'पानिपत' पुस्तकाच्या आठवणी आणि श्री. विश्वास पाटील यांची मुलाखत

अप्पा जोगळेकर's picture
अप्पा जोगळेकर in जनातलं, मनातलं
23 Jan 2011 - 1:14 pm

'रामायण'कार वाल्मिकी ऋषी आणि 'महाभारत'कार व्यास मुनी यांचे भारताच्या इतिहासामध्ये जे स्थान आहे तेच स्थान महाराष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात श्री. विश्वास पाटील यांना दिले पाहिजे. असे मराठी घर नसेल, असा मराठी उंबरा नसेल, असे मराठी मन नसेल की जे पानिपतच्या पराभवाच्या आठवणीने कातर होणार नाही. अर्थातच या महायुद्धाच्या इतिहासाला ही जी उंची लाभली आहे ती प्राप्त करुन देण्याच्या श्रेयाचे हक्कदार नि:संशयपणे श्री. पाटील हेच आहेत. मनामध्ये भावनांचा कल्लोळ माजवून देणारे त्यांचे लिखाण कुठेही वास्तवातले तपशील सोडत नाही आणि अतिरंजित सुद्धा वाटत नाही हे विशेष. पानिपतच्या युद्धाचा इतिहास हा एक पदरी इतिहास नाही. इथे असंख्य नायक आहेत, महायोद्धे आहेत्, खलनायक आहेत आणि आणि धन्याला रणांगणामध्ये एकटं सोडून पळ काढणारे रणछोडदास सुद्धा आहेत. मल्हारराव होळकरांचे स्वजनद्रोही राजकारण आहे आणि खाल्ल्या मीठाला जागण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा इब्राहिमखान गारदीसुद्धा आहे. भाउसाहेब, विश्वासराव, जनकोजी शिंदे, समशेर बहाद्दर्, पराक्रमी अहमदशहा अब्दाली, शहावलि खान, बरकुरदारखान, सुजा उद्दौला, गाजुद्दीन, सूरजमल जाट आणि शिवाय तो इतिहासातील कुप्रसिद्ध नजीबखान. नावं लिहावीत तितकी थोडी आहेत. पण उल्लेख करण्यासारखी बाब ही की ही सगळी पात्रे एकापाठोपाठ घडत जाणार्‍या घटनांच्या संदर्भात नकळतपणे प्रवेश करत जातात. त्यामुळे कुठेही पुस्तकाचा प्रवाहीपणा खंडित झाल्यासारखा वाटत नाही. दत्ताजी शिंद्यांनी लढलेल्या बुराडी घाटाच्या लढाईचे संदर्भ घेत घेत कादंबरीचे पहिले प्रकरण संपते. आणि हळूहळू पुस्तक मनावर पकड घेउ लागते. त्यानंतर दिल्लीवर केलेला हल्ला, कुंजपुर्‍याचा विजय आणि यात्रेकरुंमुळे होणारी भाउसाहेबांची कुचंबणा, मराठी सैन्याची उपासमार अशा असंख्य घटनांचा वेध घेत घेत लेखक वाचकांना अशा जागी आणून सोडतो की वाचकांना आता आपण स्वतः प्रत्यक्ष रणांगणावरती जाउन युद्ध पाहणार की काय असं वाटू लागतं. 'संगर तांडव' हे प्रकरण म्हणजे तर अक्षरशः मास्टरपीस आहे. भाउसाहेब युद्धाच्या आधीच्या दिवशी संपूर्ण फौजेसमोर अत्यंत हॄदयस्पर्शी भाषण करतात. या भाषणामध्ये जवळ जवळ एक पान भरुन नुसती मराठी आडनावेच दिलेली आहेत. अख्खा महाराष्ट्र जात्-पात विसरुन एकदिलाने अखिल हिंदुस्थानच्या पातशाहीसाठी लढला हे ठसवण्यासाठी लेखकाने कदाचित हे भाषण दिले असावे. अर्थातच ते भाषण केल्याचे ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावेसुद्धा असू शकतील कारण बाजीराव पेशवे, अ‍ॅलेक्झांडर हे सुद्धा लढाईआधी त्यांच्या सैनिकांसमोर अत्यंत स्फूर्तिदायक भाषणे करायचे असे कुठेसे वाचल्याचे आठवते ( राज ठाकरे सुद्धा राडा करण्याआधी एक सणसणीत भाषण करतातच ना. तसेच काहीसे.) पण पन्नास हजार सैनिकांच्या समोर मायक्रोफोन शिवाय भाषण कसे केले असेल हा प्रश्न मनात येउन जातोच. ते काय असेल ते असो पण ते प्रकरण वाचून संपल्यावर आपण ट्रॉय सारखा एखादा महाभव्य युद्धपट पाहिला आहे असे वाटल्यावाचून राहात नाही. ते वाचून संपल्यानंतर्सुद्धा त्यातल्या असंख्य घटना मनामध्ये घर करुन राहतात. भाउसाहेबांचा भीमपराक्रम आणि मॄत्यू, विश्वासरावांचा मॄत्यू, सिंहासारखा चवताळलेला इब्राहिमखान आणि 'गोल मोडू नका रे, घात होईल' असे आतडी पिळवटून विनवणारा इब्राहिमखानाचा भाऊ, जीवात जीव असेपर्यंत लढून पावन झालेले गारदी, गोलाची शिस्त मोडणारे आणि नंतर पळ काढणारे दमाजीराव, मल्हारराव आणि विंचूरकर, आता आपले काही खरे नाही असे वाटून जीवाचा थरकाप उडालेला अब्दाली आणि कळीकाळाशी झुंज घेण्याच्या ईर्ष्येने लढलेल्या एकंदर मराठी फौजा वारंवार डोळ्यांसमोर येत राहतात. शेवटचे 'पांढरे आभाळ' हे प्रकरण मन उदास करुन टाकते. आणि त्या विषणावस्थेतच पुस्तक संपते. फाईव्ह आऊट ऑफ फाईव्ह रेटिंग द्यावे असे हे पुस्तक आहे याबद्दल मला तरी कोणातीही शंका वाटत नाही.

