिशय रसाळ लेखन यक्कु शेठ.

लेख वाचत नव्हतो तर जणु प्रसंगच बघत होतो :)

छोटा डॉन's picture

25 Jun 2011 - 2:26 pm | छोटा डॉन

>>लेख वाचत नव्हतो तर जणु प्रसंगच बघत होतो
+१.
च्यायला, हेच म्हणायचे होते मला. :)

- छोटा डॉन

नारयन लेले's picture

25 Jun 2011 - 2:34 pm | नारयन लेले

फारच छान

विनित

किसन शिंदे's picture

25 Jun 2011 - 3:09 pm | किसन शिंदे

काही दिवसांपुर्वीच देहुतून तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान झाले आणी त्या पार्श्वभूमीवर तुम्ही टाकलेला हा लेख!
यापुढे आणखी काय बोलणार? धन्य झालो! :)

समाधान's picture

25 Jun 2011 - 2:50 pm | समाधान

_/\_

फारच सुरेख

विलासराव's picture

25 Jun 2011 - 4:12 pm | विलासराव

.

गणपा's picture

25 Jun 2011 - 4:23 pm | गणपा

प्रसंग अगदी जसाच्या तसा डोळ्या पुढे उभा राहिला.

michmadhura's picture

25 Jun 2011 - 5:08 pm | michmadhura

अगदि चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर. छान लिहीलय

अजातशत्रु's picture

25 Jun 2011 - 5:20 pm | अजातशत्रु

तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे ॥

आनंदयात्री's picture

25 Jun 2011 - 6:02 pm | आनंदयात्री

यश्या यश्या जिंकलस रे !!
सकाळ अगदी सार्थकी लावलीस. लेख फार फार आवडला.

पैसा's picture

25 Jun 2011 - 6:44 pm | पैसा

यशवंतबुवा, एकाच लेखात संत तुकाराम चित्रपट आणि देहूच्या तुकोबारायांचं सुरेखरीत्या दर्शन घडवलंत. लेख लईई ग्वाड झालाय बघा!

"तुमची आमुची हेचि भेटी येथुनीया जन्म सुखी" असे मरतानाही म्हणायला माणूस अमरतेची चव चाखलेलाच असावा लागतो.

हे खास आवडलं.

रेवती's picture

25 Jun 2011 - 6:45 pm | रेवती

लेखन आवडले.
लहान असताना सिनेमा पाहताना मीही बरीच रडले होते.
सिनेमातले सगळे खरे वाटत होते. त्यावेळी फार वाईट वाटले होते.
आता एवढं काही वाटलं नाही. तसा मला तुकारामांचा थोडा रागच येतो.
आवडाबाईला त्रास दिल्याबद्दल. मी असे आजीला सांगितल्यावर, "काय तरी बाई लक्षणं मेली!" असं तिनं म्हटल्यामुळे तो विषय डोक्यातून काढून टाकला होता.

येशा, लेका ...लेका ....
लिहित जारे असेच..

फारच सुन्दर लेख..

(बोला पुंडलिक वर्दे हारी विट्ठल . श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महराज की जय )

स्वाती दिनेश's picture

25 Jun 2011 - 8:29 pm | स्वाती दिनेश

अतिशय गोड, रसाळ लेख..
खूप आवडला.
स्वाती

प्रियाली's picture

8 Jul 2011 - 9:35 pm | प्रियाली

मिपा सुरू झाल्यावर एक चांगला लेख वाचायला मिळाला हे बरं झालं. :)

सूड's picture

26 Jun 2011 - 8:04 am | सूड

अतिशय छान !!

हुप्प्या's picture

26 Jun 2011 - 11:47 am | हुप्प्या

अगदी सुरेख लेख. मी देवभक्त नसूनही हा सिनेमा, हे प्रसंग आणि हे कलाकार विलक्षण भावतात.
तुकाराम, त्याची बायको हे म्हणजे त्या भूमिका जगले आहेत.
खरोखरचे तुकोबा अवतरले आणि ते विष्णूपंत पागनीसांसारखे दिसत नसतील तर लोकांना ते पटायचे नाहीत.
१९४० च्या दशकात चित्रपट अभिनय इतका उच्च असेल ह्यावर विश्वास ठेवणे अवघड वाटते पण ते इथे घडले आहे.
शांत, दयाळू, कमालीचा भक्त तुकाराम, कजाग पण आतून तुकारामाला देवासारखे मानणारी पण रोजच्या कटकटीला कावलेली आवडाबाई हे इतके जीव ओतून साकारले आहेत की खरोखर त्यांना काहीतरी मोठा पुरस्कार मिळालाच पाहिजे.

मी हा सिनेमा डझनभर वेळा तरी पाहिला आहे आणि बघतच राहीन.

अतिशय सुंदर लेख अतिशय सुंदर आणि एकदम समयोचित. धन्यवाद.

