उद ग अम्बे उद ! उद !!

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
14 Oct 2010 - 6:34 pm

नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवांनी त्यांच्या सेनेला दिलेलं पृथ्वीच राज्य. माझ्या घरी घट बसवला जायचा, अजूनही बसवला जातो. लहाणपणी ती कापसाची वळलेली नऊ मुठ वात, खास नवरात्रासाठी काढलेला लामण दिवा, या साऱ्याच फार अप्रूप वाटायचं. घटस्थापणे दिवशी संध्याकाळी देवघरात , (आम्ही देव खोली म्हणतो, ही एक छोटीशी देवांची खोली आहे) सारवलेल्या जमिनीवर पत्रावळ मांडली जायची. त्या पत्रावळीवर माती चा छोटासा ढीग रचला जायचा. त्या मातीत वेगवेगळी धान्य पेरून वर पाण्याचा मातीचा घट रोवायचा. ही घट स्थापना. मग वरच्या खुंटीला रोज एक झेंडूच्या फुलांची माला टांगून आज कितवी माळ हे ध्यानात ठेवायचं.
देवघर कस वेगळंच भासायच अश्या वेळी. तो भला थोरला भैरोबाचा पितळी मुखवटा, त्याचे डोळे, त्यावेळच्या निरागस मनाला भिववूनही टाकायचा अन त्याच्या देवपणान आधार ही वाटायचा. देव म्हणून त्याचा आधार वाटावा, की देव असं नाही केल तर शिक्षा करतो, देवाच व्यवस्थित नाही केल तर काही खर नाही, काहीना काही प्रत्यय येतो अश्या गोष्टी ऐकून त्याचा धाक वाटावा? असा काहीसा मनाचा गोंधळ उडायचा निदान माझा तरी.
पाचव्या माळेला सगळ्यांच्या घरी कडाकण्या बनत. रवा मैद्याचा साखर तूप घालून बनवलेला हा पदार्थ. पापडा सारखी पातळ पात लाटून तुपात तळायची की झाली कडाकणी तयार! पण मग त्यातही मजा असायची. या पीठाचे वेगवेगळे आकार केले जायचे, म्हणजे लाटलेल्या पातीवर हात ठेवून पितळी कोरान्यान हाताचा आकार काढला जायचा, पानाचा आकार, चांदणी,स्वस्तिक अन चक्क पिठाची लांबट लोळी करून तीन पेडी वेणी तयार व्हायची. जे काही बनेल ते तळल जायचं. एव्हढा एकचं पदार्थ ज्या मध्ये आम्ही मनसोक्त हात बरबटून खेळल तरी रागवल नाही जायचं. मग या सारया कलाकुसरीची एक माळ करून तीही देवघरात टांगली जायची.
या माळेच्या साथीन आणखी एक माळ सुरु असायची 'हादग्याची'. तुम्ही ज्याला भोंडला म्हणता त्याला आम्ही रानची माणस 'हादगा' म्हणतो.आमच नात 'हस्त' नक्षत्राशी म्हणून हादगा. तर पहिल्या दिवशी फक्त एक गाण, मग दुसऱ्या दिवशी दोन असं करत नवव्या दिवशी नऊ गाणी म्हंटली जायची. छोटी मोठी खिरापत वाटली जायची.
नवमीला शस्त्र पूजा. घराच्या भिंतीत एक माणूस चालत आत जाईल अश्या कपाटातून , तलवारी, भाले, जंबिया , दांडपट्टा, अन दोघं दोघं मिळून उचलाव्या लागणाऱ्या ढाली! अशी शस्त्र बाहेर काढून, स्वच्छ केली जायची. ढाली भरपूर तेल घालून अन वरचे पितळी छाप उजळवून घ्यायच्या. तलवारी पण अश्याच स्वच्छ करून हे सार सतरंजीवर मांडायचं. त्यात मग आमची पुस्तक पण ठेवली जायची. गुलाल उधळून मग या शस्त्रांना कोंबडा कापला जायचा.
