शेजाऱ्याचा डामाडुमा- मालदीवमध्ये 'बिधेयसी' सत्ता आणि इस्लामची वाटचाल - मालदीव भाग ५

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
4 Jan 2018 - 5:45 pm

मालदीव मालिकेतील या आधीचे 4 भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील. चौथा भाग इथे आहे :-

http://www.misalpav.com/node/41679

मालदीवच्या इतिहासाची नाळ भारताप्रमाणेच श्रीलंकेशीही जोडलेली आहे. इतिहासात श्रीलंकेत घडणाऱ्या घटना, तेथील राज्यकर्ते आणि व्यापारी इत्यादींची मालदीवच्या स्थानिक बाबींमध्ये बरीच दखल असावी असे आढळते. मागील भागात सांगितल्या प्रमाणे ११९३ मध्ये मालदीवच्या धेवोमी महाराधूनने इस्लाम स्वीकारल्या नंतर मालदीवकर सुलतानांच्या अंतर्गत चढाओढी आणि त्यांच्यातल्या वेगवेगळ्या राजवंशांचे सत्तेवर येणे-जाणे सोडले तर मालदीवमध्ये स्थानिक लोकांचे शासन पुढची काही शतके विनाअडथळा सुरु राहिले.

वास्को-द-गामा ने भारतीय भूमीवर पाऊल ठेवले ते १४९८ साली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून (किंवा गलबतावर गलबत ठेवून म्हणू हवे तर) पोर्तुगीझ व्यापारी मोठ्या प्रमाणात हिंद महासागरात समुद्रवाऱ्या करू लागले. पुढे त्यात फ्रेंच, डच आणि इंग्रज व्यापाऱ्यांचीही भर पडली. इथल्या सुबत्तेच्या कहाण्या ते स्वतःच्या मायदेशी कळवीत होते. त्यामुळे आशियात आणि मुख्यतः भारतीय उपखंडात साम्र्याज्यविस्तार करण्याचे डोहाळे ह्या सर्व परकीय सत्ताधीशांना लागले. ह्यात पोर्तुगीझ सत्ता जास्त आक्रमक होती. त्याचा परिपाक म्हणून पंधराव्या शतकाच्या आरंभी पोर्तुगीझ सैन्याने सिलोन (श्रीलंका) आणि भारतातले गोवा ताब्यात घेतले. मालदीव बेटे त्यांच्या नेहमीच्या व्यापारी मार्गावर होती. त्यामुळे तत्कालीन सिलोनमध्ये पोर्तुगीझ सत्ता प्रबळ होताच मालदीव त्यांच्या ताब्यात यायला फार वेळ लागला नाही. १५५८ ते १५७३ अशी १५ वर्षे मालदीव पोर्तुगीझ अंमलाखाली होते. पण गोव्यातून पाठवण्यात आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी गोव्याप्रमाणेच मालदीवमध्ये बळजबरीने धर्मपरिवर्तनचा सपाटा लावला. त्यांच्या एका अल्पवयीन सुलतानाला, हसनला, ख्रिस्ती केले. हे स्थानिक लोकांना पसंत पडले नाही आणि लवकरच सुलतान मोहम्मद अझीमच्या नेतृत्वाखाली जनतेने हिंसक प्रतिकार करून व्यापारी आणि धर्मगुरुंसकट सर्व पोर्तुगीझ लोकांना मालदीवमधून पिटाळून लावले, पोर्तुगिझांचे शासन उलथून टाकले. मालदीवमध्ये आजही हा दिवस विजयोत्सवाच्या रूपाने 'गौमी धुवस'' म्हणजे राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा होतो - आणि ह्या घटनेची आठवण म्हणून विजयी सुलतान महोम्मद 'गाझी' यांच्या महालाला एक स्मारक / संग्रहालय म्हणून जतन केले आहे.

