ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग १ - अंगकोर वाट

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in भटकंती
22 Dec 2017 - 9:16 pm

ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग १ - अंगकोर वाटचा शोध आणि इतिहास.


अंगकोर वाटचे विहंगम दृश्य. पश्चिम दिशा डावीकडे आणि उत्तर दिशा वर

१८६० सालामध्ये आँरी मूओ (Henri Mouhot) हा वनस्पतिशास्त्रज्ञ कंबोडियाच्या दाट विषुववृत्तीय जंगलामध्ये तेथील वनस्पतींचे नमुने गोळा करण्याच्या कामावर आला होता. ह्या कामावर त्याला ब्रिटनमधील रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी आणि झूऑलॉजिकल सोसायटी ह्या दोन संस्थांनी आपला प्रतिनिधि म्हणून पाठवले होते. दाट झाडीमध्ये लपेटलेल्या ह्या प्रदेशात वनस्पति आणि प्राणी ह्यांचे भरपूर वैविध्य आहे. सध्याचे थायलंड - तत्कालीन नाव सयाम, वियेतनाम आणि लाओस हे देशहि ह्याच प्रदेशात आहेत.

मूओ ह्या जंगलात आपल्या कामासाठी फिरत असता त्याच्या कानावर असे आले की ह्या जंगलामध्ये प्रचंड आकाराच्या दगडी इमारतींचे भग्नावशेष शेकडोंच्या संख्येने विखुरलेले आहेत. ह्या वार्तेची शहानिशा करण्यासाठी एका स्थानिक खेडूताला त्याने अशा जागा दाखविण्यासाठी मदतीला घेतले. तो खेडूत त्याला एका प्राचीन शहराच्या अवशेषांच्या जागी घेऊन गेला. मूओने तेथे जे पाहिले त्याची त्याने कल्पनेतहि अपेक्षा केली नव्हती. त्या प्राचीन शहरातील बहुतेक जुन्या इमारती भग्नावस्थेमध्ये होत्या. परंतु एक भव्य देऊळ अजूनहि आपल्या उंचीने आणि आकाशाकडे झेप घेऊ पाहणाऱ्या पाच शिखरांमुळे पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत होते. त्या भग्नावशेषाचा आकार आणि त्यामधील कोरीव कलाकुसरीमुळे मूओ अवाक् झाला.

अंगकोर वाट शिखर
अंगकोर वाटच्या पाच शिखरांपैकी मेरु पर्वताच्या आकाराचे मध्यवर्ती शिखर
मंदिराचे प्रतिबिंब
मन्दिराचे पाण्यात पडलेले प्रतिबिम्ब

हे भग्नावशेष आणि पाच शिखरांचे मंदिर ज्या परिसरात आहे त्याला आज 'अंगकोर' असे ओळखले जाते आणि त्या मंदिराला 'अंगकोर वाट'. पैकी 'अंगकोर' हा शब्द संस्कृत 'नगर' ह्या शब्दाचे स्थानिक रूप आहे. त्याच्या मृत्यूनंतर छापल्या गेलेल्या पुस्तकात मूओ हेच नाव Nokhor अथवा Ongkor असे देतो. 'वाट' हा शब्द पाली भाषेतील 'वत्त' - देऊळ - ह्या शब्दाचे कंबोडिया, वियेतनाम अशा चारी बौद्ध देशांमध्ये झालेले रूपान्तर आहे. तेथे स्थानिक बौद्ध देवळांना 'वाट' असे म्हटले जाते. अंगकोर आजच्या कंबोडियाच्या उत्तर भागातील एका मैदानामध्ये आहे. त्याच्या दक्षिणेस 'तोन्ले साप' नावाचा एक विस्तीर्ण तलाव आहे. त्या भागातून वाहणाऱ्या मेकॉंग नदी आणि तिच्या उपनद्यांना वार्षिक पूर आले की त्या पुराचे पाणी तलावात घुसून त्याची पातळी १० मीटरनी उंचावते; आणि विस्तार २५०० चौरस किमी पासून १६,००० चौरस किमी वाढतो. अंगकोरच्या उत्तर सीमेवर कुलेन टेकड्या ह्या नावाने ओळखला जाणारा डोंगराळ प्रदेश आहे.

