भालचंद्र नेमाडे यांची महाकादंबरी 'हिंदू' - स्तुत्य पण फसलेला प्रयत्न

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
16 Sep 2010 - 10:45 am
गाभा: 

नुकतीच प्रकाशित झालेली आणि विविध कारणांमुळे चर्चित झालेली नेमाड्यांची 'हिंदू' कादंबरी वाचून काढली. कादंबरीचं ढोबळ मानानं कथासूत्र, प्रमुख पात्रं-प्रसंग वगैरेंबद्दल पूर्वी इतर ठिकाणी बरंच काही येऊन गेलेलं आहे. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करण्याऐवजी आधी ते धागे वाचावेत अशी विनंती करून मला कादंबरीविषयी काय वाटलं याची मांडणी खाली करत आहे. इतर ठिकाणच्या दोन प्रातिनिधिक धाग्यांचे दुवे:

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ - प्रमोद सहस्रबुद्धे
हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ : चार शब्द - सौरभदा

पुष्कळ वर्षांपूर्वी कोसंबींची इतिहासविषयक मांडणी वाचत असताना त्यात पाश्चिमात्य विचारसरणी आणि भारतीय उपखंडाचा इतिहास यांविषयीची त्यांची मतं वाचताना काहीतरी लख्ख चमकून गेलं होतं. भारतीय ऐतिहासिक दस्तावेजांच्या अभावामुळे भारताला (सांगण्यासारखा) इतिहासच नाही अशी टीका काही पाश्चिमात्य इतिहासकारांकडून होत असे. पाश्चिमात्यांच्या श्रेष्ठत्वाचं आणि पर्यायानं वसाहतवादाचं समर्थन करण्यासाठी अशा टीकेचा उपयोग केला जात असे. त्याला प्रत्युत्तर देताना कोसंबींनी राजेरजवाडे-जमीनदार अशांच्या, म्हणजेच पर्यायानं सत्ताधार्‍यांच्या नोंदी-दस्त यांभोवती घुटमळणार्‍या पाश्चिमात्य इतिहासकारांच्या मर्यादा दाखवून देत लोकरीती, लोकदैवतं, लोककथा अशा साध्यासाध्या, सहज उपलब्ध असणार्‍या साधनांद्वारे सर्वसामान्यांचा, म्हणजेच भारताच्या जनसंस्कृतीचा हजारो वर्षांचा इतिहास आजही कसा जिवंत आहे आणि साक्षेपी संशोधकाला त्यातून भारतीय संस्कृतीविषयी किती मौलिक ज्ञान मिळू शकतं याचा उहापोह केला होता.

रोमिला थापर, रा. चिं. ढेरे अशा अनेकांनी नंतर या पध्दती वापरून भारतीय उपखंडाविषयी संशोधन केलं. परंतु अशा गोष्टींचा वापर करून भारतीय उपखंडाविषयी काहीतरी व्यापक सांगणारं कथनात्मक साहित्यही निर्मिलं जाऊ शकेल का? अगदीच शक्य आहे असं वाटतं. असा प्रयत्न कधी झाला होता का? मला तरी माहीत नाही. पाश्चिमात्य साहित्यात असे प्रयत्न आढळतात. गाब्रिएल गार्सिआ मार्केझचं 'हंड्रेड यर्स ऑफ सॉलिट्यूड' हे एक ठळक उदाहरण पटकन आठवतं. 'हिंदू'मध्ये नेमाड्यांचा प्रयत्न असा काहीसा असावा.

एका गावाची पार्श्वभूमी घेऊन, त्यात राहणारा अठरापगड समाज, त्यांचे परस्परसंबंध आणि बाहेरच्या जगाशी असलेले संबंध यांची वीण कादंबरीत चित्रित केलेली आहे. त्यात पिढ्यांच्या संक्रमणामुळे, बाह्य जगातल्या सत्तासंघर्षांमुळे झालेले बदल चित्रित केलेले आहेत. त्याद्वारे सबंध भारतीय उपखंडाचा, तिथल्या संस्कृतीचा प्रातिनिधिक आढावा घेण्याचा प्रयत्न असं काहीसं कादंबरीचं स्वरूप दिसतं.

भारतीय तत्त्वविचार भारतीयांच्या रोजच्या जगण्याचा अविर्भाज्य भाग म्हणून त्यात येतात. भारतीय समाजाची सहिष्णुता, व्यामिश्रता, समंजसपणा, सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती अशा चांगल्या घटकांबरोबरच रुढीप्रियता, छोटेमोठे जातिनिहाय हेवेदावे, हेकेखोरपणा अशाही अनेक गोष्टी येतात. विविध वंश, वर्णाच्या लोकांच्या हजारो वर्षांच्या परस्परसंबंधांतून बनलेली ही सांस्कृतिक वीण एका गावाच्या इतिहासामधून उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. शेती आणि शेतकर्‍याभोवती गाव फिरत असे म्हणून हे सर्व एका कुणबी निवेदकाच्या माध्यमातून येणं हेही ठीकच. थोडक्यात, कादंबरीचा पट खूपच व्यापक आणि म्हणून महाकादंबरी असं बिरुद शोभावं असा आहे.

कादंबरीविषयी अनेक ठिकाणी पुष्कळ चर्चा झाली; अजूनही होत आहे. तीविषयी काही जणांनी नोंदवलेले आक्षेपही लक्षात घेण्यासारखे आहेत.

कादंबरी प्रतिगामी आहे असा एक आक्षेप आहे. त्यात जुन्या व्यवस्थेचं उदात्तीकरण आहे आणि आधुनिक विचारांना डावललेलं आहे असा तो आक्षेप आहे. कादंबरीत लोटणारा काळ हा काही पिढ्यांचा आहे. त्यात जुन्या व्यवस्थेतला जिव्हाळा, नात्यांमधली माया अशांचं चित्रण आढळतं हे खरंच आहे. पण त्या बरोबर त्याला छेद देणारे काही घटकही आढळतात. उदा: जुन्या व्यवस्थेत बायकांचे आणि गावकुसाबाहेरच्यांचे होणारे हाल, शोषण, वगैरे. कादंबरीचा नायक-निवेदक हा या सर्व व्यवस्थेला कंटाळून, वडिलांच्या मर्जीबाहेर जाऊन, आपला वंशपरंपरागत कुणब्याचा व्यवसाय टाकून देऊन शहरात जातो, उच्चशिक्षण घेतो आणि पुरातत्वशास्त्रात पीएचडी करू इच्छितो. म्हणजे काही प्रमाणात जुन्या व्यवस्थेविषयी टीकाही यात आहे. पण यात शहरं, आधुनिक जीवनमान, तंत्र वगैरेंचं कसलंही समर्थन नाही (असली तर चेष्टाच आहे). नायकाला असं आपलं मूळ नाकारून जगण्याची काही वेगळी दिशा सापडली आहे असं म्हणता येत नाही. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही, अनेक ठिकाणी फिरल्यानंतरही, चित्रविचित्र माणसांशी परिचय झाल्यावरही तो अजून चाचपडतो आहे. त्यामुळे शहरीकरण, शिक्षण आणि एकंदरीत व्यक्तिकेंद्री आधुनिक विचार जुन्या व्यवस्थेला पर्याय म्हणून अजिबातच येत नाहीत. म्हणून कादंबरी पुरोगामी आहे असं निश्चितच म्हणता येणार नाही. तिच्यातून उमटणारं विचारविश्व हे तिच्या नायकाप्रमाणेच दोन दरडींदरम्यान गोंधळलेलं आहे असं वाटतं.

कादंबरीची रचना विस्कळीत आहे असाही एक आक्षेप आहे. सुरुवातीच्या भागात कादंबरी स्थळ-काळात फिरत राहते. नायक मोहेंजोदारोमध्ये उत्खनन मोहिमेत सामील आहे तिथलं वर्तमान वास्तव, नायकाच्या गावाकडच्या आठवणी आणि त्यानं पूर्वापार ऐकलेल्या गावातल्या मागच्या पिढ्यांच्या कथा यांमध्ये कथा फिरत राहते. अशी वीण पाश्चिमात्य कादंबरीत नवीन नाही. त्यामुळे हे फिरत राहणं मूलतः आक्षेपार्ह वाटलं नाही. नंतरचा भाग मात्र सरळ आहे. हळूहळू नायकाच्या बालपणाची, कुमारपणाची कहाणी सांगत-सांगत कादंबरी वास्तवात (साधारण १९६०चं दशक आणि विशीतला पदव्युत्तर शिक्षण घेतलेला नायक इथवर) येते.

विस्कळीतपणाविषयी मला मूलतः काही अडचण नाही. तरीही माझा आक्षेप हा 'कादंबरीच्या रचनेमागे काही विचार दिसत नाही' असा आहे. म्हणजे सुरुवातीचं स्थळ-काळातलं हलत राहणं आणि नंतरचं सरळ पुढे जात राहणं या दोन्हींमागे काहीही कारण दिसत नाही. कादंबरी याऐवजी सरळ पुढे जात राहून शेवटी कधीतरी मोहेंजोदारोला आणि परत गावात पोहोचली असती तरी काही फरक पडला असता असं वाटत नाही.

भाषेविषयीही असाच काहीसा विस्कळीतपणाचा आक्षेप आहे. म्हणजे 'कोसला'प्रमाणे यातही व्याकरण, विरामचिन्हं वगैरेंची तोडमोड आहे. संवाद लिहिताना कुठेही अवतरण चिन्हं वगैरे वापरलेली नाहीत. शिवाय मध्येच काही मजकूर इटालिक्स मध्ये येतो, काही ठळक येतो, मध्येच भित्तीचित्रावर लिहिलेला मजकूर एका ओळीवर चौकटीत दिसावा तसा काळ्या पार्श्वभूमीवर पांढर्‍या अक्षरात येतो. या सर्वाचा कादंबरीची आशयघनता वाढवायला काही हातभार लागत नाही. त्यामुळे काहीही साधत नाही. त्याची कादंबरीच्या आशयाला काहीही गरज नाही.

