बिलोरी आरसा

sneharani's picture
sneharani in जनातलं, मनातलं
1 Mar 2011 - 1:59 pm

कितीतरी वेळ असाच बसून राहिलोय..! काय करावं? झोपावं म्हंटल तर झोप येत नाही अन् नुसत रिकामं बसूनही वेळ जात नाही. जावं का नदीच्या घाटावर फिरत फिरत...पण सांजकाळी कोणी फिरकत नाही तिकडं!
कातरवेळ! तशातही तो एकटाच...सोबतीला स्वत:च मन! बस! आणखीन कशाची गरज होती भुतकाळ जगायला? सुर्याची किरणं कमी कमी होत होती.पाखर परतत होती त्यांच्या घरट्यांकड..!
घरट्याकडं परतायची एवढी गडबड? माझ घर...!
घर म्हणाव का त्याला?
"म्हण ना घर!का ते घर नाही...घरात कोणी नाही म्हणून? अरे आहेत खूप आठवणी आहेत अगदी मनभरून..अंहं घरभरून तुला दिलेल्या..तुझ्याच माणसांनी!"
जोत्यावरची काचवेल, मधघरातला भिंतीतला आरसा, सोनचाफ्याची फूले..बायकोचं प्रेम... एक की दोन? मोजता येतील का?खूप आहेत नेऊ का भुतकाळात तूला मग कळेल तुला तुझ घर म्हणजे तुझं जिवंतपण टिकून असल्याच लक्षण! नाहितरी संन्याशी व्हायचाच बाकी होतास!"
"संन्यास? घेतलाच असता पण तु जाशील तर न?
"हो ना! मी तुला सोडू शकत नाही हे सत्य!त्रिवार सत्य!"
"हम्म"

सरतेशेवटी एकांतानं काम केलच! भुतकाळात हळूच ढकललं त्याला!

सुंदर घर माझच होत अस वाटायचं.सुरवातीचा जोतासोपा...आवडायचा एकाच कारणानं ' काचवेल '! होतीच ती चकाकणारी...आजीच्या हातानं आकार घेतलेली! आईनं जोता सारवला की धाव घ्यायची ती त्या काचवेलीकडं आणि मग तिच्यावरच सारवण पुसून काढायच. आई ओरडायची सारवल्यावर नाचलो म्हणून....म्हणायची सारवल्यावर काही बुजणार नाही ती लगेच...! तशी ती बुजलीच नसती..पण ती चकाकल्याशिवाय मन कुठलं समाधानी व्हायला! कुठलसं कारण बालपणी समाधान व्हायला पुरेस असायच...!लहानपणी लहान लहान गोष्टीनी समाधानी होणारा जीव मोठेपणी सहज समाधानी होत नाही तर खुप सार्‍या गोष्टीत समाधान मानूनच जीवन व्यतीत करत असतो...कुठ हरवल ते निरागस मन कोणास ठाऊक!

सगळं शिकलो. लिहायला, वाचायला, आशयघन बोलायला! बराच पैसा कमावला! गावात मंदिर बांधल! किती धावपळ..किती ती ओढ मंदिराच काम करायला...वेगळच झपाटलेपण!

"सारख काय बाहेर जाताय हो! बसा ना चार घटका बोलत" ती

"तु का या घरात नवीन आहेस...पाहतेस ना मंदिरासाठी होणारी धांदल?"

"कशाला ओढून ताणून काम करताय? बाकीचेही लोक आहेत की...."

"आहेत ना! पण मी केली ज्यादा मदत तर बिघडलं कुठे? "

"अं! तसं नाही पण आई गेल्यापासून मी ही या घरात एकटीच आहे! वेळ जात नाही. बोलायला कोणी शेजारी सोबती नाहीयेत. त्यात तुम्ही मंदिराच्या कामात दिवस रात्र बघत नाहीत. वेळ कसा घालवू?"

"अगं मग वाचत चल काहितरी! लिहीत जा काहितरी. बघ लिहण्यावाचण्यात बराच वेळ जाईल"

"लिहण्यावरून आठवलं! तुम्ही लिहा न काहितरी! बरेच दिवस लिहताना नाही पाहिलं तुम्हाला!"

" हा बरेच दिवस झालेत लिहून पण इतक्यात काही लिहणार नाही."

"का?"

"इच्छा नाही"

"खोटं"

"मग काय खरं?"

