शस्त्रास्त्रांचा बाजार

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
28 Dec 2017 - 12:53 pm

शस्त्रास्त्रांचा बाजार
अनंतकृष्णन हा एक तमिळनाडू च्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील छोट्याशा गावात प्राथमिक शिक्षकाच्या घरात जन्माला आलेला हुशार तरुण. वडिलांच्या शाळेतच बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले आणि बारावीला उत्तम गुण मिळवल्यामुळे त्याला तिरुनेलवेलीच्या श्री तिरुवल्लुवर सरकारी अभियांत्रिकी विद्यालयात प्रवेश मिळाला. घराजवळच्या महाविद्यालयातूनच अभियंता बनलेल्या अनंताने GATE दिली आणि त्यात त्याचे गुण चांगले आले. या गुणांवर चांगल्या महाविद्यालयात एम टेक ला प्रवेश घ्यावा या विचारात असताना DRDO (संरक्षण संशीधन आणि विकास संघटन) येथील नोकरीची जाहिरात आली. घरची एकंदर परिस्थिती पाहून अनंताने नोकरी करणे सोयीस्कर ठरवले. त्याला हैदराबादच्या संरक्षण प्रयोगशाळेत सिंथेटिक अपरचर रडार वर संशीधनात्मक काम करणाऱ्या विभागात तैनात केले गेले.
मूळ तामिळ मातृभाषेत शिकलेला आणि तांत्रिक गोष्टी फक्त इंग्रजीत येत असलेला अनंत तेथे बुजल्या सारखा झाला होता.
त्याच्या बरोबरच लागलेला दिल्लीचा राहुल चोपडा हा तिसऱ्या प्रयत्नात दिल्लीतील "प्रथितयश" अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी पास झाला होता. उंच गोरा आणि आत्मविश्वासपूर्ण असा हा पंजाबी अभियंता वागण्याबोलण्यात अद्ययावत आणि कोणावरही पटकन छाप पडणारा होता. त्याचे सफाईदार इंग्रजी कोणत्याही विषयावर असणारे चौरस ज्ञान पाहून अनंताला आपण खिजगणतीतही नाही याची सतत जाणीव होत असे. त्यातून त्याला हिंदी भाषा धड समजतही नसे बोलणे तर लांबच. इंग्रजी भाषा सुद्धा ऐन वेळेस दगा देईल या भीतिने तो फारसा बोलतच नसे.

राहुल चोपडा हा आपल्या पंजाबी वृत्तीप्रमाणे "मद्रासी" लोकांना तुच्छ समजत असे. त्यातून त्याचे "डॅड" दिल्लीत संरक्षण मंत्रालयाशी निगडित असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात (PSU ) उच्चपदस्थ होते.

इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियंता असलेल्या अनंताला या सरकारी नोकरीत कामाचा ताण फारसा नव्हताच. एकटा जीव सदाशिव. त्यामुळे त्याला भरपूर वेळ होताच शिवाय तेथे असलेल्या वाचनालयात असलेली पुस्तके आणि पूर्ण वेळ उपलब्ध असलेल्या वेगवान इंटरनेटचा त्याने पुरेपूर वापर करण्याचे ठरविले.
एकच चांगली गोष्ट होती. नोकरीत त्याचे विभागप्रमुख होते डॉक्टर वसंत कुलकर्णी. हे अतिशय शांत स्वभावाचे, अबोल पण विषयाची सखोल जाण असणारे आणि पारखी होते. मूळचे कर्नाटकातील असुन म्हैसूरवरून अभियांत्रिकी करवून आय आय टी तुन एम टेक नंतर अमेरिकेत पी एच डी झालेले. दोन तीन वेळेस काम करताना अनंताची हुशारी त्यांना जाणवली होती.
राहुलचा एकंदर बडेजाव त्यांना फारसा आवडत नसे पण ते काही बोलत नसत.
कोणतेही काम दिले असताना हे काय सिम्पल आहे असे बोलत असे पण प्रत्यक्ष दिलेल्या वेळेत काम कधीच पूर्ण करत नसे. सरकारी नोकरीत फारसे कोणी काहीही करू शकत नाही हे त्याला माहित होते. त्यातून तो इथे काय मी फार काळ राहणार नाहीये म्हणून सांगत असे.

