रूममेट

ज्ञानेश...'s picture
ज्ञानेश... in जनातलं, मनातलं
9 Feb 2011 - 10:24 am

सकाळचे साडेसात.

तू आपल्या बेडवर अजगरासारखा अस्ताव्यस्त पसरलेला आहेस.
ओठाच्या कोपर्‍यातून ओघळलेला मुखरस तुझी कळकट्ट उशी भिजवतो आहे. हेही तसे रोजचेच.
गेल्या काही शतकांत साबणाचा स्पर्शही न झालेला तुझा टॉवेल अर्धा बेडवर, अर्धा जमिनीवर असा लोळतोय.

गेली तीन वर्षे सातत्याने हेच दृष्य मला सकाळी उठल्यावर दिसते आहे. त्याला कारणही आहे म्हणा.
तुझी सातत्याने नाईट शिफ्ट, आणि माझी सकाळची. मी निघण्याच्या तासभर आधीच तर तू येऊन झोपलेला असतोस ! संध्याकाळी मी रूमवर येतो, तेव्हा तू जेवायला मेसवर आणि तिकडून परस्पर कामावर. आपण दोघेही जागृतावस्थेत असे रविवारीच थोडेफार येतो एकमेकांच्या वाट्याला. तेही, मी ट्रेकवर आणि तू तुझ्या मैत्रीणीच्या गावाकडे गेलेला नसशील तर !

तीन वर्षे झालीत मला या रूमवर येऊन. माझ्या आधीपासून तू इथे राहतोस. माझ्या आधी जो इथे रहात होता, त्याच्याही आधीपासून तू इथेच आहेस असे कळले. या रूमच्या रंगहीन, जुनाट भिंतीइतकाच तूसुद्धा या रूमचा अविभाज्य भाग असावास, असे मला कायम वाटत आले आहे. घरमालकही तुझ्यावर कधी गुरकावतांना दिसत नाही. तुझ्या निर्ढावलेपणाला तोसुद्धा सरावला असावा.
आज मात्र मला तुझी चीड येत नाहीये. मला आठवताहेत, ते या रूममधले माझे सुरूवातीचे दिवस. नव्या जॉबची नवलाई, नवी स्वप्ने घेऊन माझा या नव्या शहरातला पहिला प्रवेश. आणि एका दूssssरच्या नातेवाईकाने एका स्वस्तातल्या इस्टेट एजंटकरवी मला मिळवून दिलेली ही रूम. (मी त्याच्याकडे मुक्काम टाकेन की काय अशी भीती असावी बिचार्‍याला !) त्यादिवशीसुद्धा झालेले तुझे पहिले दर्शन फारसे सुखावह नव्हते. सावळा, लुकडा आणि सर्वसामान्य किंवा कुरूपात जमा होणारा आपला देह घेऊन दुपारी केव्हातरी अंघोळ करून तू आपल्या अडीच इंच व्यासाच्या आरशात बघत दाढी कोरत होतास. निव्वळ साबण चोपडलेले तुझे गालफड खर्र खर्र असा त्रासदायक आवाज करत होते. रूमभर एक कुबट वास भरून राहिलेला होता, आणि कचरासुद्धा. नंतर मला त्याची सवय झाली, हा भाग अलाहिदा !

तू शब्दश: नि:संग आहेस.
तुला कपड्यांचा साबण विकत घेतांना मी कधी पाहिलेले नाही. माझा कपड्यांचा साबण तरी वापरत असशील, अशी एक वेडी आशा माझ्या मनात आहे.
अंघोळीचा साबण मात्र घेतोस विकत ! गोदरेज नंबर वन. तो बहुधा दाढीमुळे आवश्यक असावा.
तुझी टूथपेस्ट ही द्रौपदीच्या थाळीसारखी असते. संपता संपत नाही.
तुझे मोजून तीन ड्रेस दिसतात मला. आणि एक चौथा आहे, पण तो फक्त मैत्रिणीला भेटायला जातांना घालत असतोस.
याशिवाय तुझ्याकडे एक चप्पल, एक ऍक्शनच्या स्पोर्ट शू ची पेअर, एक सोलापुरी चादर, एक ’रंग ओळखा’ टॉवेल, तेल, कंगवा, आणि एक पुस्तकांनी भरलेली ट्रंक एवढी जंगम मालमत्ता आहे. त्यातली पुस्तके कोणीही पाहिलेली नाहीत. मीसुद्धा.