'कोसला'मध्ये ही तोडमोड कादंबरीचा अविभाज्य भाग वाटते - कारण याचा संवेदनशील नायक फार मोठ्या मानसिक ताणाला सामोरा गेलेला आहे, त्याचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे आणि तो आपली गोष्ट सांगतो आहे. इथला नायक तसा नाही. तो आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या सीमारेषेवर आहे, पण पदव्युत्तर शिक्षण घेऊन आता पीएचडीची तयारी करणारा, शिक्षकांकडून, सहकार्‍यांकडून कौतुक वगैरे झेलत आपलं काम करणारा असा आहे. कादंबरीचा पटही एका व्यक्तीच्या कथेहून खूप मोठा आहे. मग पुन्हा अशी भाषा वापरणं हा निव्वळ टाळीखाऊ प्रकार वाटतो (कारण 'कोसला'तल्या त्या भाषेचे पुष्कळ चाहते आहेत.) त्यानं उलट कादंबरीचं वजन कमी होतं. पाश्चिमात्य देशांतले नवकादंबरीकार असं करतात म्हणून आपणही करू (आणि तरीही देशीवादी म्हणून मिरवू) अशी काहीशी पोरकट वृत्ती यात जाणवते.

असो. जर मुळात कादंबरीत काही ताकद असती ('कोसला'त ती होती) तर हे सर्व आक्षेप बाद करता आले असते. मला कादंबरीचा मुख्य दोष दिसला तो असा की कादंबरी कधी पुरेशी सघन होतच नाही. सुरुवातीच्या भागात एकीकडे पाकिस्तानात भेटलेली माणसं आणि निवेदकाच्या गावातली माणसं या दोहोंमधला खास 'आपला' असा जिव्हाळा, ओलावा दिसतो. 'इथून-तिथून या भूमीतला माणूस सारखाच' असं काहीसं लेखकाला म्हणायचं असावं असं वाटतं. तिथं ते आटोपशीर आणि कादंबरीच्या आवाक्याशी संबंधित वाटतं. नंतर गावातल्या भागात भारतीय माणसाच्या विविध तर्‍हा दिसतात. भटक्या जमाती, मुसलमान, गावकुसाबाहेरचे, वेश्या ते वारकरी, महानुभावी, देशमुख, पुरोहित असे गावगाड्यातले अनेक प्रकारचे लोक त्यात येतात. या सर्वांना समाजात वेगवेगळं स्थान असतं. तरीही गावगाड्यात त्या सर्वांची एक मोळी बांधलेली असते. म्हणून कादंबरीत त्यांचं चित्रण येणं साहजिक वाटतं. निवेदकाला (म्हणजे पर्यायानं लेखकाला) त्या सर्वांविषयी (त्यांच्या गुणदोषांसहित) वाटत असलेलं प्रेमच त्यातून दिसतं. पण इतरत्र मात्र तसं जाणवत नाही.

पिढ्यांचं संक्रमण दाखवण्यासाठी दलित चळवळ, शहरी पाणी चाखलेल्या सुशिक्षित, सबल स्त्रिया असे अनेक घटक पुढे येतात. पण यातल्या कुठच्याच गोष्टीशी लेखक भिडतो असं वाटत नाही. कारण गावातल्या लोकांविषयी लेखकाला जे प्रेम वाटतं तसं इथं अजिबातच वाटत नाही. त्यामुळे तो सर्व भाग प्रक्षिप्त वाटतो. लेखकाच्या मूळ हेतूला तर त्यानं छेद जातोच; कारण आता ते सर्वसमावेशक, व्यापक भारतखंडाचं चित्र रहात नाही तर 'हेही यायला हवं, तेही यायला हवं; पण याविषयी मला तिटकाराच आहे, तर मग घ्या हात धुवून' असं काहीसं होतं. हे फार हिणकस वाटतं.

नंतर तर हे सर्व फारच लांबतं. ज्यांचा कादंबरीशी, तिच्या आशयाशी अजिबात संबंध नाही अशी पात्रं, प्रसंग यांचं अपचन होईपर्यंत वर्णन येतं. नेमाडपंथी पाचकळ ग्राम्य विनोद, स्त्रीमुक्तीवाल्यांची चेष्टा, प्रत्यक्ष नेमाड्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींची खर्‍याखुर्‍या नावांनिशी चेष्टा, शहरी माणूस कसा वाईट म्हणून त्याची चेष्टा असे सर्व पोरकट प्रकार मग त्यात येतात. ते कादंबरीचा पाया ढासळवतातच, पण 'आता तरी मोठे व्हा, लेखकराव!' असं नेमाड्यांना ओरडून सांगावं अशी पाळी आणतात. कादंबरी म्हणजे आत्मचरित्र नव्हे. त्यात इतका मोठा आवाका असलेली कादंबरी तर शेरेबाजीनं इतकी बरबटलेली आणि एकारलेली असणं हे खचितच नेमाड्यांना अभिमानास्पद नाही.

'कोसला' प्रकाशित झाली तेव्हा नेमाडे २५ वर्षांचे होते. 'कोसला'मध्ये पुष्कळ 'कट्टा'छाप पोरकटपणा आणि पाचकळपणा आहे. पण 'कोसला'चा आशय 'हिंदू'च्या मानानं मर्यादित होता. तो आशय आणि नेमाड्यांचं तेव्हाचं वय या दोहोंना हा सर्व पाचकळपणा शोभून दिसला. किंबहुना मराठी कादंबरीत त्यानं मोलाची भरच घातली. आज ते अभिजात वाङ्मय म्हणूनच वाचलं जातं. मराठी सारस्वत यासाठी नेमाड्यांना मोठं मानतं आणि ते समर्थनीयच आहे.

पण त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आज नेमाडे सत्तरीचे आहेत. त्यांना 'हिंदू'मध्ये हजारो वर्षं जुन्या भारतीय संस्कृतीच्या बहुपेडी, बहुरंगी विणीचा इतिहास मांडायचा होता. कोट्यवधी माणसांचं आयुष्य हजारो वर्षं व्यापून वर दशांगुळं उरणारी ही वीण तिच्या समृध्दीसकट आणि तिच्यातल्या ठिगळांसकट दाखवायची म्हणजे खायचं काम नव्हतंच. सधनतेची, देशोदेशींच्या मातीची आणि आधुनिक विचारांची कितीही पुटं त्यावर चढली तरी आत लखलखणारं, अस्सल, खास भारतीय असं काहीतरी शिल्लक ठेवणारी; ज्याच्यासाठी पुन्हापुन्हा आपल्या माणसांकडे, आपल्या तत्त्वविचारांकडे आणि आपल्या मातीकडे ओढ घ्यावीशी वाटेल अशी भारतीय संस्कृती नेमाड्यांना दाखवायची होती. त्यांतलं नक्की काय अस्सल आहे याबद्दलचे नेमाड्यांचे विचार आपल्याला पटोत न पटोत, मराठी आणि भारतीय साहित्यात असं काहीतरी करण्याची ही इच्छा कौतुकास्पद होती आणि आहेही. नेमाड्यांना थोडे कष्ट घेता हे जमू शकलं असतंही कदाचित, पण ते जमलेलं नाही हेच खरं. त्यामुळे एक लाखमोलाची संधी या लेखकरावानं सहज आवाक्यात ठेवता यावेत अशा आपल्या अवगुणांपायी दवडली ही अतीव खेदाची गोष्ट आहे.

प्रतिक्रिया

इन्द्र्राज पवार's picture

16 Sep 2010 - 10:56 am | इन्द्र्राज पवार

फार आनंद झाला आहे, हे पाहून की तुम्ही 'हिंदू' वर लिहिले आहे.....वाचतोय....ही फक्त लिखाणाची नोंद घेतली आहे असे समजा. सविस्तर (अर्थातच) लिहिण.

इन्द्रा

नेमाडेप्रेमींची मते वाचण्यास उत्सुक ;)

चिंतामणराव's picture

16 Sep 2010 - 11:08 am | चिंतामणराव

नुकतंच घेतलय. वाचुन प्रतिक्रिया देइन.

यशवंतकुलकर्णी's picture

16 Sep 2010 - 3:42 pm | यशवंतकुलकर्णी

मला एक कळत नाही, हे नेमाडे म्हणतात की ज्ञानेश्वरीची मूळ प्रत राजवाड्यांनी बदलली आणि ओव्या हव्या तशा बदलल्या...हे खरं मानलं तर काहीही लिहीलेले असो लोक ते डोक्यावर घेतात - लोकांना काही अक्कलच नसते असा अर्थ निघतो....मग नेमाडे पाटलांना हे माहित आहे तर एवढी पानं खरडण्याचा खटाटोप कराचाच का?

अनुराग's picture

16 Sep 2010 - 3:53 pm | अनुराग

कोसला, बिडार , जरिला , झुल वाचले अजून हिन्दू वाचायला मिळाले नाहि.

मेघना भुस्कुटे's picture

16 Sep 2010 - 8:28 pm | मेघना भुस्कुटे

मला माझी हिंदूची प्रत निम्म्या किंमतीत विकायची आहे. कुणी घेणार का? मला साडेचारशेला पडली होती. सव्वादोनशे पडतील.

मुक्तसुनीत's picture

16 Sep 2010 - 8:30 pm | मुक्तसुनीत

तयारी आहे. टपाल शील निराळे !
:-)

बेसनलाडू's picture

16 Sep 2010 - 8:36 pm | बेसनलाडू

मुसु, तुम्ही इकडे शिप करताय की मेघनाताईंना सांगू बोली लावायला?
(उत्सुक)बेसनलाडू

मुक्तसुनीत's picture

16 Sep 2010 - 8:44 pm | मुक्तसुनीत

पुस्तकाची किंमत/ आंतरराष्ट्रीय S & H = कोंबडी/मसाला

मेघना भुस्कुटे's picture

17 Sep 2010 - 9:14 am | मेघना भुस्कुटे

दिली!

