द डेक्कन क्लिफहँगर - चेकर्ड फ्लॅग..!!!!!

मोदक's picture
मोदक in भटकंती
22 Dec 2017 - 1:22 am

द डेक्कन क्लिफहँगर..!!

द डेक्कन क्लिफहँगर - रेस डे..

************

देशपांडे मामा..

.

सुमित

यथावकाश निपाणी सोडले आणि मामांनी येणाऱ्या तवंदी घाटाचं शिवधनुष्य पेललं! पुढचा हा टप्पा खरंच फार कठीण होता. मामांच्या वाटेला फार कठीण आणि लांब लांब चढ आले. मामांनी बहुधा एकच बॉटल सोबत घेतली असावी. त्यांची ती बॉटल संपली आणि त्यांनी पाणी मागितलं. रात्रीच्या वेळी चालू कार रायडरला काही देऊ शकत नाही असा नियम होता. त्यामुळे पुढे एके ठिकाणी मामांना पाणी द्यायला आम्ही गाडी थांबविली. मामा कार मध्ये येऊन काळं मीठ खाऊन गेले. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना कदाचित पायाला वात येतोय. मामांना वात येतोय हे ऐकून मी जाम घाबरलो. डाएट, हायड्रेशन एवढं सगळं पद्धतशीर आणि काटेकोरपणे करणाऱ्या माणसाला जर वात यायला लागला तर आपलं काही खरं नाही. जाताना मामा सांगून निघाले की ते आता फार चालवणार नाहीत, रायडर बदलायला तयार राहा.

पुढे आता मला चालवायची होती. त्यामुळे दहा किलोमीटर पुढे जाऊन आम्ही उतरण्याची तयारी केली. जिथून मी आता चालवणार होतो तिथून बेळगाव चाळीस किलोमीटर दूर होतं. मामांना लागलेले चढ पाहून मी हादरलो होतो. पुढे अजून पण चढ लागणार अशी शक्यता होतीच. याउलट पुढे सगळे उतारच लागले. उतार असून देखील हवा तेवढा वेग मिळत नव्हता. याला कारण म्हणजे बहुतेक हलकेसे हेडविंड आणि थकलेले पाय! हा एक लांब उताराचा पट्टा फार आनंददायक होता. पण माझा आनंद फार काळ टिकला नाही. बेळगावच्या अलीकडे एक वेगळाच कुठला तरी घाट लागला. ह्या घाटाबदल मला पुसटशी कल्पना देखील नव्हती. घाट छोटासाच होता, पण त्याच्या लांबीबद्दल माहिती नसल्याने मी फार जोखीम न घेता हळूहळूच तो सर केला. घाट चढताना एका सोलो रायडर मुळे गोष्टी थोड्या सोप्या झाल्या. अर्धा घाट चढून झाल्यावर मला फार बोअर झालं होतं. पण लगेच समोर एक गाडी आणि सोलो वाला एक रायडर दिसला. मग त्याला ओव्हरटेक करण्याच्या इर्षेने चढाचा विसर पडला. बेळगाव शहर संपल्यानंतर डॉक ने चालवायला सुरुवात केली. यावेळी मध्यरात्र उलटून गेली होती. सगळे जण आता झोपाळलेले होते. सायकल आणि गाडी चालवण्याची कुणालाच विशेष इच्छा नव्हती. झोप येऊ नये म्हणून मी आणि शैलेंद्र तात्यांनी थोडे रेड बुल पण पिऊन घेतले. आणि अशा वेळी डॉकला अत्यंत वेगाने सायकल चालवतांना पाहून आमचा बसल्या बसल्याच उत्साह वाढत होता. त्या बोरिंग वातावरणात डॉक कसं काय सायकल होते देव जाणे!

अब है सुमीत की बारी.. बेळगांवजवळ..

.

सुमितला डिप्लॉय करताना - शैलेंद्र

.
.

डॉ श्रीहास

आनंदरावांच्या हसण्याच्या आवाजानी जाग आली, रात्रीचे २:३० वाजलेले होते आणि सैराट च्या गाण्यावर डॉकला झोप लागेली पाहून त्यांना हसू आवरलं नाही !! दिवसभरात ९०-९५ किमी सायकलींग नंतरची गाढ झोप होती डॉकची ;)).....

बेळगाव च्या आसपास कुठेतरी हायवे वर पोलो थांबली होती आणि नेहमी प्रमाणे मोदकानी प्रशांतला फोन करून डॉक ला डिप्लॉय करा असा आदेश सोडला होता. "आंम्ही रायडर्स आहोत की मिसाईल्स?" असा प्रश्न डॉकला पडायचा कारण ह्याला डिप्लॉय करा त्याला थांबवा, ह्याचा नंबर आहे.. असे भ्रमणध्वनी संभाषण दिवसरात्र होत होते..!!

मग डॉकनी तयारी सुरू केली, GU जेल चं एक पॅक रिचवले (हो हो गु जेल हाच उच्चार होतो, हे एनर्जी जेल आहे :) ) ग्लोव्हज चढवले, बंडाना गळ्यात अडकवून कान आणि नाक झाकून घेतलं, चष्मा घातल्यावर डोकं कव्हर करण्यासाठी दुसरा बंडाना चढवला, सरतेशेवटी हेल्मेटच्या मागचा ब्लिंकर चालू करून हेल्मेट डोक्यावर चढवलं. खुप जास्त war movies पाहिल्यामुळे आपण एखाद्या सैनिकाप्रमाणे तयारी करून हेलिकॉप्टर मधून युध्दभूमी वर डिप्लॉय होणार आहोत अशा आवेशात डॉक गाडी बाहेर आला. बाहेर आनंदराव, प्रशांत सायकल घेऊन तयारच होते. सागरला नेमका किती वेळ होता हे कोणालाही माहीती नव्हतं म्हणून डॉकनी वॉर्मअप करायला सुरवात केली. हातपाय मोकळे केले, थोडंसं स्ट्रेचींग करून आठ दहा बैठका मारल्या त्यादरम्यान रेस ऑफिशियल्स ची एक गाडी आली आणि थोडी पुढे जाऊन थांबली. अशा गाड्यांमधून ही लोकं लक्ष ठेवण्याचं काम चोखपणे करत होते आणि त्यामुळे रेस मध्ये गडबड किंवा चिटींग हा प्रकार होऊ नये याची काळजी घेतली जात होती. अजून काही वेळात एक मिणमिणता दिवा आणि मागे सपोर्ट व्हेईकल असं दिसल्यावर सागर आला असं वाटलं.. पण एक वेगळाच रायडर आणि त्याची गाडी पुढे जाऊन बदलीसाठी थांबले.