(आणि हो, ख्रिस्ती झालेल्या मालदीवच्या सुलतानाला आणि पुढे त्याच्या वंशजांना गोव्यातील पोर्तुगीझ व्हॉइसरॉयने इनामे वगैरे देऊन गोव्यातच ठेवून घेतले.)

पुढे अनेक वर्षे मालदीवच्या सुलतानांनी स्वशासन अनुभवल्यानंतर भारतीय उपखंडातील बहुतेक भूभागाप्रमाणे मालदीव ब्रिटिशांच्या अंमलाखाली आले ते १८८७ साली. तोवर भारतात १८५७ च्या उठावाला २० वर्षे झाली होती आणि ब्रिटिश सत्ता भारतात स्थिरावली होती. भारतीय उपखंडात त्यावेळच्या ब्रिटिश अमलाखालील एकूण भूमीवर नजर टाकली तर ह्या टिकलीएवढ्या देशाकडे खरे तर त्यांचे लक्षही जायला नको. पण ब्रिटिशांना मालदीवच्या बेटांचे व्यापारी आणि भू-राजकीय महत्व आधीपासून माहित होते. म्हणून त्यांनी स्थानीय राजकारणात लक्ष घालायला सुरवात केली आणि हळूहळू मालदीवच्या सुलतानाच्या दरबारात स्वतःचे स्थान बळकट केले. ह्या दूरदृष्टीचा मोठा फायदा ब्रिटिशांना पुढे दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी झाला. कराची, सिंगापूर आणि भारतातील भूमीवरून उडणाऱ्या विमानांच्या आणि हिंदमहासागरातील जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गान बेटावरील तळाची मदत झाली.


गान बेटावरचा ब्रिटिश तळ


हिंदू सैनिकांवर मानाने अग्निसंस्कार आणि अन्य सैनिकांना दफन केल्याचा तपशील - इंग्रजी, हिंदी आणि धिवेही भाषेत - महायुद्धाचे स्मारक, अड्डू अटॉल, मालदीव.

हिंद महासागरातील हा सामरिक महत्वाचा लष्करी तळ मालदीवच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील अनेक वर्षे ब्रिटिश ताब्यातच होता. पुढे ब्रिटिशांनी हा तळ मालदीवला सोपवल्यानंतर यावर अनेक देशांचा डोळा होता. अफगाणिस्तानात क्रांती होउन रशियन सैन्य तेथे स्थिरावले तेंव्हा रशियन सत्तेने (तत्कालीन USSR) हा तळ आम्हाला वापरायला किंवा विकत द्याल का अशी विचारणा मालदीवला केली. सुदैवाने तसे काही घडले नाही आणि मालदीव तत्कालीन जागतिक कोल्ड-वॉरमधला प्यादा होण्यापासून बचावले.

मालदीवच्या सुलतानाला मांडलिक करून ब्रिटिशांनी हिंदमहासागरातून जाणान्या महत्वाच्या सागरी मार्गांवरचा आणि व्यापारावरचा स्वतःचा वचक कायम ठेवला तो थेट १९६५ साली मालदीव पूर्ण स्वतंत्र होईपर्यंत.


स्वतंत्र मालदीवचा राष्ट्रध्वज

२६ जुलै १९६५ रोजी ७७ वर्षांच्या प्रदीर्घ ब्रिटिश मांडलिकत्वातून मालदीव स्वतंत्र झाले. त्याआधीच सुलतानांची सद्दी संपत आली होती, नव्या नेत्यांच्या उदय झाला होता. स्वतंत्र मालदीवमध्ये सुलतानी राजवट संपवून आधी संसदीय पद्धतीचे आणि दोनच वर्षात अध्यक्षीय पद्धतीचे स्थानिक सरकार कायम करण्यात आले. इब्राहिम नासिर १९६८ ते १९७८ अशी दहा वर्षे स्वतंत्र मालदीव सरकारच्या प्रमुखपदी होते. ते सत्तेवर आल्या-आल्याच स्वीकारण्यात आलेल्या देशाच्या नवीन राज्यघटनेत मालदीव हे 'इस्लामिक राष्ट्र' घोषित करण्यात आले. पण अर्वाचीन मालदीवच्या एकूणच जडणघडणीत सर्वात मोठे योगदान जर कोणा नेत्याचे असेल तर ते ११ नोव्हेंबर १९७८ ला राष्ट्रपती पदावर आरूढ झालेल्या मौमून अब्दुल गय्यूम यांचे.


