क्षणभर विश्रांती

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
11 Jan 2011 - 12:45 pm

परवा 'क्षणभर विश्रांती' हा एक सुंदर मराठी चित्रपट बघण्यात आला. चित्रपटाला खरेतर खूप आकर्षक कथा वगैरे आहे अशातला भाग नाही, उलट ह्या चित्रपटाची कथा साधी सरळ आणि सहज उलगडत जाणारी आहे. मात्र कमरेखाली न जाणारे विनोद, अतिभावनाप्रधान फुलपाखरी अश्रुपाताला घातलेला आवर, दिग्दर्शकाच्या ताब्यात राहिलेला भरत जाधव आणि फ्रेश आणि तरुण चेहर्‍यांना मिळालेली सुंदर संधी ह्यामुळे चित्रपट आवडून गेला.

चित्रपटाचे तांत्रिक स्वरूप आणि स्टारकास्ट सुद्धा सचित पाटील, हेमंत ढोमे आणि मौलिक भट ह्यांनी व्यापून टाकलेली आहे. ह्या चित्रपटात अभिनय करण्याबरोबर सचित पाटील (दिग्दर्शक आणि कथा), मौलिक भट (प्रोड्युसर), हेमंत ढोमे (संवाद) अशा जबाबदार्‍या सुद्धा लिलया पेलून गेलेले आहेत. तरुणाईचा प्रयत्न म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहिल्यास हा नक्की आवडून जाईल. चित्रपटात हेमंत ढोमे आणि मौलिक भट ह्यांच्या बरोबरच कादंबरी कदम, मनवा नाईक आणि पुजा सावंत ह्या नवीनं चेहर्‍यांच्या तरुणींना देखील संधी मिळाली आहे. त्या दिसल्या आहेत छान आणि अभिनयात देखील कमी पडत नाहीत हे विशेष. खरेतर चित्रपटाची कथाच इतकी साधी सरळ आहे की ह्या लोकांना फार अभिनय करायची गरजच पडली नाहीये.

हृषिकेश कामेरकर ह्या गुणी गायक आणि संगीतकाराला मिळालेली संधी हे ह्या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य, त्याने ह्या संधीचे सोने केले आहे. संगीताच्या आणि गाण्याच्या बाबतीत चित्रपट सरसच.

काय आहे ह्या चित्रपटाची कथा ? कथा एकदम सरळ.. सचित पाटील हा अमेरिकेत नोकरी करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर बर्‍याच वर्षांनी मुंबईत परत आला आहे आणि आता त्याला आपल्या जीवाभावाच्या मित्रांना भेटायचे वेध लागलेले आहेत. हे मित्र म्हणजे भुर्जीपावची गाडी लावणार सिद्धार्थ जाधव, कवी असणारा पण एका मेडिकलच्या दुकानात नोकरी करणार हेमंत ढोमे आणि समांतर रंगभूमीवर नट म्हणून नशीब अजमावत असलेला मौलिक भट. सचित देखील खरेतर एक छानसा गायक असतो पण आयुष्यात जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तो गाण्याला रामराम ठोकून नोकरीसाठी अमेरिका गाठतो. आता निदान आपले मित्र तरी त्यांना हव्या त्या क्षेत्रात काम करत आहेत का नाही हे त्याला जाणून घ्यायचे असते. सचितचे एकूणच सगळे सुरळीत चाललेले बघून हे सर्व मित्र त्याच्याशी खोटेच बोलतात. सिद्धार्थ आपले मोठे हॉटेल असल्याचे सांगतो, हेमंत आपला कविता संग्रह छापला गेल्याचे तर मौलिक आपण यशस्वी नट असल्याचे भासवतो. मित्रांच्या यशाने आनंदित सचित पाटील त्यांना आता अलिबागला जाण्याचा प्लॅन सांगतो. सचितच्या अमेरिकेतील कमाईतून वडिलांनी तिथे एक बंगला घेतलेला असतो. त्या बंगल्याला एक भेट आणि त्यानिमित्ताने पिकनिक असा बेत ठरवून सर्वजण अलिबागला कुच करतात.