इसवी सनाच्या नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकाच्या अंतापर्यंत सुमारे ६०० वर्षांच्या काळामधे ह्या परिसरामध्ये जी संस्कृति वाढली तिला 'ख्मेर साम्राज्य' असे ओळखले जाते. ह्या पूर्ण कालखंडात साम्राज्याचे प्रमुख केन्द्र, त्याच्या सम्राटांची आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने आणि राजधानीची जागा अंगकोर वाटच्या परिसरामध्ये होती. इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकापासून ह्या भागामध्ये भारतातून आयात झालेल्या हिंदु धर्मावर - Brahminism - आधारलेली हिंदु राज्ये होती असे चीनच्या इतिहासात उपलब्ध असलेल्या नोंदींवरून कळते. इ.स. ८०२ मध्ये जयवर्मन् द्वितीय ह्याने लहानसहान राज्ये एकत्र करून आणि मलाया भागातून आक्रमण केलेल्या शैलेन्द्र राजवटीचे उच्चाटन करून स्वत:ला 'चक्रवर्ती' घोषित करून ख्मेर साम्राज्याचा पाया घातला.

प्रारंभीच्या शतकांमध्ये ह्या साम्राज्याचा धर्म हा भारतातून आलेला हिंदु धर्म होता. नंतरच्या काळात त्याची जागी श्रीलंकेतून आलेल्या थेरवादी हीनयान बौद्ध धर्माने घेतली. ह्या चारहि देशांमध्ये सध्या प्रचलित धर्म हाच आहे, यद्यपि जुन्या काळातील हिंदु धर्माच्या खुणाहि जागोजाग दिसतात. अंगकोर वाट हे देऊळ वेगवेगळ्या काळांमध्ये हिंदु आणि बौद्ध अशा दोन्ही धर्मांचे केन्द्र होऊन गेले आहे.

मंदिराचे प्रतिबिंब
अरण्याने गिळलेल्या 'ता प्रोहम' मन्दिराची छायाचित्रे

त्या काळामध्ये यशोधरपुर अशा नावाने ओळखले जाणारे - सध्याचे 'अंगकोर थोम' असे ओळखले जाणारे आणि चार वेशींच्या आत असलेले - भग्न नगर सोडून तत्कालीन ख्मेर सम्राटाने १४३१ साली आणखी दक्षिणेकडील भागामध्ये आपल्या राज्याचे केन्द्रस्थान नेले. पश्चिमेकडून सयाम आणि पूर्वेकडून वियेतनाम ह्यांच्या कित्येक शतकांच्या सततच्या दबावामुळे चौदाव्या शतकापासून ख्मेर साम्राज्य विलयास जाऊ लागले आणि देवळे, राजे आणि सामन्तांचे प्रासाद, सर्वसामान्यांची घरे ओसाड पडावयास लागली. वृक्षांच्या वाढीला अतिशय अनुकूल अशा हवामानाच्या त्या प्रदेशामध्ये हे खंडहर आपल्या ताब्यात घेण्याला आसपासच्या जंगलाला काहीच अडचण पडली नाही.

ख्मेर संस्कृतीच्या प्रथेनुसार दगडातून बांधलेल्या इमारती केवळ देवांच्या उपयोगाच्या असत आणि मनुष्यांनी - कनिष्ठांपासून वरिष्ठांनी - लाकूड आणि मातीच्या विटांच्या घरामध्ये राहायचे. अशा लाकूड आणि मातीपासून बांधलेल्या माणसांच्या घरांचा जंगल, वाळवी आणि पावसापाण्यापुढे दीर्घकाळ टिकाव राहणे शक्यच नव्हते. मोकळी पडलेली अशी घरे कालान्तराने आसपासच्या मातीत नाहीशी झाली. जंगलाच्या ताब्यात गेलेली दगडांची घरे - म्हणजेच देवळे - जंगलाने गिळून टाकली. जंगलाने व्यापलेले अंगकोर स्मृतीमधून नष्ट झाले.

