क्ष-किरणांच्या शोधाचा वाढदिवस

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
8 Nov 2010 - 5:50 pm

रोजच्याप्रमाणे आजचा दिवसही गुगलशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. इंटरनेट वापरायचं आहे, इंटरनेटवर काही कुठेतरी वाचायचं आहे आणि गुगल वापरलं नाही हे माझ्यासाठी जवळजवळ अशक्य असतं. तसंच आजही काहीतरी धुंडाळताना 'सर्च रिझल्ट्स'च्या डाव्या बाजूला वर गुगलचा चमत्कारिक लोगो दिसला. आज क्ष-किरणांच्या शोधाचा ११५वा वाढदिवस आहे हे गुगलबाबाकडून समजलं.

क्ष-किरण सर्वप्रथम शोधले ते जर्मन शास्त्रज्ञ विल्हेम कॉनराद राँतजेन याने, आजचीच तारीख, साल १८९५. आणि या शोधासाठी त्याला नोबेल पुरस्काराची फार वर्ष वाट पहावी लागली नाही, १९०१ साली राँतजेनही नोबेल लॉरिएट झाला.

क्ष-किरणही विद्युतचुंबकीय लहरींपैकी एका प्रकारच्या लहरी आहेत, दृष्य प्रकाशाचा अधिक उर्जावाला भाऊ (का बहिण?) आहेत अतिनील किरण (ultraviolet rays), क्ष-किरण (X-rays), आणि गामा किरण (Gamma rays). दृष्य प्रकाशाची तरंगलांबी ४०० (निळा) ते ७०० (लाल) नॅनोमीटर्सच्यामधे असते तर क्ष-किरणांची ०.०१ ते १० नॅनोमीटर्स. १ नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा १००००००००० (एकावर नऊ शून्य) एवढा भाग, किंवा १० चा -९ वा घात किंवा ०.०००००००००१.

क्ष-किरणांचा उपयोग वेगळा सांगायची गरज नसावीच. हाडं मोडली आहेत का नाहीत, कुठे, कितपत दुखापत आहे हे शोधण्यासाठी सर्रास क्ष-किरण वापरले जातात. शिवाय CT scan, MRI इ. साठीही क्ष-किरण वापरले जातात. प्रत्यक्ष रुग्णोपचारासाठीही क्ष-किरणांचा उपयोग होतो तो कर्करोगाच्या उपचारांपैकी रेडीओथेरपीमधे; या पद्धतीसाठी तपासणीपेक्षाही जास्त उर्जा असणारे क्ष-किरण वापरले जातात. पण चुकीच्या प्रमाणात मिळालेला क्ष-किरणांचा डोस कर्करोगास निमंत्रण ठरू शकतो.

अवकाशस्थ वस्तूंकडून येणारे क्ष-किरण आपल्या वातावरणात शोषले जातात आणि आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाहीत. अवकाशस्थ वस्तूंचा क्ष-किरणांमधे अभ्यास करण्यासाठी विशेष उपग्रह सोडावे लागतात, असेच दोन उपग्रह किंवा दुर्बिणी आहेत, रोझॅट आणि चंद्रा. या दुर्बिणींनी घेतलेल्या चित्रांमधून दीर्घिकांच्या समूहातल्या तप्त वायूचा, गॅमा रे बर्स्ट्स, एका तार्‍याने दुसर्‍या तार्‍याला गिळणे इ. अवकाशस्थ घटनांचा अभ्यास शक्य झाला.

प्रगत अशा क्ष-किरण दुर्बिणीला 'चंद्रा' हे नाव सुब्रमण्यन चंद्रशेखर या दुसर्‍या नोबेल मानकर्‍यावरून दिलं गेलं आहे. चंद्राने घेतलेली काही चित्रं (नासाच्या वेबसाईटवरून):

3C 186 नावाच्या क्वेझारभोवती असणार्‍या दीर्घिकासमूहातला निळ्या रंगात दाखवलेला हा तप्त वायू क्ष-किरणांमधेच दिसतो.


दोन दीर्घिकासमूहांच्या एकत्र येणं ही विश्वातला महास्फोटाखालोखालचा सगळ्यात जास्त उर्जा-उत्सर्जन करणारी घटना आहे. वरच्या चित्रात लाल आणि निळ्या रंगात क्ष-किरणांत घेतलेलं चित्र दिसत आहे, तर पिवळट रंगात दृष्य प्रकाशात घेतलेलं चित्र दिसत आहे. या अतिप्रचंड दीर्घिका समूहाला 1E 0657-56 किंवा 'बुलेट क्लस्टर' असं नाव आहे.