इकडे अलिबागच्या बंगल्यात वेगळेच नाटक रंगलेले असते. बर्‍याच वर्षे कोणी न फिरकलेल्या त्या बंगल्यात आता बंगल्याचा केअर टेकर असलेल्या भरत जाधवने (आप्पा) खानावळ आणि लॉज उघडलेले असते. ह्या सगळ्यात अचानक सचित येत असल्याचा त्याच्या वडिलांचा फोन आल्यावर भरतची तारांबळ उडते. जेवणार्‍या लोकांना ताटावरून उठवण्यापासून ते खोलीत राहणार्‍यांना आहे त्या कपड्यानिशी बाहेर काढण्यापर्यंतची कामे तो १० मिनिटात उरकतो. मधल्या काळात नोकराकडून बंगल्याबाहेर लावलेला 'क्षणभर विश्रांती' हॉटेलचा बोर्ड देखील काढून घेतो. बंगल्यात शिरत असताना दारातच येवढी गर्दी बघून सचित चौकशी करतोच, मात्र बंगला बघायला पर्यटक येत असतात असले कारण सांगून भरत वेळ मारून नेतो.

बहीण शुभांगी गोखले (जिजी ) , नोकर आणि मुंबईत शिकणारी भाची ह्या सर्वांशी खोटे बोलून हॉटेल चालवणार्‍या भरतची आता मात्र तारांबळ उडते. त्यातच त्याची मुंबईला शिकणारी भाची आपल्या तीन मैत्रिणींना घेऊन ट्रीपला आलेली असते आणि बंगल्यातच राहत असते. नेहमीप्रमाणेच सचित, सिद्धार्थ, हेमंत आणि मौलिक हे त्या चार जणींच्या प्रेमात पडतात आणि कथा नेहमीच्या वळणाने जायला लागते. मात्र अचानक एक दिवशी भरतचे बिंग फुटते. बहिणीच्या आजारपणासाठी आणि भाचीच्या शिक्षणासाठी हे सर्व केल्याचे भरत सांगतो आणि सचितची क्षमा मागतो. मोठ्या मनाने सचित त्याला माफ करतो आणि इथे असे पर्यंत भरतला बहीण आणि भाची समोर खोटे न पाडण्याची जबाबदारी घेतो. त्यानंतर ह्या चौघा जणांच्यात थोड्याश्या नेहमीच्या रुसव्या फुगव्यानंतर प्रेमाचे अंकुर फुटायला सुरुवात होते आणि अचानक एक दिवशी सचित आपण हा बंगला विकणार असल्याचे जाहीर करतो.

ह्यानंतर कथा नेहमीचेच वळण घेते का अजून काही अनपेक्षित घडते ? हे चित्रपटातच बघण्यात मजा आहे.
अभिनयाच्या आघाडीवर भरत जाधव, सिद्धार्थ, सचित पाटील अप्रतिमच. जिजिच्या भूमिकेत शुभांगी गोखले नेहमीप्रमाणेच यशस्वी खेळी खेळून गेल्या आहेत. हेमंत ढोमे, मैलिक भट, कादंबरी कदम, पुजा जाधव आणि मनवा नाईक आपापली कामे व्यवस्थित पार पाडतात. मुख्य म्हणजे कुठेही लाउड अभिनय जाणवत नाही. भरत जाधवने त्याच्या वाटेला आलेले हळवे प्रसंग अतिशय सुरेख उभे केले आहेत, त्याबद्दल त्याला विशेष दाद द्यायला लागेल. सोनाली कुलकर्णी दिसली आहे छान आणि अभिनयात देखील उत्तम. चित्रपटात खटकलेली एकमेव गोष्ट म्हणजे अलिबागच्या निसर्गसौंदर्याचा १०% सुद्धा वापर चित्रपटात करण्यात आलेला नाही.


तर मग कधी घेताय 'क्षणभर विश्रांती' ?

तंत्रमौजमजाचित्रपटशिफारसमाध्यमवेधआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 12:50 pm | नरेशकुमार

छान परिक्षण, पिच्चर बघायला पाहीजे. ह्या weekend लाच जातो.

