गुळपापडीची वडी

वरदा's picture
वरदा in पाककृती
14 May 2008 - 3:20 am

सोप्पी चटकन होणारी आणि पौष्टीक आहे ही वडी
४ वाटी गव्हाचे पीठ्/कणीक
२ वाट्या गुळ
१ १/२ वाटी पाणी
८-१० खारका, ५-६ बदाम दोन्ही वाटून
थोडा तळलेला डींक
२ चमचे खसखस
पाऊण वाटी साजुक तुप (वडी मऊ किंवा कडक आवडत असेल त्याप्रमाणे तुपाचं प्रमाण कमी जास्त करा)

कणीक तुपावर खमंग भाजून घ्या, गुलाबीसर रंगाची होईपर्यंत.
गुळ पाणी एकत्र करुन एक तारी पाक करा. खूप दिवस ठेवायच्या असतील वड्या तर आणखी घट्टं पाक करा. सगळा गुळ आवडत नसेल तर अर्धा गुळ अर्धी साखर घातली तरी चालेल.
आता भाजलेली कणीक पाकात घाला ढवळा आणि किंचित तुप लावलेल्या ताटात थापा. वड्या पाडा आणि खा. खूप गरम असताना वड्या पाडल्या तर तुटु शकतात. समजा पाक किंचित कमी पडला तर दुधाचा हात लावला तरी चालेल पण मग फ्रीज मधे ठेवा आणि लवकर संपवा.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 May 2008 - 7:53 am | विसोबा खेचर

वा! वरदा, सुरेख पाकृ!

गुळपापडीची वडी हा माझा अत्यंत लाडका प्रकार आहे. त्याची पाकृ तू मिपावर दिलीस हे पाहून आनंद वाटला! सोबत फोटू का नाही दिलास?

असो, अश्याच चांगल्याचांगल्या पाकृ मिपावर देत जा, म्हणजे तुला स्वयंपाक करता येत नाही हा आरोप मी मागे घेईन .. :)

तात्या.

प्राजु's picture

14 May 2008 - 7:56 am | प्राजु

करून ठेवावी आणि मग अधे मधे सहज तोंडात टाकायला म्हणून द्यावी...
मस्त रेसिपी.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋचा's picture

14 May 2008 - 9:18 am | ऋचा

मी केलेली .. पण ती खुप कडक झाली (तुटता तुटेना अशी झाली.) :S

बाकी ही कृती सोपी वाट्टेय (अशी करुन पाहीन आता)

विजुभाऊ's picture

14 May 2008 - 10:07 am | विजुभाऊ

पण ती खुप कडक झाली ...
होते असे कधी कधी. त्याचा जाडसर कूट करा. पोराना येता जाता मूठ मूठ बकणे भरायला आवडेल

रोचीन's picture

14 May 2008 - 11:08 am | रोचीन

ताटात थापल्यावर कुटलेली बडिशोप वरून पेरावी. छान चव येते!!!!!:)

स्वाती दिनेश's picture

14 May 2008 - 11:48 am | स्वाती दिनेश

वरदा,काय आठवण करून दिलीस ग्..खूप दिवसात गूळपापडी केली नाही,आता करायलाच हवी..:)
माझी लई लाडकी वडी...मस्त पाकृ...मी त्यात मूठभर पोहे,तुपात तळून घालते डींकाऐवजी आणि मग त्याच तुपात कणिक भाजते.
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2008 - 1:40 pm | प्रभाकर पेठकर

८-१० खारका, ५-६ बदाम दोन्ही वाटून
थोडा तळलेला डींक
२ चमचे खसखस

ह्याचे काय करायचे?

स्वाती राजेश's picture

14 May 2008 - 1:59 pm | स्वाती राजेश

करून दिलीस गुळपापडीची!!!!!

विजुभाऊ's picture

14 May 2008 - 4:44 pm | विजुभाऊ

८-१० खारका, ५-६ बदाम दोन्ही वाटून
थोडा तळलेला डींक
२ चमचे खसखस
हे गुळपापडी केल्यावर आलेला शीण घालवण्यासाठी खायचे

वरदा's picture

14 May 2008 - 4:52 pm | वरदा

काय गंमत करता माझी बापडीची....तात्या ते वरचं एडीट करुन त्यात हे सगळं पाकात टाकताना टाका असं होईल का हो?

सोबत फोटू का नाही दिलास?

इथे फोटु कसा चढवायचा ते माहीत नाही म्हणून्..तुम्हाला एमेल करेन मग चिकटवा इथे...

वरदा's picture

14 May 2008 - 4:52 pm | वरदा

हे गुळपापडी केल्यावर आलेला शीण घालवण्यासाठी खायचे
:)))

वरदा's picture

14 May 2008 - 4:54 pm | वरदा

नक्की पोहे घालून पाहेन गं स्वाती. बडीशोप घालायची आयडीया एकदम वेगळीच करुन पाहेन बरं का रोचीन.

शितल's picture

14 May 2008 - 6:27 pm | शितल

वरदा मी ही तुझी गुळ्पापडी चार वेळा वाचली मग माझा विश्वास बसला की तु ते बदाम आणि खारीक खाऊन टाकलीस.
खुप भुक लावगल्यावर असेच होते.
आम्ही ते पाकातच त्या गव्हाच्या पीठा बरोबर टाकु तु न सा॑गता चालेल का ?
बाकी गुळपापडीची कृती एकदम झक्कास.

मन's picture

14 May 2008 - 6:35 pm | मन

मस्त चव आली तोंडाला नुसतं वाचुनच!

ही गुळ पापडी पाहुन बोक्या प्रमाणे आपल्या जिभल्या चाटत बसलेला,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

वरदा's picture

14 May 2008 - 7:07 pm | वरदा

हो गं शितल्...मी एकीकडे वडी खाता खाताच लिहत होते....त्यामुळे खाऊन टाकले...आता पुढची पा. क्रु. लिहिताना मोजुन पाहीन सगळ्या गोष्टी टाकल्या की नाही ते......

इनोबा म्हणे's picture

14 May 2008 - 7:52 pm | इनोबा म्हणे

पाकृ झकासच बरं का! =P~ पण मला तर धड चहासुद्धा बनवता येत नाही.:(

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा's picture

14 May 2008 - 8:06 pm | वरदा

म्हणजे अग्गदी माझ्या चित्रकले सारखीच अवस्था......

चित्रा's picture

22 May 2008 - 1:30 am | चित्रा

छान पाककृती.

वरदा's picture

22 May 2008 - 1:38 am | वरदा

मन, पेठकर काका, विजुभाऊ, दोन्ही स्वाती, ऋचा, प्राजु, शितल, चित्रा, तात्या, रोचीन सगळ्यांना मनापासून धन्यवाद!