एकंदर आर्थिकदृष्ट्या तुझे फारसे बरे चाललेले दिसत नाही. तुला चहाशिवाय अन्य जिन्नस हॉटेलात किंवा टपरीवर घेतांना कोणी पाहिलेले नाही. तू स्वत:बद्दल फार कमी बोलतोस. किंवा एकूणातच घुम्या आहेस. तुझे माझे फारसे जमणार नाही, असे मला आधी वाटले होते. दुर्दैवाने माझा हा तर्क पडताळून पाहण्याइतकाही आपला सहवास कधी घडला नाही. तीन वर्षात आपण फक्त तीन वेळा सोबत हॉटेलात जेवलो. (ते तीनही माझे वाढदिवस होते !) हॉटेलात माझ्या मित्रांशीही तू कामाशिवाय एक शब्द बोलला नाहीस.
याशिवाय एक सिनेमा पाहिला, जो अति टुकार असल्याने आपण इंटरव्हलमधून बाहेर पडलो, आणि माझ्या बाईकवर शहरभर भटकत राहिलो. तुला त्या दिवशी पहिल्यांदा आणि शेवटचेच आनंदात पाहिले मी ! तुझ्या एरवीच्या निर्विकारशा सामान्य चेहर्‍यावर ’आनंद’ ही भावना मोठी देखणी दिसत होती. (आदल्या दिवशी नक्कीच तुझ्या मैत्रिणीने काही आनंददायक सांगीतले असावे, असा तर्क मी केला.) त्या दिवशी रात्री दीड वाजता तुला कॉफी पिण्याची लहर आली चक्क ! मग आपण रेल्वे स्टेशनवरच्या ’कमसम’ मधे जाऊन बसलो, पहाटे चारपर्यंत. तिथे तू मला तुझ्या मैत्रीणीचे नाव सांगीतलेस. तिची आणि तुझी लव्ह स्टोरीसुद्धा थोडक्यात (दीड तासात) ऐकवलीस. मला झोप येत असल्याचे बघून तू आवरते घेतलेस. बिल देऊन मी बाईक काढली आणि आपण परतलो. अरे हो- तुला साधी बाईकसुद्धा चालवता येत नाही !

बस्स.
तीन वर्षातल्या आपल्या दोघांच्या अशा एवढ्याच आठवणी. बाकी सगळी नुसती निरीक्षणे.
त्या कॉफीवाल्या दिवसानंतर, खरं तर रात्रीनंतर तू पुन्हा आपल्या कोषात गेलास ते आजतागायत. नंतर आणखीही काही घडले असावे कारण एव्हाना तू अगदीच अबोल-- खरं तर मुका झाला आहेस. मी तुला कधी तुझ्या समस्यांबद्दल विचारले नाही, आणि तू स्वत:हून काही सांगायचा तर प्रश्नच नाही.
मी विचारायला हवे होते का??

असे असूनही, आपले एक नाते तयार झाले. आपण मित्र आहोत का? बहुधा नाही.
"रूममेट्स" हेच त्या नात्याचे नाव.
आपण नकळत एकमेकांची काळजी घेतो. अगदी सहजच.
आणि गरज नसेल तेव्हा दखलही घेत नाही एकमेकांच्या अस्तित्वाची.
मला हे फार आवडते. तू, मी आणि ही टीचभर रूम मिळून एक स्वयंपूर्ण, एकजिनसी असे विश्व तयार झाले आहे- जे कुठल्याही बाह्य प्रेरणेशिवाय सुरळीत चालत असते. मानवी ह्रदयासारखे जणू.