..आणि १२-१५ मिनीटांनी सागर आला. पठ्ठ्या चांगलाच थकला होता कारण ३५/४० किमी ऐवजी त्याने ५० किमी मारले होते व ते देखील २९-३० किमी/तास अश्या जबरदस्त स्पिडनी _/\_

सागर येण्या अगोदर डॉक प्रशांत ला म्हणाला की बाकी तिघं (मामा,सुमीत आणि सागर) हे त्याच्यापेक्षा चांगले रायडर्स आहेत आणि त्याची स्पीड मॅच करणं फार अवघड जातं. ह्यावर प्रशांत बोलला की हेच प्रत्येक रायडर त्याला दिवसभरात बोलतोय आणि कोणीही कमी जास्त नाहीये. खरं तर सगळे मस्त रायडर्स आहात आणि तुम्हा चौघांची भारी टिम आहे त्यामुळे परत असं बोलू नका फक्त रेसची मजा घ्या आणि जोरात सायकल हाणा !! प्रशांत इतकं पर्फेक्ट आणि मोलाचं बोलला की डॉक ला काहीही बोलण्यासारखं उरलं नाही.

सागर सायकल वरून उतरला तेव्हा मोदक पळत पोलोपाशी आला आणि शैलेंद्रला आराम करायचा आहे त्यामुळे एंडेव्हर स्थितप्रज्ञ चालवणावर आणि पोलो आनंदरावांच्या हातात असेल अशी आज्ञा देऊन पोलोच्या समोरच्या सीटवर विराजमान झाला. डॉक एंडेव्हरच्या लाईटमध्ये जाऊन थांबला आणि बाकी कृ व रायडर्स आपापल्या जागांवर स्थिरावले. डॉकला निघायचा इशारा मिळाला आणि रेस चा सगळ्यात बोरींग पण महत्वाचा टप्पा सुरू झाला.
बेळगाव ते धारवाड असा ७७-७८ किमी चं अंतर पुढच्या तिन तासात कापतांना जे काही घडत होतं ते असं..
कर्नाटकातील रस्ते दृष्ट लागावेत असे चांगले बनवले गेले आहेत आणि परत जाऊन औरंगाबादच्या रस्त्यांवर खड्डे चुकवत सायकलींग करावं लागणार ह्या विचारानी डॉकचं मन अस्वस्थ होत होतं.. हायवे वरचे पिवळे दिवे आणि आजूबाजूचं शांत वातावरण झोप आणण्यासाठी पुरेसं होत पण रस्ता इतक्या मोठ्याप्रमाणावर उंच सखल होता की विचारू नका त्यामुळे सतत पेडलींग लागत होतं आणि थंडगार हवेत सुध्दा घामाचे थेंब कपाळावरून चष्म्यावर ओघळायला सुरवात झाली होती. डॉकच्या डोक्यात एकच विचार चालू होता की आता बाकी तिघांना चांगला आराम करता यावा केवळ ह्यासाठीच पुढचे सगळं अंतर सायकलींग करायचं आहे आणि काहीही झालं तरी थांबा असा सांगितल्या गेल्याशिवाय सायकलवरून उतरायचं नाही म्हणजे नाही. सायकलींग व्यवस्थीत सुरू होतं मधूनच एखादं कुत्रं भुंकायचं किंवा पळत यायचं बहूदा तेव्हा कुत्र्याला लक्षात यायचं की आपण चुकीच्या प्राण्यावर भुंकतो आहोत (एक तर हा आपल्याला घाबरत नाही आणि हा पलटला तर नक्कीच रट्टे बसतील :D ) मग कुत्री वापस फिरायची किंवा गुमान गप बसायची. असं करत करत शेवटी धारवाड आलं , खरी गंमत आता सुरू होणार होती कारण धारवाड शहरात शिरून ट्रॅक ॲंड ट्रेल शाॅप पर्यंत जाऊन तिथल्या चेक पाॅईन्टला रिपोर्ट करून पुढे गोव्याकडे वळायचं होतं. जसा डॉक हायवे वरून धारवाड शहरात शिरणार त्या आधीच पोलो पुढे जाऊन चेक पॉईन्ट ची रेकी करून मधे थांबली होती. धारवाड शहरात शिरल्यावर जवळ जवळ ८-१० किमी हा केवळ चढच होता हे अंतर पार केल्यवरच कळलं. पुढे कुठेतरी सपाट रस्ता येईल किंवा थोडा उतार येईल ह्या आशेवर डॉक सायकल रेटत होता पण चेक पॉईन्ट पर्यंत काही चढ संपला नाही. सरते शेवटी चेक पॉईन्ट आला, मोदक पळत पुढे गेला व शिक्का घेऊन परत फिरला आणि डॉक ला म्हणाला “मस्त राईड झाली आता मामांना डिप्लॉय करतोय आपण तुम्ही बसा एंडेव्हर मध्ये”

डॉक ला काही उतार मिळाला नाही पण आजतागायतच्या सगळ्यात जबरदस्त राईडचा आनंद काही औरच होता :))

********
डॉक - इन अ‍ॅक्शन..

.

शैलेंद्र

धारवाडमध्ये फालतू रस्त्यावरन आम्ही गावात शिरलो, डॉक्टर आता वैतागत आला होता. अत्यंत कंटाळवाणा पॅच जवळजवळ दोन तास डॉक्टरने मारला होता. धारवाडला परत काही कुत्रे डॉक्टरांच्या दिशेने पाहत होते, पण औरंगाबादच्या श्वानांनी ह्या श्वानांना डॉक्टरची महती सांगितलेली असावी. आपल्या अंगावर येणाऱ्या कुत्र्याला गोंधळून टाकण्याची डॉक्टरची एक अजब युक्ती आहे, तो सरळ त्या कुत्र्यांच्या तोंडावर थुंकतो. हा अपमान सहन करण्याची इच्छा नसल्याने एकही कुत्रा डॉकच्या आसपास फिरकत नव्हता. :D

धारवाडला मामानी सायकल घेतली, डॉक्टरची सायकल आणि डॉक्टर स्वतः यांना स्टँडला लावायला एंडेव्हर थांबली. मामा पोलोला पाठीशी घेऊन पुढे गेले.

