बर्मा फ्रंटवरून........

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
27 Mar 2011 - 8:37 pm

मित्रहो,

माझ्या मराठालाईट इन्फंट्रीच्या आभ्यासादरम्यान हे एका सैनिकाने त्याच्या प्रेयसीला लिहीलेले पत्र सापडले. त्याचे भाषांतर केले आहे. सैनिकांची मनस्थिती यात बरीच समजून येते. हे पत्र बर्माहून लिहीले आहे.

प्रियतमे,

पंख असते तर तू उडत येथे आली असतीस असे सारखे म्हणतेस, पण खरंच तुला येथे यायला आवडेल का ? तुला आवडेल की नाही हे मला माहीत नाही पण तू येथे आलेले मला आवडणार नाही हे निश्चित. येथे येण्यात धोके आहेत, नाही असे नाही, पण याही पलीकडे काही कारणे आहेत. धोके तर आमच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत. अतिपरिचय हे द्वेषाचे मुळ असते असे म्हणतात, त्यामुळे आम्हीही धोक्यांचा द्वेष करतो.
तू येथे का येऊ नयेस त्याची कारणे सांगतो. पटल तर बघ.

तुमच्या तिकडे बर्‍याच जणांना युध्द म्हणजे काय हे माहीत आहे असे वाटते. पण खरेच तसे आहे का ? आणि ते कसे शक्य आहे ? इतक्या दुरुन ते त्यांना कसे समजणार ? कदाचित माझे चुकत असेल पण मला पडलेला हा प्रश्न प्रामाणिक आहे. त्यांना येथे यायला लागावे अशी माझी मुळीच इच्छा नाही. तसा गैरसमजही करुन घेऊ नकोस. ते येथे नसल्यामुळे मला त्यांचा हेवा वाटतोय, किंवा द्वेषबुध्दीने मी हे लिहितोय असेही नाही. खरे तर, जेव्हा स्वर्गातून बॉंबचा वर्षाव होतो, डोळ्यासमोर होणारे मृत्यू आणि विध्वंस निराशेचा खरा अर्थ समजवतात अशा वातावरणात त्यांना येथे यायला लागू नये अशी मी देवापाशी प्रार्थना करतोय. पण त्यांना युध्द म्हणजे काय हे माहीत नाही हे सत्य नाकारण्यात काय अर्थ आहे ? युध्दाचा खरा अर्थ तुम्हाला आमच्याप्रमाणे येथे राहिलात तरच कळू शकेल. तुम्हाला एका छोट्या पण पाण्याने भरलेल्या खंदकात अनेक दिवस अन्नावाचून काढावे लागतील. साप व मलेरियाची भिती कायम तुमच्या मनात असेल. शत्रूपेक्षाही तुम्ही याला जास्त घाबराल. कारण याने तुम्ही थोडे थोडे मरता आणि ते तुम्हाला कळत असते. अशा वेळी कळते की धोके किंवा माणसे ही आपली शत्रू नसून भिती हीच आपली खरी शत्रू आहे.

अशा खंदकात रात्री या जमिनीतल्या भोकात हातपाय हलवण्याचीही भिती वाटते. थोडाजरी आवाज झालातरी शत्रूच्या गोळीला आमंत्रण दिल्यासारखे आहे. एवढेच नाही अशा वेळी मित्रांच्या गोळीलाही आपण बळी पडू शकतो. आघाडीवर जेव्हा काळोख पसरतो तेव्हा कुठलीही हालचाल करायचे धाडस करायचे नसते. अंधार पडला की असाल तेथेच निपचीत पडून रहायचे आणि पुढच्या उजेडाची वाट बघायची एवढेच आपल्या हातात असते. कोणीही कुठल्याही कारणासाठी हालचाल करत नाही. खरंच सांगतोय, कुठल्याही कारणासाठी.