आपल्यात काही अलिखीत करार झाले आहेत. मला सकाळी घाई असते म्हणून तू बाथरूम मोकळे ठवतोस. मी गेल्यावर अंघोळ- तयारी करतोस. (यात बहुधा तुझीही सोय आहेच.) याबदल्यात मी रूम आवरून ठेवतो.
माझा पेपर तुला दररोज वाचायला मिळतो.
तुझा अडीच इंच व्यासाचा आरसा एव्हाना मीसुद्धा विनासायास वापरू लागलो आहे.
मी कधी तुझ्या ट्रंकेतल्या पुस्तकांची, तुझ्या मैत्रिणीची, तुझ्या जॉबची चौकशी करत नाही. तूसुद्धा माझ्या दर रविवारच्या एकट्याने गड-किल्ले भटकण्यात कधी फारसा रस दाखवला नाहीस.
माझ्या बाईककडे आणि कधीकधी दारात येणार्‍या शेळीकडे तू त्याच कोरड्या समभावाने बघतोस. तू चुकूनही माझ्या मोबाईलला हात लावला नाहीस.
हल्ली हल्ली तू मला आवडू लागला आहेस !

तुझी आठवण नक्कीच येईल.
हो, मी ही रूम सोडून जातो आहे. आठवडाभरापुर्वीच ठरले खरं तर. तुला सांगणारही होतो.. पण आपली भेट कुठे होते रे? एकाच छपराखाली राहणारे दोन अनोळखी जीव आहोत आपण.
काल ड्यूटीवरून आल्यावर मी सामान पॅक करायला घेतले, तेव्हा विचारायला हवे होतेस तू. किंवा मी तरी सांगायला हवे होते.
आज रविवार. त्यामुळे तुला वाटले असणार की मी नेहमीसारखी भटकण्याची तयारी करतो आहे. तू काहीच विचारले नाहीस !

आता सकाळी दहा अकरा वाजता उठशील तेव्हा तुला हे पत्र मिळेल. या पत्रावर ठेवलेले माझे FasTrack घड्याळ चुकून इथे राहिलेले नाही. ते तुझ्यासाठीच ठेवले आहे. मला माहित आहे, ते तुला फार आवडते म्हणून. तुझ्या मैत्रिणीला भेटायला जातांना कायम मागुन घ्यायचास.
तू माझ्याकडून- दिवसभरासाठी का होईना, पण हक्काने मागून घेतलेली अशी ही एकच वस्तू !
आपण दोघांनी शेअर केलेल्या अवकाशातल्या काही क्षणांची यानिमित्ताने तुला आठवण येईल, अशी एक (वेडी?) आशा ठेऊ का?

मिस करेन तुला. फोन कर. पेपर नको असल्यास त्या पोर्‍याला सांग तसे.
परत या शहरात आलो, तर नक्कीच भेटेन तुला.

मला खात्री आहे, तू याच रूममधे असशील, तेव्हाही !

तुझाच-

रूममेट.

जीवनमानप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

उमराणी सरकार's picture

9 Feb 2011 - 10:38 am | उमराणी सरकार

बारकाव्यांनिशी लिहीलेला लेख. भट्टी मस्त जमली आहे. अशा अनेक रूममेट्स सोबत पुण्यात दिवस काढल्याने विषय जिव्हाळ्याचा वाटला.

स्वैर परी's picture

9 Feb 2011 - 10:40 am | स्वैर परी

ज्ञानेश राव, खुप सुंदर लिहिले आहे आपण!
आजुबाजुला पाहिल्यास खरेच असे दिसुन येते, कि बरेच जण (बॅचलर्स ) फक्त झोपण्यापुरते 'रूम' वर येतात. बाकि वेळ, ते काय करतात, कुठे जातात, कुठे खातात, याचा काहिच पत्ता नसतो. किंबहुना, ते कळवणे देखिल ते महत्वाचे मानत नाहीत.
भावना खरेच कोरड्या होत चालल्या आहेत! :(

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

9 Feb 2011 - 10:47 am | जाई अस्सल कोल्हापुरी

खुप मनापासुन लिहिलयस. आणि जसं मनात ये ईल तसा व्यक्त झाला आहेस्.त्यामुळे असं वाटुन गेल कि प्रत्यक्ष ऐकल्यासारखं वाटलं.
छान.

