पुणे ते लेह (भाग ७ - सोनमर्ग ते झोजिला वॉर मेमोरियल (गुमरी))

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
4 Jan 2018 - 9:41 am

३१ ऑगस्ट

भल्या सकाळी कडाक्याच्या थंडीत सोनमर्गच्या एकमेव रस्त्यावर फिरून आलो. भारतीय सैन्याने बांधलेले एक सर्व धर्म प्रार्थनास्थळ आहे इथे. भगवान शंकराचे मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा एकत्र आहेत. एका सैनिकाने तिघांचीही पूजा करून प्रसाद दिला.

सोनमर्ग मधील सर्व धर्म मंदिर

पुढील प्रवासास निघण्यापूर्वी सोनमर्गजवळ असलेल्या थाजीवास ग्लेशीयरला जायचे ठरवले. थाजीवासला जाताना अगोदर चुकून सोनमर्ग मधल्या आर्मीच्या कॅम्प मधेच शिरलो. तिथून मागे फिरून थोडे श्रीनगरच्या दिशेने आल्यावर थाजीवासचा रस्ता दिसला. ग्लेशीयरकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ट्रेनर सैनिकांकडून व्यायाम करून घेत होते. थाजीवास मधे प्रवेश करण्यापूर्वी एका ठिकाणी प्रवेश फी (७०/- रु.) द्यावी लागते. ग्लेशीयरजवळ जायला एका पॉईंट पर्यंत अतिशय उत्तम रस्ता आहे. तिथून पुढे चालत किंवा घोडे घेऊन जावे लागते.

ग्लेशीयरकडे जाणारा रस्ता

त्या पॉईंटला पोचल्यावर दोन घोडेवाले आले. १२००/- रु. मध्ये २ घोडे घेऊन ग्लेशीयरकडे निघालो. खूपच उत्साही गडी होता घोडेवाला. कॅमेरा घेतल्यापासूनच्या ५ वर्षात मी स्वत:चे ५ फोटो पण काढून घेतले नसतील. पण ह्याने लगेच माझ्या कॅमेऱ्याचा ताबा घेतला आणि आमचे ५० एक फोटो सहज काढले असतील. एक दोनदा शाहरुख सारख्या विचित्र पोज पण द्यायला लावल्या. अतिशय हास्यास्पद प्रकार.

'दिन में कितनी बार आते है आप यहां?' - मी विचारले.

'पहले दिन में २ सवारी भी मिल जाती थी. अब मुश्किल से २ दिन में एक सवारी मिलती है. नंबर रहता है. और पिछले २ साल से टुरिस्ट ही नहीं है. बहुत बुरा हाल है.' - घोडेवाला

'जब टुरिझम का मौसम खतम हो जाता है तब आप क्या करते है?'

'कुछ नहीं करते. दुसरा कुछ हमें आता नहीं है. आप लोग आईए इधर. टुरिस्ट को यहां गलतीसे भी कोई कुछ नहीं करेगा. आप लोग आयेंगे तो ही हमारा पेट भरेगा.' - घोडेवाला

५-६ महिन्याच्या पर्यटन हंगामात पैसे कमवून त्यावर वर्षभर गुजराण करणे म्हणजे तशी फार कठीण गोष्ट आहे.