दसऱ्या दिवशी मात्र सकाळी पोळ्या अन दुपारी बळी पडून संध्याकाळी ते मटण असायचं.
संध्याकाळी एकच गडबड उडायची. सारेजण शिलंगण करून मग थोड्या अंतरावरच्या निर्जन माळावर असलेल्या भैरीच्या देवळाला जायला निघत. गावातून दोन चार बैल गाड्या जुंपून ही मंडळी तुफान उधळत रात्री मंदिर गाठत. वाटेवर अजूनही असलेला चिख्खल, बाजूच्या शिवारातून उचललेल्या कोवळ्या भुईमुगाचे वेल, अन तशीच दुध कोवळी कणस, हे सार 'सोन' म्हणून वाटलं जायचं. घरात येणारा प्रत्येक जण चिखलाचे पाय घेऊनच घरात शिरत असे. लहाण थोर सारे एकमेकांना थोडीफार शमीची पान नाहीतर, हे बाकीचच कौतूकान देत घेत असत. शेवटी भावनेला महत्व नाही का?
रात्री घट हलवला जायचा.त्या घटावर जे धान्य जास्त जोमान उगवलं असेल ते पिक त्या वर्षी जास्त होणार असं समजून चर्चा व्हायची.मग तो घट अन त्या गडबडीत केलेला मोदकांचा नैवेद्य खाऊन आमचा गणपती असं दुहेरी विसर्जन नदीवरच्या अंधारात पार पडे. माझ्या घरी गणपती दसऱ्याच सोन घेऊन जातो.
पुढे कोल्हापुरात अम्बाबाईच्या च्या रोषणाइन अन पाजळलेल्या शिखरांनी नवरात्र साजर होऊ लागल. पंचमीला कडाकन्या ऐवजी 'ललित पंचमी ' म्हणून टेंबला बाई च्या जत्रेत जाऊन धक्के खाण सुरु झालं.
साधारण सहा वर्षापूर्वी मुंबईतून हलण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतला. तोवर नवरात्र म्हणजे धीन्ग्च्याक 'गरबा' हे समीकरण चांगलच रुळल होत. धाकटा वर्षाचा असल्यान अन धनी बघाव तेंव्हा देशाटनाला असल्यान सणा वारांची अन माझी फारशी गाठ भेट न्हवती. तर आता जायचच तर निदान माझ्या माहेरच्या कुलस्वामिनीच, तुळजापूरच्या भवानी मातेच दर्शन मला घडवशील का? असा एक साधा प्रश्न मी टाकला काय अन यान चल म्हंटल काय!! लहाण बाळ असल्यान स्वत:ची कार घेऊन जाण्या ऐवजी आम्ही सुमो बुक केली.
मुंबईहून पुणा, अन मग सोलापूर. जवळ जवळ सारा वेळ हा पेंगत होता. गाडी म्हंटली की स्वत:जरी चालवत असला तरी हा खुशाल पेंगतो. तर नेमक कुठतरी याने डोळे उघडायला अन 'सोलापूर ६ किमी' अशी पाटी याला दिसायला !! झालं ड्रायव्हर न पण याच ऐकून मुळ रस्ता सोडून कुठ गावात गाडी घातली. सारा रस्ता कच्चा. तेव्हढ्या एका पाटी नंतर एकही पाटी नाही. संध्याकाळची वेळ. माणस धारा काढून दुध घालायला निघालेली. हळू हळू चुली पेटत होत्या. अगदी माझा गावं!!
कसे बसे अंधारात गचके खात सोलापूरचा घाट गाठला.दुरून प्रथम दर्शनी आवडलेलं हे पाहिला गावं !!
