ऑक्टोबर

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in जनातलं, मनातलं
24 Apr 2018 - 8:09 pm

आयुष्याच्या महत्वाच्या गरजा भागलेली आजची तरुणाई. कुठच्यातरी भयंकर अडचणींमधून मार्ग काढून काहीतरी नेत्रदीपक करण्याची निकड संपलेली. जगण्याचं कारण काय, असा प्रश्न पडतोय, हे कळण्याइतका विचार करण्याची सवय नाही, आणि तरी त्या प्रश्नाच्या गर्तेत कधी ना कधी अडकून भरकटणारी, त्या डोळ्यांत भरणाऱ्या भरकटलेपणावर आपापल्या कुवतीने उत्तरं शोधणाऱ्या, सुचवणाऱ्या जगावर कावलेली तरुणाई.

ऑक्टोबरमधला डॅन म्हणून सहजपणे आपला वाटू शकतो. व्यवहारात मंद, आणि तरी काहीतरी करण्याची इच्छा असणारा, ते करण्यासाठी मार्ग माहीत नसलेला, आणि मग ती काही करण्यासाठीची ऊर्जा उगाच जगाला हडतुड करत वाया घालवणारा डॅन. Loser, not at the top of everything in this competitive world असा डॅन.

आणि त्याच्याच हॉटेलवाल्या डिप्लोमाची आदर्श विद्यार्थिनी शिउली. सगळं जग डॅनच्या दृष्टीने मूर्ख. शिउली त्याच जगातली अतिशहाणी. शांत, बोलक्या डोळ्यांची शिउली. प्राजक्ताची फुलं एकेक करून हळुवारपणे वेचणारी.

मग या सगळ्या कथेत घटना अशी घडते ती एकच. ड्रिंकसुद्धा न करणाऱ्या शिउलीचं नववर्षाच्या पार्टीमध्ये तिसऱ्या मजल्याच्या कठड्यावरून घसरून पडणं. हॉस्पिटलची डिटेल दृश्यं... या पार्टीलापण दांडी मारलेल्या डॅनला तसं त्याचं काहीच पडून गेलेलं नाही. हॉस्पिटलला पण सगळे जाऊन आल्यानंतर हा जातो. आणि मग काहीतरी बदलतं. काहीच न घडणाऱ्या आयुष्यात काहीतरी घडलेलं असतं. त्याला शिउलीचं असं कोमात जाणं हलवून जातं. अर्थात नक्की कुठे काय हललंय, हे न उमजताच.

त्यात त्याला एवढंच समजतं की पडण्यापूर्वी तिने 'Where is Dan' हा शेवटचा प्रश्न केलेला होता. इथून तो पुरता अस्वस्थ होऊन जातो. का बरं विचारलं असेल तिने असं? स्वतःला सिद्ध करायच्या नादात स्वतःत अति रमलेला डॅन शिउलीच्या जगण्याशी चालू असलेल्या झगड्यात पुरता रुतत जातो.

आयुष्यात आपल्याला भावणारा बहर सापडणं महत्वाचं. अगदी तो ओसरता, ओझरता सापडला तरीही. एखादा बहर अकस्मात आपला बनून जातो. प्राजक्ताच्या फुलांसारखा, कोमेजून देखील आपलं अस्तित्व जाणवून द्यायला सामोरा येतो.

तो बहर हे उद्दिष्ट नव्हे, त्याची वाट बघणं, त्याच्याकडून काही मिळणं, हेही उद्दिष्ट नसावंच कदाचित. पण त्याचं असणं त्या आत्मकेंद्रीपणातून मुक्ती मिळवून देतं. स्वतःच्या बाहेर पडलं, की जग सोपं होतं का?

'तुम लोग हर बात चान्स हो तोही करते हो क्या'? हा डॅनचा प्रश्न फार प्रातिनिधिक वाटतो मला. कुणा दुसऱ्याचं झगडणं आपलं बनलं, की आपल्या झगड्याच्या गुंत्यातून सुटणं सहजपणे जमतं का?

प्राजक्ताची फुलं आवाज न करता रात्रभर ओघळून पडतात. त्याच गतीने बघायचा, समजून घ्यायचा चित्रपट आहे हा. शिउलीची अम्मा, बहीण, भाऊ, डॉक्टर, नर्स, डॅनचे सगळे मित्रमैत्रिणी, सगळ्यांचे अनुभव मिळून एक प्राजक्ताचा सडा आहे हा चित्रपट. एक तरल अनुभव देणारा ऑक्टोबर, बघणाऱ्या प्रत्येकाला आवडेलच असं नाही. आवडावा असा आग्रहही नाही. मात्र, प्राजक्ताच्या सड्याशी नातं सांगणाऱ्या मनांना बघायला हरकत नाही.

चित्रपटप्रकटन

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

24 Apr 2018 - 8:55 pm | जेम्स वांड

राजकीय धुमाकूळ धाग्यात मिपा हरवलं वाटेपर्यंत असे सुखद धागे निघतात, ऑक्टोबर पाहणारच! तसंही बदलापूर पासून वरुण धवन करता एक खास जागा आहे मनात.

