इथे सखे नि सोबती!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in विशेष
20 Sep 2012 - 3:41 am
श्रीगणेश लेखमाला २०१२

नीलकांताचा व्यनि आला, "या गणेशचतुर्थीला मिसळपाव या संस्थळाला पाच वर्षे पूर्ण होताहेत. तेंव्हा काका, त्यानिमित्ताने काहीतरी लिहा..."

अरे पण लिहा म्हणजे काय लिहा? योग्य विषयच सुचेना. उगीच काहीतरी कथा, व्यक्तिचित्र वगैरे लिहायला मन करेना. प्रवासवर्णन, पाककृती वगैरेच्या तर वाटेलाही आपण हल्ली फिरकत नाही!!! एखादं विडंबन लिहितां आलं असतं पण मुद्दाम पाचव्या मिपावाढदिवसाच्या शुभनिमित्ताने विडंबन टाकावं हे योग्य वाटेना. तेंव्हा असाच हताश होऊन माझ्याच खात्याची पाने चाळत असतांना एका ओळीने माझं लक्ष वेधून घेतलं...

मिपावास्तव्यः ४ वर्षे ३५ आठवडे

अरेच्चा! म्हणजे जर सुरवातीचे काही आठवडे सोडले तर जवळपास हा सगळा काळ मी मिपासोबत होतो की!!

म्हणून मग या मिपासहवासाचीच गोष्ट मी तुम्हांला सांगायचं ठरवलंय.

:)

तर पाच वर्षांपूर्वीची कथा! आंतरजालांवर मराठी ब्लॉग्ज तसे आलेले होते पण त्यांचं आत्ता फुटलंय तसं पेव फुटलेलं नव्हतं. बरेचसे ब्लॉग्ज हे स्वगुणगान/ स्वप्रकटन अशा बाळबोध स्वरूपाचे होते. पण काही जण मात्र त्यात नवनवीन लेखन करीत असत, आपले ब्लॉग वाचनीय करीत असत. असाच एकदा नेटसर्फिंग करत असतांना तात्या अभ्यंकर या महाभागाचा ब्लॉग सापडला. त्याचं लिखाण तर आवडलंच पण त्याहूनही त्याने स्वतःची करून दिलेली इरसाल ओळख अधिक आवडली!!

मग तात्याच्या ब्लॉगवर नित्यनेमाने फेर्‍या सुरु झाल्या. तो लिहितोय ते आवडत होतं पण त्याला तसं सांगायचं त्यावेळी कधी सुचलंच नाही. आणि एके दिवशी त्याने मिसळपाव या नवीन संस्थळाची स्थापना केल्याचं जाहीर केलं....

मग त्याने दिलेली लिंक वापरून मिसळपाव वर जाणं सुरू झालं. पहिले काही आठवडे फक्त वाचनच केलं आणि मग लक्षात आलं की हे मिसळपाव काही वेगळंच झटकेबाज रस्सायन आहे!! माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं होतं पण कॉलेज मुंबईचं सेंट झेवियर्स आणि त्यानंतर जवळजवळ वीसेक वर्षे परदेशात वास्तव्य! त्यामुळे मराठी वाचनाची चांगलीच आबाळ झालेली. आता इथे सगळं मिळतं पण नव्वदीच्या दशकात इथे भारताविषयी इंग्रजीतून काही वाचायला मिळायची मारामार तर महाराष्ट्राबद्दल मराठीतून कुठून वाचायला मिळणार? मग प्रत्येक मुंबईभेटीत जमतील तितकी मराठी पुस्तकं खरेदी करायची आणि पुढल्या भेटीपर्यंत पुरवून पुरवून वाचायची!!! आपली वाचून झाली की आपल्या मराठी मित्रांकडची उसनी आणायची आणि आपली त्यांना द्यायची हेच शक्य होतं.