ह्या अकस्मात झालेल्या विलयाचे कारण काय असावे ह्याविषयी तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. शतकानुशतकांच्या जंगलतोडीमुळे आणि प्राण्यांच्या शिकारीमुळे नैसर्गिक संसाधनांवर ताण पडणे अथवा अचानक वातावरण बदलून पर्जन्यमान कमी होणे आणि त्यामुळे दीर्घकाळ टिकलेला दुष्काळ पडणे अशी दोन कारणे चर्चेमध्ये आहेत. कारण काहीहि असो, बाहेरील जगाच्या दृष्टीने चौदाव्या शतकाच्या अखेरीस जंगलाचे पांघरूण अंगावर ओढून अंगकोर दीर्घ निद्रेमध्ये गेले आणि ही निद्रा एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धापर्यंत चालू राहिली.

मूओच्या पूर्वीहि युरोपीय वंशांचे काही तुरळक व्यापारी आणि मिशनरी १६ व्या शतकापासून अंगकोरला छोट्या भेटी देऊन गेले होते. अन्तोनिओ दो माग्दालेनो हा पोर्तुगीज धर्मप्रसारक १५८६ साली येथे आला होता आणि त्याने पाहिलेले अंगकोरचे वर्णन दिओगो दो कूतो ह्या इतिहासलेखकाने गोव्यात प्रसिद्ध केले होते. १७ व्या शतकामध्ये काही मिशनरी स्पेन आणि पोर्तुगालमधून येथे येऊन गेले होते पण त्यांनी जमा केलेली माहिती युरोपापर्यंत पोहोचू शकली नाही.

हे चित्र मूओपासून बदलले. आपल्या जंगलभ्रमन्तीमध्ये मूओने एक व्यवस्थित दैनंदिनी लिहिलेली होती आणि पाहिलेल्या जागांची व्यवस्थित तपशीलवार वर्णने आणि रेखाचित्रेहि काढून ठेवलेली होती. मूओच्या वर्णनाप्रमाणे अंगकोरचे मंदिर युरोपातील कोणत्याहि ग्रीक आणि रोमन अवशेषांहून अधिक भव्य आणि कलेच्या बाबतीत उच्च दर्जाची आहेत. त्याच्याच शब्दांमध्ये -

One of these temples — a rival to that of Solomon, and erected by some ancient Michael Angelo — might take an honourable place beside our most beautiful buildings. It is grander than anything left to us by Greece or Rome, and presents a sad contrast to the state of barbarism in which the nation is now plunged. (Travels in the Central Parts of Indo-China - Siam, Cambodia and Laos. London 1864. p. 279)

आपल्या ह्या प्रवासानंतर मू्ओ अवघ्या एका वर्षात लाओसमध्ये मलेरियाला बळी पडला पण त्याच्या वह्या कालान्तराने सुखरूप लंडनपर्यंत पोहोचल्या आणि तेथे २ भागांमध्ये १८६४ मध्ये प्रकाशित झाल्या. ह्या पुस्तकामुळे अंगकोर पुन: जगापुढे प्रकाशात येऊ आले.
आधी वर उल्लेखिल्याप्रमाणे इ.स. ८०२ साली येथे ख्मेर साम्राज्याचा पाया घातला गेला. तत्पूर्वीहि ७-८शे वर्षे ह्या भागामध्ये हिंदु संस्कृतीवर आधारलेली राज्ये होती असे तेथे सापडलेल्या काही शिलालेखांवरून आणि चीनच्या इतिहासात नोदविलेल्या काही राजदूतांच्या भेटींच्या उल्लेखांवरून कळते. पण तो इतिहास पुष्कळसा विस्कळित आहे. ख्मेर साम्राज्याचा इतिहास मात्र ८०२ सालापासून पुष्कळसा सुसूत्र पद्धतीने कळतो ह्याचे कारण म्हणजे त्याच्या विस्तीर्ण भूप्रदेशामध्ये सापडलेले सुमारे १२०० शिलालेख.
पश्चिमेकडून सयाम आणि पूर्वेकडून वियेतनाम ह्यांच्या सततच्या दबावाला कंटाळून कंबोडियाचा राजा नोरोदम ह्याने १८६७ साली फ्रेंचांशी हातमिळवणी करून आपल्या देशाला फ्रेंचांच्या संरक्षणाखाली आणले आणि तेव्हांपासून देशाचा कारभार फ्रेंचांच्या ताब्यात गेला. कंबोडियाला आधुनिक जगात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक प्रयत्नांमध्ये तेथील प्राचीन अवशेषांचे संशोधन, अभ्यास आणि जतन ह्यांचाहि समावेश होता आणि तदनुसार पौर्वात्य विषयांच्या फ्रेंच अभ्यासकांनी ख्मेर - आणि अन्य प्राचीन - इतिहासांचा अभ्यास सुरू केला. ह्या उद्देशाने १९०० साली L'École française d'Extrême-Orient (EFEO - French School of the Far East) ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि तिच्या माध्यमामधून ह्या अभ्यासाला मोठी चालना मिळाली.