नीधप's picture

17 Sep 2010 - 12:54 am | नीधप

मला दे!
माझी वाचून झाल्यावर मी कोणाला तरी पाऊण किमतीत विकेन.. :)

निखिल देशपांडे's picture

16 Sep 2010 - 9:36 pm | निखिल देशपांडे

उत्तम लेख..
हिंदु बद्दल माझे मत आधी इथे लिहिले आहे...

अशातच हिंदु वाचुन संपवली. अक्षरशः संपवलीच म्हणावी लागेल.
पुस्तकाचे नाव आणि त्यासोबत नेमाड्यांनी मुलाखतीत केलेली फटकेबाजी पाहता पुस्तकाकडुन काही अपेक्षा निर्माण झाल्या होत्याच. कदाचीत इथेच पुस्तकाबद्दलचे गणित चुकले. कारण पुस्तकाचे नाव हिंदु एक समृद्ध अडगळ आणि मुलाखतीत दिलेले हिंदु धर्म/संस्कृती बद्दलचे विधान यांचा फारसा पुस्तकाशी कुठेच संबंध जाणवला नाही. आता हा कादंबरीच्या विषयाबद्दल बरेचसे लिहिलेले आहेच त्यामुळे त्याबद्दल फारसे काही लिहावेसे वाटत नाही. एकुणच कादंबरी खुप मोठी आणि रटाळ आहे. श्रामोंनी वर मांडल्या प्रमाणे पुस्तकाचे भाग दोन तीन चार खरोखर वाया गेलेलेच आहेत. कितीतरी वेळा तुम्हाला एका परिच्छेदाचा दुसर्‍याशी संबंध काय हे शोधावेसे लागते. असो कदाचित यालाच लेखकाची स्टाईल म्हणायचे का काय ते काही मला कळत नाही.

नेमाड्यांनी या कादंबरी साठी बराच काळ अभ्यास करुन कादंबरी लिहिली आहे असे कुठेसे वाचले होते. आता या कादंबरीच्या पहिल्या खंडातुन मला तरी हे फारसे जाणवलेले नाही. कारण कादंबरीचा बराचसा भाग हा सधन शेतकर्‍याचे एकत्र बारदान आणि त्यांची जीवनशैली समजवण्यात गेला आहे. आता या भागात रिसर्च पेक्षा लेखकाचा अनुभव जास्त जमेचा असावा असे वाटते. पुढच्या भागात आलेले मराठवाडा विद्यापिठातले राजकारण किंवा चांगदेव चतुष्टया मधले शिक्षण संस्थेतले वातावरण हे लेखकाने अनुभवलेले असावे त्यासाठी काही खास अभ्यास करायची गरज पडली असेल असे मला तरी वाटत नाही. एखाद्या लेखकाने अभ्यासपुर्व लिहिलेल्या कादंबर्‍या म्हणुन मला डॅन ब्राउन च्या कादंबर्‍याचे उदाहरण पटते, डॅन चा प्रत्येक कादंबरीत त्याचा विषयाशी निगडीत केलेला रिसर्च जाणवतो. इतिहासाची कल्पने सोबत घातलेली सांगड उत्तम असते. हिंदु च्या बाबतईत अभ्यास फारसा जाणवत नाहीच.

एकुणच या कादंबरी नंतर पुढच्या भागात आता नेमाडे काय लिहिणार आहेत ते फक्त तेच जाणो. त्यांनी एवढे वर्ष मेहनत घेतलेली त्यांचा पुस्तकातून जाणवली तर उत्तमच.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Sep 2010 - 9:32 am | बिपिन कार्यकर्ते

मस्त!

पुढील चर्चा वाचायला उत्सुक... मेघनाची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. :)

इन्द्र्राज पवार's picture

17 Sep 2010 - 12:56 pm | इन्द्र्राज पवार

"कोण आहे?
मी मी आहे खंडेराव....म्हणजे? तू स्वतःलाच मी कोण आहेस असं विचारतोस?
मग खंडेराव फक्त गोष्टच सांगत जा राव...शतकाची !"

~~ ६०३ पानाच्या शतकाच्या उलाढालीचा (वा समृद्ध अडगळीचा) आलेख उलगडविणार्‍या या कादंबरीची ही सुरुवातच त्यातील कथानकाचे सार सांगते की खंडेराव आपल्याला त्या शतकाची 'गोष्ट' सांगणार आहे आणि त्या दरम्यान येणार्‍या संस्कृतीच्या लाटेवर तुम्ही स्वार व्हायचे की त्याखाली दबून जायचे, हे कथाकारावर (जो चांगला गोष्टीवेल्हाळ माणूस आहे) नसून वाचकावर अवलंबुन आहे. हिंदू संस्कृतीच्या भव्यदिव्य परंपरेशी खंडेरावाला जे काही लेणेदेणे आहे ते त्यातील भाष्यावर वा साधुसंतांनी/धर्मरक्षकांनी घालून दिलेल्या चौकटीवर नसून जगण्याची जी काही अडगळ आहे (जी त्याच्या लेखी जरी अपरिहार्य असली तरी समृद्ध आहे) त्यात दबून बसलेल्या सुंदरतेशी आहे....जी त्याला एकत्र कुटुंबात, म्हातार्‍याकोतार्‍यांत, मित्रात, गावकीत, शेतीत, अडीअडचणीत दिसून येते. स्त्रीसत्ताक स्त्रीस्वातंत्र्य, पुरुषप्रतिबंधकत्व, आर्थिक स्वावलंबन, देशी ग्रामव्यवस्था, लैंगिक वर्तन आणि समाजस्वास्थ्य यासारख्या अनेक कोळी जाळी त्याला प्रश्नरूपाने घेरून टाकीत आहेत आणि तो सैरभैर आहे...म्हणजेच एका विशिष्ट कालखंडातील ग्रामीण (जिथे खरा भारत आहे असे मानले जाते) भागातील तरुणाईचे तो प्रतिनिधित्व करीत आहे.

नायक खंडेराव मोरगांवकर आणि त्याची जगण्याची विचारसरणी ही काही ऐतिहासिक घटना होऊ शकत नाही, आणि खुद्द नेमाडे यांचा तसा आग्रहही दिसत नाही कारण इतका तो 'बॉय नेक्ट डोअर' वाला एक इसम आहे. इतिहासाने त्याच्या अस्तित्वाची चौकट पुसून टाकली असल्याने तो आता एका अशा पिढीचा प्रतिनिधी बनला आहे की, जगणे हेच अंतिम ध्येय असल्यासारखे झाले आहे आणि किंबहुना तीच त्याची शिक्षादेखील आहे. गावातील जमीनजुमल्याचे व्यवहार त्याला कळत नाही, भावडू सगळे पाहतो, वडिलांना राजकीय पातळीवर गावात चांगला मानमरातब आहे, बहिणीच्या लोभी नवर्‍यांना आपल्या सासर्‍याकडे बक्कळ पैसा असून तो भावडू किंवा खंडेराव यांच्या डोळ्यासमोर लुबाडण्यात आनंद आहे, प्राथमिक शाळेच्या मास्तरांनी शिक्षणाचे महत्व मनावर चांगलेच बिंबवल्याने 'बहुजन समाजाचा उद्धार व्हायचा झाल्यास तो केवळ शिक्षणामुळेच होईल' ह्या तत्वाशी चिकटून राहिलेला तो आणि समविचारी मित्र, कॉलेजमध्ये आतापर्यंत दबून राहिलेल्या प्रतिभेला फुटलेले पंख, खंडेरावाची विनोदबुद्धी चांगली आहे, त्याच्या भावना नम्र आहेत, मित्रांसाठी मर्यादेत बसेल इतपत त्याग करण्याची तयारी आहे, इतराबद्दल तो साशंक नाहीत, आजुबाजूला चालत असलेला गदारोळातही स्वतःचा तोल सांभाळत धीरगंभीरपणे तो वावरताना दिसतो. मोहोनजोदडो उत्खननसमयी संस्कृतीबाबत पाकिस्तानी सहकार्‍यांच्यासमवेत तो अभ्यास करतो, निष्कर्श काढतो....संपूर्ण हिंदू तत्वज्ञान त्याला अभ्यासायचे आहे....आणि हा अभ्यास कुणावर लादायचा नसून तो गोष्टीरूपाने सर्वांसमोर मांडायचा आहे.

~~ आणि म्हणून 'हिंदू' कादंबरीकडे.....ती ३०-३२ वर्षांनी प्रकाशित झाली आहे म्हणून काही तरी जगावेगळी आहे, अशी कल्पना (किंवा पूर्वग्रह) करून पाहिले गेल्यास वाचकाला तिची जातकुळी 'चांदोबा' पेक्षा पुढची एक पायरी धर्तीच्या लिखाणापैकी आहे हेच जाणवत राहील. नेमाडे 'खंडेरावा' बद्दल अलिप्त नाहीत, ते त्याच्या नजरेतून मागील शतक अशासाठी बघतात की, त्या गोष्टीच्या रुपाने 'मला हिंदू संस्कृतीबद्दल काय वाटते ते मी सांगतो'. मग वेताळ जसे विक्रमादित्याला कथा सांगतो आणि शेवटी प्रश्न विचारून त्याचे मौन भंग करतो व परत जगण्याची ती अटळता....परत राजाने स्मशानाकडे जाणे आणि प्रेत खांद्यावर घेऊन ती कधीही न संपणारी वाट तुडविणे.....ही असहायता आपल्या भाळी आली आहे असे प्रत्येक तरूणाला वाटत आले आहे, पण तशी ती आहे म्हणून 'ह्याला जीवन ऐसे नाव.." असे जे म्हटले जाते तो भाग म्हणजेच जगण्याची एक समृद्ध अडगळ !

