दिवस उजाडता.....

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in जनातलं, मनातलं
13 Dec 2017 - 8:38 pm

सकाळच्या चालण्याने आरोग्यसंपन्न आयु लाभते असं म्हणतात. पण रात्रीच्या सुखासिन झोपेचे साखळदंड तोडणं फार कठीण असतं, हा अनुभव आहे. त्यातून पुन्हा ह्यात सातत्य राखण्याचे अवघड उद्दिष्ट. मोठ्या कष्टसाध्य यशानंतर अवतीभवतीचं जग मला नव्याने 'दिसू' लागलं. नोव्हेंबर महिन्यातही मुंबईत पावसाळी वातावरणाने हवेत, सुखदपेक्षा जास्त आणि बोचरा म्हणता येणार नाही असा आल्हाददायी गारवा अनुभवत होतो. दूरवरून जाणार्‍या गाडीच्या इंजिनाचा भोंगाही, शास्त्रीय संगीतातील पहाटेच्या भूप रागाइतकाच प्रसन्न वाटतो. रात्रभराची झोप संपवून पक्षी (पक्षी: चिमण्या, कावळे, कबुतरे इ.इ.) उठून अगदी आकाशात नाही; तरी आजूबाजूच्या इमारतींवरून भरार्‍या घेत होते. कदाचित हा त्यांच्या पंखांना आवश्यक व्यायाम असावा. त्यांच्यातलेही काही माझ्यासारखे आळशी पक्षी जागे झाले होते पण फांदीवर बसून होते. पहाटेच्या वेळी कावळ्यांची, इतरवेळी कर्कश्श वाटणारी काव-काव, वसंतऋतुतील को़कीळेच्या कुहू-कुहू इतकीच मंजूळ वाटते. खार हे अत्यंत बडबडे प्राणी किच किच किच किच करीत झाडांच्या फांद्यांवरून पकडापकडी, हा मध्यमवर्गीय 'स्पोर्ट' खेळत होते. अजून रस्त्याला म्हणावी तितकी जाग आली नव्हती. रस्त्याच्या दोन्हीकडेला पार्क केलेल्या कार्स, अजून ऑफिसला जायला उशीर आहे म्हणून रात्री ज्या कुशीवर झोपल्या होत्या त्या कुशीवरच पडून होत्या. छोट्या-छोट्या पेंगुळलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणार्‍या क्रूर रिक्षा, जरा वरच्या वर्गाच्या स्कूल बसेसची धावपळ आणि आपल्या पाल्ल्याला स्कूटरवरून शाळेत सोडणार्‍या पालकांची रहदारी एव्हढीच काय ती रस्ता जागा होत असल्याची निशाणी होती. माझ्या फेरफटका मारण्याच्या मार्गावर एक इंग्रजी माध्यमाची शाळा होती. तिथे मात्र गलबला जास्त असतो. गावातून विविध ठिकाणांहून वाहणारे ओहोळ नदीला जाऊन मिळावेत तसे गल्लीबोळातून, एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून धावणारी ही ध्येयप्रेरित वाहनं त्या शाळेच्या मुख्य द्वारासमोर गर्दी करतात. बसमधून उतरलेले ह्या देशाचे सर्व भावी आधारस्त्तंभ, ती उत्साहाची कारंजी, आपापल्या मित्रपरिवारात मिसळून शाळेच्या इमारतीत शिरत असतात. एखादी पहिली-दुसरीतील गोंडस मुलगी, घरच्या कुंडीतून तोडून आणलेले गुलाबाचे टवटवीत फुल, आपल्या मैत्रीणींच्या नजरा चुकवित आपल्या खास 'मिस' करीता घेऊन जात असते. मोठ्या मुलीला स्कुटीवरून सोडायला आलेली एखादी आई धाकट्याला पाळणाघरात सोडून, ८.१७ ची लोकल पकडण्याच्या विवंचनेत असते. ती चुकली तर आज तिसरा लेट मार्क बसेल ही चिंता असते. तिच्या नोकरीमुळे एचडीएफसीचा हप्ता जात असतो. नोकरी टिकविणं अत्यंत गरजेचे असते. तर नातवाला सोडायला आलेले निवांत आजोबा नातू सुखरुप आणि सुरक्षितपणे शाळेच्या कंपाऊंडमध्ये गेल्याची खात्री करण्यासाठी थांबलेले असतात. नातवाने चिमुकल्या हाताने केलेल्या 'बाय बाय'ला एक सुरुकुतलेला हात उत्तर देतो आणि आजोबा घराकडे वळतात. रस्त्यात त्यांना दूध आणि पेपर घ्यायचा असतो. सुनबाईंनी चहा टाकला असेलच. एखाद दुसरं वगळता दुकानेही अजून नीट उघडलेली नसतात. दूध, भाजी, पाव, अंडी विकणारी मिश्र स्वभावाची कांही दुकाने लवकरच उघडतात. बाकी ९च्या पाळीवाले.