"ते तुम्हालाच माहित"

कस सांगू? अन् काय सांगू? मानवाची दोन मनं असतात...एक लोकांना दिसत ते आणि त्याच्याआड बसलेलं व्यक्तिगत मन! तिथं खूप कोलाहल आहे! तुला कसं सांगु? ते मन हेलकावत आहे कश्या दाखवू त्या व्यथा! प्रत्येक व्यथेची निराळी कथा! लोक म्हणतात आपल्याच तंद्रीत जगतोय हा पण मनातली आक्रंदन त्यांना कशी दाखवू...!

संसाराचा जू अगदी सुखाने ओढत होतो आणि का नाही बायकोच होतीच तशी साक्षात लक्ष्मी..! सगळ्यांच आवडीनं करायची...हसरी, प्रेमळ, कधीतरी भांडणारी...तितक्याच प्रेमाने समजूत घालणारी, माझ्यातल्या लेखकाला सारखी सारखी जाग करणारी! अगदी सहचारिणी या शब्दाचा अर्थ जगताना मला दाखवून देत होती.

पण जीवनात बदल होत राहतातच...छोटेमोठे बदल! सुखं का फारकाळ टिकतात एका जागी? नियतीचा आलेख का कुणाला आधीच दिसलाय? कधी कधी आयुष्यात नको ते पहाव लागत, सहन कराव लागतं.दु:ख येत..अन् दु:खाच्या साखळीत एक कडी आणखी वाढते! तसच काहीसं झाल! अवघी पंधरा वर्षे सरली अन् तिची साथ सुटली

"जुना आरसा फुटलाय, नवीन आणा की!"

"चेहराच पहायचाय ना? मग माझ्याकडे बघ."

"तुम्ही काय माझं प्रतिबिंब आहात की काय?"

"छे! एवढं मोठं मन कुठ आहे आमच्याकडं!"

"भलतच काहितरी!"

"ही घे सोनचाफ्याची फूलं."

"बस इतकच...आणखी काही?"

"मग काय गाडी भरून हवीत का?"

"इतकी काही विकायची आहेत का?"

"तुला जितकी हवी तितकी घे बाकी विकू, कशी आहे कल्पना?"

"तुम्ही पण न.."

"अगं काही नाही हा आरसा आणला न मग येतानी घ्यावीशी वाटलीत फूलं...तुझ्यासाठी! नाहीतरी काय आणत असतो तुझ्यासाठी?"

"अय्या आणलात आरसा! चला पटकन बसवू मधघरात! आणि काय आणत नसता माझ्यासाठी न मागता तर आरसा आणि फूले आणलीतच की! आणखी काय हवय?"

कुठल्या आठवण काढाव्यात.एक..दोन... किती म्हणून काढाव्यात! प्रेमाचे ते सारे क्षण फुलासारखे...सुगंधीत!

आरसा...प्रतिबिंब ! तिच आठवण नेहमी आठवतेय...

कुणालाही हव्या असणार्‍या गोष्टी नाही मिळाल्या की अस्वस्थ होतं..एक प्रकारची खंत जाणवते..अगदी असचं अस्वस्थ होतय मनं..!
तिच्या जाण्यानं झालेली पोकळी अजूनही नाही भरलेली....कधीतरी भरल्यासारखी जाणवते... वाटत आता लय सापडेल पण पोकळ जमीन जशी खचते अन् परत रिक्त पोकळीच पुन्हा नजरेस पडते...पुन्हा रिक्तपणा...अगदी तसच होतय! हवं असणार माणूस निघून का जात - का व कस कळत नाही. हा अनुभव धरतीवरच्या प्रत्येक जीवानं अनुभवला असेल का?
प्रेम...आठवणी...भावना..चेहर्‍यावरचे भाव...सांगडच लागत नाहीये आजकाल!हसरा चेहरा दाखवतोय!तसही चेहरा हा काही आरसा नव्हे मनातल खरखुरं सांगायला..!सर्वांना हसरा चेहरा दिसतो..पण या हसर्‍या चेहर्‍याच्या आत एकाकीपण जपल जातं हळूवारपणे...अगदी अलगद...!ती उणीपुरी १५ वर्ष बघतो तेव्हा आयुष्याच्या भुतकालाच्या आरश्यात पाहिल्यासारख वाटतं!

चार दिवसाचं जीवन
गोडी गुलाबीत घालवायचं
आठवांची शिदोरी घेऊन
एकटच नेहमी चालायचं

हे काय काळोख झालाच की...!केवढी मोठी तंद्री लागली भुतकाळाची...!