मृत्युन्जय's picture

9 Feb 2011 - 10:48 am | मृत्युन्जय

छान लिहिले आहे खरेच. सुरुवातीला बक्वास म्हणुन वाचत होतो. पुर्ण वाचल्यावर जाणवले की नाही खरेच काहीतरी चांगले लिहिले आहे. पुलेशु.

वाह
क्या बात हे....

लेख वाचून झाल्यावर उगाचच त्याचा चेहरा डोळ्यांसमोर आला...
त्याच्या भावना कधी कोणाला कळल्याच नाहीत .............

एक नंबरी लिखाण !!!!

आदिजोशी's picture

9 Feb 2011 - 11:04 am | आदिजोशी

एक नंबर :) मलाही माझ्या जुन्या दिवसांची आणि रात्र जागवून पहाटे मी झोपेत असताना आपापल्या घरी गेलेल्या मित्रांची आठवण झाली.

छोटा डॉन's picture

9 Feb 2011 - 11:15 am | छोटा डॉन

हेच म्हणतो.
एकदम मस्त लेख आहे, आवडला.

- छोटा डॉन

छान निरिक्षण....

बर्‍याचदा हे रुममेट्स आयुष्यात पहिल्यांदाच नोकरी साठी म्हणून घरा/गावाबाहेर आलेले असतात. घरात होणारे लाड आणि त्यातून आलेला अहंकार हा इथे ही कायम असतो आणि त्यातून एकलकोंडेपणाची भावना वाढते.

त्यातूनआर्थिक स्वायत्तता आल्यावर नाही म्हटले तरी कुणासाठी त्यातल्या त्यात अशा नाईलाजाने एकत्र राहाव्या लागणार्‍या व्यक्तिसाठी वेळ काढावा, काही तडजोडी कराव्या असे होत नाही.

शाळा अथवा कॉलेजमध्ये जर वसतिगृहात राहणे झाले असेल, फुल्ल पब्लिक असणार्‍या सोसायटी,चाळी एकंदरीत सामाजिक वातावरणात वाढलेल्या, मित्रमंडळींमध्ये राह्यलेल्या लोकांना इतरांशी जुळ्वून घेणे अवघड जात नाही.

अति काळजी केल्या/घेतल्या जाणार्‍या घरातली मुले/मुली बाहेर रहाव्या लागण्याच्या वेळी किमान सुरुवातीला तरी त्रास करुन घेतात नाहीतर दुसर्‍याला त्रास देतात.

लेख उत्तम.

मी_ओंकार's picture

9 Feb 2011 - 11:09 am | मी_ओंकार

विनोदी लेख असे वाटतानाच हळवा कधी झाला ते कळले नाही.

- ओंकार.

कानडाऊ योगेशु's picture

9 Feb 2011 - 12:32 pm | कानडाऊ योगेशु

+१

रूममेट बद्दल सहानुभुती निर्माण झाली.
असाच अनुभव देणारे संदीप खरेचे एक मुक्तक वाचल्यासारखे वाटतेय.पण आठवत नाही कुठले ते!

मी_ओंकार's picture

9 Feb 2011 - 1:59 pm | मी_ओंकार

संदीप खरेचे एक मुक्तक

बॅचलर या नावाने आहे.

- ओंकार.

कानडाऊ योगेशु's picture

9 Feb 2011 - 3:47 pm | कानडाऊ योगेशु

करेक्ट.
बॅचलरच.
मी ब्रम्हचारी म्हणुन सर्च मारला.बॅचलर काही केल्या आठवलेच नाही.
धन्यु ओंकार!

सहज's picture

9 Feb 2011 - 11:10 am | सहज

छान.

बद्दु's picture

9 Feb 2011 - 11:10 am | बद्दु

जमलंय..ओघवती भाषा..जिव्हाळ्याचा विषय..बरेचसे सत्य अनुभव- प्रत्येकाच्या वाट्याला येणारे..भट्टी खरंच छान फुलली..

वा! आगळ वेगळ नात म्हणाव लागेल नाही याला? खुप वेगळा विषय अन न गुंतता ही गुंतल्याची खुण.

