क्रीडायुद्धस्य कथा वाहा(ब) जी वाहा(ब)

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
7 Jan 2018 - 11:58 pm

आपल्याला ड्रामा आवडतो. क्रिकेट असो वा सिनेमा वा लाइफ.... आपल्याला ड्रामा आवडतो. आपला हीरो कसा... हातात बंदुक असली तरी त्याच्या दस्त्यानी हानत हानत १० लोकांना लो़ळवील... पण गोळी नाही घालणार. सरळ समोरच्याला गोळी घालुन मामला खतम केला तर पिक्चरमध्ये मजा काय राहिली? जरा काचा तुटल्या, डोकी फुटली, मानसं हिकडून तिकडं उडून पडली, हाडं मोडली की कसं जरा पैशे वसूल झाल्यासारखं वाटतं. एका टीमनी अमुक अमुक रन केल्या आणि दुसर्‍या टीमनी तमुक तमुक ओव्हर्समध्ये त्या चेस केल्या अशी साधी सरळ सोपी स्टोरी असलेलं क्रिकेट आम्हाला कसं आवडणार? मग तो पाठलाग कितीही शिस्तीचा का असेना.

आत्ताचं जे क्रीडायुद्ध आपण बघणार आहोत ना ते म्हणजे खरंतर सलमान खानच्या पिक्चरसारखं होतं. त्याच्या पिक्चरमध्ये कसं... डायरेक्टर, कोरियोग्राफर, म्युझिक डायरेक्टर एकदम नावाजलेले.... सिनेमॅटोग्राफी उच्च.... हिरॉईन एकदम टकाटक, म्युझिक एकदम कॅची... पण आपल्याला माहिती असतं की स्टोरी बकवास आहे आणि तो पन्नाशी पुढचा लोद्या शिंग मोडून कुंवारा असण्याचं "अ‍ॅक्टिंग" २-२:३० तास करणार. पण कधीमधी एखादा नवाझुद्दीन एखाद दोन सीन असे खाऊन टाकतो की वाटतं की पैसे वसूल झाले.

अ‍ॅडलेडचं सुंदर ग्राऊंड, वर्ल्डकप उपांत्यपूर्व फेरीची उत्सुकता, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सारखे कागदावर तुल्यबळ संघ.... mouthwatering clash म्हणावा इतका परफेक्ट माहौल होता. पण कुठेतरी आत माहित होतं की हा बार फुसका निघणार. आणि झालं ही तसंच. पाकिस्तानला अवघ्या २१३ धावांत रोखल्यानंतर ऑस्ट्रेलियानी ६ गडी आणि तब्बल १६.१ षटकं राखून विजय मिळवला. सामन्याचा निकाल पाहिल्यावर अर्थातच एक एकतर्फी लढत दिसते आणि ती खरी झालीही तशीच. पण इथेही एक नवाजुद्दीन आपली करामत दाखवून गेला... अर्ध्या तासाचं फुटेज खाऊन गेला... एक अविस्मरणीय परफॉर्मन्स देऊन गेला. त्याचं नाव वहाब रियाझ.

आफ्रिदी बाद झाल्यावर ३४ व्या ओव्हरला जेव्हा वहाब बॅटिंगला आला तेव्हा पाकिस्तानच्या ६ बाद १५८ धावा झाल्या होत्या. स्टार्क आणि हेझलवुडची गोलंदाजी अर्थातच वहाबला झेपत नव्हती. फॉकनर, मिचेल जॉन्सन शिवीगाळ करत होते... मागून हॅडिनची टकळी चालू होतीच. त्यातच स्लिप्समधून शेन वॉटसन म्हणाला "Are you holding a bat?". तेव्हा त्याला कल्पना नव्हती की जेमतेम दीड तासानंतर त्याला वहाबकडून बरंच ऐकावं लागणार होतं. पाकिस्तान जेमतेम २१६ पर्यंत पोहोचू शकले.

खरंतर इथेच सामन्याचा निकाल लागलेला होता. पक्क्या व्यावसायिक आणि चिवट ऑझी फलंदाजीसाठी हे लक्ष्य फार अवघड नव्हतंच. आणि त्यांनी सुरुवातही जोरदार केली. फिन्च लवकर बाद होऊनसुद्धा वॉर्नर आणि स्मिथ ८ व्या षटकापर्यंत ४४ पर्यंत पोचले होते. कर्णधार मिसबाह उल हक साठी शेवटचा एक्का उरला होता - वहाब रियाझ!