देशीवादाचे जाहीर प्रकटन नेमाड्यांनी वारंवार केले आहे, जे सर्वानाच पचनी पडेल असे नाही. 'कोसला' हा मराठी भाषेतील एक चमत्कार होता/आहे, आणि जिच्या उल्लेखाशिवाय मराठी साहित्याचा लेखाजोखा कदापिही पूर्ण होत नाही. हाच देशीवाद जो 'कोसल्या' पासून सुरू झाला तर तिथूनच 'हिंदू' सुरु करण्यामागे नेमाड्यांची हीच भूमिका राहिली आहे. (हिंदूचे कथानक १९६३ पासून सुरु होते...नेमके हेच वर्ष 'कोसला' प्रकाशनाचे). भारतीय भाषा भगिनीसमवेत 'हिंदू' ची तुलना होणे अपरिहार्य आहे. तरीदेखील बंगाली भाषेने जे दाखवून दिले (देशीवैशिष्ट्यांमुळेच एखाद्या कलाकृतीला देशव्यापी रचनेचे स्वरूप येते) की कुठल्याही वाङ्मयकृतीचा मूलाधार देशी असेल तरच त्याचे महत्व मोलाचे ठरू शकते (उदा. लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई, पु.भा.भावे, व्यंकटेश माडगुळकर, मोकाशी, बागुल आदी). दिवाळी अंकातील लिखाण जर एक एक प्रांतिक वाङ्मयकृती म्हणून समोर आणून ती दूरदर्शनवर चर्चेचा विषय बनवू लागलो तर पुढच्या एखाद्या 'मोहोनजडो' उत्खननात हिंदू संस्कृती म्हणजे कार्पोरेट जगत असेच सिद्ध होईल.

~~ श्री.भालचंद्र नेमाड्यांनी 'हिंदू' ही कादंबरी म्हणून पुढे आणली असली तर प्रत्यक्षात तो एक इतिहास आहे, आणि इतिहास म्हटले की एक नेमकी चौकट आली, चौकटीसाठी सुतारकाम आले, नियम आले, आणि या नियमांना भटकू न देता 'शतकात जे काही दिसले' ते गोष्टीरूपात सांगितले, इतपत नजरेने 'हिंदू' कडे पाहिल्यास अपेक्षाभंगाच्या आठ्या पडण्याची शक्यता धूसर होईल. इतिहास सांगण्याची रिती जो तो कलावंत आपल्या धाटणीने सांगणारच, तो काही वाचकाशी फडके/काकोडकरी लडिवाळपणा करणार नाही. मर्ढेकरांची 'पिपांत मेले ओल्या उंदिर' ही कविता आणि यावर वर्षानुवर्षे चाललेले/झालेले चर्चेचे गुर्‍हाळ वाचले तर किती प्रकारे त्या कवितेचा अर्थ लावता येतो, ते थोडेफार कळू शकते....(प्रत्यक्षात मर्ढेकरांनी ती कविता 'बंगालच्या १९४३ च्या उपासमारीवर' लिहिली होती...)

'कोसला' पासूनची मराठी कादंबरीला दिलेली एक जबरदस्त परंपरा पुढे नेमाड्यांनी 'बिढार' चतुष्ट्यात अधिक विस्ताराने मांडली आणि त्यामुळेच त्यांच्या लेखणीतील विलक्षण अशा ताकदीवर, वेगळेपणावर केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर 'कोसला' ज्या ज्या भाषेत अनुवादित झाली तेथील वाचकांकडूनही इतर लेखकांना दुर्लभ असे प्रेम आणि आदर मिळविला. एका लेखकाच्या एखाद्या कलाकृतीसाठी ३० वर्षापेक्षा अधिक काळ वाट पाहण्याची तयारी असलेले रसिक वाचक केवळ याच आपल्या मराठी भाषेत आहेत असे म्हटले तरी ते अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण होणार नाही.

धागाकर्ते श्री.चिंतातूर जंतू म्हणतात ~~ "विस्कळीतपणाविषयी मला मूलतः काही अडचण नाही. तरीही माझा आक्षेप हा 'कादंबरीच्या रचनेमागे काही विचार दिसत नाही' असा आहे." ~~ अरेच्या मग तर मी म्हणतो की तुम्हाला ही कादंबरी पक्की समजली. खुद्द लेखकाचा तरी असा कुठे आग्रह आहे की कादंबरीच्या रचनेमागे काहीतरी विचार करून ती लेखनबद्ध केली आहे? आहे तो तो एक गुंतवळ सोडविण्याचा प्रयत्न....तो प्रयत्न म्हणजे जगण्याची धडपड.....(कधीतरी "गुंतवळ" या जी.ए.कुलकर्णी यांचा एका प्रसिद्ध कथेचे वाचन, या संदर्भात करा....कथा वाचली असली तरी....म्हणजे जगण्याची रचना आणि त्यामागील विचार तुम्हाला भावेल.)

मराठी आणि भारतीय साहित्यात असं काहीतरी करण्याची ही इच्छा कौतुकास्पद होती आणि आहेही. नेमाड्यांना थोडे कष्ट घेता हे जमू शकलं असतंही कदाचित, पण ते जमलेलं नाही हेच खरं.

~~ ठीक आहे, तसेही असेल...."हिंदू" ने जरूर त्या वाट पाहण्याच्या थराराची पूर्णपणे परतफेड केली नसेल....पण म्हणून ती एकदमच टाकावू होत नाही. आपल्या आयुष्याला जो काही आकार आहे तो केवळ सर्व काही सुजलाम सुफलाम आहे म्हणून नव्हे तर ते मिळविण्यासाठी कराव्या लागणार्‍या धडपडीची जाणीव रक्तात कुठेतरी खोलवर रूजून बसली आहे म्हणून....'दहावीला मुलाने गणिताचा आणखीन थोडा अभ्यास केला असता तर ९५% टक्के कुठे गेले नसते..." म्हणजे इथं तुम्ही म्हणता तसं "ते जमलेलं नाही..." पण म्हणजे त्या मुलांने ९० ते ९५% या दरम्यान आपली पथारी मांडली आहे ना? मग तसे असेल तर त्याला तुम्ही 'अयशस्वी परीक्षार्थी' म्हणाल? मला वाटत नाही की, तुमचे उत्तर 'होय' असेल.

शेवटी जगणे जगणे म्हणजे काय तर आल्या सुर्याला सामोरे जावून जीवन आहे त्या परिस्थितीत सुंदर करण्यासाठी झटणे. "हिंदू" तील अडगळ असेच वाचकाचे आयुष्य समृद्ध करते.

इन्द्रा

(याच संदर्भात पण थोडेसे अवांतर >>> श्री.चिंजं लेखात लिहितात :: "किंबहुना मराठी कादंबरीत त्यानं [पक्षी - 'कोसला" नं] मोलाची भरच घातली. आज ते अभिजात वाङ्मय म्हणूनच वाचलं जातं. मराठी सारस्वत यासाठी नेमाड्यांना मोठं मानतं आणि ते समर्थनीयच आहे."

~~ याबद्दल मी फार फार कृतज्ञ आहे. किती 'फार'? हे मी शब्दबद्ध करणार नाही, इतकं 'कोसला' वर प्रेम आहे माझे !)

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 3:04 pm | धमाल मुलगा

अरे भल्या माणसा, तुला टंकाळा येत नाही का?
किती टायपलंय ते. :D

इन्द्र्राज पवार's picture

17 Sep 2010 - 6:14 pm | इन्द्र्राज पवार

अरे धमुबाबा....तुम्ही एका दिवसात जेवढ्या खरडी लिहिता (आणि आलेल्या वाचता...) त्याचे मीटर माझ्या कुठल्याही प्रतिसादापेक्षा वरचेच असेल, हे मी खात्रीने सांगतो. सबब तुमचे दिवसभरातील टंकणे [तेही विविध डिझाईन्सचे] माझ्या एकसूरी टंकण्याला सहज मागे टाकते.

....आणि विषय आवडीचा असला की, नाही म्हटले तरी बोटे नकळत दोनचार जादाच्या उड्या मारतातच.

इन्द्रा

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 6:23 pm | धमाल मुलगा

हा हा हा....मी गंमत करत होतो बरं इंद्रा!

>>दिवसभरातील टंकणे [तेही विविध डिझाईन्सचे]
=)) =)) =)) डिझाईन्स..... :D

>>>नाही म्हटले तरी बोटे नकळत दोनचार जादाच्या उड्या मारतातच.
च्छ्या:! नाही म्हणुच नये. तू लिहावंसच..नक्कीच लिहावं. आणखीही खूप लिहावंस. मी मजा केली इतकंच. :)

इन्द्र्राज पवार's picture

18 Sep 2010 - 9:29 am | इन्द्र्राज पवार

"=)) =)) =)) डिझाईन्स....."

डिझाईन्सचा इथे असा अर्थ आहे >> विषयांतील वैविध्य ! तुम्ही ज्या सहजतेने अनेकविध विषयात संचार करता (आणि तोही अगदी किंगफिशरच्या नजाकतीने...) ते पाहून्/वाचून विविध रंगांचे एक कोलाज निर्माण होते. ~~ त्यास्तव 'डिझाईन्स' चे प्रयोजन.

इन्द्रा

प्रभो's picture

18 Sep 2010 - 12:16 pm | प्रभो

ती नजाकत बडवायजरची...किंगफिशरची नाही काही... ;)

शेखर's picture

17 Sep 2010 - 6:25 pm | शेखर

इंद्रराज आल्या पासुन डॉनरावानी मोठे प्रतिसाद देणे बंद केले आहे. ;)

Pain's picture

20 Sep 2010 - 6:39 am | Pain

खरे आहे तुमचे. आयडी २ झाले म्हणून काय झाल, माणूस तर... :D

(दोघांनीही हलकेच घ्या)

इन्द्र्राज पवार's picture

20 Sep 2010 - 9:27 am | इन्द्र्राज पवार

"(दोघांनीही हलकेच घ्या)"....

~~ ग्रेट. मी तर हलके घेतले पेनभाऊ....तरीही मला डॉनरावांच्या रेशन कार्डात घातल्यामुळे माझा सन्मान झाला असे मी मानतो, पण त्याचवेळी माझे तिथे नाव पाहून जर डॉनराव संतापाने लालबुंद झाले तर?

आता तुम्ही आणि डॉनराव, बघून घ्या....आम्ही काठावर बसून मज्जा बघतो.