पण मराठी पुस्तकं वाचण्यात एक अडचण होती ती म्हणजे ते सगळे लेखक आणि आपण वाचक! ते उच्चासनावर बसून लिखाण केलेले!! त्यांचं लिखाण आवडलं तर दाद द्यायची, नाही आवडलं तर भिकार आहे म्हणून सांगायची काही सोय नव्हती. शंका, प्रतिप्रश्नही विचारता येत नसत. त्यामानाने हे मिसळपाव मस्त वाटलं. आपल्यासारखीच काही अस्सल आणि इरसाल (तात्याच्या शब्दात येडझवी!!) मराठी माणसं असलेलं ठिकाण. आणि तात्याने डिक्लेअर करून टाकलं होतं की या स्थळाचं स्वरूप कॉलेजबाहेरच्या कट्ट्यासारखं राहील. लौकिक जगातला गंभीरपणा, महत्त्वाकांक्षा, चिंता, आग्रही मतं या सगळ्याला छेद देणारं हे एक आगळंच विश्व उपलब्ध झाल्यासारखं वाटलं...

मग काय विचारता? एके दिवशी आपल्या पदव्या, व्यवसाय, वय, सांसारीक स्थिती ही सगळी वस्त्रं उतरवून ठेवली आणि निस्सं:ग होऊन या डोहात सूर मारला!!!

आणि इथले इतर लोकं तरी काय? अहाहा!!!

विकास, नंदन, नीलकांत अशा खर्‍या नांवाने लिहिणारे काही बोअरिंग जीव सोडले तर बाकी सगळे कसे एकसे एक!!

धमाल मुलगा, आंबोळी, छोटा डॉन, इनोबा, सर्किट, क्लिंटन, आणि खुद्द मालक विसोबा खेचर!!!!! यांच्याशी आपलं फिट्ट जमणार असं जाणवलं आणि मग 'पिवळा डांबिस - बिल्ला नंबर ४०१' चा जन्म झाला!!!

एका पन्नाशीतल्या इरसाल म्हातार्‍याचं व्यक्तिमत्व पिवळ्या डांबिसाने स्वीकारलं. मध्येच टंकायचा आळस असलेल्या कुणीतरी (केशवसुमार कायरे तो?) मिसळपावचं मिपा केलं तेंव्हाच कधीतरी पिवळ्या डांबिसाचं पिडां झालं असावं. म्हणून मग प्राजुने त्याचं लगेच पिडांकाका केलं. तेंव्हापासून पिडांकाका हेच नांव वाचायची सवय झालीये...

सुरवातीला फक्त इतर धागे वाचून त्यावर अनुकूल-प्रतिकूल अभिप्राय देणं, काथ्याकूटात भाग घेणं आणि प्रामुख्याने इरसाल मराठीतून मनसोक्त गप्पा मारणं हेच चालू होतं. सगळ्यांच्या खोड्या काढून झाल्या, एक दिवस तर मी खुद्द प्राडाँचीही डब्बल-बॅरल खोडी काढून आलो. ते चिडले नाहीत हा त्यांचा मोठेपणा! अशी सगळी धमाल चालू होती, अवघा आनंदीआनंद होता....

आणि मग एके दिवशी तात्याची खरड आली. त्या निरोपाला खरड का म्हणतात ते त्या दिवशी कळलं!!! खरडपट्टीच ती!!

"डांबिसा फोकलीच्या, रोज नुसता येऊन धुमाकूळ घालतोस, शिंच्या जरा स्वतः काही लिही की!!!", तात्या उवाच.

अग्गं बाबौ! काहीतरी लिही? यापूर्वी केलेलं मराठी लिखाण म्हणजे माध्यमिक शाळेत असतांना! पण ते त्या वयाला अनुसरून शाळकरी वळणाचं!! इंग्रजीत लिखाण प्रकाशित केलेलं होतं पण ते गंभीर आणि व्यावसायिक स्वरूपाचं!! तात्यानं ही भलतीच टॉल ऑर्डर दिली होती. विचार करकरून मेंदूचा अगदी लगदा व्हायची पाळी आली. शेवटी ठरवलं की टेंशन नही लेनेका! बिंदास लिहायचं!!

