विधाता

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
16 Dec 2010 - 11:58 am

माझा असा पचका बर्‍याच वेळेस होतो. एखादा चित्रपट अचाट आणि अतर्क्य असेल म्हणून रेवडी उडवायला वैचारिक उच्चासनावर बसावे आणि चित्रपट नेमका चांगला निघतो. ह्याबद्दल जवळजवळ तसेच झाले. पण जे काही थोडेफार दिसले ते गोड (किंवा खमंग) मानून घ्यावे.

'विधाता' ला असलाच एक मिळाला म्हणून आधी खवचट हसू घेऊन बघायला बसलो, आणि यातील दिग्गजांच्या अभिनयाने थक्क झालो. संजीवकुमारच्या अनेक नकला नंतर बघितल्यामुळे मूळ अदाकारीच आता जरा 'अती' वाटते पण ती त्याची चूक नाही. शम्मी ही मस्त. पण खरी मजा आणतो दिलीप कुमार. अमिताभच्या अनेक पिक्चर्स प्रमाणे काही काही ठिकाणी अचाट प्रसंगही दिलीप कुमार जबरी उचलतो. उदा: अमरीश पुरीला "हवा मे उडनेवाले जहाज झटके बहुत खाते है" हा आता वरकरणी जड वाटणारा संवाद, पण तो असा दिलाय की आपल्यालाही बघताना काय अमरीश पुरीची खेचलीय असे वाटल्याशिवाय राहात नाही. असे बरेच शॉट आहेत. त्याचे आणि शम्मीचे गाणेही मस्त आहे.

पण विधाताने अगदीच निराशा केली नाही. काही अफलातून प्रसंग आहेत्:

दिलीप कुमार आपल्या नातवाला घेऊन पोलिसांपासून गाडीतून पळून जात असताना त्याची गाडी धडकते आणि तो लहान मुलगा एकदम उडून पडतो ते थेट दिवसातून पाच पैकी एका वेळा नमाज़ पढत असलेल्या संजीव कुमार च्या हातात. हे अबूबाबा नमाज़ पढत असताना रस्त्यावरचे वाहनचालक निर्धास्तपणे गाड्या चालवत असतील, कारण मुले, वस्तू वगैरे गाडीतून उडाल्या तरी कॅच करण्याची खात्री! RTO/DMV वगैरे सुद्धा रस्त्यावर "अबूबाबांची नमाज़ाची वेळ सोडून इतर वेळी सीट बेल्ट लावणे बंधनकारक आहे" वगैरे बोर्ड लावत असतील.

या अबूबाबाने 'पाळल्यामुळे'च कदाचित संजय दत्तला पुढे संजूबाबा म्हणू लागले असतील :-) हा मोठा होतो तो एकदम २-३ कप (चहाचे नव्हे. ते हीरोंना कॉलेज मधे मिळतात ते) घेउनच घरी येतो. यात एक म्हणे "चोरोंको पकडनेका और इमानदारीका" कप असतो. ही स्पर्धा नक्की कशी झाली असावी याचा अंदाज मी लावायचा प्रयत्न केला पण झेपत नाही.

तोपर्यंत बहुधा प्रिन्स चार्ल्स कडून होकार येत नाही म्हणून पद्मिनी कोल्हापुरे याच्या प्रेमात पडते. ही एकदम साधी वगैरे असते. पण मग ती ते "उडीबाबा उडीबाबा" गाणे कसे म्हणणार? म्हणून तिला दारू पाजण्यात येते. (स्वप्नात अशी गाणी दाखवण्याचा शोध नंतर लागला असावा). या गाण्यातील तिचा गेट अप यापेक्षा अचाट आणि अतर्क्य यात दुसरे काहीही नाही.

मधेच अबूबाबा मारला जातो. मग संजूबाबा बदला घ्यायला निघतो. पण तो फक्त रागीट चेहर्‍याने समोर बघत रस्त्याने जात असतो. त्याने मग खुनी बाजूच्या पानपट्टीवर असले तरी कसे दिसणार? म्हणून मग सारिका त्याच्या मदतीला येते. तिचा योग्य उपयोग करून घ्यायचा असल्याने खुन्यांना पकडण्याचे प्लॅन्स समुद्रात ती पोहत असताना करण्यात येतात. ती थेट त्याच्या प्रेमात पडते, पण तो तिला फक्त "अच्छे दोस्त" याच नज़रेने पाहतो, आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन ते सिद्ध करतो व God bless you वगैरे तरूणांच्या तोंडी सहजपणाने येणारी वाक्ये बोलतो. लगेच सारिकाच्या चेहर्‍यावरील seductive भाव जाऊन तेथे "अच्छे दोस्त" ची कळा येते. मग दुसरा हीरो नसल्याने तेव्हाच्या पिक्चर्स मधल्या जगण्या मरण्याच्या नियमा तील पोटनियम 2c (*** नोट खाली बघा) प्रमाणे ती शेवटी कोठेतरी मरणार हे उघड होते.