आजच या पुस्तकासंदर्भातल्या आठवणी जाग्या होण्याचे काहीच कारण नव्हते. काल अचानकपणे आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी विश्वास पाटील यांची घेतलेली मुलाखत पाहण्याचा योग आला. त्यानिमित्ताने कोणे एके काळी वाचलेल्या या पुस्तकाबद्दल काही लिहावेसे वाटले इतकेच. श्री. वागळे एकामागोमाग विश्वास पाटील यांना त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांसंदर्भात बोलते करत होते. सुरुवात अर्थातच पानिपत पासून झाली. आणि मग एकामागोमाग झाडाझडती, पांगिरा, महानायक, संभाजी आणि नॉट गॉन विथ द विन्ड बरोबर ही यादी संपली आणि मुलाखतसुद्धा. झाडाझडती पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचल्याचे स्मरते. विश्वास पाटील यांचे पुस्तक म्हणून हौसेनं वाचायला घेतलं खरं पण मला ते वाचताना मजबूत कंटाळा आला होता. अर्ध्याहून अधिक पुस्तक वाचेपर्यंत पेशन्स टिकला मग त्यानंतर भुक्कड पुस्तक आहे असं ठरवून अर्ध्यातच सोडून दिल्याचे आठवते. त्यांची इतर पुस्तके वाचलेली नाहीत पण त्यांच्या संभाजी या कादंबरीतल्या संभाजी राजांची क्रूरपणे कत्तल केलेल्या भागाचे काळीज चिरुन टाकणारे वर्णन ढकलपत्रातून आले होते. ते वाचल्याचे आठवते. श्री. पाटील हे सिद्धहस्त लेखक तर आहेतच पण याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छायाचित्रण करताना श्री. बिनोद प्रधान यांना सहाय्य केल्याची नविनच माहिती या मुलाखतीतून ऐकायला मिळाली. त्यांच्या प्रशासकीय सेवेसंदर्भात एकही प्रश्न विचारला गेला नाही याचे मात्र आश्चर्य वाटले. कदाचित वेळ कमी पडला असेल. पण इतक्या मोठ्या लेखकाच्या मुलाखतीकरता केवळ एकच एपिसोड आणि महागुरू पिळगावकरच्या मुलाखतीकरता दोन एपिसोड हा हिशोब मला तरी बरोबर वाटला नाही.