मग माझं पहिलं लिखाण, कथा दुरावा, ती इथं प्रकाशित केली. आणि आश्चर्य म्हणजे बर्‍याच लोकांनी ती आवडली असं कळवलं. मग एक लास वेगास वरचं प्रवासवर्णन टाकलं. त्याचंही चांगलं स्वागत झालं.

लगेच धम्याची खरड आली, "इतकं चांगलं लिहिता येतंय ना! तर मग मिपावर नुसते येऊन का हो बसत होतांत इतके दिवस?"

हे कार्टं पहिल्यापासून आगावू बघा!!!! हो, तेंव्हा तो कार्टंच होता; आता लग्न आणि पोरंबाळं झाल्यावर मिशा पिळत त्याला इतर नवीन सभासदांना शिकिवतांना बघून गंमत वाटते!!!!!

मग काय मिपा सतत वाढत होतं आणि माझा मिपावरचा धुडगूसही वाढत होता!!!!

कथा, कविता, विशेषतः विडंबनं, व्यक्तिचित्रं; राडा करायला एक दालन म्हणुन शिल्लक ठेवलं नाही. अगदी पाकक्रिया विभागातही जाऊन दोन मॉक-पाकक्रिया टाकून आलो!! तात्या पस्तावला असणार पण त्याने बिचार्‍याने तसं कधी बोलून दाखवलं नाही. हां हां म्हणता नुसत्या अनुक्रमेचीच तीन पानं भरतील इतकं लिखाण मिपावर करून झालं. अभिप्राय्-प्रतिक्रिया ते वेगळे!!

आपल्याला मराठी लिखाण करता येतं, आपण लिहिलेलं काही थोड्या लोकांनातरी आवडू शकतं हे मिपाने मला जाणवून दिलं. आणखी दुसरी गोष्ट मिपाने दिली ती म्हणजे मित्रमैत्रिणी!!! सुरवातीला मिपावर फक्त आयडीच असल्याने मुख्यतः पत्रमैत्रीच होती. पण मग नंतर तात्याने मिपाकट्टे करायची आयडिया काढली आणि त्या आयडींमागचे चेहरेही दिसले. छोटा डॉनचा सुकेशी फोटो याची देही याची डोळा पाहिला आणि मी धन्य झालो!!! महाराष्ट्रातल्या कट्ट्यांच्या यशाने चेवून जाऊन इथे अमेरिकेतल्या मंडळींनीही कट्टे भरवायला सुरवात केली, त्यात मीही भाग घेतला. त्यातूनच नंदन, मयंक, भाग्यश्रीसारखे मित्र मिळाले. बे एरिआत नाटक्या, बेसनलाडू, बबलू, सर्किट, घासुगुर्जी, शिल्पा, नांवं घ्यावीत तरी किती? शिवाय ईष्टकोष्टी आणि मिडवेष्टी ते वेगळेच! भारतात तर काय विचारता? मुंबई, ठाणेएरिया, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, अगदी इंदूरपर्यंत स्नेही मिळाले. हा मिपाने जुळवलेला स्नेह, दुसरं काय?

आता पाच वर्षांनंतर मागे वळून बघतांना हे नक्की जाणवतं की मिपाने मला जसा मराठी ललितलेखनविषयक आत्मविश्वास दिला तसंच एक कॅथॉर्किक आउटलेट दिलं. आयुष्याच्या रोजच्या जोजारातून बाहेर पडून मुक्तपणे बागडायला मिपा माझी मैत्रिण झालं. संसाराचा ताप मागे ठेऊन वारीत सामील झालेल्या वारकर्‍याला जो एक वेगळा मोकळेपणा मिळतो, जिथे बाकी सगळे सहवारकरीच असतात, आई-वडील, भाऊ-बहीण, बायकोपोरं, बॉस वगैरे नाती जिथे अस्तित्वात नसतात असा मोकळेपणा. तो थोड्या काळासाठीच असतो पण तरी तो आपल्याला ताजंतवानं करतो पुन्हा संसाराचा रथ ओढायला! आयुष्यातले ताण-तणाव, सुखदु:ख्खं, समस्या तर कुणालाच चुकलेली नाहीत, पण त्यांना हसतमुखाने सामोरं जायची शक्ती इथे मला मिळते. आणि हे काय थोडं आहे? जोपर्यंत मिसळपावचं हे कट्टास्वरूप कायम आहे तोपर्यंत आमच्यासारख्या अनेक जणांना रोज काही काळ येऊन बसायला अगत्याचं ठिकाण आहे.