स्वतंत्र मालदीवचे तिसरे राष्ट्रपती मौमून अब्दुल गय्यूम

गय्यूम यांनी १९७८ ते २००८ अशी ३० वर्षे मालदीववर अनभिषिक्त सम्राटासारखे एकछत्री राज्य केले. तीन दशके हा काही थोडा थोडका कालावधी नाही. मोकळ्याढाकळ्या ‘जाहिलिया’ मालदीवची 'इस्लामिक रिपब्लिक' ही ओळख ठाशीव होण्यामागे गय्यूम यांचे मोठे योगदान आहे.

भारताच्या आगेमागे स्वतंत्र झालेल्या एशियातील जवळपास सर्व देशांचे प्रमुख राष्ट्रनेते ब्रिटनमध्ये किंवा ब्रिटिश पद्धतीचे शिक्षण घेतलेले आहेत. मालदीवमध्येही अशीच परिस्थिती होती. गय्युम यांचे तसे नव्हते, त्यांचे वेगळेपण म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षांपासून ते ३१ वर्षांपर्यंतचा व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा काळ त्यांनी इजिप्तमध्ये घालवला. तिथल्या धार्मिक विचारांचा आणि इस्लामिक शिक्षणाचा त्यांच्या विचारसरणीवर बराच प्रभाव पडला असावा. कैरोच्या अल-अझहर विद्यापीठातून पदवी घेऊन ते मालेला परतले तेंव्हा राजकारणात पडून पुढच्या ७-८ वर्षात ते राष्ट्राध्यक्ष होतील असॆ कोणालाच वाटले नव्हते. १९७८ मध्ये राष्ट्राध्यक्षपदी आरूढ झाल्यानंतर पुढची सलग तीस वर्षे मालदीवच्या आर्थिक - राजकीय - सामाजिक जडणघडणीबरोबरच इस्लाम विषयक ओळखीचे निर्माण, संचालन आणि नियमन गय्यूम यांनीच केले असे म्हणता येते.

त्याच्या कारकिर्दीच्या सुरवातीला मालदीवमध्ये धार्मिक वातावरण मोकळेढाकळेच होते. स्त्रियांना बुरखा सक्ती वगैरे तर नव्हतीच, उलट बॅडमिंटन, टेनिस आणि पोहण्याच्या शर्यतीत स्त्रिया हिरीरीने भाग घेत इतपत पुढारलेले वातावरण होते.


राष्ट्रपती गय्यूम यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित स्त्री समुदाय - वर्ष १९७९ - खुद्द राष्ट्राध्यक्ष भेटीला आले असतांनासुद्धा एकाही स्त्रीच्या शरीरावर बुरखा तर सोडाच डोक्यावर चादर / स्कार्फ सुद्धा नाही.

