पुस्तके ..अर्थ मनाचा १

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
18 Mar 2011 - 10:01 am

येथे दिलेले पुस्तकांचे अर्थ हे मी वाचताना घेतलेले आहेत .. तुम्ही जर वेगळ्या अर्थाने वाचले असेल तर येथे द्या.. त्या मुळे आपल्याला वेगवेगळ्या कोणातून पाहता येईल पुस्तकांकडे.. पुस्तक परिक्षण या पेक्षा पुस्तकातील विचार मांडणे मला आवडते .. तुमचे ही असे लेखन दिले तर छान वाटेल.

१. पार्टनर .. व.पु. काळे

पार्टनर ही फ़क्त कादंबरी नाहि तर आपल्यासारख्या माणसांचा जीवन प्रवास आहे. त्या मध्ये प्रेम, विरह या बरोबरच स्वताच्या मनात येणारे विचार आणि फिलोसॉफ़ी उत्कृष्ट पणे मांडलेली आहे. वपुंनी या पुस्तकात सामान्य माणसाचे जे दुसरे मन असते .. त्यास एक चित्ररुप व्यक्तिरेखेचे स्वरुप दिले आहे.. आणि त्यास नाव आहे पार्टनर ...
दुसरे मन म्हणजे बघा .. आपण बर्याच दा वागताना विचार करतो की मी असे केले पाहिजे होते पण जाउद्या समाज आहे म्हणुन गप्प बसतो .. तेंव्हा हा जो दुसरा विचार येतो आहे ना मनात ..त्या विचाराचा एक माणुस च त्यांनी या पुस्तकात दिला आहे..
पण त्याच बरोबर स्वप्नवत न राहता आहे ते सुख आनंदाने उपोभोगायचे हे ही त्या पार्टनर ने येथे सांगितले आहे.

एक संधर्भ :

समुद्राची ताकद टिटवीला समजत नाही.
आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही.
सुगंधाचं कोडं फ़ुलाला उमलत नाही.
एवढासा तू, त्याहुन एवढासा मी मला जिवनाचा अर्थ कसला विचारतोस?आणी त्याहीपेक्षा संभोगाचा अर्थ लावायचा असतो, हे तुला कोणी सांगितले?
पाणी म्हणजे एच टू ओ.इथचं सगळे थांबलेले आहेत.मुर्ख म्हणुन नव्हे तर जाणकार म्हणुन थांबले.
पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणुन.
कोणता आनंद क्षणजीवी नाही?
दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव. खाली उतरला की घास.
सुगंधाचं नातं नाकाशी.घशातुन आत गेल्यावर ति फ़क्त हवा.
खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेशी नसुन तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसीकता संपली.
इतर अनेक गरजांप्रमाणे "तृप्ती" जी एक गरज आहे.
जो गरजु आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो.व्यवहार नेहमी साधतोच असं नाही.तो सत्यासारखा कटू असतो.
ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटूता निर्माण होते.
सध्या एकच वर्तमान्काळ सांभाळ.
Present tense is only tense, It takes care of past and future, If we look at it correct persepective.

-----------------------------------------------

२. दुनियादारी ( सुहास शिरवळकर)

हे पुस्तक वाचताना कॉलेज जीवन आणि त्याबरोबर कॉलेज मधील आपले मित्र .. मैत्रीणी .. आणि गर्ल फ्रेंड यांच्या बरोबरचा आपला काळ पुन्हा आपण पाहत आहोत असाच भास होतो ... पुस्तकामधील प्रत्येक पात्र आपल्या त्या ग्रुप मधील मित्र-मैत्रीणींशी एकदम फिट्ट बसतात ... आणि त्या पुस्तका बरोबर आपण आपलाच भुतकाळ परत वर्तमाना मध्ये जगतो आहोत असे वाटते...

या पुस्तकातील भाषा ही कॉलेज कट्ट्यावरील भाषा असल्याने खुप बोलके चित्र .. नाही आपलेच जुने विश्वाचे प्रतिबिंब मनात उमटते

पुस्तक शेवटी जाताना भावनाविश्वात रमलेले आपले मन पुन्हा व्यवहारवादी वास्तवतेकडे सोडुन जाते ..