मी तर बायकोला सांगून ठेवलेलं आहे. तिला माझ्या लिखाणावर असंख्य शंका/ टिप्पण्या असतात, शेवटी बायकोच ती! तरी तिला सांगितलेलं आहे की "टीका करायची असेल तर खुशाल कर. मिपावर येऊन आयडी घे आणि तिथे कर टीका! तिथे तू आहेस आणि पिवळा डांबिस आहे!!!" घरगुती टीकेला नवरा म्हणून मी उत्तर देणार नाही कारण घरगुती वादात हार पत्करण्यातच माझं हित आहे असं जुने लोक सांगून गेलेत. अहो, आपल्याच हाताने आपली रसद तोडायला मी काय मूर्ख आहे काय?
:)

असो. तर अशा आनंददायी मिसळपाव ला पंचवर्षीय वाढदिवसानिमित्त आणि पुढील कट्टास्वरूप वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!

प्रतिक्रिया

priya_d's picture

20 Sep 2012 - 4:48 am | priya_d

पिडांकाका

तुमचे तरल, सहज आणि प्रांजळ लेखन आवडले. मिपावर रोज भेट देण्याबाबत व्यक्त केलेल्या विचारांशी पूर्ण सहमत.

मिसळ्पावच्या संयोजक, कार्यकर्ते, सद्स्य या सर्वांचे पाच वर्षांचा टप्पा पूर्ण केल्याबद्द्ल अभिनंदन व पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

किसन शिंदे's picture

20 Sep 2012 - 6:12 am | किसन शिंदे

>>>>>>आयुष्याच्या रोजच्या जोजारातून बाहेर पडून मुक्तपणे बागडायला मिपा माझी मैत्रिण झालं. संसाराचा ताप मागे ठेऊन वारीत सामील झालेल्या वारकर्‍याला जो एक वेगळा मोकळेपणा मिळतो, जिथे बाकी सगळे सहवारकरीच असतात, आई-वडील, भाऊ-बहीण, बायकोपोरं, बॉस वगैरे नाती जिथे अस्तित्वात नसतात असा मोकळेपणा. तो थोड्या काळासाठीच असतो पण तरी तो आपल्याला ताजंतवानं करतो पुन्हा संसाराचा रथ ओढायला! आयुष्यातले ताण-तणाव, सुखदु:ख्खं, समस्या तर कुणालाच चुकलेली नाहीत, पण त्यांना हसतमुखाने सामोरं जायची शक्ती इथे मला मिळते.

अगदी मनातलं बोललात पिंडाकाका.

स्पंदना's picture

20 Sep 2012 - 6:33 am | स्पंदना

येस्स! यहिच बोलतीय!

नंदन's picture

20 Sep 2012 - 8:10 am | नंदन

दोन्ही नव्या संपादकांशी सहमत :)

सहज's picture

20 Sep 2012 - 7:24 am | सहज

तर अशा आनंददायी मिसळपावला पंचवर्षीय वाढदिवसानिमित्त आणि पुढील कट्टास्वरूप वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!

... - मिपावय ४ वर्ष ३ महिने - असलेल्याना बर्‍याच वाचनखुणा मिळाल्या!

