टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
भगीरथाचे वारस!
पाणी म्हणजेच जीवन असे आपण म्हणतो. पण आपल्याला मिळणारे पाणी कुठून येते? कसे येते? वगैरे प्रश्न आपल्याला कधी पडलेत काय? पडले असल्यास त्याची माहिती आपण कधी मिळवण्याचा प्रयत्न केलाय काय? काही अपवाद सोडल्यास आपण एकूण सगळेच जण त्याबद्दल फारसा विचार कधी करत नाही हेच खरे; मग पाण्याचा अभाव, म्हणून पडणारा दुष्काळ, दुष्काळपीडित लोक, त्यांच्यासाठी रोजगार हमी योजना वगैरे सारखी चालणारी सरकारी कामे वगैरेबाबत आपण कधी विचार करत असू असेही वाटत नाही. ह्याला कारण म्हणजे शहरी भागात न जाणवणारी पाण्याची टंचाई. त्याच्या उलट परिस्थिती खेड्यापाड्यात असते. विशेषतः उन्हाळ्यात, नदी, नाले, ओढे आटलेले असतात आणि मग तिथल्या आया-बायांना मैलोन-मैल पाण्यासाठी भटकावं लागतं; हे सगळे आपण वृत्तपत्रात वाचत असतो पण तरी त्याची म्हणावी तशी धग आपल्याला जाणवत नाही हेच खरे. अधेमधे कधी जलवाहिनी दुरुस्तीसाठी अथवा तलावात पाण्याचा साठा कमी आहे म्हणून काही टक्के पाणी कपात वगैरेची घोषणा महानगरपालिकेकडून झाली की आपल्याला त्याची तीव्रता कळते पण ती तेव्हढ्यापुरतीच असते.
पण ह्या जगात सगळेच काही आपल्यासारखे आत्मकेंद्रित आयुष्य जगणारे नसतात. पाणी सद्या जितक्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे त्याचा जर योग्य पद्धतीने आपण वापर आणि वाटप नाही केले तर भविष्यात पाण्यावरून युद्धे होतील असा गर्भित इशारा काही तज्ञांनी दिलेला आहे हे आपण वाचलेही असेल. काही लोक नुसतेच इशारे देतात, पण काही लोक केवळ इशारे देऊन स्वस्थ बसत नाहीत तर त्यावर तोडगा शोधण्यासाठी अविरत धडपडतात. त्यासाठी आपले आयुष्यही पणाला लावतात. अशाच पैकी एक आहेत 'पाणी पंचायत' चे विलासराव साळुंखे.
मुळातच पाणी पंचायत हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर मग आपल्याला विलासरावांचा सगळा जीवनप्रवास माहिती करून घ्यायला हवा. पाणी अडवा,पाणी जिरवा, पाणी साठवा आणि त्याचे समान वाटप करा... थोडक्यात..पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे असा जणू मंत्रच आहे विलासरावांच्या कार्याचा. वर म्हटल्याप्रमाणे खेड्यापाड्यात उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी परवड पाहिली आणि मग विलासरावांचे विचारचक्र सुरू झाले. त्यातून मग ह्या समस्येचा त्यांनी कसून अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही महाराष्ट्रातला कैक भाग हा दुष्काळग्रस्त आहे. पावसाचे पाणी नदी,नाले -ओढ्यांतून वाहत जाऊन समुद्राला मिळते हे त्याचे एक कारण. दुसरीकडे जिथे हे पाणी मोठमोठ्या धरणात साठवले जाते त्याचे काय होते? ह्या प्रश्नाचा पाठपुरावा केल्यावर लक्षात आले की सरकारी योजनेमुळे ही जी मोठमोठी धरणे बांधली गेली त्याचा जास्तीत जास्त फायदा हा त्या त्या ठिकाणच्या सधन शेतकर्यांनाच झालाय. त्यातूनच भरपूर पाणी लागणारे ऊसासारखे पीक घेतल्यामुळे इतर लोकांपर्यंत पाणी पोचतच नाही. धरणाच्या आसपास असणारे शेतकरीच त्या पाण्याचे लाभार्थी ठरतात आणि इतरजण पाण्याअभावी शेतीच करू शकत नाहीत. म्हणजे एका मर्यादित भागाचा विकास तर बाकी सर्व भकास!