भारतीय उपखंडात पाश्चात्य जगाच्या ‘आधुनिक’ 'नव्या’ आणि पुढारलेपणाच्या कल्पना बव्हंशी राज्यकर्त्या ब्रिटिशांच्या प्रभावाने आल्या. भारतात सतीप्रथा-जातिप्रथा निर्मूलन, स्त्रियांना शिक्षण अश्या बऱ्याच सामाजिक सुधारणांमध्ये राज्यकर्त्यांचा आणि स्थानिकांनी इंग्रजी भाषेत घेतलेल्या उच्चशिक्षणाचा मोठा वाटा होता हे नाकारण्यासारखे नाही. असे काही आधुनिक बदलांचे वारे मालदीवला मात्र पोचले नाही. त्याऐवजी सत्तरीच्या दशकात मालदीवमध्ये पाश्चात्य संस्कृतीचे वेगळे रूप बघायला मिळाले ते ब्रिटिश-युरोपीय उन्मुक्त पर्यटकांमुळे. १९७२ मध्ये आस्ते कदम सुरवात झाल्यानंतर मालदीवच्या बेटांवर विदेशी पर्यटकांचा ओघ सुरु झाला. मालदीवच्या निसर्ग सौंदर्यामुळे गोव्याप्रमाणेच तेथे जिप्सी - फ्लॉवर पॉवर ब्रिगेडची ये-जा वाढली. त्या पर्यटकांसोबत त्यांची स्वच्छंदी संस्कृती आली. मालदीव हा काही श्रीमंत देश नव्हता, निसर्गसौंदर्य सोडले तर धनप्राप्ती करता येईल असे काहीच त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे पर्यटकांचा पैसा सगळ्यांनाच हवाहवासा होता. पर्यटकांच्या उघड स्वैर वागण्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले, उलट अधिक पर्यटक कसे येतील याकडे लक्ष दिले. ह्याचा एक परिणाम म्हणजे स्थानिक लोकांपैकी काही कट्टर मंडळींना हे सगळे कसे गैर-इस्लामिक आहे आणि शासन कसे संस्कृती आणि इस्लाम बुडवायला निघाले आहे असा प्रचार करायची नामी संधी मिळाली.

इस्लामच्या तथाकथित बुडण्याच्या प्रचाराला उतारा म्हणून अरब देशांकडून भेट मिळालेल्या पैश्यातून मालदीवमधील जुन्या मशिदींचा जीर्णोद्धार आणि मालेमध्ये नवीन भव्य मशिदी, इस्लामिक अभ्यासकेंद्र इत्यादींची निर्मिती करण्यात आली. इस्लामिक धर्मशिक्षणासाठी स्थानिक तरुणांना सौदी आणि पाकिस्तानस्थित इस्लामिक धर्मपीठांनी उदारहस्ते शिष्यवृत्ती द्यायला सुरवात केली. इस्लामिक प्रचार-शिक्षणासाठी मिळालेल्या अश्या मदतीमुळे पुढे मालदीवमधे इस्लामच्या अरबस्तानातल्या सलाफी-वहाबी विचारांसाठी पूरक मनोभूमी तयार होण्यास मदत झाली.

स्थानीय जनतेचा ह्या पर्यटकांशी फार संबंध येऊन 'संस्कृती' बुडू नये म्हणून वस्ती असलेल्या बेटांवर विदेशी पर्यटक जाणार नाहीत ह्याकडे शासनाने लक्ष घातले. (स्वगत- सर्वत्र समुद्र असलेल्या ह्या देशातही 'संस्कृती'ला पोहायला शिकवणे अवघडच का असावे?) एव्हाना पर्यटकांसाठी वेगवेगळ्या बेटांवर बरेच रिसॉर्ट्स सुरु झाले होते. विदेशी पर्यटक आणि स्थानिकांसाठी वेगवेगळे कायदे आणि आचारसंहिता अमलात आली. स्थानिकांचा विदेशी लोकांशी कमीत कमी संपर्क यावा असे नियम करण्यात आले. विदेशी पर्यटक शक्यतो चार्टर्ड विमानांनी येऊन थेट रिसॉर्टला जातील अशी व्यवस्था करण्यात आली.