माहितीचा स्रोत: अर्थातच विकीपिडीया आणि पुन्हा एकदा गुगल-इमेज-सर्चवरून नासाचं संकेतस्थळ.

विज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

सहज's picture

8 Nov 2010 - 6:01 pm | सहज

चांगली माहीती
- होमर हेट्स एक्स रे टेक्नोलॉजी!

(नुकताच रेडिओलॉजी क्लिनिकला भेट देउन आलेला) सहज

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2010 - 6:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगली माहिती.

-दिलीप बिरुटे

सूर्य's picture

8 Nov 2010 - 7:55 pm | सूर्य

माहितीपुर्ण लेख.

- सूर्य

प्रशु's picture

9 Nov 2010 - 12:11 am | प्रशु

+१

मेघवेडा's picture

9 Nov 2010 - 1:55 am | मेघवेडा

माहितीपूर्ण लेख.

विलासराव's picture

8 Nov 2010 - 6:02 pm | विलासराव

विल्हेम कॉनराद राँतजेन यांना धन्यवाद.
या लेखासाठी आपलेही आभार.
लेख आवडला.

रोएंतजेनने पहिला एक्स रे त्याच्या बायकोच्या हाताचा काढला होता.. तिच्या बोटात वेडिंग रिंग होती... ( बहुतेक वेडिंग रिंगचा एक्स रे काढला की लग्नाबाबत काही निदान करता येते का, हे त्याला बघायचे असणार.. ) :) एक्स रे फिल्मला त्यामुळे रोएन्टजेनोग्राम असेही म्हणतात...

http://formaementis.files.wordpress.com/2008/11/anna_berthe_roentgen.gif हा तो पहिला एक्स रे. त्यात बोटावर लग्नाची 'गाठ' दिसत आहे.. :)

स्वानन्द's picture

8 Nov 2010 - 6:38 pm | स्वानन्द

>>शिवाय CT scan, MRI इ. साठीही क्ष-किरण वापरले जातात

MRI मध्ये क्ष किरण नव्हे तर चुंबकीय क्षेत्राचा वापर करण्यात येतो. म्हणूनच याला CT scan पेक्षा जास्त सुरक्षित तपासणी पद्धत मानले जाते.

अवांतरः क्ष किरण हे आपल्या त्वचेतून आरपार जातात परंतु हाडासारख्या घन पदार्थातून पूर्णपणे आरपार जात नाहीत.
हेच तत्व हाडाचे चित्र काढण्यासाठी वापरले जाते. परंतु याच गुणधर्मामुळे क्ष किरण तपासणीमध्ये सांध्याना किंवा स्नायूंना किंवा तत्सम soft tissues ना झालेली इजा दिसून येत नाही. अशा प्रकारच्या इजा शोधण्यासाठी sonography, MRI scan अशा पद्धतींचा वापर होतो.

गर्भवती महीलांकरता क्ष किरणे धोकादायक असतात वाटतं. कारण दातांचा वगैरे एक्स्-रे काढायचा असतो तेव्हा डॉक्टर विचारतात किंवा आधी भरून दिलेल्या माहीतीमध्ये तो प्रश्न विचारलेला असतो.

स्वाती दिनेश's picture

8 Nov 2010 - 6:41 pm | स्वाती दिनेश

चांगली माहिती अदिती,
स्वाती

गांधीवादी's picture

8 Nov 2010 - 7:22 pm | गांधीवादी

छान माहिती.
भविष्यात मोबाईल मध्ये सुद्धा 'क्ष' किरणांचा वापर सुरु होणार आहे. कदाचित त्याने आपण भिंती पलीकडे पाहू शकू.

सध्या आयफोन मध्ये हे अ‍ॅप आहे पण ते एक्सरे घेत नाही. मोबाईलमध्ये एक्सरे घेण्याची सुविधा येइल असे मला वाटत नाही.

रेवती's picture

8 Nov 2010 - 7:43 pm | रेवती

छान माहिती!.
लेख आवडला.