बघितला..
ठीक आहे ,
सचित पाटील सोडला तर एकही थोबाड बघण्यासारख नव्हतं..

वर सिद्धार्थ जाधव आणि मनवा नाईक हे combination म्हणजे अत्याचार होता....
त्याला हिरो म्हणून का घेतात हा प्रश्नच आहे

बाकी चित्रपटच लुक खूप फ्रेश आहे
माझ्यातर्फे २/५

+१

पण सचित पाटील काय हो बघण्यासारखा वाटला?

त्यापेक्षा ती कोण कदम मला वाटतं, ती छान आहे. सावळीशी.

>>ती छान आहे. सावळीशी.
ती पूजा सावंत .....मटा ची श्रावण क्वीन होती बव्हतेक !! आणि अप्सराला विसरलात की काय ?? :D

गवि's picture

11 Jan 2011 - 5:32 pm | गवि

की मी हा सिनेमा पहात असताना मध्यंतर झालं आणि दिसलं की हे सर्व हिरो आणि हिरविणी आमच्या पुढच्याच रांगेत शो ला येऊन बसले आहेत.

मग त्यांनी आमच्याशी संवाद केला. कसा वाटतोय सिनेमा, आमचा पहिलाच प्रयत्न आहे वगैरे म्हणून सर्वांच्या शुभेच्छा घेतल्या. तो जो मेडिकल स्टोअरमधला मुलगा दाखवलाय तो सर्वांच्या वतीने भाषण करत होता.

त्यानंतर सर्वांनी प्रेक्षकांसोबत गप्पा, फोटो इ इ केले.

तेव्हा दुर्दैवाने मला असे लक्षात आले की त्या अप्सरेचा लूक अत्यंत सामान्य आहे. तरुण असूनही काही एजिंग लाईन्स असाव्यात तसा टच अप केलेला चेहरा दिसत होता. एकूण मत अगदी वाईट झालं (लुक वाईज)

बाकी ती सावळी मुलगी खूपच उत्साही, हसरी आणि स्मार्ट दिसत होती. सुंदर तर होतीच. म्हणून ती जास्त आवडली.

बुर्जी पाववाल्याचे पात्र (ध्यान) जे काही घेतले आहे त्याच्याशी मनवा नाईकचं जुळलेलं दाखवणे म्हणजे एकास एक जोड्या जुळवा या प्रश्नात प्रत्येक जोडी तिथल्या तिथ्थे अलिबागेत उपलब्ध नगांतूनच जुळली पाहिजे आणि कोणीही पात्र जोडीअभावी "वाया" जाता कामा नये. अशा हट्टाचा अतिरेक वाटला.

मेडिकलवाल्याच्या त्या कविता (ज्या ऐकून ती फसवल्याचा फील आलेली त्याची हिरॉईनही अचानक परत त्याच्याच प्रेमात पडते,) त्या तर अशा पुळकावणी आहेत की ज्याचे नाव ते.

पण चेहरे फ्रेश आणि कुठेही कंटाळा येऊ नये अशी वातावरणनिर्मिती वगैरेमुळे एकूण बघायला खूप छान वाटले.

गाणेही चांगले वाटले..

भरत जाधवचा तो नेहमीचा बावळट अभिनय नसून वेगळाच किंचित गंभीर रोल असल्याने खूपच सुखद.

पराचे परिक्षणही एकदम योग्य आणि हवे ते पॉईंट दाखवणारे.

असंय होय, आम्ही काही अप्सरेला पाहिली नाही अजून त्यामुळे ती आमच्या साठी अप्सराच !! ;)
दृष्टिआड सृष्टी दुसरं काय :D

अहो हिरोंमध्ये तो बघण्यासारखा होता...

हिरवीणी सर्व छान होत्या

अवलिया's picture

11 Jan 2011 - 1:01 pm | अवलिया

बघतो रे या विकांताला....

