टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
चाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा!
मी सद्या ज्या इमारतीत राहतोय तिथे येऊन मला जेमतेम चारच वर्षे झालीत.मात्र ह्या इमारतीत गेली कैक वर्षे राहिलेली कुटुंबे एकमेकांना फारशी ओळखतही नाहीत ह्याची जाणीव झाली आणि ठरवले की ह्यावर काही तरी तोडगा काढायलाच हवा. ह्या वर्षी मी आमच्या इमारतीच्या कार्यकरिणीचा नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून सुत्र हाती घेतली. माझ्याप्रमाणेच नवनिर्वाचित सचिव आणि खजिनदार अशा आम्ही तिघांनी मिळून आमच्या इमारतीतील सर्व कुटुंबियांचे एक स्नेहसंमेलन कार्यकारिणीच्याच खर्चाने २६ जानेवारी २००८ रोजी आयोजित करण्याची घोषणा केली. सर्वांनी त्याला अनुमोदनही दिले आणि "कोई आनेवाला नही"(ह्या ठिकाणी मी एकमेव मराठी माणूस आहे;बाकी सगळे गुजराथी) अशी वर प्रतिक्रिया देखिल व्यक्त केली. आम्ही तिघांनी त्यामुळे खट्टू न होता जोमाने तयारी सुरु केली. जसजसा तो दिवस जवळ येऊ लागला तसतसे लोक आपणहून पुढे यायला लागले आणि सांगायला आनंद वाटतो की समारंभ अगदी झोकात साजरा झाला. झाडून सगळी लहानथोर मंडळी त्या दिवशी प्रथमच इमारतीच्या खाली घातलेल्या मंडपात जमा झाली. खेळ खेळली. जेवली, लोकांनी एकमेकांशी ओळखी करून घेतल्या . आम्हा तिघांचे पुन:पुन्हा अभिनंदन करून असेच समारंभ वरचेवर व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली गेली.
लगेचच येणार्या होळीला असाच काही कार्यक्रम करावा अशी काही तरूण मंडळींनी गळ घातली आणि त्यासाठी स्वत:हून रुपये ३००० तिथल्या तिथे जमा करून खजिनदारांकडे सूपूर्त केले. होळीच्या दिवशी असे काही आयोजन असू नये असे माझे वैयक्तिक मत मी व्यक्त केले आणि इतर दोघेजणही माझ्याशी सहमत दिसले. मात्र होळी साजरी करायची असेल तर त्याबाबतचा पुढाकार तरूणांनीच घ्यावा असे मी आवाहन केले.मी स्वत: मात्र सहभागी होऊ शकणार नाही पण इतरांनी तो आनंद जरूर लुटावा असेही सांगितले.त्या वेळेस सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आणि नंतर आम्ही आमच्या रोजच्या धबडग्यात हे विसरूनही गेलो.
आज दिनांक २२ मार्च २००८. सकाळची साडेनऊची वेळ. दाराची घंटी वाजली. मी दरवाजा उघडून पाहिले तर आमचे तरूण मंडळ हातात रंगांच्या पुड्या घेऊन मला आवाहन करायला आलेल्या.
"अंकल,(हल्ली काका का म्हणत नाहीत कुणास ठाऊक) अंकल आईये ना होली खेलने!"
"मी रंग खेळत नाही त्यामुळे मी त्यात भाग घेणार नाही. तुम्ही तुमचा आनंद आपापसात साजरा करा ." असे मी त्यांना म्हटले. काही वर्षांपूर्वीच माझ्या दोन्ही डोळ्यांवर मोतिबिंदुची शस्त्रक्रिया झालेली असल्यामुळे तर मी साधा गुलालही लावून घेत नाही.
पण त्यांचा आग्रह मला मोडवला नाही म्हणून "फक्त टिळा लावणार असाल तरच दरवाजा उघडतो" असे म्हटले. त्यांनी ते मान्य केले आणि मी बाहेर पडलो. कबूल केल्याप्रमाणे त्या पाच सहा जणांनी मला टिळा लावला आणि ते निघून गेले. मी त्यांचा आणि त्यांनी माझा मान राखल्यामुळे दोघेही खुश झालो.
दहा एक मिनिटाने पुन्हा घंटी वाजली. त्या मागोमाग आवाजही आला "प्रमोदभाय! आओ! दरवाजा खोलो!"
जाऊन पाहतो तो आमचे सचिव रमेशभाई आणि खजिनदार हिरेनभाई मला बोलवायला आले होते. स्वत: ते नखशिखान्त रंगलेले होतेच.
मी पुन्हा माझी डोळ्यांची अडचण सांगितली. त्यावर त्यांनीही समजूतदारपणे "आपको हम रंग नही लगायेंगे.खाली टिका लगायेंगे. लेकीन आप हमारे साथ नीचे आईये. आप नही आयेंगे तो मजा नही आयेगी!" असे म्हटल्यावर माझा नाईलाज झाला आणि मग मीही त्यांच्याबरोबर मैदानात उतरलो.