१५ मिनिटात एंडेव्हर निघाली, पण मामा काही सापडेना. वाटेत एक रेल्वे फाटक लागलं तिथे आम्हाला थांबावं लागलं. अजून दहा किलोमीटर पुढे गेलो तरी मामा दिसेना. शेवटी जवळ जवळ पाऊण तासाने एंडेव्हरने मामांना गाठलं. मामा पुढे, एंडेव्हर मागे आणि त्यांच्यामागे पोलो असा प्रवास सुरु झाला.

इतक्यात दुसरं रेल्वे फाटक दिसलं, नुसतं दिसलं नाही तर बंद होताना दिसलं आणि रेल्वे फाटक बंद होतानाचा टिपीकल बाँग बाँग आवाज सुरू झाला. मामांच्या डोळ्यात खून उतरला, त्यांनी फाटकाकडे रोखून पाहिलं. नाराजीने सायकलवर हात आपटले. त्याचवेळी फाटक बंद करणाऱ्या राखवालदाराने मामांकडे पाहिलं, मामांचा वेग आणि रेल्वे जाऊन फाटक पुन्हा उघडेपर्यंत वाट बघण्याचे फ्रस्ट्रेशन त्याच्यापर्यंत पोहोचले असावे.. गडाचे दरवाजे बंद होताना सफेद अश्वावर येणाऱ्या राजपुत्राला पाहून ते स्तब्ध व्हावे, तसा रखवालदार स्तब्ध झाला आणि हळू हळू खाली येणारे फाटक हवेतच थांबले. "येऊद्या.. येऊद्या.." असे रखवालदाराने हातवारे केले आणि मामा भन्नाट वेगात रूळ पार करून गेले. मागून दोन गाड्यांतून मामांचा लवाजमा सुद्धा पार झाला. सगळ्यांनी हात उंचावून त्या सिग्नलमनचे आभार मानले.

मामांच्या वादळाने साक्षात रेल्वेला टक्कर देऊन फाटक वरच्यावर थांबवले. :D

रिस्पेक्ट, कम्प्लिट रिस्पेक्ट..

मामा भन्नाट वेगाने सायकल हाणताना..

रात्री दिसणारा पोलोचा नजारा..

.

********

शैलेंद्र

अनमोड घाटाच्या 30 35 किलोमीटर आधी सुमित थकला, पहाटेचे तीन साडेतीन वाजले असावे. सुमित नंतर सागर बसणार हे ठरलेलं होतं, सागर तयारही होता. चेंजओव्हरसाठी इंडेवर पुढे गेली, पोलो सुमितच्या मागे होती. सागरला उतरवून सगळे सुमितसाठी थांबलेले.सागरची सायकल चालवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. तो न थकता खूप वेगाने, हलक्या गियरवर पायडल मारत राहतो. सायकलिंगच्या भाषेत याला स्पिनिंग किंवा इंड्युरन्स राईड म्हणतात. घाट आणि चढ चढण्यासाठी ही पद्धत प्रचंड उपयुक्त आहे. पसरणीचा घाट, मग साई इंटरनॅशनल ते कागल असे चढ मारून सागर थकला होता. सायकलवर बसायच्या आधीच तो म्हणलेला की मी इंडयुरन्स मारणार. एंडेव्हर आता अभिजित चालवत होता. शैलेंद्र बाजूला झोपला होता. सागरने सायकल घेतली तेंव्हा तो सागरला म्हटला, तू भले 20 किमी मार पण स्प्रिंट मार. म्हणजे, स्पिनिंगच्या मागे न लागता जोरात चालव. थकलास तर दुसरं कुणीतरी उतरेल, कारण आता उरलेल्या अंतरापेक्षाही ठरवलेल्या वेळात पोहोचणे गरजेचे होते. इतकं बोलून शैलेंद्र परत गाडी चालवायला बसला. सागरने आपल्या पद्धतीने सुरवात केली.

सागरला सायकल चालवताना पाहणे हा एक सोहळा असतो. रस्त्याच्या वेगवेगळ्या चढउतारावर सागरची मान दाद दिल्यासारखी हलते. एका विशिष्ट लयीत तो सर्वांगाने सायकलिंग करत असतो. रात्रीचा किर्रर्र अंधार, मधूनच हलणाऱ्या सावल्या, जंगलातून दिसणाऱ्या आभासी हालचाली आणि सायकलवर स्पिनिंग करणारा सागर.. दिवसभर गाडी चालवलेल्या कोणत्याही ड्रायव्हरला झोप आणायला हे पुरेसं आहे. आपली झोप घालवण्यासाठी मग शैलेंद्र सागरला प्रोत्साहन देऊ लागला. सागर जोरात, सागर पुढचा टाक वगैरे निरर्थक सूचना सुरू झाल्या. सागर कानाने सूचना ऐकत होता आणि सर्वांगाने धुडकावून लावत होता. अनमोड घाटाच्या आधी संपूर्ण रोलिंग होतं, म्हणजे सतत चढ आणि उतार. सागर त्याच्याच मस्तीत चालवत होता.

शेवटी घाट जवळ येतोय हे लक्षात घेऊन क्रुने रायडर बदलायचा ठरवलं. शैलेंद्र एंडेव्हर घेऊन पुढे गेला, डॉक्टरला रेडी केलं. घाट उतरायला डॉक्टरसारखा रायडर नाही, हत्ती मधे आला तरी कट मारून उधळवून टाकेल.

अनमोड घाटाच्या त्या वळणाला प्रचंड थंडी होती. डॉक्टरला उतरल्या उतरल्या ती चांगलीच जाणवली, डॉक्टर परत गाडीत बसायला निघाला होता, पण जरा बाहेर राहून सवय केल्यास, सायकलवर बसल्यावर थंडी वाजणार नाही हा थंडी इतकाच थंड आणि बोचरा सल्ला शैलेंद्रने दिला.

सागर आला आणि डॉक्टर निघून गेला. जाताना पोलो चहाचा थर्मास देऊन गेली. कडाक्याची थंडी , सायकलवर पूर्ण गळून गेलेला सागर, बघायला अभिजित आणि शैलेंद्र..