अंदाजे ३ किमीची पायवाट असावी. ती संपवून ग्लेशियरजवळ पोचलो. एका ठिकाणी घोडे पार्क करून शेवटचे १०० मी. चढून जावे लागले. अगदी नगण्य बर्फ उरलेला होता. डोंगर पोखरून उंदीर काढल्या सारखी गत झाली. पण हरकत नाही. जरी बर्फ नसले तरी ग्लेशियर पर्यंतचा प्रवास मात्र खूपच निसर्गरम्य होता. बर्फ वितळून तयार झालेली स्वच्छ पाण्याची नदी, लांबवर दिसणारे बर्फ़ाच्छादित डोंगर, सगळीकडे उगवलेले खुरटे हिरवे गवत आणि दगडी पायवाट. फारच सुंदर. ह्या ग्लेशीयरच्या मागे अजून एक ऊंच बर्फाच्छादित शिखर होते. पण तिथे जायला एक दिवस ट्रेकिंग करून जावे लागते असे समजले. हिमालयात इतके ट्रेकिंग करण्याची शारीरिक क्षमता नसल्याने तिथे जाण्याचा प्रश्नच न्हवता. थोडा वेळ थांबून परत निघालो. परतीच्या प्रवासात एका घोड्याला आराम दिला आणि मी चालतच निघालो. हलकासा पाऊस सुरु झाला. काल खरेदी केलेली छत्री न विसरता गाडीत विसरून आलो होतो. त्यामुळे एखादा फोटो काढायचा, लगेच कॅमेरा पुसून जॅकेटच्या आत धरायचा अशी कसरत करत गाडीपर्यंत आलो.

ग्लेशीयरचे काही फोटो

११ वाजता झोजिला कडे निघालो.

झोजिला कडे जाताना

श्रीनगर लेह महामार्ग

ह्याची देखभाल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन करते. दर वर्षी हिवाळ्यात हे रस्ते प्रचंड बर्फाखाली दबून खराब होतात. मे च्या शेवटी बर्फ क्लिअर करून त्यांची दुरुस्ती केली जाते. आणि पुन्हा इतके टापटीप बनवले जातात.

थांबत थांबत निसर्ग सौंदर्य पाहत झोजिला पासच्या सुरवातीस आलो.

सुरवातीचा चांगला पॅच

सुरवातीचा थोडा चांगला पॅच संपला आणि नंतर झोजीलाने आपले खरे रूप दाखवायला सुरवात केली. जवळपास ११५७८ फूट उंचीवर असणाऱ्या झोजिलाचा रस्ता सतत कोसळणाऱ्या दरडींमुळे कधीच चांगला नसतो, त्याचे खड्डे गाडीसाठी जीवघेणे आहेत हे वाचून माहीत होते. पण 'खड्ड्यांची काय आपल्याला सवय नाही. असे असून असून किती भयानक खड्डे असणार आहेत? सहज जाऊ आपण' असा विचार मी आतापर्यंत करत होतो. पण हे प्रकरण तितकेसे सोपे नाही हे लगेच लक्षात आले. जेमतेम एक लेनचा रस्ता, मोठ्या गाड्यांच्या जाण्याने तयार झालेले फुटा दोन फुटाचे खड्डे आणि मधेच चिखलाचे, दगडाचे डोंगर. कमी ग्राउंड क्लिअरन्सच्या गाड्यांसाठी कर्दनकाळ ठरणारी परिस्थिती. काळजीपूर्वक अंदाज घेऊन पुढे पुढे जात असता एका मोठ्या खड्ड्यात डावीकडचे पुढचे चाक फसले. पावसाने इतका चिखल झाला होता की कितीही अक्सिलेटर दिला तरी चाक केवळ जागच्या जागी फिरू लागले. जवळपास २ मिनिटे प्रयत्न करूनही गाडी बाहेर निघेना. आणि मागून मिलिटरीचा कॉन्व्हॉय आला. एक लेनचा रस्ता असल्याने त्यांना पुढे जाता येणार न्हवतेच. एक निर्वाणीचा प्रयत्न करून गाडी खड्ड्यातून बाहेर काढली. थोडे पुढे जाऊन एका ठिकाणी साईड द्यायला थोडी जागा होती तिथे थांबलो आणि मिलिटरी वाल्याना पुढे जायला सांगितले. जवळपास ३० ट्रक होते. त्यांना जायला १५ मिनिटे लागली. तोपर्यंत मी एका जागी थांबूनच होतो. शेवटच्या ट्रक मध्ये एक झुपकेदार मिशीवाला माणूस होता. त्याने हाताने इशारा करून मागून या असे सांगितले. पुढे निघालो. थोडे पुढे गेलो असू तोच वरून खाली चालत येणाऱ्या एका सैनिकाने थांबवले.

