कासाराचा गोईंदा

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
15 Dec 2010 - 9:06 am

काल पुण्याहून अचानक गज्याचा फोन आला आणि मी दहा बारा वर्षे मागे गेलो. गज्या म्हणजे आमच्या गोविंदकाकाचा मुलगा. हा गोविंदाकाका आमचा पोरासोरांचा गोविंदकाका असला तरी अख्ख्या पंचक्रोशीत त्याला कासाराचा गोईंदा हे एकच नाव होतं. तो आमच्या लहानशा गावात राहून चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू (स्नो!) असल्या वस्तू विकायचा धंदा करायचा. हा धंदा करण्याची त्याची रीतही त्याच्यासारखीच जगावेगळी. तो हे सामान वाहून नेण्यासाठी घोडा वापरायचा! सतत फूर्रर्र ऽऽ फूर्रर्रऽऽ करणारा आणि बांधला असेल तिथे लीद टाकून त्या आवारात विचित्र वास पसरवणारा घोडा. त्याच्या कटलरी सामानापेक्षाही गोईंदाच्या घोड्याचं आम्हाला आकर्षण. कारण गोविंदकाकाच प्रत्येक घोडं गुणाचं होतं.

गावातल्या लोकांची सकाळची गडबड सुरू असताना गोईंदाची वेगळीच गडबड सुरू असायची. चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू या सगळ्या वस्तू पडशी नावाच्या दोन गाठोड्यांत भरून त्या दोन्ही पडशा घोड्याच्या पाठीवर दोन्ही बाजूने लादायचा गोईंदाचा कार्यक्रम सकाळीसकाळी ऐन रंगात आलेला असायचा. हे सामान त्या घोड्याच्या पाठीवर लादून गोईंदानं वर मांड ठोकली की ते घोडमं त्याचा गुण दाखवायला सुरूवात करी. ते पुढे न जाता रिव्हर्स गिअरमध्ये त्याला वाट्टेल तितकं मागे, मागे, मागेच जाऊ लागे - मागे पार कुपाट्या आल्या तरी ते घोडं रिव्हर्स गिअर थांबवत नसे. मग गोईंद आणि त्याचे सामान कुपाट्यात पडे! असं दोन-चारदा झाल्यानं गोविंदा ते घोडं नीट चालायला लागेपर्यंत कुणालाही त्या घोड्यामागं एक फोक घेऊन उभं राहायला सांगे. हे काम मी मोठ्या आवडीनं करायचो. घोड्यानं रिव्हर्स गिअर टाकायचा अवकाश की त्याच्या मागच्या पायावर मी फटाफट फोकारे ओढायला सुरूवात करी. मग मात्र ते घोडं पुढे पाऊल टाकी आणि बाजारस्ता आला, की लगेच पुन्हा एकदा घोडं रिव्हर्स गिअरमध्ये यायला लागे! तिथं मात्र घोड्याचे पाय झोडपायला कुणी भेटलं तर ठीक, नाहीतर घोडं सामान आणि गोविंदाला तिकडेच फेकून घरी पळून येई. गोविंदाला सकाळी सकाळी टमरेल घेऊन घराकडे परत येणार्‍या लोकांचे सल्ले ऐकावे लागत.

"अरं काय मर्दा गोईंद, असली ब्याद घेतानाच नीट बघून इकत घेऊ नै व्हय?"
"हाना, हाना - मी बसतो, पुलापस्तोरच हाना.. मग नाई येत ते मागं.."

मी तो संतराम किंवा असाच कुणीतरी धोंड्या त्या घोड्याचे मागचे पाय झोडपून काढी आणि गोविंदकाका एकदाचा मार्गस्थ होई!