पुन्हा एकदा, जबराट परीक्षण.

श्वेता२४'s picture

24 Apr 2018 - 9:16 pm | श्वेता२४

ओक्टोबर कसा असेल माहित नाही पण तुम्ही इतकं तरल शब्दांकन केलय की मी पाहीनच.एक नं!

पद्मावति's picture

25 Apr 2018 - 12:25 am | पद्मावति

सुरेख!

चित्रगुप्त's picture

25 Apr 2018 - 12:48 am | चित्रगुप्त

वा . सुंदर परिक्षण. बघितलाच पाहिजे हा सिनेमा असं वाटायला लावणारं.

.

सुखीमाणूस's picture

25 Apr 2018 - 7:25 am | सुखीमाणूस

आता नक्की बघणार हा चित्रपट.
ह्या सुन्दर समिक्शणामुळे समजून बघितला जाईल.

पिशी अबोली's picture

25 Apr 2018 - 11:31 am | पिशी अबोली

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना खूप धन्यवाद! :)

भन्नाट भास्कर's picture

25 Apr 2018 - 11:52 am | भन्नाट भास्कर

छान परीक्षण आहे, चित्रपटाचे पोस्टरही छान आहे. परीक्षणातून कथानकाचा नेमका अंदाज मात्र लागला नाही. फार संथ असेल तर चित्रपटगृहात जाऊन बघणे होणार नाही, छोट्या पडद्यावर मात्र वरुन धवन या गुणी आणि प्रामाणिक कलाकारासाठी बघितला जाईल.

लई भारी's picture

25 Apr 2018 - 1:53 pm | लई भारी

परीक्षण म्हणावं का? :) खूप सुंदर लिहिलंय.
काही का असेना, हे वाचून चित्रपट बघायची इच्छा झालीय आता.

सकाळीच एकाने "संथ आहे, नको बघू" म्हटलं होत. आपण म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला आवडेलच असा नाही त्यामुळे हे अपेक्षित आहे.

पिशी अबोली's picture

25 Apr 2018 - 5:50 pm | पिशी अबोली

धन्यवाद! :)

ज्योति अळवणी's picture

26 Apr 2018 - 3:54 pm | ज्योति अळवणी

उत्तम परीक्षण. नक्की बघणार सिनेमा

छानच लिहिले आहे. सिनेमा लवकरच पाहीन.

बिटाकाका's picture

26 Apr 2018 - 5:19 pm | बिटाकाका

सुंदर परीक्षण! छान शब्दबद्ध केलं आहे.

अनुप ढेरे's picture

26 Apr 2018 - 5:27 pm | अनुप ढेरे

सिनेमा बघितला आहे आणि खूप आवडला. वरुण धवन आणि शिउलिच्या आईने मस्तं कामं केली आहेत.
शिउलि हा प्राजक्ताच्या फुलासाठीचा बंगाली शब्द आहे.

पैसा's picture

26 Apr 2018 - 6:29 pm | पैसा

पैसे देऊन वर रडणे आता परवडत नाही त्यामुळे सिनेमा बघणार नाही.

शिवाय नेटवर शोधताना या सिनेमात गेल्या वर्षीच्या एका मराठी सिनेमाची कथा चोरली आहे असे वाचले. या मराठी सिनेमाच्या हिंदी रूपांतर करायचे हक्क कोणीतरी विकत घेतले होते तो खड्ड्यात गेलाय. योग्य श्रेय न देता कथा वापरणे पटले नाही.

मदनबाण's picture

26 Apr 2018 - 7:28 pm | मदनबाण

सुरेख लेखन !
पाहीन कि नाही ते आत्ताच सांगता येत नाही...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dilbaro | Raazi | Alia Bhatt | Harshdeep Kaur, Vibha Saraf & Shankar Mahadevan | Shankar Ehsaan Loy

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2018 - 10:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर परिक्षण !

प्रचेतस's picture

27 Apr 2018 - 9:09 am | प्रचेतस

छान लिहिलंय

पिशी अबोली's picture

27 Apr 2018 - 12:16 pm | पिशी अबोली

धन्यवाद!
हे लिहिलेलं परिक्षणापेक्षा काहीसं मुक्तक प्रकारातील आहे, कारण त्यातील भाव जास्त महत्वाचे आहेत. मला हा चित्रपट आवडला, पण बऱ्याच जणांना खूप संथ वाटला. फक्त हे वाचून कुणाला बघायला जावंसं वाटलं तर काय अपेक्षा घेऊन जाव्यात, त्याबद्दल साधारण लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कारण कथा अशी सांगता येत नाही, किंवा नक्की कशाबद्दल आहे तेही सांगता येत नाही. अतिशय तरल हाताळणी, हेच त्याचं यश आहे.