दुष्काळ निवारणार्थ सरकारने हाती घेतलेली पाझर तलाव निर्माण वगैरेसारखी कामे कशी चालतात. त्यात काय फायदे/त्रुटी आहेत वगैरे गोष्टींचा साधकबाधक अभ्यास त्यांनी केला. ह्यातूनच काही धडा घेऊन विलासरावांनी आपली योजना तयार केली. त्यात जमेल तिथे पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे बांध बांधणे,पाणी साठवण्यासाठी तलाव सदृश खड्डे खणणे,जेणेकरून पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडवता येईल असे धोरण आखले. अडवलेले,साठवलेले पाणी मग सर्वांना समान वाटून देणे. कमी पाण्यात होणारी पिके घेणे ... हे सगळे कसे करायचे त्याबद्दल योजना आखल्या. हे सगळे एकट्याच्या बळावर करणे वाटते तितके सोपे नाही म्हणून स्थानिक लोकांशी बोलून,त्यांना ह्या गोष्टीचे महत्त्व पटवून त्यात सहभागी करून घेतले. अर्थात हे काम इतक्या सहजतेने झाले नाही. कारण जे आजवर शक्य झाले नाही असले स्वप्न दाखवणारा हा माणूस खरंच काही करून दाखवू शकेल काय? आणि त्यात त्याचा काय स्वार्थ दडलाय? असे काही प्राथमिक प्रश्न तिथल्या स्थानिकांना पडणे स्वाभाविकच होते. पण अडून राहण्याचा विलासरावांचा स्वभाव नसल्यामुळे जे आले त्यांना बरोबर घेऊन त्यांनी काम सुरू केले. ह्या संबंधीचा पहिला प्रयोग त्यांनी पुरंदर तालुक्यातील नायगाव ह्या दुष्काळी गावामध्ये केला. तो कमालीचा यशस्वी झाला.तिथे निर्माण झालेली हिरवीगार शेती, वनसंपदा पाहून जो तो त्या प्रकल्पाला भेट द्यायला येऊ लागला आणि मग ह्यातून पुढे सुरू झाली पुढची वाटचाल,पुढली चळवळ!
मंडळी हे जितक्या सहजतेने लिहिले तितके सहज झालेले नाही. ही चळवळ पुढे कशी गेली, त्याला किती यश आले,सरकारने ह्या असल्या प्रयोगांना किती आणि कसे साहाय्य केले अथवा नाही. त्या त्या वेळच्या सत्ताधार्यांनी, विशेषतः लोकनेते म्हणून गाजलेल्यांनी कसा/किती प्रतिसाद दिला, लोकांनी ह्या चळवळीला किती उचलून धरले,विरोध केला हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर मुळातूनच "भगीरथाचे वारस" हे वीणा गवाणकर लिखित पाणी पंचायतच्या विलासराव साळुख्यांच्या कार्यासंबंधीचे सचित्र कथन वाचायला हवेय.
पेश्याने विद्युत अभियंता असणारे विलासराव एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते. परंतु आधी काही दिवस आपला व्यवसाय सांभाळून आणि नंतर आपली पत्नी आणि विश्वासू सहकारी यांच्यावर उद्योगाची जबाबदारी सोपवून पूर्णपणे त्यांनी ह्या कार्याला वाहून घेतले आणि हे करतानाच देह ठेवला.त्यांची ही कहाणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे.
भगीरथाचे वारस
लेखिका: वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन,पुणे.
किंमत १६०रू.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

छान
पुस्तकाची ओळख आवडली. पुढचे महायुद्ध गोड्या पाण्यावरुन होऊ शकण्याची शक्यता आहे, असे कुठेतरी मागे वाचनात आले होते. त्या पार्श्वभूमीवर विलासरावांचे कार्य नजरेत भरते.
वीणा गवाणकरांचे 'एक होता कार्व्हर' बहुतेकांनी वाचले असेल किंवा त्याबद्दल ऐकले असेलच. हे पुस्तकही अशाच अनोळखी, नि:स्वार्थी कार्यकर्त्याची ओळख करून देणारे आहे असे हा परिचय वाचून वाटले.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
असेच म्हणतो.