एखाद्या घरात देवपूजा सुरू असते. त्याची साक्ष चिमुकली घंटी आपल्या मंजूळ आवाजात आपल्या कानांपर्यंत पोहोचवत असते. कुठे मिल्क कुकर तर कुठे प्रेशरकुकर आपापले कर्तव्य बजावित असतो. एखादी महिला आपला केशसंभार पंच्यात गच्च गुंढाळून, तोंडाने स्त्रोत्र पुटपुटत, गॅलरीच्या ग्रील्समध्ये हौसेने लावलेल्या तुळशीला पाणी घालीत असते. रस्त्यात वृद्ध, पेन्शनर्स, न चुकता (मुळात झोप कमी असल्या कारणाने) मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले असतात. नाना-नानी, दादा-दादी पार्कचे जॉगींग ट्रॅक्स, बाकडी फुलून येत असतात. कानाला हेडफोनची बुचणी लावलेली आणि बीपी, स्टेप्स, कॅलरीज मोजणारी गॅझेट्स दंडावर बांधलेली तरूणाई जॉगिंग करीत असतात. डॉक्टरांच्या सक्तीमुळे पन्नाशीतले नववृद्ध हेल्थ कमविण्याच्या प्रयत्नात दिसतात आणि त्याचबरोबर आजूबाजूचे 'हेल्दी' निसर्गसौंदर्यही डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न करीत असतात. सकाळी सकाळी चालायला जाण्यासाठी त्यांनाही कांही इन्स्पिरेशनची गरज असते.

कुठे कोणी रिटायर्ड मिलिटरी कर्नल आपल्या भरभक्कम मिशांची आणि आपल्या उग्र जर्मन शेफर्डची दहशत मिरवत जात असतात. गल्लीतील कुत्री जर्मन शेफर्डकडे आदराने आणि असूयेने पाहात राहतात. पण त्याच्यावर भुंकत नाहीत. कदाचित त्यांना जर्मन शेफर्डची आणि कर्नलसाहेबांच्या हातातील छडीची भिती वाटत असावी. हे कर्नल साहेब एका दिशेने जाताना दिसतात, पण पुन्हा घरी परतताना दिसत नाहीत. दुसर्‍याच रस्त्याने परतत असावेत. कांही तरी लष्करी कावा असावा. एखादी नवयौवना आपल्या ल्युसी किंवा तत्सम नांवाच्या पामेरियन जातीच्या अति लाडावलेल्या आणि अ‍ॅटीट्यूडवाल्या कुत्रीला घेऊन जात असते. गल्लीचे कुत्रे तिच्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहतात, पण शक्यतो तिथेही मानवी सभ्यतेचे संकेत पाळत भुंकत नाहीत. मात्र एखादे अनोळखी गावठी कुत्रे त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करते झाले तर सर्वजण आपापसातील भांडणे, हेवेदावे विसरून एकजुटीने तुटून पडतात. ते कुत्रे शेपटी दोन पायांत घेऊन खाली मान घालून जात असेल तर प्रकरण भुंकाभुंकीवरच मिटते. प्रत्यक्ष हल्ला, मारामारी होत नाही.