इन्द्र्राज पवार's picture

11 Jan 2011 - 1:03 pm | इन्द्र्राज पवार

"....तरुणाईचा प्रयत्न म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहिल्यास हा नक्की आवडून जाईल...."

~ प.रां.च्या परीक्षणातील हे वाक्य खास आहे. मराठी चित्रपटसृष्टीला असा 'फ्रेशनेस' देणार्‍या कुठल्याही प्रयत्नाचे जर अशारितीने स्वागत झाले तर त्या टीमला नव्या निर्मितीसाठी 'टॉनिक' देते. फक्त हे लोक 'प्रत्येक चित्रपट हलकाफुलकाच झाला पाहिजे' असे जे मानतात, त्यामुळे निर्मितीमूल्यांकडे अक्षम्य असे दुर्लक्ष होत जाते. अलिबागचे सौंदर्य न टिपणे याचा उल्लेख आला आहेच, पण 'ध्वनीमुद्रणा' कडे असे काही सेकंड रेटने पाहिले जाते की, दिग्दर्शकाला असे वाटत राहते जणू मराठी प्रेक्षक माझा चित्रपट पाहायला येतो तो "चकचकाट चांगला आहे" म्हणून.

कथानक भारतीय बनावटीचे करणे हेही एक कौशल्य असते, जे श्री.सचित पाटील यानी केले असल्याचे प.रा.परीक्षणावरून भासते. मूळ कथा रॉक हडसन आणि जिना लोलोब्रिगिडा अभिनित आणि अत्यंत गाजलेल्या 'कम सप्टेंबर' वर आधारित आहे हे ओळखतेच.

मुंबई-पुणे शिवाय अन्यत्रही असे चित्रपट रितसर थिएटरमध्येच प्रदर्शित व्हावेत अशी अपेक्षा.

इन्द्रा

सगळं मान्य पण चित्रपट अक्षम्य भीषण आहे. असो.

चिंतामणी's picture

11 Jan 2011 - 1:06 pm | चिंतामणी

पराने मराठी सिनेमाचे केलेले रसग्रहण आवडले.

आणि परा मराठी सिनेमेसुध्दा बघतो हे माहीत झाले. ;)

एक वेळ पहायला आवडेल.. पण हे जमवायच कस? हा प्रशन आहे.

स्वाती दिनेश's picture

11 Jan 2011 - 1:21 pm | स्वाती दिनेश

नवीन चेहरे दिसत आहेत, कादंबरी कदमचे नाव 'आघात' मुळे समजले आहे, विक्रम गोखलेंनी तिचे कौतुक केले आहे. म्हणून तिला पहायची उत्सुकता आहे. अर्थात दोन्ही सिनेमांमध्ये खूप फरक आहेच.
परा, तुझे परिक्षण आवडले.सिनेमा बघेन..
स्वाती

सहज's picture

11 Jan 2011 - 1:24 pm | सहज

नुकताच बघितला पण इतका काही खास वाटला नाही. :-)

'तुला शिकवीन चांगलाच धडा' सिनेमा देखील नुकताच पाहीला तो पण चुपके चुपके (धर्मेंद्र, ओमप्रकाश) वरुन प्रेरित!

विनायक बेलापुरे's picture

11 Jan 2011 - 1:34 pm | विनायक बेलापुरे

येत्या विकांताला पाहू जमले तर ....

पराचे परिक्षण वाचून चित्रपट पहायची इच्छा पुढच्या प्रतिक्रियांमुळे मेली नाही तर !

टारझन's picture

11 Jan 2011 - 1:52 pm | टारझन

एक च नंबर लेखन ... पेपरात छापुन यायला लागल्यापासुन क्वालिटी लिहायला लागलंय पोरगं :)

छान लिहिल आहेस. आता बघावाच लागेल पिक्चर.

आजपर्यंत मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवलेल्या परा शेठनी चक्क मराठी चित्रपटाचं परिक्षण लिहून त्यात मठ्ठोबा भरत जाधव वर स्तुतीसुमने उधळलीत म्हणजे पिक्चर एकदा पाहायलाच हवा.

