द्रव्यांचे जवळ येणे व दूर जाणे (Substances and their movements)

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
26 Jan 2018 - 4:38 pm

नितळ पाण्याच्या तळ्यातील माशांचा व इतर जलचरांचा वेध घेणे हे चिंतनशील अशा विक्रम राजाचा आवडता छंदच. अहाहा काय ते सुंदर दृष्य..पाण्याचा उथळ पृष्ठभाग सकाळच्या कोवळ्या किरणांमध्ये लख्ख उजळून निघावा. सकाळच्या किरणांचं आगमन झाल्यावर अनाहूत पाहुण्यांच्या आगमनाने होते तशी पाण्यातल्या सर्वच माशांची, कासवांची, ओक्टोपसांची व इतरेजनांची गडबड व्हावी. मग मासे एकमेकांकडे यावेत. काहीतरी बोलल्यासारखे करावेत व पुन्हा इकडे तिकडे जावेत. काही जोरात जावेत काही हळूहळू जावेत. काही चिमुकले असावेत तर काही शार्क, देवमाश्यासारखे अतिमहाकाय असावेत. काही सगळीकडे फिरणारे पण फक्त मधुन मधुन डोकं वर काढणारे व पुन्हा दडी मारणारे असवेत. काही हरणांच्या कळपासारखे घाबरून पळत सुटावेत तर काही वनराजासारखे दिमाखात शिकारीला निघावेत. काही डॉल्फिन सारखे शिट्यामारत निघावेत, काहींनी दिवा डोक्यावर घेऊन फिरावे. काही अल्पायुषी, काही दीर्घायुषी...वा वा.."

“विक्रमा, आज पदार्थविज्ञाना बद्दल बोलायची इच्छा दिसत नाही तुझी. मासे काय, तळ्याकाठी बसणं काय..काय चाललंय काय?”

“वेताळा, अश्या सरोवरांचं, सागरांचं निरीक्षण करत बसलं की मला एक पदार्थविज्ञानाची प्रयोगशाळाच पाहिल्याचा भास होतो. किंबहुना ती एक पदार्थविज्ञानाची प्रयोगशाळाच वाटते.”

“तेच म्हणतो..या तळ्यांवरून तुला पदार्थविज्ञान कसं सुचतं? या जलचरांचा व ९ द्रव्यांचा संबंध तू कसा काय लावतोस?”

“वेताळा, तळे ही केवळ एक उपमा आहे. कारण तिथे माश्यांच्या हालचाली प्रत्यक्ष दिसतात. पदार्थविज्ञानाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास पृथ्वी(solid), आप(liquid), तेज(energy), वायू(gas) व मन(mind) हे ते पाच हालचाल करणारे मासे. प्रशस्तपाद म्हणतात

क्षितिजलज्योतिरनिलमनसां क्रियावत्त्वमूर्त्तत्वपरत्वापरत्ववेगवत्वानि ||23||
To Earth, Water, Fire, Air and Mind belong the character of having actions, being corporeal, having distance and proximity, and having speed.
स्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना जाणीव स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात.”

External Forces

“विक्रमा, ही पाच द्रव्ये गती निर्माण करतात वगैरे तू आधीही बोलला होतास. ही पाच द्रव्ये हालचालींना व गतीला कारण ठरतात असे आपण बोललो होतो. पण हे जवळ येतात, लांब जातात काय प्रकरण आहे?”

“एक उदाहरणच देतो. समजा एक साधू महाराज संध्येसाठी नदीच्या पात्रात उभे आहेत व अर्घ्य देतायत. याठिकाणी त्यांचे प्रवाही मन त्यांच्या अर्घ्यपात्र धरणाऱ्या हाताशी येऊन थांबले. मग या मनाने बोटांच्या सहाय्याने बळ देऊन अर्घ्यपात्र तिरके केले. त्यामुळे पात्रातील पाण्याला वाहण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली व प्रवाही पाणी नदीत मिसळले.

Arghyadaan

“अरे पण ते जवळ-लांबचं काय झालं?”