या विरुद्ध अनंताला दिलेले कोणतेही काम तो वेळेत चिकाटीने पूर्ण करत असे. शिवाय त्याची चाचणी घेण्यासाठी डॉ. कुलकर्णी त्याला कठीण कामे देत असत तीसुद्धा तो बहुतांश वेळेस कोणाचीही मदत न घेता पूर्ण करत असे.
दोन वर्षे काम केल्यावर राहुल आणि अनंत दोघांनाही बढती मिळाली. आता दोघेही पुढची स्वप्ने पाहू लागले. अनंताला डॉ कुलकर्णीनी एम टेक बद्दल विचारले त्यावर तो म्हणाला "सर मला नोकरी सोडणे शक्य नाही कारण घरची परिस्थिती फारशी चांगली नाही. बहिणीचे लग्न चांगल्या घरात करणे आवश्यक आहे".
त्यावर डॉकटर कुलकर्णी म्हणाले --बंगलोरच्या एल आर डी इ मध्ये खात्यांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज मागवले आहेत. तुला जायचं असेल तर मी शिफारस करेन. पण कमीत कमी ५ वर्षे नोकरी सोडता येणार नाही. तसा बॉण्ड लिहून द्यायला लागेल.

अनंत म्हणाला सर अशी सरकारी नोकरी सोडली तर घरचे मला घरात घेणार नाहीत. आणि नोकरी सोडून एम टेक करणे सध्या तरी मला परवडणार नाही.

डॉ कुलकर्णीनी राहुलला असेच विचारले होते त्यावर तो म्हणाला सर मला अमेरिकेत स्टॅनफोर्ड किंवा मॅसेच्युसेट्स मध्ये एम एस करायचे आहे. एल आर डी इ सारख्या फालतू संस्थेत एम टेक करून काय फायदा?

डॉ कुलकर्णीनि त्याला हसत विचारले कि तू अशा फडतूस सरकारी नोकरीत का आला आहेस? त्यावर तो म्हणाला कि अमेरिकेत बऱ्याच चांगल्या विद्यापीठात एम टेक करताना तुम्हाला अगोदरचा कार्यानुभव असणे आवश्यक आहे आणि खाजगी कंपनीत ताबडवून काम करून घेतात त्यापेक्षा सरकारी नोकरी बरी. डॉ कुलकर्णी काहीच बोलले नाहीत.

यथावकाश अनंत एल आर डी इ मध्ये एम टेक करायला गेला.

आणि राहुलला त्याच्या डॅडच्या ओळखीतून संपूर्ण शिष्यवृत्तीसह स्टॅन्फोर्डमध्ये एम एस ला प्रवेश मिळाला.

हे असे कसे घडले?

वरील सर्व कथा हि वास्तवाला स्पर्श करणारी परंतु संपूर्णपणे काल्पनिक कथा आहे. यातील नावे प्रसंग सर्वच काल्पनिक आहेत. या माध्यमातून सरकारी आस्थापनातील राजकारण कसे चालते हे लिहिण्याचा एक छोटेखानी प्रयत्न आहे. बऱयाच गोष्टी ऐकीव असल्याने चूक असू शकतील आणि कोणत्याही/सर्व गोष्टीचा दुवा किंवा पुरावा देता येणार नाही.

क्रमशः

जाता जाता -- काही गैरसमज

१) प्रथितयश अभियांत्रिकी महाविद्यालयातच हुशार विद्यार्थी असतात

२) साध्या सरकारी महाविद्यालयातून पदवी मिळवणारे अभियंते कमी दर्जाचे असतात.

३) चलाख आणि चुणचुणीत लोक (street smart) हुशार असतात

४) फर्डे इंग्रजी न येणारी मुले मागे पडतात.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

काहीशी वेगळी सुरूवात..

एस's picture

28 Dec 2017 - 2:33 pm | एस

पुभाप्र.

अमितदादा's picture

28 Dec 2017 - 2:54 pm | अमितदादा

चांगली सुरुवात....पुभाप्र

जाता जाता -- काही गैरसमज
१) प्रथितयश अभियांत्रिकी महाविद्यालयातच हुशार विद्यार्थी असतात
२) साध्या सरकारी महाविद्यालयातून पदवी मिळवणारे अभियंते कमी दर्जाचे असतात.
३) चलाख आणि चुणचुणीत लोक (street smart) हुशार असतात
४) फर्डे इंग्रजी न येणारी मुले मागे पडतात.

