हुंडीव्यवहार

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
6 Feb 2018 - 10:58 pm

ब्रिटिश सत्तेच्या मागोमाग हिंदुस्तानात अर्थव्यवहार करण्यासाठी बॅंका स्थापन होऊ लागल्या आणि त्यांच्या माध्यमातून एका स्थानावरून दुसरीकडे वा एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पैसा पाठविण्यासाठी नवे साधन हिंदुस्तानात उपलब्ध झाले. तत्पूर्वी हिंदुस्तानातील दूरदूरच्या गावातील असे व्यवहार ’हुंडी’ ह्या गोष्टीच्या माध्यमातून होत असे. अशा ’हुंडी’चा हा अल्पपरिचय.

हुंडीचे मूळ स्वरूप म्हणजे ’अ’ ह्या व्यक्तीने ’ब’ ह्या व्यक्तीला लिहिलेले पत्र, ज्यामध्ये ’क’ ह्या व्यक्तीला एक रक्कम देण्याचा आदेश असतो. हिंदुस्तानातील व्यापारी समाजाने निर्माण केलेली ही पद्धत कोठल्याहि कायद्यानुसार निर्माण झालेली नव्हती. बाजारपेठांमधील रीतिरिवाज आणि दूरदूरच्या व्यापारी पेढयांचा एकमेकांच्या पतीवरील विश्वास ह्यांवर हुंडीपद्धत अवलंबून होती. पुरेशा संख्येने बॅंकांच्या शाखा उपलब्ध नसल्याने १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत हिंदुस्तानी व्यापारीवर्ग पैशाच्या देवाणघेवाणीसाठी प्रामुख्याने हुंडीव्यवहारावर अवलंबून असे. तदनंतर तिचा संकोच होत जाऊन आता हा शब्द क्वचितच कानी पडतो. हुंडीचाच दुसरा प्रकार, ज्याला ’हवाला’ असे नाव आहे, तो मात्र जगभर पसरलेल्या भारतीय, पाकिस्तानी आणि अन्य आशियाई लोकांचा स्वदेशाकडे पैसे पाठविण्याचा आवडता मार्ग आहे. हवाल्याचा उपयोग काळा पैसा पांढरा करणे, अमली वस्तूंच्या विक्रीची किंमत चुकती करणे, दहशतवादी संघटनांना पैसा पुरविणे, विनिमय कायद्यांचे उल्लंघन करणे ह्यासाठीहि केला जाऊ शकत असल्याने जगभरच्या गुप्तहेर संघटना आणि पोलिस दले हवाल्याकडे संशयी नजरेने पाहतात आणि त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात.

हुंडीचा उपयोग कोठे होत असे? एक उदाहरण घेऊ. १७९८ साली पुण्याहून बाळंभट माटे आपल्या आईला काशीयात्रा घडवून आणण्यासाठी काशीयात्रेला जात आहेत. रास्तेवाडयावर ते पूजेसाठी जातात तेथे त्यांच्या कानावर असे पडते की रास्त्यांच्या घरातील काही मंडळी काशीयात्रेला जाणार आहेत. त्यांच्याबरोबर आपणहि गेल्यास चांगली सुरक्षित सोबत मिळेल असा विचार त्यांच्या मनात येऊन एके दिवशी धाडसाने थोरल्या वहिनीसाहेबांना ते ’मीहि तुमच्याबरोबर येऊ का’ असे ते विचारतात. वहिनीसाहेबहि हो म्हणतात आणि अचानक ही दुर्मिळ संधि भटजीबोवांना उपलब्ध होते.

काशीच्या प्रवासासाठी आणि तेथील खर्च अणि दानधर्मासाठी त्यांना तीनशे रुपये बरोबर न्यायची इच्छा आहे. गेली चौदापंधरा वर्षे वार्षिक रमण्यात मिळालेली पाचदहा रुपयांची दक्षिणा, सरकारवाडयावर दरवर्षी अनुष्ठानाला ब्राह्मण बसवतात तेथे मिळालेली दक्षिणा, एका यजमानासाठी केलेले वटवृक्षाला लाख प्रदक्षिणा घालण्याचे अनुष्ठान आणि रोजच्या पूजाअर्चा, रुद्राची आवर्तने ह्यांच्या परचुटन दक्षिणा अशी अडीचतीनशेची पुंजी त्यांनी जमवली आहे. काशीयात्रेतून त्यांना स्वत:ला आणि आईला पुण्यप्राप्ति तर झाली असतीच पण परतीच्या वेळी गंगेच्या पाण्याची कावड आणून ते पाणी गडूगडूने यजमानांना विकून यात्रेतली सगळी गुंतवणूक दामदुपटीने परत मिळविता येईल हाहि व्यावहारिक विचार बाळंभटांच्या मनात आहे