“म्हणजे साधुमहाराजांचे मन अर्घ्यपात्राजवळ आले. अर्घ्यपात्राजवळ म्हणजे त्या पात्रात जे पाणी होते ते बाहेर पडले. म्हणजे ते दूर गेले. हाच तर प्रवाही पणा.”

“बर मन व आप द्रव्याचं सांगितलंस. आता तेज व वायू द्रव्याचं सांग.”

“वेताळा समजा आपण चुलीवर कढी करायला ठेवलीय. जस जसा वेळ जातो तसतसा कढीचा वास सर्वत्र दरवळतो. अगदी आजुबाजूच्या मांजरांना सुद्धा कळतं. यात होतं काय तर जळणाऱ्या लाकडांकडून तेज वायुमध्ये जातं व उष्ण हवेतून भांड्याला जाऊन मिळतं. गरम झालेल्या भांड्याकडून ते भांड्यातील द्रवाला मिळतं. त्यामुळे भांड्यातला द्रव रटरटू लागतो व त्यातील गरम झालेले रेणू वर वर पृष्ठभागाकडे जातात. थंड रेणू खाली येतात व त्यांच्याशी तेज द्रव्य येऊन मिळत राहतं. त्यातही द्रवातले काही रेणू बाष्पात परिवर्तित होतात. त्यामुळे भांड्याच्या तोंडाभोवती एक छोटा पांढरा ढगच तयार होतो. म्हणजेच आता हे वायू इतरत्र जाऊ लागतात.”

Fluidity

“विक्रमा म्हणजे हे तर सगळं तेजामुळे घडलं असं वाटलं..”

“होय वेताळा. तेजात इतर द्रव्यांना चैतन्य देण्याचे म्हणजे वैशेषिक भाषेत त्यांच्यात हालचाली निर्माण करण्याचे गुण आहेत..सृष्टीला संचलित करणाऱ्या सूर्याला म्हणूनच एवढे महत्व आहे. सूर्योपासना म्हणजेच या तेजाची उपासना. जेव्हा तेज एका द्रव्या..”

“थांब थांब विक्रमा, तेजाबद्दल अधिक नंतर बोलू. आता मला सांग की पृथ्वीद्रव्याला काय प्रवाहित करतं? पाणी, हवा, मन, तेज वाहणं कळू शकतं..पण पृथ्वीचं द्रवत्त्व?”

“वेताळा, प्रशस्तपाद ऋषींनी म्हटलंय
क्षितितेजसोर्नैनिमित्तिकद्रवत्वयोग: ||33||
Earth and Fire are possessed of only such fluidity as is brought about by extraneous causes.
पृथ्वी व तेज यांमध्ये निर्माण होणारा प्रवाहीपणा हा बाह्यकारणांमुळे निर्माण झालेला असतो. बाह्यकारण म्हणजे बाह्यबल..थोडक्यात स्थयुद्रव्यांच्या मूळ स्वभावातच प्रवाहीपण नसतो. पण भाग पाडलं की ते आपले हालचाल करतात. ढकलणारं बळ ओसरलं की पुन्हा बसले होते तिथेच.”

“म्हणजे स्थायु हे अतिशय आळशी, सागकाम्या माणसांसारखे वाटतात, हंटर घेऊनच मागे राहावं लागतं तर त्यांच्या. जरा दुर्लक्ष झालं की बसले निवांत. बर मग विक्रमा या स्थायू, द्रव, वायूंच्या प्रवाहीपणाविषयी काही श्लोक दे पुराव्या दाखल..”

“वेताळा, स्थायु, द्रव, वायु यांच्यातले साम्य सांगताना प्रशस्तपाद ऋषींनी म्हटलंय
त्रयाणां प्रत्यक्षत्वरूपवत्त्वद्रवत्वानि ||27||
To the three, the characters of being perceptible by the senses, having colour, and having fluidity.
पृथ्वी, आप व वायु ही द्रव्ये ज्ञानेंद्रीयांनी जाणता येतात, त्यांना रंग असतो व ती प्रवाही असतात.”