हिंदी चित्रपटांचा आणखी एक नियम आहे: श्रेयनामावलीत नाव सहज न दिसणारा पण बर्‍यापैकी फेमस कोणी सुरूवातीला दिसला की हा मारण्यासाठी घेतला असणार हे नक्की होते (यात सुरेश ओबेरॉय, सौदागर मधे जॅकी). मग त्याला काहीतरी अचाट साहस करायला लावून मारले जाते. येथे सुरेश ओबेरॉय इन्स्पेक्टर झाल्या झाल्या एकटा अगदी गणवेष सुद्धा न घालता (म्हणजे साधा ड्रेस असतो. हा काही 'सावरिया' नव्हे) एकदम 'जगावर' च्या एरियात घुसतो. नुसते 'जगावर' नाव ऐकून तरी जरा फौज वगैरे घेऊन जायची, तर नाही.

शेवटी एकदा अमरीश पुरी दिलीप कुमारला पकडून लम्बेचौडे संवाद मारत असताना मदन पुरी त्याला 'ये वक्त डॉयलॉग मारनेका नही है" असे ऐकवतो. ही यातील सर्वात समझदार संवाद. पण अमरीश पुरी ऐकत नाही. त्यातून जर आपल्याला त्या जुल्म के ग्रूपचा चेअरमन व्हायचे असेल तर अड्ड्यात ती दिवे लुकलुकणारी मशीन्स काय आहेत, त्याचा उपयोग कशासाठी करतात, त्या मशीन शेजारी एक रहाटासारखे फिरणारे गंमत म्हणून ठेवले आहे का हे सर्व माहिती करून घ्यायला पाहिजे. अमरीश पुरी ते करत नाही आणि मग त्याची गॅंग त्यातून सर्व दिशेला सुटणार्‍या गोळ्या खाते.

असे काही प्रसंग चुकून चांगला चित्रपट बघितल्याची निराशा येऊ देत नाहीत :-)

नोटः जगण्यामरण्याचे नियम. मुख्यतः हीरोसाठी, पण कधीकधी हीरॉईनलाही लागू. आगामी रिव्यूज मधे संदर्भ देता यावा म्हणून येथे देत आहे.

बॅकग्राउंडः हीरोला गोळी लागली आहे किंवा तो पाण्यात पडला किंवा "इन जनरल" गायब झाला आहे.

1 दंडात गोळी: नक्की वाचणार

2 डोक्यात किंवा छातीत गोळी: हिरॉईन जिवंत आहे का यावर ठरू शकेल
2a हिरॉईन आधी मेलेली: मग हा ही मरणार
2b हिरॉईन अजून जिवंत्: मग बहुधा वाचणार
2c तसेच याला मारून इतर कोणी कोणाबरोबर लग्न करावे हा प्रश्न सुटणार आहे: नक्कीच मरणार, डायरेक्ट गोळीने मेला नाही तर ज्याच्या लग्नाचा प्रश्न सुटणार आहे त्याला व्हिलन गोळी घालत असताना "नहीSSSS" म्हणून मधे कडमडणार.

3 नदीत पडणे किंवा अपघात होणे पण पुढे काय झाले ते न दाखवणे: नक्कीच वाचणार आणि नंतर परत येणार
3a यात चित्रपट emotional, "this movie is about relationships" वगैरे असेल तर तो नदीत पडला किंवा अपघात झाला म्हणजे मेलाच असे गृहीत धरून नायिका दुसरे लग्न करणार, आणि ते जरा सेटल होत आहेत म्हणेपर्यंत हा कडमडणार. मग दोन्हीपैकी कोणते लग्न जास्त पुढच्या स्टेज ला गेलेले आहे त्यावर हा की तो मरणार ते ठरणार.