लॉज वर जाऊन कपडे बदलले अन अक्षयला म्हंटल चल कसलं मंदिर आहे पाहून येऊ. अहो नेमके नवरात्रात आम्ही आलेलो, पण दुसऱ्या माळेला. मला हा पत्ताच नव्हता. ना ही कुठल्या चाली रीतीची माहिती ! अंधारात मंदिर एव्हढं स्पष्ट नाही दिसलं पण बाजूला संतत धार पाण्याचा लोट वाहतो आहे हे जाणवलं. मंदिराच्या रांगेत सारी तरुण साधारण १७, १८ वर्षाची मुलं उभी होती. प्रत्येकाच्या हातात एक तांब्या. एव्हढी तरुण मुलं अन गल्लीत टोळंक्यान उभारण्या ऐवजी मंदिरात ? थोडं नवल वाटल. अन बघता बघता देवीला बाहेर आणलं गेल. तिच्या मिरवणुकीची तयारी सुरु झाली. देवी बाहेर आल्या बरोबर ही सारी मुलं तांब्या घेवून देवळात शिरली अन बघता बघता ते सार दगडी मंदिर त्या प्रत्येकाच्या हातातल्या तांब्याभर पाण्यान धुवून निघाल. अगदी कानाकोपरा !! प्रत्येकान वेगवेगळ्या ठिकाणी पाणी मारून अवघ्या १५ मिनिटात मंदिर स्वच्छ !! फार भावलं. ते गावातल्या प्रत्येक घरून आलेला एक तांब्याभर पाण्यान मंदिर धुण.
तोवर बाहेर पालखी मध्ये देवीची स्थापना झाली. काहीच गर्दी नव्हती. अगदी १०० भर माणसं म्हणा.
तिथल्या कलेक्टरनी महाराजांनी दिलेली ८० सुवर्ण पुतळ्यांची माळ पुजाऱ्यांच्या सुपूर्त केली. ती देवीवर चढवून देवीची पालखी निघाली. कधी ही ऐकिवात सुद्धा नसलेली गोष्ट मी डोळ्यांनी पहात होते. बरोबरीला माझी टकळी सुरु होती." अरे कोल्हापुरात न अंबाबाईच न फार वैभव असत. तिला बालाजी शालू पाठवतो. तिच्या दागिन्यांच्या सफाई करताना त्या मांडलेल्या दागिन्यांनी ओवऱ्या भरतात. छत्रपती चामर ढाळतात. केव्हढ्या इतमामात घोडे हत्ती नी सजलेली ती मिरवणूक माहिताहे ?कसली गर्दी असते !!
समोर तुळजा मातेचा जथा निघाला होता. पालखी, तिच्या समोर डोक्यावर गॅस बत्त्या घेतलेले दोघं चौघ अन त्यांच्या पुढे नाचणारे देवीचे भुत्ये अन जोगतिणी! एक पन्नासभर अशी ही लोक पुढे नाचत अन मागून थोडी.
मी पुढे होऊन अगदी सहज दर्शन घेतलं. सारा वेळ मनात कोल्हापूरला ना...एव्हढंच घोळत होत. पण एक गोष्ट होती इथे 'भाव' नव्हता 'भाव' होता. कुणी सा भंडारा दिला मी तो माथी लावला. नको नको म्हणणाऱ्या बाळाला लावला, लेकीला लावला. हा जथ्था पुढ गेल्यावर पायऱ्यांवर बसलेली काही माणस खाली उतरली अन ज्या मार्गान देवी गेली त्या मार्गाची धूळ घेऊन माथी लावू लागली. तिथेच दंडवत घालून देवाला नमस्कार करू लागली. मसुरी टाकीच अस्सल फत्तरात बांधलेलं ते मंदिर.