परीक्षण आहे का हे ? त्यावरून तरी चित्रपट फारच संथ वाटतो आहे. त्यामुळे पाहीन असं वाटत नाही.
पण लिहिण्याची स्टाईल आवडली. विशेषत:
'आयुष्यात आपल्याला भावणारा बहर सापडणं महत्वाचं. अगदी तो ओसरता, ओझरता सापडला तरीही. एखादा बहर अकस्मात आपला बनून जातो. प्राजक्ताच्या फुलांसारखा, कोमेजून देखील आपलं अस्तित्व जाणवून द्यायला सामोरा येतो.'
हे फारच !

प्राजक्ताच्या सड्याशी नातं सांगणाऱ्या मनांना बघायला हरकत नाही

या वाक्यासाठी बघेन हा चित्रपट

शब्दबम्बाळ's picture

27 Apr 2018 - 1:45 pm | शब्दबम्बाळ

मस्त भावना उतरवल्या आहेत!
पण बऱ्याचदा असे होते की चित्रपटाचे परीक्षण तरल शब्दात किंवा कलात्मक पद्धतीने लिहिले तर मूळ चित्रपटापेक्षा परीक्षण लिहिणार्याच्या कलेनुसार तो चित्रपट वाटू लागतो! :)
तुम्ही सगळ्यांना आवडण्यासारखा असेल असे नाही हे लिहिले आहेच म्हणा!
ऑफिस मध्ये एकाने चित्रपट पहिला पण त्याला तो आवडला का नाही याबद्दल तो स्वतःच संभ्रमात आहे त्यामुळे ऍमेझॉन प्राईम वर आल्यावर बघण्यात येईल असे दिसतंय...

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Apr 2018 - 2:50 pm | राजेंद्र मेहेंदळे

<<कुणा दुसऱ्याचं झगडणं आपलं बनलं, की आपल्या झगड्याच्या गुंत्यातून सुटणं सहजपणे जमतं का?>>

वाक्य जरा कॉम्प्लिकेटेड आहे, पण मला वाटते की दुसर्‍याच झगड्णं सोडवताना आपला गुंता विसरला जातो किंवा बाजुला पडत जातो. आपोआप काहीच सुटत नसतं इथे :(

पिशी अबोली's picture

27 Apr 2018 - 10:34 pm | पिशी अबोली

इतक्या लोकांनी वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2018 - 9:56 am | चौथा कोनाडा

सुंदर संवेदनाशील रसग्रहण ! असे लेक सिनेमा पहायला अन समजुन घ्यायला उपयोगी पडतात !
कासव देखील असाच ट्युन-अप होवुन पहिला होता !

हा लेख वाचुन नागेश कुकुनूरचा मोड नावाचा सिनेमा आला होता त्याची आठवण झाली.

पिशी अबोली's picture

29 Apr 2018 - 8:08 am | पिशी अबोली

धन्यवाद!

हा कुकुनूरचा सिनेमा नाही पाहिला. बघेन.

लई भारी's picture

18 Jun 2018 - 11:51 am | लई भारी

प्राईमवर आलाय, बघायचा राहिला होता. सलग पाहता आला नाही पण अगदी असेच मनात आले.
खूप तरल अनुभव आहे. काही जणांनी तर तक्रार केली की हॉस्पिटलच्या दृश्यांमुळे/आवाजामुळे डिप्रेसिंग वाटला वगैरे. पण मला खूपच भावला. आपण बरंच काही मांडलं आहेच. सर्व पात्रांसोबत निसर्ग आणि एकंदरीतच भवताल याचा खूप बारकाईने उपयोग करून घेतलाय.
पार्श्वसंगीत खूपच सुसंगत वाटलं. शेवटचा व्हायोलिन तर काळीज चिरत गेला.
*****Spoiler alert****
एकंदरीत खूप हलवून गेला चित्रपट. शिऊलीच्या कुटुंबियांशी, डॅनशी खूप समरस झालोय असं वाटलं आणि त्याचमुळे पहिल्यांदा डोळ्यांची हालचाल करते तेव्हा एकदम भरून आलं. तिला घरी आणल्यानंतर सुखांत होतोय अशी आशा निर्माण झाली होती पण कदाचित हाच शेवट बरोबर असेल.
एकदा एखाद्या गोष्टीसाठी पूर्ण झोकून दिल्यावर ती गोष्ट आयुष्यात नसली तर किती रितेपणा येतो याची जाणीव झाली, विशेषतः डॅन आणि शिऊलीच्या आईकडे बघून.

मराठी कथालेखक's picture

18 Jun 2018 - 7:16 pm | मराठी कथालेखक

मी युट्युबवर वाट बघत होतो..आणि प्राईम घ्यावा का या विचारात होतो. पण ऑक्टोबर आलाय तर लवकरच प्राईमचे सभासदत्व घेईन म्हणतो.

जव्हेरगंज's picture

18 Jun 2018 - 8:49 pm | जव्हेरगंज

सिनेमासारखंच सुंदर परिक्षण!!!!

पिशी अबोली's picture

20 Jun 2018 - 11:23 am | पिशी अबोली

धन्यवाद!