"मी बाँग झालो" - इति सागर पाध्ये

अभिजित शैलेंद्रकडे बघतोय, समोरची व्यक्ती काहीतरी झालेली म्हणतेय पण आपल्याला ती फक्त थकल्यासारखी वाटतेय, नक्की कहना क्या चाहते हो, असे भाव अभिजीतच्या चेहऱ्यावर..

"बाँग झालो मी..!" सागर परत म्हटला. एव्हाना शैलेंद्र जरा सावरला होता. सागर गळून गेलाय असा स्वतःपुरता अर्थ त्याने काढला आणि थर्मासमधला गरम चहा सागरला दिला. गरम चहा बरोबर बॉंग हळूहळू उतरायला लागला, तेंव्हा पूर्वेला सूर्याचं पहिलं किरणं फुटायला लागलं होतं.

****************

मोदक

धारवाड नंतर अनमोड घाटाच्या सुरूवातीला मामा डिप्लॉय झाले.. मामांनी रेल्वे बिल्वेचे किस्से केले ते इथेच. मामांच्या नंतर सुमीतने सायकल हाणली आणि नंतर पाध्ये उतरले. डॉकना फक्त उतारावर डिप्लॉय करायचे अशी स्ट्रॅटेजी ठरली होती पण म्येन मुद्दा हा होता की अनमोड घाटाचा उतार सुरू कुठे होतो तेच माहिती नव्हते. त्यामुळे सगळे प्लॅनिंग अंदाजपंचे सुरू होते. शेवटी एका ठिकाणी डॉक डिप्लॉय झाले आणि सुदैवाने लगेचच उतार सुरू झाला.

आनंद्राव पोलो हाकत होते, मोदक पुढे बसून रूट / कंट्रोल पॉईंट वगैरे बघत होता, सरपंच आणि सुमीत मागे बसून पुढच्या रस्त्यावर नजर ठेऊन होते. डॉक उधळले म्हणजे खरोखरी उधळलेच. किर्र अंधार, घाटातली अनोळखी वळणे, खड्ड्याखुड्ड्यांचा रस्ता वगैरे कांहीही न बघता डॉक प्रचंड वेगात घाट उतरत होते. १२ / १५ तासांपूर्वी झालेला मामांचा अपघात अजून तसा ताजाताजातच होता. मोदकही एके काळी घाट उतरतानाच आपटला असल्याने सायकल किती लवकर नियंत्रणाबाहेर जाते त्याला व्यवस्थीत ठाऊक होते. "डॉक खूप वेगात जात आहेत" मोदकने गाडीत डिक्लेअर केले. गाडीत बसलेल्यांनी यावर करण्यासारखे कांहीच नव्हते त्यामुळे त्यांनी फक्त ऐकून घेतले. सुमीतने डॉकला अनेकवेळा सायकल चालवताना बघितले असल्याने त्याने "त्याचा कंट्रोल असतो रे, नका काळजी करू" असा दिलासा द्यायचा प्रयत्न केला पण तो किती पोकळ होता ते पुढच्या कांही वळणांवर उघड झाले. आनंद्राव् डॉकला पोलोच्या हेडलाईटमध्ये ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते मात्र डॉक सापडता सापडत नव्हते. एक दोन ठिकाणी तर डॉकनी ब्लाईंड टर्नवर मोठाल्या ट्रकना भरधाव वेगात मागे टाकले, आता आनंद काय करतोय ते बघण्यासाठी मोदकने आनंदकडे बघितले तर कांहीही होवो पण डॉकला अंधारात नजरेआड करायचे नांही म्हणून आनंदने पोलोही तशीच भरधाव सोडली होती.

डॉकनी आजिबात वेग कमी न करता कठडे नसलेले टर्न, खड्यांच्या बॉर्डर्स असे खतरोंके खिलाडी छाप स्टंट केल्यानंतर मोदकचे पेशन्स संपले आणि त्याने डॉकला गाडीतून जोरजोरात "डॉक.. हळू.." "डॉक हळू.." असे जोरजोरात आवाज द्यायला सुरूवात केली. (यांतले डॉकला किती ऐकू गेले असावे देव जाणे). इतकी वेडीवाकडी सायकल चालवल्यावर पुढे एके ठिकाणी डॉक चक्क कांहीही न कळवता थांबले. अगदी स्टँड स्टिल..!! मोदकने वेळ न दवडता डॉक कडे धाव घेतली.

"सायकल हळू जात आहे, बहुतेक चाक जॅम झाले आहे" डॉकनी तक्रार मांडली.

मोदकने सायकल उचलून मागचे चाक फिरवून बघितले आणि "सायकल ठीक आहे" असे सांगितले. त्यासोबतच "डॉक तुम्ही खूप फास्ट जाताय.. इतक्या वेगाची आवश्यकता नाहीये... आपण शेड्युलनुसार चाललो आहोत.. रस्त्यावर खड्डे आहेत.. मोठे मोठे ट्रक आहेत आणि पुढे तर वळणावरच खड्डे आहेत.." अशा अनेक सूचना दिल्या आणि मोदक गाडीत येऊन बसला.

नक्की कोणता मुद्दा डॉकला अपील झाला ते कळाले नाही मात्र डॉकने वेग कमी केला आणि अगदी आरामात राहिलेला उतार उतरायला सुरूवात केली.

********

मोदक

डॉकनी डेडली स्पीडने घाट उतरून गोव्यात पोहोचते केले.. आता फक्त गोव्यातल्या चढ उतारांच्या रस्त्यांवरून फिनिश पॉईंटला पोहोचायचे होते. सुमीतला डिप्लॉय करून नॅव्हिगेशन साठी मोदकने लीड व्हिईकलची फ्रंटसीट पकडली. सुमीत पुढे.. त्याच्या मागे दोन सायकल लटकवलेली एंडेव्हर आणि त्याच्या मागे आनंद्रावांच्या कुशल हातात पोलो असा ताफा गोव्याच्या रस्त्यांवरून फिनिश लाईनकडे झेपावू लागला. मोदकने आवडीचे काम केले - सरपंचांना फोनवले. कारण बॅकअप म्हणून मागच्या गाडीत नॅव्हिगेशन सुरू असणे आवश्यक होते.
फोनाफोनी झाल्यानंतर असे कळाले की मागच्या गाडीत नॅव्हिगेशन अ‍ॅप असलेला मोबाईल फक्त सुमीतकडे होता आणि आता सुमीत मोबाईल खिशात घेऊन सायकल हाणत होता. मग शेवटचा पर्याय म्हणून चालत्या गाडीतून मोदकने डोके आणि शक्य तेवढे हात बाहेर काढले आणि सुमीतला ओरडून विचारले की "मागच्या गाडीत नॅव्हिगेशन असणारा मोबाईल नाहीये, तुझा मोबाईल देतोस का..?" सुमीतने आज्ञाधारक बालकासारखी लगेच मान डोलावली व होकार कळवला.
शैलेंद्रने गाडी पुढे घेतली, सुमीत मागून सायकल चालवत येईपर्यंत मोदक गाडीतून उतरून रन-अप घेण्याच्या तयारीत रस्त्यावर उभा राहिला..