अप्पा जोगळेकर's picture

26 Jun 2011 - 12:52 pm | अप्पा जोगळेकर

छान लिहिलंय. आवडाबाईचा अभिनय फारच भावला आणि तिचे दु:ख काळजाला भिडले. हा सिनेमा कधी पाहिला नाही पण त्या दोन क्लिप्स पाहून बघावासा वाटतोय.
काल पुणे - चिंचवड रस्त्यावरुन बसने जात होतो तेंव्हा वारकरी मंडळींचे जत्थेच्या जत्थे हायवेवर दिसत होते. बहुतांश माणसे अत्यंत गरीब आहेत असे वाटले. जवळपास सगळीच हातावर पोट असलेली माणसे असतील. अशा परिस्थितीतल्या माणसाने आपला उद्योगधंदा, प्रपंच, पोटपाण्याचा व्यवसाय सोडून महिना दीड महिना निव्वळ टाळ कुटत देवाचे नाव घेत फिरत बसावे याचे वाईट वाटले.
ज्यांना निश्चित उत्पन्न, निश्चित रजा अशा सुविधा उपलब्ध आहेत त्यांनी एक-दीड महिना देवभक्ती करण्याची चैन केली तर काही म्हणणे नाही. पण गरीब वारकर्‍यांच्या घरातल्या असंख्य आवडाबाईंचे काय ?

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jun 2011 - 11:26 am | llपुण्याचे पेशवेll

पण गरीब वारकर्‍यांच्या घरातल्या असंख्य आवडाबाईंचे काय ?
त्यांच्या आवडाबाई पण बहुतांश वेळेला असतातच बरोबर. सध्या पाऊस लांबला आहे म्हणून नाहीतर वारीचे टायमिंग पेरण्यावगैरे झाल्यानंतरचेच असते. घरटी १ माणूस शेतीच्या कामासाठी थांबतोच घरात. वारी करणारे बहुतांश शेतकरीच असतात. रोजावर काम करणारे (जसे पुण्यातले प्लंबर, वायरमन ) वगैरे लोक १ - २ टप्पे जातात फक्त पायी.

बाकी महीन्या दीड महीन्याचे गणित कोठून काढलेत ते कळवलेत तर बरे होईल.

सन्जयखान्डेकर's picture

27 Jun 2011 - 5:10 pm | सन्जयखान्डेकर

ज्यांना निश्चित उत्पन्न, निश्चित रजा अशा सुविधा उपलब्ध आहेत त्यांनी एक-दीड महिना देवभक्ती करण्याची चैन केली तर काही म्हणणे नाही.

पण ज्यांना निश्चित उत्पन्न व रजा असतात त्यांची एक-दीड महीना रजा घेण्याची इच्छा नसते किंवा असली तरी रजा मिळत नाही .

यकु's picture

26 Jun 2011 - 3:23 pm | यकु

धन्यवाद दोस्तहो! :)

ajay wankhede's picture

26 Jun 2011 - 6:14 pm | ajay wankhede

अतिशय रसाळ लेख..
खूप आवडला....

अजय

पागनिस म्हणजे..हंड्रेड पर्सेन्ट तुकाराम ! :)
लेख उत्तम.
बाकी, लेख आणि प्रतिक्रिया वाचताना प्राजुताईचे 'आवडी' हे रेकॉर्डींग फार मागे एकदा ऐकले होते त्याची आठवण झाली.

माझीही शॅम्पेन's picture

5 Jul 2011 - 8:24 pm | माझीही शॅम्पेन

सर्व प्रथम _______/|\________

आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा ...

हे नक्की कोणी लिहिले आहे ?

प्यारे१'s picture

27 Jun 2011 - 12:02 pm | प्यारे१

पांडुरंग,पांडुरंग, पांडुरंग...

आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाचे |

धन्यवाद यकु.
(बाकी आवडी एवढी कजाग आणि तुकाराम महाराज एवढे मवाळही नव्हते. गाथा वाचताना महाराजांनी 'सकारण' दिलेल्या शिव्या वाचवत नाहीत. ;) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2011 - 10:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे मित्रा.........! लेखन आवडले.

वात्सल्य, कारुण्य, याचा कळस अभिनयातून पागनिसांनी उभा केलाय. वरीजनल तुकाराम असाच असावा इतका तो सुंदर अभिनय झाला आहे. बोलण्यातला गोडवा आणि शब्दांच माधुर्य तर क्या कहने.
बाकी, प्यारे म्हणतोय तसा आमचा तुकाराम काही इतका मवाळ नक्कीच नव्हता.

दावूनी वैराग्याचा कळा | भोगी विषयाचा सोहळा
तुका म्हणे ऐसे संत | जिते दडपावे मातीत ||

-दिलीप बिरुटे

धनंजय's picture

28 Jun 2011 - 12:05 am | धनंजय

छान उदाहरणे दिली आहेत.

त्या काळात अभिनयाचे निकषच वेगळे होते. रंगभूमी आणि चित्रपट यांच्यात (तसेच रंगभूमी आणि कथक परंपरेतला अभिनय यांच्यात) गेल्या काही दशकांत खूप फरक पडलेला आहे. त्या काळातल्या चित्रफिती बघून हे जाणवल्यावाचून राहात नाही.

पहिल्या चित्रफितीत "मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास"चा अभिनय पागनिसांनी केलेला आहे. या चित्रपटातच "कठीण वज्रास भेदू ऐसे" अभिनय करण्याची संधी जर पागनिसांना मिळाली असेल, तर ती चित्रफीत सुद्धा टाकावी, अशी विनंती. म्हणजे अभिनयकौशल्याचा विस्तारही दिसेल.