'काय साहेब कुठनं आलाय?' - सैनिक

'पुण्याहून. तुम्ही कुठचे ?' - मी विचारले.

'निपाणी....
या रस्त्यानं नका जाऊ. इकडून फक्त मिलिटरीचे ट्रक जातात. कारवाले, बाइकवाले इकडून जात नाहीत. परत मागं जा. डावीकडे एक रस्ता दिसलं. त्या रस्त्यानं झोजिला चढा. तो रस्ता ह्याच्यापेक्षा जरा बरा हाय.'- सैनिक

हा झोजिला चढायचा दुसरा रस्ता सोनमर्ग कडून येताना उजवीकडे आहे. पण थोडा लपलेला असल्याने दिसलाच न्हवता. 2 मिनिट सैनिकाशी गप्पा मारून मागे निघालो. सैनिकाने सांगितलेल्या रस्त्याजवळ पोचतच होतो तो मघाचा झुपकेदार मिशीवाला माणूस ट्रकातून परत आला. त्याने थांबवले.

'आप वापस क्यू जा रहे है? आपकी गाडी चढ नहीं पा रही क्या? मैने तो आपको इशारा भी किया था हमारे पिछे पिछे आने के लिये.' एका दमात सगळे विचारले त्यांनी.

'दादा, तुम्ही ज्या ट्रकात बसलाय त्याचा ग्राउंड क्लिअरन्स ५०० मिमी सहज असेल. आमच्या गाडीचे १६८ मिमी ग्राउंड क्लिअरन्सचे ठिगळ ह्या रस्त्यावर कुठं आणि कसं पुरायचं.' मी मनातच म्हटले.

आम्ही निपाणीच्या सैनिकाने जे सांगितले ते ह्यांना सांगितले.

'मत जाईये उस रोडसे. इसी रोडसे जाईये. इधर अगर गाडी को कुछ हो गया तो कमसे कम मिलिटरीवाले रहेंगे मदद के लिये. उस रोडपर कोई मदद नहीं मिलेगी. जाईये इसी रोडसे.' - असे सांगून तो निघून गेला.

परत मागे वळलो आणि वर निघालो. थोडे अंतर गेलो आणि मघाचा निपाणीचा सैनिक अजून एका सैनिका बरोबर खाली आमच्याकडे आला.

'काय झालं? आता का मागे आलात?' - निपाणीचा सैनिक

आम्ही त्या मिशीवाल्या सैनिकाने जे सांगितले ते ह्यांना सांगितले.

'नका जाऊ ह्या रस्त्यानं. म्हणजे जाऊ शकताय. पण खूप हाल होतील. पुढं ३-४ ठिकाणी तर इतकी भयानक कंडिशन हाय की गाडीला कायतरी होईल. मी सांगितलेल्या रस्त्यानच जा. कारवाले तिकडूनच जातात.'

बरं .... मग दुसऱ्या सैनिकाशी देखील थोडे बोललो. ते कोल्हापूरचे होते.

परत मागे फिरलो. अगोदर जो काही १ किमी खराब पॅच चढलो होतो तो चढताना नाकी नऊ आले होते. तेव्हढा परत खाली उतरलो. त्यानंतर पुन्हा जवळपास ५०० मी चढलो होतो आणि आता परत तो उतरायचा होता. एवढे सगळे कष्ट वाया गेले. ह्या सगळ्या प्रकारात तब्बल दीड तास गेला. पण मजा आली.

दुसरा रस्ता देखील एक लेनचाच आहे. ठिकठिकाणी साईड द्यायला जागा करून ठेवलेली आहे.