-----------------------------------------------

3. सेतु .. आशा बगे

नेहमी व.पु काळेंच्या फिलॉसॉफिकल दुनियेत रमणारा मी अचानक आशा बगे यांची सेतु ही मनामनाच्या तरंगातुन .. भावणांच्या सेतु ने हेलकावणारी जीवणाचे .. भावनांचे हेलकावे दाखवणारी कादंबरी हातात लागली आणि सायकॉलॉजी म्हणजे कशी असते याचे यथार्थ उदाहरण देवुन गेली ..

कादंबरीमधील ब्रीज आणि सुचिता म्हणजे भावनांचे .. नात्यांच्ये .. व्यवाहारचे वेगवेगळे किनारे एका प्रवाहात आलेत आणि मग त्यांचा .. त्यांच्या कुटुंबांचा .. व्यक्तीमत्वाचा .. अनपेक्षित भावनीक .. माणसिक सिमेवरील प्रवास अप्रतिम रेखाटला गेला आहे ...

सेतु म्हणजे फ़क्त ब्रीज आणि सुचरिताची कहाणि नसुन त्यांच्या बरोबर आलेलया सर्व व्यक्तीमत्वांचे आणि भावनांचे आपल्या मनाशी आपल्या अवतीभोवती वावरणार्‍या व्यक्तींच्या माणसिकतेचा एक सेतु बांधणारी एक आपली अशी काही तरी गोष्ट आहे ..

लिखान हे मनात भिडणारे आहे .. मानसिकतेचा कडेलोट म्हणजे काय हे जसे ह्यातुन दिसते तसेच मानसिकतेला धरुन चालणारी नाव ही कशी वाहत असते हे चित्र ही छान दाखवले आहेच ..

शिवाय उत्तर भारत आणि दक्षिण-मध्य भारत यांचे अप्रतिम मिश्रण यात खुप काही शिकवुन जाते ... कला .. लिखान .. भावना .. वेध.. वैराग्य .. एकटेपणा.. धेयवाद .. सापेक्षता.. ह्या सार्या माध्यमामधुन भावणांची मानसिकतेची एक दोर आपल्या आयुष्याला जोडत जाते आणि उरतो एक सेतु .. आपल्यामधील ..

-----------------------------------------------

4 चौघीजनी( मुळ : लिटील वूमन)
अनुवाद: शांता शेळके...

अनुवादीत पुस्तक म्हणजे जरा घाबरत हातात घेतलेले हे पुस्तक .. पण पुस्तकाच्या साध्या सरळ भाषा आणि नितळ व्यक्तिरेखा मध्ये मन गुंफ़ले की पुस्तक खाली ठेवूच वाटत नाही.

चार बहीणींची ही कथा आणि लिहिण्याची आवड असणारी ज्यो आणि तिच्या मनाची सरळता .. मनास घुसते एकदम ...

हे पुस्तक इतके नितळ आहे, काहीही नाटकीय कलाटनी नसलेले हे पुस्तक एक कौटुंबीक सुंदरता समोर ठेवते ...

घरातील वातावरण आणि लहान बहिणीचा दुरावा हा मनाला बर्याचदा चटका लाऊन जाते.. आणि कुठे तरी आपल्या व्यथेस साधर्म्य दाखवून जातो..

एक नितळ कादंबरी वाचायची असेल तर ह्या पुस्तकाचा नंबर पहिला लागेल..

-----------------------------------------------

५. पॅपिलॉन

पॅपिलॉन म्हणजे फ़ुलपाखरु, हेन्री चे गुन्हेगार जगतातील नाव.
हेन्री एकेरी संबोधले येथे करण हे पुस्तक नाही तर एक प्रेरणा वाटते मनाला, आणि हेन्री एकदम मित्रासारखा वाटतो यात, कधी कधी तर असे वाटते त्याच्या जाग्यावर आपणच आहोत आणि या सगळ्या यातना आपल्याच आहेत.