आधीच थकलो होतो, थोड लॉज वर जाऊन मग जेवायचं बघू असं ठरवून परत लॉज वर आलो. आत आल्या बरोबर अक्षय बेड वर पडला अन दुसऱ्याच क्षणी घोरायला लागला. त्याच्या जवळ लेकीन हातपाय पसरले. अन ती ही गुडूप! बाळाला मग मी दुसऱ्या बेडवर ठेवलं अन तसेच बसून थकलेले डोळे फक्त मिटले. मी नुसते डोळे मिटले ...झोपले नाही ..आडवी नाही पडले...अन डोळ्या समोर ते मंदीराच प्रांगण ...ती फरसबंदी, अन त्या फरसबंदीवर पडणारा ...जवळ जवळ फुट दीड फुट रुंदीचा सिंहाचा फक्त पंजा....!!!!!! बाकी काही नाही ..एकच क्षण, क्षण सुद्धा नव्हे निमिष!! पण मी बघितलं . तुम्ही खर माना न माना. पण मी पाहिलं. देवी नव्हे फक्त पंजा.. जणू माझी सदैव चाललेली कोल्हापूरची टकळी ऐकून तिन मला तीच वैभव...तिची ताकद दाखवली!!
मी नास्तिकही नाही अन आस्तीकही. फार कुठच्या देव देव या गोष्टींवर विश्वास म्हणण्या पेक्षा फारशी माग न धावणारी . वेल बॅलन्सड म्हणाव अशी . अगदी अजूनही. पण तुमच्या आयुष्यात घडणारया साऱ्यांच गोष्टींचा तुम्ही उलगडा नाही करू शकत.
मी अक्षयला उठवलं अन थोडफार सांगायचा प्रयत्न केला. साहेब तटस्थ असतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी; आम्ही आदल्या दिवशी ठरवलेला एक पुजारी आम्हाला दर्शनाला घेऊन गेला. अहो जवळ जवळ पहाटे चार वाजल्या पासून माणस रांगेत उभी. अन हा पुजारी आम्हाला चक्क मध्ये घुसवून रिकामा झाला ! मला नाही असं दर्शन घ्यायला आवडत. माझ्या माग एक जोडप होत . पहाटे तिन ला धार काढून ते दुध घेऊन हे दोघ एम फिफ्टी वरून ते दुध घेऊन पुण्या जवळून आलेले. अन मी निवांत झोपून उठून मध्ये घुसलेली. बर तिथला प्रदक्षिणा मार्ग पुरा पितळी सळ्यांचा. गर्दीत मुलं चेन्गरतील म्हणून एक पुजाऱ्या कडे रडतंय अन दुसर ड्रायव्हर कडे. मधी घुसलेली मी ही मुलं रडताहेत म्हणून रडायला लागले. तर आत्ता पर्यंत आम्ही मध्ये घुसलो म्हणून खवळलेला तो त्या सळ्यांवर चढला अन त्यान माझी दोन्ही मुलं त्यावरून उचलून आत घेतली. हळू हळू रांग पुढ चालली. परत पुजारी कुठूनसा उपटला अन त्यान मुलं अन अक्षयला दोन रांगा पुढ ढकललं. आता नवीन माणस रागावली. मला असह्य झाला ते सार, मी जी बाई मला गुरगुरून दाखवत होती तिला सांगितलं," बाई मी तुझ्या पुढे जावून दर्शन घेऊन पुण्यवान नाही होणार .पुढे रांगेतून बाहेर पडायला मार्ग होता तिथवर मला उभा राहूदे मी बाहेर पडते, प्लीज रागावू नको." तिन माझ्याकडे बघितलं अन म्हणाली 'अग बाई आईच्या दारात येऊन अशी दर्शन न घेता नको जाऊ. आण तुझा बाळ, मी घेते. अन पुढ बघून चालत रहा!!'
मंदिरात दुधान नाहलेली मूर्ती अशी जणू पुढ होऊन भेटली!! तिचा दुधान भरलेला गाभारा एक प्रस्थ नव्हत , तर साऱ्यांना तृप्त करून आणलेला गरीबाघरचा घोट घोट मिळून तो भरला होता. अन त्या साऱ्यात जाणवत होत तीच तेजस्वी रण रागिणीच पण माय होऊन उभा राहिलेलं रूप.!!