बर्‍याचदा एखादा लेख वाचण्यापेक्षा त्यावरच्या 'प्रतिक्रिया काय असतील?' याचीच उत्सुकता जास्त असते! कारण एखाद्या पाककृतीनंतर "हा पदार्थ अंडं घालून करता येईल का?" या प्रश्णाला "ते अंडं घालून किती वेळ झाला आहे यावर अवलंबून आहे" असं खमंग उत्तर फक्त ईथेच वाचायला मिळतं !! आणि याच वात्रटपणा बरोबरच श्रीवर्धन आणि मनरंजनच्या भटकंतीच्या लेखानंतर नंदनचा "श्री-वर्धन की मन-रंजन ही नागरी द्विधावस्थाही नेमकी व्यक्त झाली आहे" हा अप्रतिम श्लेषहि इथेच वाचनात येतो.

पंचाईत एव्हढिच आहे कि "लेख आवडला / छान आहे / मस्त लिहिलंय" या स्वरूपाचे चार शब्द पुन्हा॑ पुन्हा लिहिण्यापलीकडे माझ्यासारख्याची कुवत नाहि. त्यामुळे मी आपला वेचक वाचनखुणा साठवतो आणि नित्यनेमाने सकाळी चहाचा कप घेऊन मिपा उघडतो झालं.

मी_आहे_ना's picture

20 Sep 2012 - 12:34 pm | मी_आहे_ना

अगदी मनातलं बोललात..

अतिशय छान लिहिलंत पिडांकाका.

चौकटराजा's picture

20 Sep 2012 - 8:17 am | चौकटराजा

मी हे मनोगत वाचून केवळ खल्लास झालो, प्रवाही लेखन म्हणजे काय ? असा प्रश्न कुणाला पडेल तर त्याने हे मनोगत अवश्य वाचावं !

नीधप's picture

20 Sep 2012 - 8:25 am | नीधप

वा सि डॉ वा. :)

यशोधरा's picture

20 Sep 2012 - 8:26 am | यशोधरा

:)

शिल्पा ब's picture

20 Sep 2012 - 8:30 am | शिल्पा ब

:)

प्रकाश घाटपांडे's picture

20 Sep 2012 - 8:46 am | प्रकाश घाटपांडे

या निमित्ताने मला आनंद घारे यांच्या मिसळपाववरील पहिले वर्ष या लेखाची आठवण झाली. त्याचा दुवा http://www.misalpav.com/node/6131

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2012 - 9:07 am | प्रभाकर पेठकर

लेख मस्तच झाला आहे. जरा लहान वाटला. अजून जरा तपशीलवार करता आला असता. पण ठिक आहे हल्ली धावपळीच्या जीवनांत 'क्रमशः' शब्दाचा अनेकांनी धसकाच घेतला आहे. मिपा बद्दलच्या 'हळुवार' भावना पोहोचल्या.

तात्यांच्या निमंत्रणामुळेच मिपावर मी आलो आणि मिपा नांवाचं व्यसन कधी लागलं कळलच नाही. आता व्यसनमुक्ती केंद्र शोधणे आले.

तिमा's picture

20 Sep 2012 - 11:08 am | तिमा

लेख आवडला.
माझ्यासारख्या बहुतेक लोकांमधे एक 'वात्रट कार्टं' सदैव वावरत असते. अगदी साठ वर्षे होऊन गेली तरी ते, आहे त्याच वयाचे रहाते. त्याला बागडायला मिपासारखी दुसरी चांगली जागा शोधून सापडणार नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Sep 2012 - 11:26 am | बिपिन कार्यकर्ते

सलाम बॉस! जे अनेक नमूने भेटले इथे त्यात पिडां हे नाव पहिल्या पाचात घेईन मी! :)

छोटा डॉन's picture

21 Sep 2012 - 12:15 am | छोटा डॉन

आज मिपाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त श्री. बिका ह्यांच्याशी सहमत होण्याचे सौभाग्य मला पिडाकाकांच्या लेखाच्या निमित्ताने मिळाले म्हणुन मी त्यांचा शतशः आभारी आहे ( आज आम्ही असे बर्‍याच लोकांचे आभार मानणार आहोत ).