मागेच पाहिला होता आपलीमराठी वर. इतका खास वाटला नाही. पण अंमळ कंटाळलेल्या दिवशी टाईमपास म्हणून बरा आहे.

तरुणाईचा प्रयत्न म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहिल्यास हा नक्की आवडून जाईल....

हे खरं. परीक्षण नेहमीप्रमाणे चांगले आहे.

स्वानन्द's picture

11 Jan 2011 - 10:10 pm | स्वानन्द

सहमत.

>>सोनाली कुलकर्णी दिसली आहे छान आणि अभिनयात देखील उत्तम

हे तर अजिबात पटले नाही.

स्वतन्त्र's picture

11 Jan 2011 - 3:09 pm | स्वतन्त्र

हा चित्रपट मला देखील आवडला.एक हलकाफुलका,डोक्याला विशेष ताण न देता पाहावा असाच हा चित्रपट आहे.गाणी तर अप्रतिमच.
अप्सरेच्या चाहत्यांसाठी मेजवानी.;-)

ऋषिकेश's picture

11 Jan 2011 - 3:43 pm | ऋषिकेश

चित्रपट बघितला आहे.. ठिक वाटला होता

मृत्युन्जय's picture

11 Jan 2011 - 5:04 pm | मृत्युन्जय

परीक्षण छान लिहिले आहे. चित्रपटाकडुन मात्र मला न बघताच फारश्या अपेक्षा नाही आहेत.

हा चित्रपट एकदा पाहण्याजोगा आहे. तसा माझ्याकडे स्टॉक मध्ये असल्याने कधीही पुन्हा पाहू शकतो.
कुणाला हवा असल्यास सांगणे.. एखाद्या शेयर साईटवर टाकतो..

- पिंगू

सुहास..'s picture

11 Jan 2011 - 11:11 pm | सुहास..

नेहमी प्रमाने ' इमानदार ' परिक्षण !!

पिक्चर अजुन टाकला नाही !! टाकेन पुण्यात आल्यावर !!

बाकी हॉलीवुड, बॉलीवुड, सॅन्डलवुड, परकीय भाषेतले आणि रजनीचे २०० करोडच बजेट असलेल्या चित्रपट पहाणार्‍यासाठी, केवळ चाळीस एक लाखात बनविलेले हे निव्वल अडीच तासाचे निख्खळ मनोरंजन आवडेल की नाही अशी जरा शंकाच आहे.

ती मन्वा म्हणजे जोधा अकबर मधील जोधाची दासी होय.
तशी दिसायला ती चांगली आहे पण इथे वरील (शेवटचे)चित्रात मेकप फारच भडक वाटतोय.(पांढरा टॉप आणि गुलाबी हेडबॅण्ड मधील) पांढरी फटक दिसतेय.

फारएन्ड's picture

12 Jan 2011 - 5:45 am | फारएन्ड

परीक्षण! बघणार नकीच!

क्षणभर विश्रांती आणि बराच वेळ कंटाळा!! असाच वाटला.

सौं. नी खुपच हट्ट केला म्हणून काही महिन्यापुर्वीच घरी बघीतला. कंटाळून पुढे..पुढे ढकलत अक्षरशः कसाबसा संपवला. ज्याम बोअर झालो होतो.

अलिबागला निसर्गरम्य ठिकाणी गेलात म्हणून सगळ्यांचेच 'जमायला' पाहिजे का? कोणाला तरी कोणाच्यातरी गळ्यात बांधायचे हा नियम असल्यासारखे वाटले सगळे. आणि शेवट तर त्याहून भयानक!!! डोंगर पोखरून उंदीर काढला असे वाटले.

मिहिर's picture

12 Jan 2011 - 3:50 pm | मिहिर

परवा स्टार प्रवाहवर लागलेला तेव्हा थोडा पाहिला. पण फार कंटाळवाणा वाटला म्हणून बदलले चॅनल. बघायची इच्छा झाली नाही.

अरे वा! आज बघूच.
तसंही प्रचंड स्नो स्टॉर्म चालू असल्याने बाहेर जाता येणार नाहीच. दिवस सत्कारणी लावावा. :)