__/\__
अपर्णा
.

मांडणीसंस्कृतीधर्मसमाजरेखाटनप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

14 Oct 2010 - 6:39 pm | सुहास..

__/\__

स्सही !! ऊद गं अम्बे ऊद !!

तुळजापुरचा असाच काहीसा अनुभव ..पण स्साल देवळाच्या बाहेर अक्षरश : दुकानदारी करून ठेवलीय लोकांनी, एखाद्या जनमाणसात पवित्र म्हणुन असलेल्या प्रतिमेची पार वाट लावुन टाकतात...लवकर दर्शनासाठी देखील पैसै ?

यशोधरा's picture

14 Oct 2010 - 6:46 pm | यशोधरा

मस्त लिहिलं आहे!

अवलिया's picture

14 Oct 2010 - 6:48 pm | अवलिया

सुरेख प्रकटन !!

विसोबा खेचर's picture

14 Oct 2010 - 8:29 pm | विसोबा खेचर

सहमत..!

तात्या.

--
तात्या-धर्मेन्द्र भेट हा लेख मिपावर लौकरच! :)

अनामिक's picture

14 Oct 2010 - 7:12 pm | अनामिक

उत्तम प्रकटन. भारावून टाकणारा अनुभव!

स्वाती२'s picture

14 Oct 2010 - 7:27 pm | स्वाती२

खूप आवडले.

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 7:29 pm | नगरीनिरंजन

मस्त अनुभव! वर्णन फार भावुक होऊन केलंय हे शब्दाशब्दातून जाणवतंय.
उत्तम लेखन.
__/\__

मूकवाचक's picture

20 Mar 2013 - 9:26 am | मूकवाचक

__/\__

धमाल मुलगा's picture

14 Oct 2010 - 7:50 pm | धमाल मुलगा

_/\_
काय जब्बरदस्त लिहिलयस! अप्रतिम.
तुळजाभवानीच्या मंदीरात शिरल्यापासून ते तिथून बाहेर पडेपर्यंत जे काही भारलेपण अनुभवतो ते मला शब्दात नाही सांगता येत.

अगदीच मनापासून लिहिलंयस. खूप आवडलं.

सुवर्णमयी's picture

14 Oct 2010 - 8:16 pm | सुवर्णमयी

मस्त.
देवळात जायचा अमेरिकेतला अनुभव फारच वेगळा आहे, फार कष्ट न घेता, न ताटकळता इ..त्यामुळे मनात श्रद्धा असली तरी परीक्षा द्यावी लागत नाही असे वाटते!
लहानपणी अमरावतीची अंबामाता आणि माहुरच्या देवीचे दर्शन घेतले आहे त्याच्या आठवणी मुलांना सांगते, ते आई काय सांगते असा चेहरा करून पहात असतात. ..

स्वाती दिनेश's picture

14 Oct 2010 - 8:17 pm | स्वाती दिनेश

मनापासून लिहिलेले प्रकटन आवडले.
स्वाती

पाषाणभेद's picture

14 Oct 2010 - 8:24 pm | पाषाणभेद

एकदम छान अनुभवकथन. मंदिरांच्या रांगात माणूसकी भेटली तर.

स्पंदना's picture

14 Oct 2010 - 8:45 pm | स्पंदना

धन्यवाद. लेख टाकताना थोडी साशंक होते की कुणी उठुन याला दांभिक म्हणेल पण मिपाकर भावना समजुन घ्यायला कधीच कमी पडलेले दिसत नाहीत.

बस एकच मागण लोकांच्या बाजारुपणान देवाला कमीपणा न येवो. आपण मोडीत काढल तर हा बाजार नक्की कमी होइल.

आवडले.
(वाचक)बेसनलाडू

इंटरनेटस्नेही's picture

15 Oct 2010 - 1:28 am | इंटरनेटस्नेही

चांगला लेख. चांगल्या शब्दांत मांडला आहे.

(देवीचा भक्त) इंट्या.

शुचि's picture

15 Oct 2010 - 2:22 am | शुचि

खूप सुरेख :) अप्रतिम!!

शुचि's picture

15 Oct 2010 - 5:13 am | शुचि

कोणासाठी म्हणून तरी लिहीलं ... शेअर करते आहे कारण परदेशातील लोकांची बोंब असते स्तोत्रांची विशेषतः हे स्तोत्र नेट वर मिळत नाही -