आता बर्‍यापैकी उजाडलेले असते. पालिकेच्या मैदानावर मुले फुटबॉल, क्रिकेटचे धडे गिरविताना दिसतात तर मैदानाच्या कोपर्‍यात हास्यक्लबवाले हसण्याचे केविलवाणे धडे गिरवत असतात. मैदानासमोरचा हारवाला हार आणि फुलपुड्या विकण्यात मग्न असतो. ९ वाजेपर्यंत त्याचा व्यवसाय जोरात असतो. मधे मधे फुलांवर पाण्याचा शिडकावा मारत कालच्या फुलांना ताजं ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आणि ह्या मराठमोळ्या फुलवाल्याला कांही आज्या राष्ट्रभाषेत, 'भय्या, ताजी ताजी फुलं देओ हं, भगवानको चढाना है.' वगैरे दम देत असतात. ज्यांची फुलं घेऊन झाली आहेत अशा आज्या समोरच्या देवळाच्या पायर्‍या, राममंदिरातील उत्तरप्रदेशी रामाशी मात्र मराठीत संवाद साधत 'आले रे बाबा' म्हणत चढत असतात.

ऊन जाणवू लागलेलं असतं. रस्त्यावरची वर्दळ वाढलेली असते. अंडी, पाव, दूध घरपोच करणारी दुकानदारांची पोरं सायकली दामटत असतात. पहिल्या मजल्यावरचे आजोबा कोवळ्या उन्हाचा आणि सुनेने दिलेल्या पहिल्या चहाचा आनंद उपभोगत पेपरवर नजर टाकत असतात. नवरे मंडळी आज ऑफिसला जावं की चक्क दांडी मारावी ह्या रोजच्याच विवंचनेत असतात. ऑफिसातून येताना काय काय आणायचे आहे (नवर्‍याने) ह्याची यादी बायको सांगत असते आणि नवरा शेवटी नाईलाजाने, आंघोळीला काढलेल्या कुत्र्याच्या उत्साहाने ऑफिसला जायची तयारी करू लागतो.

आता किराणा मालाची दुकाने उघडली असतात. सकाळी सकाळी चालायला गेलेली माझ्या सारखी मंडळी घराकडे परतत असतात. बसस्टॉपवर रांगा वाढत असतात. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत सोडून आल्यावर आता शेअर रिक्षामधून चाकरमानी मंडळी स्टेशनकडे पळत असतात. घरकाम करणार्‍या बायका आणि गाड्या पुसणार्‍यांची वर्दळ सोसायट्यांमधून वाढलेली असते आणि....

दिवस नांवाचे महाप्रचंड यंत्र सुरु झालेले असतं.

कथालेख

प्रतिक्रिया

छान सकाळ चितारलीत. मजा आली.
पंधरा वर्षांपूर्वी आताच्या तुलनेत जराशी संथ सकाळ असे जुन्या मुंबईत. पण एका मंदिरात विजेची मोटार अन गियर्स अनेक घंटांना लावून अतितीव्र आवाजात आरती केली जायची ते ऐकायला असह्य होई.
(सध्या मुंबईत आलायत का काय?)

सूड's picture

13 Dec 2017 - 10:32 pm | सूड

सुंदर !! आठवडाभरा पूर्वीपर्यंत माझी सकाळ अशीच सुरु होती. आता जरा खंड पडलाय. पुन्हा मूळपदावर यायला हवंय.

वा. आम्ही पक्के सूर्यवंशी असल्याने तो चांगला वर आल्याशिवाय आमच्या मुखकमलावरून पांघरूण बाजूला करत नाही. तेव्हा अशी सकाळ पाहून आता जमाना लोटला असावा! असो. :-D

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Dec 2017 - 10:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं निरिक्षण आणि त्याचं शब्दांकन !

पेठकरजींच्या खास शैलीतले लेखन बर्‍याच दिवसांनी वाचून मजा आली ! आता परत सुरुवात केली आहे तर, तुमच्या व्यस्त कारभारातून थोडा वेळ काढून नियमितपणे लिहीत रहा, असेच म्हणेन.

प्रभाकर पेठकर's picture

14 Dec 2017 - 12:56 am | प्रभाकर पेठकर

खेडूत, सूड, एस आणि डॉ. सुहास म्हात्रे.