च्यायला पिडाकाकांच्या लेखाला नुसतीच 'उत्तम लेख' म्हणुन पावती द्यावी हे काय आपल्य तत्वात बसत नाही. हे म्हणजे लास वेगासला जाऊन दुध-कॉर्नफ्लेक्सचा नाश्ता करुन येण्यासारखे आहे.
भेटलेल्या नमून्यांचीच बात निघाली आहे तर परा, धम्या, बिका, निख्या, सोत्री, श्रामो-विमोंची जोडी, पिडांकाका, आमचे क्रिकेटचे गुरुवर्य ररा, आंद्या, विजुभौ, रामदासकाका, प्रभुमास्तर अशा एकसे एक महाभागांची रांग लागेल.
प्रत्येकाबद्दल २-४ ओळी लिहायच्या म्हटल्यातरी प्रतिसाद मेगाबायटी होऊन जाईल.
असो, आता जास्त काहे न लिहता प्रतिसादांची मज्जा घेतो. बाकी सविस्तर नंतर कधीतरी ( आता रिकामाच आहे नै का ;) )

- छोटा डॉन

झकासराव's picture

20 Sep 2012 - 11:31 am | झकासराव

काका भारी लिहिलय :)

श्रावण मोडक's picture

20 Sep 2012 - 11:32 am | श्रावण मोडक

नाश्ता झाला. जेवणाचं काय? तयारीला लागा आता. :-)

नाना चेंगट's picture

20 Sep 2012 - 12:55 pm | नाना चेंगट

+१

अप्पा जोगळेकर's picture

20 Sep 2012 - 11:49 am | अप्पा जोगळेकर

एकदम आवडून गेलं. प्रत्येक मिसळपाव सदस्याच्या मनातलंच लिहिलंय.

प्रभो's picture

20 Sep 2012 - 12:58 pm | प्रभो

:)

मोहनराव's picture

20 Sep 2012 - 1:44 pm | मोहनराव

काकानु लेखन आवडले. मिपा एक मस्त कट्टा आहे, एक दिवस इकडे फिरकुन नाही गेलो तर चुकल्या चुकल्यासारखे वाटत राहते.

गणपा's picture

20 Sep 2012 - 1:49 pm | गणपा

मस्तच.
<< "इतकं चांगलं लिहिता येतंय ना! तर मग मिपावर नुसते येऊन का हो बसत होतांत इतके दिवस?" >>
धम्याशी बाडिस.
फक्त थोडा बदल करुन म्हणतो.
"इतकं चांगलं लिहिता येतंय ना! तर मग मिपावर नुसते येऊन का हो बसता दिवसच्या दिवस?"

- काकांचा स्वयंधोषित पुतण्या

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Sep 2012 - 3:12 pm | बिपिन कार्यकर्ते

+१ .... पिडा नुसती की वो! काही लिहिणं न्हायी, चांगलं सांगणं न्हायी! नुस्तं आपलं बडाबडा करायचं का म्हणून म्हणतो मी!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2012 - 3:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:) आवडेश. प्रतिक्रिया सवडीने देतो.

-दिलीप बिरुटे
(ड्बल बॅरलवाला)

अद्द्या's picture

20 Sep 2012 - 4:02 pm | अद्द्या

लै झ्याक

ऋषिकेश's picture

20 Sep 2012 - 4:36 pm | ऋषिकेश

मस्तच! :)

मिपाचे, मालक-चालकांचे आणि आपल्या सगळ्यांचेच मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन!

परिकथेतील राजकुमार's picture

20 Sep 2012 - 6:06 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तच एकदम.

बाकी,
पहिले काही आठवडे फक्त वाचनच केलं आणि मग लक्षात आलं की हे मिसळपाव काही वेगळंच झटकेबाज रस्सायन आहे!!

आहे ? का होते ?

