टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
सातत्याचा विक्रम!
मंडळी आज गुरुवार! दत्ताचा वार!
चक्रावलात ना! माझ्यासारख्या नास्तिक(आडनावाने देव आहे म्हणून काय झाले.... नाव सोनुबाई.... ही म्हण उगीच नाही केली आपल्या पूर्वजांनी) माणसाकडून हे असले काही ऐकले की सूर्य आज पश्चिमेला तर नाही ना उगवला.. असे वाटायचे तुम्हाला. मी हे असले काही बोललो म्हणून तुमच्या भुवया उंचावलेल्या दिसताहेत. पण थांबा. नाही! अहो, मला काहीच झालेलं नाहीये. मी अगदी व्यवस्थित आहे. मग? मी असा का बोलतोय? जाणून घ्यायचंय? बरं तर ऐका!
काय आहे, की मी आज सकाळी लवकर उठलो.
आता लवकर उठलात! त्यात काय विशेष? असते एकेकाला अशी सवय!
अहो पण मी काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या ना! असा मध्ये मध्ये हाल्ट करू नका बॉ! उगाच विसरायला होते. हां! तर आज गुरुवार! मी सकाळी लवकर उठलो.
च्या मारी(काय ती घ्या म्हणतो एकदाची)! तुमची तबकडी अजून तिथेच अडकलेय की! काय ते एकदा सांगून टाका ना. कशाला उगाच नमनालाच वाटीभर(कोण म्हणाला तो घडाभर? )तेल फुकट घालवताय?
बरर्र्! सांगतो. आता एकदम विषयालाच हात घालतो.
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील 'मुंबई ब'(आता 'अस्मिता) ह्या वाहिनीवरून रोज सकाळी मंगलप्रभात हा कार्यक्रम सादर होत असतो. ह्या कार्यक्रमात भक्तिगीते सादर होत असतात. साधारणपणे ज्या देवाचा वार(उदा. सोमवार=शंकर,मंगळवार=गणपती...वगैरे वगैरे) असेल त्या देवाची गाणी लावण्याची प्रथा सुरुवातीपासूनच चालत आलेली आहे आणि ती इमाने-इतबारे पाळली देखिल जाते. तर आज गुरुवार म्हणून दत्ताची गाणी लावणे हेही साहजिकच आहे म्हणा. तर तशी ती लावली गेली होती. पण प्रत्येक वारी त्या त्या देवांची गाणी लागणे आणि गुरुवारी दत्ताची गाणी लागणे ह्याचे खास असे वैशिष्ठ्य आहे. एरवी जी इतर देवांची गाणी लागतात ती गाणारी कलाकार मंडळी हवी तेव्हढी आहेत. गानकोकिळा लताबाईं,आशा भोसले,भीमसेन जोशी,सुधीर फडके अशां सारख्या दिग्गजांपासून ते आता नव्यानेच उदयाला येणार्या अनेक गायक-गायिकांकडून आपण ही गाणी सदैव ऐकतच असतो. पण दत्ताची गाणी गाण्याचा जणू काही मक्ता एखाद्याच व्यक्तीकडे असावा.... आहे असे म्हणा हवे तर अशा तर्हेने चटकन ओठावर येणारे नाव म्हणजे "रघुनाथ उर्फ आर.एन्.पराडकर" हेच होय. ह्याचा अर्थ इतर कुणी दत्ताची गायलेली नाहीत किंवा गात नाहीत काय? गातात की! नाही कोण म्हणतंय! मग "आर्.एन." ह्यांचेच नाव मी का घेतो?
त्याला कारण आहे ते म्हणजे गेली कैक वर्षे.....५० हून जास्त वर्षे अखंडपणे दर गुरुवारी आर.एन. ह्यांची ही दत्तगीते सादर होत असतात आणि हा एक विक्रम आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
माझ्या बालवयापासून मी ही दत्त-भक्तिगीते ऐकत आलेलो आहे. साधी सोपी रचना,प्रासादिक शब्द असे ह्या गीतांचे स्वरूप आहे. अतिशय सुस्पष्ट शब्द,सुगम अशा चाली आणि मधुर आणि आवाजात फारसे चढउतार नसलेल्या पद्धतीने पराडकरांनी ही गीते गायलेली आहेत. इतक्या वर्षांनंतरही त्या गाण्यांची गोडी अवीट आहे. इथे दत्त+पराडकर+आकाशवाणी असे त्रिकुट बनलेले आहे . आजही ते अतूट आहे आणि येणारी अनेक वर्षे हे अबाधित राहील ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.
विसु: मी (स्वतःचा सोडून)कोणत्याही देवाचा भक्त नाही हेलक्षात असू द्या. संगीतालाच (मुलगी नव्हे. उगाच विचित्र नजरेने पाहू नका)मी देव मानतो.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


खरंय..