आवडल भाय, आवडल.

टारझन's picture

9 Feb 2011 - 11:21 am | टारझन

एकंच नंबर रे ज्ञान्या ... च्यायला .. आमचं दळभद्री रुममेट तर ह्याच्या पेक्षा १० पट भिकारचोट होतं :) लै बोलबच्चन द्यायचं :) आणि भिकारीपणा करायचं ;) मागे कधीतरी ल्ह्यायची इच्छा झालेली पण तेंव्हा गावकुसाबाहेर काढ्ल्यामुळे ते तसंच राहुन गेलं .. बघु कधी तरी ..

लेखन छाण !!

- (मुंबैच्या म्हाडाच्या २ बीएचके मधे अनेक रुममेट्स चा अनुभव घेतलेला ) टारेश..

sneharani's picture

9 Feb 2011 - 11:23 am | sneharani

मस्त लिहलय!
आवडल!
:)

ज्ञानेश, खुप छान लिहिलं आहेस, आत्तापर्यंतच्या आयुष्यात फक्त ६ महिने, रुममेट बरोबर या स्थितीत काढले आहेत, त्यामुळे खुप जास्त लिहिणे शक्य नाही, पण जे तु लिहिलं आहेस, ते खुपच छान आहे.

या वर्षीच्या मिपावरच्या चांगल्या लिखाणात आणखी भर घातली आहेस, त्याबद्दल धन्यवाद.

हर्षद.

आळश्यांचा राजा's picture

9 Feb 2011 - 11:32 am | आळश्यांचा राजा

सुंदर लिहिले आहे. कुणीही रिलेट करु शकेल असंच लिहिलं आहे.

मुलूखावेगळी's picture

9 Feb 2011 - 11:47 am | मुलूखावेगळी

ज्ञानेश,
अतिशय छान आनि सुंदर लिहिलेस तु. १०० पैकि १०० मार्क्स तुला.
सध्या मी पन ३.५ वर्षे असे राहत आहे.तेव्हा पहिल्या दिवसा पासुनच्या पुर्ण आठवणी डोळ्यांसमोर आल्या.
आधी मला वाटल कि तुझा सुर तक्रारीचा आहे.पन नंतर तुझे जुळलेले सुर दिसले.
घरुन आल्यावर इथे सगळेच अस्वच्छ वाटत होते.पन मी आता बदलल्ले नि मी स्वच्छतेचा अतिरेक अनि ती कोनाकडुन एक्सपेक्ट पन करत नाही.

तुला कपड्यांचा साबण विकत घेतांना मी कधी पाहिलेले नाही. माझा कपड्यांचा साबण तरी वापरत असशील, अशी एक वेडी आशा माझ्या मनात आहे.

ह्यात नवीन काही नाहीये हो ;)
तुझ्या सारखाच माझे ही झाले आहे. ज्या मुली आवडत नव्हत्या त्या पन नंतर आवडाय लागल्या.
माझी १ आठवण मी पन सांगते इथे.
माझी पहिली रुममेट वयानी अगदीच लहान कॉलेज गोइन्ग .अतिशय अल्लड अनि जिद्दि, हटवादी.
आज माझी सगळ्यात चांगली मैत्रीन कम लहान बहीण.ती कशासाठी पन माझा सल्ला मागते.
आमचे भांडन झाले तेव्हा तीच मला आधी बोल्ली होती. जेव्हा कि ती इतकी इगोइस्टीक आहे कि तिने भांडन करुन तिच्या मावशीचे घर सोडलेले.तेव्हा मला इतके फील झाले कि तिनी तिचा इगो फक्त माझ्यासाठी दूर ठेवलेला.
आज तिचे सगळे फ्रेंड्स मला ओळखतात आनि आता ती लांब राहते . एवढी भेटत पण नाही.पन तिचे २रे फ्रेंड्स मात्र मला पन भेटतात.
खट्टे-मीठे अनुभव पन आले.बाकि प्रत्येकी सोबतचे अलिखित नियम पन वेगवेगळे असायचे

गोगोल's picture

9 Feb 2011 - 12:24 pm | गोगोल

जमलय

स्वाती दिनेश's picture

9 Feb 2011 - 12:30 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला,
स्वाती

वारकरि रशियात's picture

9 Feb 2011 - 12:34 pm | वारकरि रशियात

छान जमून आलाय !