बेसनलाडू's picture

9 Nov 2010 - 12:08 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

पैसा's picture

8 Nov 2010 - 7:54 pm | पैसा

लेख आवडला. एवढा महत्त्वाचा शोध ११५ वर्षांपूर्वीचा आहे, हे त्यातही महत्त्वाचं. हा शोध लावताना रॉन्टजेनला किती अभ्यास करावा लागला असेल, तेव्हाच्या अपुर्‍या साधनांनिशी त्याने कसं काम केलं असेल, याबद्दल कोणी लिहील का? (विशेषतः अदिती)

अविनाशकुलकर्णी's picture

8 Nov 2010 - 9:16 pm | अविनाशकुलकर्णी

खुप पुर्वि क्ष करण असलेले चश्म्यांची जाहिरात वाचनात आली होति..
ते चष्मे लावुन एखाद्या व्यक्ति कडे पाहिले कि कपडे असले तरी ति व्यक्ति नैसर्गिक अवस्थेत असल्या सारखी दिसते असे जाहिरात दाराचे म्हणणे होते..

विकास's picture

8 Nov 2010 - 9:39 pm | विकास

लेख एकदम आवडला.. :)

प्रभो's picture

9 Nov 2010 - 12:16 am | प्रभो

मस्त माहिती!!

शहराजाद's picture

9 Nov 2010 - 1:59 am | शहराजाद

उत्तम, माहितीपूर्ण लेख.

राजेश घासकडवी's picture

9 Nov 2010 - 10:07 am | राजेश घासकडवी

चांगली माहिती. दीर्घिका समूह म्हणजे अनेक ग्यालेक्स्यांचा समूह असं गृहीत धरतो.

चित्रातले लाल निळे रंग हे केवळ व्हिज्युअल इफेक्टसाठी आहेत की रेड शिफ्ट - ब्लू शिफ्ट दाखवतात? (नसावेत - तप्त वायू म्हटलं आहे...)

बाकी तुम्ही रेडिओ अॅस्ट्रॉनॉमीवाले आणि ते क्ष किरणवाले म्हणजे 'वर्णव्यवस्थेच्या' दोन टोकांचे झाले की! तुमच्यात शिवाशीव वगैरे पाळतात का? (ह. घे.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2010 - 10:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> दीर्घिका समूह म्हणजे अनेक ग्यालेक्स्यांचा समूह असं गृहीत धरतो. <<
आता फुल्टॉस आलाच आहे, तर पट्टा फिरवून घेते! ;-)
ग्यालेक्स्यांचे छोटे समूह (groups) आणि मोठे समूह (clusters) असतात. इथला उल्लेख clustersचा आहे. दोन्हीतला फरक म्हणे groups मधे साधारण ४-५ दीर्घिका असतात आणि clusters मधे यापेक्षा जास्त, अगदी १० पासून कितीही जास्त दीर्घिका असू शकतात. विस्तारानेही clusters खूप मोठी असतात आणि clusters मधे हा X-ray bright वायू असतो.

>> चित्रातले लाल निळे रंग हे केवळ व्हिज्युअल इफेक्टसाठी आहेत की रेड शिफ्ट - ब्लू शिफ्ट दाखवतात? (नसावेत - तप्त वायू म्हटलं आहे...) <<
योग्य प्रश्न! हा रेड्/ब्लू शिफ्ट नसून वायूचं तापमान दाखवण्यासाठी रंग वापरला आहे. निळा रंग = हार्ड एक्स रेज (जास्त उर्जेचे, तरंगलांबी ०.१ - ०.०१ नॅनोमीटर) आणि लाल रंग = सॉफ्ट एक्स रेज (कमी उर्जा, तरंगलांबी १० - ०.१ नॅनोमीटर) अशी विभागणी आहे.

>> रेडिओ अॅस्ट्रॉनॉमीवाले आणि ते क्ष किरणवाले म्हणजे 'वर्णव्यवस्थेच्या' दोन टोकांचे झाले की! <<
:-D

दोन टोकं कुठे? गामा रे दुसरं टोक झालं. गुर्जींची चूक काढली. पण बर्‍यापैकी दोन टोकं झालीच. गंमत म्हणजे मायक्रोक्वेझार्स, दीर्घिकांच्या clusters च्या अभ्यासासाठी अगदी कमी वारंवारितेच्या रेडीओ लहरी आणि क्ष किरणांचाच उपयोग होतो.

स्वानंद, माझ्या माहितीतली चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. आणि शानबा यांनी माहितीपूर्ण लेख टाकल्याबद्दल त्यांचेही आभार.