आपल्या कमरेभोवती तीनशेचा कसा बांधून बाळंभट जाऊ शकतात पण त्यामागे अनेक धोके संभवतात. सर्वात मोठा धोका म्हणजे वाटेत चोर-दरोडेखोर अथवा फासिगार ठगांच्या टोळ्या त्यांना लुटून त्यांचा पैसा काढून घेतील आणि पैशाच्या लोभाने त्यांना मारूनहि टाकतील. पेंढार्‍यांच्या झुंडी वावटळासारख्या कोठून बाहेर पडून गरीब वाटसरांना लुटतील ह्याचा नेम नाही. पैसे वाटेत कोठेतरी हरवण्याचीहि शक्यता आहेच. तत्कालीन दळणवळणाची साधने पाहता असे काही झाले तर बिचार्‍या बाळंभटाचे हाल कुत्रा खाणार नाही अशी वेळ येईल. त्यांच्या सुदैवाने ह्यावर एक तोडगा उपलब्ध आहे. पुण्याच्या बाजारपेठेत अशा काही पेढया आणि सावकार आहेत की ज्यांचे हिंदुस्थानभरच्या पेढयांबरोबर व्यापारी संबंध आणि हिशेबाची खाती आहेत. बाळंभट बुधवारातल्या चिपळूणकरांच्या पेढीवर जातात आणि काशीमधल्या सावकारावर हुंडी मागतात. चिपळूणकरांचा कारकून भटजींना हुंडणावळीचा दर - commission - दरसदे म्हणजे दर शेकडा २ रुपये पडेल असे सांगतो पण भटजीबोवा तसे व्यवहारी आहेत. मी दरिद्री ब्राह्मण, केवळ आईची इच्छा मरण्यापूर्वी पुरी करायची म्हणून पोटाला चिमटा घेऊन ही रक्कम कशीबशी उभी केली आहे अशी विनवणी ते करतात. चार अन्य प्रतिष्ठितांच्या ओळखीहि आणतात आणि अखेर दरसदे १॥ रुपया हुंडणावळीवर सौदा तुटतो. बाळंभट ३०४॥ रुपये चिपळूणकरांच्या पेढीवर आणून भरणा करतात. भटजीबोवांनी ह्या रकमेचा मोठा भाग त्यांच्या दक्षिणेमधली नाणी साठवून उभा केला आहेत. साहजिकच ती नाणी म्हणजे वेगवेगळ्या पेठांमध्ये चालणारी, कमीजास्त मान्यता असलेली, कोरी, मळकी, अनेक छाप असलेली आणि अनेक सावकारांनी आपापल्या खुणा उमटवलेली लहान मोठी नाणी आणि खुर्दा आहे. भटजीबोवांना काशीमध्ये हवे आहेत इंग्रजी सिक्का रुपये. चिपळूकरांचे कारकून प्रत्येक नाणे पारखून इंग्रजी सिक्क्याच्या तुलनेत त्याचा बट्टा ठरवून बाळंभटांचे ३०४॥ रुपये सिक्का रुपयांमध्ये २८०॥=। रुपयांइतकेच (२८० रु १० आ. १ पै.) आहेत असे सांगतात. भटजीबोवांना हा मोठाच धक्का आहे पण आता मागे परतायचे नाही असा त्यांचा निर्धार आहे. बायकोच्या दोन तोळ्याच्या बांगडया विकून ते अजून २५-३० रुपये उभे करतात आणि अखेर दुकानावर दोन तीन चकरा मारल्यावर काशीवाले हरकिसनदास लखमीदास ह्यांच्या पेढीवर चिपळूकरांनी लिहिलेली आणि बाळंभटांचे नाव त्यात ’राखिले’ म्हणून घातलेली दर्शनी शाहजोग हुंडी घेऊन बाळंभट समाधानाने घरी येतात आणि प्रवासाच्या तयारीला लागतात. हुंडीमध्ये हुंडी लिहिण्याची तारीख वैशाख शु १ शके १७२० अशी आहे आणि हरकिसनदास लखमीदास ह्यांनी हुंडीची रक्कम ज्येष्ठ व १ ला म्हणजे १॥ महिन्यानंतर हुंडी दाखल झाल्यावर बाळंभटांना द्यायची आहे. चिपळूणकरांनी त्याच दिवशी हरकिसनदास लखमीदास पेढीला त्यांच्यावर अशी हुंडी लिहिल्याचे पेठपत्र जासूदाबरोबर वेगळे रवाना केले आहे.

भटजीबोवांच्या सुदैवाने आणि काशीविश्वेश्वराच्या असीम कृपेने ते स्वत:, पत्नी आणि आई हातीपायी धड महिना-सवामहिन्यातच काशीत हुंडीसकट पोहोचतात. तेथे आपले दूरचे आप्त मोरशास्त्री कर्वे ह्यांच्याकडे ते सर्वजण उतरतात. मोरभट २०-२५ वर्षांपूर्वी न्याय वाचण्यासाठी काशीला गेलेले असतात पण त्यांचे तेथे बस्तान चांगले बसल्यामुळे आता ते काशीकरच झालेले असतात. त्यांच्याच ओळखीने बाळंभट चांगली पत असलेल्या वरजीवनदास माधवदास ह्यांच्या पेढीवर जातात आणि वरजीवनदासांना विनंति करून आपल्या हुंडीचे पैसे त्यांनी मिळवून द्यावे अशी विनंति करतात. वरजीवनदास आपला लेख हुंडीवर लिहून आपला गुमास्ता बाळंभटांबरोबर देतात आणि सर्वजण हरकिसनदास लखमीदास ह्यांच्या पेढीवर पोहोचतात. बाळंभट तेथे हुंडी दाखवतात. ती उलटसुलट नीट तपासून आणि गुमास्त्याकडून हे बाळंभटच आहेत अशी शहानिशा करून घेतल्यावर हुंडी ‘सकारली‘ जाऊन बाळंभटांच्या हातात ३०० कलदार सिक्का रुपये पडतात आणि तशी नोंद हुंडीवर केली जाते. चिपळूणकरांचे खाते हरकिसनदास लखमीदास ह्यांच्या वह्यांमध्ये आहे आणि त्यामध्ये पुरेशी रक्कम जमा आहे. त्या खात्यात ही रक्कम आता नावे लिहिली जाईल आणि हुंडीचा खोका आता जासूदाबरोबर उलट चिपळूणकरांकडे पोहोचेल. तेथे ही ‘खडी हुंडी‘ आणि हा व्यवहार संपेल. मधल्या काळात बाळंभटांच्या मागे काशीक्षेत्रातले पंडे लागलेले आहेत. बाळंभटांचे ३०० रुपये संपवण्याचा पत्कर आता ते पंडे घेतीलच!