एकेकाळी मिपाची तर्री ही बंडाची, कुठल्याही शब्दाचा, विचाराचा, वयाचा विधिनिषेध नसलेली होती. आता काही लोकांना ही तर्री पचत नाही, लगेच मुळव्याध होते बहूदा. मग ते तर्रीच्या जागी मटार उसळीचे पाणी मागतात. ते पाहून डोके आपटून घ्यावेसे वाटते. :P

शेक्सपिअरच्या कुठल्याश्या नाटकात एक वाक्य आहे, 'तलवारीच्या बळावर जिंकलेली राज्ये, ही तलवार हातात असेपर्यंतच टिकतात.' त्याचप्रमाणे मिपाच्या तर्रीची धार आणि झणका परत येवो हीच गणपती बाप्पा कडे प्रार्थना,

त्याचप्रमाणे मिपाच्या तर्रीची धार आणि झणका परत येवो हीच गणपती बाप्पा कडे प्रार्थना,

नाही येणार ती परत. पाणी ओतायला अनेक जण तयार असतात. असो.

एस's picture

21 Sep 2012 - 11:35 pm | एस

त्यापेक्षा लिहिते व्हा, पॉपिलूं... :)

शुचि's picture

20 Sep 2012 - 6:52 pm | शुचि

वारकर्‍याची उपमा तर इतकी आवडून गेली.

मुक्त विहारि's picture

20 Sep 2012 - 6:57 pm | मुक्त विहारि

अगदी मनातलं बोललात..

संदीप चित्रे's picture

20 Sep 2012 - 8:15 pm | संदीप चित्रे

>> पण मराठी पुस्तकं वाचण्यात एक अडचण होती ती म्हणजे ते सगळे लेखक आणि आपण वाचक! ते उच्चासनावर बसून लिखाण केलेले!! त्यांचं लिखाण आवडलं तर दाद द्यायची, नाही आवडलं तर भिकार आहे म्हणून सांगायची काही सोय नव्हती. शंका, प्रतिप्रश्नही विचारता येत नसत. त्यामानाने हे मिसळपाव मस्त वाटलं. >>
अगदी सहमत पिडांकाका :)

एकंदर तुमच्या आठवणींचा फेरफटका आवडला आणि त्यानिमित्ताने मिपावरच्या वेगवेगळ्या आठवणींत रमलो.
बाकी तुमच्या लेखातलं >> आपल्याच हाताने आपली रसद तोडायला मी काय मूर्ख आहे काय? >> हे वाक्यं तर बेष्टच आहे :)

कधीचा शोधत होते मिपाचा इतिहास. छान आहे, हो, पिडांकाका. धन्यवाद !

देविदस्खोत's picture

20 Sep 2012 - 10:42 pm | देविदस्खोत

मिपास वाढदिवसानिमित अनेकानेक हार्दीक शुभकामना !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

पैसा's picture

20 Sep 2012 - 10:58 pm | पैसा

बरेच दिवसांनी इडंबन सोडून आणखी काय तरी लिव्हलांव! बरे, बेश हो! माका खूप आवाडलां. आणखी केव्हा लिहणार? :)

अगदी मनातलंच उतरलेलं आहे. मी सुद्धा मिपामुळे लिहिते झालेल्यांपैकी एक आहे. ("कशाला!" असं कोणीतरी म्हणतंय वाटतं!)

वाह पिडांकाका, झकास लिवलाय... :)

मेघवेडा's picture

21 Sep 2012 - 1:48 pm | मेघवेडा

मनोगत आवडलं. छान लिवलंयत. :)

Quintessential पिडा :-)

"......एके दिवशी आपल्या पदव्या, व्यवसाय, वय, सांसारीक स्थिती ही सगळी वस्त्रं उतरवून ठेवली आणि निस्सं:ग होऊन या डोहात सूर मारला!!! "

काय नेमकं वर्णन आहे, सलाम!

चित्रा's picture

22 Sep 2012 - 5:01 am | चित्रा

छानच.

लेख आवडला.

विजुभाऊ's picture

21 Sep 2012 - 5:52 pm | विजुभाऊ

नक्की काय लिहु.
पिडां काका इथे आला होता तेंव्हा त्यांच्यासमवेत बर्‍याच भावना शेअर केल्या होत्या.
बहुतेकांच्या बाबतीत तोच अनुभव आहे.
दिल्लीत एखादा माहेरचा माणूस भेटावा तसे माझे आतिथ्य करणारा इरसाल असो किंवा कधी प्रत्यक्ष न भेटलेला यक्कु असो इथे असलेला प्रत्येक माझ्या कुटुंबाचा सदस्य झालाय.