इथे आलीस तर तुला गार अन्न खायला लागेल. बीन्स, मांस, भाजी हेच रोजचे जेवण असेल. आम्ही त्याचा क्रम बदलून स्वत:चीच फसवणूक करुन घेत असतो. आम्हाला नुकतेच कळले आहे की आता अन्नात थोडा बदल केला जाणार आहे पण आमच्या पर्यंत तो पोहोचणार की नाही हे माहीत नाही. बहुतेक नाहीच.
असे म्हणतात की बदल हे तुमचे आयुष्य चवदार बनवते. ते खरे असेल तर आमच्या आयुष्यातील चव केव्हाच निघून गेली आहे. युध्दभुमीची चव घ्यायला तुम्हाला येथे यायला पाहिजे.

सकाळी डोंगरावर क्षितिजापलिकडे जाणारी विमाने बघायला लागतील. या विमानातले तरूण वैमानिक आपल्या कामगिरीवर, (का मृत्यूला भेटायला) जाताना ती विमाने मोजायला लागतील. एकदा ती मोजलीत की संध्याकाळी त्यातली किती परत आली हे ही तुम्ही मोजायला लागाल. बारा गेली, पाच आली असा हिशेब तुम्हीही करायला लागाल. संध्याकाळी क्षितिजाकडे नजर लाऊन तुम्ही हाच विचार करता, जे आले नाही ते कसे मेले असतील? का जपान्य़ांच्या हातात सापडले असतील ? त्यांना चांगली वागणूक मिळत असेल का? जमिनीवर ते कसे तग धरतील ? खरे काय घडले ते तुम्हाला कधीच कळत नाही. आणि जे जिवंत असतील तर त्यांना त्यांच्या मृत्यूचा अहवाल कसा वाटत असेल ?

तुम्ही सिनेमामधे बघता तसे युध्दभूमीवर सैनिक मरतात का ? मला नाही वाटत. ओठांवर हसू आणि डोळ्यात कर्तव्य बजावल्याची चमक असे कोणी मरत नाही. रणांगणावरचा मृत्यू हा नेहमीच अत्यंत क्लेषकारक आणि हताश असतो. तुम्हाला तेव्हा समजत असते की हाच तो क्षण. जखमी सैनिकांची परत येणारी रांग तुम्ही पाहिली पाहिजे. वेदनेने रडणारे, किंचाळणारे सैनिक हिरोसारखे दिसत नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावर मृत्यू माझे काही वाकडे करू शकत नाही असा भाव मुळीच नसतो. ते साधेसुधे अमेरिकन किंवा भारतीय सैनिक असतात. याहून भयंकर म्हणजे एखाद्या सैनिकाच्या डोळ्यातून प्राणज्योत निघून जाते तो क्षण बघायला लागणे. तगडे तरूण सैनिक भयाने थरथर कापताना व रात्री किंचाळून उठलेले बघताना आपलाच थरकाप उडतो. या कणखर माणसांना आपले आयुष्य या पुढे सर्वसाधारण माणसारखे जगता येणार नाही याची कल्पना असते का? त्यांचे आयुष्य खरे तर संपल्यातच जमा आहे. काही सैनिक तर येथे इतके दिवस आहेत की त्यांना घरी गेले काय आणि नाही गेले काय याचा कसलाच फरक पडत नाही. जेव्हा वचानांमागून वचने तोडली जातात तेव्हाच तुमची मनस्थिती अशी होऊ शकते.

युध्दावरची जगातली सगळी पुस्तके किंवा युध्दचित्रपट युध्दभूमीवर काय चालते यावर खराखूरा प्रकाश टाकू शकत नाही. ही पुस्तके तुम्हाला आतडी पिळवटून टाकणार्‍या भुकेचा अनुभव नाही देऊ शकत. किंवा अनेक दिवस न झोपल्यामुळे वेड लागायची पाळी येते त्याचाही अनुभव नाही देऊ शकत. ओल्याचिंब कपड्यात थंडीत काकडत रायफल कशी पकडायची याचा अनुभव नाही देऊ शकत. या पेक्षाही महत्वाचे म्हणजे भयंकर एकटेपणाचा अनुभव, ते कसा देऊ शकतील ? तुम्ही, आम्ही घरी परतल्यावरची गोड स्वप्ने रंगवत असता पण आम्हाला खरे काय ते माहीत आहे. तिकडे काहीही बदललेले नाही. लोकांना असे वाटते की त्यांना युध्दभूमीवर काय चालते याची पूर्ण कल्पना आहे. त्यांची माहीती ही त्यांच्या मनाचे खेळ आहेत. मला माहीती आहे की माझे शरीर हे या युध्दाने पोखरलेले आहे आणि भिती माझ्या ह्रदयात खोलवर घर करून बसली आहे. मी जेव्हा तिकडे होतो तेव्हा युध्द माझ्यापासून दूर होते आणि मला त्या बद्दल पुस्तकात आणि चित्रपटातून माहीती मिळत होती. पण मला आता ते खरेखूरे कसे असते हे कळले आहे. हे शब्दात आणि कॅमेर्‍यात पकडता येत नाही त्याचा अनुभवच घ्यावा लागतो.