मालदीवच्या भूमीवर इस्लामिक कट्टरतेचे वारे जोमदार झाले १९९० च्या दशकापासून. तोवर पर्यटन आणि मत्स्य-निर्यातीच्या व्यवसायातून सरकार आणि जनतेकडे समृद्धीचा ओघ सुरु झाला होता. गय्युम ह्यांची एकाधिकारशाही मालदीवमध्ये स्थिरावली होती, म्हणजे म्हणायला ते लोकशाही मार्गाने निवडलेले नेते होते पण अनेक वर्षे राष्ट्रपतीपदाच्या प्रत्येक निवडणुकीत ते एकमेव उमेदवार असत. त्यामुळे जनतेकडे त्यांना मत द्यायचे किंवा द्यायचे नाही असे दोन पर्याय (!) उपलब्ध होते. त्यांनी सर्व राजकीय विरोधकांना थोपवून धरले होते आणि मालदीववर त्यांचा एकछत्री अंमल होता. पुसटसा पण राजकीय विरोध त्यांना मंजूर नव्हता. १९८० ते १९९० च्या दरम्यान त्यांच्या विरोधकांनी त्यांचे सरकार उलथून टाकण्याचे २-३ प्रयत्न केले, पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. खरेतर गय्युम यांनी स्वतःला राजकीय आव्हान देऊ शकेल असा कोणी नेता निर्माण होणार नाही याकडे पूर्ण लक्ष दिले होते.

एकाचवेळी स्वैर-उन्मुक्त पर्यटकांना पूर्ण सूट एकीकडे तर दुसरीकडे स्थानिक जनतेवर अरब पद्धतीच्या इस्लामिक विचारांचा मारा असे दोन ठळक वेगळे प्रवाह मालदीवमध्ये तयार झाले होते. स्त्रियांनी अंगभर काळा बुरखा घालावा आणि पुरुषांनी पाच वेळा नमाज पढण्यासाठी जावे याकरता काही धर्मगुरूंचा प्रचार जोरात सुरु झाला.

राष्ट्रपती अब्दुल गय्यूम सुरवातीला कट्टर इस्लामिक मताचे विरोधक होते. धार्मिक कट्टरतेच्या आव्हानाचा परामर्श घेत त्यांनी कट्टरतेचा प्रचार करणाऱ्या काही मौलवींना अटक करून तुरुंगात खितपत तर ठेवलेच, वर महिलांवर बुरखा/डोके ‘न’ झाकण्याची सक्ती करणारे आदेश काढले होते. कट्टरवाद्यांनी आणि मौलवींनी आदळआपट केली तरी गय्यूम सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांना जाब विचारणारे असे कोणीच नव्हते.

पुढे १९९७ मध्ये गय्यूम यांनी एक घटनादुरुस्ती करून सर्व इस्लामिक विषयांची अंतिम व्याख्या करण्याचे सर्वोच्च अधिकार राष्टपतींकडे - पर्यायाने स्वतः कडे घेतले. ह्या कृतीतून त्यांना स्वतःचे आधीच मजबूत असलेले राजकीय स्थान अधिक बळकट करायचे होते हे उघड आहे. या कृतीला सौदी-पाकिस्तानातून धर्मशिक्षण घेऊन आलेल्या कट्टरपंथी मौलवींनी कडाडून विरोध केला. त्याला गय्युमविरोधकांची साथ मिळाली आणि 'अदालत पार्टी' ह्या जहालमतवादी पक्षाचा जन्म झाला. तेंव्हापासून आजवर ह्या पक्षाच्या विचारधारेने मालदीवच्या राजकीय-सामाजिक जीवनात इस्लामिक कट्टरतावाद पसरवण्याची एकही संधी वाया घालवलेली नाही. मालदीवला 'जाहिलिया' गैर इस्लामिक जीवनपद्धतीतून पूर्णपणे मुक्त करून 'खऱ्या' इस्लामची स्थापना करणे हे अनेकांचे जीवनध्येय बनले.