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

नुकताच ट्रॉय पाहिला...लेखन असले तरी नक्कीच ट्रॉयसारखा पट विश्वास पाटलांनी पानीपतमध्ये उभा केलाय..
विश्वास पाटलांचा आणखी एक मास्टरपीस म्हणजे "महानायक!" धनंजय कीर यांनी लिहीलेल्या स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या वास्तवादी चरित्रानंतर विश्वास पाटलांच्या ऐतिहासिक कादंबर्‍यांमधून खरोखर असा पट उभा करण्याची ताकद दिसली.

वाटाड्या...'s picture

23 Jan 2011 - 3:27 pm | वाटाड्या...

अप्पाजी...

काहीसं असंच...ज्या एका युद्धानं मराठी इतिहासाला कायमचं वळण लावलं, ज्यानं मराठी माणसांविषयी कितीतरी पैलु उघडुन दाखवले ...ते लिहीणार्‍या विश्वास पाटलांना मानलंच पाहिजे.....अक्षरशः कित्येक वेळेला नर्मदा ओलांडण्याच्या प्रकरणापासुन पुढे वाचण्याचा प्रयत्न केला पण पुढे पुस्तक हातात धरणंच शक्य झालं नाही इतका भेदक परिणाम हे पुस्तक करुन जातं.

तुम्ही पाहिलेल्या मुलाखतीची कुठे लिंक असेल तर इथे देता आली तर पहा...इच्छुकांना त्याचा फायदाच होइल....कारण ही काळाच्या पडद्याआड गेलेली माणसं आणि त्यांचे विचार बघायला/ऐकायला मिळणं ही एक चांगली संधीच आहे...

- वाट्या...

लॉरी टांगटूंगकर's picture

23 Jan 2011 - 11:04 pm | लॉरी टांगटूंगकर

विश्वास पाटील !!!!!!!!!काय उच्च लिहिलंय पुस्तक ;सुरुवातीचा रघुनाथराव,होळकर आणि नजीब संबंध दाखवणारा एक प्रसंग आहे तो तर डोळ्यासमोर उभा राहतो.

मनामध्ये भावनांचा कल्लोळ माजवून देणारे त्यांचे लिखाण कुठेही वास्तवातले तपशील सोडत नाही आणि अतिरंजित सुद्धा वाटत नाही

अगदी बरोबर बोललात .
ऐतहासिक पुस्तकांची काहीच पार्श्वभूमी माहित नसताना मी हे पुस्तक घेतले होते.खरोखर खिळवून ठेवणारे पुस्तक आहे .

अर्धवटराव's picture

24 Jan 2011 - 12:41 am | अर्धवटराव

पानिपत वाचताना अगदी असाच अनुभव आला होता. इतीहासात निर्णायक क्षणी एका-दोघाने केलेले कृत्य पुढे किती खोलवर परिणाम करुन जातात याचा पाढा पानिपतात वाचायला मिळतो.
विश्वासरावांचे महानायक सुद्धा ग्रेटच. "महात्म्याचा", आब राखुन, बुरखा इतका टराटरा क्वचितच कुणी फाडला असेल . तसेच त्यांची "संभाजी" हि कादंबरी. 'छावा' पेक्षा मला ती दसपट चांगली वाटली.

अर्धवटराव

परत एकदा वाचावे म्हणतो.

मस्त रे अप्पा
बर्याच दिवसांनी लिहिता झालास, अभिनंदन :)

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Jan 2011 - 9:42 am | llपुण्याचे पेशवेll

पानिपताची शेवट शेवटची प्रकरणे वाचवत नाहीत.

स्वानन्द's picture

24 Jan 2011 - 5:17 pm | स्वानन्द

खरं आहे :(

अप्पा जोगळेकर's picture

24 Jan 2011 - 7:46 pm | अप्पा जोगळेकर

काळजाला हात घालणारे लिखाण आहे त्यामुळे असेल. आमच्या मातोश्री हे पुस्तक वाचताना रडल्या होत्या. तुमच्या प्रतिसादावरुन त्या प्रसंगाची आठवण झाली.

आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी विश्वास पाटील यांची घेतलेली मुलाखतीची लिंक-http://www.youtube.com/watch?v=FMgP4D8lC-o

असुर's picture

24 Jan 2011 - 8:06 pm | असुर

जोगळेकर,
पानिपत नाहीये माझ्याकडे इकडे, तर तुम्हाला शक्य असेल तर एकदा ती 'दो मोती गलत..' ची ओळ लिहा इथे! वर्ष झाली पानिपत वाचून, पण त्या ओळींचा इफेक्ट विसरायला होत नाही!
आणि काही प्रसंगही विसरायला होत नाहीत अजिबात. समशेर घेऊन कल्लोळात विरुन गेलेले सदाशिवरावभाऊ, जनकोजीला मारून बकर्‍यांच्या खड्ड्यात पुरल्याचा प्रसंग, अब्दाली आणि इब्राहिमखानाची शाब्दिक जुगलबंदी, समशेर बहाद्दराचे अखेरचे दिवस नि अजून काय काय! काटा येतो अंगावर ही वर्णनं वाचताना...

कुणाला तरी सांगून मागवून घेतो हे पुस्तक आता !!!

--असुर

अप्पा जोगळेकर's picture

24 Jan 2011 - 8:14 pm | अप्पा जोगळेकर

दो मोती गलत, दसवीस अश्रफत, रुपयोंकी गणती नहीं |
पण हेच वाक्य आमच्या शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात
'दोन मोती गळाले, सत्तावीस मोहरा हरवल्या, रुपये आणि खुर्दा किती गेले याची गणतीच नाही' असं दिलं होतं.
अब्दाली आणि इब्राहिमखानाची शाब्दिक जुगलबंदी
इब्राहिमखान हे या पुस्तकातलं सगळ्यात अपिलिंग कॅरेक्टर आहे.

ramjya's picture

24 Jan 2011 - 8:48 pm | ramjya

पुस्तकातील एक वाक्य आठ्वते..

विश्वासराव च्या प्रेताकडे पाहात.
" मौत के बाद भी कितना हसिन दिख्ता है ."....अब्दाली चे वाक्य....

(महिला मध्ये 'मस्तानी' आणी पुरुषा मध्ये 'विश्वासराव )

अप्पा .. खुप छान लिहिले आहे आपण येथे.
पुन्हा त्या सळसळणार्या इतिहासाच्या पानांची आठवण काढुन दिल्याबद्दल धन्यवाद.
---

विश्वास पाटील यांची दुसरी पुस्तके वाचली नाहीत असे लिहिले आहे. म्हणुन एक सांगु इच्छितो की तुम्ही महानायक नक्कीच वाचा, खरेच ते ही पुस्तक खुप उच्च दर्जाचे आहे. खुपच ह्रद्यस्पर्षी लिखान आहे त्यात ही.
महानायक रीलीज होताना त्यांचे उरुळी कांचन ला झालेल्या वसंत व्याखेनमालेतील भाषण आठवते आहे, सलग ८ वर्षे कसा प्रवास केला, जपानी आझाद हिंद सेनेचे शुर शिपाई .. म्यानमार ची धावपट्टी यांचे उल्लेख वगैरे खुपच उत्साह ओसांडुन वाहणारे होते.
त्याचवेळेस घरच्यांची आणि कलेक्टर असुनही दिलेल्या सवलतीची ही त्यांनी खरेच खुप कळवळुन आभारी असल्याचे सांगितले होते.

झाडाझडती बद्दल तुम्ही निगेटीव्ह लिहिले आहे, तरीही बरेच दिवस झाले त्यांचे लेखन वाचले नसल्याने हे पुस्तक घेणार आहे असे ठरवले आहे. बघु या. तुम्ही सांगितले आहे तरीही वाचणार आहे.. कारण विश्वास पाटलांच्या लेखनाने अगदी वेड लावलेले आहे. ऐतिहाशिक कादंबरी मी खुप कमी वाजतो, पण विश्वास पाटलांमुळे त्या वाचणात ही एक जान निर्मान होते.

--