ख्मेर संस्कृतीचा अभ्यास करण्याचे जवळजवळ एकमेव साधन म्हणजे तिच्या विस्तीर्ण भूप्रदेशामध्ये सापडलेले सुमारे १२०० शिलालेख, जुन्या मंदिरांचे भग्नावशेष आणि त्यातील शिल्पे. जुन्या इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी अन्य ठिकाणी वापरली जाणारी दुसरी साधने म्हणजे जुने ग्रन्थ आणि अन्य हस्तलिखिते, तसेच नाणी, परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तान्त ह्यांचा ख्मेर साम्राज्याच्या संदर्भात जवळजवळ पूर्ण अभावच आहे. जुने ग्रंथ आणि भूर्जपत्रांवर आणि तत्सम नाशिवंत माध्यमांवर जे काही लेखन त्या काळात झाले असेल ते सर्वच्या सर्व दमट हवामानाचे बळी ठरून नष्ट झाले आहे. ख्मेर साम्राज्य पूर्णतः देवाणघेवाणीच्या अर्थव्यवस्थेवर चालत असावे असे दिसते कारण कसलीच ख्मेर नाणी प्रकाशात आली नाहीत. एकीकडे चीनशी आणि दुसरीकडे हिंदुस्तानच्या दक्षिण भागातील राज्यांशी ख्मेर शासकांचे काही संबंध होते असे जाणवते कारण तुरळक शिलालेखांमधून असे उल्लेख आढळतात पण त्यातून ठोस अशी माहिती फार थोडी हाती लागते. झू दागुआन (Zhou Da-guan) अशा नावाचा एक चिनी मनुष्य चीनच्या सम्राटाच्या राजदूताच्या लवाजम्यामधून तेराव्या शतकाच्या अखेरीस ख्मेर साम्राज्यात आला होता आणि ऑगस्ट १२९६ ते जुलै १२९७ इतका काळ तो ख्मेर साम्राज्यात राहिला होता. परत गेल्यावर त्याने त्या साम्राज्याचे त्रोटक वर्णन लिहून ठेवलेले उपलब्ध आहे आणि साम्राज्यातील अर्थव्यवस्था, सामाजिक जीवन अशी काही माहिती त्या वर्णनावरून उपलब्ध होते.

तेव्हा जुन्या ख्मेर इतिहासाचा मागोवा घेण्याचे उर्वरित असे जवळजवळ एकमेव साधन म्हणजे आता उरलेले शिलालेख आणि मंदिरांचे अवशेष. ह्या क्षेत्रामध्ये EFEO च्या विद्वानांनी भरपूर आणि भरीव असे कार्य केले आहे. EFEO मधील विद्वान् अभ्यासक जॉर्ज सेडेस (George Cœdès) (१८८६-१९६९) हे संस्कृत, प्राचीन ख्मेर भाषा आणि प्राचीन ख्मेर लिपि ह्या तिन्ही विषयात पारंगत होते. त्यांनी उपलब्ध अशा सर्व शिलालेखांचे वाचन करून त्यांना K ह्या अक्षराने सुरू होणारे क्रम दिले आणि आठ खंडांमध्ये ते शिलालेख भाषान्तरांसह प्रकाशित केले. (माहीत‌ अस‌लेले ज‌गात‌ले प‌हिले 'शून्य‌' ह्याचा पुरावा K127 अशी क्रमसंख्या असलेल्या शिलालेखामध्ये मिळालेला आहे.) अशाच शिलालेखांपैकी K908 क्रमांकाच्या प्रियाह खान (Preah Khan) नावाच्या मंदिराच्या स्थापनालेखामधील पहिले ५ श्लोक पहा. ह्याची भाषा संस्कृत आणि लिपि प्राचीन ख्मेर लिपि आहे. ही लिपि दक्षिण भारतातील ग्रन्थ लिपीसारखीच ब्राह्मी लिपीपासून उत्पन्न झालेली आहे.
शिलालेख
शिलालेख
प्रियाह खान मंदिराचे अवशेषहा शिलालेख जेथे मिळाला त्या प्रियाह खान मन्दिराचे अवशेष असे आहेत.