अनेक धन्यवाद. लिहीत राहण्याचा मानस आहेच पण दैनंदिन व्यस्तताही खूप आहे. महिनाभर रजेवर होतो म्हणून जमून गेलं. पाहूया आता कसे काय जमतंय ते पाहू.

खेडूतः हो आलो होतो मुंबईत नोव्हेंबर महिन्यात. पण तिथेही धावपळ होतीच. आता पुन्हा येणार आहे फेब्रूवारी किंवा मार्च मध्ये. तेंव्हा भेटूच.

पैसा's picture

14 Dec 2017 - 12:57 am | पैसा

बरेच दिवसांनी मिपावर असे काहीतरी छान साधे सरळ आणि प्रसन्न वाचले!

इरसाल's picture

14 Dec 2017 - 10:26 am | इरसाल

सकाळी लवकर उठवुनच सोडाल असे दिसतेय.
(आळशी इरसाल)

प्रभाकर पेठकर's picture

14 Dec 2017 - 2:15 pm | प्रभाकर पेठकर

हा हा हा! अरे मीही इरसाल आळशी आहे. व्यायाम, आरोग्य, मधूमेहासाठी चालण्याचे महत्व इ. विषयांवर मी तासंतास बोलू शकतो. पण कृतीची वेळ आली की मला घराबाहेर काढायला चार चार हत्ती लागतात. सध्या मोठ्या मुश्किलीने सुर गवसला आहे. रक्तशर्करा न्यूनतम पातळीला राखणे एव्हढे माफक ध्येय बाळगून आहे.

चांदणे संदीप's picture

14 Dec 2017 - 10:49 am | चांदणे संदीप

सुंदर लेखन! आवडले!

Sandy

प्रभाकर पेठकर's picture

14 Dec 2017 - 2:17 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद संदिप...

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Dec 2017 - 11:30 am | ज्ञानोबाचे पैजार

वेलकम बॅक, कसे आहात?
तुमचे नाव बोर्डावर पाहूनच आनंद झाला.
आणि तुम्ही लिहीता ते न आवडण्याचे काही कारणच नाही.
झकास एकदम झकास.
आता इकडे नियमित येत रहा.
पैजारबुवा,

प्रभाकर पेठकर's picture

14 Dec 2017 - 2:20 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद पैजारराव.

कार्यबाहुल्ल्यामुळे मिपावर येणे जमत नाही. नोव्हेंबर महिन्यात महिनाभर रजेवर होतो. त्यामुळे जरा वेळ काढता आला. लिहावेसे खुप वाटत असते पण वेळ आणि मूड ह्याचे गणित कांही जमत नाही. पण नक्कीच प्रयत्न करेन.

मनिम्याऊ's picture

14 Dec 2017 - 4:56 pm | मनिम्याऊ

छान वर्णन.
मंगल पांडे चित्रपटातील एक गीत आठवलं.

भोर आवे जो गंगा नहाने ,
रात हर घाट से हट जाये |

सूर्य किरणों की तलवार ताने,
और अंधियारा सब कट जाए|

कोई तट पे ही धूनी रमावे ,
कोई दर्शन को झटपट जाए |

जो भी आवे , मन की पावे ,
पाप सब जन्मो का धुल जाए |

लेके करवट उठे फ़िर बजरिया ,
और धंदा सभी खुल जाए |

लाला मुंशी पुजारी सिपहिया ,
हल्का भारी हर इक तुल जाए |

जोगी लेके फिरे इक तारा ,
और बस अपने मन की गाये |

खुले सभी के भाग का द्वारा ,
सभी कुशल मंगल हुई जाए |

प्रभाकर पेठकर's picture

14 Dec 2017 - 6:22 pm | प्रभाकर पेठकर

क्या बात है, मनिम्याऊ,

मस्त गाणे. ऐकलेच पाहिजे.

विजुभाऊ's picture

15 Dec 2017 - 10:43 am | विजुभाऊ

वा छान. पेठकर काका.
पुन्हा एकदा फॉर्मात आलात. बरे वाटले

संजय पाटिल's picture

15 Dec 2017 - 10:59 am | संजय पाटिल

एकदम खोलवर निरीक्षण आणि झकास लेखण!

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2017 - 2:10 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद विजूभाऊ संजय पाटील.