वरच्या गोष्टीतील हुंडी दर्शनी आणि शाहजोग होती. म्हणजे तिचे पैसे हुंडी पटवण्यासाठी म्हणजे ‘सकारण्या‘साठी पुढे आल्यावर लगेच द्यावयास हवेत. तसे न दिल्यास हुंडीधारकास त्या विलंबाचे व्याज मिळते. हुंडी शाहजोग आहे म्हणजे पेठेतील कोणी प्रतिष्ठित आणि पतदार व्यक्ति मध्यस्थ म्हणून उभे राहिल्यावरच तिचे पैसे धारकास मिळतात. हुंडी शाहजोग न करता धनीजोग (ज्याच्यापाशी हुंडी आहे अशा कोणासहि पैसे मिळतील), नामजोग (ज्याचे नाव हुंडीमध्ये आहे त्याला पैसे मिळतील), निशाजोग (ज्याच्या शरीरावर वर्णिलेल्या खुणा आहेत अशा व्यक्तीलाच पैसे मिळतील), फर्मानजोग म्हणजे (ज्या व्यक्तीच्या नावे ती हस्तान्तरित करण्यात आली आहे त्याला पैसे मिळतील), देखनवार (बेअरर चेकसारखी जो ती घेऊन येईल त्याला पैसे मिळतील) अशा प्रकारची असू शकते. तसेच ती जोखमी हुंडी असू शकते. एक व्यापारी दुसर्‍याला काही माल पाठवतो आणि मालाच्या किंमतीच्या रकमेची हुंडी खरीददारावर लिहितो. माल कोठल्या वाहनाने येत आहे हेहि नोंदवतो. ही जोखमी हुंडी तो एका दलालाला विकतो आणि आणि दलाली वजा करून मालाची किंमत त्याला मिळून जाते. माल खरीददाराकडे पोहोचल्यावर दलाल त्याच्याकडे हुंडी पाठवून तिचे पैसे वसूल करतो. माल पोहोचेपर्यंत मालाचे पैसे चुकते करण्याची जबाबदारी खरीददारावर नाही. अशा रीतीने विकणारा आणि खरेदी करणारा ह्या दोघांचीहि मालवाहतुकीमधील जोखीम दलाल स्वीकारतो म्हणून ह्या हुंडीला जोखमी हुंडी म्हणतात. कधीकधी परक्या गावात गरजेप्रमाणे पैशाची उचल करता यावी म्हणून व्यापारी मूळ गावातून भलावणपत्र घेऊन येतो. ह्या पत्राच्या आधारे त्याला हवी ती रक्कम वेळोवेळी मिळते. भलावणपत्र लिहिणारा, ते जवळ बाळगणारा आणि पैसा देणारा आपल्याआपल्यामधील हिशेब नंतर पूर्ण करतात. हुंडी दर्शनीऐवजी मुदती असू शकते म्हणजे तिचे पैसे हुंडी दाखविल्यानंतर विशिष्ट मुदतीनंतर मिळतात.

बाळंभटांना मिळालेली हुंडी एका ठराविक पद्धतीने आणि व्यापार्‍यांमध्ये वापरात असलेल्या महाजनी भाषेत लिहिली असावी. अशा एका हुंडीतील मजकूर पहा:

निशानी
हमारे घरु खाते नाम मांडना
दस्तखत ब्रिजकिशोर भार्गव के हुंडी लिखे मुजिब सीकर देसी
श्रीरामजी
सिध श्री पटना सुभस्ताने चिरंजीव भाई रिकबचंद बिर्दीचंद जोग श्री जयपुर से लिखी ब्रिजकिशोर भार्गव की आसिस बाचना. अपरंच हुंडी एक रुपिया २००० अक्षरे दो हजार के निमे रुपिया एक हजार का दुना यहां रखा साह श्री पुनमचंदजी हरकचंदजी मांगसिर बद बारस शाहजोग रुपिया चलान का देना. संबत १९९० मिति मांगसिर सुद बारस

पाठीमागच्या बाजूस
रु २०००
नेमे नेमे रुपिया पांच सौ का चौगुना पूरा दो हजार कर दीजो.

(अर्थ: पेढीच्या शिक्क्याखाली
आमच्या पेढीच्या खात्यात नावे लिहा.
ब्रिजकिशोर भार्गव ह्यांनी हाताने लिहिलेली हुंडी.

श्रीराम

सिद्धि. शुभस्थान पटना येथील चिरंजीव भाई रिकबचंद बिर्दीचंद ह्यांना श्रेष्ठ शहर श्री जयपूरहून ब्रिजकिशोर भार्गव ह्यांचे आशीर्वाद वाचावे. आणखी म्हणजे एक हुंडी रुपये २००० अक्षरांनी दोन हजार ह्याचे निम्मे रुपये एक हजार ह्याची दुप्पट. येथे राखिले शाह श्री पुनमचंदजी हरकचंदजी शाहजोग. मार्गशीर्ष वद्य १२ ला चलनी रुपये देणे. संवत १९९० मिति मार्गशीर्ष वद्य १२.

मागील बाजूवर

रु २०००
निम्म्याचे निम्मे रुपये पांचशे ची चौपट पुरे दोन हजार करावे.

अशाच एका हुंडीचे चित्र पहा: (श्रेय रिजर्व बॅंक संस्थळ)

महाजनी हुंडी

पुण्याच्या सावकारी पेठेत हुंडी आणि चलनांचे व्यवहार कसे चालत असत ह्याची उत्तम माहिती ना.गो.चापेकरलिखित ’पेशवाईच्या सावलीत’ ह्या पुस्तकामध्ये मिळते. चिपळूणकर सावकार आणि तुळशीबागवाले घराण्यांच्या अनेक वर्षांच्या हिशेबवह्या तपासून संकलित केलेली अशी ह्या पुस्तकातील माहिती पेशवे काळातील अर्थव्यवहार, सामाजिक चालीरीती अशा बाबींवर प्रकाश टाकते. त्यातील पुढील दोन उतारे वानगीदाखल पहा:

चिपळूणकरांच्या वह्यातील हा एक व्यवहार आहे. असे दिसते की सगुणाबाई पंचनदीकर ह्या एका प्रतिष्ठित घराण्यातील बाई काशीयात्रेला जाणार आहेत. त्यासाठी तरतूद म्हणून त्यांनी चिपळूणकरांचे तेव्हाचे कर्ते पुरुष दाजिबा चिपळूणकर ह्यांच्याकडे आपले कोणी आप्त/सेवक/परिचित असे राघोपंत थत्ते ह्यांच्या हस्ते काही रक्कम शके १७४६ (सन १८२४) पौष महिन्यात सोपवली आहे. त्या रकमेमध्ये ३१५ सिक्का रुपयाची नाणी होती आणि बाकी रक्कम ३०८ रु ६ आणे २ पैसे हे चांदवडी रुपये होते. चांदवड रुपये सिक्का रुपयात बदलण्यासाठी दर शेकडा ६ रु. ५ आ. १ पै. ह्या दराने १९ रु. ८ आ. १ पै. इतका बट्टा चिपळूणकरांनी घेतला. (३०८ रु ६ आणे २ पैसे भागिले १०० गुणिले ६ रु. ५ आ. १ पै. = १९ रु. ८ आ. १ पै. ) बट्टा वजा जाता उरले सिक्का २८८ रु १४ आ. १ पै. मूळचेच सिक्का असलेले ३१५ रु ह्यात मिळवून एकूण रक्कम झाली सिक्का ६०३ रु १४ आ. १ पै. ह्या रकमेची काशीवरची हुंडी जगजीवदास बुक्खीदास ह्यांच्या पेढीवरून करून घेण्यासाठी - चिपळूणकरांची अडत काशीमध्ये नसावी म्हणून दुसर्‍या पेढीवरून हुंडी घेतली - दरशेकडा १॥ रुपये इतकी हुंडणावळ पडली. ती पेढी प्रथम १।।। रुपये दर मागत होती पण थोडी घासाघीस करून १॥ वर दर आणला. ह्या दराने ६०३ रु १४ आ. १ पै. ह्या रकमेवर हुंडणावळ होते ८ रु १५ आ.* १९ रु. ८ आ. १ पै. इतका जो बट्टा चिपळूणकरांनी घेतला आहे त्यावरची हुंडणावळ होते ४ आ. ३ पै. ८ रु १५ आ. मधून हा आकडा वजा केला की उरते देय हुंडणावळ ८ रु. १० आ. १ पै. ही हुंडणावळ ६०३ रु १४ आ. १ पै. मधून वजा करून हुंडीची रक्कम उरते ५९५ रु. ४ आ. ही रक्कम बाईंना काशीमध्ये वैशाख शु १ शके १७४७ ह्या दिवशी मिळेल.