'पॅपिलॉन' ही आत्मकथा आहे, तसे आत्मकथा मी कमी वाचतो , पण या कथेमध्ये का कोण जाणे खुप गुंतलो मी. पॅपिलॉन ने जे जे सहन केले ते इतके वेगळे आणि रोमांचकारी आहे की चित्रपटात ही असे काही दाखवता येवू शकत नाही.

हे पुस्तक ज्यांनी वाचले नाही त्यांना मी म्हणतो तुम्ही खुप काही मीस केले म्हणुन.

पॅपिलॉन ला खोट्या खुनाबद्दल जन्मठेप होते, आणि सूरु होतो त्याचा खडतर प्रवास, सुटकेसाठी परक्या अमेरीकेतील गयाना बेटात चाललेली त्याची धडपड साहस आणि त्याला आलेले ईतके वेगळे अनुभव शहारे आणतात, सुटकेसाठी केलेले त्याचे ८ प्रयत्न त्याच्या पुर्ण बुद्धीमत्तेची जाण देतात, एकदा समुद्रातून केलेले अवघड पलायन आणि त्यातील रेड इंडीयन बरोबर घालवलेले ६ महिने तर अप्रतीमच.

पुस्तक वाचताना आपण ईतके समरसुन जातो की समजा काही वेगळे घडलेले सांगितले की आपण निराश होतो आणि माझे सांगायचे झाले तर काही ठिकाणी त्याच्या यशस्वी चालीवर मी जोरात टाळ्या वाजवल्या आहेत.

पॅपिलॉन ही कादंबरी पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहे बस्स. thanks पॅपिलॉन

-----------------------------------------------

6. महानायक .. विश्वास पाटील

ऐतिहासिक कादंबरी म्हंटले की आपल्याला एकच लक्षात येते ... लेखकाच्या मनाच्या तुरंगातील खदखद तो आपल्या आवडत्या व्यक्तिद्वारे समाजात मांडतो..

पण ही कांदंबरी वेगळी आहे .. सलग आठ वर्ष अथक प्रयत्नातून तयार झालेली ही खरी कांदंबरी आहे ...

जपान मध्ये जेंव्हा विश्वास पाटील गेले होते ..तेंव्हा आझाद हिंद सेनेची माणसे भेटली त्यांना .. तेथिल इतिहास खाते अक्षरश्या पिंजुन काढले त्यांनी ...

कदाचित सुभासचंद्र भोस यांच्या खर्‍या माहिती साठीच जपानी लोकांचे आयुष्य मोठे केले असेल देवानी ...

सुभाष चंद्र भोस या असाधरण व्यक्तिमत्वास येथे अतिशय योग्य शब्दात न्याय मिळाला आहे ...

ही कांदंबरी एक इतिहास नाही तर एक संग्राम आहे एका आयुष्याचा सर्व परकीय शक्तीशी ... एक व्यक्ति म्हणुन आपल्या विचारांशी ठाम आणि अतिशय बिनधास्त व्यक्तीमत्व आपल्या समोर आदर्श म्हणुन उभे रहाते ...

" आईच्या गर्भातून जन्मल्या नंतर अर्भकाने फोडलेला टाहो म्हणजे बंडाची प्रथम निशानी होय"

-----------------------------------------------

7. 'ही वाट एकटीची ... व.पु.काळे

प्रामाणीकपणा शिकवायचा नसतो तो असावाच लागतो. त्यात टक्केवारी नसते. तो असतो किंवा नसतो.

'ही वाट एकटीची' ... ही कादंबरी सत्याच्या साथीला उत्तुंग मनाची हीम्मत असणार्‍या आणि समाजाशी ही दोन हात करु पहाणार्‍या नायीकेची एक कथा आहे..