Prasat Sdok Kok Thom हे शिवाला वाहिलेले भग्नावस्थेतील हिंदु मंदिर थायलंड-कम्बोडिया सीमेनजीक पण थायलंडच्या प्रदेशात आहे. तेथे सापडलेल्या संस्कृत-ख्मेर अशा संमिश्र आणि ३४० ओळींच्या प्रदीर्घ शिलालेखात - क्र. K235 - ते मंदिर बांधणारा ब्राह्मण सदाशिव ह्याने आपल्या कुटुंबाच्या नऊ पिढ्यांचा २५० वर्षांचा इतिहास नोंदवून ठेवला आहे. हे कुटुंब नेहमीच राजाश्रयावर अवलंबून असणारे आणि राजघराण्याशी जवळचे संबंध ठेवणारे असल्याने कुटुंबाच्या इतिहासाबरोबर जवळजवळ २५० वर्षांची राजघराण्याची वंशावळ तेथे वाचावयास मिळते. ख्मेर साम्राज्याचा उदय इ.स. ८०२च्या पुढेमागे झाल्याचा तर्क ह्या लेखावरूनच काढता येतो.
१५व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ख्मेर साम्राज्य आपले स्थैर्य सांभाळून होते. बहुतांशी ख्मेर मंदिरांची उभारणी ह्या पूर्वीच्या काळात केली गेली. विख्यात अंगकोर वाट हे मंदिर सूर्यवर्मन् दुसरा ह्या सम्राटाने इ.स. १११३ ते ११४५ ह्या आपल्या राज्यकाळात बांधले. इ.स.११८१-१२१८ ह्या काळात जयवर्मन् सातवा ख्मेर साम्राज्याचा सम्राट् होता आणि सर्व सम्राटांमध्ये तो अन्य सर्वांहून अधिक यशस्वी ठरला. त्याने बौद्धांच्या हीनयान पंथाला आपल्या राज्यात शिरकाव दिला आणि तदनंतर हिंदु धर्माचा प्रभाव कमीकमी होत गेला. सातव्या जयवर्मन् नंतरचे सम्राट् पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून होणाऱ्या आक्रमणांना थोपवू शकले नाहीत आणि ख्मेर राज्याचा अस्त होऊ लागला.१५व्या शतकाच्या मध्यापासून ते १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत कंबुजदेश - कंबोडिया अगदीच खिळखिळा होऊन गेला होता. अखेर १८६३ साली तत्कालीन राजा नरोदोम ह्याने फ्रेंच राष्ट्राशी हातमिळवणी करून कंबोडियाला फ्रेंच रक्षणाखाली आणले.

Cambodian Flag
कंबोडियाचा राष्ट्रीय ध्वज

आधुनिक कंबोडियाच्या जडणघडणीमध्ये तत्कालीन हिंदु संस्कृतीचे मोठे योगदान आहे हे जागोजागी दिसते. ऐतिहासिक हिंदु मंदिरांचे अवशेष त्या सर्व प्रदेशात आहेत. त्या देशाच्या ख्मेर भाषेवर संस्कृतचा मोठा प्रभाव आहे. त्या भाषेची लिपि ही तामिळ ग्रंथ लिपीपासून निर्माण झाली आहे. हिंदु मंदिरांचे आणि त्यातील शिल्पांचे अवशेष हा तेथील जनतेचा एक मानबिंदु आहे. (कंबोडिया-थायलंड सीमेवरची काही मंदिरे, ज्यात वर उल्लेखिलेल्या Prasat Sdok Kok Thom चाहि समावेश होतो, ह्या दोन राष्ट्रांमधील कायमचे वादाचे मुद्दे आहेत. Prasat Preah Vihear ह्या मंदिराबाबतचा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे जाऊन १९६२ साली कंबोडियाला त्याचा ताबा थायलंडकडून मिळवावा लागला.) Reamker (रामकीर्ति) हा रामायणाचा कंबोडियन अवतार त्या राष्ट्राचे राष्ट्रीय महाकाव्य मानले जाते. 'अंगकोर वाट' मंदिर कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर स्थान मिळवून आहे. (पूर्व चंपारण जिल्ह्यामध्ये 'विराट् रामायण मंदिर' नावाचे प्रस्तावित मंदिर 'अंगकोर वाट'ची प्रतिकृति आहे ह्या कारणासाठी कंबोडियन शासनाने त्याच्या बांधणीस आक्षेप घेतला आहे आणि सध्या भारतीय शासनाच्या हस्तक्षेपामुळे प्रस्तावित मंदिराची बांधणी स्थगित ठेवण्यात आली आहे.)