झोजिला

बर्फाच्छादित शिखरे

काही पॅचेस सोडल्यास हा रस्ता पहिल्या रस्त्यापेक्षा खूपच बरा होता. कमी ग्राउंड क्लिअरन्सच्या गाड्यांनी देखील थोडी काळजी घेऊन पार करता येईल. निपाणीच्या सैनिकाचे ऐकले ते योग्यच झाले. पहिल्या रस्त्यावर अक्षरश: धाबे दणाणले होते आमचे. इथे पण एका ठिकाणी गाडी खड्ड्यात फसली. पण एका स्थानिक माणसाच्या मदतीने लगेच बाहेर काढली. आमची गाडी फसलेली पाहून अजून एक स्थानिक ड्रायव्हर मदतीला आला होता. त्याच्या गाडीत गोव्याचे एक कुटुंब प्रवास करत होते. यथावकाश झोजी ला सर करून दीडच्या सुमारास गुमरी ह्या गावी पोचलो. इथे लष्कराचे एक कॅन्टीन आहे. इथे जेवण केले. जेवण म्हणजे फक्त मॅगी आणि काश्मिरी कहावा. कहावा तर खूपच चवदार बनवला होता. भात, चपाती, रोटी, भाजी असले काही मिळत नाही इथे.

गुमरी मधील लष्कराचे कॅन्टीन

ह्या कॅन्टीनच्या समोरच एकदम छोटेसे झोजीला वॉर मेमोरियल आहे.

झोजीला वॉर मेमोरियल

हे असे काही वॉर मेमोरियल आहे हे मला माहीत न्हवते. जालावरून थोडेसे इतिहासात डोकावून बघितले तर खालील माहिती मिळाली.

झोजिला वॉर -
१९४८ साली भारत पाक मध्ये काश्मीर वरून युद्ध सुरु झाल्यानंतर १९४८ च्या मे महिन्यात पाकिस्तानी सैनिकांनी झोजीला वर कब्जा केला आणि ते लडाख प्रांत पादाक्रांत करण्याच्या उद्देशाने लेहच्या दिशेने निघाले. लडाखला पाकिस्तानच्या घशात जाण्यापासून रोखण्यासाठी झोजीला वर बर्फ वृष्टी सुरु होण्याच्या अगोदर नियंत्रण मिळवणे भारताला भाग होते. सुरवातीला भारताच्या ७७ पॅराशूट ब्रिगेडने केलेला हल्ला निष्फळ ठरल्यानंतर लेफ्ट.जनरल करिअप्पा ह्यांनी ऑपरेशन बायसन हाती घेतले. श्रीनगर लेह महामार्ग त्या वेळी अस्तित्वातच न्हवता. (त्याची बांधणी १९६२ साली सुरु झाली). त्यामुळे M5 Stuart लाईट टँक्स श्रीनगर वरून बालताल पर्यंत त्यांचे भाग वेगळे वेगळे करून आणले गेले आणि बालताल इथे ते परत जोडले. बालताल ते झोजीला ते गुमरी हा रस्ता त्या काळी फक्त खेचरांच्या सहाय्याने पार केला जाऊ शकत असे. मद्रास सॅपर्स च्या जवानांनी दिवस रात्र काम करून हा रस्ता हे टँक्स चढू शकतील असा बनवला. बालताल मध्ये जोडलेले टॅंक भारतीय सैन्याने झोजीला वरून चढवले आणि पाकिस्तानी सैन्यावर ह्या टँक्सच्या सहाय्याने निर्णायक हल्ला केला. हा हल्ला पाकिस्तानी सैन्यासाठी अनपेक्षित होता. कारण अशा प्रकारे जिथे जायला रस्ता देखील न्हवता तिथे टॅंक चढवून भारताने हल्ला केला होता. इतक्या ऊंचीवर टँक्सचा वापर करण्याचा तो जगातील पहिलाच प्रयत्न होता. ह्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्य पुढे द्रास/कारगिल ला पळून गेले. त्याचवेळी लेह वरून भारतीय सैन्याची दुसरी तुकडी कारगिलच्या दिशेने आली. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य कात्रीत सापडले आणि कारगिल मधून सध्याच्या पाकव्याप्त काश्मीर मध्ये असलेल्या स्कर्दूला पळून गेले. त्या वेळी कारगिल ते स्कर्दू ह्यांच्या दरम्यान रस्ता होता. म्हणजे आजही आहे पण तो १९४९ पासून बंद केलेला आहे. आज लडाख हा भाग भारतात आहे ह्याचे कारण लेफ्ट.जनरल करिअप्पा ह्यांनी हाती घेतलेले आणि सर्व सैनिकांनी प्रचंड मेहनत करून यशस्वी केलेले ऑपरेशन बायसन हे आहे. ऑपरेशन बायसन हे 'आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग' चे उदाहरण समजण्यास हरकत नसावी. हे मेमोरियल पाहून पुढे द्रास ला निघालो.