स्त्रीची आपल्या जवळील माणसांकडून असणारी अपेक्षा, आणि.. आपला जोडीदार..लग्नाअगोदर प्रेमसंबध आणि त्यातून जोडिदाराचा टाळाटाळ पणा .. मग कुमारी माता आणि मुलाकडून ही होणारी अपेक्षाभंग असा स्त्रीचा एक प्रवास या पुस्तका मध्ये वर्तविला आहे .. सत्य आणि तत्त्व यांच्या तारेवर चालताना समाजाची फार मोठी कींमत नायीकेस चुकवावी लागते . .आणि शेवट पुन्हा एकटेपणाचा रहातो .... एकाकी वाट्..एकटीची

या पुस्तकात व्.पु काळे यांचे अतिशय सुंदर लिखान पहावयास मिळते ...

-----------------------------------------------

8. ह्सरे दु:ख (अनुवाद "मी चार्ली चॅपलीन' )
..भा.द.खरे

लोकांना मनसोक्त हसवणारा कलाकार... प्रत्येक्षात किती दु:खांना सामोरे जात असतो आणि तरीही आपल्या कलेविषयी किती प्रमाणिक असतो याचा प्रत्येय देणारे चार्ली चॅपलीन याचे संपुर्ण आयुष्य या पुस्तका मध्ये रेखाटलेले आहे ...
आपली आई .. भाऊ यांच्या बरोबर गरीबीमध्ये जीवन जगताना आलेली सगळी संकटे आणि त्या बरोबरच त्याच्या कार्यक्रम, चित्रपट या मध्ये आलेली संकटे आणि वळणे खुप काही सांगुन जातात ...

स्वता: कितीही दु:खात असले तरी दुसर्यांना हसवत ठेवण्यासाठी काय काय करावे लागते हे चार्ली चॅपलीन चे हे आत्मचरीत्र सांगुन जाते ...
आपली कला आपले स्वप्न जपताना आपल्या घरच्यांसाठीची ओढ सांभाळणारा चार्ली चॅपलीन आयुष्याचा खुप मोठा अर्थ सांगुन जातो...

9. रारंग ढांग...........
प्रभाकर पेंढारकर

रारंग ढांग, नावच येव्हडे वेगळे होते हातात घेतल्यावर असे वाटत होते काय असेल यामध्ये ..
पण पुस्तक हातात घेतल्यानंतर मनावर ते पकड घेत रहाते..आणि शेवटी तर अतिउच्च बिंदू साधला गेला आहे ..
एक सिविलियन सिविल इंजिनियर सैन्यात भरती होतो, मुंबईतील उच्च पगाराची नोकरी सोडून काही तरी वेगळे आणि चांगल्या उद्देशाने करण्यासाठी तो आर्मीत भरती झाल्यावर.. तेथील लोक, अधिकारी आणि काम यांचे वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने लेखकाने केले आहे..
रस्ता बांधकाम आणि त्याचा सैन्याबरोबर बाकीच्या लोकांना होणारा वापर यामुळे मनोमन खुश असणारा विश्वनाथ अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त करताना
एक स्वतंत्र विचार, बुद्धीमान तरुण आणि त्याच बरोबर अधिकारी त्यांची अधिकारी वृत्ती यामुळे दडपणारी त्याची हुशारी अत्यंत उत्कृष्ट पणे दाखवलेली आहे..

खरे सांगायचे तर या तरुणामध्ये आपण स्वता:लाच पहातो , तरुण रक्त.. काही तरी नावीन्यपुर्ण करुन दाखवण्याची उमेद पण सत्ता, वरिष्ट यांच्या जाळ्यात अडकुन मनासार्खे काही न करता येणारी खंत .. हे आजच्या तरुण पिढीचेच उदाहरण वाटत आहे असे मला वाटले ..
तसेच आर्मीतील लोक , त्यांचे लांबचे घरदार आणि तेथील लोकांची त्यांच्या मनात असणारी ओढ सुंदर पणे मांडलेली आहे