(* ह्या आकडेमोडीत मला एक अडचण जाणवते. शेकडा दीड रुपया प्रमाणे ६०३ रु १४ आ. १ पै. वर हुंडणावळ ९ रु.हून थोडी जास्तच होईल. येथे ती ८ रु १५ आ. अशी कशी काढली आहे? चिपळूणकरांच्या वाकबगार कारकुनांकडून अशी चूक हे शक्य वाटत नाही. ह्याचे स्पष्टीकरण कोणी देऊ शकेल काय?)

ह्यापुढे दोन हुंडीव्यवहार दिसत आहेत. पहिल्यामध्ये काशीवरची ५०० ची हुंडी ज्या कोणाकडे होती त्याच्याकडून ४७५ रोख देऊन विकत घेतली. त्याला बहुधा रोख रकमेची निकड असेल वा हुंडी पटविण्यासाठी काशीला जायची त्याची तयारी नसेल. ह्यातील नफा रु २५ कसर (discount) खात्यात जमा केला आहे. त्याच्यापुढे असे दिसते की कोणा बाळकृष्ण आपाजीला उज्जैनीत ५०० ची गरज आहे. तेथे चिपळूणकरांची अडत नसावी म्हणून बाळकृष्ण आपाजीला औरंगाबादेवर त्या रकमेची हुंडी दिली आहे. तेथे ह्या हुंडीच्या जागी त्याला उज्जैनीवर ५०० ची दुसरी हुंडी करून घ्यावी लागेल. येथे चिपळूणकरांना १ टक्का अशी ५ रु हुंडणावळ मिळाली आहे. हुंडीची रक्कम आणि हुंडणावळ बाळकृष्ण आपाजीच्या नावे लिहिली आहे. ह्या रकमेचा भरणा बाळकृष्ण आपाजी सवडीने करेल.

इंटरनेट बॅंकिंगच्या चालू जमान्यात अंतर्गत व्यापारासाठी हुंडीव्यवहार आता कालबाह्य झाले असले तरी हुंडीचे दुसरे भावंड, जे 'हवाला' ह्या नावाने ओळखले जाते, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठया प्रमाणात चालू असावे. ह्याचे सर्वपरिचित उदाहरण म्हणजे आखाती देशांमध्ये गेलेला भारतीय-पाकिस्तानी कामगारवर्ग आपल्या कुटुंबांकडे पैसे पाठविण्यासाठी बॅंकांकडे न जाता पुष्कळदा सहज ओळखीने उपलब्ध होणार्‍या ’हवाला’ ह्या खाजगी सेवेचा लाभ घेतात. दुबईमधील भारतीय कामगार आपली परकीय चलनामधली कमाई तेथील एका हवाला एजंटाच्या हाती सोपवतो आणि बरोबर आपल्या कुटुंबीयांचा पत्ता, फोन नंबर इत्यादि. एजंट फोनवरूनच आपल्या भारतातील सहकार्‍याला लगेच हे तपशील पुरवतो. एवढ्यावर दुसर्‍याच दिवशी कुटुंबाच्या हातात रुपये येऊन पडतात. केवळ विश्वासावर चालणारी ही यंत्रणा एक्स्चेंज दर, कमिशन दर, लिखापढीचा अभाव, सेवेची तत्परता आणि गति अशा बाबतींत बॅंकांहून अधिक समाधानकारक सेवा देते आणि त्यामुळे विशेषत: खालचा वर्ग तिच्याकडे सहज आकर्षित होतो. ह्यात सहसा कधी फसवणूक होत नाही असा anecdotal अनुभव ह्याच्यामागे असतो.

ह्याच मार्गाने गुन्हेगारीतून निर्माण झालेला पैसा, कर चुकविलेला काळा पैसा, दहशतवादी चळवळींना पुरवला जाणारा पैसा तितक्याच सुकरतेने सीमापार जाऊ शकतो आणि देशोदेशींच्या आर्थिक देखरेख करणार्‍या संस्थांच्या नजरेबाहेर आपले काम करत राहतो. ह्याच कारणासाठी इंटरपोलपासून देशोदेशींचे पोलिस त्याच्या मागावर असतात.

हुंडी व्यवहार कमी झाले पण हुंडीव्यवहारांनी मराठी भाषेला दिलेले काही शब्द आता भाषेचा अविभाज्य भाग झाले आहेत. शहाजोगपणा करणे, शहानिशा करणे, लग्नाळू मुलीला चांगले स्थळ मिळवणे अशा अर्थाने हुंडी पटविणे, भलावण करणे हे शब्द असेच वापरात चालू राहणार!

इतिहासविचार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

6 Feb 2018 - 11:07 pm | आनन्दा

बापरे..

मुक्त विहारि's picture

6 Feb 2018 - 11:10 pm | मुक्त विहारि

मस्त

manguu@mail.com's picture

6 Feb 2018 - 11:34 pm | manguu@mail.com

छान.

