७-८-९

पुष्कर's picture
पुष्कर in काथ्याकूट
23 Mar 2008 - 6:18 pm
गाभा: 

सृष्टीलावण्याचं चांदण्यात रात्र रात्र वाचलं आणि डोक्यात अगदी भिकार सावकार पासून ते मुंगूस, चॅलेंज, बदाम सात, ५-३-२, ७-८, बेरीज झब्बू, गुलाम चोर, लॅडीज, मेंढीकोट, नॉट ऍट होम, जजमेंट/बिस्मार्क, कॅनस, ३०४, २८, रम्मी, तीन पानी पर्यंत खेळांची गर्दी झाली. पण या सगळ्यांपेक्षा वेगळ्याने एकच खेळ सारखा डोकं वर काढत होता, तो म्हणजे ७-८-९.

हा एक नव्यानेच कळलेला खेळ (तरी मला तो शिकून ७-८ वर्षं झाली असतील). "शॉर्ट अँड स्वीट" अश्या शब्दात वर्णन करावं असा हा खेळ आहे. पण तरीसुद्धा हा खेळ त्याचं व्यसन लावू शकतो. मग कितीही झालं तरी डाव संपवावासा वाटत नाही. खूप कमी कालावधीत (माझ्या परिचयातील लोकांत) लोकप्रिय झालेला हा खेळ. त्याच्याबद्दल इथे देखिल लिहिण्याचा मोह अनावर झाला आहे.

एखादा खेळ प्रत्यक्ष खेळून दाखवूनच शिकवावयास हवा. तो कसा खेळायचा हे वाचणं कंटाळवाणेपणाचं होईल, हे मला माहित आहे. पण तरीदेखिल मी हे देत आहे. सध्या मिपावर काही काही पदार्थांच्या पाककृती लिहिल्या जात आहेत. त्याप्रमाणे काही उत्साही मंडळी ते करूनही पाहतात. माझी समस्त मिपाकरांना विनंती आहे, कि त्यांनी ही "खेलकृती" सुद्धा एकवार आजमावून पहावी. सुरुवातीला खेळ समजवयास वेळ लागेल, पण एक-दोनदा खेळलत की मग तो समजायला सोपा जाईल. एकदा का डाव जमू लागला, कि त्यासारखी दुसरी मजा नाही.

७-८-९ आणि ७-८ ह्या खेळांचा काही संबंध नाही. ७-८-९ हा थोडा रम्मी सारखा आणि फार 'उनो' सारखा आहे. ७--८--९ ही पत्त्यांमधली जणू ट्वेंटी-ट्वेंटी आहे. खेळताना खूप मजा येते.

ह्याला कोणतीही पाने वर्ज्य नाहीत. पाच-पाच पाने वाटून डाव सुरू होतो. हातातले गुण कमित कमी ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट. रम्मी प्रमाणे मध्ये उरलेल्या पानांचा गठ्ठा ठेवायचा. रम्मीच्या उलट खेळायचे, म्हणजे आधी हाततले पान टाकायचे आणि मग गठ्ठ्यातून उचलायचे.पानांच्या जोड्या टाकायला परवानगी आहे. (२ एक्के, २ गुलाम इ. ; राजा-राणी ही जोडी नाही). तसेच ३ किंवा जास्त पानांचा सिक्वेंस टाकू शकतो. घेताना मात्र एकच पान उचलायचे.

सत्ती, आठ्ठी, नश्शी ही ह्या खेळाची मुख्य हत्यारं. समजा एखाद्याने सत्ती टाकली, तर त्याच्या पुढच्या भिडूने काहीही न खेळता समोरच्या गठ्ठ्यातून २ पाने उचलायची आणि त्याच्याही पुढच्या भिडूने नेहमीप्रमाणे खेळ चालू ठेवावा. एखाद्याने आठ्ठी टाकली, तर ज्या क्रमाने खेळ चालत आला, त्याच्या उलट सुरु करावा (क्लॉकवाईज खेळत असाल तर अँटीक्लॉकवाईज). एखाद्याने नश्शी टाकली, तर त्याच्या पुढचा भिडू एकावेळेसाठी स्किप (थोडक्यात, त्याची एक उतारी चुकते).
एक्क्याला १, दुर्रीला२, अश्या क्रमाने दश्शीला १० गुण. सर्व चित्रांना १०-१० गुण असतात.

डावाचा शेवट हा खेळाडूंच्या मनावर असतो. जर एखाद्याला असे वाटले की आपल्या हातात सर्वांपेक्षा कमी गुण आहेत, तर त्याने त्याची उतारी आल्यावर उतारी करण्यापूर्वी "शो" करावा. तो जर बरोबर निघाला, तर त्याला ० गुण आणि इतरांचे जे झाले असतील तेगुण लिहावेत. प्रत्येक डावात गुणांची बेरीज करत रहावे. जो २५० चा टप्पा पार करेल, तो खेळातून बाहेर. उरलेले भिडू खेळ चालू ठेवतील. अश्या रितीने एक एक गडी कमी होत शेवटी जो एक राहील तो जिंकला.

मुख्य लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हातात कमी पाने ठेवणे हे उद्दिष्ट नसून कमी गुण ठेवणे हे आहे.
ह खेळ १ पेक्षा जास्त कितीही जणांत खेळता येतो. ४ पेक्षा जास्त जण असतील तर जास्त कॅट घ्यावेत.

एकदा हा खेळ जमू लागला, की तो व्यसन लावतो. वर्षानुवर्षे मेंढीकोट खेळणार्‍यांचा सवयी ह्याने मोडल्या आहेत.कोणाला अधिक माहिती हवी असेल ह्या खेळाबद्दल, तर मला कळवा.

प्रतिक्रिया

सृष्टीलावण्या's picture

23 Mar 2008 - 6:50 pm | सृष्टीलावण्या

हा खेळ मस्त असेल असे वाटते. पुढचा अड्डा जमला की नक्की खेळून पाहू.

नशीब तुम्ही पण ह्याला 'चांदण्यात रात्र रात्र' असे शीर्षक दिले नाही कारण बरेच जणांचा मागच्या वेळी हिरमोड झाला होता... ;)

'चांदण्यात रात्र रात्र' म्हटल्यावर त्यांना काही तरी वेगळेच वाटले होते...

जाऊ दे. पत्त्याची नशा पत्तेबाजालाच ठाऊक..

>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

विसोबा खेचर's picture

24 Mar 2008 - 9:28 am | विसोबा खेचर

हम्म! खेळ चांगला वाटतो आहे. एकदा खेळून पाहिला पाहिजे!

तरीही तीन पत्तीतली मजा कशातच नाही, हे माझं मत..

आपला,
(तीनपत्ती प्रेमी) तात्या.