इथे दत्त+पराडकर+आकाशवाणी असे त्रिकुट बनलेले आहे .
प्रमोदकाका,
हे मात्र १००% खरं. बहुतेक अजित कडकडे यांनीही काही श्री. दत्त गुरूंची गाणी गायलेली आहेत असे वाटते.. नक्की माहिती नाही.
छोटासा लेख आवडला... गप्पांच्या ओघात बोलता आहात असे वाटले..
- (सर्वव्यापी)प्राजु
बरोब्बर आहे प्राजु
अलिकडच्या काळात त्यानी बरीचशी दत्तगुरुंची गाणी म्हणली आहेत.
त्यातलेच "एक निघालो घेवुन दत्ताची पालखी" हे आपण ऐकल असालच.
कंफर्ट झोन
देवकाकानी नेहमीप्रमाणे साध्यासुध्या अनुभवांमधूनकाहीतरी मनोज्ञ विचारांचे स्फटिक गोळा केलेले आहेत.
दत्तगीतांची माधुरी एका स्वघोषित नास्तिकाला जाणवावी यात त्या गाण्यांची गोडी, त्यातील शब्द , रचना आणि स्वरमेळाचा सुलभपणा हे महत्त्वाचे घटक जसे आहेत त्याचप्रमाणे त्या गाण्यांच्या सातत्याने निर्माण केलेले नातेसंबंध , त्यांच्या नियमित वाजण्याने आपल्याला वाटणारी विश्वासाची जाणीव या गोष्टीसुद्धा आहेत/असाव्यात असे माझे मत आहे. हे थोडेसे लहान मुलांप्रमाणे आहे. रोज रात्री एखाद्या लहान मुलाला ठराविक गोष्ट, ठराविक गाणी , ठराविक उबदार स्पर्श आवश्यक असतात. रोजरोज तीच परिचयाची गाणी ऐकून मुलाला ओळाखीची , त्यातून वाटाणार्या सुरक्षिततेची, विश्वासाची जाणीव होते. देव काकांचा आणि त्यांच्यासारख्या असंख्यांचा अनुभव या जातीचा असला पाहिजे.
देवकाका, अहो तुमचा अनुभव इतका
आपल्यातला आहे ना की मला एक क्षणभर वाटून गेलं की मी आमच्या जुन्या घरात आहे, सकाळचे ११ वाजत आलेत, एकीकडे कूकरची शिट्टी होते आहे, आई "अरे शाळेची वेळ झाली, या आता जेवायला!" असं ओरडते आहे, खालच्या मजल्यावरच्या रेडियोवर (व्हाल्वचा जुना मोठा रेडियो) पुणे केंद्राची गाणी सुरु झाली आहेत आणि "स्मरा हो दिगंबरा" असं पराडकरांचं सात्विक आवाजातलं सुरेल गीत सुरु झालं आहे.
हे अनुभव आता माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनून गेले आहेत इतके की अशा कुठल्याशा आठवणीनेच एकदम लक्षात येते की अरे हे तर आपणही एके काळी जगलो आहोत.
आणि हेच अनुभव आपली सोबत शेवटपर्यंत करत असावेत असे वाटते.
चतुरंग
आठवणींचा उमाळा
होय , कधी कधी काळाच्या मागील तुकड्याशी आपण इतके जोडले जातो कि काळाच्या पट्टीवर आपण पुढे सरकलो आहोत याचे भानच रहात नाही.
प्रकाश घाटपांडे
रेडीओ नॉस्टॅल्जिक
आमच्या घरी पण कायम रेडिओ चालू असायचा. मला तर फार मजा यायची. त्यामुळे अनेक गाणी, चांगल्या चर्चा कानावर पडत असत.
बुधवार आणि शुक्रवार सकाळी लागणारा बण्डा सकाळी लागणारा 'सुप्रभात' हा कार्यक्रम. त्यातील 'सुप्रभात श्रोतेहो' अशी होणारी सुरुवात. 'काही माहीती, घटना आणि संगीतावर आधारीत' असे असणारे या कार्यक्रमाचे वर्णन. एकदम सही.
दुपारी ११ ला लागणारी मुंबई केंद्रावरील कामगार सभा. ती तर अगदी आम्ही जेवायच्या वेळेला लागत असे. आम्ही जेवायला बस्लो की आई म्हणत असे '११.३० च्या आत आटपा म्हणजे १२ ची शाळा व्यवस्थित गाठता येईल'
तसेच दुपारी १२ ला विविधभारतीवर लागणारा गीतगंगा हा कार्यक्रम पण एकदम मस्त असे.
संध्याकाळी ६ ला सांजधारा.