4 कोठेही गोळी, पण अजून व्हिलन जिवंत आहे, थोडा बदला बाकी आहे आणि तो घेणारे अजून कोणी (सहनायक वगैरे) नाही: नक्कीच वाचणार आणि बहुधा बरा व्हायच्या आधीच हॉस्पिटल मधून धावत सुटणार आणि व्हिलन ला "त्यापेक्षा हा ठीक असताना याच्याशी मारामारी परवडली" असे वाटावे इतका बडवणार

5a चित्रपटाच्या शेवटी मेला: पर्मनंट मेला
5b चित्रपटाच्या मधेच मेला अशी शंका: नक्कीच नंतर उगवणार
5c चित्रपटाच्या मधेच मेला आणि जाळलेला किंवा पुरलेला दाखवला: नक्कीच डबल रोल असणार

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

झकास ...
अजुन एक कोणत्या तरी चित्रपटात ... णसिरुद्दीन एका णायिकेवर प्रेम करत असतो .. पण त्याचे वडिल मरता मरता त्याचं लग्न कोणा दुसरी बरोबर लावतात ... तो पण बावळटासारखं तिच्याशी लग्न करतो .. कालांतराने ती मरते .. मग पुन्हा नसिरुद्दिन पहिल्या आयटम बरोबर लग्नाचे बेत रंगवतो :)
युएसबी डिव्हाईसेस चा शोध हिंदी चित्रपटांत सर्वांत आधी आणि फार पुर्वी लागलेला आहे

प्रदीप's picture

16 Dec 2010 - 12:20 pm | प्रदीप

युएसबी डिव्हाईसेस चा शोध हिंदी चित्रपटांत सर्वांत आधी आणि फार पुर्वी लागलेला आहे

:)

मुक्तसुनीत's picture

17 Dec 2010 - 2:08 am | मुक्तसुनीत

बाळ टारुला शिसानविवि.
फारएन्ड चा लेख म्हणजे दिवस उत्तम जायची ग्यारंटी आहे. यांचे नि आमचे समदे घोडे विनमदी. :-)

सागरकदम's picture

25 Nov 2015 - 12:01 am | सागरकदम

कोणतात हो

गणेशा's picture

16 Dec 2010 - 5:58 pm | गणेशा

छान केले आहे वर्णन

स्वैर परी's picture

16 Dec 2010 - 6:31 pm | स्वैर परी

भारी जमलय !

व्हिलन ला "त्यापेक्षा हा ठीक असताना याच्याशी मारामारी परवडली" असे वाटावे इतका बडवणार

हसुन हसुन पुरेवाट झाली!

अजुन एक : मारामारी चे सीन्स! मारणार्याचा हात गालापासुन एक फूट लाम्बुन जरी गेला, तरी मार खाणारा १० फूट लांब जाउन पडतो! राम शेट्टी साहेबाना सलाम!

अजुन एक : मारामारी चे सीन्स! मारणार्याचा हात गालापासुन एक फूट लाम्बुन जरी गेला, तरी मार खाणारा १० फूट लांब जाउन पडतो! राम शेट्टी साहेबाना सलाम!

ह्या पेक्षा , बुक्की मारल्यावर होणारा "अ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅ भिषुम ", "अ‍ॅभिष..अ‍ॅभिष" गोळी झाडल्यावर होणारा , "ढिषक्यांऊऊऊऊ" अप्रतिम असतो :)

- सैल बरी

पैसा's picture

16 Dec 2010 - 7:59 pm | पैसा

हिरोला गोळी लागणे यावरचे संशोधन तर अल्टिमेट आहे!

शिल्पा ब's picture

17 Dec 2010 - 12:06 am | शिल्पा ब

मस्त...

मेघवेडा's picture

17 Dec 2010 - 12:16 am | मेघवेडा

क ह र!!

>> त्या मशीन शेजारी एक रहाटासारखे फिरणारे गंमत म्हणून ठेवले आहे का हे सर्व माहिती करून घ्यायला पाहिजे.

ब्येक्कार!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Dec 2010 - 1:55 am | निनाद मुक्काम प...

टिपिकल बॉलीवूड
तरीही आपण पाहतो
सवय झाली आहे त्याची .विधात्याचा पंचनामा सुरेख
नशीब तुम्ही हा विधाता नाही पहिला .

एकदम खुसखुशीत पंचनामा ;)

हे अबूबाबा नमाज़ पढत असताना रस्त्यावरचे वाहनचालक निर्धास्तपणे गाड्या चालवत असतील, कारण मुले, वस्तू वगैरे गाडीतून उडाल्या तरी कॅच करण्याची खात्री!
लै भारी... लै भारी. :) :)

पोटनियम पण येकदम झकास.

अजून येउद्या.

रन्गराव's picture

18 Dec 2010 - 3:33 pm | रन्गराव

लई भारी!