इन्द्रा

चिंतातुर जंतू's picture

17 Sep 2010 - 6:26 pm | चिंतातुर जंतू

इंद्रांच्या रसग्रहणाविषयी थोड्या शंका आहेत. एकाच प्रतिसादात सगळ्या शंका मांडणं कठीण जाईल म्हणून मला जमेल तशा हळूहळू त्या मांडत जाईन.

एका विशिष्ट कालखंडातील ग्रामीण (जिथे खरा भारत आहे असे मानले जाते) भागातील तरुणाईचे तो प्रतिनिधित्व करीत आहे.

नायक-निवेदक विशिष्ट स्थळ-काळातल्या तरुणाईचा प्रतिनिधी वाटत नाही. तर एका विशिष्ट व्यक्तीचं ते चित्रण वाटतं. अशा परिस्थितीतल्या किती जणांना 'व्यवस्थे'विषयी (आणि पर्यायानं भारतीय संस्कृतीविषयीच) निवेदकासारख्या शंका पडल्या असतील? मुळात किती जणांना त्या चौकटीकडे तटस्थतेनं पाहून तिचं पृथक्करण करता आलं असेल? कारण निवेदक निव्वळ गावगाड्यातले प्रसंग चितारत नाही, तर एका तत्त्वचिंतनात्मक व्यवस्थेचं (ज्याला नेमाड्यांच्या लेखी भारतीय संस्कृती म्हणता येईल) चित्रण आणि मूल्यमापन करतो आहे. किती जणांनी वेगळा मार्ग चोखाळला असेल? निवेदक घरच्यांचा विरोध/अनाकलन स्वीकारून आपला परंपरागत व्यवसाय आणि भूमिका झुगारतो. तो ते एका विशिष्ट भूमिकेतून हेतुपुरस्सर करतो. प्रवाहात वाहून जाणार्‍या इतरांहून तो निश्चितच निराळा आहे. या अर्थानं 'कोसला'मधला हजारांतल्या ९९९पैकी एक असलेल्या नायकाहून हा निश्चितच वेगळा वाटतो. तुम्हाला काय वाटतं?

इन्द्र्राज पवार's picture

18 Sep 2010 - 1:13 am | इन्द्र्राज पवार

"एकाच प्रतिसादात सगळ्या शंका मांडणं कठीण जाईल म्हणून...."

~~ असे श्री.चिंजं यांनी लिहिल्यामुळे मला वाटले की, पुढील काही तासात ते पुढील एखाददुसरी शंका मांडतील व त्यांच्यासह प्रतिसाद (मी 'शंकानिरसन' जाणीवपूर्वक म्हणत नाही...कारण ही एक वैचारिक बैठक आहे, जिथे फक्त चर्चा अपेक्षित आहे....शंका मलाही असू शकतील...पण त्या विचारमंथनातूनच शमणे शक्य आहे) द्यावा असे ठरविले होते. पण आता इथे त्यांच्या किमान या शंकेला प्रतिसाद लिहित आहे.

नायक-निवेदक विशिष्ट स्थळ-काळातल्या तरुणाईचा प्रतिनिधी वाटत नाही. तर एका विशिष्ट व्यक्तीचं ते चित्रण वाटतं.

कादंबरीच्या धाटणीमध्ये [वा एकूणच ललितलेखनात] असे जाणीवपूर्वक लेखक कधीही म्हणत नाही की मी अमूक एका पिढीचा, गटाचा, विचाराचा प्रतिनिधी आहे. ही समजूत वाचक [व बर्‍याच अंशी टीकाकार त्यावर लादत असतात] करून घेतो. 'कोसला' ही पांडुरंग सांगवीकर खानदेशातल्या एका तरूणाची कहाणी जो कॉलेज शिक्षणासाठी पुण्यात आला, राहिला, रमला, सुरेश बापट, इचल्यासारखे इरसाल मित्र, बुंदी सारखी वर्गमैत्रीण यांच्याबरोबर काढतो. चार वर्षे गेटच्या आतील, वर्गातील, हॉस्टेलवरील आणि बाहेरील जीवनाचे त्याचे परीने त्याने आकलन केले. इतकी सोपी जर ही चार वर्षे होती तर तशी त्या सालातील हजारो विद्यार्थ्यांनीही पाहिली असतीलच ना? मग एका रात्रीत हा उदाहरणार्थ वगैरे पांडू सगळ्या तरूणाईचा प्रतिनिधी कसा काय झाला? १९६३ च्या पहिल्या वाचनापासून ते आजतागायत कोणताही साक्षेपी टीकाकर [आणि बड्याबड्या लेखंकाची फौजदेखील] तसे सांगण्यात अजिबात कुचराई करीत नाही. 'हिंदू' तील खंडेरावबद्दल मी जे वर 'पांडू' च्या लाईनमध्ये जो विचार मांडला आहे, त्यावर असे म्हणू या की, निदान आज तरी तो माझा विचार आहे.

"विशिष्ट व्यक्तीचं ते चित्रण वाटतं." ~~ म्हणजे नेमकं काय मनात आहे तुमच्या? व्यक्तीचं की विचाराचं? व्यक्ती म्हटली तर खुद्द नेमाडे स्वतःच म्हणतात ही सर्वसामान्याची गोष्ट आहे ... असा सामान्य की जो म्हणतो आपल्या वडलांनी आपल्याला हा चांगलाच खो दिला - आयुष्यभराचा. आपण बरे एकुलते एक सुपुत्र सापडलो. आता आपल्याला खो द्यायला कुणीच नाही. ~ हे चित्रण या देशातील एका विशिष्ट नसून तर लाखो तरूणांचं आहे.

अशा परिस्थितीतल्या किती जणांना 'व्यवस्थे'विषयी (आणि पर्यायानं भारतीय संस्कृतीविषयीच) निवेदकासारख्या शंका पडल्या असतील? मुळात किती जणांना त्या चौकटीकडे तटस्थतेनं पाहून तिचं पृथक्करण करता आलं असेल?

~~ मान्य, हे सर्वांनाच जमत नाही...म्हणून तर 'मास' ला 'मोझेस' लागतो, जो त्यांच्यातीलच असला पाहिजे. मोझेस हा काय आकाशातून अवतरला नव्हता तर त्यांच्यासारख्याच भावभावनेचा भुकेला होता. फक्त त्याला इतरापेक्षा दोनचार गोष्टी जादाच्या समजत म्हणून नेतृत्व त्याच्याकडे चालून आले. त्याच्या मनी या इतक्या महाप्रचंड अशा अनुयायांची जी "व्यवस्था" होती तिच्याकडे तो तटस्थतेनं पाहू शकत नव्हता. खंडेरावही भोवतालची शतकी अडगळ पाहत असताना त्याचे पृथःकरण तो (त्याच्या क्षमतेनुसार) करू शकतो...चुकीचे वा योग्य....आणि त्याच्यासमोर त्या ठाकल्या असल्याने त्याला सामोरेही जातो...त्याच्याबरोबरीच्यांनी आपली सीमारेषा वेळीच ओळखली (उदा.रघू नायक) आणि वेळीच थंडही झाले, म्हणून खंडेरावाच्या धडपडीचे महत्व कमी होऊ शकत नाही. तो तिथेही एका गटाचे नेतृत्व करतोच.

निवेदक घरच्यांचा विरोध/अनाकलन स्वीकारून आपला परंपरागत व्यवसाय आणि भूमिका झुगारतो. तो ते एका विशिष्ट भूमिकेतून हेतुपुरस्सर करतो.

~~ इथे 'झुगारतो' या तुमच्या शब्दप्रयोगाला "बंडखोरी"ची टिंट आहे, जी लेखकाला अपेक्षित नाही. "खंडेराव आपला परंपरागत व्यवसाय आणि भूमिका स्वीकारत नाही..." हतबलता दर्शवितो म्हणा हवंतर. लक्षात घ्या ना भावडू, ना वडील ना बहिणींचे नवरे त्याला 'तू हे केलेच पाहिजेस' असं कंपल्शन करीत नाहीत...अपेक्षा करतात हे सत्य. उलटपक्षी 'तो आता हे करणारच...शेवटी घराण्याची इस्टेट आहे ती..." असं गृहीतक मांडतात. त्यामुळे ते न स्वीकारण्याच्या भूमिकेत ज्यावेळी खंडेराव जातो, त्यावेळी तो त्या जबाबदारीपासून दूर जातो... सर्वसामान्य विचाराचा एखादा तरूण करेल तसा....बंडखोरी करण्यासारखा केशवसुत काकडा तो हाती घेत नाही....म्हणूनच हे सर्वसामान्य व्यक्तीचे गोष्टीवेल्हाळ चित्रण आहे, जे अपार अडगळींने भरले आहे.

प्रवाहात वाहून जाणार्‍या इतरांहून तो निश्चितच निराळा आहे. या अर्थानं 'कोसला'मधला हजारांतल्या ९९९पैकी एक असलेल्या नायकाहून हा निश्चितच वेगळा वाटतो. तुम्हाला काय वाटतं?

~~ हे ९९९ जे आहेत ते "एक झुंज वार्‍याशी..." असे कधीच म्हणू शकत नाहीत, कारण त्यांना माहित आहे की समाजात नायक एकच असतो तर बाकीची प्रवाहातील ढालप्या....गटांगळ्या खाणार्‍याला आहे त्या क्षीण ताकदीने सहारा देण्याचे कार्य करणे, किंवा त्याच्याबरोबरच प्रवाहपतीत होणे, ही जीवनाची अटळपणे भोगावी लागणारी शिक्षा...जे त्यांच्या ललाटी लिहिले गेले आहे ते त्या त्या वेळी भोगणारच.

~~ खंडेराव मोरगांवकर तरी काय करतो? भोगतोच ना अटळपणे सर्वकाही...? मग त्याचे चित्रण हे विशिष्ट व्यक्तीच चित्रण न राहता ९९९ जणांचं होतं.

इन्द्रा

शहराजाद's picture

18 Sep 2010 - 3:50 am | शहराजाद

सुरेख परीक्षण.
मी पुस्तक वाचले नसल्यामुळे त्यावर मत नाही. रोचक चर्चा वाचत आहे.