पंचवार्षिक सहल मस्त घडवलीत पिडांकाका... असेच वाचायला मिळो...

मी-सौरभ's picture

21 Sep 2012 - 6:26 pm | मी-सौरभ

सहमत

विसोबा खेचर's picture

21 Sep 2012 - 7:54 pm | विसोबा खेचर

नीलकांत, सर्व संपादन मंडळ आणि मिपाकर.. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार..

-- (आद्य संस्थापक)

पि. डां.काकांच्या ओघवत्या आणि चपखल शब्दात मांडलेल्या लेखामुळे (माझ्यासारख्या) नवागतांस (काही बाही) लिहिण्यासाठी प्रेरणा मिळेल..
धन्यवाद काका.

पि. डां.काकांच्या ओघवत्या आणि चपखल शब्दात मांडलेल्या लेखामुळे (माझ्यासारख्या) नवागतांस (काही बाही) लिहिण्यासाठी प्रेरणा मिळेल..
धन्यवाद काका.

विकास's picture

21 Sep 2012 - 8:33 pm | विकास

लेख आवडला... "पिवळा डांबिस ऐसा मिपावरी झळकला" हे पाहून आनंद झाला! :-) अजून येत राहूंदेत, दरवेळ नीलकांतच्या व्यनीची वाट बघत बसू नका!

विसोबा खेचर's picture

21 Sep 2012 - 8:34 pm | विसोबा खेचर

डांबिसाने पण नेहमीप्रमाणे सुरेखच लिहिले आहे..:)

इरसाल's picture

21 Sep 2012 - 9:42 pm | इरसाल

मी नीलकांत नाही. तरी पण तुम्हाला एक व्यनि पाठवेन म्हणतो. जर तुम्ही असेच लिहीत रहाणार असाल तर.
हे लिहीलेले मनाच्या आरश्यातील प्रतिबिंब आवडले.

बॅटमॅन's picture

21 Sep 2012 - 10:06 pm | बॅटमॅन

मिपाचे हिरोडोटसच आहात पिडांकाका :)

पिडांकाका असेच लिहीत रहा... :) व्यनीची वाट न-पाहता ! ;)

>>"मी तर बायकोला सांगून ठेवलेलं आहे. तिला माझ्या लिखाणावर असंख्य शंका/ टिप्पण्या असतात, शेवटी बायकोच ती! तरी तिला सांगितलेलं आहे की "टीका करायची असेल तर खुशाल कर. मिपावर येऊन आयडी घे आणि तिथे कर टीका! तिथे तू आहेस आणि पिवळा डांबिस आहे!!!""

हम्म्म्म्... तरीच काकू अजून मिपावर येत नाहीयेत... ;)

धनंजय's picture

22 Sep 2012 - 3:21 am | धनंजय

मिसळपाव हे मोठे मजेदार व्यसन आहे. ते लावून देणार्‍या सर्वांचे आभार.

सुधीर's picture

23 Sep 2012 - 10:04 am | सुधीर

आवडलं! या निमित्ताने काही दुर्मिळ आयडींचे निदान प्रतिसाद वाचायला मिळाले.

प्रास's picture

23 Sep 2012 - 9:28 pm | प्रास

छान लिहिलंय.
मिपास वर्धापनदिनाच्या शुभेच्छा!

अन्जलि's picture

25 Sep 2012 - 2:38 pm | अन्जलि

खरेच मिपाचे व्यसन लागले आहे रोज मिपा मिपा खेळल्याशिवाय चैन पडत नाहि. इतके दिवस घरच्या गणपति मधे व्यस्त असल्या मुळे मिपा वर येता आले नाहि म्हणुन आज मिपाला वाढदिवसा निमित्त हर्दिक शुभेछा उशिरा देत आहे.