बॅंक प्रणालीचे खापरपणजोबा

आनंदयात्री's picture

6 Feb 2018 - 11:49 pm | आनंदयात्री

ह्या हुंड्या म्हणजे जुन्या काळातले चेकच आहेत कि. हुंडी हा शब्द कैकवेळा ऐकलं होता पण त्याचा असा अर्थ असेल असे वाटले नव्हते.
लेख खुप आवडला, जुन्या भारतातल्या या मोठ्याच यंत्रणेची ओळख झाली. म्हणजे काठीच्या टोकाला सोने बांधून कुणी काशीला जात नव्हते तर! ती नुसती म्हणच होती.

वाचक's picture

6 Feb 2018 - 11:49 pm | वाचक

जुन्या हुंड्यांची नवी आवृत्ती म्हणजे letter of credit

राघवेंद्र's picture

7 Feb 2018 - 12:12 am | राघवेंद्र

वाव, मस्तच लेख !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Feb 2018 - 12:19 am | डॉ सुहास म्हात्रे

रोचक माहिती !

अमितदादा's picture

7 Feb 2018 - 12:43 am | अमितदादा

उत्तम लेख... पर प्रांतात हुंडीव्यवहार करताना भाषेचा अडथळा कसा दूर होत असावा? निरोप्या किंवा सावकार कडील एखाद्या व्यक्तीस अनेक भाषा ज्ञात असाव्यात.

पद्मावति's picture

7 Feb 2018 - 1:51 am | पद्मावति

जबरदस्त लेख.

शेखरमोघे's picture

7 Feb 2018 - 5:14 am | शेखरमोघे

सुन्दर - माहिती, सखोल विवरण आणि भाषा सगळेच अप्रतीम!! फेटाही उडवला आणि शिट्टीदेखील वाजवली!! एकदम एखादी (समजेल अशी) बखर वाचल्यासारखे वाटले. अगदी बट्टा, कसर इ.इ. व्यवहारात फारसे वापरले न जाणारे शब्ददेखील झोकात आणि जागच्या जागी!!

हुन्डी म्हणजे Letter of Credit नव्हे तर Bill of Exchange. इथे चिपळूणकरान्च्या खतावणीतला उतारा दिसतो त्यामुळे हुन्डीची भाषा वगैरे कळत नाही. पण दुसर्‍या जयपुरहून पाटण्यावर काढ्लेल्या हुन्डीतली भाषा (हिन्दी खडीबोली) ही जास्त वापरली जात असावी. "code language" सारखा "अर्ध्याचे दुप्पट" "अर्ध्याच्या अर्ध्याच्या चौपट" वगैरेचा वापर हा ही लक्षात घेण्यासारखा.

चिपळुणकरान्ची हुन्डी केन्व्हाही वटवता येणारी (at sight) नसून "जेष्ठ वद्य१" नन्तरच वटवता येइल. जरी ऐवज पौष महिन्यात ठेवल्याचा उल्लेख असला तरी लिहिलेली हुन्डी पौष महिन्यातली आहे की (पुढील वर्षातील) वद्यातील आहे हे नक्की कळत नाही. पण ही हुन्डी वटेपर्यन्त पैसे चिपळूणकर (किन्वा जगजीवनदास बुक्खीदास ज्यान्च्याकडून चिपळूणकरानी ही हुन्डी बनवली) वापरत असल्यामुळे वटणावळीत काही फरक पडत असेल?

सुंदर, भटजींबरोबर आमचीपण काशीयात्रा घडली !!!

कंजूस's picture

7 Feb 2018 - 5:48 am | कंजूस

छान.
१) जासुदाबरोबर पत्र का पाठवत? तो तिकडे अगोदर/ पोहोचलाच नाही तर?
२) तिथिचा घोळ आणि पंचांगे -
चैत्री/कार्तिकी अमान्त/पोर्णिमान्त पंचांग पद्धती होत्या. त्याचा सुसंवाद त्यांनी ठेवलाच असणार.

सुखीमाणूस's picture

7 Feb 2018 - 6:58 am | सुखीमाणूस

मिपावर इतिहासाची मेजवानी चालू आहे.
किती विचार करून पैशाचे व्यवहार आखले होते हे बघून कौतुक वाटते.

अति उत्कृष्ट.. हे प्रचंड रोचक आहे.

बाकी जासुदाचा रोल अजून स्पष्ट व्हावा. एका हुंडीपोटी एक जासूद जात नसणार काशीपर्यंत किंवा अन्य देशभरातल्या गावांत.

गावभरातून अनेक पत्रे जमा झाली की तो एक खेप करत असावा.

शिवाय कधी ना कधी प्रत्यक्ष पैश्याची देवघेव फिजिकली करावी लागत असणार. ते काम कोण करायचं? तेव्हा सुरक्षितता कशी ठेवायचे?

manguu@mail.com's picture

7 Feb 2018 - 7:17 am | manguu@mail.com

पैशाची ट्रान्सफरही होतच असणार

माझ्यामते प्रत्यक्ष पैशाचा व्यवहार कमीच होत असणार, करण जसे इकडून तिकडे, तसेच तिकडून इकडेही असणारच ना.. त्यातून होत असला तर केंद्रीय पद्धतीने होत असावा, म्हणजे या सगळ्या हुंडीवाल्यांचा एक मोठा हुंडीवाला वगैरे या धर्तीवर..

बाकी जासुदाचे म्हणाल तर बहुतेक तुघलकाच्या काळापासून भारतात टपाल पद्धत कार्यरत होती असे ऐकले आहे..

अरविंद कोल्हटकर's picture

7 Feb 2018 - 9:29 am | अरविंद कोल्हटकर

एकटे पत्र जासूदजोडीबरोबर पाठवणे अर्थातच आतबट्टयाचे ठरेल. असे कोणी करतहि नव्हते.

पेशव्यांच्या फौजा हिंदुस्तानभर हिंडू लागल्यावर महत्त्वाच्या शहरांमध्ये सरकारी आणि सावकारी डाका निर्माण झाल्या होत्या. (बाळाजी बाजीराव पेशव्यांना पानिपतमधल्या दारुण पराभवाची बातमी ते हिंदुस्तानच्या वाटेवर असतांना भेलसा येथे सावकारी डाक नेणार्‍या जासूदाकडून कळली हे प्रसिद्धच आहे. पहा रियासत भाग २). कल्याण-काशी, सातारा-ग्वाल्हेर अशा काही डा़कांचा उल्लेख 'पेशवाईच्या सावली'त आहेच. डाकेबरोबरची पत्रे वजनावर घेत असत आणि तोळ्याला ४ आणे असा दर होता. अनेक जणांची अनेक पत्रे डाकेने गेल्यावर खर्च वाटला जाईलच.