९ व षटक टाकायला वहाब आला आणि तिसरा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर वाईड पडला... वॉर्नरने पुल करायचा प्रयत्न केला पण चेंडू बराच बाहेर होता. पुढचा चेंडू तसाच ऑफस्टंपच्या बाहेर पडला. मारायच्या मूडमध्ये असलेल्या वॉर्नरने पुन्हा बॅट फिरवली पण चेंडू फक्त थर्डमॅनला उभ्या असलेल्या राहत अली पर्यंतच गेला. वहाबने पाकिस्तानला बेहद्द जरूरी खिंडार पाडून दिलं होतं. बस... अब शेर के मुंह खून लग चुका था! पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज.. वर्ल्डकपचा करो या मरो सामना वाचवण्यासाठी गोलंदाजी करत होता.... कोपर्‍यात गाठलेल्या वाघासारखा. त्याला माहित होतं की आता लढाई आर या पार होती. पकिस्तानला सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करणं भाग होतं आणि त्यांचं एकमेव अस्त्र होतं वहाब रियाझ. वॉर्नरच्या विकेटची आयती भेट मिळाल्यावर रियाझ चवताळून उठणं साहाजिक होतं.

पुढच्याच षटकापासून रियाझने आखुड टप्प्याचा मारा सुरु केला. ऑझी कर्णधार क्लार्क पाठीच्या दुखापतीने त्रासला होता. त्याच्या ह्याच कच्च्या दुव्यावर रियाझने हल्ला केला. चौथाच चेंडू लेगस्टंपवरून जो उसळला तो क्लार्कच्या हेल्मेटच्या दिशेनेच. क्लार्कने आपलं डोकं वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण शॉर्टलेगच्या सोहेब मक्सूदकडे झेल देण्यापलिकडे तो काहीच करू शकला नाही. वहाबने दोन षटकांत आपली दुसरी शिकार केली होती.

आणि खेळायला आला शेन वॉटसन..... वहाब जणू दुपारचं स्लेजिंग डोक्यात ठेऊनच धडधडत निघाला.... पहिलाच चेंडू वॉटसनच्या नाकासमोरून सरसरत यष्टिरक्षकाच्या ग्लव्हजमध्ये जाऊन थडकला.... पुढचा बॉल १५० किमी वेगाने सणसणत गेला..... वहाब आता धगधगत होता.... तो रनअप मध्येच वॉटसन समोर गेला... आपल्या सहकार्‍यांकडे बघून टाळ्या वाजवल्या... आणि वॉटसनकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून म्हणाला.... "Hello Shane, I'm Wahab"! ज्जे बात!! अब आयेगा मजा खेल का!! आता जरा सावरून बसायला हवं... चेंडूनी आग आणि तोंडानी गरळ ओकणार्‍या वेगवान गोलंदाजासमोर कसलेला फलंदाज उभा असणं हे क्रिकेटमधलं सगळ्यात अप्रतीम दृश्य. एरवी निश्चितपणे बॅट्समन्स गेम असताना जेव्हा एक वेगवान गोलंदाज दंड थोपटून उभा राहातो तेव्हा भल्या भल्या फलंदाजांचं पाणी कळतं. स्मिथ आणि वॉटसनची आता खरी कसोटी होती.

WahabWatson

पण म्हणतात ना.... बोलर्स हन्ट इन पेअर्स. वहाबला समोरून तोलामोलाच्या साथीची गरज होती पण दुर्दैवानी वेगवान गोलंदाजांची खाण असलेल्या पकिस्तानच्या संघात त्या दर्जाचा गोलंदाज नव्हता. राहत अलीच्या पुढच्या षटकात ५ धावा काढायला स्मिथला काहीच तोशीस पडली नाही. आणि पुढे सामनाभर देखील वहाबच्या समोरच्या बाजूनी रन्स जातच राहिल्या. त्यामुळे त्याच्या आक्रमणाची धार नक्कीच जरा बोथट झाली.

आपल्या तिसर्‍या षटकासाठी वहाब पुन्हा चवताळून आला. दुसराच चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पडून वॉटसनच्या डोक्याच्या दिशेने झेपावला.... पुन्हा तिसरा... पुन्हा सहावा. आता मात्र एक हुन्नरी वेगवान बोलर एका चांगल्या फलंदाजाला कळसूत्री बाहुलीसारखा नाचवत होता. एकीकडे स्मिथसारखा दर्जेदार फलंदाज धीरोदात्तपणे टिकून होता... पण त्याच्यापेक्षा काकणभरच कमी असलेल्या वॉटसनला मात्र चांगलीच कसरत करावी लागत होती. स्मिथ वहाबची आग थंड व्हायची वाट बघत होता पण वॉटसन मात्र कोळश्यांवर चालायला लावल्यासारखा नाचत होता. १९ आणि २१ मधला फरक आता दिसत होता. वॉटसनला टाकलेल्या प्रत्येक चेंडूवर वहाब जणू आग पाखडत होता. बॉल वॉटसनच्या बरगड्यांवर आदळले... नाकासमोरून गेले... कानामागून गेले.... बॅटची कड घेऊन थर्डमॅनला गेले... पण १५ निवडणुका हरून एखादा नेता पक्षाध्यक्ष रहावा तसा वॉटसन कसाबसा टिकला होता.