कथासाहित्यिकसमाजप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर लिहिलेली आहे कथा....

जोता .. काचवेल .. बिलोरी आरसा .. खुप दिवसानी ऐकले हे शब्द मस्त वाटले...

आठवणींची घालमेल आणि गतीमान शब्दरचना खुप सुरेख जमले आहे सारे .. काहि वेळेस फिलॉसॉपी चा टच वाटतो आहे ..

छान .. लिहित रहा ... वाचत आहे .

पर्नल नेने मराठे's picture

1 Mar 2011 - 2:11 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख !!!

पैसा's picture

1 Mar 2011 - 2:24 pm | पैसा

मस्त जमलीय कथा! खूप आवडली.

सुहास..'s picture

1 Mar 2011 - 2:43 pm | सुहास..

बराच लांब ब्रेक घेतलात ..कथा आणि शैली दोन्ही पण फार छान .

स्वैर परी's picture

1 Mar 2011 - 2:55 pm | स्वैर परी

वाटत आता लय सापडेल पण पोकळ जमीन जशी खचते अन् परत रिक्त पोकळीच पुन्हा नजरेस पडते...पुन्हा रिक्तपणा...अगदी तसच होतय

अगदी अगदी! खुप सुंदर लिहिले आहे!
लेख मनाला स्पर्श करुन गेला!

श्रावण मोडक's picture

1 Mar 2011 - 2:56 pm | श्रावण मोडक

मुहूर्त सापडला? छान. मधघर, सांजकाळ हे फक्त त्याच भागात लीलया वापरले जाणारे शब्द भेटले.

स्वैर परी's picture

1 Mar 2011 - 3:05 pm | स्वैर परी

मधघर, सांजकाळ हे फक्त त्याच भागात लीलया वापरले जाणारे शब्द भेटले

कुठल्या भागात बरे?

सुहास..'s picture

3 Mar 2011 - 1:51 am | सुहास..

कुठल्या भागात बरे? >>>

हाच प्रश्न विचारणार होतो

परिकथेतील राजकुमार's picture

1 Mar 2011 - 3:07 pm | परिकथेतील राजकुमार

झक्कास गो.
आवडले एकदम.

आता लिहिती रहा, वाचनमात्र बास झाले.

गणपा's picture

1 Mar 2011 - 3:19 pm | गणपा

सुरेख !!!

प्रीत-मोहर's picture

1 Mar 2011 - 3:31 pm | प्रीत-मोहर

पराशी बाडिस :)

५० फक्त's picture

1 Mar 2011 - 3:51 pm | ५० फक्त

स्नेहाराणि, खुप छान लिहिलं आहे तुम्ही. ब-याच दिवसांनी आलात, आता येत रहा. म्हणजे तुम्ही लिहित रहा आम्ही वाचत राहु.

पुढील लेखन लवकरच येवो ही सदिच्छा.

असुर's picture

1 Mar 2011 - 4:43 pm | असुर

मस्त!!! छानच लिहीलंय!!! पण हे वाचून 'कुण्या एकाची..' ची आठवण का व्हावी???

--असुर

स्वाती२'s picture

1 Mar 2011 - 5:45 pm | स्वाती२

सुरेख!

मुलूखावेगळी's picture

1 Mar 2011 - 9:32 pm | मुलूखावेगळी

मस्त ग
खुप भावस्पर्शी लिहितेस.

माधघर म्हन्जे माजघर काय आनि जोता ?

आत्मशून्य's picture

1 Mar 2011 - 11:42 pm | आत्मशून्य

.

अवलिया's picture

2 Mar 2011 - 8:26 am | अवलिया

अतिशय सुंदर लेखन.

नेहमी लिहीत जावे अशी विनंती

प्राजु's picture

3 Mar 2011 - 3:23 am | प्राजु

छान लिहिले आहेस.
खूप आवडले.
लिहित रहा.

प्रकाश१११'s picture

11 Mar 2011 - 8:03 pm | प्रकाश१११

विषय आणि भाषाशैली -आवडली. पु.ले.शु.

प्राजक्ता पवार's picture

12 Mar 2011 - 3:07 pm | प्राजक्ता पवार

खुप छान लिहले आहेस .

sneharani's picture

12 Mar 2011 - 6:52 pm | sneharani

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार!
:)