विलासरावांचे कार्य अनमोल.
+१
परीक्षण आवडले.
गोड्या पाण्यावरून युद्ध - ही शक्यता भेडसावते.
क्या बात है !!!
देव साहेब, बाकी काही म्हणा !!! आपण वाचता ती पुस्तके जरा हटकेच असतात असा आमचा अनुभव आहे. पुस्तकाची ओळख आवडली. काही तरी नवीन वाचकांच्या समोर यावं यासाठीचा आपला अट्टाहास सहीच आहे. एका निस्वार्थी कार्यकर्त्याच्या सामाजिक जाणिवेचा परिचय 'भगिरथाच्या वारसा'च्या निमित्ताने आपण करुन दिला, आम्ही आपले काय कौतुक करावे !!!
'वीणा गवाणकर' यांच्या नव्या पुस्तक परिचयाबद्दल आपले आभार !!!
हेच,
देव साहेब, बाकी काही म्हणा !!! आपण वाचता ती पुस्तके जरा हटकेच असतात असा आमचा अनुभव आहे.
हेच म्हणतो...
चांगला परिचय..
तात्या.
ओळख
पुस्तकाची ओळख आवडली
स्वगत-येत्या भारतवारीत पहायचे सिनेमे,वाचायची पुस्तके यांची यादी फुगत चालली आहे.बरोबर आणायच्या तबकड्या आणि पुस्तके किती वजन खाणार आहेत बरं?
स्वाती
जरूर...
श्री. प्रमोदकाका,
आपल्या लिखाणामुळे विचारांना चालना मिळाली. वरील शिफारस केलेले पुस्तक जरूर जरूर वाचेन. त्या नंतर पुन्हा प्रतिक्रिया देईन.
एका चांगल्या पुस्तकाचे नांव सुचविल्याबद्दल धन्यवाद.
माहिती वर्धक लेख
मला वाटते विलासराव साळुंखे या॑ची 'पाणी पंचायत' ही योजना ह्या बद्दल पेपरला लेख येते होते, आणि त्या त्या॑च्या कार्यात त्या॑च्या पत्नी या॑चा देखिल त्या॑ना चा॑गला सहभाग आहे.
छान लेख.....
त्यात जमेल तिथे पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे बांध बांधणे,पाणी साठवण्यासाठी तलाव सदृश खड्डे खणणे,जेणेकरून पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडवता येईल असे धोरण आखले. अडवलेले,साठवलेले पाणी मग सर्वांना समान वाटून देणे
विलासरावांचे कार्य हे बहुमोल आहे.....
(अवांतर :--आपल्या लोकांना फक्त बोअरवेल खोदणेच माहित आहे.....)
(पाणी हेच जीवन ) असे मानणारा.....
मदनबाण
उत्तम पुस्तक परिचय!
श्री. प्रमोदकाका,
हे पुस्तक वाचण्याचा योग अजून आला नाही. पण विलासरावांबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्द्ल पूर्वीपासून आदर आणि आपुलकी आहे. स्वतःचा उत्तम चाललेला व्यवसाय सोडून या कार्याला वाहून घेण्याचा त्यांचा त्याग खरोखरच वंदनीय!
विशेषतः स्थानिक पातळीवर पाणी जिरवून त्यापासून स्थानिक जनतेला लाभ होऊ शकतो. प्रत्येक वेळी सरकारवर वा सरकारी योजनांवर अवलंबून रहायची गरज नाही. आपणच आपली समस्या सोडवू शकतो ही मानसिकता ग्रामीण भागात रुजवण्याचे कार्य किती मोलाचे आहे! जर तीव्र इच्छा असेल तर आपणच मार्ग काढू शकतो हे जर समाजाच्या अंगी बाणलं तर त्या समाजाला प्रगतीपासून कोणीच रोखू शकत नाही.
असो. असेच चांगल्या पुस्तकांचे परिचय देत चला. आम्ही लिस्ट करून ठेवू आणि पुढच्या खेपेला कोठावळ्यांच्या खनपटीला बसून ती पुस्तके इथे घेऊन येऊ...