पण तुला काही चांगल्या गोष्टीही मला सांगितल्या पाहिजेत. संध्याकाळी दिवस मावळायच्या वेळी सैनिक गाणी म्हणतात. आरत्यासुध्दा म्हणतात ज्या मला आजिबात आवडायच्या नाहीत. पण आता त्या ऐकतांना मला बरे वाटते हे खरे आहे. त्या ऐकताना मला घराची, देवळांची, फुलांची आठवण येते. संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी असणारी शांतता मनाला एक प्रकारची हवीहवीशी वाटणारी हुरहुर लावून जाते आणि गत आयुष्यातील सर्व चांगल्या आठवणी मनात गर्दी करतात. त्या गाण्यांमुळे मी माणसात परततो.
तू येथे आलीस तर येथील सुर्यास्त तुला खूपच आवडेल. त्यावेळी ढगातून डोकावणार्‍या, न संपणार्‍या डोंगराच्या निळसर रांगाही तुला आवडतील. नजर पोहोचेल तेथपर्यंत हे डोंगर धुक्यात वेढलेले तुला दिसतील. येथील सरळसोट, आकाशाशी स्पर्धा करणारे वृक्ष तुला भारावून टाकतील. जमिनीवर मऊ पानांचा गालिचा तुला चालण्याचे आमंत्रण देईल तर पहाटे दरीतून वरती येणार ढग तुला आपल्या कवेत घेतील. जेथे कोणीही पाऊल टाकलेले नाही अशा जागी पाय ठेवण्यातला अनामिक आनंद तुला येथेच उपभोगायला मिळेल.

मला आता थोडा वेळ आहे आणि स्वप्नच बघायची असतील तर ती चांगल्या गोष्टींचीच बघितलेली बरी.

मला जिवंत रहायचे असेल तर ती स्वप्न बघायलाच पाहिजेत.

तुझाच,
ऑस्कर

जयंत कुलकर्णी.

वाङ्मयइतिहाससमाजलेखबातमीअनुभवमाहितीभाषांतर

प्रतिक्रिया

अमोल खरे's picture

27 Mar 2011 - 8:43 pm | अमोल खरे

अप्रतिम पत्र...........युद्धभुमी कशी असते त्याची व्यवस्थित कल्पना आली. आता मॉडर्न टेक्नॉलॉजिमुळे कदाचित सैनिकांना त्यांच्य घरच्यांशी रेग्युलर संपर्क साधता येत असेलही. पण तरीही सैनिकाचे आयुष्य कठीण आहे ते तर खरेच.

अप्पा जोगळेकर's picture

28 Mar 2011 - 7:52 pm | अप्पा जोगळेकर

युद्धभुमी कशी असते त्याची व्यवस्थित कल्पना आली.
तुम्ही ही वाक्ये वाचली नाहीत काय?

युध्दावरची जगातली सगळी पुस्तके किंवा युध्दचित्रपट युध्दभूमीवर काय चालते यावर खराखूरा प्रकाश टाकू शकत नाही. सब्दात किंवा कॅमेर्‍यात ते पकडता येत नाही. त्याचा अनुभवच घ्यावा लागतो.

पैसा's picture

27 Mar 2011 - 8:48 pm | पैसा

भयंकर आहे हे सगळं.