श्री गणेशाय नमः| नगरी प्रवेशले पंडुनंदन|तो देखिले दुर्गास्थान|धर्मराजा करी स्तवन्|जगदंबेचे तेधवा||१||
जय जय दुर्गे भुवनेश्वरी| यशोदागर्भसंभवकुमारी|इंदिरारमणसहोदरी|नारायणी चंडीकेंबिके||२||
जय जय जगदंबे भवानी |मूळप्रकृति प्रणवरूपिणी|ब्रम्हानंदपददायिनी|चिद्विलासिनी जगदंबे||३||
जयजय धराधरकुमारी | सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी| हेरंबजननी अंतरी| प्रवेश तु अमुचिया||४||
भक्ताहृदयारविन्दभ्रमरी |तुझिया कृपावलोकने निर्धारी|अतिमूढ तो निगमार्थ करी|काव्य रचना अद्भुत||५||
तुझिया आपंगते करून्|जन्मांधासी येती नयन्|पांगुळ धावे पवनाहून्|करी गमन त्वरेने||६||
जन्माधाराभ्य जो मुका|होय वाचस्पतिसम बोलका|तू स्वानंदसरोवरमराळिका|होसी भाविका सुप्रसन्न||७||
ब्रम्हानंदे आदि जननी| तव कृपेची नौका करूनी|दुस्तर भवसिंधू लंघोनी|निवृत्ती तटा नेईजे||८||
जय जय आदि कुमारिके| जय जय मूळपीठनायिके| सकल सौभाग्यदायिके| जगदंबिके मूळप्रकृती||९||
जय जय भर्गप्रियभवानी|भवनाशके भक्तवरदायिनी| समुद्रकारके हिमनगनंदिनी|त्रिपुरसुंदरी महामाये||१०||
जय आनंदकासारमराळिके| पद्मनयन दुरितकाननपावके|त्रिविधताप भवमोचके|सर्व व्यापके मृडानी||११||
शिवमानस कनकलतिके|जय चातुर्य चंपककलिके| शुंभनिशुंभ दैत्यांतके|निजजनपालके अपर्णे||१२||
तव मुखकमल शोभा देखोनि|इंदुबिंब गेले गळोनि|ब्रम्हादिके बाळे तान्ही|स्वानंदसदनी निजवीसी||१३||
जीव शिव दोन्ही बालके| अंबे तुवा निर्मीली कौतुके|जीव तुझे स्वरूप नोळखे|म्हणोनी पडला आवर्ती||१४||
शिव तुझे स्मरणी सावचित्त|म्हणोनी अंबे तो नित्य मुक्त|स्वनंदपद हातासी येत्|कृपे तुझ्या जननीये||१५||
मेळवुनि पंचभूतांचा मेळ्|तुवा रचिला ब्रम्हांडगोळ|इच्छा परतता तात्काळ|क्षणात निर्मूळ करिसी तू||१६||
अनंत बालसूर्य श्रेणी| तव प्रभेमाजी गेल्या विरोनी| सकलसौभाग्य शुभकल्याणी|रमा रमण वरप्रदे||१७||
शंबरारि रिपुवल्लभे| त्रैलोक्यनगरारंभस्तंभे|आदिमाये आदिप्रभे|सकळारंभे मूळप्रकृति||१८||
जय जय करुणामृतसरिते|निजभक्तपालकगुणभरिते|अनंतब्रम्हांडपालके कृपावंते|आदिमाये अपर्णे||१९||
सच्चिदानंद प्रणवरुपिणी| चराचरजीव सकल व्यापिणी|सर्गस्थित्यंतकारिणी|भवमोचनी महामाये||२०||
ऐकोनी धर्मराजाचे स्तवन्|दुर्गादेवी झाली प्रसन्न|म्हणे तव शत्रु संहारून्|राज्यी स्थापीन धर्मा तूते||२१||
तुम्ही वास करावा येथे|प्रकटो नेदि जनाते|शत्रू क्षय पावती तुमचे हाते|सुख अद्भुत तुम्हा होय||२२||
तुवा जे केले स्तोत्र पठण| हे जो करील पठण श्रवण|त्यासी सर्वदा रक्षीन्|अंतरबाह्य निजांगे||२३||

धमाल मुलगा's picture

15 Oct 2010 - 4:35 pm | धमाल मुलगा

धन्यवाद शुचि!
मनापासून धन्यवाद. :)

प्रभो's picture

15 Oct 2010 - 3:17 am | प्रभो

ऊद गं अम्बे ऊद !!

sneharani's picture

15 Oct 2010 - 10:57 am | sneharani

मस्त लेख.
सुरेख !!!