गोईंदाही मुलखाचा चिकट होता. चांगले दहावीस हजार रूपये खर्चून अस्सल घोडा विकत आणायचा तर चार-पाच हजारात एखादा असलाच गुणी घोडा तो शोधून आणी. बुलेट गाडी घेण्याइतका पैसा पदरी बाळगत असूनही तो साधी सायकलसुध्दा वापरायचा नाही. पांढरा लेंगा, तसाच पांढरा शर्ट आणि एका डोळ्याभोवतीची कातडी काळी झालेला त्याचा डोळा. आवाज गेंगाणा- चिरका.
घोड्याचा ताप फार वाढला की तो घोडं बदलीत असे. मग नव्या घोड्याचे नवे गुण! असाच माऊली नावाचा एक घोडा त्यानं कुठूनतरी शोधून आणला. या घोड्याची खोड वेगळी होती. या घोड्यासमोर कुणीही अचानक जाऊन उभा राहिला की हे घोडं त्याचे पुढचे दोन पाय समोरच्या माणसाच्या खांद्यावर टाकी. बाजारात गोविंदाच्या दुकानाशेजारी दुकान लावणार्‍या बोकडासारख्या दाढीच्या मणेर्‍याचीही त्या घोड्यानं एकदा अशीच गळाभेट घेतली होती.
"मेरे कू कुछ नही करिंगा वो घोडा, गोईंदऽऽऽ मैने भोत खच्चरोंको ठीक किया है"
असा नाद लावून त्यानं हट्टानं गोविंदाकडून घोड्याचा लगाम मागून घेतला, आणि थोड्यावेळानं गपगार गंगाकडे जाऊन स्वत:चे भरलेले कपडे धूवून आला!
मी गोविंदकाकाच्या खनपटीलाच बसत असे. त्या घोड्याला खरारा कर, त्याला वैरण टाक, दुपारच्या वेळेस जाऊन चोंबाळ असं करून मी त्या घोड्याची मैत्री संपादन केली. काही दिवसांनी गोविंदासमोर माझी आणि घोड्याची मैत्री सिध्द करून दाखवून त्याचा लगामही हस्तगत केला. मला पण त्या घोड्यानं चार-सहा वेळा पाडलं - पण मी गोविंदकाकाला त्याचा पत्ता लागू देत नसे. तो सकाळीसकाळी नवं सामान भरायला तालुक्याला जाताना पाच वाजता बसस्टॅण्डवर घोडा घेऊन यायचा निरोप तो त्याच्या बायकोकडे म्हणजे रमाकाकूकडे ठेवून जाई. तासभर आधीच घोडा घेऊन मी लंपास होई आणि त्या घोड्याच्या तोंडातून फेस येईपर्यंत त्याला गंगेच्या वाळूतून पिदडून काढी. जोपर्यंत व्यापार केला तोपर्यंत गोविंदकाकानं घोडं सोडलं नाही. गोविंदकाका गावातला एक विक्षिप्त माणूस होता. कधीच कुणाला आपण होऊन बोलत नसे. त्याला मित्रही नव्हतेच. आपण भलं, आपला बाजार भला आणि आपलं घोडं भलं असं मानणारा गोईंदा कासार. दररोज देवदर्शन, विठ्ठलमंदीरातला हरिपाठ मात्र चुकवत नसे.
तो बाजार करून येताना रानातून घोड्यासाठी गवत आणत असे. कुणीतरी रस्त्यात विचारी -
"काय गोविंदराव.. कुनीकडून आणलं गवत?"
"लांबून" गोविंदा एकाच शब्दात उत्तर देऊन घोडा पुढे रेटीत असे.
कधीतरी कुणीतरी विचारी -
"किती वाजले गोईंदा?"
"बख्खळ" !!

त्याच्या गावोगावच्या बाजारातल्या गिर्‍हाईकांना मात्र तो पोपटासारखा बोलायचा. बाजार ऐन भरात आलेला असे. गावच्या भोयांनी झणझणीत लसण घातलेला चिवडा, जिलेबी, मासे यांचा बाजारात घमघमाट सुटलेला असे आणि आम्ही पोरं चिंचेच्या पारावरून बाजाराची शोभा पाहात असू. खालीच गोविंदाचा पाल ठोकलेला असायचा -
"केवढ्याला देता बुटाड गोईंद महाराज, पटकन बोला" जेरीला आलेलं गिर्‍हाईक म्हणायचं.
"लास्ट सत्तर रूपै.. नाई.. नाई.. माल बघा ना तुम्ही...पिवर नायलॉनय.." अत्यंत भोळाभाबडा चेहेरा करून, दुसरीकडेच बघत गोईंदकासार उत्तर देई.
"अरे हॅट!! पिवर नायलॉन म्हनं! सा म्हैन्यात चुरा व्हतो ह्याचा.. ह्याचे सत्तर रूपै ??" गिर्‍हाईक चवताळत असे.
"मग किती देता?.. गिर्‍हाईक
"चाळीस रूपये देतो बघ ह्याचे..पटत असंल तर बघ.. नाहीतर पाथरीहून आणतो चांगला बूट उद्या..."
"चाळीसला हे घ्या ना मग.. पस्तीसला घ्या.. पाच कमी करतो पाटील तुमच्यासाठी" दुसरा एक बेक्कार बूट समोर ठेऊन गोविंदा म्हणे!
गिर्‍हाईक पुन्हा एकदा तो नवा बूट खालीवर करून बघे.. दोन्ही बूट समोर ठेऊन पाही आणि सत्तर रूपै वाल्या बुटाचेच पन्नास रूपये द्यायला तयार होई.
"पन्नासमध्ये मला पन आला नाही माल पाटील.. सत्तर लास्ट.. तुम्ही माल बघा की.."
"आता लई झालं तुव्हं.. पंचावन रूपै देतो बघ" असं म्हणून पाटील एकदम उठून धोतर झटकीत असे.
"साठ रूपये देऊन टाका जाऊद्या..." गोविंदा बूट कागदात बांधत म्हणे.
"आता पंचावन घी.. पुढच्या बाजारी पाच रूपै देईन..ओऽ?" गिर्‍हाईक पैसे समोर करी
गोविंदा पट्कन पैसे घेऊन त्याच्या लोखंडी गल्ल्यात टाकून देत असे. वर्षानुवर्ष तीच गिर्‍हाईकं, तीच गावं आणि बाजारातली त्याची तीच ठरलेली जागा आणि दुकानाच्या त्याच निळ्या तंबूखाली गोविंदकासाराचा व्यापार चालत होता. त्यावरच त्यानं एका मुलीचं लग्न केलं - गल्लीच्या हमरस्त्यावर एक नवं पत्र्याचं शेड बांधलं आणि रमाकाकूला वेगळं बांगड्यांचं दुकान काढून दिलं. स्वत:चा घोडा आणि गावोगावचे बाजार मात्र सोडले नाहीत.