पुष्करिणी's picture

27 Mar 2011 - 8:57 pm | पुष्करिणी

पत्र भयानक आहे..

असुर's picture

28 Mar 2011 - 5:02 am | असुर

+१
पत्र भयानकच आहे. करुण आणि बीभत्सरसाचे आदर्श उदाहरण आहे हे.

'युद्ध व्हावे' असे वाटणार्‍या लोकात सर्वात शेवटचा नंबर ते युद्ध लढणार्‍या सैनिकांचा असतो हेच खरे! किंबहुना 'युद्ध होऊच नये' असे अगदी मनापासून वाटणारे लोक म्हणजे एकमेकांकडे बंदुका रोखून बसलेले सैनिक!

--असुर

स्पंदना's picture

28 Mar 2011 - 7:31 am | स्पंदना

असुरनी माझेच शब्द उच्चारले असे म्हणेन मी.

जयंत दा सुरेख जमलय पत्र.

निवेदिता-ताई's picture

28 Mar 2011 - 8:18 am | निवेदिता-ताई

असेच म्हणते...

धनावडे's picture

4 Dec 2016 - 6:14 am | धनावडे

+१

सामान्य सैनिकाचे असामान्य लेखन कौशल्य!

पत्रातला शब्दन् शब्द सहजतेतलं साहित्यिक लेणं आहे.

जयंतरावजी, या पत्रातल्या शब्दांतील भावना तुमच्या भाषांतरातून आमच्यापर्यंत छान पोहोचल्या.

आवडलंय..... छान!

प्राजु's picture

27 Mar 2011 - 9:23 pm | प्राजु

खूप सुंदर आहे.
आपले विशेष आभार जयंत कुलकर्णी काका.
धन्यवाद.

आत्मशून्य's picture

27 Mar 2011 - 10:38 pm | आत्मशून्य

रस्ता केवळ माहीत असणे वेगळे अन त्यावर चालणे वेगळे

हरिप्रिया_'s picture

28 Mar 2011 - 11:30 am | हरिप्रिया_

+१ अगदि खर....
तरिहि म्हणेन, मस्त पत्र...

५० फक्त's picture

28 Mar 2011 - 7:05 am | ५० फक्त

एका अतिशय सुंदर पत्राचा तेवढाच सुदर अनुवाद करुन इथं उपलब्ध करुन दिल्याबद्दल अतिशय धन्यवाद जयंत कुलकर्णीजी.

युद्धस्य कथा रम्यः हे फक्त ऐकणा-यांसाठीच असतं, जो ते करतो तो आणि त्यांचं कुटुंबिय हे अक्षरशः ते भोगत असतात.

पत्राचा अनुवाद केल्याबद्दल जयंतकाका तुमचे शतशः आभार.

खरेच पत्रात लिहल्याप्रमाणे युद्धस्य कथा रम्य असेच वाटते. मुळात युद्ध भूमीवरील अनुभव कितीतरी शतपटीने बोचरा असतो.

- पिंगू

पियुशा's picture

28 Mar 2011 - 11:24 am | पियुशा

अनुवाद मन हेलावुन गेला !

वपाडाव's picture

28 Mar 2011 - 7:33 pm | वपाडाव

@ पियुशा :
टंकलेखणात एकही चुक न केल्याने ड्वले पाणावले...
पुढील वेळी असाच प्रतिसाद टंकाल ही अपेक्षा....

विनीत संखे's picture

28 Mar 2011 - 11:51 am | विनीत संखे

छान अनुवाद केलाय. मस्तच! :)

कच्ची कैरी's picture

28 Mar 2011 - 2:07 pm | कच्ची कैरी

युद्धभुमीची कल्पना कधी केली नव्हती तुम्ही मात्र तुमच्या अनुवादातुन युध्दभुमी डोळ्यासमोर उभी केली ,काटा आला अंगावर विचार करुन .

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Mar 2011 - 7:18 pm | बिपिन कार्यकर्ते

पत्र वाचले. अनुवाद करून इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

'लेटर्स फ्रॉम इवो जिमा' ( http://www.misalpav.com/node/7957 ) मधला असाच एक प्रसंग आठवला.