तसेच यातील बहादूर आणि त्याचे सोबती कसे काम करतात आणि बाकीच्या लोकांचे वर्णन ही सुंदर पद्धतीने झाले आहे ..
संपुर्ण हिमालय आणि आर्मी आपल्या डोळ्यासमोर उभी करताना .. सतलज नदी आनि तिच्या बाजुला उत्तुंग वाटणारा रारंग ढांग हा पर्वत आणि त्यातुन रस्ता खोदत असणारे सारे जवान आणि मिळालेली कमी वेळेत त्यांनी केलेले पुर्ण काम , पण वरिष्टांच्या चुकीच्या हलगर्जीमुळे रस्त्यावर झालेला अजब अपघात आणि त्यांनतर शेवटी व्याकुळतेने मनासारखे करण्याचे विश्वनाथचे धैर्य आणि नंतरकोर्टमार्शल आणि त्यातून निर्दोश मुक्तता पण नोकरी तून कायमची सुटका या घटना मनावर अतिशय कोरल्या जातात आणि एकच प्रश्न मागे ठेवतात ...

जर आपल्या बुद्धीने काम करताना सगळे कौशल्य आपण पणास लावले आणि सर्वांगीन विचार करुन जर आपण लोककल्याणकारी जरी काम करत असु, तरी वरिष्ट त्यांच्या अधिकाराखाली आपण काहीच करु शकत नाही का ?

अतिशय सुंदर पद्धतीने लिहिलेल्या या पुस्तकात मध्ये मध्ये आपल्यालच पडणारे प्रश्न जीवनाचे खुप मोठे अर्थ सांगुन जातात

-----------------------------------------------

1०. सांध्यपर्वातील वैष्णवी .. कवी ग्रेस

" मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फ़ूल"

कवी ग्रेस यांच्या कविता नेहमीच मनात भुरळ घालतात आणि एक रुखरुख मनात ठेवून तरळत राहतात,
त्यांच्या आई साठीच्या कविता वाचल्या तर मन एकदम भावनाविवश होते..
"भय येथले संपत नाही .. आठवणीत बुडलेल्या या कवीचे सांध्यपर्वातील वैष्णवी हे पुस्तक ही असेच खुप अप्रतिम कवितेचा साठा असलेले... कवितेबद्दल लिहायला गेलो तर शब्द्च येथे पुरणार नाहीत.

पण एक सुखद विचारांबरोबर शब्दांचा उत्तम वापर असलेल्या कविता वाचण्यासाठी हे पुस्तक सर्वोत्तम आहे ...

११. एक एक पाण गळावया..
.. गौरी देशपांडे

एक स्त्री आणि तिची कौटुंबीक अवस्था.. अतिशय सुरेख आणि तितक्याच वेगळ्या पद्धतीने ताकदीने उतरवली आहे लेखिकेने..

कामामुळे पती बरोबर कायम देशाबहेर राहावे लागलेली आई, मुलांचा दुरावा..मुलांच्या मनातील चीड .. आणि तितक्याच बोल्ड्पणे वावरणारे प्रेमळ पती यांच्या बरोबरचा एक जीवनप्रवास अतिशय भावपुर्ण पणे लेखीकेने वर्णन केले आहे ..
तसेच आपल्या सद्य परीस्तिती मध्ये अनेक विचारांचे काहूर उठवणार्‍या घटनांनी मन अगदी बैचेन होते...मुलाकडूनच चारीत्र्यहिन असा सवाल उठने .. नवरा मेल्यानंतर आलेले एकाकी जीवन आणि मुलांच्या गावात असूनही वेगळे रहातानाचे आइचे मन ही भिडते ...

-----------------------------------------------

१२. घर हरवलेली माणसे.. व.पु काळे

व.पु काळे यांचे पुन्हा ह्रद्य हेलवणारे एक पुस्तक, पण समाजाचे हे दर्शन बघवत नाही अजिबात, त्यापेक्षा नसते वाचले असते हे पुस्तक तरी बरे झाले असते असे वाटले, आणि या पुस्तकामुळे माझ्या ओळखीच्या मैत्रीणींचे आणि एका मित्राचे उजाडलेले आयुष्य पुन्हा डोळ्या समोर आले
बाकी या पुस्तकाबद्दल मी काही लिहीत नाही पण यातील असूर या कथेवर तर मी खुपच विचार करत होतो पुन्हा कधीच हे पुस्तक मी वाचणार नाही पण

-----------------------------------------------

१३. उपरा- लक्ष्मण माणे..