रों.. रों.. करत सुमीत आला आणि सुमीत सायकलवर आणि मोदक पळत असे पुढील संभाषण झाले..

मोदक - हां.. दे मोबाईल..
सुमीत - कशाला..?
मोदक - अरे नॅव्हिगेशनसाठी..
सुमीत - मी नाही देणार.. स्ट्राव्हा सुरू आहे.. (स्ट्राव्हा हे एक सायकलिंग परफॉमन्स, अंतर, वेळ वगैरे मोजण्याचे अ‍ॅप आहे)
मोदक - (पळत पळतच) अरे..???
सुमीत - नाही नाही.. स्ट्राव्हा सुरू आहे रे.

पाणीपुरी खाताना अचानक पुरीचा खालचा भाग मऊ होऊन पाणी, बटाटे वगैरे प्लेटमध्ये रहावे आणि फक्त पुरी खाल्ली गेल्यावर कसा चेहरा होईल तसा चेहरा घेऊन मोदक गाडीत येऊन बसला.

*******

मोदक

मोदकने पोलो ते एंडेव्हर जागा बदलली तेंव्हा जवळ जवळ ६० किमी अंतर बाकी होते आणि एंडेव्हरमध्ये पाध्ये सॉक्स / रिफ्लेक्टिव वेस्ट वगैरे काढून निवांत मांडी घालून बसले होते. "माझे सायकलिंग झाले" पाध्येंनी डिक्लेअर केले. सुमीतने "आता फक्त आणखी २० किमी" असे आमच्याकडून कबूल करून घेतले आणि मामांनी "नाही हो मोदकभाऊ.. मी फक्त २० ते २५ किमीच सायकल चालवेन" असे अजीजीने सांगितले होते.

कितीही म्हटले तरी शेवटी शेवटी सगळे रायडर थकले होते. इतरवेळी आरामात १०० किमी सायकल चालवणे वेगळे आणि वेळेच्या तणावाखाली सायकल तासभर पळवून ३०-३५ किमी अंतर कापणे वेगळे कारण सलग वेगात सायकल चालवून विलक्षण थकवा येतो आणि रिकव्हरीला बराच वेळ लागतो. सुमीतला आणखी १० किमी चालव सांगणे त्या क्षणी शक्य नव्हते. मग मोदकने सरळ खोटी माहिती द्यायला सुरूवात केली. २० किमी झाल्यावर १२ च किमी झाले आहेत असे सांगितले. इकडे गाडीत ६० किमीचा हिशेब जुळत जुळत नव्हता.. मोदकने बॅगेतून चितळेंच्या काजू रोलचा एक बॉक्स काढला आणि सर्वांनी काजू रोल खाल्ले. मामांना थोडीतरी एनर्जी मिळावी असा माफक हेतू आहे अशी सर्वांनी काजू रोल खाताना स्वत:ची समजूत करून घेतली. मोदकची बदमाशी सुमीतलाही कळाली असावी कारण तो थोड्या वेळाने थांबला आणि रायडर बदला असे म्हणाला.

"वाटेत एका ठिकाणी डेडली चढ आहे" असे सांगून शैलेंद्रने मामांचे टेन्शन वाढवले होते.

आता मामांना ३५ किमी अंतर पार करायचे होते. नाईलाजाने मोदकने पाध्येंना "बुटं घालून तयार रहा" असे फर्मान सोडले.

आमच्या सुरूवातीच्या प्लॅन प्रमाणे त्या दिवशीचे बड्डे बॉय डॉक फिनीश लाईन क्रॉस करणार असे होते पण ते कितपत शक्य होईल याची शंका होती.

मामा सायकलवर बसले आणि उधळलेच.. अहो अहो म्हणेपर्यंत बांग बुंग बांग बुंग असे पेडल हाणत मामा सुसाट दिसेनासे झाले. शेवटी वळणावळणाच्या आणि गोव्यातल्या कन्फ्युजिंग रस्त्यावर घोळ नको म्हणून आंम्ही लीड व्हिईकलला पुढे काढले. गोव्यातल्या चिंचोळ्या रस्त्यावर भलीमोठी एंडेव्हर.. त्यानंतर व्यवस्थीत अंतर राखून मामा आणि सर्वात मागून मामांना कव्हर करत पोलो अशा लयीत आमचा ताफा पळू लागला.

ड्राफ्ट घेतल्याचा आळ भाळी नको म्हणून आंम्ही जरा पुढे पुढेच गाडी पळवत होतो. शैलेंद्र गाडी चालवत, मोदक रस्ता शोधत आणि पाध्ये मागे वळून मामांवर नजर ठेवत असे तिहेरी काम सुरू होते.सुमीत शांतपणे मजा बघत होता.

चला चला मामा आले... (पाध्ये)
थांबा थांबा मामा येत आहेत.. (हे पण पाध्येच)
हां, इथून डावीकडे गाडी घ्या.. (मोदक)
अरे हा रस्ता पणजीला जात नाही.. सरळ जायला पाहिजे.. (शैलेंद्र)
ते माहिती नाही.. नॅव्हिगेशन डावीकडे दाखवत आहे, घ्या डावीकडे. (मोदक)
बरोबर आहे.. चला चला.. (सुमीत)

अशी जुगलबंदी सुरू असताना अचानक एका ठिकाणी वळण घेतल्यावर ४५ अंशाचा चढ लागला. सर्वांना धास्ती की "अरे हे काय मध्येच.."
आता थोड्या वेळाने मामा येतील असा विचार करून आंम्ही पुढे जाऊन थांबलो आणि अचानक पाध्ये बोलले.. चला चला.. मामा आले..
अविश्वासाने सर्वांनी मागे वळून पाहिले तर खरंच मामांनी तो अवघड चढ लीलया चढवला होता. (नंतर कळाले की त्या चढावर अनेक सायकलिस्ट अक्षरशः खुरडत चालत आले होते, तिथे आपले मामांनी राजाच्या आवेशात सायकल सीटवर बसून चढ चढवला)

यथावकाश फिनिश लाईनला पोहोचलो.