पुढे २००४ मध्ये आलेल्या सुनामीने मालदीवच्या बेटांचे भरपूर नुकसान तर केलेच, आणिक मालदीवच्या समाजविश्वात एक दुसरी सुनामी आणली. देशात झालेल्या प्रचंड नुकसानीत मदत करायला म्हणून सौदी आणि अन्य देशांचे जे अनेक 'समाजसेवक' मालदीवमध्ये प्रवेश करते झाले त्यांनी मालदीवच्या समाजाची वीण उसवण्याचे काम केले. भोळ्या देशवासीयांच्या मनावर ही सुनामी अल्लाहच्या कोपामुळे आली आहे आणि त्याचे कारण इस्लामच्या मूळ शिकवणीपासून मालदीवच्या लोकांनी घेतलेली फारकत हेच आहे असे बिंबवण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. ह्या धार्मिक ध्रुवीकरणामुळे सर्वच राजकीय नेते - पुढारी - धर्मगुरुंमध्ये आपणच कसे ‘खऱ्या’ इस्लामचे पाईक आणि तारणहार आहोत हे दर्शविण्याची चढाओढ सुरु झाली. ती दिवसेंदिवस वाढतच आहे.

सद्यस्थितीत मालदीवसमोर राजकीय अस्थिरता आणि कट्टरतावाद्यांचे वाढते प्रस्थ असे दुहेरी आव्हान आहे. नियतीचे फासे असे की अदालत पार्टीने आयुष्यभर ज्यांचा विरोध केला त्या गय्युम यांचे सावत्र भाऊ अब्दुल्ला यामीन आज मालदीवचे राष्ट्रपती आहेत आणि अदालत पार्टी त्यांच्यासोबत मालदीवच्या सरकारात सामील आहे.

आज मानवी वस्ती असलेल्या प्रत्येक बेटावर मिस्की म्हणजे मशीद आहे. एकट्या माले शहरात नव्या जुन्या मिळून ३० मशिदी आहेत. महिलांसाठी वेगळ्या मशिदी आहेत.


विलूफुशी ग्रँड मिस्की - विलूफुशी बेटावरील मालदीवमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मशीद.

मालदीवमध्ये असलेल्या एकूण ७२४ मशिदींपैकी २६६ महिलांसाठी आहेत, त्यातही बऱ्यापैकी उपस्थिती असते.

धर्माचरणात सामान्य जनतेची रुची (!) वाढत आहे. इतकी की काहींनी आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये न पाठवता घरीच इस्लामिक शिक्षण देण्याचा घाट घातला आहे. मालेच्या रस्त्यांवर साधारण १० टक्के स्त्रिया पूर्ण बुरखा तर बहुसंख्य स्त्रिया चादर/स्कार्फ घातलेल्या दिसू लागल्या आहेत. हज यात्रेला उत्सुक लोकांची संख्या एकाएकी वाढली आहे.

मालदीवच्या धार्मिक कट्टरतेकडे सुरु झालेला प्रवास हा त्या देशात आणि भारतासारख्या आजूबाजूच्या देशात अस्थिरता निर्माण करणार हे दिसू लागले आहे.

सर्व नकाशे आणि बहुतेक चित्रे जालावरून साभार.

* * *
थोडे अवांतर :-

मालदीवमध्ये समुद्राखाली तसेच जमिनीवर जैव-वैविध्याची अगदी आगळी-वेगळी रूपे बघायला मिळतात. जलचर-भूचर प्राणी, पक्षी, झाडेझुडपे वेगळी आहेत, काही तर सुदूर आफ्रिकेच्या किनाऱ्यांशी साधर्म्य दाखवणारी. वटवाघुळे भरपूर आहेत, मांजरी आणि उंदीर आहेत पण माकडे नाहीत. कुत्री नाहीत - जंगली, भटकी, पाळीव -कुठलीच कुत्री नाहीत. वृक्षराजींची वेगळी रेंज आहे, भारत किंवा श्रीलंकेपेक्षा वेगळी झाडे - फुले - झुडपे. ह्यात निसर्गतः उगवलेले काटेरी निवडुंग / 'कॅक्टस' कुठेच दिसत नाही. पण भारत-मालदीव सुदीर्घ संबंधातील एका महत्वाच्या वळणावर एका 'कॅक्टस'नी एक अनोखी भूमिका पार पाडली आहे. त्याबद्दल पुढे.