अप्पा जोगळेकर's picture

28 Mar 2011 - 8:01 pm | अप्पा जोगळेकर

श्री. जयंत कुलकर्णी,
काय लिहू. तुम्ही असे कधीमधी उगवता ते असे बहारदार लेख/अनुवाद यांच्यासकट.
अगदी सुंदर अनुवाद आहे एवढेच म्हणावेसे वाटते.

क्रान्ति's picture

28 Mar 2011 - 11:23 pm | क्रान्ति

अनुवाद! इतक्या विचित्र परिस्थितीतही शेवटच्या भागातला आशावाद/ वाइटातही चांगलं पहायची प्रवृत्ती खासच!

सहज's picture

29 Mar 2011 - 9:51 am | सहज

मागल्या ऑस्करला बाजी मारुन गेलेला हर्ट लॉकर सिनेमा जरुर बघणे.

रेस्ट्रेपो नावाचा अफगणीस्तानमधील एका भागातील अमेरिकन संघर्षावरचा एक माहीतीपट देखील रोचक आहे. येथील संघर्षात तालीबानींनी ५० अमेरीकन सैनिकांना मारले होते. हा माहीतीपट तेथे तैनात असलेल्या सैनिकांच्या स्वगत, अनुभवांवर आहे.

बर्माफ्रंटवर लिहाकि मग अजून.

मन१'s picture

23 Jan 2012 - 10:28 am | मन१

glorified युद्धाची दुसरी बाजू मांडण्याचे प्रयत्न भावले. इतके की प्रतिसाद देउन धागा वर काढत आहे.

हा धागा वर काढल्याबद्दल मनोबाला थँक्स.
कसा कोण जाणे वाचायचा विसरला होता.
एक झळझळीत तुकडा वाचायचा राहून गेला असता.. जयंतकाकांच्या लेखणीला पुन्हा एकदा सलाम.

मदनबाण's picture

23 Jan 2012 - 4:53 pm | मदनबाण

हा धागा वाचायचा राहिला होता...
सैनिकांचे आयुष्य खरेच अतिशय कठीण असते ! शेवटी ती सुद्धा माणसेच ना ? :(
कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांचे सहकारी यांना ज्या कॄरपणे ठार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचे मॄतदेह त्यांच्या आप्तजनांना देण्यात आले तेव्हा काय भावना आल्या असतील त्यांच्या मनात ? त्यांना न्याय मिळाला ? :(
We The People of India ? http://goo.gl/01T3f

जाता-जाता:-
इराक युद्धात युकेवाल्यांनी त्यांच्या सैन्यात स्त्रींयांनाही समाविष्ट केले,आणि इराक मधे पाठवले जवळपास ५०००+.
त्यातल्या अनेक गर्भवती होउन परतल्या, तर काहींवर अत्याचार देखील झाले.हीच अवस्था युएस मिलेटरी मधे सुद्धा झालेली आढळेल,१/३ अमेरिकन स्त्री युद्ध सैनिकांवर बलात्कार झालेले आहेत.
संदर्भ :--- http://newsjunkiepost.com/2010/01/26/13rd-of-women-in-us-military-raped/

गणेशा's picture

23 Jan 2012 - 10:44 pm | गणेशा

निशब्द

जयंत कुलकर्णी's picture

24 Jan 2012 - 12:31 am | जयंत कुलकर्णी

कशाला जूने उकरून काढताय ?

मन१'s picture

24 Jan 2012 - 9:42 am | मन१

आम्हाला वाचनीय वाटलेले इतरांनाही दाखवता यावे म्हणून.

भयंकर!!!
केवळ सत्ताधीशांच्या लालसेपोटी असंख्य सैनिक आपले जगणेच गमावुन बसतात. :(

स्वीट टॉकर's picture

4 Dec 2016 - 6:30 pm | स्वीट टॉकर

सामान्य सैनिकाचे असामान्य लेखन कौशल्य! +१००

धन्यवाद जयंतराव !

Ram ram's picture

4 Dec 2016 - 8:03 pm | Ram ram

जयहिंद