मध्ये एका उन्हाळ्यात त्याच्या शेडसमोरच वाडा असणार्‍या मधूआण्णासोबत रमाकाकूच्या काहीतरी कुरबुरी झाल्या. आणि एका रात्री त्यांच्या त्या पत्र्याच्या शेडनंच आतून पेट घेतला. गोविंदकासाराचे सत्तरऐंशी हजार रूपये त्या रात्रीच्या तीन ते साडेसहा वाजेदरम्यान राख झाले !
सरपन्या केशवला दारू पाजवून, पाचशे रूपये देऊन मधूअण्णानंच दुकान पेटवून द्यायला लावलं अशी चार-सहा महिन्यानं अफवा उठली होती.
त्या झटक्यानं त्या कुटूंबानं गावंच सोडलं. रमाकाकू गोविंदकाकाला घेऊन तिच्या माहेरी राहायला गेली. तिथं नवं दुकान टाकलं.
तर त्या गोविंदकाकाचा मुलगा गजा काल फोनवर सांगत होता -
"मी पुण्यात एमबीए करतोय.. हॉस्टेलवर असतो... पप्पा न आई आजोळीच असतात.. पप्पाला दिसत नाही व्यवस्थित आजकाल.."
मी गज्याला काहीच बोललो नाही. फक्त इकडच्यातिकडच्या, पुण्याच्या गप्पा केल्या.

कथाभाषामुक्तकसमाजजीवनमानरेखाटनलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

गवि's picture

15 Dec 2010 - 9:51 am | गवि

काय ती सुंदर बोलीभाषा आणि त्यातही एकदम सातत्य मेंटेन केलेलं..

पुलापस्तोर्..बुटाड..कुपाट्या

सर्व स्थानिक भाषेतले शब्द म्हणजे "ज्वेल्स" आहेत.

लिखाण म्हणजे एकदम ताबडतोब छापण्यासारखं झालंय.. हल्ली तुझं काही आलं की तातडीने वाचावंच याला ऑप्शन राहिलेला नाही.

प्रदीप's picture

16 Dec 2010 - 10:40 am | प्रदीप

म्हणतो. अत्यंत डोळस लिखाण, त्रयस्थपणे जे पाहिले, अनुभवले त्यातून आलेले. त्यामुळे ह्या लिखाणाचा केंद्रबिंदू ज्या व्यक्तिविषयी लिहायचे आहे, त्यावर आहे, स्वतःवर नव्हे!!

सुंदर व्यक्तिचित्रण, 'माणदेशी माणसां'ची आठवण होत आहे, ती केवळ अस्सलपणामुळे, व गावाकडील व्यक्तिच्या चित्रणामुळे. एरव्ही तुमचे लिखाण स्वतंत्र आहे. असेच लिहीत चला (पुढेमागे ह्या लेखांचा संग्रह जरूर प्रकाशित व्हावा, अशी आशा करतो).