क्रमश:

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

4 Jan 2018 - 5:47 pm | अनिंद्य

@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,

हा भाग कृपया अनुक्रमणिकेला जोडावा.

अग्रिम आभार !

अनिंद्य

तेजस आठवले's picture

4 Jan 2018 - 6:33 pm | तेजस आठवले

फोटो काय अप्रतिम आहेत. निळ्या पाण्यातल्या ती होडी, ते रिसॉर्ट आणि पांढऱ्या वाळूतली निल मशीद काय सुरेख आहे.
कट्टरतेकडे होणार प्रवास हा खरंच चिंताजनक विषय आहे.

रुपी's picture

5 Jan 2018 - 5:20 am | रुपी

+१

अनन्त अवधुत's picture

7 Jan 2018 - 7:09 am | अनन्त अवधुत

.

तेजस आठवले's picture

4 Jan 2018 - 7:26 pm | तेजस आठवले

डामाडुमा म्हणजे धांडोळा असा काहीसा अर्थ अभिप्रेत आहे का ?

अनिंद्य's picture

8 Jan 2018 - 11:06 am | अनिंद्य

@ तेजस आठवले,

'डामाडुमा' शब्दाचा काटेकोर अर्थ धांडोळा नाही पण लेखमालिका त्याच अर्थाच्या दिशेने जात आहे.

अमितदादा's picture

4 Jan 2018 - 8:35 pm | अमितदादा

उत्तम लेख..फोटो अप्रतिम आहेत

१९८० ते १९९० च्या दरम्यान त्यांच्या विरोधकांनी त्यांचे सरकार उलथून टाकण्याचे २-३ प्रयत्न केले, पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.

यावरून एक आठवलं 1988 साली गयूम यांच्या एका विरोधकाने श्रीलंके मधील लिट्टे च्या अतिरेक्यांची मदत घेऊन सत्ता उलटवण्याचा सशस्त्र प्रयत्न केला. त्यावेळी गयूम यांनी राजीव गांधी कडे मदत मागितली आणि भारतीय लष्कराने वेगाने कारवाई करत operation cactus राबवून मालदीव आणि पर्यायाने गयूम सरकार च सरंक्षण केलं. भारत मालदीव संबंधातील हे मनाचं पान आहे.

अनिंद्य's picture

8 Jan 2018 - 11:15 am | अनिंद्य

@ अमितदादा,

पेपर फोडल्याबद्दल जाहीर निषेध :-) :-)

'थोडे अवांतर'मध्ये मी ऑपरेशन कॅक्टस बद्दल हिंट दिली होती.

आभार,

अनिंद्य

पेपरचा काही भाग फोडल्याबद्दल क्षमा असावी.

भारत किंवा श्रीलंकेपेक्षा वेगळी झाडे - फुले - झुडपे. ह्यात निसर्गतः उगवलेले काटेरी निवडुंग / 'कॅक्टस' कुठेच दिसत नाही. पण भारत-मालदीव सुदीर्घ संबंधातील एका महत्वाच्या वळणावर एका 'कॅक्टस'नी एक अनोखी भूमिका पार पाडली आहे. त्याबद्दल पुढे.

तुमची अलंकारिक भाषा लक्ष्यात नाही आली. तरीही तुम्ही याबद्दल लिहाल अशी थोडी आशा असल्याने मी प्रतिसाद जास्त लांबवला नाही किंवा कोणती लिंक दिली नाही. तुमच्या भाषेत वाचण्याची आणि समजावून घेण्याची मजा काही औरच.

अनिंद्य's picture

8 Jan 2018 - 3:00 pm | अनिंद्य

गमतीत लिहिले हो :-)

एस's picture

4 Jan 2018 - 10:42 pm | एस

लेख व छायाचित्रे नेहमीप्रमाणेच अप्रतिम. शेजारच्या देशांमध्ये वाढणारी कट्टर इस्लामी वहाबी विचारसरणी ही भारताच्या आणि जगाच्याही डोकेदुखीस कारणीभूत ठरणार आहे.