एकदम मस्त! खूप आवडले प्रकटन.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Feb 2011 - 12:42 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त लिखाण ज्ञानेश शेठ :) अगदी सुंदर व्यक्तिचित्र उभे केले आहेत.

हॉस्टेल, रुममेटसचा वगैरे काहीही अनुभव नाही, तरी लिखाण वाचताना तसे कुठेच वाटले नाही.

छान झालाय लेख.
रूममेट्स हा प्रकार परदेशात गेल्यावर पहिल्यांदा अनुभवला. त्या आठवणी जाग्या झाल्या. :)

ashvinibapat's picture

9 Feb 2011 - 1:30 pm | ashvinibapat

खुपच सुंदर लिहिलय ,
१च कारण असु शकते कि तु जिवना वर मनापासुन प्रेम करत असणार .............

ज्ञानेश...'s picture

9 Feb 2011 - 1:51 pm | ज्ञानेश...

अनपेक्षीत प्रतिसादामुळे सुखावलो.
तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

श्रावण मोडक's picture

9 Feb 2011 - 2:03 pm | श्रावण मोडक

खूप चांगलं लिहिण्याची ताकद दिसली. :)

अवलिया's picture

9 Feb 2011 - 3:15 pm | अवलिया

असेच म्हणतो

नंदन's picture

9 Feb 2011 - 3:57 pm | नंदन

सहमत, लेख आवडला!

प्रदीप's picture

10 Feb 2011 - 9:11 pm | प्रदीप

म्हणतो. लिखाणाची शैली आवडली.

पैसा's picture

20 Feb 2011 - 5:41 pm | पैसा

या चौघांशी सहमत.

वपाडाव's picture

9 Feb 2011 - 2:05 pm | वपाडाव

अव्वल....
इतकंच म्हणू शकतो या लिखाणाला...
वाचता वाचता गहिवरून आलंय मला...

प्रमोद्_पुणे's picture

9 Feb 2011 - 2:20 pm | प्रमोद्_पुणे

छान लिहिले आहे.. मुंबइतल्या रूममेटची आठवण झाली..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Feb 2011 - 3:14 pm | विश्वनाथ मेहेंदळे

छान लिहिले आहे. जुन्या रूममेट्स पैकी काही पटकन डोळ्यांपुढे आले.
बऱ्याच दिवसांनी काही चांगले वाचायला मिळाले. धन्यवाद !!!

मुलूखावेगळी's picture

9 Feb 2011 - 3:28 pm | मुलूखावेगळी

बाकि रुममेट्स बद्दल १ सत्य मी ऑबसर्व केलेले -
जे पहिल्यांदा बघुन/भेटुन चांगले वाटतात. ते शक्यतो नंतर चांगले निघत नाहीत आनि व्हाइसवर्सा

इन्द्र्राज पवार's picture

9 Feb 2011 - 3:43 pm | इन्द्र्राज पवार

"....या पत्रावर ठेवलेले माझे FasTrack घड्याळ चुकून इथे राहिलेले नाही. ते तुझ्यासाठीच ठेवले आहे...."

~ हे सगळ्यात जास्त आवडले. जरी रूममेट असला तरी लेखकाच्या मनात त्याच्याविषयी 'मैत्री' ची भावना कशी सातत्याने जागृत होती हेच वरील घड्याळाचा प्रसंग सुचवितो. पु.ल.देशपांडे यांच्यासमवेत पत्रात भरपूर वाद घालून, त्याना बोल लावून, शेवटी त्या पत्र लिहिणार्‍याने "....तरीही तुमचाच" असे लिहून सही केली होती. त्याला उत्तर देताना बेहद्द खूश झालेले पुलं म्हणाले, "अहो, हेच खरे तर आपले अस्सल मराठी मन.....दोष दाखवायचे तर आहेतच, पण शेवटी तो 'आपला' आहे हेही मनी असतेच, तेच महत्वाचे." श्री.ज्ञानेश यानी रूममेटसाठी घड्याळ ठेवणे हीच भावना दर्शविते.