क्रेमर's picture

18 Sep 2010 - 6:59 am | क्रेमर

गाब्रिएल गार्सिआ मार्केझचं 'हंड्रेड यर्स ऑफ सॉलिट्यूड' हे एक ठळक उदाहरण पटकन आठवतं. 'हिंदू'मध्ये नेमाड्यांचा प्रयत्न असा काहीसा असावा.

तुलनात्मक-पूर्वग्रहीत परीक्षणामूळे एरवी पटू शकणार्‍या मुद्द्यांविषयी संभ्रमित झालो. '...सॉलिट्यूड' आणि 'हिंदू..' यांत किमानपक्षी शैलीच्या निराळेपणामू़ळे संभवू शकणार्‍या वर्णनाच्या भुमितीवैविध्याविषयी भाष्य हवे होते.

चिंतातुर जंतू's picture

18 Sep 2010 - 4:08 pm | चिंतातुर जंतू

प्रश्नः 'कोसला'चा निवेदक सर्वसामान्य तरुणाईचं प्रातिनिधित्व का करतो? 'हिंदू'चा ते का करत नाही?

उत्तरः 'कोसला'च्या निवेदकाला समाजमान्य फूटपट्ट्यांनुसार काहीही जमलेलं नाही. उलट 'हिंदू'मध्ये निवेदकाच्या बापाची लाख केळ्यांची शेती आहेच; शिवाय त्याला डेक्कन कॉलेजात सांखळियांसारख्यांकडे पुरातत्वशास्त्रात पीएचडी करायला मिळते, त्याच्या कामाचं कौतुकही होतं; मंडीसारखी हुशार, पाश्चिमात्य बाई पण त्याला हुशार मानते; आणि तो संवेदनशीलही आहे, मुस्लिम-महारमांगांना तो जवळचंही मानतो. म्हणजे जवळजवळ हिंदी सिनेमातला हीरोच झाला की हो - पुरखोंकी जायदाद, चिकनाचोपडा, तरुण मुलींना इम्प्रेस करणारा, चांगल्या घरचा, गरिबांचा कनवाळू आणि शिवाय बी.ए. फर्स्टक्लासफर्स्ट - असंच काहीसं नव्हे का हे? या मानानं पांडुरंग सांगवीकर खूपच साधा वाटतो, कारण संवेदनशीलता आणि व्यवहारात उपयोगी न पडणारी अचलाख हुशारी आणि विनोदबुध्दी हेच काय ते त्याच्याकडे आहे. म्हणून त्याला काहीही जमत नाही. याउलट खंडेराव चाकोरीबध्द होण्याला शरण जातो म्हणून केवळ तो सर्वसामान्य होत नाही. मग त्याच्यात आणि गावातल्या त्याच्या इतर सवंगड्यांत वा नातेवाईकांत फरकच राहणार नाही. 'कोसला'चा निवेदक साधं चाकोरीबध्दसुध्दा धड जगू शकत नाही. तो आपल्या कोशात गुरफटून जातो. म्हणून तो अतिसामान्य (सामान्यांहूनही सामान्य) आहे. तीच त्याची (आणि कादंबरीची) ताकद ठरते. असं पात्र केंद्रस्थानी असणं तेव्हा अनोखं होतं. हे (१९६३ मधलं) नेमाड्यांचं कौशल्य आहे.

असो. आता इतर मुद्द्यांकडे वळतो.

'हिंदू' कादंबरीकडे.....ती ३०-३२ वर्षांनी प्रकाशित झाली आहे म्हणून काही तरी जगावेगळी आहे, अशी कल्पना (किंवा पूर्वग्रह) करून पाहिले गेल्यास वाचकाला तिची जातकुळी 'चांदोबा' पेक्षा पुढची एक पायरी धर्तीच्या लिखाणापैकी आहे हेच जाणवत राहील.

९९% गोष्टींनी होणारा माझा भ्रमनिरास हा माझ्या सवयीचाच भाग आहे त्यामुळे तो सोडून द्या; त्यात काही विशेष नाही (ह. घ्या). कादंबरी किती वर्षांनी प्रसिध्द झाली हाही मुद्दा नाही. नेमाडे आज थोर 'लेखकराव' आहेत; ते 'चांदोबा'छाप लेखक नाहीत. हे बरोबर ना? एकदा हे मान्य केल्यावर मग हा प्रश्न येतो की 'हिंदू' त्यांच्या लौकिकाला साजेशी आहे का? मराठी साहित्याचा इतिहास 'कोसला'शिवाय लिहिला जाऊ शकत नाही. कादंबरीचा भव्य पट पाहता 'हिंदू'मागेही तसंच अचाट काहीतरी करण्याची महत्त्वाकांक्षा दिसते. असा प्रयत्न आजवर मराठी साहित्यात झाला नसावा असं मी म्हणतोच आहे. फक्त प्रयत्न फसलेला आहे त्यामुळे 'हिंदू'चं मराठी साहित्येतिहासातलं स्थान तितकं महत्त्वाचं नसणार. मला वाटतं या बाबतीत आपण सहमतच आहोत. हो ना?

श्री.भालचंद्र नेमाड्यांनी 'हिंदू' ही कादंबरी म्हणून पुढे आणली असली तर प्रत्यक्षात तो एक इतिहास आहे, आणि इतिहास म्हटले की एक नेमकी चौकट आली, चौकटीसाठी सुतारकाम आले, नियम आले, आणि या नियमांना भटकू न देता 'शतकात जे काही दिसले' ते गोष्टीरूपात सांगितले, इतपत नजरेने 'हिंदू' कडे पाहिल्यास अपेक्षाभंगाच्या आठ्या पडण्याची शक्यता धूसर होईल.

माफ करा, पण इतिहासाच्या चौकटीत तर हे लिखाण कोणत्याच कसाला उतरणार नाही. कारण इतिहासकारांनी ('कोसंबी' कूळ) भारतीय जनसामान्यांचा इतिहास खूपच चांगला मांडलेला आहे. नेमाडेंनी मांडलेली ही गावगाड्याची, जातींची उतरंड, आणि त्यांतल्या नात्यांची उलगडलेली ती वीण, आणि त्यांनी मांडलेला त्यामागचा विचार (की ही वीणच खरी तर भारतीय तत्त्वविचारांना कशी आधारभूत आहे), हे सर्व असं मांडणारे ते पहिले कादंबरीकार असतीलही कदाचित, पण पहिले इतिहासकार तर खचितच नाहीत. सांगण्यासारखं नेमाड्यांपाशी जे आहे, ते भारतीय तत्त्वविचार किंवा इतिहास पातळीवर नवीन नाहीच आहे. मग शैली कोणतीही (आणि कितीही रसाळ) निवडा.

आणि 'जे काही दिसले ते सांगितले' असं झालं आहे यामुळेच ती 'कादंबरी' म्हटली तरीही उठावदार होत नाही. कारण स्वतःच्या अनुभवांना कादंबरीच्या आशयाशी सुसंबध्द अशा रीतीनं रचता आणि जोडता येणं या कौशल्याचा तर इथं अभावच आहे. म्हणूनच तर कॉलेजविश्वाच्या 'कोसला'छाप (आणि त्याहून कमी विनोदी, अधिक हिणकस अशा) पोरकट वर्णनांमध्ये शे-दोनशे पानं सहज वाया गेली आहेत. श्री. पु. भागवतांसारखा साक्षेपी संपादक मिळता तर हा प्रक्षिप्त भाग कमी झाला असताही कदाचित, आणि मग कादंबरीतल्या ढोबळ चुकाही नष्ट झाल्या असत्या. मग ती थोडी अधिक उंची तरी गाठू शकली असती. तेवढी कच्ची सामग्री त्यात मुळात आहेच. म्हणून तर तो 'स्तुत्य प्रयत्न' आहे आणि म्हणूनच ती दवडलेली संधी आहे.

खुद्द लेखकाचा तरी असा कुठे आग्रह आहे की कादंबरीच्या रचनेमागे काहीतरी विचार करून ती लेखनबद्ध केली आहे? आहे तो तो एक गुंतवळ सोडविण्याचा प्रयत्न....तो प्रयत्न म्हणजे जगण्याची धडपड.

जगण्याची धडपड म्हणून पाहिलं तर मग ते फारच मर्यादित होतं. याहून 'कोसला' आणि चांगदेव चतुष्ट्यातली जगण्याची धडपड फारच ताकदीची आहे. पाहा: 'कोसला'तली बहिणीच्या मृत्यूनंतरची अजिंठ्याची भेट, 'बिढार'मधला गावात वीज नसण्याचा भाग, किंवा मुलीला पाहायला जाण्याचा प्रसंग. त्या ताकदीचं इथं काहीच नाही. बरं, मग पुरातत्वात आणि इतिहासात इतकी पानं का खर्च करायची? कादंबरीचा पट निव्वळ जगण्याच्या धडपडीपुरता लेखकालाच ठेवायचा नाही आहे. त्याला कुणब्याच्या, वारकर्‍यांच्या, वेश्यांच्या, अगदी पाकिस्तान्यांच्याही जाणिवांमागे असणारी हजारो वर्षांची कारणमीमांसा उलगडायची आहे. ते सर्व मिळून आपला समाज बनतो; त्या सर्वांनी आपली संस्कृती घडवलेली आहे; जाणिवा घडवलेल्या आहेत. हे आपल्याला रोजच्या धडपडीत कळत नाही. म्हणून असा निवेदक हवा. तो पुरातत्वज्ञ आहे म्हणून मोहेंजोदारोपर्यंत ते नेता येतं आणि त्याच्या तोंडी मोरगावातल्यांना माहीत नसलेला इतिहास घालता येतो. त्याची आत्या महानुभावांबरोबर उत्तरेत नाहीशी झाली म्हणून ते खानदेशापुरतंच राहत नाही. म्हणून कादंबरीत महानतेच्या खुणा तरी आढळतात. नाहीतर काय, कोसलानंतर पुष्कळच जणांच्या जगण्याच्या धडपडी मराठीत आलेल्या आहेत - गावकुसाबाहेरच्यांच्या, स्त्रियांच्या, शहरी उत्तर-आधुनिकतेशी झगडणार्‍यांच्या, समलैंगिकांच्या, आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या...