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2017 - 2:12 pm | प्रभाकर पेठकर

कृपया, विजूभाऊ आणि संजय पाटील असे वाचावे.

खुप खुप छान लिहीले आहे. मधून मधून अगदी मनातून दाद निघत होती वाह वा म्हणून.

माझाही मागील काही दिवसापासून मॉर्निंग वॉकच्या प्रवासाबद्दल लिहायचा विचार चालू आहे. वेळ मिळेल तेव्हा लिहेन. शहरातले वातावरण किती सुरेख लिहील आहे तुम्ही. आमचे जरा सुधारीत गावातले वातावरण.

प्रसाद_१९८२'s picture

15 Dec 2017 - 2:49 pm | प्रसाद_१९८२

खूपच आवडले.

NiluMP's picture

15 Dec 2017 - 5:57 pm | NiluMP

मस्त.

अँड. हरिदास उंबरकर's picture

15 Dec 2017 - 8:10 pm | अँड. हरिदास उंबरकर

सुंदर.. शब्दांकन अप्रतिम

ज्योति अळवणी's picture

15 Dec 2017 - 8:22 pm | ज्योति अळवणी

खूप सुंदर वर्णन. मनापासून आवडलं

पद्मावति's picture

15 Dec 2017 - 8:53 pm | पद्मावति

खुप सुंदर लिहिलंय.

प्रभाकर पेठकर's picture

17 Dec 2017 - 1:40 am | प्रभाकर पेठकर

जागु, प्रसाद-१९८२, NiluMP, अँड. हरिदास उंबरकर, ज्योति अलवनि, पद्मावति मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहानात्मक प्रतिसादांमधून पुढील लिखाणास बळ मिळेल..

अमितदादा's picture

17 Dec 2017 - 2:17 am | अमितदादा

उत्तम लेख आवडला...

ज्ञानव's picture

17 Dec 2017 - 7:57 pm | ज्ञानव

सकाळ खरंच प्रसन्न रंगवली आहे. नोव्हेंबर गुलाबी थंडीचा होता आणि त्या थंडीतले बारिक निरीक्षण लाजवाब रंगले आहे.

आयुष्याची संध्याकाळ फटफटायला लागली की सकाळी चालायला जाणे अवघड होते. इमारतीच्या गेटपर्यंत मुलाला शाळेसाठी सोडायला जाताना किलकिले डोळे करून माॅर्नींग वाॅकर्स आणि काही "अर्ली बर्डस्" पाहूनही चालायला जाण्याचा आग्रह मोडीत निघतो आहे.
शर्करा लेव्हल मेंटेन आहे तो पर्यंतच सकाळी फिरायला जाण्याचा दुग्धशर्करा योग जमवून आणायला हवा.

शिव कन्या's picture

17 Dec 2017 - 9:28 pm | शिव कन्या

काका, सगळ्या भूपाळ्या एकदम कानामनात गोळ्या झाल्या.
फार सूक्ष्म निरीक्षण. आणि हो, बाकीच्या मिपाकरांशी सहमत.... नियमित लिहित रहा.
आवड तुम्हाला आहेच, सवडही निघेलच.

सई कोडोलीकर's picture

19 Dec 2017 - 11:27 am | सई कोडोलीकर

छान वाटलं वाचताना. लेख आवडला.
असं साधं सुंदर फार कुणी लिहितच नाहीत आजकाल. तुम्ही तरी थोडी सवड नक्की काढत जा, काका.

सिरुसेरि's picture

19 Dec 2017 - 1:00 pm | सिरुसेरि

खुप सुंदर लेखन . +१

इरसाल's picture

19 Dec 2017 - 3:24 pm | इरसाल

जोशाला (जोशी नव्हे ;)) पुढे घट्ट पकडुन ठेवत एक छानशी पाकृ पण येवु द्या !

मुक्त विहारि's picture

22 Dec 2017 - 11:07 pm | मुक्त विहारि

लेख आवडला...

निरिक्षणातुन केलेले छान लेखन !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]

यशोधरा's picture

25 Dec 2017 - 8:55 pm | यशोधरा

वा काका, मस्त लिहिलंय.