मोदक तयारीतच होता. त्याने पटकन रेसकार्ड आणि डिजीटल चिप घेऊन आयोजकांकडे धूम ठोकली. बाकीची मंडळीही उतरून आलीच होती.
फक्त २ जण सोडून.. एंडेव्हर जवळ एक आणि पोलो जवळ एक जण सायकल राखण्यासाठी थांबले होते. यथावकाश गाड्या नीट पार्क करून व सायकली उतरवून ते ही आले.

पहिल्याच प्रयत्नात मामा, सुमीत, पाध्ये आणि बड्डे बॉय डॉक यांनी डेक्कन क्लिफहँगर ही मानाची ६४५ किमीची सायकलरेस २४ तास ३० मिनीटात पूर्ण केली होती..!!!

.

द रायडर्स..!!

डावीकडून - सुमित, मामा, डॉक आणि पाध्ये.
.

.
.
मिशन अकम्प्लीश्ड..!!

.
.
आमचे टाईमिंग..

.
.

क्रू..
डावीकडून - शैलेंद्र, स्थितप्रज्ञ, मोदक, आनंदराव, प्रशांत.

.
.
क्रू - आणखी एकदा..

.
.

हीच ती भारी लोकांनी भरलेली टीम ;)

.
.

आनंदराव, मागे ब्लर झालेले पाध्ये आणि स्थितप्रज्ञ.

.
.

रेस फिनिश नंतरच्या दिलखुलास गप्पा..

.
.
.
.
.
.
आंम्ही मुक्काम ठोकलेल्या बंगल्यातून दिसणारा अप्रतिम नजारा..

.
.
श्रमपरिहार - आणि गप्पा..!!

.
.
द डॉक..!!

.

भेटू पुन्हा.. अशाच एखाद्या उपक्रमानंतर..!!

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

22 Dec 2017 - 2:00 am | कपिलमुनी

Respect

सुंदर , वेगवान आणि डिटेल लेखमाला ! सर्व डीसी वीरांचे आणि क्रू मेंबरचे हार्दिक अभिनंदन !

टंकनश्रम घेऊन ही स्पर्धा आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार्स !!

संग्राम's picture

22 Dec 2017 - 2:49 am | संग्राम

+१

मी-सौरभ's picture

27 Jan 2018 - 8:04 pm | मी-सौरभ

सर्व सहभागी झालेल्या आणि अनुभव लिहिलेल्या सदस्यांच्या प्रयत्नांना सलाम

अरिंजय's picture

22 Dec 2017 - 5:49 am | अरिंजय

रेस, टीम दोन्ही जबरदस्त. चालक + मदत पथक दोघांचेही दणकुन अभिनंदन. खुप मेहनत घेतली दोघांनी.

अभिजीत अवलिया's picture

22 Dec 2017 - 6:15 am | अभिजीत अवलिया

+१

धडपड्या's picture

22 Dec 2017 - 8:24 am | धडपड्या

भन्नाट झाली रेस...!!!

सायकल गृपवर चाललेला जल्लोष परत एकदा अनुभवायला मिळाला..
सर्वांचे अभिनंदन...

सिरुसेरि's picture

22 Dec 2017 - 9:04 am | सिरुसेरि

मस्त ... फास्ट आणी फ्युरिअस

शैलेन्द्र's picture

22 Dec 2017 - 9:34 am | शैलेन्द्र

"डॉकना फक्त उतारावर डिप्लॉय करायचे अशी स्ट्रॅटेजी ठरली होती पण म्येन मुद्दा हा होता की अनमोड घाटाचा उतार सुरू कुठे होतो तेच माहिती नव्हते. त्यामुळे सगळे प्लॅनिंग अंदाजपंचे सुरू होते. शेवटी एका ठिकाणी डॉक डिप्लॉय झाले आणि सुदैवाने लगेचच उतार सुरू झाला."

ओ, ते सुदैवाने नव्हतं, डॉकने मला योग्य आमिष देऊन उतार शोधायला सांगितलेलं. म्हणून मी सगळे चढ सागरकडून चढवून त्याला बॉंग केलं, आणि डॉक्टरला सायकल दिली.

पण डॉक्टरने अजूनही आमिष दिलेलं नाही मला.

डॉ श्रीहास's picture

22 Dec 2017 - 9:49 am | डॉ श्रीहास

आज भेटा....

आमिष ... सॉरी सामिष ट्रीट दिली जाईल.

टिप: ऑफर आज संध्याकाळी संपत आहे ;D

शैलेन्द्र's picture

22 Dec 2017 - 9:57 am | शैलेन्द्र

ऑफर चढ संपल्यावर संपेल, हे माहीत होतं मला

अन्यायग्रस्तांचं काय ?

डॉ श्रीहास's picture

22 Dec 2017 - 10:46 am | डॉ श्रीहास

लाल रंगाची तेलकट रेश्मा भुर्जी !!

sagarpdy's picture

22 Dec 2017 - 10:10 am | sagarpdy

सकाळपासून तीच-ती सँडविच, चिकी, कॅडबरी खाऊन वैताग आला होता. अगदी नाईलाज म्हणून धारवाड मध्ये बसल्या बसल्या एक कॅडबरी आणि थोडी चिकी खाऊन घेतली होती. अनमोड सुरू व्हायच्या आधी मामांना गाडीत बसवून सुमित उतरला. तासाभरात सायकलिंग साठी रेडी राहा ही सूचना सागरला मिळाली. आधी कुणालातरी कायप्पा वर अनमोड जंगलात कुण्या एका टीम ला वाघ दिसला, असा संदेश आलेला. त्यामुळे वाघ आला तर काय यावर चर्चा सुरू होत्या. अंतराच्या आकडेमोडी चालल्या होत्या. 30-35 किमी नंतर सुमित ने हाताच्या खुणेने त्याच्या सायकलचा दिवा लो बॅटरी दाखवत असल्याचे सांगितले. सागर उतरला.
आतापर्यंत वाघ आला तर काय वगैरे फालतू चर्चा विसरून घाटाच्या सुंदर जंगलात चंद्रप्रकाशात सायकलिंग सुरू झाली. गोव्याकडे जाताना या रस्त्याला सलग चढ कुठेच नव्हता, पण चढउतार सारखे लागत होते. हा घाटाचा उतार, म्हणेपर्यंत पुढचा चढ यायचा. हवेत गारवा होता. त्यामुळे पाणी/इलेक्ट्रॉल फार घ्यावं असंही वाटत नव्हत. 25-30 किमी वगैरे झाले असतील, अचानक कायच्या काय भूक लागायला लागली. आणि हाताला मुंग्या यायला लागल्या. बॉंक. कार डॉक ना पुढे उतरवायला निघून गेली.
सोसाट्याच्या वाऱ्यात चहा आणि सँडविच खाताना सागरला कोणीतरी म्हणलं, "डॉक उतारावर भुंगाट सुटले असतील"