असो.

इन्द्र्राज पवार's picture

20 Sep 2010 - 1:05 am | इन्द्र्राज पवार

श्री.चिंजं यांच्या वरील प्रतिसादावरून एक गोष्ट नक्की होत आहे की, ते 'हिंदू' च्या गुणावगुणांचा विचार करणार असतीलच (आणि करतात, हे तर सिद्ध झाले आहेच...) तर ते 'कोसला'ला कमरेवर बसवूनच. साक्षेपी वाचकाने असे करणे म्हणजे सचिन तेंडुलकरने मैदानात उतरल्यावर तो शतकी खेळी करूनच परतणार हे साध्य आणि मग त्या अनुषंगाने त्याच्या खेळीचे सूत्र त्याने मांडल्यासारखे होईल. मग तसे जर घडले नाही, तर सचिनची प्रत कमी झाली असे मानण्यात काहीच अर्थ नाही. समजा 'कोसला' ही कादंबरी अस्तित्वातच नसती आणि नेमाडे यांनी आपली पहिली कादंबरी म्हणून "हिंदू" च आणली असती तर वाचकाने आस्वादाचा कोणता तोल सांभाळला असता? दोन्ही कादंबर्‍यांचे मेरीट वेगळे आहे, जरी काही ठिकाणी पांडुरंग आणि खंडेराव हातमिळवणी करतात असे दिसत असले तरी. "कोसला" चे कौतुक करताना मी स्वतःला आवरू शकत नाही पण "हिंदू" चे परिशीलन करताना कोसलाला आडवे येऊ देत नाही. याचा अर्थ असा बिलकुल नाही की, हिंदू ही कोसलाच्या तोडीची आहे. 'कोसला' ही मराठी वाड्मय विश्वातील एक चमत्कार आहे, एक अढळ असा माईल स्टोन आहे, जिच्या उच्चतेबद्दल आणि काळाच्या कसोटीवर टिकलेले तिचे अस्तित्व हा टीकाकार आणि अभ्यासक यांना सातत्याने भुरळ घालणारा आहे. 'सांगवीकरा'ने मिळविलेले प्रेम 'मोरगावकर' कदापिही मिळवू शकणार नाही, हे सांगायला कुठल्या पोपट ज्योतिषालादेखील बोलाविण्याची गरज नाही. खुद्द नेमाडे खंडेरावाची रंगरंगोटी करताना पांडुरंगचेच ब्रश वापरतात, यातच कोसलाचे यश आणि हिंदूचे अपयश ठसले आहे.

मग 'हिंदू' ला दूर करायचे?
~ नाही. मी तरी तसे करणार नाही. कारण परत तेच...मी तिचे अस्तित्व एक स्वतंत्र रूप म्हणून स्वीकारत आहे, जरी ती मला अगदी 'सात सक्कं त्रेचाळीस', 'पुत्र', 'धग', 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी..", यांच्या पंक्तीत आणावी अशी वाटत नसली तरी. हिंदूच्या पटावर (१०० वर्षाचा इतिहास) प्रकाशनपूर्व काळात झालेला गलबला त्या कादंबरीच्या यशाला मारक ठरत आहे असे निदान आज तरी दिसत आहे. कारण श्याम मनोहरांच्या स्टाईलमध्ये वाचक जेव्हा 'उत्सुकतेने मी वाचत गेलो..' असे म्हणतो, त्यावेळी मोहोनज्दोडोच्या उत्खनन टीमबरोबर सुरू झालेले कथानक हिंदूच्या इतिहासाचा मागोवा घेताघेता ते धाडकन मोरगावात येऊन थांबते आणि एव्हाना खुद्द लेखकालादेखील अपेक्षित नसलेली कथानकातील अपरिहार्यता त्याला (पक्षी : खंडेरावाला..) कायमचा पारंपारीक इस्टेटीच्या झमेल्यात आणून ठेवते. अर्थात जर नेमाडे आणि भटकळ वारंवार सांगत आले आहेत की 'हिंदू' हे सुद्धा बिढारसारखे एक चतुष्ट्य आहे, आणि ते जर सत्य असेल तर मग वाचकच अगतिक आहे कारण त्याच्या मनात 'हिंदू'च्या चित्राबद्दल आलेले धुके दूर होण्यासाठी त्याला वाट पाहणाखेरीज दुसरे काहीच करता येणे शक्य नाही....फक्त आता नेमाडे यांनी परत ३० वर्षाचा असह्य असा वेळ घेऊ नये इतकेच म्हणतो.

"पोरकट वर्णनांमध्ये शे-दोनशे पानं सहज वाया गेली आहेत. श्री. पु. भागवतांसारखा साक्षेपी संपादक मिळता तर हा प्रक्षिप्त भाग कमी झाला असताही कदाचित..."

~~ ६०० ऐवजी खरे तर हिंदू ला ३५० पानाच्या मर्यादेत सहज बसविता आले असते, हे मान्य...आणि त्यासाठी श्री.श्री.पु.भागवतासारख्या साक्षेपी संपादकाचीही गरज नाही. दुसर्‍या/तिसर्‍या आवृत्तीत स्वतः नेमाडे [मनात आणले तर] हे एडिटिंग करू शकतात (धंद्याचे बेरकेपणाचे गणित मांडून भटकळांनी बिढारमधून गरज नसताना 'हूल' चे पिल्लू बाहेर काढलेच ना? मग त्याच सूरात आता हिंदूला ठिकठाक करण्यासाठी भटकळदेखील वस्तरा घेऊ शकतात, मनात आणले तर). बापाच्या मयताचे आणि त्यासंदर्भातील आपल्या संस्कृतीत सांगितलेल्या धर्मनियमांचे पालन याचे शेवटीशेवटी आलेले वर्णन 'अती' झाले आहे हे मी मान्य करतोच. पण जर का नेमाडे यांच्या विचारसरणीत ती एका परंपरेच्या तत्वज्ञानाची सांगड असेल तर ते वर्णन वाचल्याशिवाय वाचकाला गत्यंतर नाही.

शेवटी वर म्हटल्याप्रमाणे संस्कृती संस्कृतीचे ढोल बडवत खंडेरायाचा वारू खुंट सोडून फार भलतीकडे भरकटलेला नाही आणि जरी काही नेमाडेप्रेमींना तसे तो भरकटलेला आहेच आहे असे वाटत असले तरी, आशा करू या की, पुढच्या भागात लेखक त्याला दावणीला आणून लावतील.

इन्द्रा

चिंतातुर जंतू's picture

20 Sep 2010 - 2:31 pm | चिंतातुर जंतू

श्री.चिंजं यांच्या वरील प्रतिसादावरून एक गोष्ट नक्की होत आहे की, ते 'हिंदू' च्या गुणावगुणांचा विचार करणार असतीलच तर ते 'कोसला'ला कमरेवर बसवूनच.

खरं सांगायचं तर असं करण्याची माझी अजिबातच इच्छा नव्हती. पण नेमाड्यांनीच 'हिंदू'मध्ये एक अडचण उभी ठाकवली आहे. ती म्हणजे इतक्या वर्षांनतर, एका पूर्ण वेगळ्या विषयावरच्या कादंबरीत, आशयाला अजिबात गरज नसतानाही, त्यांच्या मनातल्या पांडुरंग सांगवीकराला ते संपादित करू शकत नाहीत. त्यामुळे त्याला टाळून कादंबरीचा आस्वाद घेणंच अशक्य होतं. तसं शक्य झालं असतं तर आनंदच झाला असता.

मोहोनज्दोडोच्या उत्खनन टीमबरोबर सुरू झालेले कथानक हिंदूच्या इतिहासाचा मागोवा घेताघेता ते धाडकन मोरगावात येऊन थांबते आणि एव्हाना खुद्द लेखकालादेखील अपेक्षित नसलेली कथानकातील अपरिहार्यता त्याला (पक्षी : खंडेरावाला..) कायमचा पारंपारीक इस्टेटीच्या झमेल्यात आणून ठेवते.

बापाच्या मयताचे आणि त्यासंदर्भातील आपल्या संस्कृतीत सांगितलेल्या धर्मनियमांचे पालन याचे शेवटीशेवटी आलेले वर्णन 'अती' झाले आहे हे मी मान्य करतोच. पण जर का नेमाडे यांच्या विचारसरणीत ती एका परंपरेच्या तत्वज्ञानाची सांगड असेल तर ते वर्णन वाचल्याशिवाय वाचकाला गत्यंतर नाही.

कथानकाच्या या प्रवासाविषयी मला मूलत: आक्षेप नाही. उलट, मी असं म्हणेन की नेमाड्यांना भारतीय संस्कृतीविषयी जे म्हणायचं आहे त्याला हे सर्व पूरक आहे. भारतीय उपखंड व्यापून राहिलेल्या एका प्रचंड मानवसमूहाच्या जाणिवांमधला मोठा भाग हा (कुठेही गेलं तरी) एकसारखाच आहे. सर्व अर्थानं सर्वसामान्य/अतिसामान्य अशा एका खेड्यात त्याचं प्रतिबिंब कसं पडतं, हे त्यांना दाखवायचं आहे. भारतीय उपखंडात कुठेही तो सारखेपणा कसा दृग्गोचर होत असतो, हे त्यातून त्यांना अधोरेखित करायचं आहे. लोकपरंपरा, आपला गाव, कुटुंब, कुणब्याचा वंशपरंपरागत व्यवसाय अशा, वरवर पाहाता (त्या सारखेपणाहून) वेगळ्या वाटणार्‍या गोष्टींपासून दूर गेलेला आणि पुरातत्वज्ञ होऊ पाहाणारा निवेदक उत्खनन करून ज्या भारतीय संस्कृतीची मुळं शोधतो आहे, ती मुळं त्याला नकोशा झालेल्या या गोष्टींमध्येच आहेत हे ठसवण्यासाठी नेमाडे बापाच्या मृत्यूच्या प्रसंगाचा आणि त्याला अनुलक्षून येणार्‍या नंतरच्या संस्कारांचा वापर करतात. 'रुढ इतिहासाच्या चौकटीनुसार माझं मूळ मोहेंजोदारोत आहे, पण तिथली लिपी अनाकलनीय आहे. याउलट माझ्या इतिहासाचं खोलवर रुजलेलं मूळ खरं तर माझ्या परिसरात, माझ्या मातीत, माझ्या संस्कारांतच आहे. फक्त तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे.' ही दृष्टी हळूहळू निवेदकाकडे कादंबरीच्या अंताशी येते. कादंबरीतला अभिनिवेश वगळला, तर हीच कोसंबी कुळाची इतिहास-दृष्टी आहे.

