सारे तुझ्यात आहे.....एक स्वप्नवत् प्रवास(२)

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
17 Apr 2008 - 5:31 pm

मला इतकी उत्सुकता होती ना…. की गाणं बनतं कसं….? माझ्या डोळ्यात इतके सारे प्रश्न बघून प्रशांत म्हणाला,” अगं, जरा धीर धर. आता तुझ्याच समोर घडणार आहेत तुझी सगळी गाणी” मी माझा कॅमेरा घेऊन तयार झाले. एका वेगळ्याच विश्वात मी पाऊल टाकलं होतं. समोर जे काही घडणार होतं ते माझं एक स्वप्न…. प्रत्यक्षात उतरणार होतं.

प्रशांत ने “धुंद तेच चांदणे” पासून सुरवात केली. त्याने त्याच्या कीबोर्डवर सिक्वेन्सिंग केलं होतं म्हणजे गाणं कसं सुरु होणार…. कुठे कुठे कोणची वाद्यं वाजणार…. मधले पीसेस…. आणि तो कॉर्ड्स देऊन त्यावर अभिजीत गाणार होता. ह्याला “क्यु ट्रॅक” म्हणतात. म्हणजे गाण्याचं बेसिक फ़्रेमवर्क. एका पाठोपाठ एक असे सगळ्या गाण्यांचे क्यु ट्रॅक्स बनलेत. मग सुरु झाली ताल वाद्यांची करामत. अभिजीत नार्वेकर हा आमचा ताल संयोजक होता. एकेक गाणं घ्यायचं आणि त्यात तबला, ढोलक, डफ अशी मुख्य ताल वाद्यं टाकायची. ह्यात प्रचंड मेहेनत असते. प्रत्येक वाद्याचं नोटेशन असतं. विजय ते लिहून घेत होता आणि भीमराव वाजवत होते. असं करत करत प्रत्येक पीस ठरला. तबला विजय आणि भीमराव दोघेही वाजवत होते. म्हणजे थोडक्यात दोन तबले एकाच वेळी वाजणार होते. ह्यात प्रचंड सिन्क्रोनायझेशन हवं. ही जोडगळी एकदम जबरी होती. एकाच फ़टक्यात त्यांचे टेक्स होत होते. मधे मधे त्यांची चर्चा…… नेहेमी पेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं.

मग झाले मनिष कुळकर्णीचे आगमन. मुंबईचा नंबर वन बेस गिटार वादक. प्रत्येक गाण्याच्या आधी सगळे आम्ही असे गोल करुन बसायचो……अभिजीत गायचा…… प्रशांत मधले पीसेस तोंडानेच बोलून दाखवत होता आणि अभिजीत नार्वेकर, विजय आणि भीमराव……. त्यात आपापली भर टाकत होते. मनिषचे गिटारचे वेस्टर्न सूरही होतेच साथीला मला तर काय काय साठवून घेऊ आणि काय काय नको असं झालं होतं. माझ्या कॅमे-यात जेवढं काही टिपता येईल तेव्हढं टिपून घेत होते.

अचानक एक खूप छान सरप्राईज मिळालं……. देवकाका मला भेटायला आले होते. त्यांना असं अचानक बघून खूप आनंद झाला. देवकाकांना पहिल्यांदाच भेटत होते. मला भेटायला ते मुद्दाम इतक्या दुरुन आलेत…….खूप छान वाटलं.

दुपारचे ३ वाजले….तेव्हा सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली. बझ-इन स्टुडियो मधला छोटा आणि चुणचुणीत मुकेश आमची खूप काळजी घेत होता. चहा, खाणं सगळं तोच बघत होता. आम्ही सगळ्यांनी जेवणावर मस्तपैकी ताव मारला. हसत खेळत जेवणं झाली. मला कुठेही मी इथे वेगळी आहे असं जाणवलं नाही किंबहुना कोणीच मला तसं जाणवू दिलं नाही. कित्येक दिवसांची ओळख असल्यासारखे आम्ही वावरत होतो. माझा कॅमेरा पण सुरुच होता.

जेवणानंतर पुन्हा एकदा उत्साहाने सगळे गाण्यात, वाद्यात बुडाले. रात्रीचे ९ वाजले तशी माझी बॅटरी डाऊन व्हायला लागली. पण बाकी लोकांच्या उत्साहात किंचितही फ़रक पडला नव्हता. ते तितक्याच जोमाने काम करत होते. मला माझीच लाज वाटली. मला बसल्या बसल्या दमायला काय झालं….. ! असं करता करता रात्रीचे चक्क १२.३० झालेत. मग मात्र माझी हालत बघून प्रशांत बोलला……. “तू निघ आता….. उद्या पुन्हा सकाळी ९ वाजेपासून यायचंय. आम्हाला अजून वेळ लागेल.” माझा खरं तर तिकडून पाय निघत नव्हता. पण शरीर खरोखरच थकलं होतं. प्रकाश चेंबूरहून मला घ्यायला आले होते. मी माघार घेऊन घरी परतले. जाताना एक प्रचंड मोठी चूक करुन बसले. त्याची फळं भोगावी लागली दुस-या दिवशी.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

जयवी's picture

19 Apr 2008 - 5:52 pm | जयवी

:)