+1000000

पिंगू's picture

28 Dec 2017 - 3:48 pm | पिंगू

मस्त सुरुवात.

बाकी उद्धृत केलेले गैरसमज जास्त प्रमाणत आढळतात, हे नोंदवतो..

सिरुसेरि's picture

28 Dec 2017 - 6:53 pm | सिरुसेरि

साध्या ( ? ) सरकारी महाविद्यालयातून पदवी मिळवणारे अभियंते कमी दर्जाचे असतात. ---- असा गैरसमज निदान महाराष्ट्रात तरी कोणी करणार नाही . कारण पुणे , कराड , औरंगाबाद , सांगली येथील सरकारी महाविद्यालयांमधे कटऑफच ९५% ला असतो . एखाद्या सरकारी महाविद्यालयाचे नाव चुकुन राहिले असल्यास माफ करावे .

सुबोध खरे's picture

28 Dec 2017 - 7:11 pm | सुबोध खरे

1. College of Engineering, Guindy, Chennai (1794)
4. Indian Institute of Engineering Science and Technology, Shibpur (1856)
8. Faculty of Technology and Engineering, Maharaja Sayajirao University, Vadodara (1890)
9. Jadavpur University, Kolkata (1906)

हि सर्वात जुन्या १० अभियांत्रिकी कॉलेजातील नावे आपण ऐकली (तरी) होती का?
अखिल भारतीय स्तरावर आपण जेंव्हा जाता तेंव्हासुद्धा कराड औरंगाबाद किंवा सांगलीचे अभियांत्रिकी कॉलेज हे "साधारण" समजले जाते.
आज आय आय टी किंवा एन आय टी तुन आपण अभियांत्रिकी केली असेल तर आपण हुशार ठरता.
मग आपण तिसऱ्या प्रयत्नात पास झाला असाल तरीही.
आय आय टी मध्ये २०१६ साली ४५ % मुले हि दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नात पास झाली होती. हा "कोटा"( राजस्थानातील) पॅटर्न कसा थांबवता येईल याबद्दल आय आय टी मध्ये बरेच चर्वित चर्वण चालू आहे.
असो
तो मूळ विषय नाही म्हणून मी येथेच थांबतो.
हुशारी हि कोणत्या महाविद्यालयाची मक्तेदारी नाही एवढेच म्हणून थांबतो.
(हे "द्राक्षे आंबट" म्हणून मी लिहीत नाही कारण माझे वैद्यकीय महाविद्यालय वर्षानुवर्षे भारतात दुसरे येते म्हणून प्रसिद्ध आहे)

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2017 - 9:18 pm | श्रीगुरुजी

आय आय टी मध्ये २०१६ साली ४५ % मुले हि दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नात पास झाली होती. हा "कोटा"( राजस्थानातील) पॅटर्न कसा थांबवता येईल याबद्दल आय आय टी मध्ये बरेच चर्वित चर्वण चालू आहे.

आयआयटीसाठी दोन वेळाच प्रयत्न करता येतो (चूभूदेघे).

दुस-या (किंवा अगदी तिस-या) प्रयत्नातही आयआयटीत प्रवेश मिळविणे अत्यंत अवघड आहे.

साहना's picture

28 Dec 2017 - 10:27 pm | साहना

IIT मध्ये ना गेलेली हुशार असतात ह्यांत शंका नाही पण IIT मध्ये विना आरक्षण आलेली मुले सहज IQ १३०+ असतात.

भारतातील अभियांत्रिकी शिक्षण अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे ह्यांत शंकाच नाही.

एकुलता एक डॉन's picture

29 Dec 2017 - 1:25 am | एकुलता एक डॉन

मुद्दा काय आहे ?

अप्पा जोगळेकर's picture

29 Dec 2017 - 3:44 pm | अप्पा जोगळेकर

आय क्यू हे कार्यक्षमता मोजण्याचे एकक नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Dec 2017 - 8:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सुरुवात ! या विषयावर कोणीतरी बोलणे आवश्यकच होते. पुभाप्र.