जासूदहि एकटे जात नसत तर जोडीने हे काम करीत. म्हणून जासूदजोडी हा शब्दप्रयोग जुन्या पत्रांमध्ये वारंवार भेटतो.

प्रचेतस's picture

7 Feb 2018 - 8:50 am | प्रचेतस

हुंडीव्यवहाराची तपशीलवार माहिती देणारा अप्रतिम लेख.

सिरुसेरि's picture

7 Feb 2018 - 9:19 am | सिरुसेरि

रोचक ऐतिहासीक माहिती

अभिजीत अवलिया's picture

7 Feb 2018 - 11:00 am | अभिजीत अवलिया

एक शंका आहे
काशीच्या प्रवासासाठी आणि तेथील खर्च अणि दानधर्मासाठी बाळंभटाना तीनशे रुपये बरोबर न्यायची इच्छा आहे.
म्हणजे हे पैसे बाळंभटाना केवळ काशी मध्ये (म्हणजे शेवटच्या मुक्कामी) मिळून उपयोग नाही तर काही पैसे प्रवासात देखील लागणार आहेत. हा प्रवास तब्बल महिन्याचा आहे. मग बाळंभटानी सगळ्या पैशाची हुंडी घेतली तर महिन्याभराच्या प्रवासातील खर्चाचे काय? ती रक्कम देखील मोठीच असणार ना.

अरविंद कोल्हटकर's picture

7 Feb 2018 - 8:13 pm | अरविंद कोल्हटकर

त्यासाठी त्यांनी थोडीफार रोख रक्कम जवळ ठेवली असावी हे सहज शक्य आहे. अजून हेहि लक्षात घ्यायला हवे की असले लांबचे प्रवास कोणीहि एकटादुकटा करीत नसे. बाळंभट रास्ते कुटुंबाचे आश्रित म्हणून त्यांच्याबरोबर जात आहेत. त्यांचे जेवणखाण संपूर्ण जथ्यामध्येच होत असणार.

अभिजीत अवलिया's picture

7 Feb 2018 - 8:27 pm | अभिजीत अवलिया

बाळंभट रास्ते कुटुंबाचे आश्रित म्हणून त्यांच्याबरोबर जात आहेत. त्यांचे जेवणखाण संपूर्ण जथ्यामध्येच होत असणार.

ओके. हे शक्य आहे.

अनिंद्य's picture

7 Feb 2018 - 11:17 am | अनिंद्य

@ अरविंद कोल्हटकर,

अतिरोचक लेख !

मला या विषयावर माहिती हवीच होती, अनेक आभार.

माझ्या ओळखीतले एक सिंधी व्यापारी-सावकार कुटुंब आहे, मूळचे कराचीचे. त्यांच्या पेढीच्या हुंड्या पार ताशकंद आणि समरकंद (सध्याचे उझबेकिस्तान) पर्यंत चालत. तशी कागदपत्रंही त्यांच्याकडे आहेत.

ते जोग लिखी... आणि हजार का दो गुना, पांचसो का चार गुना.. महाराष्ट्रातल्या जळगाव, वाशीम, नाशिक तसेच हैद्राबादच्या लोकांकडेही वाचलंय. हुंडणावळ, शहाजोगपणा, शहानिशा, नामजोग, भलावण (की भलामण?) ह्या शब्दांची व्युत्पत्ती समजून गंमत वाटली.

अनिंद्य

कंजूस's picture

7 Feb 2018 - 11:22 am | कंजूस

१) प्रत्यक्ष पैसे पाठवत नसावेत. दर महिन्याला वगैरे दिलेले/ आलेल्या रकमेचे समायोजन जासुद नेत असणार. म्हणजे पैसे न नेता विवरणपत्र नेत असावा. सही घेऊन येणार.

गवि's picture

7 Feb 2018 - 11:24 am | गवि

Traveller cheque शी साम्य वाटतं.

आजही हुंडी हा प्रकार बँक ग्यारंटी किंवा DD या स्वरुपात जिवंत आहे असं वाटतं.

प्रचंड माहितीने भरलेला लेख.
अतिशय आवडला.

आदूबाळ's picture

7 Feb 2018 - 3:08 pm | आदूबाळ

मरीना मार्टिन नावाच्या संशोधिकेने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये "An economic history of Hundi, 1858-1978" या विषयावर संशोधन करून पीएचडी मिळवली. त्यांचे मार्गदर्शक म्हणजे भारताच्या आर्थिक इतिहासावरचे आघाडीचे तज्ज्ञ तीर्थंकर रॉय.

त्यांचा प्रबंध इथे वाचायला मिळेलः http://etheses.lse.ac.uk/315/

त्या प्रबंधाचा अ‍ॅबस्ट्रॅक्ट खालीलप्रमाणे:

A centuries-old artery of credit for Indian merchant networks, the indigenous credit system hundi has received no systematic attention in histories of the Indian subcontinent. Poorly understood and ill-defined, hundi was a highly negotiable instrument, and source of liquid capital. Hundi knitted together the properties of goods, capital, credit, information and agency, all of which served as the backbone of the Indian merchant network.

Drawing on government proceedings, reports, and legal cases, this study provides an insight into the legal encounter between Indian indigenous institutions and the British colonial government. It simultaneously reveals the customs, contracts and individual functions of hundi determining its usage. In particular, this study addresses the important issue of how legal change in colonies affected the so-called ‘informal’ institutions which made trade possible.

Between 1858-1947, hundi caught the eye of the British Indian government initially as an important taxable revenue stream. This resulted in hundi being integrated with statutes and regulations during the colonial period. However, this process of formalization was not without its own share of classificatory and interpretive problems, nor did hundi remain unchanged.

Material from the 1930s reveals an appreciable change in how the government perceived hundi. The instrument distinguishes itself as a source of liquidity capable of promoting trade and modern banking developments. Moreover, hundi’s importance to the indigenous banking community underscores hundi’s function within the wider Indian economy. Nevertheless, the system’s integration with modern banking continued to present problems. The penultimate chapter explores why problems persisted, examining how a legal solution was proposed in 1978. Finally, the conclusion ties all the threads together and discusses the implications for hundi’s survival.