रात्री ११ ला विविधभारतीवरचा 'बेला के फूल' एक सो एक मस्त कार्यक्रम.
बरेच दिवसानी सुखी कॉलेज जीवनाची आठवण आली.
पुण्याचे पेशवे
सर्वांग सुंदर
'सुप्रभात श्रोतेहो' अशी होणारी सुरुवात
आणि अजून एक "सुधा नरवणे बातम्या देत आहे" ... हे वाक्य तर डोक्यात अगदी घट्ट बसले आहे (दूरदर्शनच्या बातम्या म्हटल्यावर सोज्ज्वळ चेहर्याची सरला महेश्वरी डोळ्यासमोर यावी तसे).
वनिता समाज ची धून तर चाळ नावाची वाचाळ वस्ती ह्या मालिकेत सुद्धा वापरली होती.
अजूनही मी रोज मराठी एफएम ऐकते पण आता ती मजा उरली नाही. मुळात मराठी एफएमचे कार्यक्रम विसंगत असतात. उदा. स. ४ ते ५ चित्रपटसंगीत, ५ ते ६ भक्ती संगीत आणि परत ६ ते ७ चित्रपटसंगीत मधेच एड्स प्रसार रोखा सारखे कार्यक्रम.
दुसरे म्हणजे प्रकाश पाटकर, प्रसाद ठोसर इ. श्रोत्यांना बाळं समजून अखंड ज्ञानघुटी पाजणारे निवेदक तर डोक्यात जातात. माय मराठीसाठी किती म्हणून सहन करायचे.
असो. देवकाकांचे सर्वच लेख सर्वांग सुंदर असतात त्यापैकी हा एक.
>
>
स्वातंत्र्यासाठी या आम्ही काय केले, पूर्वज श्रमले तयासाठी...
देव
होय आमचे देव गुरुजी पण म्हणायचे
दया क्षमा शांती तेथे .......|
राक्षसांची वसती |
गाळलेली जागा गायनातील समेसारखी छ्डीने भरुन निघे.
प्रकाश घाटपांडे
आम्हाला अस लिहिता येत नाही
काका तुमची लिहिण्याची पद्धत आवडली. वाचुन मजा आली
आम्हाला पण!!
देवकाकांनी छान विषय मांड्ला आहे.
मला देखील आठवते, माझी आई आर.एन. पराडकर रेडियोवर गायला लागले की दत्त्या पराडकर गायला लागला अशी म्हणायची!
जिव्हाळ्याचा विषय
अत्त्यानंदमहाशय,
लेख वाचून बालपणचे दिवस; विशेषत: मंगलप्रभात व कामगारसभा आठवली. पराडकरांची गाणी आजही आपले वेगळे पण टिकवुन आहेत, त्यांचे स्थान अजुनही अढळ आहे. कदाचित गुरुवारी त्यांची गाणी ऐकली नाही तर प्रत्यक्ष दत्तगुरुंनाही गुरुवार आहे असे वाटणार नाही:)
थोडंसं
थोडंसं विशयांतर...(मला पोटफोड्या श लिहिता येत नाही.)
पराड्कर हे सी.आर. व्यासांचे शिश्य. सी. आर व्यासांची श्री आणि गौरी रागांची एक कॅसेट आहे. त्यात पराड्कर व कारेकर यांची साथ आहे. ते राग फारच जमून आले आहेत. साथ इतकी सुंदर आहे की त्याकरता ती कॅसेट लक्षात राहते.
जरूर ऐकावी
सुंदर..
देवकाका,
छोटेखानी, परंतु सुंदर लेख...!
साधी सोपी रचना,प्रासादिक शब्द असे ह्या गीतांचे स्वरूप आहे. अतिशय सुस्पष्ट शब्द,सुगम अशा चाली आणि मधुर आणि आवाजात फारसे चढउतार नसलेल्या पद्धतीने पराडकरांनी ही गीते गायलेली आहेत. इतक्या वर्षांनंतरही त्या गाण्यांची गोडी अवीट आहे.
अगदी सहमत आहे...
आपला,
(दत्तभक्त आणि रेडियोप्रेमी) तात्या.
सुंदर लेख +१
प्रमोदकाका यांची खास जिव्हाळ्याची शैली, आणि हळुवार पण नेमकी आठवण जागवणारा प्रसंग.
+१
मन:पूर्वक आभार!
व्यक्त अव्यक्त प्रतिसाद दात्यांचे मन:पूर्वक आभार.
एकेकाळी आकाशवाणी हा प्रत्येक घराचा एक अविभाज्य भाग होता. आता ती जागा दूद ने घेतलेली आहे. तरीही अजून आकाशवाणीचे गारूड माझ्यासारख्या असंख्य श्रोत्यांवर आहे, हेही तितकेच खरे आहे, हे इथल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रियांवरून जाणवले.