पुन्हा एक सत्य कथा वाचनात आली .. लेखकाने त्याचे आणि त्याच्या जातीच्या लोकांचे आणि इतर समाज्याचे जे चित्र रेखाटले आहे ते खरोखरच विचार करावयास भाग पाडते..
आपल्या देशात अजुनही अशी परिस्तीथी आहे आणि जातीवरून भेदभाव आहे ही खुप मोठी खंत आहे..

लेखकाची शिकण्याची जीद्द खुप मोठी होती आणि अतिशय प्रतिकुल परिस्तीतीमध्ये त्याने ती पुर्ण केली पण त्याबरोबरच एका कैकाडी कुटुंबाचे झालेली फ़रफ़ट आणि त्यातून पुर्ण दर्शवीलेली समाजाची हेळसांड खुप काही प्रश्नांना वाचा फ़ोडत आहे ..

एका गाढवावर संसार ठेवून फ़िरणार्‍या समाजाची मने आणि त्यांच्याबद्दल असलेली समाजाची नजर .. अतिशय परखड पणे मांडलेले हे पुस्तक आहे..

१३. झोंबी .. आनंद यादव

एक निशब्द शांतता .. हो पुस्तक वाचुन झाल्यावर माझ्यापाशी उरली ती एक निशब्द शांतता.. आणि उगाचच तळमळणारे माझे मन पुन्हा पुन्हा आनंद यादवांच्या झोंबी पाशी लोंबकळत होते...

प्रत्येक दिवशी यातनांच्या वादळाशी लढणारा आनंद (येथे एकेरीच संबोधतो आता त्यांना, कारण या सबंध कादंबरी मध्ये कोठेही त्यांनी लिखान हे एक चिडुन आपल्याच वट्याल का असले जगणे म्हणुन न करता एक सत्य निर्विवाद पणे मांडले आहे म्हणुन जवळीक वाटते आहे त्यांच्याशी )

आणि मनामध्ये शिकण्याची उर्मी आणि सभोवताली कामचा पडालेला गराडा आणि नीट खायला ही मिळत नसताना उलगडणार्या सर्व गोष्टींचे पदर मन थक्क करुन जातात.

आनंद बरोबरच संसारात फ़रफ़रट होणारी त्याची आई, आणि शेतकर्याचे हात फ़क्त शेतात काम करण्यासच असतात बाकी शाळा बिळा सगळ भिकारचोट पणाचे लक्षण असे म्हणनारा त्याचा बाप यांचे चित्रण मनास होरपळून काढते

शब्द आणि शाळा याचा लवलेश ही घरी कधी कोणाशी आला नसलेला आणि वडीलांची शाळेप्रती असणारा तिटकारा आनंद पुढे रोज नवनविन संकटे उभे करत होता, दुखाच्या वरातीत शेवटपर्यंत आपले हात हे कष्ट करण्यासाठीच असतात येव्हडाच जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण त्याला आपल्या पित्याकडुन मिळालेला असतो

पुस्तकातील कोरडेपणा दर्शविणारे शब्द पाहिले ना तर आपल्या सभोवतालच्या पांढरपेशी समाजाच्या प्रती एक तिरस्कार निर्मान झाल्या सारखा वाटतो ...

मनात असे कित्येक आनंद या जगात परिस्तितीशी झुंज देत असतील असे वाटून जाते.. यातुन नक्कीच समाजात आपण काही तरी यांसाठी केले पाहिजे हे भाव तरळून जातात ..

कादंबरीतील व्यथा मनावर खोल जखमा करुन जातात.. पण त्यातून ओघळणारे भावनांचे पाट कधी अश्याच झोंबीतील नायकाप्रमाने कोण असतील त्याकडे वळले तरच योग्य होयील असे वाटते...

-----------------------------------------------

१४. नॉट विदाउट माय डॉटर..

माणुस आणि त्याची परकीय प्रांतामध्ये स्वताची सुटका करण्यासाठीचे प्रयत्न अतिशय परिनामकारक पणे दाखवण्यात लेखिका यशस्वी झाली असली तरी स्वताच स्वताच्या घडलेल्या ह्या घटना पुन्हा लिहिताना ही तीला खुप काही वेदना होत असतील असे वाटते ..