आमचाही एक अशाच मुशीतील मित्र होता....त्याची आठवण मात्र आहे ती त्याच्यातील एकमेव गुणाची. ती म्हणजे स्थानिक पातळीवर झालेल्या एखाद्या अपघाताची बातमी पेपरमध्ये वाचली की चटकन तो, ओळख असो वा नसो...ते इस्पितळ शोधून तिथे जर पेशंटला मॅच होत असेल तर 'रक्तदान' करून यायचा. तसे करून आल्यानंतर आम्ही बाकीचे तिघे त्याच्यासाठी स्पेशल डिश करून ठेवत असू.

छान आणि भावुक लेख.

इन्द्रा

प्रीत-मोहर's picture

9 Feb 2011 - 3:58 pm | प्रीत-मोहर

आवडेश!!!!

कानडाऊ योगेशु's picture

9 Feb 2011 - 4:01 pm | कानडाऊ योगेशु

ह्या लेखाच्या खाली क्रमश: असायला हवे होते असे राहुन राहुन वाटले. :)

मेघवेडा's picture

9 Feb 2011 - 4:21 pm | मेघवेडा

ज्ञानेशशेठ.. सुंदर प्रकटन. दोन्हीही व्यक्तिरेखा जगून झालेल्या असल्याने लेखातील भावनांशी जवळीक साधता आली! :)

खूप छान! :)

माझीही शॅम्पेन's picture

9 Feb 2011 - 4:22 pm | माझीही शॅम्पेन

नितांत सुंदर लेख ,

माझे सर्व रूममेट आठवले , खूप गाहीवरुन आल , लवकरच ह्या विषयावर काहीतरी लिहिल पाहिजे यार ! मार डाला !

निवांत पोपट's picture

9 Feb 2011 - 4:37 pm | निवांत पोपट

मस्त लिहिले आहे. ‘रूममेट’ नाव वाचून विलास सारंग ह्यांच्या ह्याच नावाच्या अप्रतिम कथेची आठवण झाली.तुम्ही पण छान लिहिले आहे.

रेवती's picture

9 Feb 2011 - 7:15 pm | रेवती

लेखन आवडले.

स्वाती२'s picture

9 Feb 2011 - 9:11 pm | स्वाती२

खूप आवडले. :)

मुक्तसुनीत's picture

9 Feb 2011 - 9:29 pm | मुक्तसुनीत

उत्तम लिखाण !

दैत्य's picture

9 Feb 2011 - 10:17 pm | दैत्य

ज्ञानेशभौ, एकदम भारी!! माझ्या सगळ्या रुममेट्स ची आठवण आली!! प्रत्येकाची काहीतरी खासियत असते, ठराविक ठिकाणी वस्तू ठेवण्याची पद्धत, बोलण्याची स्टाईल...!! रूममेट्स ची मैत्री हा अजब प्रकार आहे!....
मला माझे रुममेट्स अमेरिकेत भेटले, पण ह्या लेखावरुन वाटलं की, पुणे असो किंवा अमेरिका, रूममेट म्हणून राहणार्या लोकांच्या परस्पर-संबंधात फारसा फरक नसतो !
ज्ञानेशभौ, तुम्हाला 'ब्रोमान्स' (कोणताही विपरीत अर्थ अपेक्षित नाही!!) झाला आहे, कदाचित!!

भडकमकर मास्तर's picture

9 Feb 2011 - 10:51 pm | भडकमकर मास्तर

या कथेतल्या लेखकाला गहिवरून यायला, डोळे पाणावायला स्कोप असतानाही ती संधी न घेता; कथा / लेख शक्य तितका साधा आणि नैसर्गिक ठेवल्याबद्दल फुल्ल मार्क्स....

वरील कारणासाठी लेखन फार आवडलं

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Feb 2011 - 1:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाण आवडले.

मस्त कलंदर's picture

11 Feb 2011 - 6:04 pm | मस्त कलंदर

लेख आवडला..