अनिंद्य's picture

8 Jan 2018 - 11:18 am | अनिंद्य

@ एस,
सहमत आहे,
आभार !

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2018 - 11:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण ! फोटोही अप्रतिम ! पहिला फोटो भयंकर आवडला !

पुभाप्र.

अनिंद्य's picture

9 Jan 2018 - 12:57 pm | अनिंद्य

@ डॉ सुहास म्हात्रे,

आभार !

आता असे फोटो घेणे कठीण आहे, पर्यटकांची प्रायव्हसी जपण्यासाठी ड्रोन कॅमेरा फोटोग्राफीवर बंदी टाकण्यात आली आहे.

आनन्दा's picture

5 Jan 2018 - 3:38 pm | आनन्दा

माहितीपूर्ण लेख.

लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण व सुंदर फोटोज. अमितदादानी वरती उल्लेख केलेल्या घटनेबद्द्ल अधीक वाचण्यास उत्सुक.
पुभाप्र.

अनिंद्य's picture

8 Jan 2018 - 11:22 am | अनिंद्य

@ रांचो,

प्रतिसादाबद्दल आभार,

ऑपरेशन कॅक्टस हे सर्व भारतीयांना अभिमान वाटावे असेच प्रकरण आहे, पुढे थोडक्यात लिहीन त्याबद्दल.

-अनिंद्य

पैसा's picture

6 Jan 2018 - 10:29 pm | पैसा

धार्मिक कट्टरता वाढणे भयावह आहे. आता फोटोत स्वर्गासारखे सुंदर मालदीव कुठे जाऊन पोचणार आहे त्या अल्लालाच माहीत!

अनिंद्य's picture

8 Jan 2018 - 11:32 am | अनिंद्य

@ पैसा,

समाधानाची बाब म्हणजे जागतिक पर्यटकांच्या संख्येवर त्याचा परिणाम नाही. उलट पर्यटक वाढत आहेत. त्यामुळे समतोल साधला जाईल अशी आशा आहे.

आभार !

- अनिंद्य

अनिंद्य's picture

8 Jan 2018 - 11:01 am | अनिंद्य

@ तेजस आठवले
@ रुपी
@ अनन्त अवधुत

प्रतिसादाबद्दल आभार ! मालदीवचे निसर्गसौंदर्य वादातीत आहे :-)

अनिंद्य - काय सुरेख फोटो आणि कमाल सुरेख वर्णन.

धन्यवाद !

अनिंद्य - काय सुरेख फोटो आणि कमाल सुरेख वर्णन.

धन्यवाद !

अनिंद्य's picture

9 Jan 2018 - 1:01 pm | अनिंद्य

@ आनन्दा,
@ बांवरे,

आभार !

अनिंद्य's picture

17 Jan 2018 - 6:16 pm | अनिंद्य

@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,

आजच मालिकेतील पुढील भाग प्रकाशित केला आहे, कृपया अनुक्रमणिकेला जोडावा.

अग्रिम आभार !

अनिंद्य

या भागातील काही फोटो आता दिसत नाहीत. काय कारण असावे ?
संपादक / साहित्यसंपादक मदत करतील का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2018 - 10:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

न दिसणार्‍या फोटोंच्या जागी "This photo is no longer available" असा संदेश दिसत आहे.

(अ) फोटो मुळ ठिकाणाहून दुसरीकडे हलवले गेले असावेत, अथवा
(आ) फोटोंचा पब्लिक अ‍ॅक्सेस काढून घेतला गेला असावा.

अनिंद्य's picture

17 Feb 2018 - 10:15 pm | अनिंद्य

आभार.
ते फोटो पुन्हा दिसतील असे करण्यासाठी काय करावे लागेल ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2018 - 10:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्यनि पहा.

आता सर्व फोटो पुन्हा दिसताहेत.
झटपट दुरुस्ती केल्याबद्दल आभार _/\_