अतिशय कणखर पणे आपल्या लेकी साठी एक नरक मय जीवन जगणे आणि नवर्‍याचा त्रास सहन करत परक्या राज्यात जीव मुठीत जगणे खरेच खुप अवघड असते ,,
पुस्तक वाचताना आलेला परीसर आणि इराण मधील राहणीमान वाचुन बर्याचदा किळस येते ..

अश्या अवस्थेमध्ये आपल्या पत्नीस आणि मुलीस मनाविरुद्ध डांबून त्यावर अत्याचार करणारे पुरुष पाहीले की मनात घृणा येते.

जवळ्जवळ २ वर्ष स्वताच्या स्वातंत्र्यासाठी झटत असणारी लेखीका जेंव्हा मुक्त होऊन अमेरीकेत जाते तेंव्हा मन एकदम प्रसन्न होऊन जाते ..

आपलाच खडतर प्रवास तितक्याच परीनामकारक पद्धतीने मांडलेली ही एका स्त्रीची कहानी खुप बोलकी अशी आहे.

-----------------------------------------------

१५ . महोत्स्व ....व.पु काळे

व.पु काळे म्हणजे माझे आवडते लेखक आणि "आपण सारे अर्जुन" या सारख्या सर्वोत्कृष्ट कलाक्रुतीनंतर "महोत्सव " हे आयुष्याचा महोत्स्व सांगणारे पुस्तक हाती लागले ...

व.पुं च्या पुस्तका बद्दल लिहिने जमने जरा अवघडच आहे ,, त्या पेक्षा त्यातील काही वाक्य येथे देतो म्हणजे आपोआप कळेल पुस्तक काय आहे ते

" आयुष्य खुप साधे असतं. कधीकधी खुप रटाळ असतं. आयुष्याच महोत्स्व करता आला पाहेजे. श्वास घेणं आणि सोडन. ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्येय आला पाहीजे"
'
.

"बंद दरवाजांची एकजुट पटकन होते, कारण त्या दरवाज्याच्या पल्याड भ्याड माणसांची घरे असतात"
.
.

"दूसर्या व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जी आवर्तने निर्मान होतात त्या आवर्तनांना समोरच्या व्यक्तीची स्पंदने भेटली पाहीजेत. तस घडल्यानंतरच स्पर्शाची कविता होते"
.
.

"एका क्षणामध्ये पत्नीची आई होते, नवर्‍याने त्यानंतर 'पिता' व्हावं ही पत्नीची अपेक्षा असते. पण तस घडत नाही. ह्याच कारण दिवस गेल्या पासुन दिवस पुर्ण होई पर्यंत पत्नीने मातृत्वाचा छोटा कोर्स केलेला असतो. एकच विद्यार्थी असलेला वर्ग तीने नऊ महीने संभाळलेला असतो. मुल आणि आई, शाळेतच असतात. आणि पुरुष शाळा सोडून अन्यत्र असतो. म्हणुनच त्याला पिता व्हायला वेळ लागतो."

----- शब्दमेघ

(आता इतकेच .. पुढील वेळेस पुढील १५ पुस्तकांचे विश्लेशन देइन .. आपले लिखान आल्यास छान वआटेलच ..
जाता जाता .. "आपण सारे अर्जुन .. ययाती .. बटाट्याची चाळ .. नांगरणी .. तु भ्रमत आहाशी वाया ... every thing happens for a reason ... अश्या असंख्य पुस्तकांबद्द्ल आता देवु शकलो नाही म्हनुन कसे तरी वाटत आहे.. पुढील वेळेस नक्की .. आधी वाचलेल्या पुस्तकांबद्दल पुन्हा वाचुनच लिहिले .. त्यामुळे कपाटात मागे गेलेल्या पुस्तकांना पुन्हा वाचत येइल )

हे ठिकाणसाहित्यिकविचारमतमाध्यमवेधसमीक्षा