“पण विक्रमा, आकाश व आत्मा यांचं काय झालं? काल व दिक् कुठे गेले? ते प्रवाही नसतात?”

“वेताळा, प्रशस्तपादांच्या श्लोकात सांगायचं झालं तर
आकाशात्मनां क्षणिकैकदेशवृत्तिविशेषगुणवत्त्वम् ||31||
Akash and the Souls have such specific qualities as last only a single moment and exist only over certain parts of their substrates.
आकाश व आत्मा हया द्रव्यांचा विशेष गुण म्हणजे ती एका क्षणाला एका ठिकाणी असतात तर दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या. म्हणजे ही दोन द्रव्ये एका ठिकाणी थांबतच नाहीत. उडाणटप्पु पोरांसारखी सारखी इकडुन तिकडे, तिकडून भलतीकडे अशी सतत उड्या मारत असतात. एका ठिकाणी राहण्याचा स्वभावच नाही मुळी..”

“विक्रमा, फारच की रे बोलघेवडा तू. एवढे सांगितलेस तरीही कोणाच्या जवळ, कोणापासून लांब हा काही उलगडा नाही झाला बरका मला? उगीचच आपला लांबलचक उदाहरणं देतोस..मला हे ही माहिती आहे की हे संदर्भाचं काम त्या बिनकामाच्या काळ व दिक् द्रव्यांनाच तुम्ही दिलं असणार..पण मला प्रशस्तपाद ऋषींचं म्हणणं ऐकायचंय. त्यासाठी पुन्हा भेटू राजा..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

झालं. प्रवाहीपणा ऐकता ऐकता थांबलेली रातकिडयांची किरकिर पुन्हा सुरु झाली. निरव शांतता भंग पावली. क्षितिजाच्या पलिकडे सतत कार्यमग्न असलेल्या सूर्याचं काम मात्र अहोरात्र चालूच होतं..तेज वाटण्याचं, सर्वांना हलवण्याचं, चालवण्याचं, बोलवण्याचं..मग त्याची कोणी पूजा करो वा कोणी आगीचा अतिप्रचंड गोळा म्हणो..त्याचं दानव्रत तो सूर्य म्हातारा होईपर्यंत चालूच राहील..पण हो त्याला म्हातारा झालेलं पाहायला मात्र कोणीच कुठे शिल्लक नसेल!

Soorya

रथसप्तमीच्या निमित्ताने त्या सहस्रकरांनी जग चालवणाऱ्या, जगाला दिशा दाखवणाऱ्या दिग्दर्शकाला प्रणाम!!

सर्व कथा एके ठिकाणी इथे पाहा: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

प्रतिक्रिया

हेही विवेचन आवडले. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अंतराळ यामधील अंतराळच्या जागी प्रशस्तपादऋषींनी मन हे पाचवे महाभूत मानलेले दिसते. त्याआधी चार्वाकांनी केवळ आधीची चार महाभूते मानली होती आणि अवकाश किंवा अंतराळ ह्या तत्त्वाचे वेगळे अस्तित्त्व नाकारले होते, कारण इतर चार महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव म्हणजेच अंतराळ असे त्यांचे मत होते. सृष्टीतील जड द्रव्यांना चेतनगुण कसा प्राप्त होतो या एकाच प्रश्नाने जगातील जवळजवळ सर्वच तत्त्वज्ञान आणि धर्मांना जन्म दिला असावा असे म्हणावेसे वाटते.

पुलेशु.

वैशेषिकानुसार पृथ्वी(solid), आप(liquid), तेज(energy), वायु(gas) व आकाश(plasma) ही पाच भूते होत. पण आकाश बलप्रयोग करत नाही असे म्हटले आहे. आकाश हे तरगांनी बनलेले असते अशी कल्पना आहे. यात ध्वनिपासून अतिनील तरंग सर्वच येतात. मन द्रव्य मात्र बलप्रयोग करते असे सांगितले आहे. अंतराळ हा शब्द जर space या अर्थी वापरत असाल तर त्याला दिक् असे म्हटले आहे.