आपला,
पिवळा डांबिस
पाणी - "पंचाईत"
विलासराव साळूंख्यांबद्दल आणि विणा गवाणकरांच्या लेखनाबद्दल (एक होता कार्व्हर) माहीती आहे. पण हे पुस्तक नव्याने कळले. ग्रंथपरीचयाबद्दल धन्यवाद!
थोडे अवांतरः
जेफरी सॅक्स (Jeffrey Sachs) ह्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या मान्यवर प्राध्यापकाचे "कॉमनवेल्थ" नावाचे पुस्तक वाचले. सद्य स्थिती आणि जागतीक विकास (विशेष करून अप्रगत, विकसनशील राष्ट्रांबद्दल) आणि पर्यावरणीय बदलांचे परीणाम या वरील खूपच प्रभावी असे हे पुस्तक वाटले. त्यात जाता जाता भारताबद्दल एकाठिकाणी उल्लेख होता. भारताने हरीतक्रांती केली त्याबद्दल चांगले लिहीले होते पण त्यात पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन न केल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कशी कमी झाली आणि त्यामुळे होणारे अजून परीणाम काय आहेत वगैरे. विलासराव साळूंख्यांसारख्या माणसांनी हे वेळीच हेरून त्याचे दुष्परीणाम कमी करायचा प्रयत्न केला आणि स्वतःचे द्रष्टेपण दाखवले.
ऐकीव पण लॉजिकल वाटलेले : गेल्या विधानसभा निवडणूकीच्या सुमारास पण निवडणूका जाहीर होण्या आधी बाळासाहेबांनी युतीचे सरकार आल्यास शेतकर्यांना वीज फूकट वाटू म्हणून सांगीतले. लगेच घाबरून घाईगडबडीत सुशीलकुमार शिंद्यांनी ती तशी फुकट देऊन पण टाकली! परीणाम काय झाला? शेतकरी वीजेचे मोल विसरले, पाण्याचा उपसा कसाही काढू लागले, परीणामी वीज टंचाई, भूगर्भातील पाण्याची पातळी (स्थानीक पातळीवर) कमी, शेतजमिनीत जास्त पाण्याने पिकांवर परीणाम...
धन्यवाद मंडळी.
२३ एप्रिल २००२ साली ह्या अवलियाचे निधन झाले ते हृदयविकाराने. सामान्य शेतकर्यांना जे उपचार झेपत नाहीत ते मीही करून घेणार नाही ह्या हट्टापायी शेवटची काही वर्षे त्यांनी हा रोग अंगावर काढला. सामान्य शेतकरी सुखी व्हावा हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जगले. त्यांच्या छोटया छोट्या गोष्टीतही ते पाणी वाचवण्याबद्दल किती सखोल विचार करत हे काही उदाहरणांमधून दिसून येते. चहा पितानाही साखर फक्त अर्धा चमचा वापरत कारण एक चमचा साखर बनवण्यासाठी दोन बादल्या पाणी लागतं असं ते म्हणत!
दूध-भात,पुरणपोळी,बेसन लाडू अशा प्रिय असणार्या गोष्टींचाही त्यांनी त्याग केला तो निव्वळ भाताला आणि उसाला जास्त पाणी वापरावे लागते म्हणून. त्यासाठी त्यांनी ज्वारीच्या भाकरीचा पुरस्कार केला आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला दारात उगवलेले मिरच्या-कोथिंबीरीचा ठेचा ते वापरत.
इतके करूनही ते थांबले नाहीत तर ज्वारीच्या भाकरीचा प्रसार त्यांनी आपल्या चळवळीतून केला.
भाकरी माणसाच्या पोटात गेल्यावर पुढे काय?विषय तिथेच कसा संपेल.
एका माणसाला वर्षाकाठी २०० किलोग्रॅम ज्वारी,साठ किलोग्रॅम भाजीपाला आणि चाळीस किलोग्रॅम कडधान्य लागतं असा हिशेब त्यांनी आपल्या निरीक्षणातून,अभ्यासातून मांडलेला होता.एवढं धान्य पिकवण्यासाठी ३गुंठे जमीनपुरे.मग तिच्यासाठी खत हवं. ते विकत कशाला आणायचं?