शैलेन्द्र's picture

22 Dec 2017 - 12:16 pm | शैलेन्द्र

मीच तो कोणीतरी

देशपांडेमामा's picture

22 Dec 2017 - 9:50 am | देशपांडेमामा
देशपांडेमामा's picture

22 Dec 2017 - 10:27 am | देशपांडेमामा
देशपांडेमामा's picture

22 Dec 2017 - 10:29 am | देशपांडेमामा

मोदकभाऊंचे आभार्स !

एवढे टंकन श्रम घेऊन लेखमाला पूर्ण केल्याबद्दल मोदकभाऊंचे मनःपूर्वक आभार !

माझ्या काही आठवणी लिहितो आहे ह्या रेस च्या

१) पुण्याला येताना तवंदी घाटमाथ्याला कावेरी नावाचे हॉटेल आहे तिथे अप्रतिम कॉफी मिळते . कॉफी घ्यायला थांबलो असताना मी खिडकीतून घाटाचा वर येणारा रस्ता बघत होतो . एक दिवस आधी तो घाट चढताना लागलेली वाट आठवत होती. बाजूला बसून मोदक आणि शैलेंद्र काही तरी बोलत बसलेले. मी बराच वेळ विचारात हरवलो होतो बहुतेक. एकदम कानावर खुप वेळ लागला असे काहीतेरी ऐकू आले आणि मी म्हणालो, हो ना राव तवंदी खरंच खूप लांब आणि चढावाचा होता रात्री राईड करायला. हे ऐकून मोदक आणि शैलेंद्र हसायला लागले. मला कळेना काय चुकीचं बोललो मी. मग मोदकने विचारले की मामा आम्ही कश्याबद्दल बोलत होतो असं वाटतंय? म्हटलं.. तवंदी घाट स्लो केला ना मी खुप ? तेच बोलत होते ना? तर शैलेंद्र हसता हसता म्हणाले की आम्ही एका ऑफिस मधल्या कामाच्या दिरंगाईबद्दल बोलत होतो की तिथे काम खूप स्लो होत म्हणुन. मोदकला हसू आवरत नव्हतं ... म्हणाला मामा रेस संपली केव्हाच जागे व्हा!! :D :D

२) पुण्याला येताना नाजुकराव सोबत होते. ते रेस मध्ये मार्शल (रेस मध्ये कोणी चीटिंग वगरे नाही करत ना बघणारे ) होते . त्यांनी आग्रहानी आम्हाला सगळ्यांना (९ जणांना!! ) त्यांच्या कोल्हापूरच्या घरी जेवायला नेले. त्यांच्या मातुश्रींच्या हातचे मटण, पांढरा आणि तांबडा रस्सा खाऊन एकदम भरून पावलो. जेवण एवढे लज्जतदार होते की पुढल्या वर्षी DC करावी तर फक्त ह्यासाठीच अस वाटतंय :P आणि जेवणानंतर मिळालेली भाजलेली गरम गरम बडीशेप आणि साखर म्हणजे तर चेरी ऑन टॉप होती !

३) सम्पूर्ण रेस दरम्यान रायडर्स च्या खालोखाल कस लागला तो ड्रायव्हर्सचा. इतर वेळेस लांब पल्ल्यासाठी गाडी चालवणं वेगळं आणि सायकलस्वाराच्या मागे २४ तास सतत १५/२० km/h एवढी हळू चालवणं वेगळं. हे काम हसत हसत करण्यार्या आणि ग्रुप रायडर्स ला रेस पूर्ण करण्यात मदत करणाऱ्या शैलेंद्र , आंदनराव आणि अभिजीत ह्याचे मनापासून आभार

४) मोदक आणि प्रशांत ह्यांचे communication हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे :D. मोदक लीड व्हेइकल मध्ये असल्यामुळे जो काही चेंज असेल तो प्रशांत ला सांगायचा आणि मग प्रशांत तो पोलो मधल्या बाकीच्या लोकांना. बर्याचदा असे पण झाले की दर ५ १० मिनिटाला प्लॅन्स चेन्ज होत गेले आणि मोदक आणि प्रशांतला त्यांचे दोघांमधले आणि बाकीच्या कृ आणि रायडरचे कोऑर्डिनेशन करावे लागले. प्रशांत दुसर्या गाडीत असल्याने बर्याचदा त्यांची ताराम्बळ उडायची. तरी पण दोघांनी न कुरकुरता आणि न कंटाळता जबरदस्त कोऑर्डिनेशन करत ही कसरत पूर्ण केली

५) अभिजीत आणि आंनदराव जोडगोळी म्हणजे धमाल होती. अभिजीत जेवढे शांत तेवढेच आंनदराव उत्साहानी फसफसणारे ! शैलेंद्र जेव्हा पहाटे दमले होते तेव्हा अभिजीत एन्डेव्हर चालवायला आले. थोड्यावेळानी म्हणाले ह्या गाडीत आल्यावर एकदम स्कॉलर मुलांमध्ये आल्यासारखं वाटतंय :P. मंद संगीत ,हळू हळू गप्पा वैगरे. पोलोमध्ये तर नुसता धिंगाणा सुरु आहे :D आंनदरावांनी सगळ्यांना जाग ठेवायला गाण्यान्चा खास खजिना आणला होता (सुया घे पोत घे types ) . अभिजीतच्या बोलण्याचा अनुभव नंतर मी पण घेतला :D

DC केल्यावर काय मिळाल तर प्रचंड आनंद आणि काही तरी ठरवलेली मोठी गोष्टी पूर्ण केल्याचं समाधान !