ख्मेर साम्राज्याचे तत्कालीन भारताशी कसे संबंध होते, दोघांमध्ये कितपत व्यापार होता, इकडून तिकडे येणारे-जाणारे व्यापारी कोण होते, राजनैतिक संबंध कितपत आणि कोणाशी होते अशा प्रकारचा विशेष काही पुरावा आता उरलेला नाही पण शिलालेखांमधून मिळणाऱ्या तुरळक उल्लेखावरून काही आडाखे बांधता येतात. शिलालेखांमधील संस्कृत भाषा शुद्ध आणि प्रौढ आहे, बहुतांश लेख काव्याच्या मार्गाने श्लोकबद्ध असे लिहिलेले असून छन्द:शास्त्रातील आपणास नित्य परिचित अशी सर्व वृत्ते ह्या शिलालेखांतून आपणास भेटतात, कालिदासांसारख्या कवींचे अनुकरण काही श्लोकांमध्ये जाणवते, काही राजपुरोहित आर्यदेशामधून (भारत) आल्याचे उल्लेख मिळतात. पुराणे, रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये ह्यांचा अभ्यास चालू असल्याचे दिसते, पाणिनि, सुश्रुत, गुणाढ्य, वात्स्यायन अशा प्राचीनांच्या नावांचे उल्लेख आढळतात. शिलालेखांच्या भाषेचे उदाहरण म्हणून वर उल्लेखिलेल्या K908 शिलालेखातील क्र. ६ आणि ७ हे श्लोक पहा. हे श्लोक अनुक्रमे वसन्ततिलका आणि इन्द्रवज्रा ह्या वृत्तांमधील आहेत.

आसीदखण्डमनुदण्डधरावनीन्द्र-
वन्द्यो वर: श्रुतवतां श्रुतवर्मसूनु:।
श्रीश्रेष्ठवर्मनृपति: शुचिभिर्यशोभि:
श्रेष्ठोऽवदातवसुधाधरवंशयोनि:॥६॥
श्रीकम्बुवंशाम्बरभास्करो यो
जातो जयादित्यपुरोदयाद्रौ।
प्राबोधयत्प्राणिहृदम्बुजानि
तेजोनिधि: श्रेष्ठपुराधिराज:॥७॥

६. राजा श्रुतवर्मन् ह्याला एक पुत्र होता. मनूच्या धर्माचे अखंड पालन करणाऱ्या राजांना तो वन्द्य होता. विद्वानांमध्ये तो अग्रणी होता. त्याचे नाव होते राजा श्रेष्ठवर्मन्. आपल्या अकलंकित यशामुळे तो श्रेष्ठ होता. त्याच्यापासून देदीप्यमान राजवंश सुरू झाला.

७. कम्बुवंशरूपी आकाशाचा तो सूर्य होता. पर्वतावर सूर्य उगवावा तसा तो जयादित्यपुर नगरात जन्मला. श्रेष्ठपुरसम्राट् असलेल्या त्याने सूर्याप्रमाणे प्राणिमात्रांची हृदयकमळे उमलविली.