एका माणसाची एका दिवसाची एकूण विष्ठा ४०० ग्रॅम, त्यात १००मिली मानवी मूत्र आणि ५०० ग्रॅम माती मिसळली की, सुमारे एक किलोग्रॅम खत रोज तयार होऊ शकतं. म्हणजे वर्षाकाठी अंदाजे ३०० किलो नक्कीच.
ही विष्ठा वापरता येण्यासाठी त्यांनी एक खास शौचकूप तयार केला, यात मानवी मूत्र आणि विष्ठा यांची अलग विभागणी होती. विष्ठा वेगळी काढून ती माती,पालापाचोळा इ.च्या साहाय्यानं ते एका बादलीत साठवत. खळदमधील त्यांच्या राहत्या खोलीच्या कोपर्यात ती बादली झाकून ठेवलेली असे. त्याची दूर्गंधी अजिबात येत नसल्यानं, ते सांगेपर्यंत दुसर्याला त्या बादलीविषयी समजत नसे.
या शौचकूपाविषयी आणि नंतर मुबलक युरिया खत देणार्या खास मुतारीविषयी त्यांनी 'पाणी पंचायत' पत्रिकेत लेख लिहिले. खळद आणि नायगावात त्यांची त्यांनी उभारणीही केली.
विलासरावांच्या ह्या सर्व कार्यात त्यांची पत्नी कल्पनाताई ह्यांचेही भरीव योगदान आहे. ह्या जगावेगळ्या अवलियाला सांभाळणे,समजून घेणे आणि संसाराची जबाबदारी कौशल्याने पार पाडत असतानाही त्याच्या कार्यात मदत करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. विलासरावांच्या मागे आजही कल्पनाताई ह्या कार्यात सक्रिय आहेत. ह्या लोकोत्तर जोडप्याला माझा सलाम.
मंडळी हे पुस्तक नक्की वाचा त्याशिवाय विलासराव ही काय चीज होती ते कळणार नाही. आपण त्यांच्या सगळ्याच गोष्टींचे अनुकरण करणार नसलो तरी आपापल्या पातळीवर जे शक्य होईल ते करून,म्हणजे रोजच्या आपल्या जीवनात पाण्याचा वापर सद्या आहे त्यापेक्षा काही अंशाने जरी कमी केला तरी भरपूर पाणी वाचेल.
वीणा गवाणकरांनी ह्या चळवळीचा आणि एकूणच विलारावांच्या कार्यप्रणालीचा साकल्याने अभ्यास करून हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यांनाही माझा सलाम.
सर्व व्यक्त अव्यक्त वाचकांचे मनःपूर्वक आधार.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
वाचलं.
आज सकाळी घेतलं. काही वेळापूर्वी वाचून झालं. हलके-फुलके वाचन करण्याची सवय असल्यामुळे वाचनाला वेग यायला वेळ लागला पण हातात घेतल्यावर अखंड पाठ झाला.एक चांगले पुस्तक वाचायचे राहून गेले अशी रुखरुख आता लागणार नाही पण एक थोर माणूस आता नाही याची हुरहुर कायमची राहील्.शहरात राह्यला असल्यामूळे पेपर मध्ये पाणी पंचायती ची बातमी कायम टाळत राह्यलो. पाणी टंचाई आता उंबरठ्यावर येउन उभी आहे आणि शहरात एकही विलासराव दिसत नाही. जे आहेत ते विलासीराव आहेत. साळुंखे साहेबासाठी रडू पण शकत नाही. डोळ्यातले पाणी वाया गेलेले त्यांना आवडणार नाही.देव साहेबांचे आभार .देव आये दुरुस्त आये.
पुस्तक वाचून झाले आहे. हवे असल्यास व्यनि टाकावा. टपालाने पाठवीन.
नक्कीच
नक्कीच वाचेन. शोधावयास पाहिजे हे पुस्तक आता.
प्रमोदकाका
प्रमोदकाका,
उत्तम पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद...
वाचणारच लगेच,,..