खाली गेलो तर बायका,मुले,पुरूष सगळे हजर होते.कुणीही ओळखू येणार नाही असे एकेकाचे चेहरे आणि कपडे रंगलेले होते. एकमेकांवर रंग आणि पाणी उडवण्याची स्पर्धा चाललेली होती. कुणी स्वखुशीने तर कुणी नाईलाजाने आपापले चेहरे रंगवून घेत होते. माझ्या तिथे जाण्यामुळे त्यांना "नवा बकरा" सापडल्याच्या आनंदात काही जण आले मात्र माझी परिस्थिती कळल्यावर मग रंग चेहर्याला नाही तर मग अंगावर उडवला तर चालेल असे मानून(माझीही त्याला हरकत नव्हती) रंगांची उधळण करून मलाही रंगवले. काही जणांनी(मला विचारून) अंगावर पाणीही उडवले. मी मात्र कुणालाच रंगवले नाही. रंगवण्यापेक्षा रंगण्यात म्हणा किंवा रंगवून घेण्यात मला जास्त आनंद वाटतो. मी त्या सगळ्यांसोबत तास-दीड तास तिथे उभा राहिलो आणि मग घरी परतलो.
मंडळी आता तुम्ही म्हणाल, "ह्या! ह्यात काय विशेष असे सांगण्यासारखे आहे? आम्ही तर दरवर्षी हा आनंद मुक्तपणे अनुभवत असतो!"
खरं आहे तुमचे. म्हटले तर विशेष नाहीच आहे.पण...
मी माझी शालांत परीक्षा १९६८ साली पास झालो. त्यावर्षी मी जी धुळवड साजरी केली होती त्यानंतर आज बरोबर चाळीस वर्षांनी धुळवड साजरी केली.तीही दुसर्यांच्या आग्रहाखातर आणि आनंदाखातर! मधल्या काळात ती साजरी न करण्याच्या मागे म्हटले तर कोणतेही संयुक्तिक कारण माझ्याकडे नाहीये. नंतर वापरात आलेले ऑईल-पेंट, रासायनिक रंग वगैरे अशी कारणे आहेत. नाही असे नाही. पण दुसरे कोणतेही कारण मला तरी दिसत नाही. माझा हट्टी स्वभाव(नाही म्हणजे नाही; अजिबात नाही) हे कदाचित त्याचे कारण असू शकेल.
पण आज इतक्या वर्षांनंतर कुणाच्या तरी विनंतीला मान दिल्यामुळे त्यांना झालेला आनंद आणि त्या आनंदात माझेही काही क्षण आनंदात गेले असे मला वाटले आणि ह्यात आपलीही सोबत असावी म्हणून हा लेखन प्रपंच.
वय वाढले की हट्टीपणा कमी होतो की वाढतो? हा मात्र एक संशोधनाचा विषय ठरावा.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

वा प्रमोदकाका किती छान स्फुट आहे, अगदी समयोचित!
४० वर्षांनंतर असा अनोखा आनंद अनुभवताना तुम्हाला एक विलक्षण अनुभूती आली असणार.
तुमचं म्हणणं अगदी खरं आहे माणसे हट्टीपणाने म्हणा किंवा दुराग्रहाने म्हणा जीवनातल्या छोट्या-छोट्या आनंदाना मुकतात.
तुमच्या पुढाकारामुळे तुमच्या निवासी संकुलात खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले त्याबद्द्ल तुमचे अभिनंदन!
चतुरंग
रंगुनि रंगात सार्या
रंग माझा वेगळा, गुंतुनि गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा' गाणे आठवले. चतुरंग म्हणतात तसे छान, समयोचित स्फुट.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
(सहमत)बेसनलाडू
वय वाढले की हट्टीपणा कमी होतो की वाढतो? हा मात्र एक संशोधनाचा वि
काका.
वय वाढत जाईल पण आठवणी कायम राहातील.
शरीर थकले असेल पण आपले मन अजुन तरुन आहे.
हट्टीपणा माणसाला मोठे करित असतो पण काहि ठीकानी माणसाला तो खाली पणा दाखवतो. या दोन्ही गोष्टी आपल्या
दिसुन येतात. ४० वर्षांनंतर कुणाच्या तरी विनंतीला मान दिल्यामुळे त्यांना झालेला आनंद आज घेतलेल्या स्वप्ननाचा
आंनद बरेच वर्ष टिकेल.
संजिव
लगे रहो प्रमोदभाय! :)
लगे रहो प्रमोदभाय!
आप तो छा गये! सोसायटीच्या धुळवडीत रंगलात हे वाचून खूप आनंद वाटला.
आपको होली के त्योहार की बहोत सारी शुभकामनाए!
तात्या.
खूप छान.
खूप छान. मलाही रंग खेळायला खूप आवडते. पण इथे नाही खेळता येत... खूप वाईट वाटते या गोष्टीचे..
अनुभव कथन आवडले..
- (सर्वव्यापी)प्राजु
धन्यवाद!
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
हट्ट, निग्रह आणि दुराग्रह...
ज्या आग्रहाला तार्किक बैठक नसते, नुसतेच मला वाटते म्हणून किंवा मी म्हणतो म्हणून अशी भावना असते त्याला हट्ट म्हणावे. ज्या आग्रहा मागे काही तार्किक बैठक असते त्याला निग्रह म्हणावे आणि जेंव्हा एखाद्या चूकिच्या गोष्टीचा (हे चूक आहे हे स्वतःला माहित असुनही) आग्रह धरला जातो त्याला दुराग्रह म्हणावे असे वाटते.
वय वाढले की हट्टीपणा कमी होतो की वाढतो?
वयाबरोबर परिपक्वता वाढली तर हट्ट कमी (किंवा नाहिसा) होतो, निग्रह वाढतो, दुराग्रह विनाश पावतो.
आपल्या भावना किती तीव्र .......
आहेत यावर अवलंबून आहे.
कोणालाहि जबरीने रंग लावणे हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे. मग हट्टी म्हणा नाहीतर आणखी कांही.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.