प्रतिक्रिया

वा! छान लिहिलेय! फोटोही आवडले.

अतिशय सुंदर फोटो. गुगल मॅप वर तुम्ही गेलेल्या रस्त्याचे आरेखन करून इथे टाकू शकता का?

अभिजीत अवलिया's picture

4 Jan 2018 - 10:11 pm | अभिजीत अवलिया

हे असे?

हा बालताल ते झोजी ला मार्गे गुमरी रस्ता आहे. गूगल मॅप सोनमर्ग ते बालताल ते गुमरी एकच रस्ता दाखवते. कदाचित तो आम्ही ज्या रस्त्याने झोजी ला चढला तोच असावा. कारण पहिला रस्ता लष्कराची वाहने सोडून अन्य कुणी वापरत नाहीत असे सैनिक बोलला होता.

श्रीधर's picture

4 Jan 2018 - 12:37 pm | श्रीधर

अतिशय सुंदर वर्णन आणि फोटो

मराठी कथालेखक's picture

4 Jan 2018 - 1:03 pm | मराठी कथालेखक

छान लेख.
बाकी थंडी आणि विरळ हवेमुळे तुम्हाला , तुमच्या कुटुंबाला आणि कारला काही समस्यांचा सामना करावा लागला का ? आलेल्या अडचणींवर कशी मात केलीत ?

अभिजीत अवलिया's picture

4 Jan 2018 - 10:14 pm | अभिजीत अवलिया

होय. पुढील प्रवासात थोड्या अडचणी आल्या. त्याबद्दल त्या त्या भागात लिहितो.

पद्मावति's picture

4 Jan 2018 - 1:39 pm | पद्मावति

वाह! मस्तच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2018 - 2:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर वर्णन आणि फोटो !

किल्लेदार's picture

5 Jan 2018 - 1:10 am | किल्लेदार

थाजीवास ग्लेशिअर राहूनच गेले. जोझिला पण फार निगुतीने बघता आला नव्हता तो पण आत्ता बघता आला :).... पण फार न रेंगाळता परतलो हे बरेच झाले. पेन्सी-ला आणि जोझी-ला या अहि-महींनी माझ्या रॉलीच्या मागच्या चाकाचा पुरा घास घेतला.

केडी's picture

7 Jan 2018 - 7:14 pm | केडी

लवकर लिही रे...पुढचे सगळे भाग लवकर येऊदेत...

गणेश.१०'s picture

13 Jan 2018 - 10:23 pm | गणेश.१०

आणि महत्वाचं म्हणजे प्रवासातील बारीक सारीक गोष्टींचा केलेला अभ्यास.
बरंच शिकायला मिळालं त्यातून. माझ्या पुढील प्रवासात नक्की उपयोगी पडेल. धन्यवाद.

दहशतवादाचा कलंक नसता तर काश्मीरचं सोनं झालं असतं.