दूरवरच्या भारतदेशामधून येथे स्थानान्तरित झालेल्या उच्चवर्णीयांनी स्थानिकांच्यावर आपली मजबूत पकड बसवून त्यांना दुय्यम स्थानावर लोटले होते असे जाणवते. स्थानिक प्रजेबाबत ह्या उपलब्ध शिलालेखांमध्ये जवळजवळ संपूर्ण अनुल्लेख आहे. त्यांचे काम म्हणजे ख्मेर सम्राटांच्या सैन्यामध्ये सैनिक होऊन लढायचे, ही प्रचंड मंदिरे बांधण्यासाठी लागणारी मनुष्यशक्ति पुरवायची आणि शेती करून सम्राटांच्या तिजोऱ्या भरत्या ठेवायच्या इतकेच दिसते. वस्तूंच्या विनिमयाचे, मंदिरांसाठीच्या जागांच्या क्रयविक्रयाचे जे उल्लेख मिळतात त्यामधील सर्व विनियम 'इतके सोने, इतकी चांदी आणि इतके गुलाम' अशा स्वरूपाचे आहेत. कोठलीच नाणेपद्धति ख्मेर साम्राज्यात अस्तित्वात असल्याचा पुरावा पुढे आलेला नाही आणि अशी नाणीहि कोठे मिळालेली नाहीत पण गुलामांचे उल्लेख मात्र अनेक सापडतात. हे गुलाम म्हणजे स्थानिक प्रजाच होय.

१५व्या शतकामध्ये हे सर्व साम्राज्य कोसळले, वस्ती उठली आणि मंदिरे कोसळू लागली वा अरण्याने गिळायला सुरुवात केली असा उल्लेख वर आला आहेच पण २०व्या शतकात त्याच्यापुढे दोन नवी आह्वाने उभी राहिली. पहिले म्हणजे हौशी प्रवाशांची नजर त्यांच्यावर पडून त्यातील कलाकृतींची चोरी आणि तस्करी सुरू झाली. येथील मूर्ति जागेवरून उचलून अथवा कापून काढून देशोदेशींची वस्तुसंग्रहालये भरण्यासाठी आणि पाश्चात्य देशांतील हौशी श्रीमंतांचे दिवाणखाने आणि प्रासाद सजविण्यासाठी त्यांची चोरटी निर्यात अनेक दशके चालू होती आणि त्याचे पुरावे जागोजागी दिसतात. प्रख्यात फ्रेंच डावे विचारवंत आणि नंतरच्या काळातील फ्रान्सचे संस्कृति मन्त्री आन्द्रे मालरो हे १९२३ साली 'बान्तेय् स्रेई' ह्या ख्मेर मंदिरातून चार मूर्ति उचलल्याच्या आरोपामध्ये दोषी सापडले होते आणि त्यांना त्याबद्दल सजाहि सुनावण्यात आली होती. १९७४-७९ ह्या 'ख्मेर रूज' ह्या अति-डाव्या पक्षाच्या दडपशाहीच्या काळात ख्मेर मंदिरे पोरकी पडल्यासारखीच होती. 'ख्मेर रूज'चे सैनिक मंदिरांचा उपयोग छावणीसारखा करीत असत आणि त्या हेळसांडीमध्ये पुष्कळ मंदिरांचे फार नुकसान झाले. मंदिरांच्या आसपास सैनिकांनी शेकडो हजारो भूसुरुंग लावून ठेवले होते. त्यांच्या स्फोटांमुळे हातपाय गमावलेले शेकडो गरीब लोक आजहि देवळांबाहेर बसून काही वाद्य वाजवून परकीय प्रवाशांनी नाणी फेकण्याच्या आशेकडे डोळे लावून बसलेले दिसतात. मूर्तींच्या तस्करीची पुढील दोन बोलकी उदाहरणे (डावीकडे) पहा.
मूर्तीचोरी
मस्तकहीन द्वारपाल
नंदीबान्तेय् साम्रे मंदिरातील शंकराचे वाहन असलेला नन्दी

आता ही परिस्थिति बदलू लागली आहे. अंगकोर वाटसहित जवळच्या आणखी दोन मंदिरांना World Heritage Site चा दर्जा मिळाला आहे. जुन्या अवशिष्ट मंदिरांचे ह्यापुढे नुकसान होऊ नये म्हणून अनेक राष्ट्रांकडून तज्ज्ञ आणवून अवशेषांच्या रक्षणाचे काम चालू आहे. भारताच्या पुराणवस्तु विभागाने येथील 'ता प्रोहम' नावाच्या मन्दिरात असेच काम केले आहे. 'Lara Croft: Tomb Raider' ह्या सिनेमाचे चित्रीकरण ह्याच भग्न मन्दिरात झाल्यापासून प्रवासी लोकांचे ते एक महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे.
ता प्रोहम मंदिराच्या रक्षणाचे भारतीय कार्य