सविता's picture

11 Feb 2011 - 6:58 pm | सविता

+३

असेच म्हणते

पिवळा डांबिस's picture

10 Feb 2011 - 4:22 am | पिवळा डांबिस

छान प्रकटन!
लिखाण आवडलं!!
आम्हाला आमचा अब्दुल खान आठवला...
"इन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा!!!"
;)

मितान's picture

10 Feb 2011 - 1:03 pm | मितान

उत्तम लिखाण ! अजून लिहा :)

शाहरुख's picture

10 Feb 2011 - 8:48 pm | शाहरुख

ज्ञानेश, छान लिहिलं आहे..आवडले !!

धनंजय's picture

11 Feb 2011 - 5:40 am | धनंजय

छान.

(माझ्या अनेक रूममेटांपैकी एकाचे नाव ज्ञानेश होते की काय ते आठवून बघतो आहे...)

ज्ञानेश...'s picture

11 Feb 2011 - 11:18 am | ज्ञानेश...

पुन्हा एकदा, दिलखुलास प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे आभार !

फारएन्ड's picture

11 Feb 2011 - 6:06 am | फारएन्ड

आवडले!

पु.ले.शु.

गवि's picture

11 Feb 2011 - 4:49 pm | गवि

अगदी मनातलं.. क्लोज टू हार्ट लिखाण..

खूप छान.

प्राजक्ता पवार's picture

11 Feb 2011 - 5:49 pm | प्राजक्ता पवार

छान लिहलं आहे. आवडलं. हॉस्टेलच्या अनेक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
पु. ले.शु.

मनराव's picture

11 Feb 2011 - 6:33 pm | मनराव

छान लिहिलं आहे........ ज्ञानोबा..........

मराठे's picture

11 Feb 2011 - 7:13 pm | मराठे

सहज-सुंदर लेख! पुलेशु

निशदे's picture

11 Feb 2011 - 10:14 pm | निशदे

त्यामुळे लेख प्रवाही झाला आहे......असे रूममेट कधी काळी माझेही होते. त्यामुळे लेख आवडला.....

चिगो's picture

13 Feb 2011 - 7:57 pm | चिगो

मस्त लिहीलय.. आमच्या सगळ्या जुन्या रुममेट्सची आठवण झाली.. पण त्यातले सगळेच सर्वगुणसंपन्न होते, कुणीच घुमा-बिमा नव्हता.. मजा यायची..

गेल्या काही शतकांत साबणाचा स्पर्शही न झालेला तुझा टॉवेल अर्धा बेडवर, अर्धा जमिनीवर असा लोळतोय.
<<

आमच्या पण टॉवेलची थोडीफार हीच अवस्था असायची. चादर तर "भयानक" अशीच असायची.. :tongue:

(पुर्वाश्रमीचा) अस्वच्छ चिगो

लवंगी's picture

13 Feb 2011 - 9:51 pm | लवंगी

मस्त लिहिलय.. डोळ्यापुढे उभा राहिला रुममेट

अप्पा जोगळेकर's picture

13 Feb 2011 - 11:41 pm | अप्पा जोगळेकर

१ नंबर लिहिलंय. फास्ट ट्रॅकचं घड्याळ वाला प्रसंग आवडला.

प्रितेश सुभाश रणदिवे's picture

20 Feb 2011 - 5:28 pm | प्रितेश सुभाश रणदिवे

लेख खुप छान आहे. मी पण होस्तेल वर राहात अस्ल्यने we had exactly same conditions in the room, you touched by your description. thanks a lot.

विजुभाऊ's picture

21 Feb 2011 - 11:06 am | विजुभाऊ

ज्ञानेश आवडले रे हे लिखाण. झकास जमलय.

Rahul D's picture

30 Apr 2016 - 10:26 pm | Rahul D

छान आहे..झकास

अपरिचित मी's picture

2 May 2016 - 10:56 am | अपरिचित मी

रूम मेट आवडला !! छान लिहिलंय...

सविता००१'s picture

2 May 2016 - 11:40 am | सविता००१

छान लिहिलंय.