अरुण मनोहर's picture

15 Oct 2010 - 3:03 pm | अरुण मनोहर

भावोत्कटता हा तुमच्या लेखनात प्रकर्षाने जाणवलेला गुण. जे काही लिहीता, ते मनातली भांडारे लुटवून लिहीता!
अजून येऊ द्या.

शुचि's picture

20 Mar 2013 - 6:56 am | शुचि

धागा वर आणते आहे.

बॅटमॅन's picture

20 Mar 2013 - 1:06 pm | बॅटमॅन

लेख उत्तमच-अस्मादिक इतके भाविक नसलो तरी आवडला. पण

तुम्ही ज्याला भोंडला म्हणता त्याला आम्ही रानची माणस 'हादगा' म्हणतो.

हे काय पटलं नै बा. मिरजेत असताना, रानात न राहता अगदी बंगल्यात राहणार्‍यांच्या तोंडीसुद्धा हादगा हाच शब्द होता. तो खास दक्षिण महाराष्ट्रीय शब्द असण्याची शक्यता जास्त आहे. बायदवे भोंडला हा शब्द कोकणीछाप आहे का?

नगरीनिरंजन's picture

20 Mar 2013 - 2:26 pm | नगरीनिरंजन

कोकणीछाप नसावा. नगरकडच्या भागातही भोंडलाच म्हणायचे आणि म्हणतात

ओक्के धन्यवाद. कोकणीछाप आहे की नाही असे विचारायचे कारण म्हंजे मला वाटले (अजूनही वाटते) की भोंडला हा शब्द ब्राह्मणी बोलीत जास्त आढळतो तोही पुणेकरछाप बोलीत. आता पुणेकर ब्राह्मणी बोली म्हंजे परिणामी कोकणस्थांचीच, त्यामुळे त्यांच्या बोलीतले शब्द आसपास पसरले, त्यांची स्थलांतरे जशी झाली तशी.

किमानपक्षी दक्षिण महाराष्ट्रात तरी हादगा हाच शब्द नेहमी ऐकलेला आहे (ब्राह्मण-ब्राह्मणेतर दोघांच्याही बोलीत) म्हणून आपलं कुतूहल, बाकी काही नाही.

सूड's picture

21 Mar 2013 - 12:50 am | सूड

कोकणी लोक भोंडला आणि घाटी लोक हादगा म्हणत असावेत.

अभ्या..'s picture

20 Mar 2013 - 2:44 pm | अभ्या..

दुकानदारी आन भोप्याची मस्ती आम्ही बघत पण नाही.(पुण्यामुंबैच्या लोकानीच लाडावून ठेवलय त्यांना)
गाभार्‍यात आई असते आमची. तिच्यासाठीच जातो. मग कितीका येळ लागंना.

मेघनाद's picture

22 Mar 2013 - 12:22 am | मेघनाद

खूपच मस्त लिहील आहे...
खेडेगावातील देवळं आणि तिथले देवांचे उत्सव ह्या गोष्ठी खरच अनुभवण्यासारख्या असतात......तिथे कुठलाही भपका नसतो असते ती निव्वळ श्रद्धा आणि देवाप्रतीचे प्रेम.
माझ्या आजोळी कोकणात देखील असाच छान उत्सव होतो दरवर्षी तो अनुभवलांय म्हणून लिहील असं.

प्रशु's picture

22 Mar 2013 - 10:02 pm | प्रशु

कोल्हापुर आणि तुळजापुर, दोन्ही ठिकाणी दोन वेळेस गेलो आहे. कोल्हापुरातका अनुभव खुपच छान , शांतपणे दर्शन आणी आईचा तो प्रसन्न अनुभव काय सांगु.....

तुळजापुर बद्द्ल मात्र लिहायला सुद्धा धजत नाही. बाहेर जे कल्लोळ तिर्थ आहे तिथ पासुनच सुरुवात. आई भक्तांना सदबुद्धि देवो..

प्यारे१'s picture

23 Mar 2013 - 12:13 am | प्यारे१

छान लिहीलंय!

किसन शिंदे's picture

23 Mar 2013 - 9:44 am | किसन शिंदे

सह्हीच लिहलंय.