****** पुढ्ल्या वर्षी परत DC करणारच ******

देश

अरिंजय's picture

22 Dec 2017 - 11:10 am | अरिंजय

तुम्ही डिसी साठी केलेली तयारी यावर एक वेगळा धागा काढा. वेग आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी केलेला व्यायाम, आहार, सराव अाणि सर्वात महत्त्वाचे मानसिक तयारी. सायकल निवडताना काय निकष लावले. असा थोडा टेक्निकल पार्ट त्यात घ्या जेणेकरून इच्छुकांना त्याचा फायदा होईल.

शलभ's picture

22 Dec 2017 - 2:49 pm | शलभ

+१

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Dec 2017 - 11:42 am | ज्ञानोबाचे पैजार

या सगळ्यांचे मनापासुन कौतुक. लेखमाला भन्नाट झाली. प्रचंड आवडली.
तुम्हा सगळ्यांचा हा वेडे पणा असाच चालु राहो आणि उत्तरोत्तर वाढत राहो ही सदिच्छा.
आणि पुढील वर्षासाठी अनेक अनेक शुभेच्छा.
पैजारबुवा,

एस's picture

22 Dec 2017 - 12:01 pm | एस

साष्टांग दंडवत स्वीकारा सर्वांनी! _/\_

आता अडगळीत पडलेली सायकल काढून तुम्हांला मानवंदना म्हणून एक राईड मारणेत येईल.

चाणक्य's picture

22 Dec 2017 - 1:36 pm | चाणक्य

सगळ्यांचे अभिनंदन. वाचतानाच असलं भारी वाटलं. कडक सॅल्युट राव तुम्हा सगळ्यांना.

सुमीत भातखंडे's picture

22 Dec 2017 - 2:10 pm | सुमीत भातखंडे

जबरदस्त झाली डी.सी.
क्रु आणि चालक - दोघांचेही अभिनंदन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2017 - 2:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट !!!

अभिनंदन आणि पुढच्या मोहिमांसाठी अनेकानेक शुभेच्छा !

ऋष्या's picture

22 Dec 2017 - 2:47 pm | ऋष्या

सर्व रायडर्स आणि क्रू मेम्बर्सनी जबरदस्त कामगिरी पार पाडलेली आहे. कायप्पा ग्रुपवरील थरारक अपडेट्सनंतर ह्या पोस्टवर share केलेले अनुभव म्हणजे cherry on cake !!!

हॅट्स ऑफ टीम !!!

नन्दादीप's picture

22 Dec 2017 - 5:17 pm | नन्दादीप

फुल रिस्पेक्ट भाई....

नितीन पाठक's picture

26 Dec 2017 - 3:14 pm | नितीन पाठक

सर्व डीसी वीरांचे आणि क्रू मेंबरचे हार्दिक अभिनंदन !
जबरदस्त झाली डी.सी.
या सगळ्यांचे मनापासुन कौतुक. लेखमाला भन्नाट झाली.....

सस्नेह's picture

28 Dec 2017 - 3:41 pm | सस्नेह

काय म्हणून असले अचाट उद्योग करतात ब्र हे मिपाकर्स ?

पद्मावति's picture

31 Dec 2017 - 2:21 am | पद्मावति

जबरदस्त __/\__

झेन's picture

8 Jan 2018 - 1:00 pm | झेन

एखादी फास्ट ईंग्लिश मुव्ही बघत असल्याचा फिल येतोय. मोहीम भारी, वर्णन करायची पध्दत लै भारी

झेन's picture

8 Jan 2018 - 1:11 pm | झेन

एखादी फास्ट ईंग्लिश मुव्ही बघत असल्याचा फिल येतोय. मोहीम भारी, वर्णन करायची पध्दत लै भारी

गामा पैलवान's picture

10 Jan 2018 - 9:44 pm | गामा पैलवान

क्या शॉल्लेट मारा बे! जब्बडदस्त !! झभ्भडधस्त !!
-गा.पै.

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Jan 2018 - 1:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

भयंकरच आहात तुम्ही लोक्स....६४५ किमीची सायकलरेस २४ तास ३० मिनीटात पूर्ण ?????

वाचताना क्षणोक्षणी असे वाटत होते की आपण स्वतः त्या क्रु बरोबर पुढे पुढे चाललो आहोत, ते प्लॅनिंग, आलेल्या अडचणी, त्यातुन काढलेले मार्ग, सगळेच भन्नाट!!
___/\__

माधुरी विनायक's picture

12 Jan 2018 - 5:08 pm | माधुरी विनायक

मानलं तुम्हा सर्वांना. असा संकल्प करायचा आणि पूर्णही करायचा म्हणजे दं ड व त.... चित्रदर्शी वर्णन..

सोमनाथ खांदवे's picture

17 Jan 2018 - 4:38 pm | सोमनाथ खांदवे

मी सकाळ संध्या काळ मिळून बळ बळ 20 की मि सायकल हानतो तर मला लै मोठा पराक्रम क्येल्या सारख वाटत ,अन त्याबद्दल मी माझ्या मित्र सगे सोयरयात फुशारक्या मारत अस्तो . पन तुमचे ह्ये असले पराक्रम वाचताना वर तेंदुलकर च पुढ येवून सिक्स मारल्या च फिलिंग आठवल .तुमच्या पुढ मनोमन नतमस्तक झालो . गेल वर्ष भर तुम्हा लोकांचे हे असले उद्योग बगुन मी सुदा सायकल हानायला सुरवात क्येली . तो कुत्र्या च्या तोंडावर थुकन्या प्रयोग लै जाम आवडला , उद्या पासून करून बगतो .

मालविका's picture

28 Dec 2021 - 8:32 pm | मालविका

नुकतीच मोदक शी भेट झाल्यावर त्याने या लेखाबद्दल सांगितले. कधीतरी निसटून गेला नजरेतून.पण आता लिंक मिळाल्यावर सलग सगळे भाग वाचून काढले. एकदम भन्नाट वर्णन. सुपर एक्सयटिंग आहे हे सगळं. कधीतरी कुणासाठी तरी कृ मेम्बर म्हणून जायला नक्की आवडेल. सगळ्या रायडर्स ना आणि कृ मेम्बर्स ना सलाम!