ठळक ठसा माझा.

तेजस आठवले's picture

7 Feb 2018 - 3:39 pm | तेजस आठवले

उत्तम लेख. आपल्याला धन्यवाद आणि शुभेच्छा.

आदूबाळ, राज्यांचे वेगळे चलन,नाणी, ही समस्या असणारच. शिवाय विनिमय आणि खरेखोटेपणा.

मी अजून पूर्णपणे वाचला नाहीये, पण मला वाटतं हुंडीतून निर्माण होणारं उत्पन्न हे ब्रिटिश बँकिंग सिस्टिमच्या बाहेर होतं. त्यामुळे त्यांना अस्वस्थता आली.

अभ्या..'s picture

7 Feb 2018 - 8:08 pm | अभ्या..

सावकारी जासूदामार्फत देशभक्तांशी संधान आणि बंडासाठी लागणार्‍या पैशाची माहीती नसलेली वाहतूक हेही इंग्रजांच्या रोषाचे कारण असावे.
.
बादवे उत्तम लेख.
असेच लेखन येउ द्या.

manguu@mail.com's picture

7 Feb 2018 - 8:13 pm | manguu@mail.com

आम आदमी हुंडी वापरत होते.

मोठे राजे , इंग्रज हे काय करायचे ?

अरविंद कोल्हटकर's picture

7 Feb 2018 - 9:44 pm | अरविंद कोल्हटकर

वरचा लेख पेशवे काळाच्या शेवटाशेवटाच्या दिवसांमध्ये हुंडीव्यवस्था कशी होती हे दाखवितो. ’लेखपद्धति’ नावाचे एक पुस्तक गायकवाड ओरिएंटल सीरीजमध्ये छापले गेले होते. मध्ययुगीन काळामध्ये (सर्वसाधारणपणे इ.स. १००० -१५००) ह्या दिवसात राज्याराज्यांमधले तहनामे, गावचा वसूल, राजाच्या आज्ञा इत्यादि कशा लिहिल्या जात असत त्याचा ’मेस्तक’वजा संग्रह ग्रन्थामध्ये आहे. त्यातून ’राजहुण्डिका’ - राज्यकारभाराशी संबंधित हुंड्या - ह्याचे तीन नमुने दाखविले आहेत. त्यापैकी दोन पुढीलप्रमाणे:

ह्या दोनातील पहिल्या हुंडीमध्ये राजाच्या कोणा महामण्डलेश्वर पातळीच्या अधिकार्‍याने आपल्या मंडलातील कोणा अन्य अधिकार्‍याला आदेश दिला आहे तो असा: राजाच्या प्रथम गोळा केलेल्या महसूलातील ३००० तीन सहस्र द्रम्म द्यायचे आहेत. राजाच्या तेथे आलेल्या ८ पायदळी सैनिकांना रक्कम (३०००) शिल्लक आहे तोपर्यंत प्रतिदिनी ८ तांदुळाचे वाटे द्यावेत. ज्येष्ठ शु.१५ गुरुवार संवत् ८०२. हे राजेसाहेबांना मंजूर आहे. त्यांच्या स्वत:च्या आदेशावरून (ही आज्ञा पाठविली आहे.)

त्याखालची हुंडी असे सांगते: राजाज्ञेवरून अमुक अधिकार्‍याने अमुक देशामध्ये दुसर्‍या कोणाला हुंडी लिहिली ती अशी. अमुक राजाच्या आज्ञेवरून १५ दिवस होऊन गेले की ह्या हुंडीमुळे १२४ (अक्षरी एकशेचोवीस) द्रम्म भरती करावेत. मुदती पलीकडे प्रतिदिन १ द्रम्म २ पैसे (व्याज द्यावे). ज्येष्ठ शु.८ मंगळवार संवत् १५३३. सहीशिक्का.

गामा पैलवान's picture

8 Feb 2018 - 6:54 pm | गामा पैलवान

अरविंद कोल्हटकर,

लेख व पूरक माहिती अतिशय रोचक व रंजक आहे. दुबईचं चलन दिरहाम हा शब्द द्रम्म वर बेतलेला दिसतो. दिनार तर मौर्यकालीन चलन होतंच. शिवाय ग्रीक चलन द्राश्मा हे त्राश्म सारखं वाटतं. त्राश्म म्हणजे प्रवासात रक्षण करणारे दगड. (त्रा = त्राता, अश्म = छोटा दगड ).

आज डॉलर ही संज्ञा जशी जगभर चलनासाठी वापरली जाते (उदा. : अमेरिकी डॉलर, सिंगापूर डॉलर, ऑस्ट्रेलियन डॉलर) त्याप्रमाणे दिनार हे जगात देशकाळ दोहोंच्या बाबतीत सर्वत्र पसरलेलं लोकप्रिय चलन असावं. अर्थात चूकभूल देणेघेणे. आज मात्र दिनार केवळ पूर्व युरोप आणि मध्यपूर्वेत प्रचलित आहे.

आ.न.,
-गा.पै.

निशाचर's picture

10 Feb 2018 - 7:01 am | निशाचर

त्राश्म आणि द्राख्माचा संबंध नसावा. द्राख्माचा उल्लेख (मूठ किंवा मूठभर याअर्थी) ग्रीसच्या मायसिनीअन संस्कृतीच्या Linear B लिपीत लिहिलेल्या सुमारे ३३०० वर्षे जुन्या पट्ट्यांवर आहे. बायझंटाइन काळात द्राख्माचा प्रसार अरब भागात होऊन त्यावरून नंतर दिरहाम हे चलन आले.

दिनार शब्द एका प्राचीन रोमन नाण्यावरून आला आहे. (इटालियन भाषेत पैश्यांसाठी Denaro असा शब्द आहे.) कुषाणांचंही बहुतेक दिनार नावाचं नाणं होतं.

दिर्हाम मूर, ऑटोमन वगैरे शासकांमुळे एकेकाळी युरोपात प्रचलित होता. दिनारपेक्षा दिर्हाम हे चलन युरोपातील जास्त देशांत वापरलं गेलं असावं असं वाटतं, नक्की माहित नाही.