६०० ऐवजी खरे तर हिंदू ला ३५० पानाच्या मर्यादेत सहज बसविता आले असते, हे मान्य...आणि त्यासाठी श्री.श्री.पु.भागवतासारख्या साक्षेपी संपादकाचीही गरज नाही. दुसर्‍या/तिसर्‍या आवृत्तीत स्वतः नेमाडे [मनात आणले तर] हे एडिटिंग करू शकतात (धंद्याचे बेरकेपणाचे गणित मांडून भटकळांनी बिढारमधून गरज नसताना 'हूल' चे पिल्लू बाहेर काढलेच ना? मग त्याच सूरात आता हिंदूला ठिकठाक करण्यासाठी भटकळदेखील वस्तरा घेऊ शकतात, मनात आणले तर).

'मनात आणले तर' हे महत्त्वाचं. नेमाड्यांचं वय आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर असं खेदानं म्हणावं लागतं की आता हे होणं अशक्य वाटतं. कारण त्यांच्यातला पोरकटपणा त्यांच्यातल्या साक्षेपी साहित्यिकाला पुरून उरतो आहे, हे सातत्यानं दिसत आहे. उदा: प्रकाशनसोहळ्याविषयी लोकसत्तेत आलेला हा वृत्तांत पाहा.

विरामचिन्हं का टाळली आहेत यावरची त्यांची कोटीबाज आणि गंभीर स्पष्टीकरणं वाचा. मला विचाराल तर या विरामचिन्हं टाळण्याच्या प्रकारानं कादंबरीला कसलीही समृध्दी येत नाही. एक हट्टी पोरकटपणा याशिवाय त्याला काही मूल्य नाही. पण तेच नेमाड्यांचं स्वभाववैशिष्ट्य आहे.

आता जेम्स लेनविषयी ते काय म्हणतात, ते पाहा:

जेम्स लेन वादाबद्दलही नेमाडे यांनी रोखठोक मत मांडले. ते म्हणाले मूळात अमेरिकन माणसाने शिवाजींवर लिहू नये. लिहिले तर तिकडेच काय ते छापा, त्या प्रती इकडे का पाठवता, असा सवालही त्यांनी विचारला.

इतकी वर्षं जगल्यानंतरही आणि इतकं जग पाहिल्यानंतरही अजून हेच विचार असतील तर मग आता यापुढे संस्कृतीचं मूलगामी उत्खनन आणि त्यानंतर मग आकलन आणि मग त्याचं कलाकृतीतून प्रतिभाशाली सादरीकरण कसं आणि कधी होणार? असा प्रश्न पडतो.

असो. एकंदरीत, आयुष्याविषयीचा आणि नेमाड्यांच्या पुढच्या प्रवासाबद्दलचा तुमचा आशावाद माझ्यापाशी नाही, पण तो आशावाद कौतुकास्पद आहेच. तो खरा ठरला तर मराठी साहित्यात मोलाची भरच पडेल, म्हणून तो खरा ठरो या शुभेच्छा!

इन्द्र्राज पवार's picture

21 Sep 2010 - 8:52 pm | इन्द्र्राज पवार

इतपत चर्चा केल्यानंतर मला वाटते की, या विषयावर आपण दोघे जरी नदीच्या आरपार उभारलो असलो तरी मूळ प्रवाहाशी आपण नाळ तोडू इच्छित नाही. "हिंदू" कशी झाली आहे त्यापेक्षा ती कशी फसलेली आहे याबद्दल विविध ठिकाणी होत असलेल्या 'रिपोर्ताज' च्या प्रती लेखीतोंडी रा.रा.भालचंद्र नेमाडे यांच्याकडे निश्चितच गेल्या आहेत. त्यामुळे आशा आहे की पुढील भागात ते या मतातंराची नोंद घेतील.

तुमच्या वरील प्रतिसादाविषयी माझे मत :

१. "पांडुरंग सांगवीकराला ते संपादित करू शकत नाहीत. त्यामुळे त्याला टाळून कादंबरीचा आस्वाद घेणंच अशक्य होतं."
~ हे तुमचेच नव्हे तर माझेही मत होऊ शकते, पण मी जसे वर म्हणालो आहे तसे 'कोसला' बाजूला ठेवूनच मी मोरगांवकराबरोबर मोहोनजोदडो ते परत असा प्रवास केला....तो अर्थातच पूर्णपणे सफल झाला हा दावा मी बिलकुल करणार नाही; कारण प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर कोपर्‍यावर लपून बसलेला पांडुरंग वाकुल्या दाखवत होताच. इतकेच काय पण मराठवाडा युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये खंडेराव आल्यावर त्याच आवारात मला चांगदेव पाटील आणि नामदेव भोळेदेखील हसतहसत सामोरे आले. त्यांच्याशी हातमिळवणी करणे क्रमप्राप्त होते.

काय करणार ? कादंबरीच्या प्रेमात पडायचे तर ह्या गोष्टी टाळता येतच नाहीत. [शिरीष कणेकर म्हणतात, "मधुबाला पाहिजे असेल तर तुम्हाला भारत भूषण आणि प्रदीपकुमार सहन करावेच लागतील." ~ तिच तर्‍हा !]

२. "भारतीय उपखंड व्यापून राहिलेल्या एका प्रचंड मानवसमूहाच्या जाणिवांमधला मोठा भाग हा (कुठेही गेलं तरी) एकसारखाच आहे...."

~~ मग मी तरी काय वेगळं म्हणतोय, चिंजं ? फार मोठा कॅनव्हास आहे हा जाणिवेचा आणि त्यातील सधनता अनुभवायची असेल तर त्यासाठी स्केचेसचे दोनचार इकडेतिकडे फराटे मारून ते रसिक वा समीक्षकापुढे ठेवता येणार नाही. रेम्ब्रॉ ऑईलसाठी वापरत असलेल्या गडद तपकिरी [डार्क ब्राऊन] रंगातच एक किमया होती जो ती फार विस्ताराने वापरत असे [मला चित्रकलेतील फारसे काही कळत नाही, पण त्यावरील साहित्य मात्र खूप वाचले आहे, त्यामुळे हे नाव आणि त्याच्या चित्रांची वैशिष्ट्ये थोडीफार माहित आहेत], त्याच लयीत एखादा लेखक इतका मोठा आवाका असलेला विषय कागदावर मांडतो त्यावेळी त्याला त्या प्रचंड मानवसमूहाच्या जाणिवा व्यक्त करण्यासाठी विविध प्रयोग करावेच लागतात....काही वेळा यश येते, पण ज्यावेळी अपयश येते ते देखील तितकेच भव्य असावे लागते. शेक्सपीअरला सारे इंग्लंड डोक्यावर घेऊन नाचते असे म्हटले जाते, खरेही आहे... पण त्याच्या सर्वच नाटकांनी मी वेडावून गेलो आहे असे त्याच्या कट्टर शिष्यही म्हणणार नाही. (असो...हे थोडे विषयांतर झाले.)

३. त्यांच्यातला पोरकटपणा त्यांच्यातल्या साक्षेपी साहित्यिकाला पुरून उरतो आहे, हे सातत्यानं दिसत आहे. उदा: प्रकाशनसोहळ्याविषयी लोकसत्तेत आलेला हा वृत्तांत पाहा.

~~ वेल... तो वृत्तांत मी त्या प्रकाशित तारखेला वाचला होताच. पण खुल्या मंचावर शेकडो लोकांच्या समवेत होत असलेल्या चर्चेला एक गप्पाटप्पाचे स्वरूप आलेले असते त्यामुळे तिथे नाही म्हटले तरी "लाईट एन्व्हायरनमेन्ट" असतेच असते. मग अशा स्थितीत त्यांनी घेतलेल्या प्रश्नोत्तराच्या फिरक्यामुळे ते पोरकट ठरतात, हे मान्य करणे थोडे जड जाते. पण अर्थात लोकशाही तत्वानुसार तुम्हाला मत स्वातंत्र्य असल्याने मी तुम्हाला तुमच्या त्या मतासंदर्भात विरोध करीत नाही. वैयक्तिक पातळीवर मला त्यात पोरकटपणा दिसला नाही, इतकेच.

४. "नेमाड्यांच्या पुढच्या प्रवासाबद्दलचा तुमचा आशावाद माझ्यापाशी नाही, पण तो आशावाद कौतुकास्पद आहेच. तो खरा ठरला तर मराठी साहित्यात मोलाची भरच पडेल, म्हणून तो खरा ठरो या शुभेच्छा!"

~~ व्वा !! हीच तर खरी आपली मराठी मन फुलोवणारी इच्छा. "बाळ" पडले, ठेचकाळले, नव्हे रक्तबंबाळ जरी झाले, तरी त्याला कुणी कायमचा आता घरीच बस म्हणत नाहीत, तर उलट त्याला उमेद वाटावी म्हणून प्रोत्साहनाचे बिस्किट देऊ करतात....का तर, त्याच्या पुढील प्रवासासाठी त्याला शुभेच्छा देणे ही आपल्या मनी निर्मळ भावनाच असते. तुम्हीही त्या परंपरेपासून वेगळे नाही, हेच तुमच्या वरील वाक्यात स्पष्टपणे दिसते.

धन्यवाद.

इन्द्रा