Watto1 Watto2 Watto3

वहाबच्या शॉर्ट चेंडूंनी वॉटसनला पुरता जखडला होता.... नटसम्राट गणपतराव बेलवलकरासारखा "खेळावं बेशरम लाचार बॅटिंगनं की फेकून द्यावं हे विकेटचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या लज्जेच्या जाणीवेसह वहाबच्या बोलिंगच्या हातामध्ये आणि एकाच शॉटमध्ये करावा शेवट... ह्या इनिंगचा.. ह्या मॅचचा आणि ह्या वर्ल्डकपचाही" अश्या to be or not to be परिस्थीत अडकलेला. पार पार गुडघ्यावर टेकलेला... खचलेला... हरलेला... हताश.

वहाब आता आपल्या पाचव्या षटकासाठी पुन्हा जिवाच्या करारानी धावून आला. पहिल्याच चेंडूवर निकराचा हल्ला चढवत त्याने एक अप्रतीम बाउन्सर टाकला... आता मात्र वॉटसन केवळ हतबलतेने बॅट फिरवता झाला.... बॉल फाइनलेगच्या दिशेने उडाला..... तो उडाला सामना... तो उडाला वर्ल्डकप.... फाइनलेगला निवांत उभ्या असलेल्या राहत अलीच्या हातात विसा....व.....

Dropped

राहतनी सोडलेल्या त्या झेलानी वहाबच्या जणू शिडातली हवाच काढून घेतली. एखाद्या रियाझी तबला नवाजाने अप्रतीम पलटे वाजवीत एखादी लयदार बंदिश बांधावी आणि नेमकी शेवटच्या तिहाईला सम चुकावी तशी त्या सुटलेल्या झेलानी सगळ्या मैफिलीचा कचरा केला. वहाब अर्थातच भडकला... आणि मग खचला. एका खंद्या लढवय्याप्रमाणे पुन्हा आक्रमणाला सज्ज झाला. पण आता ती वेळ टळून गेली होती... वॉटसनला नशीब आपल्या बाजूनी असल्याची जाणीव झाली. बुडत्याला काडीचा आधार मिळालेला होता. आता वॉटसनने त्याच्या आत्मविश्वासावरची धूळ झटकली...पुढच्याच ओव्हरला त्याने सोहेल खानला पुलचा एक कडकडीत चौकार लगावला आणि आता निराळाच वॉटसन दिसायला लागला. काही मिनिटांपर्यंत कचरत खेळणार्‍या वॉटसनची देहबोलीच बदलली. वहाबची पुढची ओव्हर त्याने व्यवस्थित खेळून काढली. पूर्ण ताकदीने पाठोपाठ सहा षटकं टाकल्यावर वहाब थकला होताच. वहाब आणि वॉटसन - दोघांनाही कळालं होतं की द्वंद्व खरंतर संपलं आहे. वहाब आग ओकत असताना भिजलेल्या मांजरासारखा भेदरलेला वॉटसन संधी मिळताच डिवचलेल्या नागासारखा फणा काढून आला. त्याच्या साथीला आलील्या मॅक्सवेलनी देखील धडाका लावला. एका वेळी पुरता नामोहरम झालेल्या वॉटसननंच रियाझला एक षटकार आणि एक चौकार ठोकून ह्या युद्धाचा निकाल लावला.

जिंकण्यासाठी हव्या असलेल्या ११६ धावा एका स्मिथच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाने केवळ पुढच्या १५ षटकांत केल्या आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

शत्रुराष्ट्र का असेना... एका क्रिकेटवेड्या आणि अतिशय प्रतिभाशाली खेळाडूंच्या संघाची ही शोकांतिका. एरवी खरोखरंच प्रतिभावान पोरं.... दृष्ट लागावी असं टॅलेंट... काय ह्यांचे बोलर्स... काय त्यांचा स्विंग... काय त्यांचे विचित्र स्पिन्स.... लाजवाब. पण मोक्याच्या वेळी... तोळामासा स्थितीत नुसती प्रतिभा कामी येत नाही. त्याबरोबर लागतं टेंपरामेन्ट... डोकं थंड ठेवण्याची हातोटी. आणि इथेच त्या दिवशी पाकिस्ताननी कच खाल्ली. ऑस्ट्रेलियाच्या नसानसांत भिनलेली व्यावसायिकता त्यांच्या कामी आली. एखाद्या खेळाचं वा कलेचं प्रशिक्षण घेताना कौशल्य आत्मसात करण्याइतकंच... किंबहुना काकणभर जास्त महत्त्वाचं असतं ते टेंपरामेंट. अ‍ॅडलेडच्या ह्या क्रीडायुद्धानी क्रीडाप्रेमींना एका अविस्मरणीय द्वंद्वाचा आनंद दिला. आणि एक महत्त्वाची शिकवणही..... Hard work beats Talent if Talent doesn't work hard!!

मौजमजाविचारआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

8 Jan 2018 - 1:18 am | गामा पैलवान

जे.पी.मॉर्गन,

वर्णन रोमांचक आहे.

आ.न.,
-गा.पै.

फारएन्ड's picture

8 Jan 2018 - 2:18 am | फारएन्ड

भन्नाट जमला आहे लेख मॉर्गनसाहेब! सगळे द्वंद्व उभे केलेत! ते क्लिप्स चे फोटो एकदम चपखल, आणि पक्षाध्यक्षासारख्या उपमाही :)

मजा आली. अजून अशा गेम्समधल्या बॅटल्स बद्दल लिहा! आजच दुपारी गप्पांमधे कधी अचूक वेळी घेतलेल्या (१९८३ रिचर्ड्स कपिल) तर कधी मोक्याच्या वेळी सोडलेल्या (१९९९ वॉ गिब्ज) कॅचेस मुळते फिरलेल्या मॅचेस बद्दल गप्पा चालल्या होत्या. ही ही त्यात आली आता. हायलाइट्स शोधतो आता.

आनन्दा's picture

8 Jan 2018 - 11:33 am | आनन्दा

मस्त

चाणक्य's picture

9 Jan 2018 - 2:56 pm | चाणक्य

जबरा लिहिलंय.

मस्त लिहिलंय. त्या दिवशीचा वहाब कायच्या काय आवडला. बॉलर्सच क्रिकेट परत येवो.

मुक्त विहारि's picture

9 Jan 2018 - 3:31 pm | मुक्त विहारि

लेख आवडला...

आणि शेवटचे वाक्य पण....

Hard work beats Talent if Talent doesn't work hard!!

शेखरमोघे's picture

9 Jan 2018 - 10:42 pm | शेखरमोघे

सुन्दर!! वर्णन, चित्रे, हतबलता आणि आक्रमण यान्चा चढाव उतार सगळेच सुन्दर.

वहाबची गोलंदाजी जिगरबाज होती. त्याला कुणाची साथ मिळाली असती तर चित्र वेगळे असते.
लेख जबरजस्त !!

फेरफटका's picture

10 Jan 2018 - 1:03 am | फेरफटका

जे. पी. मॉर्गन, क..ह...र... लिहीलय! नाही, कहर जमलय!!! क्या बात है!!! ईतकं जिवंत वर्णन करणं ही निव्वळ कलाकारी आहे. झकास!!!

हा सामना आणि त्यातली वहाब रियाझची आग ओकणारी गोलंदाजी निव्वळ अविस्मरणीय होती. शेन वॉटसनला नक्की काय करावं हे सुचतच नव्हतं. अप्रतिम!

तुषार काळभोर's picture

10 Jan 2018 - 7:08 am | तुषार काळभोर

सुरेख लेख!
चपखल क्षणछायाचित्रांनी बहार आणली!!
आणि शेवटच्या वाक्याने चार चांद लावले!!!

Hard work beats Talent if Talent doesn't work hard!!
याचं पोश्टर बनवून लावतो घरात आणि हापिसात.

अभिजीत अवलिया's picture

10 Jan 2018 - 8:42 am | अभिजीत अवलिया

मस्त लिहीलय.

रुपी's picture

18 Jan 2018 - 5:14 am | रुपी

छन लिहिलंय.. मस्त उपमा दिल्यात एकेक :)

मृत्युन्जय's picture

19 Jan 2018 - 2:02 pm | मृत्युन्जय

भारी लिहिलाय राव लेख. या अश्या लेखांसाठीच फक्त अधुन मधुन मिपावर येणे होते. अन्यथा मिपावर उरलय काय आता? फक्त काथ्याकुटाचा उकिरडा.

ss_sameer's picture

20 Jan 2018 - 6:06 pm | ss_sameer

भन्नाट
भन्नाट लिहिलंय मित्रा...

एखादी ग्रीक शोकांतिका वाचल्यासारखी वाटली.
अशाच असतात त्या, त्यांचे नायक लढत राहतात आणि परिस्थिती त्यांना हरवत राहते.