ह्या प्रास्ताविक परिचयानंतर पुढील भागांमधून ख्मेर शिल्पांची उदाहरणे पाहू. ह्यासाठी चार भाग केले आहेत. ह्यापुढील भाग २ मध्ये 'अंगकोर वाट' ह्या प्रख्यात मंदिरातील भिंतीवर कोरण्यात आलेली रामायण-महाभारत-समुद्रमन्थन इत्यादींची bas relief पद्धतीची शिल्पे पाहू. त्यानंतर भाग ३ मध्ये 'बान्तेय् स्रेइ' ह्या मंदिरातील पुराणान्तर्गत कथानके सांगणारी शिल्पे पाहू. भाग ४ मध्ये अंगकोर थोम ह्या प्राचीन शहरातील शिल्पे आणि तेथीलच बायोन मंदिरातील ख्मेर सैन्य, सर्वसामान्य प्रजेचे चित्रीकरण हे दर्शविणारी bas relief पद्धतीची शिल्पे पाहू आणि अखेरीस भाग ५ मध्ये उत्तरेकडच्या डोंगरातील 'तोन्ले साप' नदीच्या उगमाच्या पात्रात कोरलेली शिवलिंगे आणि आसपासची अन्य शिल्पे पाहू. (ह्या शिवलिंगांवरून त्या नदीस 'हजार शिवलिंगांची नदी' असे नाव पडले आहे.)

क्रमश:

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

22 Dec 2017 - 11:08 pm | धर्मराजमुटके

केवळ अप्रतिम लिखाण ! पुढील भागांची वाट बघत आहे.

प्रचेतस's picture

23 Dec 2017 - 10:14 am | प्रचेतस

उत्तम लिहिलंय.
तिकडील शिलालेखांची रचना देखील आपल्याकडील शिलालेख/ताम्रपटांसारखीच आहे. म्हणजे सुरुवातीला राजाचे गुणगान, पराक्रमांचे वर्णन, उपमांचा भरपूर वापर.

दुर्गविहारी's picture

23 Dec 2017 - 11:30 am | दुर्गविहारी

खुपच माहितीपुर्ण आणि उत्तम धागा. क्रमशः आहे वाचून आनंद झाला.
मि.पा.वर या पुर्वीच या संदर्भात लेखन झाले आहे, पण काही नवीन माहिती वाचायला आवडेल.
या आधीच्या धाग्याच्या लिंक देतो.
बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ११ - अंगकोर वट

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ६ : महामंदिर अंगकोर वट

उपेक्षित's picture

23 Dec 2017 - 12:43 pm | उपेक्षित

अतिशय उत्तम लिखाण, एकुणात हि मालिका माहितीपूर्ण असेल हे नक्की.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Dec 2017 - 3:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहितीपूर्ण लेख. पुभाप्र.

संग्राम's picture

23 Dec 2017 - 3:45 pm | संग्राम

पु.भा.प्र.

मनिमौ's picture

23 Dec 2017 - 6:30 pm | मनिमौ

अनेक वर्षापासून मनात घर करून आहे. जमल्यास पुढच्या वर्षी जायचा बेत आहे. लेख अतिशय आवडला. ही माहीती वाचून तिथे फिरताना नक्कीच ऊपयोग होणार आहे.
जमल्यास पुढच्या लेखांमध्ये स्थानिक वाहतूक जवळपास ची चांगली हॉटेल्स यांचा ही ऊल्लेख केलात तर खूप बर होईल

दीपक११७७'s picture

24 Dec 2017 - 12:18 pm | दीपक११७७

फारच छान माहिती. मज्जा आली वाचतांना.
पुभाप्र

दीपक११७७'s picture

24 Dec 2017 - 12:18 pm | दीपक११७७

फारच छान माहिती. मज्जा आली वाचतांना.
पुभाप्र