अर्धवटराव's picture

15 Dec 2010 - 10:10 am | अर्धवटराव

काय छन लिहीता हो तुम्ही...

अर्धवटराव

नगरीनिरंजन's picture

15 Dec 2010 - 12:30 pm | नगरीनिरंजन

अपेक्षाभंग झाला नाही. सुंदर लेखन. स्मृतीरंजन आणि व्यक्तिचित्रण दोन्हीही उत्कृष्ट!

भाऊ पाटील's picture

15 Dec 2010 - 12:42 pm | भाऊ पाटील

असेच म्हणतो

मितान's picture

15 Dec 2010 - 12:43 pm | मितान

मस्त रंगलाय हा ही लेख ! बोलीभाषा वाचताना वेगवेगळ्या आवाजात 'ऐकू येते' :)

सूड's picture

15 Dec 2010 - 6:54 pm | सूड

+१

रणजित चितळे's picture

15 Dec 2010 - 2:08 pm | रणजित चितळे

छान आहे गोष्ट. गोविंदकाकां बद्दल वाईट वाटले.

गणेशा's picture

15 Dec 2010 - 2:08 pm | गणेशा

मस्त लेख आहे ..
आवडला .. चित्रनिर्मीती करतात हे शब्द

स्वानन्द's picture

15 Dec 2010 - 2:15 pm | स्वानन्द

छान.

क्या बात हे.. यशवंत...
झकास लेख.....

गोविंद काका डोळ्यांसमोर उभा केलास

आळश्यांचा राजा's picture

15 Dec 2010 - 3:03 pm | आळश्यांचा राजा

सुरेख लिखाण!

राजेश घासकडवी's picture

15 Dec 2010 - 3:36 pm | राजेश घासकडवी

अजून येऊ द्यात.

शुचि's picture

15 Dec 2010 - 4:57 pm | शुचि

लेख आबडला

शैलेन्द्र's picture

15 Dec 2010 - 5:20 pm | शैलेन्द्र

खुपच सुंदर...

कासाराचा गोविंदा जसा लिहीला तसाच दिसला...

योगेश सुदाम शिन्दे's picture

15 Dec 2010 - 6:22 pm | योगेश सुदाम शिन्दे

लेख छोटा आहे पण दमदार आहे
एकदम व्यक्ती & वल्ली ची आठवण झाली ...
आवडल

सर्व प्रतिसादकांचे खूपखूप आभार!

मौनी वाचकांचे मौन व्रत सुफल संपूर्ण होवो अशी सर्व सक्रिय सदस्यमात्रांच्या वतीने शुभेच्छा! :)

शैलेन्द्र's picture

15 Dec 2010 - 6:56 pm | शैलेन्द्र

नको तळमळ, नको मळमळ,
अंतरीची खळबळ पुसुन टाका..
प्रतिसादांची तमा कशाला,
अव्यक्त देता व्याकुळ हाका?.

यकु's picture

15 Dec 2010 - 7:24 pm | यकु

ते वाचकमात्रांचेही आभार हे वाक्य बोर झालं होतं खूप.. म्हणून म्हटलं थोडा चिमटा घ्यावा ;-)

पैसा's picture

15 Dec 2010 - 7:48 pm | पैसा

धागा टाकला सक्काळी नऊ वाजता आणि संध्याकाळी ७ ला आभारप्रदर्शन झालं सुद्धा? लोकाना वाचायला तरी थोडा वेळ दे!

असो. व्यक्तिचित्र मात्र फर्मास. लोकमतचं नक्कीच खूप नुकसान झालंय तुझा राजीनामा स्वीकारून.

वा... सुरेख,अप्रतिम,झकास,लयं भारी !!! :)

गोईंदा झकास रंगलाय की वो...

- पिंगू

प्राजु's picture

16 Dec 2010 - 12:34 am | प्राजु

सुरेख लिहिले आहे व्यक्तिचित्रण.
गोईंदकाका चांगला रंगवला आहे.

sneharani's picture

16 Dec 2010 - 10:44 am | sneharani

व्यक्तिचित्रण छान रंगवलय!
मस्त!

रन्गराव's picture

16 Dec 2010 - 11:52 am | रन्गराव

जबरा लिवलय यशवंता ! :)

अवलिया's picture

16 Dec 2010 - 2:19 pm | अवलिया

मस्त लेखन.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Dec 2010 - 9:39 pm | बिपिन कार्यकर्ते

छानच.

मराठे's picture

16 Dec 2010 - 10:38 pm | मराठे

मस्त जमलंय व्यक्तिचित्र!