अरविंद कोल्हटकर's picture

10 Feb 2018 - 8:10 am | अरविंद कोल्हटकर

’द्राख्मा’ वरून ’दिनार’ ही उडी जरा लांब वाटते. ’द्राख्मा’ हे नाणे ग्रीक संस्कृतीमध्ये ऐतिहासिक काळापासून अलीकडे यूरोने त्याचे उच्चाटन होईपर्यंत वापरात होते. भारताच्या वायव्य दिशेस ’गांधार’ ह्या नावाखाली ग्रीक संस्कृति आणि ग्रीक राज्ये होती. विदिशेजवळ विष्णुस्तंभ उभारणारा हेलिओडोरस, चन्द्रगुप्त मौर्याबरोबर तह करणारा सेल्यूकस निकेटर हे सगळे ग्रीकच होते. ह्या गांधार संस्कृतीमधून पैशाचे एक मान ’द्राख्मा’ = द्रम्म आपल्याकडे आले असावे.

manguu@mail.com's picture

10 Feb 2018 - 6:39 pm | manguu@mail.com

गांधार म्हणजे आजचा कंदहार म्हणजे अफगाणिस्तान ..

बरोबर ना ?

१) धार्मिक पर्यटन - चार धाम यात्रा सामान्य जनता करत असे. त्यांची सोय होत असे.
२) इंग्रज लोक धार्मिक गोष्टींत कमी लुडबुड करत. त्या व्यवहारांतून सरकारलक उत्पन्न मिळण्याची आशा नसावी.
३) व्यापारी मालाची ने आण करत ते नियमित टोल ,गरजेच्या वस्तू वाटेतल्या टोळ्यांना देऊन व्यापार चालू ठेवत. अन्यथा ते अशक्यच होते.
४) एका राजाने दुसरे राज्य जिंकले की त्याला महसुलाचे अधिकार मिळतच. तसे इंग्रजांनाही मिळाले होतेच. जर का व्यापारी लोकही हुंडिचा वापर करत असतील तर त्यात त्यांना वाटा मिळण्याची इच्छा असणारच. माल किती जातो ते वाटेत अडवल्यावर समजेलच.
५) अंगडिया पद्धत अजुनही तुरळक कुठेकुठे गुप्तपणे चालते.

उपेक्षित's picture

8 Feb 2018 - 12:37 pm | उपेक्षित

मिसळपाववाल्यांची सध्या मजा आहे मनो/ डॉक / अनिंद्य / आणि अरविंद यांच्या एक so एक मालिकांची मेजवानी मिळत आहे :)

निनाद आचार्य's picture

8 Feb 2018 - 4:56 pm | निनाद आचार्य

अतिशय माहितीपूर्ण लेख. धन्यवाद

मंदार कात्रे's picture

9 Feb 2018 - 5:36 pm | मंदार कात्रे

अतिशय माहितीपूर्ण लेख. धन्यवाद

निशाचर's picture

10 Feb 2018 - 7:03 am | निशाचर

माहितीपूर्ण आणि रोचक लेख

नितिन थत्ते's picture

10 Feb 2018 - 10:50 pm | नितिन थत्ते

>>एक हुंडी रुपये २००० अक्षरांनी दोन हजार ह्याचे निम्मे रुपये एक हजार ह्याची दुप्पट.

हा प्रकार बहुधा हुंडीच्या रकमेत कोणी फेरफार करून फसवू नये म्हणून लिहिलेला असावा. जसे हल्ली आपण चेकवर १००० रु अशी रक्कम लिहिल्यावर "नॉट ओव्हर वन थाउजंड रुपीज" असे लिहितो तो प्रकार वाटतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Feb 2018 - 2:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

अनेक वर्णने असलेल्या मजकूरात संशय येणार नही अशा पद्धतीने खाडाखोड करून नवीन रक्कम लिहिणे जवळ जवळ अशक्य होते.

तसेच, पूर्वीच्या हालाखीच्या परिस्थिती होणार्‍या प्रवासात, हुंडीचा कागद चुरगळला, थोडासा फाटला, मळून खराब झाला, पाण्याने त्याची एखादी बाजू ओली होऊन शाई पसरली तरीही अश्या अनेक वर्णनांपैकी एकदोन वर्णने तरी शाबूत राहतील व त्यांच्या आधारे हुंडीची योग्य किंमत अदा करता येईल... असाही विचार यामागे असावा.

नितिन थत्ते's picture

10 Feb 2018 - 10:55 pm | नितिन थत्ते

हुंडि हा प्रकार पूर्ण बंद झाला आहे काय? आमच्या अभ्यासक्रमात निगोशिएबल इन्स्ट्रुएंट्स अ‍ॅक्टच्या खाली बिल ऑफ एक्सचेंज उर्फ हुंडी हा विषय होता.

Nitin Palkar's picture

18 Feb 2018 - 9:02 pm | Nitin Palkar

इयत्ता ६ वीत, १९६६ साली गणितात हा भाग होता.

हतोळकरांचा प्रसाद's picture

16 Feb 2018 - 5:13 pm | हतोळकरांचा प्रसाद

अतिशय सुंदर लेख!! आपले मनापाससून आभार हि रोचक माहिती शब्दबद्ध केल्याबद्दल!

मंदिरातल्या दानपेट्यांनापण हुंडी म्हणतात, त्याचा ह्या हुंडीशी काही संबंध आहे का?

पैसा's picture

16 Feb 2018 - 9:34 pm | पैसा

अतिशय माहितीपूर्ण लेख आणि उत्तम चर्चा.

पिशी अबोली's picture

17 Feb 2018 - 11:04 am | पिशी अबोली

+1

रक्कम लिहिण्याचे वेगवेगळे प्रकार फारच रोचक.

manguu@mail.com's picture

17 Feb 2018 - 1:22 pm | manguu@mail.com

नीरव मोदीसारखी प्रकरणं त्या काळात कशी होत असतील ?

गब्रिएल's picture

17 Feb 2018 - 10:36 pm | गब्रिएल

तेवाबी फस्वाफस्वी कर्नारे निरव मोदी व्हते आनी तेवाच्या आसलेल्या सोईपर्माने झाडाच्या पारावर फत्कल मारून बसून फुकाच्ये उलटसुलट बिन्कामाच्ये श्येरे मारत मिरवनारे manguu@mail.com बी होतेच की वो =)) =)) =))